सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ त्रिकोण -भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(सोहमने सांगितलेलं सकारात्मक विचारांचं महत्त्व पटल्यामुळे सरलाचं टेन्शन नाहीसं झालं. हे पाहून सोहमलाही बरं वाटलं…. आता पुढे )

‘तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, आई. तू मघाशी बाबांचं आणि दादाचं कौतुक करत होतीस. म्हणजे ‘बिचारे ‘, ‘कधी सासू -सुनेच्या मध्ये पडले नाहीत ‘वगैरे वगैरे….’

‘खरंच आहे ते.’

‘खरं असेल, पण त्याला गुण नाही म्हणता येणार.’

‘म्हणजे?’

‘म्हणजे बघ हं. समिधा ‘माझी ‘ बायको म्हणून आपल्या घरी येईल. म्हणजे आधी तिचं ‘माझ्याशी’ नातं जुळेल आणि नंतर तुझ्याशी, बाबांशी, आपल्या घराशी.’

सरला काही न बोलता त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत राहिली.

‘तिला या घराशी ऍडजस्ट व्हायला मदत करणं, हे ‘माझं’ काम आहे. त्याचबरोबर तिला तुमच्याविषयी, या घराविषयी आपलेपणा कसा वाटेल, हे बघणं, हे ‘माझं’ काम आहे. हे करत असताना तिला काही अडचणी आल्या, तरी त्या सोडवणं, हे ‘माझं’ काम आहे. उलटपक्षी, ती इथे आल्यावर तुला – बाबांनाही काही बाबतीत प्रॉब्लेम्स येऊ शकतील. तसं झालं, तर तुमचे प्रॉब्लेम्स सोडवणं, हेही ‘माझंच’ काम आहे.’

सोहम बोलत होता. सरला मन लावून ऐकत होती.

‘आता एक सांग आई, सासू-सुनेमध्ये भांडणं का होतात?’

‘कितीतरी कारणं असतात. सासू-सून हे नातंच कुविख्यात आहे. विळ्या-भोपळ्याचं सख्य असलेलं. अगदी पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकं चालत असलेली दुष्मनी आहे ती. त्यांच्यातल्या भांडणांची कारणं तरी अगणित असतील.’

‘पण त्या सगळ्यांचं मूळ कारण, रूट कॉज आहे पझेसिव्हनेस -मालकी हक्काचा हव्यास. सासूला वाटतं -हा माझा मुलगा आहे. सुनेला वाटतं -हा माझा नवरा आहे.’

‘बरोबरच तर आहे.’

‘तसं हे बरोबर आहे. पण आतापर्यंत आपला असलेला हा मुलगा आता आपल्या सुनेचा नवरा लागतोय, तिच्याही त्याच्यापासून काही अपेक्षा असणार, याचं भान सासूने ठेवलं पाहिजे. तसंच सुनेनेही, आपला नवरा हा त्याच्या आईचा मुलगा आहे, हे लक्षात घेऊन लग्न झाल्यानंतर त्याने आपलं हे मूळ उखडून टाकावं, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण प्रत्यक्षात घडतं काय? तर दोघींनाही तो पूर्णपणे आपला असावा, असं वाटतं. आणि या वाटण्याचा फायदा कोण घेतो, माहीत आहे? सासूचा मुलगा आणि सुनेचा नवरा. तो दोघींकडूनही स्वतःचे लाड करून घेतो आणि त्याच्यावरून विवादाचा प्रसंग आला, की बिलंदरपणे ‘मी मध्ये पडणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या’  म्हणून नामानिराळा होतो.’

‘बघूया हं आमचा सोहमबाळ काय करतो ते,’ सरलाने चिडवलं. पण सोहम गंभीरच होता.

‘खरं तर त्याचं काम असतं पुलाचं. सासू आणि सुनेमधला सेतू बनलं पाहिजे त्याने. एकमेकींविषयी एकमेकींना वाटणारा जिव्हाळा, कौतुक, चांगल्या गोष्टी परस्परांपर्यंत ‘त्यानेच’ पोहोचवल्या पाहिजेत. एकीच्या मनात दुसरीविषयी कटुता आली, तर सामंजस्याने सुसंवाद साधून, समाधानकारकरीत्या गैरसमज दूर करण्याचं काम ‘त्याचं’आहे. प्रेमाचा त्रिकोण वगैरे म्हणतात ना? पण मला मात्र हा वेगळाच त्रिकोण दिसतोय.’

‘त्रिकोण?’

‘हो. त्रिकोण. तू, मी, समिधा हे त्या त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाने आपले दोन्ही हात पसरले आहेत आणि उरलेल्या दोघांचा एकएक हात धरलाय. त्यामुळे तयार झालेल्या त्रिकोणात आपलं विश्व सामावलंय. आपलं सुखीसमाधानी, आनंदी विश्व.’

‘खरोखरच मोठा झाला माझा सोहमराजा.’

‘पण तुझ्यासाठी मात्र सोहमबाळच आहे हं मी,’असं म्हणत त्याने सरलाच्या मांडीवर डोकं ठेवलं.

समाप्त 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments