सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

लोकरंग च्या पुरवणी मधील एक खूप मस्त आणि मुख्य म्हणजे खरोखरीच विचारात पाडणारा लेख शनिवारी  चतुरंग ह्या पुरवणीत वाचनात आला. हा लेख “वळणबिंदू” ह्या सदराखाली डॉ. अंजली जोशी लिखीत “वैचारिक स्वावलंबन” ह्या नावाचा.  विशेषतः पालकत्वाची सुरुवात होतांना पासून हातपाय थकल्यावर देखील तेवढ्याच सुरसुरीनं पालकत्व निभावणा-या पालकांसाठी तर खास भेटच.

“स्पून फिडींग” ,पाल्याची अतिरिक्त टोकाच्या भूमिकेतून घेतलेली काळजी पाल्यांना कुठलाही अवयव बाद न होता कसे पंगू करुन सोडते हे परखड सत्य ह्या लेखातून चटकन उमगतं, आणि मग खोलवर विचार केल्यानंतर त्यातील दाहकता जाणवते.

खरोखरीच मुलं ह्या जगातल्या तलावात पोहोचतांना त्यांना बुडू नये म्हणून पालकत्वाचं रबरी टायर न चुकता बांधून द्या व लांबून काठावरुन त्यांच्याकडे काळजीपूर्वक बघतांना त्यांचे त्यांना पोहू द्या, कधी गटांगळ्या खाऊ द्या, अगदी काही वेळा थोडं नाकातोंडात पाणी जावून जीव घाबरु द्या, पण हे होऊ  देतांना एक गोष्ट नक्की …. आपला पाल्य हा तावूनसुलाखून, अनुभव गाठीशी बांधून पैलतीर हा यशस्वीपणे गाठणारच, आणि मग तो विजयाचा आनंद  तुम्हाला आणि तुमच्या पाल्यांना कितीतरी पट सुखं देऊन सुवर्णक्षणांची अनुभूती देऊन जातो. 

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे – प्रसंगी अपत्यांच्या कुबड्या बनण्यापेक्षा त्याच्या मनाला उभारी देणारी संजीवनी पुरवा.

मी तर सांगेन हा लेख नीट विचारपूर्वक वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच स्वतः ला प्रश्न विचारायचा की … ड्रेस कुठल्या रंगाचा घालू ह्या अगदी साध्या प्रश्नापासून, ते लग्नासाठी आपल्याला नेमका जोडीदार कसा हवायं ह्या गहन प्रश्नापर्यंत, आपण आपल्या मनाने, स्वतंत्र विचारशक्तीने किती निर्णय घेतलेत ? त्यापैकी किती निर्णय तडीस नेलेत ? ह्या तडीस नेलेल्या आपल्या स्वतंत्र मतांमुळे, किंवा तडीस न नेता केवळ दुसऱ्यांच्या ओंजळीने कायम पाणी प्यायल्यामुळे, आपले नेमके नुकसान झाले की फायदा झाला ? .. आणि तो नेमका किती झाला ? …..  ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर आपल्याला नेमक्या वस्तुस्थितीची जाणीव होईल आणि मग अभ्यास वा विचारांनी बनवलेली स्वतंत्र स्वमतं, स्वकृती किती महत्त्वाची असते आणि ती आपल्या जीवनात किती चांगला आमुलाग्र बदल करते हे पण कळून येईल. 

तेव्हा डॉ अंजली जोशी ह्यांचा चतुरंग पुरवणीमधील “वैचारिक स्वावलंबन” हा लेख तुम्हाला मिळाला तर जरूर स्वतः आधी वाचा आणि मग आपल्या पाल्यांना पण वाचायला सांगा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments