सुश्री गायत्री हेर्लेकर
कवितेचा उत्सव
☆ मन मोकळं करायला– ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
तुझा संसार—माझे कुटुंब,
तुझी नोकरी—माझा पेशा,
असो ताण क्षणोक्षणी,
मन मोकळं करायला–
हव्यात हक्काच्या मैत्रिणी!
तुझे पैसे —माझा खर्च,
तुझा पगार–माझा नफा,
असोत हिशोब देणेघेणी,
मन मोकळं करायला —
हव्यात हक्काच्या मैत्रिणी!
तुझी शिस्त—माझी रीतभात,
तुझा थाटमाट–माझा साज,
असु देत थोडी ऊणीदेणी,
मन मोकळं करायला—
हव्यात हक्काच्या मैत्रिणी!
तुझी दुखणी–माझा आजार,
तुझे लंगडणे–माझे धडपडणे,
असतील काही रडगाणी,
मन मोकळं करायला —
हव्यात हक्काच्या मैत्रिणी!
तुझे रुसणे—माझे रागावणे,
तुझा अबोला–माझे मौन,
करायला लागेल मनधरणी,
मन मोकळं करायला —
हव्यात हक्काच्या मैत्रिणी!
तुझा छंद–माझा आनंद,
तुझी आवड–माझी निवड,
जपुया कायम आठवणी,
गाऊया गोड गाणी,
मन मोकळं होईल—
असतील जर हक्काच्या मैत्रिणी!
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈