? कवितेचा उत्सव ?

☆ म्हणे राम आज ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

म्हणे राम आज

लढू मी कोणाशी

सोन्याच्या लंकेशी

माझा तह !

 

सोपी झाली आता

विषाची परीक्षा

भेसळीची दीक्षा

विषालाही !

 

स्वतःचा स्वत:शी

अशक्य संवाद

कर्कश निनाद

ठायी ठायी !

 

मठाचे मांगल्य

सांडुनिया मठ

उरे  एक  पेठ

व्यापाराची !

 

शाश्वत केवळ

निशाणांचे दांडे

त्यावरती झेंडे

रोज नवे !

 

अख्खे शेत खाई

साक्षात कुंपण

विषाक्त चंदन

सर्पांसंगे !

 

परागंदा राजा

रिते सिंहासन

सेनापतीविण

सैन्य रणी !

 

बेपत्ता चेहरे

मुखवटे शेष

भरोशाचा देश

शोधू कोठे !

 

खेळ हा उलटा

चाले क्षणोक्षणी

मीच शीर्षासनी

किंवा देवा !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments