मराठी साहित्य – विविधा ☆ भव्य स्वयंपाक उत्तम… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ भव्य स्वयंपाक उत्तम… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

भव्य स्वयंपाक उत्तमस्वयंपाक कसा असावा ह्या बद्दल

 श्री समर्थ  रामदास स्वामी महाराज लिहितात —

           शक्ती बुद्धी विशेष ।

           नाही आलस्याचा विशेष ।

           कार्यभागाचा संतोष ।

                  अतिशयेसी ॥

स्त्रियांना काम करावयाचे तर शक्ती पाहिजे आणि काम कसे करावे यासाठी बुद्धीही पाहिजे आणि काम करताना आळस नसावा. समर्थांच्या मते आळस हा मनुष्याचा शत्रू आहे. केलेल्या कामाचा संतोष असावा. कोणालाही खाऊ घालताना तृप्त वृत्ती असावी.

ही ओवी समर्थ रामदास स्वामींच्या ‘स्वयंपाकिणी’ या स्फूट समासातील आहे. समर्थ रामदास हे असे संत आहेत की, ज्यांनी जीवनातील प्रत्येक गोष्टींवर मार्गदर्शन केले आहे.

            आता ऐका स्वयंपाकिणी ।

            बहुत नेटक्या सुगरणी ।

            अचूक जयांची करणी ।

                    नेमस्त दीक्षा ॥

स्वयंपाक करताना पदार्थ नीट करावे ते कसे असावे –

           गोड स्वादिष्ट रुचिकर ।

            येकाहून येक तत्पर ।

            न्यून पूर्णाचा विचार ।

               कदापि न घडे ॥

घरात होणारा स्वयंपाक हा घरातील सर्व व्यक्तींना योग्य अशा प्रकारचा असला पाहिजे.

             रोगी अत्यंत खंगले ।

         तेणे ते अन्न पाहिजे भक्षिले ।

              भोजन रुचीने गेले ।

                 दुखणे तयाचे ॥

अत्यंत खंगलेल्या रोग्यालाही उत्तम वाटेल असे अन्न सुगरणीने करावे जेणे करून ते अन्न खाल्ल्याने त्याचे दुखणेही दूर होईल.

           उत्तम अन्ने निर्माण केली ।

              नेणो अमृते घोळिली ।

            अगत्य पाहिजे भक्षिली ।

                    ब्रह्मादिप्ती॥

स्वयंपाक असा असावा की, जणुकाही अमृतच टाकले आहे असे वाटावे. देवांनाही आवडेल असा रुचकर स्वयंपाक करणे हे सुगरणीचे काम असते.

           सुवासेची निवती प्राण ।

           तृप्त चक्षू आणि घ्राण ।

           कोठून आणिले गोडपण ।

                 काही कळेना ॥

स्वयंपाकाच्या नुसत्या वासाने अंत:करण आनंदित झाले पाहिजे. डोळे आणि नाक तृप्त झाले पाहिजे. या पदार्थांची चव इतकी छान असावी की इतकी सुंदर चव कशी आली असा खाणार्‍याला प्रश्‍न पडला पाहिजे. याचे नेहमी पाहत असलेले उदाहरण म्हणजे महाप्रसादाचे जेवण होय. काही विशेष न टाकताही देवासाठी आत्मीयतेने केल्यामुळे महाप्रसादाचा स्वयंपाक अप्रतिमच होतो. तसा घरी कितीही मसाले टाका पण होत नाही.

एवढा उत्तम स्वयंपाक केला की मग प्रथम देवाला नैवेद्य दाखवावा.

             देव वासाचा भोक्ता ।

             सुवासेचि होये तृप्तता ।

                येरवी त्या समर्था ।

                    काय द्यावे ॥

देवाला आपण नैवेद्य दाखवितो. देव फक्त वासानेच तृप्त होतो. आपण सामान्य माणसे देवाला काय देणार. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतरच बाकीच्यांना जेवावयास वाढावे. जेवताना देवाचे नामस्मरण करावे.

            जनी भोजनी नाम वाचे वदावे ।

           अति आदरे गद्यघोषे म्हणावे ।

           हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।

           तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ॥

अशा प्रकारे गृहिणीने स्वयंपाक केला तर सर्व कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. सुदृढ कुटुंब सुदृढ समाज निर्माण करेल. अशा या स्वयंपाकाची फलश्रुती समर्थ सांगतात-

          भव्य स्वयंपाक उत्तम |

           भोजनकर्ते उत्तमोत्तम |

           दास म्हणे भोक्ता राम |

                    जगदांतरे ||

अशाप्रकारे केलेले मिष्टान्न चवीने ग्रहण करणारे लोक तृप्त झाले म्हणजे श्रीरामच संतोष पावतात. कारण श्रीरामच सर्वांच्या अंतरी असतात. 🍀

– लेखक कोण ते माहित नाही पण ह्या लेखाबद्दल त्यांना शतशः प्रणाम.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे – लेखिका – सौ. मानिनी महाजन ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे – लेखिका – सौ.मानिनी महाजन ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे ..  प्रीतीची मला एक साद दे 

धावत येऊन गळामिठी दे ..  तुझ्या पाव्याच्या मंजुळ स्वरात भिजू दे

तुझ्या प्रेमात राधेसम आकंठ बुडू दे ..  मीरा होऊन तुझ्यात सामावू दे 

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे…… 

 

विसरून जगाला तुझीच होऊ दे .. चंद्राचा झुला अन् चांदण्यांचे लक्ष लक्ष दिवे होऊ दे 

मन नौकेत विराजमान होऊन ..  प्रीतीची गाज ऐकू दे….

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे…..

 

कृष्णा बस फक्त तू आणि मी .. भैरवीचे सूर गाता-गाता भूपातुन तुला आळवू दे 

प्रीतीच्या पायघड्यावरून चालताना .. तू माझ्यात नि मी तुझ्यात सामावू दे

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे …..

 

प्रेम एवढं अवघड नसतं .. हे जगाला कळू दे….

निर्मळ प्रेमाला विश्वासाची झालर दे .. प्रीतीचे पंख दे.. उडण्याचे बळ दे 

श्वास श्वास रंध्र रंध्र कृष्णमय होऊ दे 

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे…….

 

लेखिका — सौ.मानिनी महाजन, मुंबई 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हिरवी हिरवी वाट ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– हिरवी हिरवी वाट– ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

धुके दाटले पुढे दिसेना

सरली आता रात

स्वच्छ मोकळ्या वातावरणी

हिरवी हिरवी वाट

असेच जावे पुढे वाटते

चढूनिया सोपान

असेल तेथे स्वर्गभूमीची

उभारलेली कमान

हासत जाईन ओलांडून मी

 सोडून पाऊलखुणा

आठवणींनी होतील हिरव्या

पाऊलवाटा पुन्हा.

चित्र साभार – श्री सुहास रघुनाथ पंडित

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सण संक्रांतीचा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ सण संक्रांतीचा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तीळागुळाचा स्निग्ध गोडवा

असाच वाढत जावा

शुभ्र चांदणी परी फुलावा काटेरी हलवा.

 

तीळातीळातून स्नेह वाढवा

कणाकणातून प्रेम,गोडवा

तीळगुळाच्या मधुर मिलनी भाव असा रंगावा

शुभ्र चांदणी परी फुलावा काटेरी हलवा.

 

शीतल वारे येत रहावे

दवबिंदूंना पंख फुटावे

कुडकुडणा-या गात्रांमधूनी स्नेहदीप उजळावा

शुभ्र चांदणी परी फुलावा काटेरी हलवा.

 

काट्यातूनही फुलत रहावे

गोडीसाठी तन झिजवावे

परस्परातील स्नेह वाढता क्षणाक्षणाचा सण व्हावा

शुभ्र चांदणी परी फुलावा काटेरी हलवा.

 

तीळगुळाचा स्निग्ध गोडवा असाच वाढत जावा

शुभ्र चांदणी परी फुलावा काटेरी हलवा .

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 135 – बाळ गीत –  शाळेत जाऊ द्याल का ? ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 135 – बाळ गीत –  शाळेत जाऊ द्याल का ?  ☆

आई बाबा आई बाबा

पाटी पेन्सिल घ्याल का!

पाटीवरती घेऊन दप्तर

शाळेत जाऊ द्याल का!

 

भांडी कुंडी भातुकली

आता नको मला काही।

दादा सोबत एखादी

द्याल का घेऊन वही।

 

नका ठेऊ मनी आता

मुले मुली असा भेद।

शिक्षणाचे द्वार खोला

भविष्याचा घेण्या वेध।

 

कोवळ्याशा मनी माझ्या

असे शिकण्याची गोडी।

प्रकाशित जीवन होई

ज्योत पेटू द्या ना थोडी।

 

पार करून संकटे

उंच घेईल भरारी।

आव्हानांना झेलणारी

परी तुमची करारी।

 

सार्थ करीन विश्वास

थोडा ठेऊनिया पाहा।

थाप अशी कौतुकाची

तुम्ही देऊनिया पाहा

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन मोकळं करायला– ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मन मोकळं करायला– ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

तुझा संसार—माझे कुटुंब,

तुझी नोकरी—माझा पेशा,

                     असो ताण क्षणोक्षणी,

मन मोकळं करायला–

              हव्यात हक्काच्या मैत्रिणी!

 

तुझे पैसे —माझा खर्च,

तुझा पगार–माझा नफा,

                 असोत हिशोब देणेघेणी,

मन मोकळं करायला —

               हव्यात हक्काच्या मैत्रिणी!

 

तुझी शिस्त—माझी रीतभात,

तुझा थाटमाट–माझा साज,

                असु देत थोडी ऊणीदेणी,

मन मोकळं करायला—

               हव्यात हक्काच्या मैत्रिणी!

 

तुझी दुखणी–माझा आजार,

तुझे लंगडणे–माझे धडपडणे,

                असतील काही रडगाणी,

मन मोकळं करायला —

               हव्यात हक्काच्या मैत्रिणी!

 

तुझे रुसणे—माझे रागावणे,

 तुझा अबोला–माझे मौन,

              करायला लागेल मनधरणी,

मन मोकळं करायला —

               हव्यात हक्काच्या मैत्रिणी!

 

तुझा छंद–माझा आनंद,

तुझी आवड–माझी निवड,

               जपुया कायम आठवणी,

                गाऊया गोड गाणी,

मन मोकळं होईल—

असतील जर हक्काच्या मैत्रिणी!

© सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #157 ☆ स्वामी विवेकानंद – तेजोमयी दीपस्तंभ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 157 – विजय साहित्य ?

☆ स्वामी विवेकानंद – तेजोमयी दीपस्तंभ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(स्वामी विवेकानंद जयंती निमित्त) 

बंधु आणि भगिनीनो

त्रिखंडात बोल गाजे

कलागुणी वक्तृत्वाने

युवकांचे झाले राजे…….१

 

ध्येय वादी संघटन

युवकांना दिशादायी

रूजविली अंतर्यामी

नीतिमत्ता ठायी ठायी…….२

 

सा-या विश्वाला प्रेरक

अशी शक्ती शब्दांकित

स्वामी विवेकानंदांचे

कार्य झाले मानांकित ……..३

 

काव्य, शास्त्र विनोदाचे

अलौकिक संकलन

रामकृष्ण हंस ज्ञानी

ज्ञानमयी संचलन……..४

 

शिकागोची परिषद

कार्य कर्तुत्वाला गती

ज्ञानयोगी नरेंद्राची

तेजोमय कळे मती………५

 

हिंदू धर्म प्रचारक

युवकांना दिले बल

तत्वज्ञान, आत्मज्ञान

संस्कारीत कर्मफल…….६

 

रामकृष्ण मिशनने

व्यक्तीमत्व घडविले

तेजोमयी दीपस्तंभ

अंतरात जडविले …….७

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लेकी … लेखिका- डाॅ.नयनचंद्र सरस्वते ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ लेकी … लेखिका- डाॅ.नयनचंद्र सरस्वते ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

ओठांचे कोपरे विलग करत

फुलासारख्या हसत राहतात लेकी

आणि

नाचरी पावले नुसती वाहत राहतात

निर्झराच्या उत्कट आनंदाने…

लेकी रंगीत साड्या नेसतात म्हणे… कानात डूल डुलतात

हातात सुगंधी फुले आणि वाऱ्यावर उडणारे केस

लेकी नाजूक दिसतात…लेकी आकर्षक असतात म्हणे …… 

अरे, याच नाजूक-साजूक लेकी

कठीण कातळाला धडका देत

शोधत राहतात निरंतर जिवंत झरे

हे दिसत नाही कुणाला 

आणि…. 

दिसले तरी, करत नाहीत कधीच मान्य……. 

पांडुरंगा…

आसुसून-आसुसून कुशीत शिरतात लेकी

तेव्हा शब्द बोलतात वेगळे…स्पर्श सांगतो दुसरे काही…… 

तुला सांगू का…

काय मागतात रे लेकी…???

नाचऱ्या पावलांमागील समर्थ कर्तृत्व पहा

हसणाऱ्या चेहऱ्यामागील वेदना न्याहाळा

नाजूक हातांनी दिलेल्या धडका अनुभवा

मान्य करा….”अहं ” सोडून…एकदा मान्य करा…… 

“स्त्री” म्हणून दिसण्यापेक्षा “असणे “…मान्य करा..

काय मागतात रे लेकी…?

आमच्या प्राक्तनातले कातळ आम्ही सांभाळू,

तुम्ही तरी वाटेत उभे राहू नका

नवीन “वांझ कातळ” होऊन….. 

कुशीत शिरलेल्या लेकी…

सांगत राहतात ना मूक राहून

तेव्हा…. जीव जळतो पांडुरंगा… जीव जळतो…

असो….

तू “माऊली” म्हणून बोलले हो…

अन्यथा

माऊलीचे जळणे फक्त तिलाच ठाऊक बाबा…….. 

लेखक : डॉ. नयनचंद्र सरस्वते

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १४ (विश्वेदेव सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त सूक्त १४ (विश्वेदेव सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १४ (विश्वेदेव सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – विश्वेदेव 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चौदाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी विश्वेदेवाला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त  विश्वेदेव सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : –

ऐभि॑रग्ने॒ दुवो॒ गिरो॒ विश्वे॑भिः॒ सोम॑पीतये । दे॒वेभि॑र्याहि॒ यक्षि॑ च ॥ १ ॥

सिद्ध करुनिया सोमरसा ठेविले अग्निदेवा

यज्ञवेदिवर सवे घेउनी यावे समस्त देवा 

सोमरसासह स्वीकारुनिया अमुच्या स्तोत्रांना

सफल करोनी अमुच्या यागा सार्थ करा अर्चना ||१||

आ त्वा॒ कण्वा॑ अहूषत गृ॒णन्ति॑ विप्र ते॒ धियः॑ । दे॒वेभि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥

आमंत्रित केले कण्वांनी अग्ने प्रज्ञाशाली

तुझ्या स्तुतीस्तव मनापासुनी स्तोत्रे ही गाईली

प्रसन्न होई अग्नीदेवा अमुच्या स्तवनांनी

झडकरी येई यज्ञाला या सकल देव घेउनी ||२||

इ॒न्द्र॒वा॒यू बृह॒स्पति॑म् मि॒त्राग्निं पू॒षणं॒ भग॑म् । आ॒दि॒त्यान्मारु॑तं ग॒णम् ॥ ३ ॥

इंद्र वायू अन् बृहस्पतींना सवे घेउनी या

सूर्य अग्नि सह पूषालाही सवे घेउनी या

मरुद्गणांना भगास आदित्यासी घेउनी या

सर्व देवता यज्ञासाठी सवे घेउनी या ||३||

प्र वो॑ भ्रियन्त॒ इन्द॑वो मत्स॒रा मा॑दयि॒ष्णवः॑ । द्र॒प्सा मध्व॑श्चमू॒षदः॑ ॥ ४ ॥

सोमरसाचे चमस भरुनिया आम्हि प्रतीक्षेत 

विशाल तरीही पात्रे भरली पूर्ण ओतप्रोत 

मधूर सोमरसाचे प्राशन सुखदायी होत

याचे करिता सेवन होते उल्हसीत चित्त ||४||

ईळ॑ते॒ त्वाम॑व॒स्यवः॒ कण्वा॑सो वृ॒क्तब॑र्हिषः । ह॒विष्म॑न्तो अर॒ंकृतः॑ ॥ ५ ॥

मुळे काढुनी सोमलतेची चविष्ट हवि बनविला

कण्वऋषींनी तुजसाठी हा सिद्ध सोमरस केला

आर्त होऊनी तुझी प्रार्थना मनापासुनी करिती

रक्षण करी रे तुझ्या आश्रया ऋषीराज येती ||५||

घृ॒तपृ॑ष्ठा मनो॒युजो॒ ये त्वा॒ वह॑न्ति॒ वह्न॑यः । आ दे॒वान्सोम॑पीतये ॥ ६ ॥

तुकतुकीत पृष्ठाने शोभत तुझे अश्व येती

स्वतः येउनी रथा जोडूनी प्रतीक्षा तुझी करिती

तुला आणखी समस्त देवा घेउनि यायाला

भावुक होऊन यजमान तया ठायी कृतार्थ झाला ||६||

तान्यज॑त्राँ ऋता॒वृधोऽ॑ग्ने॒ पत्नी॑वतस्कृधि । मध्वः॑ सुजिह्व पायय ॥ ७ ॥

समस्त विधी संपन्न व्हावया अश्वची हो कारण

त्यांच्या ठायी बहुत साचले कार्य कर्माचे पुण्य

कृतार्थ करी रे त्यांना देवुनि त्यांची अश्विनी

तृप्त करी रे देवा त्यांना सोमरसा देवुनी ||७||

ये यज॑त्रा॒ य ईड्या॒स्ते ते॑ पिबन्तु जि॒ह्वया॑ । मधो॑रग्ने॒ वष॑ट्कृति ॥ ८ ॥

अग्नीदेवा देवतास ज्या यज्ञा अर्पण करणे 

ऐकवितो हे स्तोत्र तयांसी करुनी त्यांची स्तवने

जिव्हा होवो त्या सर्वांची सोमरसाने तुष्ट

त्या सकलांना अर्पण करि रे हविर्भाग इष्ट ||८||

आकीं॒ सूर्य॑स्य रोच॒नाद्विश्वा॑न्दे॒वाँ उ॑ष॒र्बुधः॑ । विप्रो॒ होते॒ह व॑क्षति ॥ ९ ॥

जागृत झाल्या सर्व देवता अरुणोदय समयी

प्रकाशित त्या रविलोकातुन सर्वां घेऊन येई

विद्वत्तेने प्रचुर असा हा कर्ता यज्ञाचा

पूजन करुनी त्या सर्वांचे धन्य धन्य व्हायचा ||९||

विश्वे॑भिः सो॒म्यं मध्वग्न॒ इन्द्रे॑ण वा॒युना॑ । पिबा॑ मि॒त्रस्य॒ धाम॑भिः ॥ १० ॥

उजळुन येता वसुंधरा ही प्रभातसूर्य किरणे

वायूसह देवेंद्राला त्या अमुचे पाचारणे

सवे घेउनी उभय देवता आता साक्ष व्हावे

मधुर अशा या सोमरसाला प्राशन करुनी घ्यावे ||१०||

त्वं होता॒ मनु॑र्हि॒तोऽ॑ग्ने य॒ज्ञेषु॑ सीदसि । सेमं नो॑ अध्व॒रं य॑ज ॥ ११ ॥

अर्पण केला हवी स्विकारुनी अपुल्या ज्वालांत

सुपूर्द करिशी देवतांप्रती देऊनी हातात

तू हितकर्ता अमुच्या यज्ञी हो विराजमान 

अमुच्या यज्ञा प्रसन्न होउन सिद्ध करी संपन्न ||११||

यु॒क्ष्वा ह्यरु॑षी॒ रथे॑ ह॒रितो॑ देव रो॒हितः॑ । ताभि॑र्दे॒वाँ इ॒हा व॑ह ॥ १२ ॥

अग्नीदेवा सिद्ध करूनी रथा अश्व जोड 

प्रसन्न करुनी देवतांसी रे करी त्यात आरूढ

आतुर आम्ही त्यांच्यासाठी येथे तिष्ठत

झणि घेउनि ये सर्व देवतांना या यज्ञात ||१२||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/GEmOUqbE9Wk

Attachments area

Preview YouTube video Rugved 1 14

Rugved 1 14

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाप… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ बाप… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

बाप अथांग आकाश

बाप सागराची खोली

कोणी नाही मोजली

त्याच्या जीवाची काहिली

 

बाप पूनव चांदण

बाप रवी चा किरण

रात अंधारली तरी

प्रकाशतं  त्याचं मन

 

दुःख आलं किती पोटी

मुखी हसू रिजवितो

सारं गेलं पाण्यात

तरी अश्रू लपवितो

 

येवो यश अपयश

तरी मातीशी झुंजतो

पायी फाटता चप्पल

अनवाणी तो फिरतो

 

झालं सागराचं  दुःख

क्षणी पिऊन टाकतो

लेख सुखात राहावी

दिनरात तो चिंततो

 

त्याच्या लेकीला वाटे

सुखी राहो माझा बाप

दिन रात त्याच्या ठायी

पडो सुखाचंच माप

 

कष्टतो कुटुंबासाठी

काळजात जपे माया

घर भरून वाहते

त्याच्या असण्याची छाया

– मेहबूब जमादार

मु -कासमवाडी पो .पे ठ  जि .सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares