मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माहेर…..ग. दि. माडगुळकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ काव्यानंद ☆ माहेर…..ग. दि. माडगुळकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर

टोपणनाव: गदिमा

रसग्रहण:

शाळेतील विज्ञानाचा किंवा भूगोलाचा तास आठवतो का? मग जलचक्रही आठवत असेल. पाण्याची वाफ होऊन पाऊस पडणे आणि हाच क्रम पुनः पुन्हा होत रहाणे म्हणजे जलचक्र. आठवतंय ना? पण हे असं रूक्ष भाषेत समजावून सांगण्यापेक्षा थोड्या अलंकारीक, काव्यात्मक भाषेत सांगितलं तर? विज्ञान आणि तेही काव्यातून ? कठीण वाटतं ना ? पण जो कल्पना विश्वावर राज्य करीत होता आणि शब्द ज्याला मुजरा करीत होते असा एक महाकवी या महाराष्ट्रात होऊन गेला.त्याचं नांव गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच आपले गदिमा ! त्यांनी हा चमत्कार करून दाखवला आहे. हा चमत्कार म्हणजेच आजची त्यांची ‘माहेर’ ही कविता अर्थात ‘नदी सागरा मिळता’.

नदी पर्वतातून उगम पाऊन वाहत येते व शेवटी सागराला जाऊन मिळते. त्यामुळे  पर्वत, डोंगर हे तिचे माहेर. ज्याला सर्वस्व अर्पण केले तो सागर तिचा पती. तेच तिचे सासर.ती काही तेथून परत येऊ शकत नाही. म्हणजे तिचे माहेर कायमचे तुटलेच असे म्हणावे लागते. पण हे झाले तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी.कवीची दृष्टी एवढी मर्यादीत असत नाही. शब्दांचे पंख लेऊन कल्पनेच्या विश्वात रसिकांना घेऊन जातो तोच खरा कवी. त्यामुळे नदीचे माहेर तुटले हेच कविला मान्य नाही. कवी काय म्हणतो पहा.

सागर नदीचे अवघे जीवन पोटात घेतो पण नदीला मात्र तिच्या पित्याची, डोंगराची आठवण येत असतेच. कसे भेटावे त्याला ? कसे जावे माहेराला ?

माहेरच्या  भेटीची ओढ पूर्ण करण्यासाठी मग ती वाफेचे रूप घेते. वार्याचे पंख लावते आणि मेघांच्या ओंजळीतून पावसाची सर बनून डोंगराच्या पोटी जन्म घेते. वाळे वाजवत वाजवत पुन्हा अवखळ पणे वाहू लागते.शेवटी परत सागराला येऊन मिळते आणि कवीचे जलचक्र पूर्ण होते.

नदी ,डोंगर,सागर……

स्त्री,  माहेर,सासर.

एक रूपकात्मक काव्य. स्त्री सासराशी एकरूप झाली  तरी माहेर कसं विसरेल ? माहेरी जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तिला माहेरी घेऊन जातेच. अगदी नदीप्रमाणे.आणि चार दिवस माहेरपण करून आल्यावर आपोआप सासरची वाट धरते. नदीप्रमाणेच. वर्षानुवर्षे हेच चालत आलय. जीवन चक्र आणि जलचक्रही. खरंच आहे. जीवन म्हणजेच जल ना ?

‘सारे जीवन  नदीचे घेतो पोटात सागर’

या ओळीत कविला जीवन म्हणजे आयुष्य आणि नदीचे पाणी अशा दोन्ही अर्थानी तर हा शब्द वापरायचा नसेल ना असे वाटते.

वार्याचे पंख लावून नदी तरंगत तरंगत डोंगराकडे जाते.अगदी तसच, माहेरच्या वाटेवर असतानाच स्त्री मनाला पंख लावून केव्हाच माहेरी पोहोचलेली असते.

कवी म्हणतो, नदी माहेरी जाते, म्हणून जग चालते. माहेरपणाच्या उर्जेवर स्त्री सासरी पुन्हा रमून जाते,असं कविला सुचवायच आहे,असं वाटतं.

असं हे जलचक्र!काव्यानंद देता देता विज्ञान सांगणारे ,गदिमां च्या प्रतिभेचा साक्षात्कार घडवणारे .

खरंच, जेथे गदिमा तेथे प्रतिभा.!

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ काव्यानंद ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

रसग्रहण:

आयुष्यामध्ये कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला; मग ती एखादी कला असो, संशोधन असो, वारी किंवा परिक्रमा असो, देशसेवा असो त्या ध्यासापायी सर्वस्व उधळून देणे, त्या ध्येयाची धुंदी चढून इतर जाणिवा नाहीशा होणे ही जी तन्मयतेची, तंद्रीची, झपाटलेपणाची स्थिती आहे तिला म्हटले आहे “झपूर्झा “.

असा एखादा ध्यास घेऊन,त्यासाठी जगाला विसरून बेभान अवस्थेत त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी ध्येयपूर्ती करून यशोगाथा लिहिल्या आहेत, त्यांना अवलिया, साधक असे म्हटले जाते. हर्ष, खेद, हास्य, शोक या भावनांच्या त्यांच्या जाणीवा बोथट झालेल्या असतात.जे इतरांना व्यर्थ वाटते त्यात त्यांना अर्थ भरलेला जाणवतो आणि त्या अर्थासाठी ते धडपडतात. हा अर्थ त्यांनाच दिसतो ज्यांना त्याचे वेड लागलेले असते. या अर्थाचे बोल कसे असतात तर “झपूर्झा गडे झपूर्झा. ”

जिथे कुणाला काही दिसत नाही अशा ज्ञाता पलीकडे अज्ञाताच्या अंधारात त्यांना काहीतरी जाणवते.वीज चमकून जावी तसे होते. त्या उजेडात अंधुक जाणीवा होतात. तिथे काहीतरी आहे हे जाणवते आणि ते त्याचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान करतात. या जाणीवा गूढ गीते गातात. त्याचे बोल असतात “झपूर्झा गडे झपूर्झा.”

भुई नांगरलीच नाही तर पीक येईल कसे ? अशी कितीतरी जमीन नांगरल्याविनाच आहे. म्हणजेच विश्वात अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला ज्ञात नाहीत. त्यासाठी ते शोध घेत राहतात आणि शेवटी ते संशोधन फळाला येते. असंख्य शास्त्रज्ञांनी शोध लावले ते म्हणजे विश्वात असलेल्याच गोष्टींची उकल करून सर्वसामान्यांसाठी त्यांचे अस्तित्व सिद्ध करून दाखवले. त्यासाठी झपाटून शोधाचा ध्यास घेतला. त्यावेळचा मंत्र आहे “झपूर्झा गडे झपूर्झा.”

या विश्वाचा पसारा म्हणजे एक अवघड कोडे आहे. विश्वाची निर्मिती, मानवी जगाचा विकास हे समजून घेणे हाच ज्ञानाचा हेतु आहे. ज्ञान आणि कला यांच्या माध्यमातून विश्वाचे रहस्य, त्याची सुंदरता जाणवते. याचा अभ्यास ही अशाच अवलियांनी केला. तोही एकच मंत्र गात “झपूर्झा गडे झपूर्झा.’

आपल्या तारा मंडळातील मंडळी अव्याहत फिरत असतात. पण या तारा मंडळाच्या पलीकडेही असंख्य ग्रह-तारे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांचा अभ्यास करणे यासाठी इतर सर्व गोष्टी बाजूला सारून झपाटून जाऊन अभ्यास करणे, प्रयत्न करणे आणि तिथे पोहोचणे हे महत्त्वाचे असते. तेव्हा अशा या सर्व अशक्य कोटीतील कामांसाठी आवश्यक असते ते झपाटलेपण. त्यालाच म्हणतात “झपूर्झा.’

कवीने एके ठिकाणी सांगितले आहे की ,’त्यांनी काही मुलींना पिंगा घालताना पाहिले. त्या मुली “जपून जा पोरी जपून जा”असे म्हणत गोल फिरत होत्या. असे  म्हणत म्हणत फिरताना हळूहळू अंगात लय भिनत जाते आणि त्याचीच गुंगी येते. कवीने त्याच अर्थाने शब्द योजीले “झपूर्झा गडे झपूर्झा.”

कवितेच्या सुरुवातीला लिहिले आहे, आपल्याला जे  कांही नाही असे वाटते, त्यांतूनच महात्मे कल्याणाच्या चिजा बाहेर काढतात. त्या महात्म्यांची स्थिती लक्षात घेऊन पुढील गाणे वाचल्यास ते दुर्बोध होऊ नये असे वाटते .म्हणजेच ह्या अज्ञाताच्या गुहेमध्ये शिरणाऱ्या मनाला बजावले ‘जपून जा मना जपून जा’.तर त्या ध्यासामध्ये फिरत असताना त्याचेच कधी ” झपूर्झा रे झपूर्झा ” झाले हे त्या मनाला सुद्धा कळत नाही.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ सेतू – कवी: वसंत बापट ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ सेतू – कवी: वसंत बापट ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

कोवळ्या हिरव्यागार गवताच्या फुलांवर ठिबकलेले दवबिंदू,  समोर दाटलेला धुक्याचा तलम झिरमिरित पडदा, ताजातवाना,  थंड सुखद गारवा.  शरद ऋतुतल्या अशा पहाटवेळी श्री वसंत बापट यांनी कवीमनाला मुक्त केले आहे.

” अशी ही शरद ऋतुतील तरणीताठी पहाट समोर आहे, जणु उषेनं हिरवागार चुडा दोन्ही हातात भरलाय,  तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आहे. गवतपातीच्या नाजुक तनुवर दवाचं चमकणारं कणीस खुलून दिसतंय.

जणूकाही अष्टदिशा तिच्या दासी होऊन तिला न्हाऊ घालत आहेत. आणि अशा राजविलासी थाटात नुक्ते स्नान करून आलेली पहाट आपली आरसपानी कांती न्याहाळत  आहे. तितक्यात कुणाच्या तरी चाहुलीनं ती थबकली. चटकन आपल्या विवस्त्र देहलतेवर हात उंचावून रवि-रश्मी चं सोनेरी वस्त्र ओढून घेतलं. अंगाशी हात लपेटून लाजेनं ओठंगुन ती  क्षणभर उभी राहिली.

ओलसर पाय अलगद उचलून ती चालू लागली. नटखट वारा अवतीभवती रुंजी घालतच होता.  नजर पुढे जाताच तिला दिसला निळाशार तलाव. त्या निळ्या दालनात कुणी असेल का? तिचं पाऊल क्षितिजाशीच थबकलं.

माथ्यावरच्या तलम निळ्या ओढणीतून तिच्या गालावरचा,  फुलाच्या स्पर्शाने उमटलेला व्रण लक्ष वेधून घेत आहे. एक एक पाऊल अलगद टाकत ती येत आहे.

तिच्या नाजुक तनुवर लगडलेले केशरी गेंदेदार झेंडू  आणि सोनेरी शेवंती असे रंग गंधाचे गहिरेपण बघून गुलाबाच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली आणि झेंडू-शेवंतीच्या टपो-या, टंच रुपाच्या बरोबरीने तोही मुसमुसून बहरला.

अशी रंग गंधात चिंब भिजलेली पहाट हलकेच फुलांची हनुवटी कुरवाळीत चालली आहे.  गवतफुलांच्या,  तृणपात्यांच्या कानात हळुच कुजबुजत चालली आहे. पण हे प्रेम वात्सल्य ममता वगैरे काही नाही हं! हे आहेत तारुण्याचे विभ्रम.  यौवनातील प्रेमाचे लडिवाळ क्षण आहेत. असे हे इशारे सराईताला सुद्धा कसे कळावे?

अशी ही सुखद रोमांचित पहाट कवी मनाला जास्तच रोमॅटिक करते. नावात वसंत, पहाट शरदातली,  आणि आश्विनातली पुष्पसृष्टी. अशी ऋतु-मास मीलनाने बहरलेली पहाट.

कवी वसंत बापट यांचा सेतु हा 1957 सालचा काव्यसंग्रह. ते स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातले कवी. अत्यंत संवेदनशील अशा कविमनावर राजकीय,  सामाजिक घडामोडींचा परिणाम होणे अपरिहार्य होते. स्वांतः सुखाय हे तत्व बहुजन हिताय या तत्वाने झाकून टाकले. त्या काळी वसंत बापट हे पोवाडे लिहिणारे व गाणारे म्हणून नावाजलेले होते. त्यांचा संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा,  शिंग फुंकलेे रणी वाजतात चौघडे सज्ज व्हा उठा चला सैन्य चालले पुढे’ अशी स्फुरणदायी कवने खूप गाजली. शूरत्वाला आव्हान देणारी, पारतंत्र्याची लाचारी मानसिक दैन्य याने खचलेल्या अचेतन जनतेला गदागदा हालवून जागं करणारी त्यांची तेजस्वी धारदार लेखणी तळपत होती. वसंत बापटांनी  दुस-या एके ठिकाणी म्हटले आहे, ” संघर्ष,  लोभीपणा, मानसिक सुस्तपणा या आवर्तात सापडल्यामुळे जीवनातील मूलभूत आनंदाला आपण मुकतो. ” ह्याचा प्रत्यय म्हणजे

नंतरच्या काळात त्यांच्या लेखणीने नवे रुप धारण केले.  कोमलतेला हलकासा स्पर्श करणारी, सृष्टीसौंदर्य शब्दात उलगडून मन ताजेतवाने करणारी कोमल कलम तारुण्याला साद देत होती.  निसर्गाच्या स्पंदनांची जाणीव,  मनाच्या अनेक स्मृती,  अनुभव  यांचे आगळे वेगळे रसायन त्यांच्या नंतरच्या कवितांतून आढळते. याचेच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ” सेतु” ही कविता.

फुलातील फूलपणा तर आहेच, पण त्या बरोबर त्याच्याशी संलग्न अशी जाणीव मनात घर करते.

कवितेत शब्द सहज समजणारे. वाचताना जाणवते की, ” ह्या जागी हेच शब्द,  ह्यापेक्षा दुसरा चपखल शब्द असूच शकत नाही “. बघा ना!……’तरणीताठी पहाट ‘, ‘राजविलासी स्नान’ , ‘ आरसपानी कांती ‘, ‘ ओठंगुन उभी ‘, ‘ वारा नखर’, ‘ फलचुखिचा व्रण’, ‘ गुलाब ईर्षेने मुसमुसले’, अशी सुंदर शब्द रर्त्ने. इतके तरल आणि पारदर्शी शब्द,  असं वाटतं की, लिहिताना पेनातून शाईऐवजी दवबिंदू तर टपकत नाहीत ?

प्रत्येक ओळीतून एकेक भावनावस्था प्रकट होते. अरूणोदय हा नेहमीच पूज्य, आराध्य वाटतो.उगवते सूर्यबिंब दिसताच नकळत हात जोडले जातात.पण इथे तर कवीने हाच अरूणोदय इतक्या नर्म,  संयमी,शृंगारिक भावनेने व्यक्त केला आहे. शृंगार रसाला एका उच्च आणि स्वच्छ,  शुद्ध पातळीवर नेऊन ठेवलं आहे.  हेच या कवितेचे मर्म आहे.

रात्र संपून पहाट होता होता एक सौंदर्याकृती आकाराला येते.एक निसर्ग चित्र तयार होते आणि कलमरूपी कुंचला खाली ठेवता ठेवता कवीला ती पूर्वस्मरणीय घटना वाटते, आणि चित्रच बदलून जाते. एक सजीव सौंदर्य डोळ्यासमोर येते आणि कवीमन थबकते.  डोळे विस्फारून पहाटेकडे अनिमिषतेने बघतच रहाते.अशाच पहाटे ” तिला” पाहिले होते. क्षणभरात पहाटेचे ते दवांनी भिजलेले गारव्याचे स्मृतिक्षण रोम रोम पुलकित करतात आणि शब्द उतरतात,

” ही शरदातिल पहाट? …..की…….ती तेव्हाची तू?

तुझिया माझ्या मध्ये पहाटच झाली सेतु?”

एका झंझावाती, मर्द मनाच्या कवीची अगदी नाजुक आणि सुंदर कविता ” सेतु ”

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संधीप्रकाशात – कवी: बा. भ. बोरकर ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ संधीप्रकाशात – कवी: बा. भ. बोरकर ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

श्रेष्ठ कवी बा.भ.बोरकर निसर्गदत्त   प्रतिभेचे कवी. ईश्वराने गोमंतभूमीला बहाल केलेला निसर्ग खजिना म्हणजे गर्द दाट हिरवाई, उंच उंच एकमेकांना लगटून उभे असलेले माड, फणस, पोफळी, खळाळणा-या नद्या, अथांग समुद्र, आणि लोभसवाणे समुद्रकिनारे. जिथे निसर्गाची लयलूट तिथे प्रेमाची बरसात.  निसर्ग आणि बोरकरांचे शब्द जेव्हा तद्रूप होतात, तेव्हा जे साहित्यशिल्प आकार घेतं, त्या असतात त्यांच्या कविता.

हिरवाईच्या कॅनव्हासवर रंगीत फुलांच्या नक्षीने चितारलेली छोटी छोटी  खेडी, ती कौलारू घरे, लहान लहान ओहोळ, झरे हाच त्यांच्या कवितेचा खरा बाज. बा.भ.बोरकर म्हणतात, ” हिरवळ आणिक पाणी तेथे सुचती मजला गाणी “.

सारं तारूण्य असं रोमांचित निसर्गा बरोबरच फुलण्यात  गेलेलं, प्रेमात आकंठ बुडालेलं. वय जसंजसं पुढे सरकत गेलं, तशी तशी कविता जास्त मुक्तपणे बहरत गेली. पुढे गंभीर होत गेली. तारूण्य सरलं, तरी प्रेम अधिष्ठित  होतंच. पैलतीराकडे चालताना आधार म्हणून जीवनसाथी पत्नीचा हात घट्ट धरून चालावेसे वाटू लागले. तिच्यासाठी अनेक प्रेमकविता करताना रंगणारं मन आयुष्याचं अंतिम सत्य समोर येताच गंभीर झालं. तिचं असणं जास्त जवळ असावंसं वाटू लागलं. तेव्हा मनातल्या भावनांनी  कवितेचं रूप घेतलं, आणि ही कविता जन्मली.

“संधीप्रकाशात अजुन जो सोने

तो माझी लोचने मिटो यावी”

संध्याकाळी फिकट अबोली, गडद केशरी प्रकाशात जोपर्यंत मावळत्या सुर्यकिरणांचे सुवर्ण मिसळते आहे,  अशाच सांजवेळी माझे डोळे मिटावेत.

आयुष्य छानपणे जगता जगता अशा सुंदर संध्याकाळी आयुष्य थांबावे,  ते ही कसे? तर शेवटच्या  क्षणी तू जवळ असावीस. बस् इतकीच इच्छा!

खळखळंत वहात येणारी अल्लड नदी जेव्हा समुद्राला मिळते,  तेव्हा शांत, समाधानी,  आणि संपूर्णं असते.

पत्नीप्रेम, निसर्ग प्रेम, मत्स्याहार प्रेम अशा वैविध्यपूर्ण प्रेमाची मुशाफिरी करणार-या  प्रेमाचा बहर ओसरून एक धीर गंभीर, निर्व्याज, अशारिरीक,  तितकिच खोल अशी अद्वैत रूपी अथांगता मनात भरून राहते.

अशावेळी पत्नीला सांगतात,  ” सखे, तुळशीचे एक पान माझ्या रसनेवर ठेव आणि त्यावर तू माझ्यासाठीच विहिरीतून ओढलेलं स्वच्छ, निर्मळ पाणी घाल,  ” थोर ना त्याहुनि तीर्थ दुजे “.

तुलसीपत्र हे पावित्र्याचं, मांगल्याचं, आणि निष्ठेचं प्रतीक.

आयुष्यभर अनुभवलेलं हे पावित्र्य,  ही निष्ठा अनमोल आहे. ते म्हणतात,  ” तुझ्याकडे तुलसीपत्रांची मुळीच कमतरता ( वाण) नाही. ” हा तिच्या निष्ठेचा केवढा सन्मान आहे! निष्ठेचं तुळसीपत्र , त्यावर प्रेमाचे निर्मळ पाणी जिभेवर शेवटच्या क्षणी पडणं,  यासारखं सद् भाग्य ते दुसरं कोणतं?

इथेच सर्व भावना थबकतात.  विचारशक्ती थांबते. कल्पनाशक्ती सुन्न होते.रोम रोम शहारतो.

पुढच्या ओळीत जाणवतं मुरलेलं खरं प्रेम काय असतं! ” तुझ्या मांडीवर डोकं विसावावं. ” ती मांडी कशी? तर ” रंभागर्भी वीज सुवर्णाची कांडी “. केळीच्या बुंध्यातल्या नितळ, मऊस्पर्शी, गो-या  गाभ्यात सुवर्णलडी सारखी सचेतन वीज असावी तशी

इतकी सूक्ष्म थरथर जाणवणा-या तुझ्या मांडीवर डोकं ठेवून विसावावे. आता एकच शेवटचं मागणं, ” वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल,  भुलीतली भूल शेवटली. “.

शृंगार, आसक्ती, प्रेम, अद्वैत या सर्वांचा एकबंध.

“संधीप्रकाशात अजुन जो सोने

तो माझी लोचने मिटो यावी”

मृत्यू सारख्या अबोध, गूढ सत्याबद्दल दोन ओळीत केवढे मोठे तत्वज्ञान भरून राहिले आहे!

अतिशय शांत,समाधानी आयुष्य उत्कटपणे जगून शृंगार, प्रेम, निसर्ग असे सगळे धुमारे घेऊन पुढे कविता अध्यात्मात विलीन होते.  तिचा सहवास हाच श्वास, कासावीस जीवाला निष्ठेचं तुळशीपत्र हेच चिरंतन सत्य, तिनंच ओढलेलं पाणी हेच तीर्थ असतं. शेवटी एक लाडीक मागणी, ” वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल “…… ह्या एकाच क्षणात पराकोटीची अनेक सुखे, अपरिमित समाधान ” संतर्पणे ” सामावली आहेत.

उत्कट, बहारदार आणि तृप्त भावना आपल्या कवितांमधून व्यक्त करणारे बा.भ. बोरकर आणि त्यांच्या अप्रतिम कविता हा मराठी साहित्याचा खजिना आहे.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माती सांगे कुंभाराला ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ काव्यानंद ☆ माती सांगे कुंभाराला ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

कोणत्याही कवितेची परिपक्वता कविच्या विचार परिपक्वतेवर अवलंबून असते आणि विचार अनुभवसिध्दतेवर आधारलेले असतात.जेव्हा कवीकडून एखाद्या कवितेची प्रसव प्रक्रिया सुरु होते तेव्हा त्याच्या मनातला कल्लोळ आपोआप शब्दबध्द होत असतो.ती कविता वाचक वाचतो तेव्हा ती त्याला विचारप्रवृत्त करते मग त्याला भावेल तसा अर्थ तो लावत जातो त्यामुळे एकाच कवितेतून वेगवेगळे अर्थ निर्माण होऊ शकतात.

कवी मधुकर जोशी यांची,’माती सांगे कुंभाराला !’ ही कविता अशीच विचारप्रवृत्त करणारी आहे.कुंभार ज्या मातीपासून घट निर्मिती करतो ती माती साधीसुधी नसते.एका विशिष्ठ प्रकारच्या मातीत घोड्याची लीद,शेण,राख, धान्याची टरफले मिसळलेली असतात. कुंभार ती माती भिजवून आपल्या पायाखाली तुडवून तुडवून एकजीव करतो.ते करताना त्याच्या मनातील विचार मातीवर संस्कारीत होत असतात. गोरा कुंभार विठ्ठलाचे अभंग गात चिखल तुडवीत असे.

पण ज्या मातीपासून कुंभार घट बनवितो त्या मातीला कुंभाराची आपल्याला पायाखाली तुडविण्याची क्रिया आवडत नाही.म्हणून ती कुंभाराला,

‘तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी’असे ठणकावून सांगते.

ती म्हणते,हे कुंभारा मला चाकावर फिरवत तुझ्या हातातल्या कौशल्याने तू वेगवेगळ्या आकाराचे सुबक, सुंदर घट बनवितोस. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने वापरले जातात ते,

‘लग्नमंडपी कधी असे मी कधी शवापाशी !’ असतात

लग्नमंडपापासून मानवाच्या अंतीम यात्रेपर्यंत, चांगल्यावाईट सर्व ठिकाणी मी (माती)असते। स्वतःला शूर वीर समजणारे शेवटी माझ्याजवळच येतात. हे माणसा त्याशिवाय पर्याय नाही हे माहीत असतानाही तू कशाला ताठ रहातोस, गर्वाने फुगतोस? भाग्यवान, भाग्य संपवत जगणाऱ्यांना माझ्याशिवाय पर्याय नाही तेव्हा हे कुंभारा, मला पायी तुडवताना,

‘तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी ! याचा विचार कर.’

कवी मधुकर जोशी यांच्या कवितेतला कुंभार म्हणजे विश्वनियंता ! पृथ्वी, आप , तेज, वायु, आकाश या पंचमहाभूतापासून या विधात्याने विविध आकार, रंगातून मानव निर्माण केला.पण ज्याने आपल्याला निर्माण केले, हे जग दाखवले त्यालाच हा स्वार्थी माणूस विसरला. फक्त स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसाला आपला पराक्रम, सौंदर्य यांचा गर्व झाला.त्याचा अहंकार फुग्याप्रमाणे फुगला. जसा कुंभार तुडवताना मातीला विसरला तसा माणूस पंचमहाभूतांचा उपभोग घेताना त्याच्या निर्मात्याला, विश्वनियंत्याला विसरला.

आपल्या नियतीचे चाक त्याच्या हातात आहे याचेही भान मानवाला राहिले नाही. धुंदीचा कैफ चढलेला स्वार्थी मानव विधात्याने लिहिलेला भाग्यलेखच खरा ठरणार ही जाणीव हरवून बसला.त्याने जन्मापासून आपले मातीचे असलेले दुर्लक्षित केले.

‘माती असशी मातीस मिळशी’ हे सत्य लक्षात ठेवून प्रत्येकाने जगावे हाच संदेश या कवितेतून मिळतो.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘दिवनाली’ कवितेचं रसग्रहण ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ काव्यानंद ☆ ‘दिवनाली’ कवितेचं रसग्रहण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

रसग्रहण:

व्यक्तीच्या स्वभावाच्या, आचारविचारांच्या साधेपणाचे उत्कृष्ट प्रतीक जर दाखवायचे तर ते म्हणजे, कवयित्री इंदिरा संत. खरंतर त्यांचा फोटो बघितल्यावर जाणवतं की,  यांचं आडनाव फक्त आणि फक्त ” संत” च योग्य आहे. त्यांच्या कविता म्हणजे अतिशय साध्या सोप्या शब्दात गुंफलेला उत्कट भावनांचा रम्य आविष्कार.

इंदिरा संत आणि त्यांचे पती, दोघेही कवी मनाचे .

आयुष्यात अवेळी अचानक कोसळलेल्या पतिनिधनाच्या आघातामुळे त्यांची कविता नेहमीच वेदना, विरह, स्मृति यांतून गुंतून राहिली. आणिे  स्वाभाविक होते.

पण ” दिवनाली ” ही कविता बहुतेक त्यांच्या संसाराच्या सुरवातीच्या काळातली असावी.

नव्या नवतीच्या विवाहोत्तर काळात सगळं जग त्याच्याच ठिकाणी एकवटलेलं असतं.केंद्र बिंदू तोच.त्यानं सतत जवळ असावं, प्रेमानं त्याच्याकडे काही मागावं, आणि त्यानंही ते भरभरून द्यावं , ही स्त्री सुलभ चिरंतन भावना.

शब्द इतके साधे, सोपे की वाचू लागताच अर्थ उमलू लागतो. वाचक इतका समरस होतो की ही कविता आपल्यासाठीच आहे असे वाटू लागते. तीच तल्लीनतेची तद्रूपतेची भावना व्यक्त करणारी कविता “दिवनाली”.

तू नेहमी जवळ असावास किंवा तू जवळ असल्याचा भास व्हावा म्हणून तुझ्याकडे एकच फूल मागितले,  म्हणजे त्याच्या सुगंधी दरवळाने तू जवळ असल्यासारखे वाटेल, तर तू…….माझ्या अंगणातले हिरवेगार वृक्षच तिन्ही त्रिकाळ बहरत ठेवलेस !

कानात कायम तुझा आवाज गुंजत रहावा म्हणून मी एक शब्द हवा म्हटले , तर तू……समुद्राच्या लाटांची फेसाळ थेंबांची कर्णफुले माझ्या कानांवर गुंफलीस !

तुझा स्पर्श,  तुझा रोमांचित करणारा स्पर्श मला हवा म्हणून मी मान जरा उंचावून धरली तुझ्यासमोर,  तर तू……स्पर्शाने अशी लाली पसरवलीस की कपाळावर ज्योतशी उमटली.

अशा तुझ्याकडून भरभरून मिळालेल्या सुखाने मी इतकी सुखावले, आणि भारावून गेले की नखशिखांत उजळून निघाले. जणू काही निरंतर तेवणारी दिवनाली झाले. प्रकाशमयी समई झाले.

तिनं इतकंसं मागावं, त्यानं भरभरून द्यावं. ह्या सगळ्या सुखात न्हाऊन, प्रेमरंगात रंगून ती ज्योती प्रमाणेच तेजाळली. स्वतःच ज्योत झाली. ज्योतीची दिवनाली झाली.

पती-पत्नीच्या प्रेमाचं इतकं उत्कट, इतकं ऐश्वर्यी रूप दैवी अलौकिक आहे.

नवीन लग्न झालेल्या मुलीच्या प्रेमभावना इतक्या साध्या सोप्या शब्दात पण अतिशय समर्पकतेने व्यक्त करणं हेच इंदिरा संतांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. अतिशय स्वाभाविक,  जे हवे ते मागून घ्यायचं, आणि त्यानं उधळलेलं सुख तन मन भरून आणि भारून व्यक्त व्हायचं,  हा कवितेचा साधा सरळ अर्थ. शब्द कसे? तर थेट इच्छा प्रकट करणारे.लपवाछपवी नाही कि लाजरेबुजरेपणा नाही. पण तरीही कुठेच उथळपणा नाही.  उच्छृंखलता नाही. जे व्यक्त करायचे ते अगदी हळुवारपणे, ओंजळीतून फुले हलकेच ठेवावीत तसे.

कवयित्रीला जे सांगायचं आहे, जे मनातले भाव पोचवायचे आहेत ते अगदी अलवारपणे ह्रुदयापर्यंत पोचतात, कुठेही तोल न ढळता.

कविता वाचताना सुरवातीपासून एक अव्यक्तअर्थ डोकावत रहातो. देवघरातील देव आणि तेवत असणारी समई यांचं अजोड नातं आहे.  समईचं प्रकाशणं हे देवाचं देणं, आणि त्या ज्योतीप्रकाशात देवांचं तेज उजळून दिसतं, हा तन्मयतेचा भाव  आहेच. स्त्रीच्या स्थानी एका समईची कल्पना केली तर, उत्कटता तीच आहे. समईचं  निरंतर तेवणं आणि ईश्वराने भरभरून वरदान देणं.  दिवनालीच्या ज्योतीची तेवत राहणारी, ईश्वरी प्रचीतीच्या अपरूपात रंगून नित्य तेवणारी दीपशिखा,  तीच दिवनाली.

असा दुहेरी गोफ उलगडून दाखवणारी आणि मनात कायम रुंजी घालणारी कविता  ” दिवनाली “ .

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं  रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆  काव्यानंद ☆ ‘वेळ झाली भर माध्यान्ह’ कवितेचं  रसग्रहण ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

ख्यातनाम कवी अनिल यांनी शब्दबद्ध केलेले आणि यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत आपल्या धारदार आणि नाविन्यपूर्ण आवाजाने उषाताई मंगेशकर यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

एरवी सकाळ आणि संध्याकाळ यांचं अप्रूप असणाऱ्या कवींनी उपेक्षिलेली अशी ही माध्यान्ह! यशवंत देवांनी हीच माध्यान टिपून   या गाण्यात पेरली आहे. माध्यान हा शब्द या गीताची लय छान संभाळतो.‘प्रीतीच्या फुला’ या शब्दांवर समेची टाळी येते.

मथळ्यावरुन हे गाणे प्रियकराला उद्देशून असावे असे वाटणारे हे गीत एका कामगार स्त्रीने आपल्या लेकराला उद्देशून म्हटले आहे त्यामुळे हे प्रेम गीत आर्त गीत झाले आहे.

कवी गीतामध्ये ज्या माध्यानीचे वर्णन करतात ती ग्रीष्म ऋतूतील तळपणारी, सर्वांगाची लाहीलाही करून टाकणारी अशी आहे. सूर्य माथ्यावर आल्याने त्याची किरणे जास्ती दाहक आहेत, त्यामुळे तिचे बाळ अर्थात तिचे प्रीतीचे फुल कोमेजून जाईल अशी तिला काळजी वाटते.

उन्हाची तीव्रता दाखवण्यासाठी कवीने ‘तप्त दिशा झाल्या चारी,भाजतसे तसेच सृष्टी सारी’अशा ओळी लिहिल्या आहेत.

निसर्गापुढे मानव हतबल असतो हे तिला गृहीत आहे. म्हणून ती मुलाबरोबर परिस्थितीशी मिळतंजुळतं घ्यायचा आग्रह धरते आहे. ‘कसा तरी जीव धरी’ या ओळीतून ते लक्षात येते.

वारे उष्मा वाहतात आणि बाळाच्या नाजूक देहाला पोळतात. त्यामुळे ती बेचैन आहे.

तिची अगतिकता कवीने फार अचूक शब्दात दर्शवली आहे. तिच्याच पायात पडणारी तिची सावली तिच्या बाळाचे पांघरूण होऊ शकत नाही तसेच तिच्या डोळ्यातील अश्रू हे डोळ्यातच आटतात त्यामुळे ती बाळाची तृषा ही भागवू शकत नाही.‘दाटे दोन्ही डोळा पाणी आटेनयनातच सुकुनी’ या ओळीतून ते दाखवले आहे.

या परिस्थितीत आशेचा एकही किरण तिला दिसत नाही त्यामुळे ती चिंताक्रांत आहे या नीरभ्र आकाशाखाली तिला एक मृगजळ दिसतयं तेही फसव!

तिची खूप तगमग होते आहे पण आयुष्याशी तडजोड करायला हवी म्हणून ती आपल्या बाळाला आपल्या सोबत आनंदाचं एखादं गाणं गुणगुणायला प्रवृत्त करते ‘चल रंगू सारंगात’ या ओळी तो अर्थ देतात

सारंग हा माध्यानी गाण्याचा राग आहे म्हणून या रागाचा उल्लेख कवीने केला आहे.

माध्यान या शब्दावर उषा ताईंचा ठहराव आणि उन शब्दाची मिंड घेऊन गायकी सगळं काही कमाल!…..

कवी अनिल संगीतकार यशवंत देव आणि उषाताई या त्रिकुटाचा हे एक अजरामर गीत!

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं रसग्रहण☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆  काव्यानंद ☆ ‘नवलाख तळपती दीप…कुसुमाग्रज’ कवितेचं  रसग्रहण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

विरह आणि प्रेम ही भावना एखाद्या व्यक्तीपुरतीच मर्यादीत असत नाही. एखादा प्रसंग, एखादे ठिकाण, एखादी आठवण ही सुद्धा मनात अशी घर  करून बसलेली असते की मनाला थोडासा धक्का द्यायचा अवकाश, त्या उफाळून वर येतात. घडून गेलेल्या प्रसंगाची,  सहवासाची, आवडत्या ठिकाणाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपले मन किती संवेदनशील आहे, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत आणि आपण ते किती टिकवून ठेवले आहेत यावरच ही प्रेमाची, विरहातून निर्माण होणार्या आर्ततेच्या भावनेची तीव्रता अवलंबून असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांची ‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ’ ही कविता.

जीवनाविषयी अखंड आशावादी असणारा, तार्यांशी करार करणारा, क्रांतीचा जयजयकार करणारा हा कवी जेव्हा स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखाशी समरस होतो, अंतर्मुख होतो तेव्हा …

परस्पर विरोधी परिस्थितीचे नेमके वर्णन कवीने या कवितेत केले आहे. प्रलोभन आणि संयम यात होणारे द्वंद्व  कवितेत सहजपणे दिसून येते. नेमक्या शब्दांच्या वापरामुळे कवी मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातो. विजेच्या दीपांना तारकादळे म्हटल्यामुळे त्यांची संख्या, व्याप्ती सहजपणे डोळ्यासमोर येते. श्रीमान इमारतींचा थाट हे शब्द वाचल्यावर मरिन ड्राइव्ह सारखा सागर किनारा आठवत नाही का ? लालस विलासापेक्षा करूण विलासच मन आकृष्ट करून घेतो.

लयबद्ध, प्रवाही अशी ही कविता वाचून झाल्यावर आपण त्यातून लगेच बाहेर पडू शकत नाही. आपण ती कविता पुन्हा वाचतो आणि मनात विचारांचे तरंग उठू लागतात. आपल्यालाही काहीतरी आठवते. हे आठवायला लावणं, विचार करायला लावणं हेच कवितेचं यश आहे.

जाता जाता आठवण होते ती आणखी एका कवितेची. स्वा. सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेची. ‘नभी नक्षत्रे’ किंवा ‘प्रासाद इथे……आईची झोपडी प्यारी’ या सारख्या ओळी सहज आठवतात. किंवा गदिमा यांच्या “धुंद येथ मी” या गीतातील शब्दही मनात गुणगुणले जातात. एक चांगली कविता वाचताना दुसर्या एक दोन चांगल्या कविता आठवाव्यात आणि आपला काव्यानंद वाढत जावा ही कविच्या कलाकृतीची यशस्विता नाही काय ?

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

(निवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण। )

☆  काव्यानंद ☆ ‘पैंजण’ कवितेचं  रसग्रहण☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

‘पैंजण’ ही नीलम माणगावे यांचीनिवेदन – आजपासून कवितेच्या रसग्रहणावर आधारित ‘काव्यानंद’ हे नवीन सादर सुरू करत आहोत. आज प्रथम वाचा, ‘पैंजण’ या कवितेचं रसग्रहण कविता, चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे.

आजी जड, वजनदार पैंजण घालून  आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.

आईने जड, वजनदार पैंजण  वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.

तिसर्‍या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ने हे सगळं सहन केलं.

आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊदेत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी….’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.

स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी’ असं म्हणणारी तिची मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.

कविता मुक्तछंदात आहे. प्रत्यक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची….’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं , ना खुपणं, ना चिघळणं,’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळाणं, फाटणं काहीच नको. …’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले असणार.

२०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास ती अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे.

महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भरतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print