मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दृढता….. ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ दृढता….. ☆ श्रीशैल चौगुले ☆

काटा खुपता पायी

होई काळजाला ईजा

फुल तोडण्याची जी

वेलपर्णा  मिळे सजा.

 

माय,लेकरु जपे

अंतरीचे प्रेम देत

वेल जपते कळी

सुगंधाचे दान देत.

 

कधी कळावे मना

अज्ञानी माणसा गुढ

सल जीवना दुःख

मातीशी पराग दृढ.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 86 – मला वाटले.. ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #86 ☆ 

☆ मला वाटले.. ☆ 

मला वाटले, भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही, कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

येते म्हणाली, होतीस तेव्हा जाता जाता

किती वाढले, दोघांमधले अंतर अंतर…!

 

रोज वाचतो, तू दिलेली ती पत्रे बित्रे

भिजून जाते, पत्रांमधले अक्षर अक्षर…!

 

तूला शोधतो, अजून मी ही जिकडेतिकडे

मला वाटते, मिळेल एखादे उत्तर बित्तर…!

 

स्वप्नात माझ्या, येतेस एकटी रात्री रात्री

नको वाटते, पहाट कधी ही रात्री नंतर…!

 

उभा राहिलो, ज्या वाटेवर एकटा एकटा

त्या वाटेचाही, रस्ता झाला नंतर नंतर…!

 

विसरून जावे, म्हणतो आता सारे सारे

कुठून येते, तूझी आठवण नंतर नंतर…!

 

मला वाटले, भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही, कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भक्तीरचना ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ भक्तीरचना ☆ श्री सुहास सोहोनी ☆

भक्तीरचना : पंढरी माझ्या ह्रदयी ग

??

पंढरिचे चैतन्य लुटोनी

अगणित झाले पावन ग ।

रिक्तहस्त मी माझ्यासाठी

विठ्ठल उरला नाही ग ॥

?

अंश अंश नेला सर्वांनी

स्तिमित जाणिवा झाल्या ग ।

बधीर मानस उरले केवळ

विठ्ठल कोठे गेला ग ॥

?

तुळशीहारे कंठ पळविला

तुकया मस्तक घेई ग ।

हस्त कटीवर विसावलेले

डोंगा चोखा नेई ग ॥

?

नेत्र गवसले ज्ञानीयासी

ज्ञानचक्षु ते झाले ग ।

गोरोबाच्या संगे गेला

होउनि वेडा कुम्हार ग ॥

?

पायरिचा पाषाण मज हवा

नाम्या हटून बसला ग ।

नामाचा व्यवहार करोनी

धन्य नरहरी झाला ग ॥

?

सहज लाभता माळपदक तिज

जनी हासली गाली ग ।

आळ चोरिचा खोटा स्मरता

अश्रु दाटला नेत्री ग ॥

?

दामाजीने  हरिनामाची

कोठी उघडी केली ग ।

युगायुगांची उभी पाउले

पुंडलिकाघरी गेली ग ॥

?

मळा भक्तिचा जाइ सावता

घेउन अपुल्या गांवी ग ।

उरला विठ्ठल लुटण्या जमला

वारकर्‍यांचा मेळा ग ॥

?????

तिळातिळाने विरघळणारा

विठ्ठल मी देखिला ग ।

बांध फुटोनी वाहु लागल्या

नयनांमधुनी सरिता ग ॥

?

एकटीच मी राउळि बसले

बाकी शून्य पसारा ग ।

बघवे ना गाभारा पोकळ

थकले डोळे मिटले ग  ॥

?

जाणिव नेणिव बोथट झाली

भानच नुरले कसले ग ।

अंतर्यामी सूर उमटला

मनोमनी आकळला ग ॥

?

सूर बोलला घेई समजुन

कशी बावरी झालिस ग ।

चराचरी मी भरुन राहिलो

लुप्त कसा मी होइन ग ॥

?

ज्याने त्याने नेला विठ्ठल

दशांगुळे तरि राही ग ।

डोकावुनिया हृदयि आपुल्या

अनुभुति त्याची घेई ग ॥

?

सहजपणाने स्वहृदयांतरि

प्रथमच मी देखिले ग ।

सहस्र रश्मी तेजाळुनिया

डोळे माझे दिपले ग ॥

?

हळू हळू साकार होउनी

विठ्ठलाकृती सजली ग ।

आश्चर्याला सीमा नाही

वैष्णव जमले भवती ग ॥

?

चंद्रभागेचा कांठ होउनी

हृदयकमल मम फुलले ग ।

दिंड पताका गर्दी उसळे

अबिर गुलाला उधळति ग ॥

?

संत वारकरि हासत नाचत

नृत्य कीर्तनी रमले ग ।

त्यांच्या संगे विठू सावळा

भान हरपुनी नाचे ग ॥

?

दर्शन घडले विठुरायाचे

आस मनीची फिटली ग ।

अंतरिचा संवाद संपला

भान जगाचे आले ग ॥

?

माझे होते माझ्यापाशी

परी ठाउके नव्हते ग ।

आता उमगे वसली आहे

पंढरि माझ्या हृदयी ग ॥

पंढरि माझ्या हृदयी ग ॥

पंढरि माझ्या हृदयी ग ॥

 

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 108 ☆ गाणारं झाड ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 108 ?

☆ गाणारं झाड ☆

(जुन्या डायरीतून….)

सखी तू आहेस एक गाणारं झाड,

चिवचिवणारी चिमणी पाखरं

यायची तुझ्या अंगणात,

मग तुझ्या घनदाट छायेसह,

तू घेऊन जायचीस त्यांना,

जॅक अॅन्ड जील च्या टेकडीवर,

ए बी सी डी च्या प्रदेशात!

तेव्हा तू असायचीस त्यांची

मायाळू टिचर!

 

आजारी सासूसास-यांची तू सेवाभावी परिचारिका बनायचीस,

दुखलं खुपलं, पथ्यपाणी…

हळूवार निगराणी करत रहायचीस !

 

मैत्रीणींच्या मैफिलीत,

ऐकवतेस हळवी कविता..

ओंजळ, ओंजळ फुलंसुद्धा…

असतातच त्यांच्या करीता!

 

माहेरवाशिणी,सासुरवाशिणी…

सा-यांचीच तू हक्काची,

तुझ्या फांद्या—अष्टभुजा,

मदतीला धावणा-या,

चुकल्या पाखरालाही,

योग्य दिशा दावणा-या!

 

तुझ्या गर्द छायेमध्ये,

जाणवत नाहीत वैशाख वणवे,

झळा सोसून, ताठ कण्याने उभी राहून,

तू ताजी टवटवीत !

 

सखी तू आहेसच, परीकथेतलं.

सत्यात अवतरलेलं,

एक झाड गाणारं,

फुललेलं….फुलवणारं!

 

© प्रभा सोनवणे

१४-१०-१९९५

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्पर्धा ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ स्पर्धा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

असतो खुळा जमाना म्हटले कधीच नाही

माणूस माणसाने जपले कधीच नाही

 

सौदे हजार ज्यांचे माणूस जोडण्याचे

त्यांनी स्वत:स कोणा विकले कधीच नाही

 

झाकून ठेवलेल्या गंधाळ चंदनाला

लपवून गंध जगणे जमले कधीच नाही

 

दडपून टाकलेले उरते खरेच मागे

खोट्या समोर असली झुकले कधीच नाही

 

आभाळ चांदण्यांचे चंद्रास मिरवणारे

सूर्यास तळपणा-या दिसले कधीच नाही

 

धरती निसर्ग पाणी आधार जीवनाचे

सेवेत व्यस्त असता रुसले कधीच नाही

 

प्रेमा मुळेच अंती माणूस जगत जातो

प्रेमास शांत बसणे सुचले कधीच नाही

 

आल्या बलामतीला जा ठोकरून पुढती

अग्नीस शुद्ध सोने डरले कधीच नाही

 

देवात माणसाने या लावल्यात स्पर्धा

त्यानेच देवतांचे पटले कधीच नाही

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 111 ☆ देहाचा बंगला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 111 ?

☆ देहाचा बंगला ☆

तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा

हवे तसे झुकण्याची, तरी आहे तुला मुभा

 

तुझ्या कानांचे पडदे, त्यांना भेटतात वारे

वाजवती कडी हळू, पोचवती शब्द सारे

खोट्या शब्दांची संगत, नको धरूस रे बाबा

तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा…

 

मुखःद्वार अन्नासाठी, नको उघडे कायम

जठर हे माणसाचे, आहे पावन रे धाम

ज्याचे सपाट उदर, तेच पोट देते शोभा

तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा…

 

काळजाचे हे घड्याळ, त्याची टिक टिक भारी

नको चावी नको सेल, चालते ते श्वासावरी

नाही तुझ्या हाती काही, आहे ईश्वराचा ताबा

तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा…

 

अचानक बंगल्याला, आज गेला आहे तडा

काल भरलेला होता, आज रिकामा हा घडा

प्रियजनांच्या हातात, फक्त घेणे शोकसभा

तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपज्योती….. ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ दीपज्योती….. ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆

दीपज्योती

दीपावलीच्या या ज्योती

दिव्य तेज उजळती

तम दूर ग सारती

रम्य प्रभेच्या संगती

ज्योती-ज्योती प्रकाशती

शुभ संदेश देताती

दुःखामागुनी सुखाची

उधळण होई या जगती

येती आप्त नि सोबती

हर्षोल्हास दुणावती

सर्वांसवे तेजराशी

दीप्ति करीते आरती.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी,

कोल्हापूर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बहिणीची माया…… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ बहिणीची माया……. ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

आली दिवाळी भाऊराया

वाटते पडावे तुझ्या पाया

विदेशात तू ,विलासात तू

तरी चिंता करते वेडी माया

 

पाठविली तू भेटवस्तू  जी

पडून आहे कोपऱ्यात ती

नाही मजला ओढ तयाची

आस मनी तुज बघण्याची

 

बसवून पाटावरी तुजला

ओवाळावे वाटे रे मजला

नारळ  फळांनी भरून ओंजळ

भाळी तुझ्या लावावे चंदन

 

आप्त स्वजन मिळून सारे

करावी वाटे मज दंगल

पण मोठे होऊन बसले सारे

मोद खरा विसरलो ना रे

 

आठविते  रे ती दिवाळी

बालपणीची आनंदाची

नव्हता पैसा नी फटाके

मौज तरीही रे खूप वाटे

 

झाले सगळे सधन आता

निवडल्या स्वार्थाच्या वाटा

 सुखाचा तू रे संसार थाटला

पण जिव्हाळा बहिणीचा

 

नाही रे आटला…..,नाही रे आटला ……

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 55 ☆ सोहळा… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 55 ? 

☆ सोहळा… ☆

सोहळा…
चांगल्या कर्माचा

सोहळा…
सगुण गुणांचा,सद् परंपरेचा.

सोहळा…
थोर मोठ्यांच्या विचारांचा,
जाणकारांचा विशिष्ठ विधिलेखाचा.

सोहळा…
अंतर्भूत त्या कलेचा,
योग्य सुयोग्य परिघाचा,
मर्म बंधनांचा.

सोहळा…
जीवन जन्माचा
अमृत वेळेचा,
संघर्षाचा त्यागाचा
बलिदानाचा सुप्त संगमांचा
परोपकरांचा.

सोहळा…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंदी दिवाळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंदी दिवाळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आठवणींच्या पणत्यांनी,

उजळत जाई माझी दिवाळी!

बालपणीच्या रम्य जीवनाची,

सुबक उमटते मनी रांगोळी!

 

स्वस्त आणि मस्त खरेदी,

करीत होते मन आनंदी !

छोट्या छोट्या आठवणींची,

मन कुपीत भरली धुंदी !

 

तारुण्याच्या मस्ती मधली,

होती दिवाळी आनंदाची !

सुखी परिवारासह मनी दाटली,

दिवाळी होती ती सौख्याची!

 

फुलबाज्या अन् रंग-बिरंगी,

अनार झाडे उडली अंगणात!

दिवाळी आमच्या आयुष्यात,

करी आनंदाची बरसात !

 

आनंदाचा अंक तिसरा ,

अनुभवत आहे जीवनात!

सर्वांचा आनंद पहाता,

आनंदी दिवाळी राहो हृदयांत!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print