सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ ती… भाग – १ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
साडेआठ वाजले तसा पर्समध्ये डबा आणि चपलेत पाय कसेतरी कोंबून ती घाईघाईने घराबाहेर पडली. कितीही भरभर चालली तरी स्टेशनपर्यंत पोहोचायला अर्धा तास तरी लागायचाच. त्यामुळे नऊ सातची लोकल पकडायची तर साडेआठ वाजता घराबाहेर पडायला पर्यायच नसायचा. आणि लोकलमध्ये बसायला जागा मिळेल याची शाश्वती कधीच नसायची. कारण याबाबतीत ‘हाजीर तो वजीर’ हा एकच नियम होता. आणि बरेचदा तिला ५, ७ मिनिटं उशीरच व्हायचा निघायला.
खरंतर पहाटे ४-४॥ वाजताच उठायची ती. आणि इतरांची झोपमोड होऊ नये याची काळजी घेत स्वयंपाकाचे काम उरकतांना त्रेधा उडायची तिची. सहा सव्वासहा वाजता, तिचा नवरा सोडून बाकी सगळे उठायचे. बाकी सगळे म्हणजे तिच्या दोन मुली आणि सासू-सासरे. साखर झोपेत असणाऱ्या दहा आणि बारा वयाच्या त्या मुलींना जबरदस्तीने उठवायचं रोजच तिच्या खूप जिवावर यायचं… वाईट वाटायचं. पण त्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कसंतरी त्यांचं चहापाणी, अंघोळ वगैरे उरकून, एकदा त्यांच्या घट्ट वेण्या घालून दिल्या, की मग सासू-सासऱ्यांचा नंबर असायचा. दोघांचंही तसं वय झालं होतं. सासऱ्यांचा एक पाय अर्धांगवायू होता होता वाचला होता, पण त्याला साहजिकच अधूपणा आला होता. सकाळचं सगळं आवरतांना त्यांना तिची मदत घ्यावीच लागायची. सासूबाई शरीराइतक्याच मनानेही खूप थकलेल्या होत्या. त्यांचा भार स्वत: पेलत त्यांना बाथरूममध्ये नेऊन, सगळं आवरून पुन्हा कॉटवर झोपवण्यापर्यंतची सगळी जबाबदारी जणू तिच्या एकटीचीच होती. पण त्याबद्दल तिच्या तोंडून तक्रारीचा एकही शब्द कधी उच्चारला जात नव्हता. तिचं जन्मजात कर्तव्यच होतं ना ते. मग पडलेले सगळे कपडे पटापट धुवून वाळत घालायचे. पडलेली भांडी घासून टाकायची. केरवारे करायचे. आधीच करून ठेवलेला नाष्टा सगळ्यांना द्यायचा. तोपर्यंत नवरा उठायचा. मग त्याचे ताल सांभाळत कसंतरी स्वत:चं आवरून घ्यायचं. मुलींचा आणि स्वत:चा डबा भरायचा … ही तिची सतत चाललेली धावपळ अतिशय त्रयस्थपणे आणि निर्विकारपणे पहाणारं भिंतीवरचं पिवळं पडलेलं घड्याळ, साडेआठचा ठोका पाडण्यासाठी जणू आसुसलेलं असायचं, आणि तो ठोका पडताच, मुलींकडे, नवऱ्याकडे, आणि राहून गेलेल्या कामांकडे अक्षरश: पाठ फिरवून ती घराबाहेर पडायची.
आजही ती तशीच बाहेर पडून, तरातरा चालत स्टेशनच्या दिशेने निघाली… त्याक्षणी तसं तरातरा चालणं हे आयुष्याचं एकमेव ध्येय असल्यासारखी… आणि आज गाडी प्लॅटफॉर्मवर लागत असतांनाच ती चक्क नेहेमीच्या ठरलेल्या डब्यापर्यंत पोहोचलीही होती. पटकन् डब्यात चढून आत जाताजाता खिडकीजवळची एक सीट रिकामी दिसली, आणि तिने अक्षरश: झेप घेत ती जागा पटकावली. ‘या गाडीला घरी काही कामं-धामं नसतात वाटतं… ठरल्यावेळी रोजच नेमकी कशी पोहोचते प्लॅटफॉर्मवर? ’… हा न चुकता रोज मनात येणारा गंमतीदार विचार आज तिने मनापासून एन्जॉय केला आणि ती जाम खूश झाली… कारण आज तिला बसायला, तेही खिडकीजवळ बसायला जागा मिळाली होती. आता पुढचा तास-सव्वा तास तरी तिला एकही धक्का पचवावा लागणार नव्हता. कारण आता एकदम शेवटचं स्टेशन येईपर्यंत, ती एका जागी निवांत बसू शकणार होती. आज हा वेळ फक्त तिचा एकटीचा होता… फक्त तिच्या एकटीचा. रोजच्या ओळखीच्या चेहेऱ्यांकडे पाहून ओळखीच्या हसण्याची देवाण-घेवाण झाल्यानंतर, त्या खिडकीच्या चौकटीवर हात टाकून ती निवांतपणे बाहेर बघत बसली. ती खिडकी म्हणजे आपल्या जिवलग मैत्रिणीचा हक्काचा खांदा आहे असं तिला मनापासून वाटून गेलं… आणि तिचं मन एकदम हलकं झालं. मग मागे पळणाऱ्या झाडांबरोबर तिचं मनही मागे कधी पळायला लागलं ते तिलाही कळलं नाही.
… रत्नागिरी जवळचं ‘वारे’ गाव हे तिचं माहेर… अतिशय रम्य, प्रसन्न, छोटंसं, सुंदर गाव… एकीकडे नितळ निळाशार शांत समुद्र… पांढरट, पिवळ्या वाळूची स्वच्छ चादर पांघरलेला समुद्रकिनारा… पहावं तिथे सुखद-गार वाऱ्याबरोबर मजेत डोलणारी नारळी-पोफळीची, सुरुची झाडं… अलिकडे आंब्याच्या झाडांमध्ये शांतपणे विसावलेली, लाल कौलांनी शाकारलेली, टुमदार बैठी घरं… शेणाने स्वच्छ सारवून, छोट्या पण सुबक रांगोळीने सजलेली अंगणं… लहान मोठ्या प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी-वृंदावनात विसावलेली, शांत डुलणारी तजेलदार तुळस… आणि अंगणाच्या सभोवताली अनेक प्रकारची फुलझाडं… कुणालाही पाहताक्षणी मोहात पाडणारं हे तिचं अतिशय आवडतं माहेर गाव. त्यातलंच एक, सदैव आनंदाने-समाधानाने फुलून राहिलेलं तिचं माहेरघर… तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे तिचे आई-वडील… दोघे मोठे भाऊ. पैशाची श्रीमंती फारशी नसली, तरी मनाने कमालीची श्रीमंत असणारी ही माणसं… …. बघताबघता ती कधी तिथे पोहोचली हे तिला कळलंही नाही… नेहेमीच्याच स्टेशनांवर लोकल थांबत होती… उतरणारे-चढणारे चेहेरेही बहुतांशी तेच होते. पण ती मात्र त्याक्षणी जणू तिथे नव्हतीच. एव्हाना तिची ओट्याशी उभ्या असलेल्या तिच्या आईला मागून जाऊन घट्ट मिठी मारूनही झाली होती. वडलांच्या कुशीत विसावून झालं होतं. दोन्ही भावांचे हात पकडून आनंदाने गिरक्या मारून झाल्या होत्या. मग धावतच अंगणात भिरभिरून झालं होतं. सगळ्या झाडांशी गप्पा मारून झाल्या होत्या. आणि आत्ता आईच्या हातचं खमंग थालिपीठ चवीचवीने खात ती अंगणाच्या पायरीवर निवांत बसून आठवणीत रमली होती…..
…. अगदी सहजपणे ती दहावीपर्यंत ज्या शाळेत शिकली होती, ती शाळा, सगळ्या बाई, सगळ्या शाळू-सोबती… सगळं सगळं डोळ्यांसमोर तरळून जात होतं. मोठे दोघे पाठोपाठचे भाऊ रत्नागिरीतल्या कॉलेजमध्ये शिकत होते. हिनेही हट्ट धरल्यावर वडलांनी तिथेच तिचं ११ वी साठी नाव घातलं होतं. तीन तीन मुलांना कॉलेजमध्ये घालतांना वडलांची किती ओढाताण होत होती, हे सत्य तिच्यापर्यंत कधीच पोहोचलं नव्हतं. ती काही खूप हुशार नव्हती. अगदी मन लावून अभ्यास करूनही १२ वीत जेमतेम ५५% पर्यंत पोहोचली होती. पण आईच्या हाताखाली घरकामात मात्र बरीच तरबेज झाली होती. १२ वी नंतर तिचं शिक्षण थांबवावं लागलं. वडील स्थळं शोधायला लागलेच होते. तिचं रहाणं-दिसणं साधंसुधं असलं तरी ती चुणचुणीत होती. लवकरच हे मुंबईचं स्थळ आलं. मुलगाही १२ वी पर्यंत शिकलेला, पण स्मार्ट होता. एका चांगल्या कंपनीत स्टोअर-कीपर म्हणून नोकरी करत होता. स्वत:चं घरदार वगैरे नव्हतं, पण मुंबईत ते असणं, त्याचं वय लक्षात घेता तसं कठीणच असणार, असं सहज गृहीत धरलं गेलं होतं. त्याच्या दोन मोठ्या बहिणी त्यांच्या सासरी सुखात होत्या. त्यामुळे आई-वडील-मुलगा एवढीच माणसं घरात असणार होती. शिवाय ते स्थळ ओळखीतून आलेलं… मग लग्न ठरवायला कितीसा उशीर लागणार? तिलाही मुलगा आवडला, आणि मुंबईला जायला-रहायला मिळणार याचा आनंद तर काकणभर जास्तच होता, इतकं मुंबईबद्दल ऐकलं होतं… नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे चारच महिन्यात वडिलांनी त्यांच्या परीने थाटात लग्न करून दिलं, आणि ती नवी नवरी मुंबईत आली…
… डब्यात एकदम गडबड, गलका सुरू झाला, आणि ती भानावर आली. शेवटचं स्टेशन आलं होतं. डब्याच्या दाराशी उतरण्यासाठी झुंबड उडाली होती. तिला मात्र आज तिथेच तसंच बसून रहावंसं वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. सावकाशीने उठून, सगळ्यांच्या शेवटी ती खाली उतरली. आता मात्र पावलं सवयीनेच झपझप पडायला लागली. पण आज मन मात्र सारखं आठवणीत रेंगाळत होतं.
अतिशय उत्सुकतेने नवरा आणि खूप सारी स्वप्नं यांच्या बरोबर ती मुंबईला आली. एका चाळीतल्या वरच्या मजल्यावर त्याचं घर होतं. पण इतकं लहान? … वन रूम – किचन – थोडी रुंद पण स्वतंत्र गॅलरी…. बस् एवढंच्? क्षणभर दचकली होती ती. अंगण नाही… फुलझाडं नाहीत… तुळशी वृंदावन नाही… पण तिने लगेच स्वत:ला सावरलं… होईल की पुढे-मागे स्वत:चं घर असं स्वत:ला सहज समजावलं तिने, आणि मग ते घर तिला मनापासून आपलं वाटलं. सासूबाईंनी अलगद ते घर तिच्या ताब्यात दिलं होतं, याचं फार अप्रूप वाटायचं तिला. तिचं आवर्जून कौतुक केलं नाही, तरी कशाबद्दल तक्रारही नसायची त्यांची. तिने घर छान सजवलं होतं… घरकामाबद्दल प्रश्नच नव्हता. तिचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू झालं.
– क्रमशः भाग पहिला
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈