? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग -3 ☆ श्री आनंदहरी ☆

अंथरुणावर आडवं झाल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिने झोपेत पोराचे पाय पोटावर लागू नयेत म्हणून मध्ये अंतर ठेवले होते. नाही म्हणलं तरी पोराकडं जरा दुर्लक्षच होतंय हे तिला जाणवत होतंच.. तो विचार मनात येताच तिला आतून भरून आलं. शांत झोपलेल्या पोराकडे तिने मायेने पाहिलं. ती हात लांब करून पोराला उगाचच हळुवार थोपटू लागली. ‘ काहीही न कळण्याचे वय पण बरेच शहाण्यासारखे वागतंय ‘ असं तिच्या मनात आले..

घरात आणखी कुणी असतं तर बरे झाले असते.. आपले काम, त्यात हे दुसऱ्यांदा गरोदर राहणं.. कुणाची, कशाची फिकीर नसणारा बाप यात पोराची फार आबाळ होतेय ती तरी झाली नसती.., तिच्या मनात उगाचच पोराची काळजी दाटून आली. ..पण घरात दुसरं असणार कोण ? जवळच असे कुणी नव्हतंच.. जे कुणी होते त्यांच्याशी तिच्या नवऱ्याने संबंध ठेवले नव्हते.. आणि तिला मनातून कितीही वाटत असले तरी तिला ठेवू दिले नव्हते.. त्याच्या दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या सवयीमुळे शेजारी-पाजारीही  तिच्याशी नसले तरी त्याच्याशी तुटूनच होते.. पण तरीही तिने मात्र शेजारधर्म पाळला होता.. शेजार राखला होता.

तिला जरा आराम वाटत असला तरी हवी असूनही झोप काही येत नव्हती. उगाचच मनात काहीबाही विचार येत होते. तिला नवऱ्याची आठवण आली. ‘ कुठं असतील ? कसे असतील ? अजून का घरी आले नाहीत ? ‘ अशा प्रश्नांच्या वावटळीत तिचं मन भिरभिरु लागलं होतं, भरकटू लागलं होतं.तिला नवऱ्याची जास्तच आठवण येत होती. तो दारू पिऊन घरात आला की नुस्ता दंगा-धुडगूस घालायचा. तिला शिव्यांची लाखोली वाहायचा, मारहाण करायचा… तिला तो घरात आलाच नाही तर बरे होईल असे तेंव्हा वाटायचं.. पण आत्ता मात्र तो यायला हवा, घरात असायला हवा असे वाटत होतं पण  कर्फ्यु लागल्यापासून त्याचा पत्ताच नव्हता. खरंतर त्याच्या विचाराने  तिच्या डोळ्यांत दाटून आलेली झोप पाला-पाचोळ्यासारखी उडून गेली होती.

तिला अस्वस्थ वाटू लागले तशी ती हाताला रेटा देत उठून बसली. नकळत तिची नजर पोराकडे गेली. ते कुशी बदलून गाढ झोपलेले होते. आपल्या अवतीभवती काय घडतंय याची त्याला खबतबातही नव्हती. तिची अस्वस्थता वाढू लागली. पोटात कळा येऊ लागल्या. वेदना असह्य होऊ लागली. गात्रागात्रात फक्त वेदनेचीच जाणीव भरून राहिली. तिचा चेहरा कसानुसा होत होता..

” देवा ss माणकुबा ss! “

तशाही स्थितीत तिने हात जोडून देवाची करुणा भाकली.

” चार रोज थांब रं….आरं दिस उजडंस्तवर तरी थांब बाबा ..”

ती पुटपुटली.. त्यावेळी तिची नजर स्वतःच्या पोटाकडे होती.. ती एकाच वेळी देवाला आणि येणाऱ्या जीवाला विनवीत होती.

पोटातील कळा थांबण्याचं चिन्ह दिसेना. ‘ काहीतरी करायला पाहिजे… कुणालातरी बोलवायला हवं..कुणाला बोलावणार ?’  मनात विचार येताच तिची नजर झोपलेल्या पोराकडे गेली.

‘त्येला हाळी मारून उठवावं काय ? तर येवडंसं प्वार.. ती काय करंल ?  उलटं भेदरून जायाचं … त्येला नगंच ..’ ती उठून  उभारायचा प्रयत्न करू लागली. असह्य कळांमुळे तिला जमेना.. ती तशीच खुरडत, सरकत दाराकडे निघाली.. पुढेही सरकवेना.. ती शेजारणीला हाका मारू लागली पण समोरची काहीच चाहूल लागेना… जीव घाबराघूबरा झाला होता.. साऱ्या अंगातून त्राण निघून गेल्यासारखे वाटत होते. वेदनेचा आगडोंब साऱ्या शरीरात पसरला होता. ती ओरडू लागली..किंचाळू लागली.. आक्रन्दू लागली. तिचा जीव गुदमरू लागला.  वेदना वाढतच प्राणांतिक वेदनेने ती धडपडत राहिली.. तिचा आवाज, ओरडणे, किंचाळणे कमी झालं… थांबले….  रात्रीची असह्य शांतता पुन्हा भवतालात भरून राहिली.

क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments