डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ११ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ११ ( इंद्र सूक्त )

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील अकराव्या सूक्तात मधुछन्दस वैश्वामित्र या ऋषींनी इंद्रदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

— मराठी भावानुवाद —

इन्द्रं॒ विश्वा॑ अवीवृधन्त्समु॒द्रव्य॑चसं॒ गिरः॑ । र॒थीत॑मं र॒थीनां॒ वाजा॑नां॒ सत्प॑तिं॒ पति॑म् ॥ १ ॥

सागरासिया व्यापुनी टाकी इंद्र यशोवान

स्तुतिस्तोत्रांनी यशोदुंदुभी होई वृद्धीमान 

राजांचाही राजा इंद्र बलशाली अधिपती

महारथीहुनि अतिरथी म्हणती रणाधिपती ||१||

स॒ख्ये त॑ इन्द्र वा॒जिनो॒ मा भे॑म शवसस्पते । त्वाम॒भि प्र णो॑नुमो॒ जेता॑र॒मप॑राजितम् ॥ २ ॥

हे इंद्रा तू चंडप्रतापि अमुचे रक्षण करीशी

तव सामर्थ्यावर विसंबता आम्हा भीती कैशी

पराभूत तुज कोण करु शके विजयी तू जगज्जेता

तव चरणांवर नमस्कार शत तुम्हीच अमुचे त्राता ||२||

पू॒र्वीरिन्द्र॑स्य रा॒तयो॒ न वि द॑स्यन्त्यू॒तयः॑ । यदी॒ वाज॑स्य॒ गोम॑तः स्तो॒तृभ्यो॒ मंह॑ते म॒घम् ॥ ३ ॥

अमाप गोधन धनसंपत्ती देवेन्द्रा जवळी

भक्तांसाठी दान द्यावया मुक्तहस्त उधळी 

विशाल दातृत्व इंद्राचे अथांग जणु सागर 

अमुचे रक्षण सुरेंद्र करतो पराक्रमी अतिशूर     ||३||

पु॒रां भि॒न्दुर्युवा॑ क॒विरमि॑तौजा अजायत । इन्द्रो॒ विश्व॑स्य॒ कर्म॑णो ध॒र्ता व॒ज्री पु॑रुष्टु॒तः ॥ ४॥

इंद्रराज दिग्विजयी ध्वंस रिपुपुरे करतो

अक्षय यौवन बुद्धी अलौकिक अवतारुन येतो

वज्रधारी हा चंडवीर हा कर्मांचा आधार

स्तोत्र अर्पुनी स्तवने गाती याचे भक्त अपार ||४|| 

त्वं व॒लस्य॒ गोम॒तोऽ॑पावरद्रिवो॒ बिल॑म् । त्वां दे॒वा अबि॑भ्युषस्तु॒ज्यमा॑नास आविषुः ॥ ५ ॥

बलासुराने बळे पळविले समस्त गोधन

मुक्त तयांना केलेसि तू कोटा विध्वंसुन

देवगणांना पीडा होता तव आश्रय मागती 

तव शौर्याने सुखी होउनी क्लेशमुक्त होती ||५||

तवा॒हं शू॑र रा॒तिभिः॒ प्रत्या॑यं॒ सिन्धु॑मा॒वद॑न् । उपा॑तिष्ठन्त गिर्वणो वि॒दुष्टे॒ तस्य॑ का॒रवः॑ ॥ ६ ॥

तू तर सागर असशि कृपेचा औदार्याचा धनी

तव चरणांशी भाट पातले तव शौर्या पाहुनी

पराक्रमी देवेंद्रा  तुझिया दातृत्वे भारुनी 

स्तोत्रांना तुज अर्पण करतो स्तवनासी गाउनी ||६||

मा॒याभि॑रिन्द्र मा॒यिनं॒ त्वं शुष्ण॒मवा॑तिरः । वि॒दुष्टे॒ तस्य॒ मेधि॑रा॒स्तेषां॒ श्रवां॒स्युत्ति॑र ॥ ७ ॥

महारथी शुष्णालाही तू पराजीत केले

तव शौर्याला प्रज्ञावंत विद्वाने देखिले

पंडित सारे तुला अर्पिती स्तुतीपूर्ण भजने

मान राखी रे त्या  स्तवनांचा स्वीकारुन कवने ||७||

इन्द्र॒मीशा॑न॒मोज॑सा॒भि स्तोमा॑ अनूषत । स॒हस्रं॒ यस्य॑ रा॒तय॑ उ॒त वा॒ सन्ति॒ भूय॑सीः ॥ ८ ॥

वसुंधरेवर देवेंद्राचे सहस्र उपकार

सहस्र कैसे अनंत असती कर्मे बहु थोर

बहुत अर्पुनीया स्तोत्रांना सुरेन्द्रास पूजिले

आराधनेस इंद्राच्या संपन्न आम्ही केले  ||८||

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. सदर गीताचे संगीत संकलन आणि गायन श्री. शशांक दिवेकर यांनी केलेले आहे आणि त्यातील रेखाटने सौ. सुप्रिया कुलकर्णी यांनी रेखाटली आहेत. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. 

https://youtu.be/bHeCJVpV8qE

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments