? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग – 4 ☆ श्री आनंदहरी

” अवो ss ! वाईच उठतायसा का ? “

शेजारची रखमा नवऱ्याला जागे करण्याचा प्रयत्न करत होती.

” गप झोप की..”

नवरा पांघरूण तोंडावर घेत झोपेतच त्रासिकपणे कावदारला.

” अवो, पर सखू आरडल्यावानी वाटली..”

”  मंग.. ? “

नवऱ्याने जास्तच त्रासिकपणाने विचारले.

” वाईच बगूया काय… ? “

” तेच्यात काय बगायचं हाय ..? मारत्या आला आसंल ढोसून.. दिलं आस्तील दोन-चार तडाखं ..तुमा बायकांस्नी सवंच आस्ती.. वाईच ब्वाट लागली का बोंबलायची..  गप झोप… आन मलाबी झोपुनदेल..”

रखमा काही क्षण गप्प झाली. नवरा म्हणाला ते संगळंच काही खोटं नव्हतं तरी पण तिला राहवेना..

थोड्या वेळाने ती परत नवऱ्याला जागं करत म्हणाली,

” अवो,पर…”

” गप झोपतीस का आता.. का तुला बी..?”

तो आणखीनच चिडून म्हणाला तशी ती गप्प झाली. तो बोलल्यासारखा दोन तडाखे द्यायला कमी करणार नाही याची तिला खात्री होतीच.. पण रखमाला काही चैन पडेना. नाही म्हणलं तरी इतक्या वर्षाचा शेजार होता. त्यात सखू प्रत्येक वेळेला अडी-नडीला उभा रहात होती. तिला ही सखूबद्दल आपलेंपणा वाटत होताच. थोडा वेळ ती तशीच अस्वस्थशी कानोसा घेत बसून होती. अधून-मधून सखूचा आवाज येतंच होता.

काहीतरी विचार करून ती उठली आणि दाराकडं जाऊ लागली.

नवरा जागाच होता.. त्याला तिची हालचाल जाणवली तसे त्याने चिडक्या आवाजात, जाब विचारावा तसे विचारले,

” कुटं निगलीस येवड्या रातचं ? “

” सखूकडं बगती जाऊन ..”

” येवड्या रातचं ? तुज्या बाचं काय गटूळं पुरलया व्हय ततं ? “

” गटुळं ततं कशापायी पुरंल माझा बा ? “

ती काहीशी चिडून म्हणाली.. लगेच पुढं समजावणीच्या सुरात म्हणाली,

” अवो, सखू पोटुशी हाय..”

तिच्या आवाजातील तिखटपणामुळे त्याच्या स्वरातील पुरुषी कडकपणा काहीसा कमी झाला.

” आगं, मारती आला आसंल ढोसून.. आन करफू हाय ती इसारलीस व्हय ? पोलिसांनी गोळी-बिळी घातली मजी .. ? “

नवऱ्यानं कर्फ्युची आठवण करून दिली तशी ती काहीशी घाबरली आणि थबकली.

” आगं, आन तसंच काय आसतं तर आगुदरच बोलीवलं नसतं का सखूनं तुला ? मारत्याच आला आसंल.. उगा कशापाय जीवाची जोखीम घ्याची ? “

‘ सखूनं बोलावले नसते का ?’ हा नवऱ्याचा मुद्दा तिला पटल्याचे जाणवलं. त्यात सखूचा आवाजही आधी येत होता तसा येत नव्हता. ती थबकली. ती थबकलेली पाहून तिचा नवरा म्हणाला,

” सकाळच्या पारी बगू काय ती.. करफु बी उठायचा हाय. तू बी झोप आता आन मलाबी झोपूदेल.. करफू उठतुया म्हनल्याव कामाव जाया नगं ? “

दाराकडे निघालेली रखमा परत फिरली होती.

‘आगं, सखू काय पयल्यांडाव पोटूशी ऱ्हायलीया व्हय ?  तिनं बोलवली नसतं व्हय तुला..? ‘ नवऱ्याचं हे सांगणंही तिला पटलं होतं. नवरा म्हणाला त्यात तथ्य होतंच. ती माघारी येऊन अंथरुणावर आडवी झाली.

  • ● ●        ●         ●         ●        ●

क्रमशः……

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments