श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “शौर्य-श्रीमंत सैनिक” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
डोईवर अक्षता पडल्या आणि अवघ्या पंचवीस-तीस दिवसांत कुंकू सीमेवर लढायला गेलं…. त्यावेळी ती सतरा वर्षांची असेल नसेल! त्यानंतर त्याला नऊ महिन्यांनीच पाहण्याचा योग आला! तिच्या यजमानांच्या नावाचा अर्थ चमकता तारा… अगदी चुनचुनीत मुलगा! वाढत्या वयासोबत या ता-याची चमक वाढतच होती.
इतरांचे धनी नोकरीवरून सुट्टीवर आले की, बायकोसाठी सोन्याचे दागिने आणत असत… हिचा नवरा मात्र पहिल्याच सुट्टीत चांदी घेऊन आला! पण ही चांदी हि-यापेक्षाही मौल्यवान आणि चमचमती. या चांदीच्या दागिन्याच्या एका बाजूला हाती बंदूक घेऊन ताठ उभा असलेला सैनिक दिसत होता तर दुस-या बाजूला बंदुकीची संगीन… टोकदार… आभाळाकडे उंचावलेली… शत्रूच्या नरडीचा वेध घेऊ पाहणारी. तो चांदीचा दागिना म्हणजे एक पदक होतं…. सेना मेडल म्हणतात याला. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी हे पदक आपल्या छातीवर अभिमानाने मिरवण्याचे भाग्य लाभले होते तिच्या कुंकवाला….. होय… शिपाई चुन्नीलाल तिच्या घरधन्याचं नाव. जम्मू येथील रहिवासी. सहा मार्च १९६८ रोजी जन्मलेले चुन्नीलाल वयाच्या सोळाव्या वर्षी सेनेत भरती झाले दोन वर्षांच्या कठीण प्रशिक्षणापश्चात त्यांना 8, Jammu And Kashmir Light Infantry नेमणूक मिळाली. आणि पहिल्याच वर्षी म्हणजे १९८७ मध्ये त्यांना फार मोठ्या लष्करी कारवाईत सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभली…. होय… सैनिकासाठी लढाई करायला मिळणे म्हणजे एक सुवर्णसंधीच असते. पण या लढाईसाठी त्यांना काही महिन्यांचे खूप कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले… कारण त्यांची नेमणूक होणार होती सियाचीनच्या पर्वतांचे रक्षण करण्यासाठी.
१९८७ हे वर्ष होते… पाकिस्तानी घुसखोर सेनेने हजारो फूट उंचीवर असलेले एक शिखर बेकायदा ताब्यात घेतले होते… आणि त्याला त्यांच्या कायद-ए-आजम (कायदेआजम) अर्थात मोहम्मद अली जिनाचं नावही देऊन टाकलं होतं! भारत-पाक-चीन या सीमा त्रिकोण भागात ही शत्रूची चौकी असणं म्हणजे भारतासाठी मोठाच धोका होता. शत्रूला तिथून हुसकावून लावण्याची नितांत गरज लक्षात घेऊन लढाऊ बाणा असलेले सैनिक या कामगिरीवर पाठवण्यात आले! ही कामगिरी जीवघेणी होती. प्रचंड अंगावर येणारे शिखर, थंडी, बर्फ आणि वरून पाकिस्तानी अचूक गोळीबार यांतून त्या चौकीपर्यंत पोहोचायचे होते…. नायब सुबेदार बाणासिंग स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सामील झाले… तसेच आपले तरुण वीर चुन्नीलाल सुद्धा… त्यांच्या सोबत तसेच नीडर इतरही काही जवान होतेच. बाणा सिंग साहेबांचे मार्गदर्शन होते…. चुन्नीलाल इंच इंच पर्वत चढत चढत अंधार, थंडी, बर्फ याची पर्वा न करता मोठ्या कौशल्याने त्या बर्फाळ पर्वतावर चढले…. यातील एक सुळका ४५७ मीटर्स उंचीचा आणि एकदम खडा म्हणजे जवळजवळ ९० अंशाचा होता… बर्फाचे वादळ सुरु होते… समोरचे नीट काही दिसत नव्हते…. पण तरीही चुन्नीलाल यांनी शत्रूच्या बंकरवर तुफान हल्ला चढवला…. सहका-यांना सोबत घेऊन त्या बंकरमधील सर्व पाकिस्तानी यमसदनी पोहोचवले…. त्यांना वाटलं ही भूताटकीच की काय? इतक्या उंचीवर असे कोणी येईल आणि हल्ला करेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिले नसेल! या मोहिमेतील कामगिरी बद्दल त्यांचे म्होरके बाणा सिंग साहेबांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले! या मोहिमेला ‘राजीव’ असे नाव दिले गेले होते आणि ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल या चौकीला बाणा सिंग यांचे नाव देण्यात आले! आणि चुन्नीलाल यांना याच मोहिमीतील यशस्वी सहभागासाठी त्यांच्या कारकीर्दीतील पहिले मोठे मेडल मिळाले होते…. सेना मेडल! ही तर फक्त सुरुवात होती…. पुढे १९९९ मध्ये त्यांनी पूंच सेक्टर मध्ये थोडेथोडके नव्हे तर १२ पाकिस्तानी घुसखोर ठार मारण्यात मोठी भूमिका बजावली! या मोहिमेत त्यांचे दुसरे पदक आले… वीर चक्र!.. पाच टोके असलेला तारा असतो या चांदीच्या चक्रावर! चुन्नीलाल नावाच्या ता-याच्या छातीवर हे दुसरे पदक मोठ्या डौलाने विराजमान झाले. एका साध्या सैनिकाने कमावलेली हे मोठी दौलत होती.
चुन्नीलाल पुढे आफ्रिकी देशात आपल्या भारतातर्फे संयुक्त राष्ट्र सैन्यातही कामगिरीवर गेले… त्यांच्या पलटणला तिथेही उत्तम शाबासकी प्राप्त झाली!
२१ जून २००७… या दिवशी चुन्नीलाल हे नायब सुबेदार या पदावर पदोन्नत झाले…. सामान्य सैनिक म्हणून भरती झालेले सैनिक अंगभूत गुणांच्या जोरावर उच्च पदावर पोहोचू शकतात… त्यातलेच नायब सुबेदार हे पद. यांच्याकडे सैनिकांच्या एका तुकडीचे नेतृत्व दिले जाते… आणि इतर महत्त्वाची कामे तर असतातच! चुन्नीलाल यांना बढती मिळून केवळ तीनच दिवस उलटले होते. नायब सुबेदार साहेब कुपवाडा मधील एका सैन्य चौकीचे प्रमुख होते… उंची होती १४ हजार फूट. रात्र मोठी अंधारी होती…. आकाशात ढगांनी दाटी केलेली. दोन हातापलीकडचे काही दिसत नव्हते…. पारा वजा ५ इतका खाली गेलेला… जीवघेणी थंडी. पहाटेचे साडे तीन वाजलेले… चुन्नीलाल साहेब पहा-यावर मौजूद होते… त्यांना सीमेजवळ काही हालचाल जाणवली…. त्या स्थितीत ते स्वत: शोध घेण्यासाठी पुढे सरसावले. तेवढ्यात तेथून जोरदार गोळीबार झाला… चुन्नीलाल साहेबांनी आपल्या सहका-यांना सावध केले होतेच. प्रत्युत्तर तर दिले गेलेच… दोन अतिरेकी ठार मारले गेले! पण या गदारोळात आपले दोन सैनिक जखमी झाले… आणि जिथे अतिरेकी लपले होते नेमके त्याच्याजवळच कोसळले होते… लपलेल्या अतिरेक्याकडून या सैनिकांच्या जीवाला शंभर टक्के धोका होता… चुन्नीलाल साहेब निर्धाराने पुढे गेले… आणि त्या दोघांना ओढत सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले… पण तिथे एक अतिरेकी लपून बसला होता आणि तिथून पळून जायच्या बेतात होता… चुन्नीलाल साहेबांनी त्याचा माग काढला… त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला… आणि त्याला वर पाठवला! पण त्याची एक गोळी साहेबांच्या पोटात घुसली… प्रचंड रक्तस्राव सुरु झाला!
रुग्णालयात पोहचेपर्यंत नायब सुबेदार चुन्नीलाल साहेब स्वर्गस्थ झाले होते… ही कामगिरी त्यांना त्यांचे तिसरे पदक देऊन गेली… अशोक चक्र! शांतता काळात सैनिकांना प्रदान केले जाणारे सर्वोच्च सैन्य पदक!
नायब सुबेदार या तिस-या पदकाने आणखी श्रीमंत ठरले होते… तिन्ही महत्त्वाची, सन्मानाची पदके मिळवणारे एकमेव सैनिक ठरले चुन्नीलाल साहेब! त्यांच्या धर्मपत्नी चिन्तादेवी यांनी २६ जानेवारी २००८ रोजी आपल्या पतीचं हे पदक मोठ्या अभिमानाने स्वीकारले… चुन्नीलाल साहेबांनी एवढी मोठी श्रीमंती प्राप्त केली होती… जिचे मोल करणे अशक्य! चुन्नीलाल साहेब हे इतर सैनिकांसाठी आदर्श बनले आहेत! त्यांच्या अलौकिक जीवनावर आणि शौर्याबद्दल Bravest of the Brave : The Inspiring Story of Naib Subedar Chunni Lal, AC()अशोक चक्र), VrC, (वीर चक्र) SM(सेना मेडल) हे Lt General Satish Dua (Retd) यांनी लिहिलेले एक इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. एका सैनिकाच्या कामगिरीची एका मोठ्या अधिका-याने घेतलेली ही नोंद अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे.
जय हिंद.. जय भारत.. जय हिंद की सेना !
☆
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈