मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 110 ☆ कधी वाटते… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 110  ? 

कधी वाटते… ☆

कधी वाटते, उगे मौन्य व्हावे

कधी वाटते, संवाद साधावे.!!

कधी वाटते, मी कशातच नसावे

कधी वाटते, सर्वास मी दिसावे.!!

कधी वाटते, अंतरंग प्रगटावे

कधी वाटते, त्यास आवरावे.!!

कधी वाटते, कलह नकोच काही

कधी वाटते, का बळे सहन करावे.!!

कधी वाटते, विजनवास असावा

कधी वाटते, सहवास मिळावा.!!

मनाचा गुंता, सुटता ही सुटेना

व्यथा अंतरिची, बोलता बोलवेना.!!

ही भावना, जाणतो फक्त कृष्णस्वामी

आहे कृपाळू भगवंत, प्रभू अंतर्यामी.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 41 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 41 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

६९.

माझ्या धमन्यांमधून जो जीवनस्त्रोत वाहतो आहे

तोच अहोरात्र या विश्वातून वाहात असून

तालबद्ध नृत्य करतो आहे.

 

धरतीच्या मातीतून तो जीवनस्त्रोत

आनंद निर्भरतेनं अगणित तृणपात्यातून आणि आनंदानं नाचणाऱ्या फुलांच्या लहरीतून उमटतो .

 

जनन- मरणाच्या, सागराच्या भरती ओहोटीतून

तोच हेलकावे खात असतो.

 

जीवन – विश्वाच्या स्पर्शामुळं

माझी गात्रं दिव्य झाली.

 

या क्षणी युगांत जीवन स्पंदन

माझ्या अभियानातून नर्तन करत आहे.

 

७०.

या आनंदाच्या, तालाच्या भीषण भोवऱ्यात

फेकलं जाणं,नाहीसं होणं तुला अशक्य आहे का?

 

साऱ्याच गोष्टी धावतात, थांबत नाहीत.

मागे वळून पाहात नाहीत,

कोणाचीच सत्ता त्यांना रोखू शकत नाही,

त्या धावतच असतात.

 

त्या वेगवान व अस्थिर संगीताबरोबरच

ऋतू नाचत येतात, जातात.

निरंतर वाहणाऱ्या झऱ्यातून रंग, ध्वनी आणि

सुगंध यांचा आनंद पसरतो आणि नाहिसा होतो.

 

७१.

मी माझा अहंकार पुरवावा, तो मिरवावा,

तुझ्या तेजावर रंगीबेरंगी छाया फेकाव्यात-

ही सारी तुझीच माया.

 

तू स्वतःच्या अस्तित्वावर बंधनं घालतोस आणि

अगणित स्वरात स्वतःला विभागात राहतोस.

हे तुझं स्वतःचं अलगपण शरीररूपानं माझ्यात आलंय.

 

सर्वत्र आकाशात हे गान भरून राहिलंय.

त्यात किती रंगाचे आसू- हसू आशा नि धोके!

लाटा उठतात आणि विरतात.

स्वप्नं उमटतात आणि शिरतात.

माझा पराजय हा तुझाच पराजय आहे.

 

दिवस रात्रीच्या कुंचलानं अगणित चित्रं काढून

तू हा पडदा रंगवून सोडलास.

या पडद्यामागे तुझं आसन चितारलं आहेस,

त्यात निष्फळ, सरळ रेषा न वापरता

अद्भुतरम्य गोलाकार वळणांचा वापर केलास.

तुझा आणि माझा हा खेळ

सर्व आभाळात चालला आहे.

तुझ्या – माझ्या गीतानं सारं वातावरण

दुमदुमत आहे.

तुझ्या – माझ्या पाठशिवणीच्या या खेळात

लपंडावात किती युगं गेली?

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पांथस्थास… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ पांथस्थास… ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

चल पांथस्था झाली आता

परतीची वेळ

जोडिलास जो मेळ तयाचा

आवर आता खेळ ॥

 

दिनमणि उगवुन ढळला आता

दिशा पश्चिमेला

रात्र तमाची होण्याआधी

वळवी तव पाउला ॥

 

नेई तुझिया संगे येथिल

स्मृती शुचिर्भूत

राहु द्यावे इथेच येथिल

अमंगलाचे भूत ॥

 

सर्वव्यापी चैतनाचा अतूट

तू अंश

अवनीवरती परी पाहुणा

होउनि आलास ॥

 

नच स्वामी तू धनि वा मालक

इथल्या धूलिकणाचा

पाहुणेर तुज मिळोनि गेले

वाटा तव भाग्याचा ॥

 

मंगल घटिका येइल आता

ठेवाया प्रस्थान

पंचभूती मग विलीन होता

सोन्याचा तो दिन ॥

 

जातांना परि संगे न्यावे

संजीवक ते वित्त

ओवि-अभंगी लपले

जे अन् पसायदानात

 

स्वस्थचित्त हो त्या लोकीही

मनास ठेवुन साक्षी

स्थलकालाच्या अतीत होऊनि

वितळुनि जाय गवाक्षी ॥

 

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देह आणि मन…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ देह आणि मन…! 🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

देह आपला

     असतो कह्यात,

मन असते

     बरेच वाह्यात !

 

देह असला

     जरी धरेवरी,

मन नाठाळ

     मारी भरारी !

 

देह रंगात

     रंगवी स्वतःला,

मन शोधी

     आपला कुंचला !

 

देह धरी ताल

      गोड अभंगावर, 

मन मोहीत

      होई लावणीवर !

 

देह मन जयाचे

        झाले एकरूप,

लोकां दिसे तो

        संत स्वरूप !

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – फांदीवरती बसला पक्षी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– फांदीवरती बसला पक्षी – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

1

फांदीवरती येऊन  बसला

इवला  वेडाराघू  पक्षी

कोवळ्या पानाने रेखली

नाजूक  सुंदर  नक्षी

अंगावरची नक्षी पाहून

राघू मनात  सुखावला

मिरवत  नक्षी इवला पक्षी

काही वेळ तिथे स्थिरावला

2

पिवळ्या पिसांचा

ताज शिरावर

हिरवाई  लेऊन

इवल्या अंगावर

क्षणभर विसावे

राघू फांदीवर

आपसूक उमटे

नक्षी अंगभर

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वंशवेल… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ वंशवेल… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

  ज्या क्षणाची आस होती,

  उगवला तो क्षण सखी!

  चाहूल लागली जीवा,

  येणार पाहुणा जगी !

 

 किती अपूर्वाईचे ते,

 सौभाग्य कुशीत आले!

वंशवेल बहरता ,

 मनोमनी मोहरले !

 

चिमणा खेळवताना

 दुग्धे वक्ष भरलेले !

चोचीत अमृत देता,

जीवन सार्थक झाले!

 

किती अजब   करणी

ईश्वर करून जातो !

तो अंशरूपे त्याचेच,

चैतन्य भरून येतो !

 

उजळली भाग्य रेखा

  वंशा दिवा आला पोटी!

  त्याच्या सुखात माझा,

  आनंद उमटे ओठी !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 132 – बाळ गीत – रोजच जाईन शाळेला ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 132 – बाळ गीत – रोजच जाईन शाळेला ☆

पाटी-पुस्तक नवीन दप्तर घेऊन रोजच वेळेला ।

मित्रासंगे हासत खेळत जाईन रोजच शाळेला।।धृ।।

 

शाळा माझी भासे मजला जणू जादूची ही नगरी ।

तशीच ताई प्रेमळ भारी अवतरली जणू सोनपरी ।

लहान होवून तेही खेळे धमाल येते शिकण्याला ।।१।।

 

चित्र जुळुन गोष्टी बनती अक्षरांच्या गाड्या पळती ।

समान आकार समान चित्रे हसत खेळत येथे जुळती

अक्षर-अक्षर जुळवून आम्ही स्वतःच शिकलो वाचायला ।।२।।

 

गणिताची ही मुळी न भीती काड्या आणि बियाही जमती

नोटा नाणी काड्या मोजता गणिताची ही कोडी सुटती।

वजन मापे घड्याळ काटे आम्हीच घेतो फिरवायला।।३।।

 

झाडे वेली फुले नि पाने बागही लागली फुलायला।

फुलपाखरे अणिक पक्षी येतील आम्हा भेटायला।

त्यांच्यासंगे खेळ खेळूनी रंगत आली शिकण्याला ।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फुरसत… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ फुरसत🌊 ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

आभासी या जगात साऱ्या

 गुंता  नकली नात्यांचा

कोण ते कसे कळावे

बाजारची हा मुखवट्यांचा

 

भासमान या दुनियेमध्ये

लाईक कमेंट अवती भवती

ज्याला त्याला विसर पडतो

आपली माती कुठली नाती

 

विश्व आले आज अवघे

ज्याच्या त्याच्या मुठीमधूनी

क्षितीज कवेत घेण्यासाठी

दूर चाललो काय सोडूनी?

 

मोबाईलशी जुळले नाते

विश्वाचे अंगण होई खुले

दोन प्रेमळ शब्दांसाठी

वृध्द जीव हे आसुसले

 

विस्तारू दे तरु कीर्तीचा

आम्हाही अभिमान तयाचा

फुरसत काढून वळून पहा

हालहवाल पुसा मुळांचा

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #154 ☆ त्रिगुणात्मक अवतार… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 154 – विजय साहित्य ?

☆ त्रिगुणात्मक अवतार… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

ब्रम्हा विष्णू आणि शिवाचा, त्रिगुणात्मक अवतार

दिगंबरा दिगंबरा हा, मंत्रघोष तारणहार.. ..||धृ.||

 

गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगावर भस्माच्या रेषा

गोमाता नी श्वान सभोती, दत्त हा दिगंबर वेषा

शंक,चक्र त्रिशूळ हाती,स्वामी चराचरी साकार….||१.||

 

नवनाथांचा कर्ता धर्ता, गिरनार पर्वत वासी

महान योगी दत्तात्रेया, येशी संकट तारायासी

औदुंबर वृक्ष निवासी, कर अवधूता संचार…..||२.||

 

आद्य ग्रंथी लीळाचरित्री,उपास्य दैवत ज्ञाता तू

अत्री आणि अनुसूयेचा, जगत् पालक त्राता तू

चार वेद नी भैरवाचा,होई सदैव साक्षात्कार…||३.||

 

औदुंबर नी माहुर क्षेत्री, किंवा त्या नरसोबा वाडी

पिठापूर, गाणगापूरी, संकीर्तनी भरे चावडी

जात पात ना ठावें काही,धावे करण्याला उद्धार…||४.||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ११ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ११ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ११ ( इंद्र सूक्त )

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील अकराव्या सूक्तात मधुछन्दस वैश्वामित्र या ऋषींनी इंद्रदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

— मराठी भावानुवाद —

इन्द्रं॒ विश्वा॑ अवीवृधन्त्समु॒द्रव्य॑चसं॒ गिरः॑ । र॒थीत॑मं र॒थीनां॒ वाजा॑नां॒ सत्प॑तिं॒ पति॑म् ॥ १ ॥

सागरासिया व्यापुनी टाकी इंद्र यशोवान

स्तुतिस्तोत्रांनी यशोदुंदुभी होई वृद्धीमान 

राजांचाही राजा इंद्र बलशाली अधिपती

महारथीहुनि अतिरथी म्हणती रणाधिपती ||१||

स॒ख्ये त॑ इन्द्र वा॒जिनो॒ मा भे॑म शवसस्पते । त्वाम॒भि प्र णो॑नुमो॒ जेता॑र॒मप॑राजितम् ॥ २ ॥

हे इंद्रा तू चंडप्रतापि अमुचे रक्षण करीशी

तव सामर्थ्यावर विसंबता आम्हा भीती कैशी

पराभूत तुज कोण करु शके विजयी तू जगज्जेता

तव चरणांवर नमस्कार शत तुम्हीच अमुचे त्राता ||२||

पू॒र्वीरिन्द्र॑स्य रा॒तयो॒ न वि द॑स्यन्त्यू॒तयः॑ । यदी॒ वाज॑स्य॒ गोम॑तः स्तो॒तृभ्यो॒ मंह॑ते म॒घम् ॥ ३ ॥

अमाप गोधन धनसंपत्ती देवेन्द्रा जवळी

भक्तांसाठी दान द्यावया मुक्तहस्त उधळी 

विशाल दातृत्व इंद्राचे अथांग जणु सागर 

अमुचे रक्षण सुरेंद्र करतो पराक्रमी अतिशूर     ||३||

पु॒रां भि॒न्दुर्युवा॑ क॒विरमि॑तौजा अजायत । इन्द्रो॒ विश्व॑स्य॒ कर्म॑णो ध॒र्ता व॒ज्री पु॑रुष्टु॒तः ॥ ४॥

इंद्रराज दिग्विजयी ध्वंस रिपुपुरे करतो

अक्षय यौवन बुद्धी अलौकिक अवतारुन येतो

वज्रधारी हा चंडवीर हा कर्मांचा आधार

स्तोत्र अर्पुनी स्तवने गाती याचे भक्त अपार ||४|| 

त्वं व॒लस्य॒ गोम॒तोऽ॑पावरद्रिवो॒ बिल॑म् । त्वां दे॒वा अबि॑भ्युषस्तु॒ज्यमा॑नास आविषुः ॥ ५ ॥

बलासुराने बळे पळविले समस्त गोधन

मुक्त तयांना केलेसि तू कोटा विध्वंसुन

देवगणांना पीडा होता तव आश्रय मागती 

तव शौर्याने सुखी होउनी क्लेशमुक्त होती ||५||

तवा॒हं शू॑र रा॒तिभिः॒ प्रत्या॑यं॒ सिन्धु॑मा॒वद॑न् । उपा॑तिष्ठन्त गिर्वणो वि॒दुष्टे॒ तस्य॑ का॒रवः॑ ॥ ६ ॥

तू तर सागर असशि कृपेचा औदार्याचा धनी

तव चरणांशी भाट पातले तव शौर्या पाहुनी

पराक्रमी देवेंद्रा  तुझिया दातृत्वे भारुनी 

स्तोत्रांना तुज अर्पण करतो स्तवनासी गाउनी ||६||

मा॒याभि॑रिन्द्र मा॒यिनं॒ त्वं शुष्ण॒मवा॑तिरः । वि॒दुष्टे॒ तस्य॒ मेधि॑रा॒स्तेषां॒ श्रवां॒स्युत्ति॑र ॥ ७ ॥

महारथी शुष्णालाही तू पराजीत केले

तव शौर्याला प्रज्ञावंत विद्वाने देखिले

पंडित सारे तुला अर्पिती स्तुतीपूर्ण भजने

मान राखी रे त्या  स्तवनांचा स्वीकारुन कवने ||७||

इन्द्र॒मीशा॑न॒मोज॑सा॒भि स्तोमा॑ अनूषत । स॒हस्रं॒ यस्य॑ रा॒तय॑ उ॒त वा॒ सन्ति॒ भूय॑सीः ॥ ८ ॥

वसुंधरेवर देवेंद्राचे सहस्र उपकार

सहस्र कैसे अनंत असती कर्मे बहु थोर

बहुत अर्पुनीया स्तोत्रांना सुरेन्द्रास पूजिले

आराधनेस इंद्राच्या संपन्न आम्ही केले  ||८||

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. सदर गीताचे संगीत संकलन आणि गायन श्री. शशांक दिवेकर यांनी केलेले आहे आणि त्यातील रेखाटने सौ. सुप्रिया कुलकर्णी यांनी रेखाटली आहेत. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. 

https://youtu.be/bHeCJVpV8qE

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares