सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २० – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ✈️

अंगकोर येथून आम्ही दा फ्रॉम इथे गेलो. दा फ्रॉम येथील शिल्पकाम राजा जयवर्मन सातवा याच्या काळात बाराव्या तेराव्या शतकात झाले. इथे त्याने आपल्या आईसाठी यज्ञगृह, ध्यानगृह उभारले होते. भगवान बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग इथे कोरलेले आहेत. द्वारपाल, भूमी देवता, लायब्ररी, नृत्यालय, घोडेस्वारांची मिरवणूक, पुराणातील प्राणी असे सारे शिल्पकाम गाईडने दाखविल्यावरच आपल्याला दिसते. कारण महाप्रचंड वृक्षांनी आपल्या मगरमिठीमध्ये हे सारे शिल्पकाम जणू गिळून टाकले आहे. सावरीच्या ‌ कापसाची झाडे व एक प्रकारच्या अंजिराच्या जातीच्या झाडांनी या बांधकामातील  भेगा रुंद करीत आपली पाळेमुळे त्यात घुसवून या शिल्पांवर कब्जा केला आहे.अंजेलिना जोली या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘ टुम्ब रेडर’ (Tomb Raider) सिनेमाचे चित्रिकरण इथे झाले आहे. तेव्हापासून ती या जागेच्या प्रेमात पडली व तिने इथली एक मुलगी दत्तक घेतली आहे. तसेच इथले  एक गावही दत्तक घेतले आहे. सततच्या परकीय आक्रमणांमुळे तसेच स्वकीय क्रूरकर्मा, हुकुमशहा पॉल पॉट याच्या अत्याचारामुळे इथे फार मोठ्या प्रमाणावर अनाथ मुले आहेत. काही वेळा त्यांचा वाईट कामासाठी उपयोग केला जातो. या अनाथ मुलांना शिक्षण, निवारा देण्यासाठी जगातील अनेक संस्था कार्यरत आहेत. आम्ही गेलो त्या दिवशी आम्हाला ‘कंबोडियन ऑर्फन फॅमिली सेंटर ऑर्गनायझेशन’ या संस्थेतर्फे अनाथ मुलांचा पारंपारिक डान्स शो बघण्याचे आमंत्रण मिळाले होते. पण वेळेअभावी ते जमू शकले नाही.

बान्ते सराय या ठिकाणाचा शोध १९३६ साली लागला. गुलाबी सॅ॑डस्टोनमधील येथील शिल्पकाम अत्यंत सुबक, शोभिवंत आहे. मूर्तींभोवतीच्या महिरपींवरील नक्षी कमळे, पाने, फुले, फळे, पक्षी यांनी सुशोभित केली आहे. नंदीवर बसलेले उमा-महेश्वर, हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह, इंद्राचा ऐरावत, सीता हरण, सुंद- उपसुंद यांची लढाई, भीम-दुर्योधन गदायुद्ध, शिवाचे तांडवनृत्य, सिंहरूपातील दैत्यावर नर्तन करणारी दुर्गा, शिवावर बाण मारणारा कामदेव, खांडववनाला लागलेल्या आगीवर पाऊस पाडणारा इंद्र, व त्या पावसाला अडविण्यासाठी अर्जुनाने उभारलेले बाणांचे छप्पर, कृष्णाने केलेला कंसवध, कुबेर,हंसावरील देवता अशा अनेक देखण्या शिल्पांनी सजलेले हे मंदिर इतर वास्तूंपेक्षा छोटे असले तरी  कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. माकड, गरुड, सिंह, अप्सरा, शंकराच्या मांडीवर बसलेली पार्वती, सज्जे, दरवाजांवरील छज्जे असे सारे सुंदर, उठावदार नक्षीकामाने, शिल्पकामाने इंच-इंच भरलेले आहे.युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या इथल्या शिल्पांचे संरक्षण, पुनर्बांधणी करण्यासाठी चीन, जपान, फ्रान्स असे अनेक देश मदत करीत आहेत. भारताच्या पुरातत्त्व खात्यातर्फे येथील दोन मंदिरात पुनर्निर्माणाचे काम करण्यात येत आहे. येथील अनेक मूर्ती चोरून विकण्यात आल्या आहेत तसेच पॉल पॉट याच्या कारकिर्दीत त्यांचा विध्वंसही करण्यात आला आहे.

कंबोडिया हा शेतीप्रधान देश आहे. मेकॉ॑ग रिव्हर चीनमध्ये उगम पावून तिबेट, लागोस, बँकॉक, कंबोडियामधून व्हिएतनाममध्ये जाते. व साऊथ चायना समुद्राला मिळते.सियाम रीप शहरामध्ये ‘तोनले साप लेक’ या नावाचा ६० किलोमीटर लांब, ३६ किलोमीटर रुंद व १२मीटर खोल असलेला दक्षिण आशियातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे .यात उदंड मासे मिळतात. मेकाँग नदीच्या पुरामुळे आजूबाजूची जमीन सुपीक होते. भाताची तीन- तीन पिके घेतली जातात. भात व मासे निर्यात केले जातात. या खूप मोठ्या तलावामध्ये पाण्यावर बांधलेली घरं आहेत. तलावात बोटीने सफर करताना आपल्याला ही घरे, हॉस्पिटल, शाळा, दुकाने, बाजार, गाई-गुरे असे सारे तरंगणारे गावच दिसते. ८० हजार लोकांची वस्ती या तलावात आहे असे गाईडने सांगितले.

कंबोडियामध्ये ऊस, कापूस,  रबर यांचे उत्पादन होते.केळी,  नारळ, आंबे,फणस, अननस, चिक्कू अशी फळे होतात. आम्हाला नोव्हेंबर महिन्यात उत्तम चवीचे आंबे व फणसाचे गरे खायला मिळाले. झाडांवर आंबे व फणस लटकत होते. दोन हातात न मावणाऱ्या शहाळ्यातील मधुर पाणी व कोवळे खोबरे खाऊन पोट भरले.गाडीतून प्रवास करताना अनेक ठिकाणी रस्त्यावरील विक्रेते कणसासारखे काहीतरी भाजून देताना दिसले. त्यांच्याभोवती गर्दीही होती. एकदा गाडी थांबवून आम्हीही अशा एका विक्रेत्याकडे गेलो. गाईडने सांगितले की हा ‘बांबू राइस’ आहे. आम्ही याला ‘कलांग’ असे म्हणतो.कोवळ्या बांबूच्या पोकळ नळीत तांदुळ, पाणी, खोबरेल तेल व बीन्स घालतात. गवताने त्याचे तोंड बंद करून तो बांबू विटांच्या भट्टीत भाताचे तूस जाळून त्यावर भाजत ठेवतात. विक्रेत्याने तो बांबू कणसासारखा सोलून त्यात बांबूचाच चमचा घालून खायला दिला. तो गरम, थोडासा चिकट भात चविष्ट होता. एकदा तेथील जेवणात आम्हाला एक वेगळ्या प्रकारची करी दिली. फ्लॉवर, गाजर ,बिन्स, बटाटे वगैरे अगदी थोड्या तेलावर परतून त्यात  सौम्य मसाले घातले होते.  टेबलावर प्रत्येकाला कमळासारखे सोललेले शहाळे ठेवले होते. शहाळ्याच्या पाण्यात या परतलेल्या भाज्या घातल्या व शहाळ्यातील कोवळ्या खोबऱ्याचे बारीक तुकडेही त्यात घातले होते. अशी ही वेगळी चविष्ट, छान करी आम्हाला मिळाली. उसाचा सुमधुर ताजा रस मिळाला.  तिथे केक केळीच्या पानात किंवा नारळाच्या कोवळ्या पानात गुंडाळून देण्याची पद्धत आहे .बीन्स किंवा साबुदाणा वापरून बनविलेल्या गोड सुपामध्ये ताज्या फळांचे बारीक तुकडे घालतात.

कंबोडियाच्या उत्तर भागात डायमंड, रुबी, सफायर, चांदी व सोने मिळते. गल्फ ऑफ थायलंडमध्ये तेल मिळते. चांदीच्या भांड्यांवरील नक्षीकाम, लाखेवरील नक्षीकाम यासाठी कंबोडिया प्रसिद्ध आहे. छोट्या, स्वच्छ गावातून सायकलवरून शाळेत जाणारी मुले आम्हाला पाहून हात उंचावून आनंद व्यक्त करीत होती. जपान, बँकॉक इथून मोटरबाईक आयात करून त्याला मागे रिक्षासारखे वाहन जोडून प्रवाशांची वाहतूक करतात. पुराच्या भीतीमुळे बहुतांश घरे स्टील्टवर उभारलेली असतात .घरांवर लाल, गुलाबी रंगाची उतरती स्वच्छ छपरे होती.ठिकठिकाणच्या पॅगोडांवरील कौले सोनेरी, निळसर, व विटकरी रंगाची होती. फुटबॉल, सॉकर व खमेर युद्धकलेतून जन्मलेले किक बॉक्सिंग लोकप्रिय आहे. एका हॉटेलमध्ये जेवणासोबत अप्सरा नृत्य बघायला मिळाले. त्यातील तरुणांनी सोवळ्यासारखे काष्ट्याचे धोतर व शर्ट आणि तरुणींनी  नऊवारीसारखे  काष्टयाचे वस्त्र कमरेभोवती गुंडाळून वरती ब्लाउज घातले होते. अतिशय संथ हालचालींमध्ये, तालवाद्य व दक्षिण भारतीय संगीतासारख्या गाण्यावर वेगवेगळ्या  छोट्या कथा त्यांनी सादर केल्या.

कंबोडिया_ भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments