सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
इंद्रधनुष्य
☆ अशी विचित्र नावे का? ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
पुण्यात अनेक मारुती मंदिरे आहेत. पण त्यात विचित्र नावाची काही मंदिरे आहेत. त्यासंबंधी काही माहिती.
1) पत्र्या मारुती
पुण्यात ससून रुग्णालयाचे काम चालू होते. त्यासाठी पत्रे मागवले होते. रुग्णालय बांधताना त्या पत्र्यांचा उपयोग केला गेला. त्यात काही तुकडेही होते. त्या सर्व तुकड्यांचा उपयोग करून नारायण पेठेत एक मंदिर बांधले गेले. त्यात मारुतीची प्रतिष्ठापना केली. लोक साहजिकच त्या मंदिराला पत्र्या मारुती मंदिर असे म्हणू लागले. पुण्यात लक्ष्मी रोड आहे. तिथे शगुन चौक आहे. त्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना एक चौक लागतो. त्या चौकात हा पत्र्या मारुती आहे.
2) जिलब्या मारुती
जिलब्या मारुती मंदिर पुण्यातील तुळशीबागे जवळ आहे. खूप वर्षांपूर्वी तिथे एक हलवायाचं दुकान होतं. तो हलवाई रोज खूप जिलब्या बनवायचा. पण प्रथम तयार झालेल्या जिलब्यांचा एक हार बनवायचा आणि श्रद्धेनं त्या मारुतीच्या गळ्यात घालायचा. ते पाहून लोकांनीच त्याला जिलब्या मारुती असे नाव ठेवले.
3) दुध्या मारुती
हे मंदिर शुक्रवार पेठेत आहे. मंदिराच्या परिसरात पूर्वी गाई-म्हशींचा गोठा होता. तिथे खूप दूध तूप मिळत असे. येथील गोठ्यातील गवळी या मारुतीवर दुधाचा अभिषेक करायचा. इतर ठिकाणी सर्व देव पाण्याच्या अभिषेकाने थंड होत असतात. येथे मात्र दुधाचा अभिषेक. म्हणून या मारुतीला दुध्या मारूती असे नाव पडले
4) बटाट्या मारुती
हे मंदिर पुण्यातील शनिवार वाड्यातील मैदानावर आहे. पूर्वी इथेच भाजी मंडई भरत असे. आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी भाजीपाला विक्री करत असत. तिथे कांदा बटाटा खूप प्रमाणात विकला जात असे. बटाटा विकणारे शेतकरी या मंदिराच्या शेजारीच बसत असत म्हणून त्याला बटाट्या मारुती असे नाव पडले
5) उंबऱ्या मारुती
.. हे मंदिर बुधवार पेठेत आहे. हे मंदिर उंबराच्या झाडाखाली आहे म्हणून याला उंबऱ्या मारुती असे नाव पडले.
6) खरकट्या मारुती
लक्ष्मी रोडवरील तुळशी बागेत हे मंदिर आहे. पूर्वी दर्शनासाठी आजूबाजूचे खूप लोक येत. त्यावेळेस हॉटेल्स नव्हती. ते घरूनच जेवण बांधून आणत असत. ते बांधून आणलेली शिदोरी मंदिराच्या परिसरात बसूनच खात असत. तिथे त्यांचे खरकटे पडत असे म्हणून त्याला खरकट्या मारुती असे नाव पडले.
7) रड्या मारुती
हे मंदिर गुरुवार पेठेत आहे. पूर्वी लोक या मारुती समोर मृतदेह ठेवून रडत असत. म्हणून ला रड्या मारुती असे नाव पडले.
8) उंटाड्या मारुती
पुण्यात रास्ता पेठेत केईएम हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफीला त्या हॉस्पिटल समोर थांबायचा. तिथे नियमित उंटांचा तळ असायचा म्हणून त्याला उंटाड्या मारुती असे नाव पडले
9) डुल्या मारुती
पुण्यात हे मंदिर गणेश पेठेतील लक्ष्मी रोडवर आहे. हे मंदिर खूप पूर्वी स्वामी समर्थांनी बांधले आहे असे म्हणतात. पानिपतच्या युद्धात आपले मावळे अहमद शहा अब्दालीशी लढत होते. ते युद्ध अत्यंत गंभीर होतं. युद्धाचे हादरे या मारुतीला देखील बसू लागले. तो अक्षरशः डुलू लागला. म्हणून त्याला डुल्या मारुती असे म्हणू लागले.
10) भांग्या मारुती
पुण्यात शिवाजी रोडवर रामेश्वर चौक आहे. त्या चौकात हे मंदिर आहे. शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपती कडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या परिसरात गांजा विकत असत. भांगदेखील विकली जात असे. म्हणून या मंदिराला भांग्या मारुती असे नाव पडले.
– – वर्षानुवर्षे या मंदिरांची अशीच नावे आहेत. ती नावे बदलण्याचा देखील काही लोकांनी प्रयत्न केला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून देखील मंदिरांची ही विचित्र नावे बदलण्याचा प्रयत्न झाला. मात्र पुणेकरांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. ही नावे पुण्याच्या समृद्ध ऐतिहासिक अस्मितेचा आणि धार्मिक वारशाचा भाग आहेत असे लोकांचे ठाम मत आहे. त्यामुळे अजून तरी हीच नावे या मंदिरांना दिली गेली आहेत.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈