कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – १ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘लक्ष्य’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला एक संवाद आठवत असेल, “ये इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं… “

आपल्या मायभूमीकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्यांचे डोळे फोडायलाच हवेत, आणि भारताविरोधात उठलेला प्रत्येक हात खांद्यापासून कलम केलाच पाहिजे, याबाबत कधीच दुमत असणार नाही. परंतु सच्च्या सैनिकाने आपली नीतिमत्ता आणि माणुसकी विसरणे योग्य नव्हे, हेही तितकेच खरे आहे. वरकरणी ही दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटू शकतात. पण कारगिल युद्धामधली आणि त्यापूर्वींचीही अनेक उदाहरणे सांगता येतील ज्यामध्ये भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवण्यात कधीच कुचराई केली नाही, परंतु, त्याच वेळी आपले माणूसपण हरवले नाही.

आज मी अशीच एक गोष्ट सांगणार आहे.

१९७१ साली बांगलादेश युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानी सैन्यातल्या एका तत्कालीन कॅप्टनने कथन केलेला स्वानुभव त्याच्याच शब्दात…

डुंगरसिंग 

१९७२ सालच्या मार्च-एप्रिलच्या दरम्यान आम्हाला आग्र्याहून रांची येथील कॅम्प ९५ मध्ये हलवण्यात आले. त्या प्रवासादरम्यान आमच्यावर पहारा देणाऱ्या एका भारतीय सैनिकाने आमच्यापैकी एका अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केले. त्याचे कारण काय हे तो पहारेकरीच जाणे! आमचा आणखी एक अधिकारी तर बेपत्ताच झाला. एकूणात, उत्तर हिंदुस्थानातल्या भीषण उकाड्यात आम्ही रेल्वेने केलेला तो प्रवास अक्षरशः जीवघेणाच ठरला होता.

आम्हाला आग्र्याहून तडकफडकी हलवण्याचे कारणही तसे सबळ होते. आग्र्याच्या युद्धकैदी शिबिरातून पळून जाण्याचा आमचा प्रयत्न नुकताच फसला होता. त्यामुळे ‘अतिशय डेंजरस कैदी’ असा शिक्का आमच्यावर बसलेला होता. त्या घटनेचे कठोर परिणाम होणार याची आम्हाला कल्पना होती आणि होईल ते भोगायची मानसिक तयारी आम्ही ठेवली होती. यात जगावेगळे असे काहीच नव्हते. युद्धात पकडले गेल्यास, शत्रूच्या तावडीतून शिताफीने निसटण्याचा जमेल तितका प्रयत्न करण्याचे बाळकडू प्रत्येक सैनिकाला प्रशिक्षणादरम्यान दिलेलेच असते. परंतु, युद्धकैद्यांचा पलायनाचा बेत फसल्यास, शत्रू काही त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस निश्चित देणार नाही याचीही कल्पना प्रत्येकाला असतेच.

रांचीच्या कॅम्प ९५ मध्ये पोचताच आमची शिरगणती झाली आणि ५-६ जणांच्या गटात आम्हाला एकेका खोलीत डांबले गेले. या नवीन शिबिरामध्ये आमच्या सोबतीला, सरपटणारे, उडणारे नाना प्रकारचे किडे होते. त्याशिवाय उंदीर तर होतेच, पण त्यांचा पाठलाग करत येणारे हिरवट-पिवळे गवती सापदेखील आम्हाला अधूनमधून दर्शन द्यायचे.

रांचीवर निसर्गाची मात्र मेहेरनजर होती. स्वच्छ निळ्या आकाशाला टेकू पाहणारे आणि वाऱ्यासोबत डोलणारे गडद हिरवे माड आम्हाला खिडकीतून दिसायचे. चहाच्या मळ्यांनी तर आसपासच्या टेकड्यांवर जणू सोनहिरवे गालिचेच घातले होते. आमची दृष्टी पोचेल तिथपर्यंत हिरव्या रंगाच्या विविध छटांची नुसती पखरण होती. आसपास उगवलेले गवत तर अक्षरशः शांघायच्या मखमलीसारखे होते – मऊ आणि गुबगुबीत. वाऱ्याच्या झुळकीने गवत हलले की त्यावरची हिरवी छटाही बदलत असे. इथला पावसाळा मार्चमध्ये सुरु होई आणि नोव्हेंबरपर्यंत सुमारे ७५० इंच पाऊस पडे. कधी-कधी तर ठरवून एकत्र आल्यासारखे, तीन बाजूंनी एकाचवेळी ढग दाटून येत आणि पाऊस कोसळू लागे. निसर्गाचा असा अद्भुत आविष्कार मी कधीच कुठे पाहिलेला नव्हता.

इथल्या दमट वातावरणाचे तोटेही खूप होते. धुवून वाळत टाकलेल्या आमच्या कपड्यांवर किंवा टॉवेलवर संध्याकाळपर्यंत बुरशी लागत असे. आल्यानंतर काही दिवसातच आमच्या कातडी बुटांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आणि ते वेडेवाकडे झाल्याने वापरणे अशक्य झाले. त्यामुळे, अंगावर खाकी रंगाच्या अर्ध्या चड्ड्या, बिनबाह्यांचे बनियन आणि पायात साध्या-सुध्या ‘हवाई चप्पल’ हाच वेष सगळ्यात सोयीस्कर आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्याचे लक्षात आले. असल्या दमट हवेत शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे आमच्या शरीरावरच्या विविध बेचक्यांमध्ये घाम साठून राही. त्यामुळे, अंगावर उठलेले उन्हाळी फोड, खरूज आणि नायटे यांनी आम्ही अक्षरशः बेजार झालो. त्या जागी लावायला एक गुलाबी रंगाचे मलम आम्हाला दिले गेले होते. शरीराच्या बेचक्यांमध्ये ते मलम लावून, ती जागा उन्हात वाळू देणे हाच एकमेव उपाय होता. सकाळी-सकाळी, खुशाल नग्नावस्थेत उन्हात पहुडलेल्या आम्हा कैद्यांचे ते बीभत्स दृश्य पाहण्याची शिक्षा, कॅम्पच्या वॉचटॉवरवर पहारा देणाऱ्या भारतीय शिपायांना भोगावी लागे! त्याला मात्र आमचा नाईलाज होता.

ब्रिटीशकालीन रांची कॅन्टोन्मेंटच्या एका कोपऱ्यात आमचा युद्धकैदी कॅम्प होता. अगदीच कामचलाऊ अशा बराकींमध्ये आम्हाला मिळालेल्या खोल्या तशा प्रशस्त होत्या. एकेका खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. सर्वांसाठी एकच सामायिक स्वयंपाकघर आणि जेवणाचा हॉल होता. खिडक्यांवर गज ठोकून त्या बंदिस्त केलेल्या होत्या आणि बराकीचा दरवाजाही रात्रीच्या हजेरीनंतर बाहेरून कुलूपबंद केला जात असे. आमची खोली बराकीच्या एका टोकाला होती. तिथून अक्षरशः ढांगेच्या अंतरावर असलेले कुंपण आम्हाला सतत भुरळ घालत असे. जवळजवळ त्या कुंपणाला लागूनच दाट जंगल सुरु होत होते आणि त्यापलीकडे पाटण्याला जाणारा रस्ता होता. कॅम्पमध्ये पोचल्यानंतर आमच्यापैकी काहीजण रेडक्रॉसतर्फे मिळालेली पुस्तके वाचण्यात दंग झाले, तर काहीजणांनी धार्मिक वाचन व प्रार्थनेला वाहून घेतले. काही थोडेजण मात्र अगदीच सैरभैर झाले आणि अखेरपर्यंत निराशेच्या गर्तेतच राहिले.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments