श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ३  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

अमृतस्वरूपा च ॥ ३ ॥

अर्थ : आणि (ती भक्ति) अमृतस्वरूपा (ही) आहे.

विवरण : द्वितीय सूत्रात परमप्रेम हे भक्तीचे यथार्थ स्वरूप आहे, असे स्पष्ट केल्यानंतर या सूत्रात त्या प्रेम भक्तीचा एक महत्त्वाचा विशेष श्री नारदमहर्षि सांगतात, ती प्रेमरूपा भक्ती ‘अमृतस्वरूपा’ आहे. अमृत म्हणजे मरण-विनाश-बाधरहित अवस्था अथवा स्वरूप होय.

विवेचन:

सर्व संतांनी सत्संगाचा महिमा गायिला आहे. भक्ति करणे म्हणजे भगवंताशी संग करणे, असे म्हटले तर अधिक उचित होईल. एखाद्या मनुष्याचा हात चुकून कोळशाला लागला तरी त्याचा हात काळा झालाच म्हणून समजा. याच सूत्रानुसार भगवतांच्या थोड्याशा सत्संगाचा मनुष्याच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. 

अमृत शब्दाचा प्रचलित अर्थ असा आहे की जे मृत्यू पासून आपल्याला वाचवते ते अमृत. समुद्र मंथनातून अमृत निर्माण झाले असे म्हणतात…..

थोडक्यात जे आपल्याला अमर करते ते अमृत. आजपर्यंत अनेक लोक जन्माला आले आणि मृत्यू पावले. त्यांची गणती करणे निव्वळ अशक्य आहे. त्यातील काही मोजक्या लोकांची नावे आपल्या लक्षात आहेत, इतिहासाला ठाऊक आहेत. ज्यांनी या धरती साठी, समाजासाठी, योगदान दिले, त्याग केला, विशेष कार्य केलं त्यांचीच नावे समाजाने लक्षात ठेवली आहेत. त्यातील प्रमुख नावे ही संतांची आहेत. आपल्याला आपल्या मागील चौथ्या किंवा दहाव्या वंशजाचे नाव सांगता येईलच असे नाही पण माउलींचे, समर्थांचे, तुकारामांचे, अर्थाचे संतांचे गोत्र ही पाठ असेल,. ही किमया नव्हे काय ? ही किमया कशामुळे  घडली असेल….?

प्रत्येक संतांनी आपल्या आवडीनुसार भक्ति केली असेल, नवविधा भक्तीचा अंगिकार केला असेल, पण भक्ति च केली यात बिल्कुल शंका नाही. भक्ति करणारा मनुष्य देहाने जातो, पण नामरूपाने, कीर्तिरूपाने अमर होतो, अमर राहतो हे सिद्ध होते. 

मेलेल्या मनुष्याला अमृत देऊन काही काळापुरते जिवंत करणे आणि भक्ताला मरण प्राप्त झाल्यानंतरही अनंत काळ अमर करणे , यात अमृत श्रेष्ठ म्हणता येईल की भक्ति….? आपल्या मनात भक्ति हेच उत्तर आले असेल ना ?

अमृत स्वरूपा असे नारद महाराज म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ कसा घ्यायचा ? सरळ अर्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की भक्ति मुळे मनुष्य अमृत समान होऊ शकतो…!

स्वरूप म्हणजे आपले रूप असा अर्थ घेतला तर आपले रूप आरशात दिसते तसे आहे की कसे ? आरशात दिसते ते बाह्य रूप आहे आणि दिसत नाही, जे अंतर्यांमी आहे ते आत्मरूप आहे. भगवंताला जाणणे म्हणजे अंतर्यामी असलेल्या आत्म तत्वाला जाणणं….

शबरी मातेची कथा आपल्याला माहित आहे. काही शे  बोकडांची हत्या होऊ नये, म्हणून ही मुलगी लग्नाच्या आदल्या दिवशी घर सोडून निघाली ती मातंग ऋषींच्या आश्रमात आली. मातंग ऋषींनी तिला सांगितले की तू अखंड नाम घे, प्रभू श्रीराम तुझे दर्शन घ्यायला येतील….! तिचा तिच्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास होता. गुरू वाक्य प्रमाण मानून तिने साधना करायला सुरुवात केली. तिला राम कसे असतील हे माहीत असण्याचे कारण नव्हतं. तिने आपल्या मनात रामाची प्रतिमा तयार केली. अर्थात ते आपल्या मातंग ऋषींसारखेव असतील……! जटाभार ठेवलेले, वल्कले नसलेलं…! शबरी जसे रूप मनात धरले, अगदी त्याच रुपात येऊन रामाने तिला दर्शन दिले.  एवढेच नव्हे तिची उष्टी बोरे भगवंताने आनंदाने खाल्ली. लक्ष्मण तिला म्हणाला की ही बोरे उष्टी आहेत. त्यावर ती म्हणाली की ही बोरे दिसायला उष्टी आहेत, पण खऱ्या आज ती अभिमंत्रित आहेत. हे सामर्थ्य भक्तीने प्राप्त होऊ शकते….!

जय जय रघुवीर समर्थ!!!

देवर्षी नारद महाराज की जय!!!

– क्रमशः सूत्र ३ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments