मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 43 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 43 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७८.

विश्वाची निर्मिती नुकतीच झाली होती.

प्रथम तेजात तारका चमकत होत्या.

तेव्हा आकाशात देवांची सभा भरली आणि

ते गाऊ लागले-

“वा!पूर्णत्वाचं किती सुरेख चित्र! निर्भेळ आनंद!”

 

एकजण एकदम ओरडला,

“प्रकाशमालेत कुठंतरी त्रुटी आहे.

 एक तारा हरवलाय!”

 

त्यांच्या वीणेची एक तार तुटली.गीत थांबले.

ते निराशेनं म्हणू लागले,

” हरवलेली ती तारका सर्वात सुंदर होती.

 स्वर्गाचं वैभव होती.”

त्या दिवसापासून सतत शोध चालू आहे.

आणि प्रत्येकजण दुसऱ्याला सांगतो,

” जगातला एक आनंद नाहीसा झाला आहे.”

रात्रीच्या खोल शांततेत तारका हसतात

आणि आपापसात कुजबुजतात,

“हा शोध व्यर्थ आहे,

एकसंध पूर्णत्व संपलं आहे.

 

७९.

या आयुष्यात तुला भेटायचं माझ्या वाट्याला

येणार नसेल तर, तुझ्या नजरेतून

मी उतरलोय असं मला सतत वाटू दे.

मला क्षणभरही विस्मरण होऊ नये.

जागेपणी व स्वप्नातही या दु:खाची टोचणी

सतत मनात राहो.

 

जगाच्या बाजाराच्या गर्दीत माझे दिवस

जात असताना आणि दोन्ही हातांनी

भरभरून नफा होत असताना

मला सतत असे वाटत राहो की मी

काहीच मिळवत नाही.

या दु:खाची टोचणी मला स्वप्नात व

जागेपणी सतत राहावी.

 

दमून भागून रस्त्याच्या कडेला मी बसेन.

धुळीत माझा बिछाना पसरेन तेव्हा,

दीर्घ प्रवास अजून करायचा आहे याची जाणीव

मी क्षणभरही विसरू नये

आणि या दु:खाची टोचणी मला जागृतीत व

स्वप्नातही रहावी.

 

शृंगारलेल्या माझ्या महालात

गाण्याचे मंजूळ स्वर आणि

हास्याचा गडगडाट असावा.

तेव्हा मात्र मी तुला निमंत्रण दिले नाही या दु:खाणी टोचणी मला जागेपणी

व स्वप्नातही असावी.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आले आभाळ भरून… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आले आभाळ भरून… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

 आले आभाळ भरून   

 मनी लागे हूरहूर

 पोर अल्लड कालची

 झाली आज उपवर  ||१ ||

 

 लेक परक्याचे धन

 असे सांगे जनरीत

 तरी काळजाची व्यथा   

 वाटे सांगावी कानात||२ ||

 

 आता सोडून जाईन

 सुने होईल अंगण

 तिचे  बालपण सारे 

 मनी घालील रिंगण||३ ||

 

 भोळीभाबडी लाडली  

 खूप वाढली लाडात

 तिच्या श्वासांची बासरी 

 रोज घुमते घरात ||४||

 

 सुने सुने च  घरटे

 मुकी झाली किलबिल    

 मन चाहूल घ्यावया 

 घरभर पसरेल |५||

 

 तिच्या स्वप्नातले गाव 

 एका हाकेवर आले

 तरी वात्सल्याचे मोर 

 उगा आसवात न्हाले||६||

 

अशा आनंदाच्या क्षणी

मनी उठते काहूर

आणि डोळ्यात मावेना

 मुक्या आसवांचा पूर||७||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येणे…जाणे… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ येणे…जाणे… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अवचित येणे असे कसे?

 कळत नकळत

 नकळत कळत

पर्णा बिलगून स्वप्न हसे

अंगांग व्यापणे आणि कसे ?

हरखत निरखत

निरखत हरखत

घन सावन पसरी दाट पिसे

अलगद जाणे काय असे?

उधळत निखळत

निखळत उधळत

टपटपणारी बकुल कुसे

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वडिलोपार्जित आई… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ वडिलोपार्जित आई… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

एक आई सोडली

तर

तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे

काहीही नाही आणि

भावंडांमध्येही

मी एकटाच.

 

एकदा

थकल्या आवाजात आई म्हणाली होती,

“तुला एखादा भाऊ हवा होता

म्हणजे जरा तुझा ताण हलका झाला असता.”

बस्स इतकेच.

 

मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून

त्याची आई कुठे दिसली नाही घरात

सहज विचारले तर म्हणाला,

“दादाकडे गेली आहे पुढच्या सहा महिन्यांसाठी.”

“सहा महिन्यांसाठी म्हणजे ?

म्हणजे काय ?”

“वडील वारले आणि गावाकडच्या

घराची आणि शेतजमिनीची

वाटणी

झाली होती दोघांमध्ये

तेव्हाच ठरले होते –

आईलाही दोघांनी सहा-सहा महिने सांभाळायचे आणि

तसेच काही झाले तर अर्धा-अर्धा खर्चही

वाटून घ्यायचा दोघांनी.”

आईविना पोरक्या घराचा

आणि मित्राचा मी निरोप घेतला.

 

घरी आलो तर

आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी बडबडत असलेली

सुरकुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या समुद्रासारखे अथांग

देहाला जाणवणारा, न जाणवणारा हलकासा कंप

घट्ट पदर लपेटून, उजव्या हाताने मांडीवर हलकासा ठेका

एक अपार करूणा समोर

मूर्तिमंत !

 

मी जवळ गेलो तिच्या

बसलो गळून गेल्यासारखा

तर म्हणाली –

“का रे ?

चेहरा का उतरलाय ?

कोठे गेला होतास ? बरे का नाही वाटत ?”

“काही नाही गं,” असे म्हणून मी तिचा हात हातात घेतला

घट्ट धरून ठेवला

तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजुनही नाळ न तुटलेला दृष्टांत.

 

उठलो सावकाश गेलो आत

देवघरात

मित्राची आई आठवत राहिलो

समईच्या मंद उजेडात.

 

रात्र झाली असावी खूप आता

मध्येच जाग येते आहे आणि

मी सावकाश येतो आईजवळ तर

ती शांत झोपलेली –

माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा एक कवडसा हलतो आहे

तिच्या चेह-यावर अजुनही.

 

देवा,

मला कोणत्याही जन्मी

लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस

आईची वाटणी कधीही होऊ देऊ नकोस.

 

मी सावकाश उठतो

पाय न वाजवता

सावध फिरत राहतो सगळ्या घरभर

आईला स्मरून देवाचे आभार डोळ्यातून वाहत राहतात

माझे ओठ

रात्रभर कसलीतरी प्रार्थना गुणगुणत राहतात…

 

एक आई सोडली

तर

तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही

आणि

भावंडांमध्येही मी

एकटाच….

 

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी- नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – किनारा शोधत राही – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– किनारा शोधत राही – 🚤⛵? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

अथांग सागर भवताली

आकाशाची जली निळाई

 दिशा द्यायला नाही वल्हे

नाव एकटी टिकून  राही

 बोलवी  का  कुणी किनारा?

 शाश्वत  सहारा नीत देणारा

त्याच किनार्‍याच्या विश्वावर

मिठीत घेईल पुर्ण  सागरा

 सागराची निळी नवलाई

भूल पाडत हाकारत जाई

भरकटण्याचे भय  होडीला

 म्हणून  किनारा शोधत राही

  किनारा मिळे बंधन येते

 बंधन विश्वहर्तता देते

 प्रेमरज्जू साथीला मिळता

 होडी सागरी खुशाल फिरते

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जादू… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जादू💦 ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

केली जादू त्या निळ्याने

गेले होऊनी मी निळी

भारावूनी गेले मनी

रेशमी शेला सोनसळी

 

घुमे सूर वेळूतूनी

जीवा गारूड जाहले

गात्रागात्रांतूनी माझ्या

नाम कृष्ण कृष्ण वाहिले

 

मीच माझ्या देहात या

कुठे आता रे राहिले

अधिरशा त्या स्वरमयी

मीच पुन्हा झंकारले

 

 सावळ्या त्या रुपाची

 पडे पुन्हा पुन्हा भूल

 मनी दरवळे कान्हा

 उरी मोरपिशी चाहूल

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 134 – हा भास दो घडीचा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 134 – हा भास दो घडीचा ☆

प्रेमात रंगलो मी । हा भास दो घडीचा।

खोटेच भाव सारे। आभास दो घडीचा।

 

हे स्वप्न भाव वेडे। देऊ नको कुणाला।

स्वप्नात रंगलेला हा रास दो घडीचा।

 

या भाबड्या मनाला। समजाविता कळेना।

या बेगडी फुलांचा। हा वास दो घडीचा।

 

भाळू नको उगा रे। खोट्याच कल्पनांना ।

संपेल हा कधीही ।सहवास दो घडीचा ।

 

जादूत धुंद  होशी।स्वप्नातल्या परीच्या।

येशील भूवरी रे। हा ध्यास दो घडीचा ।

 

सौंदर्य या मनाचे। जाणून घेई आता।

प्रेमास लाभलेला।विश्वास दो घडीचा

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुण्याची कहाणी:  कालची अन् आजची! – सुश्री प्रज्ञा रामतीर्थकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पुण्याची कहाणी:  कालची अन् आजची! – सुश्री प्रज्ञा रामतीर्थकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

आटपाट नगर होतं ​—-विद्येचं माहेरघर होतं ​​​​

​​​​सह्याद्रीच्या कुशीत होतं​​​​—-टेकड्यांच्या मुशीत होतं ​​​​

​​

मुळा-मुठा निर्मळ होती ​​​​​—-गोड पाण्याची चंगळ होती ​​

​​​काळ्या मातीत कस होता​​​​​​—-वरण भात बस्स होता​​​​​​

 

निसर्गाचं देणं होतं ​​​​—-पाताळेश्वरी लेणं होतं ​​​​

​​​​नाव त्याच पुणं होतं ​​​​—-खरंच काही उणं नव्हतं ​​​​

​​​​​

शिवबाचं बालपण होतं​​​—-जिजामातेचं धोरण होतं​​​

​​मोगलाई कारण होतं​​​—-पुण्याचं ज्वलन होतं​​​

​​​

​छत्रपतींचं स्वराज्य होतं​​​​—-पेशव्यांचं अटकेपार राज्य होतं​​​​

​​​​निधड्या छातीचे मावळे होते​​​​—-पराक्रमाने न्हायले होते​​​​

 

पर-स्त्री मातेसमान होती​​​​—-कोल्ही-कुत्री गुमान होती​​​​

​​नवसाला पावणारे गणपती होते​​​​—-तालमीसाठी मारुती होते​​​​

​​

चिरेबंदी वाडे होते​​​​—-आयुर्वेदाचे काढे होते​​​​

अंगणात रांगोळी होती​​​​​​—-घराची दारं उघडी होती​​​​​

​​​​

संध्याकाळी दिवेलागणी होती​​​​—-घरोघरी शुभंकरोती होती​​​​

गृहिणी अन्नपूर्णा होत्या​​​​—-तडफदार स्वयंसिद्धा होत्या

​​​​

जेवायला साधी पत्रावळ होती ​​—-चौरस आहाराने परिपूर्ण होती​​​

वेदांचा अंगिकार होता​​​​​​​—-विद्वान लोकांचा संचार होता​​​​​​

 

टिळकांची सिंहगर्जना होती​​​​—-आगरकरांची सुधारणा होती​​​​

​​​​फडके चाफेकरांचं बंड होतं—-सावरकरांचं अग्निकुंड होतं

​​​

रानडे, फुले, कर्वे झटले होते​​​—-बायकांचे जगणे फुलले होते​​​

​​विद्वत्तेची पगडी होती​​​​—-सन्मानाची भिकबाळी होती​​​​

 

घरंदाज पैठणी होती—-शालीन नथणी होती

काटकसरीचा वारा होता —-उधळपट्टीला थारा नव्हता

 

सायकलींचे शहर होतं—-निवृत्त लोकांचे घर होतं  

एका दमात पर्वती चढणं होतं—-दुपारी उसाचा रस पिणं होतं 

 

पुण्याची मराठी प्रमाण होती​​​​—-शुद्धतेची कमाल होती​​​​

कलाकारांची कर्मभूमी होती​​​—-पुणेकरांची दाद जरूरी होती​​​

 

सवाई गंधर्व, वसंत उत्सव होते —-पुणेकरांना अभिमानास्पद होते 

​​​​सार्वजनिक मंडळे विधायक होती​​​​—-समाज-स्वास्थ्याला तारक होती​​​​

​​​​:

:

पण परंतु किंतु….​​​​​…. 

 

औद्योगिक क्रांती झाली​​​​—-पुण्यामध्ये पिंपरी आली​​​​

​​चारी दिशांनी कामगार आले​​​​​​—-स्थानिक मात्र बेरोजगार झाले​​​​​​

​​

​​​कारखाने धूर ओकू लागले ​​—-पुणेकर सारखे खोकू लागले ​​

​संगणकाची नांदी झाली ​​—-हिंजवडीची चांदी झाली ​​

​​

पुण्याची आय-टी पंढरी झाली​​—-तज्ञांची मांदियाळी आली​​

तांत्रिक भाषा ओठावर रूजली​​​​​—-मराठी मात्र मनातच थिजली​​​​​

 

उंच इमारतींचे पीक आले​​—-शेती करणे अहित झाले 

टेकड्यांवर हातोडा पडला—-सह्याद्रीच तेवढा कळवळला 

 

मुळा-मुठा सुकून गेली—-सांडपाण्याने बहरून आली

​​​​​रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला​​​​​​—-चालताना श्वास कोंडत गेला 

 

पिझा बर्गर ‘जेवण’ झाले—-सार्‍यांनाच आजारपण आले 

डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली —-बँकांनी आरोग्यासाठी कर्जे दिली

​​​​​

‘युज अँड थ्रो’ प्रतिष्ठेचे झाले​​​​​​—-जागोजागी ढीग कचऱ्याचे आले​​​​​​

​​​​तरुणाई  रेव पार्टीत रंगली​​​​—-चारित्र्याची कल्पना मोडीत निघाली​​​​

​​

मारामारी, खून, बलात्कार झाले​​—-निर्ढावलेल्या मनांचे साक्षात्कार झाले ​​—– 

​​​​

​एकेकाळची पुण्य नगरी​​​​—-

होतेय आता पाप नगरी​​​​—-

भिन्न प्रांतीयांची भाऊगर्दी—-

कुठे हरवला अस्सल पुणेरी?​​​​​—-

कुठे हरवला अस्सल पुणेरी?​​​​​—-

 

प्रस्तुती –  सुश्री प्रज्ञा रामतीर्थकर

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायको… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बायको… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

प्रत्येकाच्या नशिबात

एक बायको असते

आपणास कळतही नसते

डोक्यावर ती केव्हा बसते

 

बायको इतरांशी बोलताना

गोड, मृदू स्वरात बोलते

अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही

नवऱ्याने काय पाप केले असते

 

ज्ञानेश्वराने भिंत चालवली

बायको त्यांचं कौतुक करते

सालं! नवरा अख्खं घर चालवितो

तेव्हा मात्र बायको गप्प असते

 

वस्तू कुठे ठेवली

हे बायको विसरते

दिवसभर नवऱ्यावर

उगीचच डाफरते

 

लग्नात पाचवारी बायकोला

खूप होत होती मोठी

आता नऊवारी गोल नेसताना

बायकोला होतेय खूपच छोटी

 

बायकोच्या प्रेमाची गड्यांनो

तर्‍हाच खूप  न्यारी असते

पाहिजे तेव्हा रेशन लागते

नको तेव्हा उतू जाते

 

वयाच्या साठीनंतर

एक मात्र बरं असतं

बायको ओरडली तरी

नवऱ्याला ऐकू येत नसतं

 

       काट्याकुट्याच्या रस्त्यातून

       नवरा किती मस्तीत चालतो

       याला कारण खरं बायकोचा

       मस्त, धुंद सहवास असतो

 

   बायको गावाला गेली की

  देवाशपथ, करमत नसतं

   क्षणाक्षणाला रुसणारं

   घरात कुणीच नसतं

 

   नवरा-बायकोचं

   वेगळंच नातं असतं

   एकमेकांचं चुकलं तरी

   एकमेकांच्याच मिठीत जातं

 

       बायकोवर रागावलो तरी

       तिचं नेहमी काम पडतं

       थोडावेळ जवळ नसली तर

       आपलं सर्वच काही अडत असतं

 

       अव्यवस्थित संसाराला

       व्यवस्थित वळण लागतं

       त्यासाठी मधूनमधून

       बायकोचं ऐकावंच लागतं

 

       सुना-नातवंडासह आता

       घर चांगलं सजले आहे

       बायको एकटी सापडत नाही

       दुःख मात्र एवढंच आहे.

 

      बायकोशी भांडताना

      मन कलुषित नसावं

      दोघांचं भांडण

      खेळातलंच असावं

 

      नाती असतात पुष्कळ

      पण नसतो कुणी कुणाचा

      खरं फक्त एकच नातं

      असतं नवरा  बायकोचं

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ती परत आली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

💃 ती परत आली ! 🙆‍♀🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

आली गुलाबी थंडीला

पुन्हा एकदा लहर,

सुरू केला बघा तिने

परत तिचा तो कहर !

 

बाहेर काढा परत

स्वेटर आणि शाली,

ऊब घ्या तयांची

मऊ मऊ मखमली !

 

आता घसरले आहे

इतके काही टेंपरेचर, 

करून टाकले तिने

मुंबईचे महाबळेश्वर !

 

पेटतील गावोगावी

रोज रोज शेकोट्या,

जमून सारे करतील

आनंदाने “पोपट्या” !

 

बेभरोशी हवामानाची

पाहून अशी गती,

कुंठली आहे सध्या

मानवाची “मंद” मती !

 

पण

आपणच बघा मोडले

पर्यावरणाचे कंबरडे, 

आता रोज रोज मरे

त्याला कोण बरं रडे ?

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares