सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मर्रि कामय्या…☆ सुश्री शोभा जोशी ☆

हे नाव अशा एका जनजातीतील व्यक्तिचं आहे, ज्याचं घर जाळलं गेलं, ज्याला जंगलात राहावं लागलं. त्याचंच घर नाही तर सबंध गावच जाळलं गेलं. त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल!असं आहे की सूर्याला तात्पुरतं ग्रहण लागलं म्हणून त्याचं तेज कमी होत नाही. तसंच कामय्यांचं झालं.

आंध्र प्रदेशातील, पाडेरू क्षेत्रातील, हुकूमपेट मंडलातील गरूडापल्ली गाव हे या वीराच्या नावाने ओळखले जाते. कामय्यांचा जन्म कोंडा दोरा जनजातीत झाला होता.

ब्रिटिशांच्या काळात, आपल्या देशातील काही सावकारांनी भोळ्या- भाभड्या वनवासींकडून जास्तीत जास्त कर वसूल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांना पाणी, रस्ते, शिक्षण या प्राथमिक सुविधाही मिळत नव्हत्या. त्यांचं अगदी सरळ सरळ शोषण चालू होतं. हीच परिस्थिती गरूडापल्ली गावातही होती. या सावकारांना इंग्रजांचा पाठिंबा होता ही गोष्ट लपून राहिली नव्हती. या सावकारांच्या विरूध्द पर्यायाने इंग्रजांविरूध्द लढा उभा करण्याची योजना मर्रि कामय्यांनी ठरवली. आता सूर्याला लागलेलं ग्रहण सुटेल ही आशा लोकांच्या मनात जागृत झाली.

सिताराम राजूंनी १९२४ मध्ये केलेल्या रम्पा संग्रामापासून प्रेरणा घेऊन कामय्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी ५० लोकांचं एक दल बनवून इंग्रजांविरूध्द संघर्ष सुरू केला.

ज्या ज्या गावात कोंडा जनजातीतील लोक राहात त्या त्या गावात ग्राम समित्या निर्माण करून शाळा सुरू केल्या. आज आपण जनजातीतील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आपण निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करत आहोत. दूर दूर वनात राहाणार्‍या मुलांना औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण मिळावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून संस्कार वर्ग, छात्रावास चालवत आहोत. असाच प्रयत्न त्याकाळी जनजातीतील लोकांनीही केला होता. त्यातलेच एक मर्रि कामय्या होते.

लोकांना स्वावलंबी बनवण्याचेही प्रयत्न चालू होते. हळू हळू लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली. ही गोष्ट इंग्रजांच्या पचनी पडत नव्हती. त्यांनी कामय्यांविरूध्द कारवाई करण्यास सुरूवात केली. प्रथम त्यांनी गरूडापल्ली गाव जाळून खाक केले. कामय्या डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या गावातील ३६० बेघर झालेल्या कुटुंबांना घेऊन एक बीटागरूदू नावाचे गाव वसवले. इंग्रजांनी तिथेही अत्याचार सुरू केले. कामय्यांच्या सगळ्या संपत्तीचा लिलाव केला. कामय्या काही काळ आपल्या साथीदारांबरोबर जंगलात भटकत राहिले. अशा परिस्थितीत ५० लोकांचं एक दल बनवून इंग्रजांविरूध्द संघर्ष सुरू केला. अर्थातच त्याचं नेतृत्व कामयांकडे आलं. इंग्रजांनी त्यांना कैद करून ११ दिवस तुरूंगात टाकले. या ११ दिवसात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले.

कैदेतून मुक्त झाल्यावर, असहकार आंदोलनात सहभागी झाले, हा आरोप त्यांच्यावर ठेऊन त्यांना पुन्हा कैद केले. यावेळी कैदेतून मुक्त झाल्यावर ते भूमीगत झाले. त्यांनी आपले केंद्र वारंवार बदलून इंग्रजांशी लढा चालू ठेवला.

अशावेळी एक दुर्घटना घडली. त्यांची मुलगी नदी पार करत असताना त्यांच्या नजरेसमोर वाहून गेली. हा त्यांच्या मनावर झालेला खूप मोठा आघात होता. तरीही आंदोलनातून त्यांनी माघार घेतली नाही. व्यक्तिगत जीवनातील अनेक प्रकारचे कष्ट सहन करूनही ते इंग्रजांबरोबर संघर्ष करत राहिले. हा संघर्ष भारत स्वतंत्र होईपर्यंत चालू राहिला.

५ मे १९५९ ला त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला. तुमच्याजवळ काहीच नसताना, तुमच्या मनात जनहिताची निर्माण झालेली ओढ यातूनच लोकांना तुमची ओळख पटते. आणि म्हणूनच कामय्यांचे नाव त्या भागात आदराने घेतले जाते. या जनजातीतील वीराला ५ मे या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments