श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्मिता मांजरे – कोल्हे – लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बीए साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला . अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रमा यात ती सहभागी होऊ लागली.पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात आले. त्यानुसार एलएलबी ला प्रवेश घेतला. पण मनातली वैद्यकीय शिक्षणाची इच्छा परत जागृत झाली आणि मग दहावीच्या गुणपत्रिकेवर तिने डीएचएमएस या होमिओपॅथीच्या पदविकेसाठी पण प्रवेश घेतला! कालानुक्रमे दोन्ही शिक्षणे पूर्ण केली आणि वकिली आणि डॉक्टरी अशा दोन्ही व्यवसायाभिमुख पदव्या स्मिताताईंनी मिळवल्या. त्यानंतर आवडीप्रमाणे नागपुरात स्वतःचा दवाखाना टाकला. तो चांगलाच चालू लागला.डॉ. स्मिताच्या हाताला चांगला गुण होता. भरपूर पेशंट येत असत. त्या आणि त्यांची असिस्टंट दवाखाना संपल्यावर सगळे पैसे मोजत बसायच्या. स्वतःचा दवाखाना झाला, दुचाकी आली आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाले.यामुळे डॉक्टर स्मिता मांजरे यांना एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला.

यादरम्यान घरात लग्नाचे वारे वाहू लागले. त्या काळात म्हणजे १९८० च्या दशकात चहा पोहे आणि मुलगी पाहणे असे कार्यक्रम सर्रास होत असत. पण स्मिता ताईंनी एक-दोन कार्यक्रम झाल्यानंतर हे दाखवून घेणे काही बरे नाही, असे वाटून त्यांनी ते थांबवले. 

या दिवसांत त्यांच्या हातामध्ये विनोबा भावे यांचे ‘गीता प्रवचने’ हे पुस्तक पडले.जसजशा स्मिताताई हे पुस्तक वाचत होत्या तसतसे त्या अंतर्मुख होत गेल्या. त्यामध्ये सांगितलेली ‘जीविका आणि उपजीविका’ यांचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. ‘माझा स्वधर्म काय आहे’या विचाराने त्यांना भंडावून सोडले. अंगावर ल्यायला उत्तम कपडे, दाग दागिने, फिरण्यासाठी गाडी , चांगली कमाई हे सगळं असूनही काहीतरी अनुपस्थित आहे , असे व्याकुळ असमाधान या युवतीला जाणवू लागले.

त्याच भागात एक ध्येयवेडा तरुण डॉक्टर एम डी पूर्ण करत होता. एमबीबीएस झाल्यावर तो बैरागड या मेळघाट जिल्ह्यातील गावी जाऊन राहिलेला होता.त्याच लोकांसाठी अधिक शिक्षण घेऊ या हेतूने तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. या डॉक्टरचे नाव होते रवींद्र कोल्हे !! बैरागड येथील आदिवासी जनजाती लोकांना आरोग्य सेवा द्यायची हे ध्येय ठरवून बसलेला हा तरुण सुयोग्य जीवनसाथीच्या शोधात होता. यादरम्यान स्मिताताईंचे परिचित सुभाष काळे यांनी ताईंना हे स्थळ सुचवले. पण त्याचबरोबर मुलाच्या वेगळ्या चार अटी सांगितल्या.या अटी काय होत्या 

१) महिन्याला चारशे रुपयांमध्ये संसार करावा लागेल

२) चाळीस किलोमीटर पायी चालता आले पाहिजे 

३) लोकांसाठी समाजासाठी भिक्षा मागण्याची तयारी असली पाहिजे 

४) कोर्ट मॅरेज करावे लागेल.

सुभाष काळेंनी सहजच सुचवले होते. कारण त्यावेळची स्मिताताईंची राहणी ही उच्चभ्रू प्रकारातील होती. जेव्हा या अटी कळाल्या तेव्हा आपण चारशे रुपयांची साडी नेसत होतो, गाडीवरून नागपुरात आरामात फिरत होतो आणि आपली कमाई पण भरभक्कम होती असे स्मिताताई एका मुलाखतीत सांगतात.

मात्र जसजसा त्या या अटींचा विचार करू लागल्या तसतसे त्यांना गीता प्रवचने वाचल्यापासून ज्या असमाधानाने अस्वस्थ केले होते ते असमाधान दूर होऊ लागले असा प्रत्यय आला. त्यांना या अटींमध्येच आपला स्वधर्म आहे, आपले जीवन ध्येय आहे याची आंतरिक जाणीव झाली.आणि मग दोघे भेटले १९८८ साली या ध्येयवेड्यांनी विवाह बंधन स्वीकारले.डॉ.स्मिता मांजरे डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे म्हणून सातपुडा पर्वतरांगातील अरण्यात असलेल्या बैरागडला आली.लग्न कोर्ट पद्धतीने झाल्यामुळे सप्तपदी झाली नाही .मात्र नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी नव्या नवरीला तालुक्याच्या ठिकाणापासून बैरागड पर्यंत ३५ किलोमीटर चालत जावे लागले.लग्न ठरल्यानंतर स्मिताताईंनी दवाखाना बंद केला. आपले साठवलेले सगळे पैसे त्यांनी बँकेत एकरकमी डिपॉझिट करून ठेवले. स्वस्तातल्या साड्या खरेदी केल्या. महाग महाग साड्या मैत्रिणी आणि बहिणींना दिल्या. उंची सॅंडल्स, पर्सेस, प्रसाधने सारे काही वाटून टाकले आणि खऱ्या अर्थाने नवजीवनचा प्रारंभ केला !

डॉक्टर रवींद्र कोल्हे पूर्वीपासूनच तेथे आरोग्य केंद्र चालवत होते. ते एक रुपया इतकीच फी दवाखान्यात घेत असत. औषधांसाठी शहरातील धनिक लोकांना विनंती करून आदिवासी लोकांना जमतील तितकी औषधेही ते उपलब्ध करून देत. स्मिता ताईंनी जेव्हा बैरागड मध्ये पाऊल टाकले तेव्हा त्यांची स्वतःची झोपडी देखील नव्हती. आजूबाजूच्या जनजाती लोकांनी लाकडे कुडे आणि गवताने साकारलेली झोपडी तयार करण्यासाठी त्यांना मदत केली. सतत शहरी वातावरणात राहिलेल्या स्मिताताईंचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. वीज नाही, नळ नाही, पिठाची गिरणी नाही, जवळपास दुकाने नाहीत असा नन्नाचा पाढा सगळीकडे दिसत होता. त्यातच आजूबाजूला दारिद्र्याने गांजलेली आजाराने ग्रस्त आणि अज्ञानी अशी आदिवासी जनजाती कुटूंबे. त्यांची भाषा वेगळी चालीरीती वेगळ्या.किर्र अरण्याचा एक वेगळाच गंध, शहरी सुरक्षिततेची उब नाही अशा सगळ्या गोष्टी त्यांना नव्याने जाणवू लागल्या. पण एकदा मनापासून कार्य स्वीकारले की समस्या भेडसावत नाहीत .थोड्याच दिवसात विहिरीवरून पाणी भरणे, शेण गोळा करून आणणे, घर सारवणे, जात्यावर दळणे ही सगळी कामे त्यांच्या अंगवळणी पडली. नवीन शिकण्याची आवड त्यांना येथे कामाला आली. 

एका मोठ्या लोक वस्तीला एकच डॉक्टर असल्याने कोल्हेना अक्षरशः श्वास घ्यायला फुरसत नसे. खरं म्हणजे स्मिताताईंना पण आपण आरोग्यसेवा द्यावी, पेशंट तपासावे असे वाटत असे. पण सुरुवातीला आदिवासी लोकांचा एक स्त्री डॉक्टर असू शकते यावर विश्वासच नव्हता. त्यांना तेथील लोक कोल्लं आणि कोल्लाणी म्हणत .

एक  घटना घडली आणि लोकांनी कोल्लाणीला वैद्यकीय ज्ञान आहे हे स्वीकारले!!.वाघाने अक्षरशः फाडलेला एक पेशंट आला आणि त्यावेळी  स्मिताताईंना जवळपास ४०० टाके घालावे लागले.अत्यंत चिकाटीने त्यांनी ते काम पूर्ण केले आणि तो पेशंट  वाचला!! काही दिवसांत बरा झाला.नंतर तो चालत दवाखान्यात आला आणि डॉक्टर बाईंना नमस्कार करून गेला!. तेव्हापासून आदिवासी जनजाती लोकांनी ताईंना डॉक्टर म्हणून सहर्ष स्वीकारले!!मग मात्र तपासायला ताईच हव्या अशी आग्रही मागणी पण सुरू झाली!!

मेळघाटात कुपोषणाचे बळी जात असतात. आत्ताही जातात. पण आता प्रमाण कमी आहे. त्यावेळी रवींद्र कोल्हेंनी एमडीला हाच विषय घेऊन प्रबंध लिहिला. त्यांच्या मते हा प्रकार उपासमारीमुळे अर्थात अन्न कमी पडल्यामुळे, पोटाची खळगी न भरल्यामुळे घडतो.त्यांनी नंतर अशाच प्रकारच्या मृत्यूची बातमी एका वृत्तपत्राच्या बातमीदाराला दिली. छोट्या चौकटीतील त्या बातमीने दिल्ली मुंबई हादरली. कारण आपल्या संविधानानुसार ”स्टारव्हेशन कोड” म्हणजे ‘भूकबळी’ हा शासनाचा गुन्हा मानला जातो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा विषय गाजला.दिल्ली मुंबईत सूत्रे हलली. घाईघाईने सारे मंत्री, सरकारी अधिकारी मेळघाटामध्ये येऊन पोहोचले.त्यांनी चर्चा केली. स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी तेथील भीषण अन्नटंचाई आणि त्यामुळे घडणारे बालमृत्यू मातामृत्यू यांची माहिती दिली.मात्र या मृत्यूना ‘उपासमारीचे बळी’ असे न म्हणता ‘कुपोषणाचे बळी’ असे म्हणावे अशी शासकीय यंत्रणेने विनंती केली. सर्व प्रकारची मदत शासकीय यंत्रणा करणार आहे या गोष्टीमुळे स्मिताताई आणि रवींद्र कोल्हे यांनी देखील तसे म्हणण्याचे मान्य केले आणि मग एकेकाळी १००० मागे २००मुले दगावत ते प्रमाण खूप कमी होत गेले . शासनाच्या मोठ्या यंत्रणेचा अशिक्षित गरीब लोकांना लाभ मिळवून देणे हे आपले ध्येय आहे.शासनाला समांतर कार्य यंत्रणा उभी करणे हे नव्हे , हे दोघही पती-पत्नींनी ठरवलेले होते.

आपल्या सोबतच्या या रान सवंगड्यांना प्रेरणा मिळावी , अन्नटंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून स्मिता आणि रवींद्र यांनी सुधारित शेतीचे प्रयोग केले. स्वतः दुबार पिके काढून दाखवली. खते बियाणांची माहिती दिली  रेशन धान्याचे दुकान टाकले. कोल्हेंच्या दुकानांमध्ये तीस तारखेपर्यंत धान्य मिळत असे. आजही हे दुकान दिमाखात चालू आहे 

आपले कार्य , त्याच्या मागची प्रेरणा ही पुढच्या पिढीत रुजवण्यातही स्मिताताई आई म्हणून यशस्वी ठरल्या! त्यांचा मोठा मुलगा रोहित सुधारित शेती करतो.त्याचे प्रशिक्षण देतो. तर धाकटा मुलगा राम एमबीबीएस एमडी सर्जन होऊन मेळघाट  बैरागड येथेच वैद्यकीय सेवाकार्य करतो. खास वैदर्भीय शैलीतील आघळपघळ बोलणे, पण आवश्यक तिथे ठामपणे उभे राहणे आणि निर्भयता हे दोन महत्त्वाचे गुण स्मिताताईंच्या अंगी आहेत. नामदार नितीन गडकरी हे त्यांचे एकेकाळचे अभाविप मधले सहकारी कार्यकर्ते! त्यांच्या प्रयत्नांमुळे आज मोठ्या नाल्यांवर मोठमोठे पूल झाले आहेत, बरेच ठिकाणी रस्ते देखील आले आहेत. पण म्हणून प्रश्न सुटलेले नाहीत.

नागपुरातील मध्यमवर्गीय घरातील ही कन्या आता आदिवासी बंधू भगिनींची आई झाली आहे. एखादे व्रत घेणे सोपे पण  सातत्यपूर्ण आचरण अत्यंत कठीण असते. म्हणूनच पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे आणि पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्यासारख्या तेजस्वी दीपांचे महत्व असते.

लेखिका : डॉ रमा दत्तात्रय गर्गे

प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments