सौ. मनीषा रायजादे-पाटील

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘विशाल होत चाललाय माझा सूर्य’ – सुश्री अश्विनी कुलकर्णी ☆ परिचय – सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆ 

कवितासंग्रह – विशाल होत चाललाय माझा सूर्य

कवयित्री – अश्विनी कुलकर्णी

प्रकाशक – प्रतिभा पब्लिकेशन,इस्लामपूर

मूल्य – २२० रु

‘विशाल होत चाललाय माझा सूर्य ‘ हा कवयित्री आश्विनी  कुलकर्णी यांचा दुसरा कवितासंग्रह  रसिक वाचकांच्या भेटीला आला आहे .या अगोदर त्यांचा  ‘ शब्दगंध    या पहिल्या कवितासंग्रहाला रसिक वाचकांची भरभरून दाद लाभली आहे. विशाल होत चाललाय माझा सूर्य या कवितासंग्रहास जेष्ठ समीक्षक मा. वैजनाथ महाजन सर यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. तसेच अतिशय देखणे असे असे मुखपृष्ठ चित्रकार सुमेध कुलकर्णी यांनी रेखाटले आहे.जेष्ठ साहित्यिक मा. आनंदहरी अतिशय मार्मिक व प्रेरणादायी पाठराखण केली आहे. तसेच पुस्तकासाठी वापरण्यात आलेला कागद ,छपाई अतिशय चांगल्या प्रतीची असून प्रतिभा पब्लिकेशनने या पुस्तकाची निर्मिती अतिशय दर्जेदार, वाचकाला प्रथम दर्शनी भावणारी व मोहित करणारी अशीच आहे.

कवयित्रीचा जन्म मुंबईसारख्या  स्वप्ननगरीत झाला असला तरी त्या प्रत्येक घटनेकडे उघड्या डोळ्यांनी, चिकित्सक नजरेने पाहतात .  प्रत्येक गोष्टीच्या निरीक्षण, चिंतन मननातून त्यांची कविता जन्म घेते. कवयित्री आपल्या मनोगतात म्हणतातच की, ” कवी सृजनोत्सुक मनाचा असतो. जन्माला घालतो नवीन विचार ..नवीन शब्द ..नवीन भावना आणि नवीन कृती…” कल्पनाशक्ती आणि वास्तवाचे भान यांचा संगम करून लिखाणाद्वारे ‘ शब्दाचीं अपत्ये’ जन्माला घालण्याचं मातृत्व ही खूप मोठी देणगी आहे.आणि खरंच, ही खूप मोठी देणगी माझी सखी कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांना लाभली आहे.

समाजमनाची अस्वस्थता कवयित्रीच्या मनाला बोचत राहते .आणि तीच अस्वस्थता त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरत जाऊन  त्यांची  कविता जन्म घेते. या कविता काळजाचा ठाव घेतात. त्यांच्या कवितेत अनुभवाची, भावनांची कितीतरी विलक्षण वळणे आहेत. प्रत्येक वळणात अभावाची, दुःखाची, सकारात्मकतेची, प्रेमाची, विरहाची व मानसिक वृत्तीची परिचित अपरिचित स्पंदने आहेत .भावभावनांच्या  अगणित किरणातून साकारत, शब्दमय होत  त्यांचा सूर्य असा  विशाल होत चाललाय.

कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांच्या संवेदनशील मनातून अनेक  विषयांची आशयघन मांडणी आपल्या अनेक कवितेतून मांडत आहेत.  कवितासंग्रहातील कविता या विविध विषयांवरील कविता आहेत.. माणूस जसा कुटुंबात, समाजात वेगवेगळ्या नात्यांनी जोडला गेलेला असतो तसेच तो त्याच्या भावतालाशी, निसर्गाशीही विविध भावनात्यांनी जोडला गेलेला असतो. पाऊस हा माणसाच्याच नव्हे तर अवघ्या निसर्गाच्या जगण्याचा अविभाज्य भाग.  पावसाची विविध रुपं कवीचेच नव्हे तर समस्त मानवजातीचे भावविश्व आंदोलीत करत असतात. कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांच्या कवितेतही याचे प्रतिबिंब दिसून येते. पावसाविना शुष्क झालेल्या धरतीमातेची चिंता त्यांच्या मनात, कवितेत डोकावताना दिसते.. पण ती शब्दातून व्यक्त होत असताना त्यात आजच्या काळातील स्त्री मनाची स्पंदने एकरूप होताना दिसतात. त्या आपल्या कवितेत म्हणतात,

मुसळधार नव्हेच,

रिमझिम ही नाही…

कसा येईल ग्लो धरणीवर?

कोणतं मॉयश्चरायझर लावायचं तिला?

जीवनात पुढे पुढे चालत राहणे हा मानवी स्वभाव आहे. त्याला प्रगती हवी असते.. पण प्रगतीची परिमाणे मात्र व्यक्तीपरत्वे भिन्न भिन्न असतात. एखाद्याला जी बाब प्रगतीची वाटेल ती दुसऱ्याला प्रगतीची वाटेलच असे नाही.  ज्या क्षणी माणसाने यंत्र युगात प्रवेश केला तिथून माणसाच्या प्रगतीच्या व्याख्या इतक्या बदलून गेल्या आहेत की निसर्गाचा एक घटक म्हणून विचार करता मनात प्रश्न निर्माण व्हावा की खरेच ही प्रगती आहे काय ?  हाच प्रश्न कवयित्रीच्या चिंतनशील मनाला सतावत राहतो आणि मग त्या आपल्या कवितेतून विचारतात,

माणसाच्या प्रगतीचा आलेख,

उंचावत असताना, 

निसर्गाच्या जपणुकीचं व्यवस्थापन,

कोलमडतंय का?

कवी-कवयित्रीचे भवतालाशी, निसर्गाशी अतूट असं जिव्हाळ्याचे नाते असते. मुळातच मानवी भावरूपाला भवतालाच्या परिस्थितीचे एक सोनवर्खी कोंदण असते. त्यात संवेदनशीलता, तरलता ल्यालेल्या कविमनावर तर भवतालाच्या रूपाची झुल असतेच. हे सांगताना कवयित्री म्हणते,

सगळीकडे हिरवंगार असतं,

तेव्हा कवींचे शब्द न् शब्द,

हिरवेगार प्रसवतात,

मंद गंधाळताना….

जीवनात संयमाचे महत्व खूप आहे. ‘धीर धरी रे धीरा पोटी, असती मोठी फळे गोमटी ‘ असे म्हणतातच. आजच्या या ‘ झटपट ‘ च्या बदलत्या काळात, जमान्यात धीर, संयम हे शब्दच मुळात दुर्मिळ झालेत.. पण त्यांचे मानवी जीवनात महत्व अबाधित आहे. हेच अबधितत्व अधोरेखित करताना कवयित्री म्हणते, 

उद्या पहाट बघण्या, रात्र ही रोज येते

रात्र संयमाची मोठी, पहाट खंत दूर करते

कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांनी कविता कधी परखड होते तर कधी ती समजावण्याचा सूर घेऊन येते.  आपल्या समोरची व्यक्ती खरंच साधू आहे की साधुवेशधारी मायावी रावण हे सीतेलाही उमजले नव्हते..  आजही समोर, जवळपास असणारी व्यक्ती खरंच सज्जन आहे की सज्जनपणाचा मुखवटा धारण केलेला कुणी दुर्जन हे  आजच्या सीताही ओळखू शकत नाहीत.. इतकी ही साशंकता, भय पावलोपावली आहे हे आजच्या समाजातील भयाण वास्तव आहे. आणि म्हणून सावध राहायला हवे हे समजावून सांगताना त्या म्हणतात,

पटकन होऊ नये फुलांनी कुणाचं

देऊ नये आपला रंग, गंध, सर्वस्व

कोणत्याही हातांना

कोण जाणे..

किती हात खरेखुरे आहेत सोज्वळ?

कोणत्या हातांनी, आपण कुस्करणार?

कुठं माहीत असतं फुलांना…

कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांच्या कवितेची शीर्षक पाहिली तर त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य व नावीन्यपण आपल्या लक्षात येते.  ‘तुडुंब ओळी,  अभद्र मुखवटे, अदृश्य जखम, गैरसमजाच्या गाठी ,केंद्रस्थानची हिरवळ, पोलादी ढाल, नेढ सुईचं, अपराधगंड , शहरातील ऑक्सिजन, तुझ्या अस्थींची पालवी , माफ केलंय अंधाराला, अदृश्य चित्रकार , स्पेस व म्यान इत्यादी.

अतिशय अर्थपूर्ण व नाविन्यपूर्ण विषयांच्या कविता या कवितासंग्रहात नक्की रसिक वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतील असा विश्वास आहे. असाच वेगळेपण ल्यालेला त्यांचा पुढचा कवितासंग्रह लवकरच रसिक वाचकांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आणि खात्री आहे.  कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांना त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !

प्रस्तुति – सुश्री मनीषा रायजादे-पाटील

सांगली

मो.  9503334279

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments