मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक…

यो यो यां यां तनुं भक्त: श्रद्धयार्चितुमिच्छति ।

तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ।।२१।।

*

मनी कामना जोपासुनी पूजितो ज्या देवतेला

त्या देवतेप्रति स्थिर करितो मी त्या भक्ताला ॥२१॥

*

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।

लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ।।२२।।

*

श्रद्धा बाळगुनी मनात भक्त पूजितो त्या देवतेला

प्राप्त होती माढ्याकडुनी वांच्छित भोग त्या भक्ताला ॥२२॥

*

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।

देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ।।२३।।

*

अल्पमती त्या नरास लाभे फल परि ते नाशवंत

अर्चना करित ते देवतेची ज्या तयास ती होई प्राप्त 

भक्तांनी मम कसेही पुजिले श्रद्धा मनि ठेवुनी

मोक्ष तयांना प्राप्त होतसे मम चरणी येउनी ॥२३॥

*

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।

परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ।।२४।।

*

मूढ न जाणत अविनाशी माझे परम स्वरूप 

गात्रमनाच्या अतीत मजला मानत व्यक्तिस्वरूप॥२४॥

*

नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत: ।

मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ।।२५।।

*

आवृत मी योगमायेने सकलांसाठी अप्रकाशित

अज्ञानी ना जाणत म्हणती मज जननमरण बद्ध ॥२५॥

*

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।

भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ।।२६।।

*

भूतवर्तमानभविष्यातील सकल भूता मी जाणतो

श्रद्धाभक्तिविरहित कोणीही ना मजला जाणतो ॥२६॥

*

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।

सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥२७॥

*

जन्म अर्जुना द्वेषापोटी वासनेच्या कारणे

अज्ञ राहती सकल जीव सुखदुःखादी मोहाने ॥२७॥

*

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।

ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता: ।।२८।।

*

निष्काम कर्मयोग्याचे होत पापविमोचन

द्वेषासक्ती द्वंद्वमुक्त ते माझेच करित पूजन ॥२८॥

*

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।

ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ।।२९।।

*

जरामरण मुक्तीकरिता येत मला शरण

ब्रह्माध्यात्म्याचे कर्माचे पूर्ण तया ज्ञान ॥२९॥ 

*

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।

प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ।।३०।।

*

अधिभूताचा अधिदैवाचा अधियज्ञाचा आत्मरूप मी

प्रयाणकाळी मला जाणती युक्तचित्त तयास प्राप्त मी ॥३०॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय: ॥७॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी आत्मसंयमयोग  नामे निशिकान्त भावानुवादित सप्तमोऽध्याय  संपूर्ण ॥७॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अविस्मरणीय दरबारा सिंग साहेब ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

अविस्मरणीय दरबारा सिंग साहेब ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९७७-८० या काळात मी NDA मध्ये होतो. तेथे असलेल्या अनेक ड्रिल इंस्ट्रक्टर्सपैकी, आम्हाला विशेष प्रिय असलेले (तत्कालीन) सुभेदार दरबारा सिंग यांची आज प्रकर्षाने आठवण झाली.

कोणाही सेनाधिकाऱ्याला विचारून पहा. ट्रेनिंग अकादमीमधील अनुभव, आणि विशेषतः तेथील ‘ड्रिल उस्ताद’, यांना तो कधीच विसरू शकत नाही. कारण, गाळलेल्या घामाच्या एकेक थेंबागणिक कॅडेट्सची शारीरिक आणि मानसिक जडण-घडण होत असते. आणि ड्रिल उस्तादही त्या घडणीचा एक शिल्पकार असतो.  

ज्यांनी-ज्यांनी NDA ची ‘पासिंग आऊट’ परेड पाहिली आहे त्यांना त्या सोहळ्यामागच्या कष्टांची जाणीव नक्की झाली असेल. अक्षरशः तासंतास परेड ग्राऊंडवर पाय आपटत आम्ही सराव करायचो. आम्हा कॅडेटसची कवायत पाहून प्रेक्षक उत्स्फूर्तपणे टाळ्याही वाजवायचे. पण आमच्याहूनही अधिक मेहनत घेणारे आमचे उस्ताद मात्र पडद्याआडच राहत असत. 

संपूर्ण सरावादरम्यान, परेड करणाऱ्या कॅडेट्सच्या पुढून, मागून, आणि दोन्ही बाजूंनी ड्रिल उस्तादांना बारीक नजर ठेवावी लागे. कुणाची चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त करावी लागे. कारण एखाद्याच्या चुकीमुळे संपूर्ण परेडची लय बिघडणे हे अक्षम्य असे. त्यामुळे, सगळे उस्ताद पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण ग्राउंडभर सतत थिरकत असायचे. एखादा सराव मनाजोगता न झाल्यास संपूर्ण परेड पुन्हा पहिल्यापासून सुरु करावी लागे. अशा वेळी दमल्या-भागलेल्या कॅडेट्सना हुरूप देत, त्यांना पुन्हा एकदा सरावासाठी उभे करणे सोपे काम नसे. 

आम्हाला प्रोत्साहित करण्याची दरबारा सिंग साहेबांची शैली खास होती. “बस एक और रिहर्सल, आपके उस्ताद के नाम!” इतकेच  म्हणणे अनेकदा पुरेसे असे. पण तेवढे बोलून थांबतील तर ते दरबारा सिंग कसले! 

“भरतनाट्यम का एक ‘शो’ करने के बाद हेमा मालिनी भी वन्स मोअर नही करती, लेकिन मेरा कॅडेट जरूर करेगा!” असे त्यांनी म्हटले की आम्ही पोट धरून हसत पुन्हा परेडसाठी तयार असायचो! 

आमच्या चुका काढतानाही ते असेच काहीतरी विनोदी बोलायचे, “कॅडेट बापट, ढीला क्यों पड गया? खटमल खुजली कर रहा है क्या ?” असे म्हणून “लेफ्ट-राईट” च्या ऐवजी “खटमल-खुजली, खटमल-खुजली” असे म्हणत ते आमच्या बाजूने चालायचे. अशा वेळी हसू दाबत-दाबतच, पण नव्या जोमाने आम्ही टाचा आपटायचो. 

पुढे सुभेदार मेजर या हुद्द्यावर बढती मिळून, दरबारा सिंग साहेब NDA मध्ये बरीच वर्षे पोस्टिंगवर राहिले. आम्ही पास आऊट झाल्यानंतरच्या काळातला एक प्रसंग काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आला होता. 

पासिंग आऊट परेडचा सराव चालू होता. कॅडेट्स दमलेले होते. कदाचित NDA च्या सिनेमागृहातल्या ‘शो’ची वेळही होत आली असेल. मनाजोगती परेड न झाल्यामुळे आणखी एक सराव करायचा आदेश मिळाला होता. त्या जास्तीच्या सरावादरम्यान हजार-दीड हजार कॅडेट्सची आपसात कुजबूज आणि धुसफूस चाललेली होती. 

परेडच्या शेवटी, NDA चे ‘निशाण’, म्हणजेच राष्ट्रपतींनी प्रदान केलेला मानध्वज सन्मानपूर्वक घेऊन जाण्याची वेळ झाली. त्या कारवाईदरम्यानही कॅडेट्सची कुजबूज थांबलेली नव्हती.

एरवी सदैव हसतमुख असणाऱ्या दरबारा सिंग साहेबांना ‘निशाण’चा अवमान मात्र सहन झाला नाही. ताड-ताड चालत ते मंचावर जाऊन उभे राहिले. त्यांचा अवतार पाहून कॅडेट्सची कुजबुज काहीशी कमी झाली. 

महत्प्रयासाने राग आवरत दरबारा सिंग बोलू लागले. “कॅडेट्स, मी दोनच मिनिटात तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या NDA मध्ये ‘Hut of Remembrance’ नावाची जी वास्तू आहे, त्यामध्ये गेल्या तीन वर्षात मी फक्त एकदाच गेलो आहे. त्या वास्तूमध्ये अखंड तेवत असलेल्या ज्योतीच्या आजूबाजूला जी नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत, ते सगळे तुमच्यासारखेच NDA कॅडेट होते. त्यामध्येच एक नाव आहे लेफ्टनंट योगराज पलटा, वीर चक्र.”

एक दीर्घ श्वास घेऊन दरबारा सिंग पुढे म्हणाले, “१९६२ साली चीन युद्धाच्या वेळी शीख रेजिमेंटची नववी बटालियन अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे तैनात होती. बटालियनच्या एका चौकीवर युद्धासाठी सज्ज असलेल्या तुकडीमध्ये मीदेखील होतो. साधारण माझ्याच वयाचे एक तरुण अधिकारी आमचे कमांडर होते. ते म्हणजे, हेच लेफ्टनंट योगराज पलटा. 

१५ नोव्हेंबर १९६२ रोजी आमच्या चौकीवर चिन्यांनी हल्ला चढवला. चिनी सैन्य आमच्यापेक्षा कैक पटींच्या संख्येने, आणि भरपूर शस्त्रे आणि दारुगोळ्यासह आले होते. पलटासाहेब आम्हाला प्रोत्साहित करत स्वतःदेखील गोळीबार करीत होते. ‘शेवटची गोळी, आणि रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आपण लढायचं आहे’, हेच ते आम्हाला सतत सांगत होते.”

परेडमधल्या सगळ्याच कॅडेट्सना जाणवले की दरबारासिंग साहेबांचा आवाज आता जड झाला होता. 

भरल्या कंठानेच ते पुढे बोलत राहिले, “मी आणि लेफ्टनंट पलटासाहेब शेजारी-शेजारीच होतो. एका क्षणी मॉर्टरचा एक गोळा आला आणि थेट पलटा साहेबांच्या चेहऱ्यावर लागला. त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले आणि त्यांचे निष्प्राण कलेवर माझ्या अंगावर पडले. क्षणार्धात माझी पगडी, दाढी,आणि छाती त्यांच्या रक्ताने चिंब झाली. 

माझ्या अंगावरून त्यांचा देह उचलण्याचाही अवधी मला मिळेस्तोवर चिनी सैनिक आमच्या चौकीमध्ये घुसले. एका मृतदेहाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला मीदेखील मेलेलोच आहे असे समजून, दिसेल त्या सैनिकाला भोसकत ते क्षणार्धात आमच्या अंगावरून पुढे गेले.” 

आता मात्र NDA च्या परेड ग्राउंडवर अक्षरशः स्मशानशांतता पसरलेली होती. महत्प्रयासाने अश्रू आवरत असलेल्या दरबारा सिंग साहेबांकडे सर्व कॅडेट अविश्वासाने पाहत होते. 

सद्गदित आवाजात दरबारा सिंग म्हणाले, “सर्वप्रथम जेंव्हा मी ‘Hut of Remembrance’ मध्ये पलटासाहेबांचे नाव वाचले तेंव्हा मी नखशिखांत थरारलो होतो. अचानक माझ्या आयुष्यातली २०-२५ वर्षे गळून गेली आणि माझ्या दाढीवर आणि छातीवर गरम रक्त वाहत असल्याचा भास मला झाला. त्यानंतर पुन्हा कधीच मी तिथे गेलो नाही. पण, पलटासाहेबांसारख्या अनेक NDA कॅडेट्सच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान म्हणून, माननीय राष्ट्रपतींनी दिलेला हा ध्वज जेंव्हा-जेंव्हा परेडवर आणला किंवा नेला जातो तेंव्हा माझी छाती अभिमानाने भरून येते. माझा हात आपोआप सलामीसाठी उचलला जातो.”

“लक्षात ठेवा कॅडेट्स, त्या वीरांची आठवण आपल्याला करून देणारे हे ‘निशाण’ आहे. जे त्याला निव्वळ एक रंगीबेरंगी कापडाचा तुकडा समजतात त्यांच्यासारखे करंटे तेच !”

कसेबसे एवढेच बोलून, पुन्हा ताड-ताड चालत दरबारा सिंग साहेब परेडवरून निघून गेले. त्यापुढील कैक मिनिटे संपूर्ण परेड हतबुद्ध होऊन तिथेच उभी होती. 

अशा आमच्या अविस्मरणीय दरबारा सिंग साहेबांनी अगदी परवाच, म्हणजे ११ ऑक्टोबर २०२२ रोजी या इहलोकातून कूच केले! 

“सुभेदार मेजर व ऑनररी कॅप्टन दरबारा सिंग साहेब, आज १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तुमच्या गावी, तुमच्यासाठी ‘अंतिम अरदास’ आयोजित केलेला आहे. तुम्हाला मानवंदना देण्यासाठी मी प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. म्हणून इथूनच तुमच्या कॅडेटचा तुम्हाला कडक सॅल्यूट!”

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे 

‘तदेव लग्नं सुदिनं तदेव । ताराबलं चंद्रबलं तदेव ।’ ……. म्हटल्याबरोबर माझं घर दुरावलं . मी परकी झाले . पाहुणी झाले . आयुष्याच्या या वळणावरील ही डिटॅचमेंट मला खूप हळवी करणारी होती .पण दुरावलेल्या या माया बंधनांची हुरहुर मनी असली तरी नवीन नात्यांची गुंफणही मनाला दिलासा देत होती .सून , वहिनी , जाऊ , पत्नी या नात्यांनी तर समृद्ध  केलंच होतं  पण एक सर्वोच्च नातं माझ्या कुशीत आलं होतं .मला मातृत्व पद बहाल केलं होतं.माझी छकुली , माझी सावली , माझा काळीज तुकडा , त्रिभुवनाचं सुख मला यापुढे थिटं वाटू लागलं आणि मुली माहेर सोडून सासरी का येतात या प्रश्नाचं गमक मला कळालं.

निसर्गकन्या बहिणाबाईंनी आपल्या योगी आणि सासुरवाशीण कवितेत हेच तर मांडलं.

” देरे देरे योग्या ध्यान

ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते “

या डिटॅममेंटला अशी ही गोड अँटॅचमेंट होती .

पुढे आयुष्यात असेही वळण आले आणि एकएक करत आई बाबांनी इहलोकीची यात्रा संपविली . हा माझ्यावर कुठाराघात होता .माझी मायेची माणसं , माझं हळवंपण जाणणारी आई , माझ्यावर अतोनात प्रेम करणारे बाबा निघून गेले , मला पोरकं करुन गेले . उत्तरकार्य संपल्यावर मी माझ्या घरी निघाले तेव्हा माझा भाऊ गळ्यात पडून रडला होता . ” ताई , आई बाबा गेले म्हणजे माहेर संपलं असं समजू नकोस . हा तुझा भाऊ आहे अजून , केव्हाही हक्काने येऊन राहात जा .मला भेटत जा . आईनंतर आता तूच माझी आई आहेस ग . तुझ्या मायेची पखरण होऊ देत जा माझ्यावरही .आणि लाभू दे तुझ्या प्रेमाची श्रीमंती मलाही .” या डिॅचमेंटलाही किती सुंदर अँटॅचमेंट होती . ” आई , तू रडत आहेस ” माझी छकुली मला विचारत होती , ” नाही बाळा “, मी तिला कुशीत घेतलं . आई गेल्याचं दुःख तर होतंच पण मी सुद्धा कोणाची आई आहे हे विसरुन चालणारं नव्हतं .

छकुली आणि तिच्यानंतर आलेला चिंटू . चौकोनी कुटुंबात विसावलेली मी . मुलांचं संगोपन शाळा , शिक्षण , काळ द्रुतगतीनं कधी पुढे सरकला कळलेही नाही . मुलांना पंख फुटले , भरारी घेण्यास सज्ज झाले ,आणि माझे मन कातर झाले .छकुलीचं कन्यादान करतांना मला माझं लग्न आठवलं आणि आयुष्यातलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं होतं .

चिंटूने खूप प्रगती केली व एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या द्वारे अमेरिकेला गेला आणि पुढे तिथलाच झाला . ” चिंटूसाठी मी स्थळं शोधू लागले . निदान मुलगी भारतीय असावी , आपले संस्कार येणार्‍या पिढीवर व्हावे ही  माझी भोळी आशा . मी चिंटूला म्हणाले पुढच्या महिन्यात येतोच आहेस तर मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम उरकवून टाकू या “.

” आई तुला हा त्रास कशाला , मी शोधलीय तुझी सून . नॅन्सी खूप गुणी मुलगी आहे .” 

माझं स्वप्न भंगलं , पण मुलाच्या स्वप्नाला महत्व देणं गरजेचं असल्यानं मी हा दुःखावेगही सोसला .

मुलं घरट्यात विसावली , उरलो आम्ही दोघेच.सुधीरची साथ असल्याने मला जीवन जगणं सोप झालं .

” अगं , सुनीता जेवायचं नाही काय आज ?. चल मलाही वाढून दे आणि तुझंही वाढून घे . चल लवकर , जाम भूक लागलीय मला ” ” होय चला , जेवण करून घेऊ या . “

सुनीता रिलॅक्स , अगं वाटेल दोन चार दिवस मनाला रुखरुख  , रोजचं जीवनचक्र बदललं कि होतो हा त्रास. सेवानिवृत्त झालं म्हणजे आपण निकामी झालो असं नाही . उलट आता आपला हा वेळ स्वतः साठी ठेवायचा .स्वतःसाठी जगायचं .आपल्या इच्छा पूर्ण करायच्या , आपले छंद जोपासायचे “Life begins at sixty my dear “.

दुपारच्या वामकुक्षीसाठी मी विसावले . झोप येत नव्हती म्हणून टी. व्ही . लावला . कोणत्यातरी चॅनेलवर आध्यात्मिक प्रवचन सुरू होते ” हा संसार मोह मायेने व्यापलेला आहे .या मायाजालातच माणूस फसत जातो व हे माझं , हे माझं ची वीण घट्ट होत जाते . माणसानं प्रेम करावं किंबहुना हे जग प्रेमानंच जिंकता येतं पण प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात . जवळकीतूनच दुरावा निर्माण होतो . म्हणून कोठे थांबायचं हा निर्णय घेता आला पाहिजे . साधं पक्ष्यांचंच उदाहरण बघा ना , पिल्लं मोठी झाली , भरारी घेतली कि स्वतंत्र होतात .तसंच माणसांचंही आहे . वानप्रस्थाश्रम ही संकल्पना हेच तर सुचविते .

नवीन पिढीला त्यांचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं . वृद्धांनीही आपली मते त्यांना द्यावीत पण लादू नयेत.नवीन बदल , नवीन विचारांना संमती आनंदाने द्यावी.निसर्गाचं चक्रही हेच सांगतं . शिशिरात पानगळ होणारचं . जर पानगळ झालीच नाही तर नवपल्लवी फुटणार कशी ? माणूसही यापेक्षा वेगळा नाही .वृद्ध , जर्जर शरीर जीर्ण पानासारखं गळून पडणारचं. पंच तत्वानं भरलेलं हे शरीर शेवटी पंचतत्वात सामावून मोक्षाला जाणारचं .वेळीच ही अलिप्तता ज्याला कळली तो भाग्यवानच ,.कारण मायेच्या , मोहाच्या जाळ्याला त्यानं भेदलेलं असतं .सर्व येथे सोडून वैकुंठागमन करणं सोपं होतं मग “

“होय आता आपणही अलिप्त झालं पाहिजे .निरोगी तनाबरोबरच निरोगी मनासाठी हलकासा व्यायाम , निसर्गात रमणं , आपले छंद जोपासणं आणि संवाद साधत माणसं जोडणं कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या या जगात .” नकळत माझ्या ओठांवर हास्य आलं होतं . आरशात डोकावले तर चेहरा प्रफुल्लित झाला होता . चित्तवृत्ती फुलल्या होत्या .

— समाप्त — 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पालकांचा गृहपाठ — संकलन : श्री भार्गव पवार ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ पालकांचा गृहपाठ — संकलन : श्री भार्गव पवार ☆ श्री सुनील देशपांडे

**  आपली मुले चांगली घडावीत ही सर्वांचीच इच्छा असते.  पण काय करावे हे उमजत नाही.  चला तर त्या साठी शाळेने पालकांना एक गृहपाठ दिला आहे *****

(सूज्ञ पालकांकडून याची अपेक्षा आपल्या आपल्यासाठीच बर का !) 

चेन्नईतील एका शाळेने आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होत आहे.

याचे कारण इतकेच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येते की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत? अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिला आहे,जो प्रत्येक पालकाने वाचला पाहिजे.

त्यांनी लिहिले-

गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पुढील दोन महिने त्यांच्या नैसर्गिकह संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल.

– मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका असे सांगा.

– जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल.

– त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यासाठी मदत करू द्या. त्यांना भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या.

– तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा.

– आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा.

– त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.

– कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका.

– किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

– मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा.

– तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होऊ द्या, त्यांना घाण होऊ द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.

– त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या.

– त्यांना काही लोकगीते वाजवा.

– तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा.

– तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे.

– त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, एरेटेड पेये आणि बेकरी उत्पादने जसे पफह आणि तळलेले पदार्थ जसे समोसे देणे टाळा.

– तुमच्या मुलांच्याह डोळ्यात पहा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल निसर्गाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत, ते नवीन उंचीवर असतील.

पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुले खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टींपासून दूर आहेत…!

म्हणून हा प्रयत्न…

संकलन : श्री भार्गव पवार 

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ I am in control – एक व्यसनयात्रा ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

I am in control  एक व्यसनयात्रा ☆  श्री मकरंद पिंपुटकर

I am in control  एक व्यसनयात्रा

रमेश हा एक almost आदर्श नागरिक होता. त्याची जुनी बजाज चेतक चालवताना तो कधी गाडी बेफाम पळवायचा नाही, नेहमी स्पीड लिमिटचे पालन करायचा. लाल काय, नियमानुसार तो कधी पिवळा सिग्नलही तोडायचा नाही. कधीही wrong साईडने गाडी चालवायचा नाही. 

म्हणजे एकंदरीत इतक्या सज्जनपणे गाडी चालवायचा, की अगदी शुक्रवार – शनिवार रात्री किंवा सणासुदीलासुद्धा पोलीस त्याला संशयावरून बाजूला घ्यायचे नाहीत. 

आणि ते तसे त्याला बाजूला घ्यायचे नाहीत म्हणून बरं होतं, कारण रमेश हा नेहमीच तर्र अवस्थेत असायचा. “मला दारूचं व्यसन नाही रे. दारू काय आपण केव्हापण सोडू शकतो. आपण नेहमी full control मध्ये असतो.” हातातला देशी दारूचा ग्लास रिचवताना तो त्याचं तत्त्वज्ञान सांगायचा. 

त्याचं लग्न झालं होतं, दोन मुली होत्या. दिवसा तर त्या शाळेत गेलेल्या असायच्या. रात्री जेवताना रमेश, लेकी आणि रमेशची बायको एकत्र असायचे. टीचभर स्वयंपाकघरात बायकोची लगबग चाललेली असायची, मुली दोन घास पोटात ढकलत असायच्या आणि रमेश नेहमीप्रमाणे कोणाशी काही न बोलता, आपल्याच धुंदीत (आपल्याच नशेत, खरं तर) उन्मनी अवस्थेत बसलेला असायचा. 

मला तर वाटतं की खाण्यापेक्षा त्याचा जास्त भर पिण्यावरच होता.  दारूच्या नशेत बायकोला – मुलींना मारहाण करायचा नाही हेच काय ते नशीब. 

त्याला चांगली नोकरी होती. आम्ही दोघं एकाच कारखान्यात काम करायचो. पण या व्यसनापायी त्याला अनेकदा warning मिळाल्या आणि मग, नाईलाजाने, शेवटी एके दिवशी कामावरून डच्चूही मिळाला. 

रमेशला काहीच फरक पडला नाही. ना त्याने दारू सोडली, ना त्याने नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. उलट आता त्याला दारू पिण्यासाठी आणखी वेळ आणि मोकळेपणा मिळाला.

याची नोकरी गेल्यावर बायकोने महिनाभर आस लावली, तिला वाटलं – नवरा नोकरीसाठी प्रयत्न करेल. महिन्याभरात पुन्हा एकदा भ्रमनिरास झाल्यावर त्या माऊलीने धुण्याभांड्याची चार कामं आणखी वाढवली. 

रमेश पूर्ण वेळ full time घरकोंबडा झाला. 

याचं दारू ढोसणं चालूच होतं. कर्जाचा आणि खर्चाचा डोंगर वाढतच होता. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेल्यावर बायकोने शेवटी ज्या घरात ते रहात होते ते तिच्या वडिलांच्या मालकीचं घर विकलं, सर्व कर्जं बऱ्यापैकी फेडली. 

आता ते एका झोपडपट्टीवजा इलाख्यात भाड्याने राहत होते. रमेश अजूनही नोकरीसाठी प्रयत्नही करत नव्हता. “आपण दारूबाज नाही रे. आपण एकदम control मध्ये असतो.” हे त्याचं घोषवाक्य अजूनही कायम होतं. 

मुलींची शिक्षणं जेमतेम दहावी बारावीपर्यंत झाली, आलेल्या स्थळांबरोबर बायकोने मुलींची लग्नं लावून दिली, निदान त्या दोघींची तरी सुटका झाली. 

आयुष्य मागच्या पानावरून तसंच नीरसपणे पुढे सुरू होतं. 

आणि एका रात्री त्याच्या किंचाळ्यांनी बायकोला जाग आली. त्याच्या तोंडातून आणि शौचाद्वारे रक्त येत होतं. 

“ब्लड हॅमरेज,” सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे नेमकं काय हे त्या बिचाऱ्या बायकोला कळलं नाही. मग डॉक्टरच तिला समजावून सांगू लागले. 

हाताने यकृताची जागा दाखवत ते म्हणाले, “या इथे liver असते. किडन्यांप्रमाणे liver सुद्धा रक्तातील अशुद्ध भाग काढून टाकते. सारखी दारू पिण्याने तुमच्या नवऱ्याची liver निकामी झाली आहे. जेमतेम १०% काम करत आहे. 

दारूनं त्याची जठर, आतडी या सगळ्या सगळ्यांची आवरणं पार खराब झाली आहेत, त्यांत अल्सर झाले आहेत. त्यातला कुठलातरी एक अल्सर आज फुटला, म्हणून आज हे असं झालं.”

डॉक्टर कमालीच्या यांत्रिकपणे, कोणत्याही भावभावनेशिवाय हे सगळं सांगत होते. आणि त्यात आश्चर्य नव्हतं. जवळपास रोज एखादीतरी अशी केस यायचीच. काही महिन्यांनंतर तेही निर्ढावले होते. 

“आता आम्ही याचं नाव लिव्हर ट्रान्सप्लांट लिस्टमध्ये टाकू. ते ऑपरेशन महाग असतं,” डॉक्टरांनी खर्चाचा आकडा सांगितल्यावर बायको मटकन खालीच बसली. “पण लिव्हर कधी मिळेल काहीच सांगता येत नाही. शिवाय लिव्हर उपलब्ध झालीच तर एखाद्या दारुड्यापेक्षा दारू न पिणाऱ्या पेशंटला लिव्हर दिलेले जास्त चांगलं असतं, कारण व्यसनाधीन माणूस पथ्यपाणी करत नाही आणि मिळालेली नवी लिव्हरही नासवतो.

आज तुम्ही धावपळ करून त्याला वेळेवर हॉस्पिटलला आणलंत, आणि आज आम्ही त्याला वाचवू शकलो. कदाचित पुढच्या वेळी जर तुम्हाला उशीर झाला, किंवा आम्ही हा रक्तस्त्राव थांबवू शकलो नाही तर …”

निर्विकारपणे सांगताना अचानक डॉक्टरांचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं, त्यावरची प्रेतकळा पाहून तेही वरमले, चरकले, थांबले. 

पण त्यामुळे त्यांनी वर्तवलेला भविष्यात फरक पडला नाही. रमेश मृत्यू पावला – कणाकणाने, क्षणाक्षणाने, वेदनादायी मरण आलं त्याला. 

व्यसनापायी सर्व पैसा उधळवून टाकला होता त्याने, आयुष्यही उधळून टाकलं.

“आपल्याला व्यसन नाही रे दारूचं. I am in full control,” हे ध्रुपद घेऊन सुरू झालेली व्यसनयात्रा त्याचा प्राण घेऊनच संपली.

रमेशसारखेच एकदम full control मध्ये असणारे तुमच्या आजूबाजूलाही अनेक जण असतील. ते वेळीच सावरोत, ही सदिच्छा.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ अण्णासाहेब किर्लोस्कर ☆ श्री प्रसाद जोग

अण्णासाहेब किर्लोस्कर

( जन्मदिन ३१ मार्च,१८४३ — स्मृतीदिन २ नोव्हेंबर,१८८५ ) 

मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम, खर्‍या अर्थाने रुजवण्याचे श्रेय  बलवंत पांडुरंग अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांकडेच जाते.

१८७३ साली अण्णासाहेबांनी ‘शांकरदिग्विजय’ या नावाचे एक गद्य नाटक प्रसिद्ध केले. १८८० साली पुणे मुक्कामी किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी एका बैठकीत  ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.

१३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘शाकुंतला’च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

भारतीय नाट्यशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं.

भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत – ती वाद्यांवर वाजवली जात.जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. त्यालाच आपण आज नांदी म्हणतो .

नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार ‘संगीत शाकुंतल’ नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. ‘पंचतुंड नररुंडमालधर’ ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्‍यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत अचानकपणे बदलून गेला.

संगीत, नृत्य, नाट्य यांच्या अपूर्व संगमातून निर्माण झालेली संस्कृती म्हणजे रंगभूमी. याच रंगभूमीचं तेजस्वी रुप म्हणजे आपली मराठी संगीत नाट्य परंपरा. रंगमंदिरातील निःशब्द शांतता, भारावून टाकणारं वातावरण, मंद होत जाणारे दिवे, मखमली पडदा, धुपाचा गंध आणि ऑर्गनच्या साथीनं येणारे नांदीचे सूर. सगळच भव्यदिव्य.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाद्वारे ही देदीप्यमान परंपरा सुरू केली.

पंचतुंड नररुंडमाल घर, पार्वतीश आधी नमितो।

विघ्नवर्ग नग भग्न कराया,विघ्नेश्वर गणपती मग तो॥

 

कालिदास कवी काव्य रचित हे गानी शाकुंतल रचितो I

जाणूनिया अवसान नसोनी हे महत्कृत्यभर शिरी घेतो II

 

ईशवराचा लेश मिळे तरी  मूढयत्न शेवटी जातो I

या न्याय बलत्कवि निज वाकपुष्पी रसिकार्चन करितो II

नांदी आणि नाटकातील इतरही पदे निरनिराळ्या राग-रागिण्यांवर आधारित असत. यमन, भूप, ललत, जोगिया, पिलू, आसावरी, भैरवी यांसारखे प्रचलित आणि लोकप्रिय राग तर वापरले गेले.

शाकुंतल नाटकांमधील पदे आजही आवडीने ऐकली जातात त्या पैकी थोडी

१)मना तळमळसी ,

२)लाविली थंड उटी

संगीत सौभद्र मधल्या पदांची यादी फारच मोठी आहे म्हणून नमुन्या दाखल काही गाणी .

१) नच सुंदरी करू कोपा

२) नभ मेघांनी आक्रमिले

३) पाण्डुनृपती जनक जया

४) राधाधर मधू मिलिंद

५) लग्नाला जातो मी

६) प्रिये पहा ( पूर्वीच्या काळी ह्या गाण्याच्या वेळी खरोखर पहाट होत असे)

१५० वर्षांपूर्वी लोकरंजन करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या स्मृतीला  विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शिवथर घळ’ … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. राहायला नेहेमी मिळते तशी मोफत खोली मिळाली… आज फारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजून कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून राहावयास पाठविले. एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले ! “हाय ! मी भोपळे !” ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता… इतक्यात त्यांनी पँटच्या खिशातून खचाखच भरलेल्या  काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली… माझी उत्कंठा ताणली गेली.. “हे काय आहे ?” “ही जीपीएस मशीन्स आहेत … डू यू नो व्हॉट जीपीएस इज ?” 

माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला ! “येस, आय नो… पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता ?” हसत हसत ते म्हणाले “मी जीपीएस व्हेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे ” असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहर्‍यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले – “हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो ! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफत !” असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतिशय सखोलपणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसची इत्थंभूत माहिती मला सांगितली … ज्ञानात चांगलीच भर पडली ! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध ? मलाही तोच प्रश्न पडला ! पण खरी गंमत तर पुढे आहे ! वाचत रहा !

भोपळे म्हणाले “चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करूयात…” असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो… उघड्या आकाशाखाली…  कारण जीपीएसला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते ! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझिशन, स्थान सांगत असतात ! आता माझी परीक्षा सुरु झाली !

भोपळे : बरं, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे ?

मी : “९० तरी असेल.”

भोपळे : “गुड.. मग मला सांगा आता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील ?”

मी : “तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत.”

भोपळे: “करेक्ट! लेट्स व्हेरीफाय !”

असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८… नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मीटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही !

भोपळे :” मी जगभरातील अनेक देश फिरलोय… सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते”. आता मात्र मला रहावेना. मी म्हणालो – “भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणि शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात ?”

“तीच तर गंमत आहे!” भोपळे हसत हसत म्हणाले – “इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो. म्हणजे सर्वेक्षणच होते .. आणि अचानक एक चमत्कार गवसला !”

मी अति उत्सुकतेने ऐकत होतो !

“डू यू वाँट टू विटनेस इट ? या माझ्या सोबत !” असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले. 

भोपळे : “वर पहा, किती आकाश आहे ?”

मी :” ७० अंश तरी आहेच आहे.”

भोपळे :” मग किती उपग्रह दिसावेत ?”

मी : निदान २०-२५ ?

भोपळे : “करेक्ट, नाऊ लेट्स चेक…” असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरू केली … आणि काय आश्चर्य ! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना ! चमत्कारच हा ! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते ! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते. म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते !

भोपळे म्हणाले “पूर्ण जग फिरलो परंतु absolutely frequency less अशी केवळ हीच एक जागा पाहिली !” …. आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्रकन स्मरल्या !

…. ‘ विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे !! ‘                                      

विश्रांती ! शांतता ! कंपनरहित अवस्था ! निर्विचार स्थिती ! अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार ! त्यात भेसळ होणे नाही ! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार ! …. म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे !

अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या… भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला… समर्थांच्या पायावर लोटांगण घातले… आज तिथे भासणारी शांतता अधिक खोल होती… अधिक गंभीर होती… अधिक शांत होती ! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती !

आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ अंतःस्थ जाणीवेने समजले होते !

दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे ! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो ? नसेल … तर अगदी अवश्य पहा ! आणि सर्वांना सांगा !

!! जय जय रघुवीर समर्थ !! 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सद् रक्षणाय खलनिग्रहणाय ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ☆ श्री प्रसाद जोग

अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे — बलिदान दिवस १९ एप्रिल,१९१०

हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे,कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या तिघांनी मिळून नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध दिनांक २१ डिसेंबर,१९०९ रोजी केला.

वध आणि खून दोन्हीचा शेवट मृत्यू असला तरी “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” म्हणून जी हत्या केली जाते तिला वध असे म्हटले जाते आणि वाईट प्रवृत्ती जेंव्हा हत्या करतात तेंव्हा खून केला असे म्हटले जाते.

तिघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक होते . १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत ‘ या क्रांतिकारक संघटनेचे ते सदस्य होते . नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरूण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. फाशी दिली त्या वेळी त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते.

गोल्फच्या बॉल ला हात लावला म्हणून जॅक्सनने नेटिव्ह माणसाला बेदम मारले त्या मध्ये त्यात त्याचा मृत्यू झाला,दुसऱ्या एका घटनेमध्ये वंदेमातरम म्हणणाऱ्या लोकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली पकडले होते,त्यांची वकिली करण्यासाठी बाबासाहेब खरे यांनी वकीलपत्र घेतले ,तर त्यांची सनदच रद्द केली आणि त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांना कैदेत टाकले.

बाबाराव सावरकर सातत्याने इंग्रज सरकारच्या विरोधात लिखाण प्रसिद्ध करत होते कवी गोविंद यांच्या रचना असलेले पुस्तक बाबाराव सावरकरांनी छापले, जॅक्सनने त्यांना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला,आणि त्यांनासुद्धा कैदेत टाकून त्यांची अंदमानात रवानगी केली.या सर्व घटनांची चीड येऊन या तिघांनी जॅक्सनला संपवायचे नक्की केले.

सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याना कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अश्या समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभा राहिले , त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च, १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल, १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.

“१९०९” या नावाने त्यांच्या जीवनावर सिनेमा बनवला होता, तो २०१३ साली प्रदर्शित झाला. त्याचा टिझर मला यु ट्युब वर मिळाला, त्याची लिंक देत आहे

ठाण्याच्या तुरुंगात त्यांचे स्मारक केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील धगधगलेल्या यज्ञकुंडात तिघांची आहुती पडली आणि स्वातंत्र्य क्रांती पुढे वाट चालू लागली.

या तिन्ही थोर क्रांतिकारकांच्या स्मृतीला सादर प्रणाम … 

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मंदिर स्थळांचे रहस्य — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मंदिर स्थळांचे रहस्य — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

तुम्ही अंदाज लावू शकता का की या प्रमुख मंदिरांमध्ये काय सामान्य आहे:

  1. केदारनाथ,
  2. कलहष्टी,
  3. एकंबरनाथ- कांची,
  4. तिरुवनमलाई,
  5. तिरुवनाइकावल,
  6. चिदंबरम नटराज,
  7. रामेश्वरम,
  8. कलेश्वरम.

 ” सर्व शिवमंदिरे आहेत ” असे तुमचे उत्तर असेल, तर तुम्ही अंशतः बरोबर आहात.  प्रत्यक्षात ही मंदिरे ज्या रेखांशात आहेत.

 ” ते सर्व 79 ° रेखांशांमध्ये स्थित आहेत.”

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मंदिरांच्या अनेक शेकडो किलोमीटरच्या वास्तुविशारदांनी जीपीएस शिवाय ही अचूक स्थाने कशी तयार केली.

  1. केदारनाथ 79.0669°
  2. कलहष्टी ७९.७०३७°
  3. एकंबरनाथ- कांची 79.7036°
  4.  ४. तिरुवनमलाई ७९.०७४७°
  5. तिरुवनैकवल 78.7108°
  6.  ६. चिदंबरम नटराज ७९.६९५४°
  7.  ७. रामेश्वरम ७९.३१२९°
  8. कलेश्वरम 79.9067°

नकाशा पहा. सर्व सरळ रेषेत आहेत.  

“केदारनाथ ते रामेश्वरम पर्यंत” सरळ रेषेत बांधलेली शिव मंदिरे भारतात आहेत.

ही मंदिरे 4000 वर्षांपूर्वी बांधली गेली होती.  मग, पाच मंदिरे इतक्या अचूकपणे कशी स्थापन झाली?    फक्त देवच जाणे.

केदारनाथ आणि रामेश्वरममध्ये 2383 किमी अंतर आहे.

ही सर्व मंदिरे 5 तत्वांची अभिव्यक्ती दर्शवतात, पंच तत्व (पांच तत्व), म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु आणि अवकाश.

श्री कलाहस्ती मधील चमकणारा दिवा हा आकाशवाणी घटकाचे प्रतिनिधित्व करतो थिरुवनिक्काच्या आतील पठारातील वॉटर स्प्रिंग हे पाण्याच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते.

अन्नामलाई टेकडीवरील मोठा दिवा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो.

कांचीपुरम येथील सँड्सचे स्वयंभू लिंग पृथ्वीचे घटक दाखवते.

चिदंबरम यांचे निराकार (निराकार) राज्य हे देवाच्या स्वर्ग (आकाश) घटकाचे प्रतिनिधित्व करत आहे.

आपल्या प्राचीन ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला अभिमान असायला हवा.  असे मानले जाते की ही केवळ 5 मंदिरे नाहीत तर “शिव-शक्ती अक्ष रेखा” या ओळीत अनेक आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महाकालचे देशभरातील सर्व ज्योतिर्लिंगांशी नाते आहे.

ज्योतिर्लिंगाचे अंतर आहे:

* उज्जैन ते सोमनाथ- 777 किमी

* उज्जैन ते ओंकारेश्वर – 111 किमी

* उज्जैन ते भीमाशंकर- 666 किमी

* उज्जैन ते काशी विश्वनाथ- 888 किमी

* उज्जैन ते मल्लिकार्जुन – 888 किमी

* उज्जैन ते केदारनाथ- 1111 किमी

* उज्जैन ते त्र्यंबकेश्वर – 555 किमी

*उज्जैन ते बैद्यनाथ- 1399 किमी

* उज्जैन ते रामेश्वरम- 1999 किमी

“उज्जैन हे पृथ्वीचे केंद्र मानले जाते.”  हिंदू धर्मामध्ये विनाकारण काहीही नव्हते.

सनातन धर्माचे 1000 वर्षांचे केंद्र म्हणून, उज्जैनमध्ये सूर्य आणि ज्योतिषाची गणना करण्यासाठी मानवनिर्मित साधन सुमारे 2050 वर्षांपूर्वी बांधले गेले होते

आणि, जेव्हा पृथ्वीवरील काल्पनिक रेषा सुमारे 100 वर्षांपूर्वी ब्रिटीश शास्त्रज्ञाने तयार केली, तेव्हा तिचा मध्य भाग उज्जैन होता. आजही उज्जैनमध्ये सूर्य आणि अवकाशाची माहिती घेण्यासाठी वैज्ञानिक येतात.

आपल्या शिव मंदिराविषयी ही खूप छान शास्त्रीय माहिती आहे. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता.लंडनमध्ये रहायचा. असाच एकदा अमेरिकेत गेला होता. न्युयॉर्कमध्ये.

रस्ता ओलांडत होता..आणि त्याला एका गाडीची धडक बसली.

एका हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमीट केलं.ही बातमी सगळीकडे पसरली.वेगवेगळ्या दैनिकाचे..मॅगझिन्सचे रिपोर्टर हॉस्पिटल बाहेर जमले‌.

पण कोणाशीही बोलण्यास त्याने नकार दिला.आपल्या या अपघातामध्ये बाहेर किती औत्सुक्य आहे हे त्याला उमगलं.त्याने ठरवलं.यावर आपणच लिहायचं.मग त्यानं त्यावर एक लेख तयार केला.’कॉलिअर्स’ या दैनिकाने तो तिथल्या तिथे विकत घेतला.चक्क तीन हजार डॉलर्सला.

ही गोष्ट शंभर वर्षापुर्वीची.त्याचं सगळं आयुष्यच भन्नाट.सुरुवातीच्या काळात लष्करात सेवा बजावल्यानंतर त्यानं ठरवलं.. यापुढे आजन्म उपजीविका करायची ती फक्त लेखनावरच.

लेखनासाठी शांतता लाभावी म्हणून त्यानं चक्क पाचशे एकर जमीन खरेदी केली.त्यात एक गढी उभारली.एक सुसज्ज अभ्यासिका बनवली.

त्याचा दिनक्रम विलक्षणच.सकाळी आठ वाजता उठल्यावर तासभर तो दैनिकांचं वाचन करत असे.त्यानं एक उभं डेस्क बनवलं होतं.तिथे उभं राहून तो तोंडी मजकूर सांगायचा.तो जरी लेखक होता,तरी आयुष्यात त्याने हातात लेखणी धरली नाही.त्यानं सांगितलेला मजकुर दोन टायपिस्ट उतरुन घेत.सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात साधारण अडीच हजार शब्दांचं लेखन झालं पाहिजे हा त्यांचा दंडक.

दुपारी दोन ही त्याची स्नानाची वेळ.तो एक उत्तम वक्ता देखील होता.स्नानाच्या वेळी तो मोठ्या आवाजात भाषणाचा सराव करत असे.यावेळी कधी त्याला उत्तम वाक्य सुचायची.तो ती मोठ्या आवाजात उच्चारायचा.त्याच्या टायपिस्ट बाहेर उभ्याच असतं.लगेचच त्या ती वाक्ये टिपून घेत.

त्यानंतर मग भोजन.जेवणाच्या आधी आणि जेवण करताना उत्तम मद्याचे प्याले त्याच्या टेबलवर असत.व्यवस्थित तब्बेतीत मद्यपान..साग्रसंगीत भोजन..आणि मग वामकुक्षी.

वामकुक्षीबद्दल त्याचे विचार अफलातून होते. तो म्हणतो… 

“एक तासाच्या शांत वामकुक्षी मुळे आपण एका दिवसाचे दोन प्रसन्न दिवस करु शकतो.डुलकी काढल्यानंतर चित्त कसं टवटवीत होतं.ज्याला आयुष्यात वेळ वाचवुन मोठं काम करायचं आहे..त्यानं वामकुक्षीची सुखद सवय लावून घ्यावी “.

दुपारी चार ते रात्री दहापर्यंत तो लेखनाची संबंध नसलेलं राजकीय काम करत असे.रात्री दहा ते पहाटे तीन ही वेळ लिहीण्याची.. म्हणजे मजकूर सांगण्याची.दोन टायपिस्ट पुन्हा एकदा त्याच्या मुखातून येणारे शब्द टिपुन घेण्यासाठी सरसावुन बसत.

वयाच्या पन्नाशीत असतांना त्याला आपल्यातल्या एका वेगळ्या गुणांचा शोध लागला.आपल्या मुलाला चित्रकला शिकवत होता तो.त्याच्या लक्षात आलं..आपण चित्रही छान काढु शकतो.

मग त्यासाठी एक नवा स्टुडिओ उभा केला.त्याच्या कुंचल्यातून शेकडो रंगीत अप्रतिम चित्रे अवतरली.

साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणारा तो एकमेव राजकीय नेता होता.जगातील सत्तावीस विद्यापिठांनी त्याला सन्माननीय पदव्या अर्पण केल्या.त्याच्या भाषणांच्या रेकॉर्डस् निघाल्या.रॉयल ॲकेडमीचा चित्रकार म्हणून कलावंतांच्या जगातला सर्वोच्च सन्मान त्याला मिळाला.उत्तमोत्तम मद्याचे महासागर त्याच्या घशाखाली उतरले.लाखो चिरुटांची त्यानं राख केली.

पुर्वायुष्यात त्यानं लष्करी शिक्षण घेतलं होतं.एक जिगरबाज योद्धा म्हणुनही त्याची ती कारकीर्द गाजली.सतत साठ वर्षे तो इंग्लंडच्या संसदेत होता.. आणि तरीही नीतीवान होता‌.. काठोकाठ चारित्र्य संपन्न होता.आजन्म त्याने सरस्वतीची साधना केली.

आपल्या कुटुंबावर अपार प्रेम करणारा..लखलखीत जीवन जगणारा तो म्हणजे …. 

इंग्लंडचे महाप्रतापी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈