मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पालवी…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पालवी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

माझ्या रानात,रानात

तुझ्या झाडाची पालवी

गर्द सावल्या,सावल्या

माझ्या मनाला झुलवी

 

जस सपान, सपानं

एक असाव घरटं

दोन पाखरं,पाखरं

गुज प्रेमाच चावट.

 

गं तुझ हिरवं लेण

माझ्या काळजात ठाण

काळी पांघर हलते

तुला जल्माचीच आण.

 

वारा धावतो,धावतो

सुसाट पिसाट खुळा

वर आभाळ,आभाळ

चुंबते ओढ्याच्या जळा.

 

आता बांधात,बांधात

सळसळ चाल धुंद

झाली चाहुल-चाहुल

सांज येळची ही मंद.

 

पुन्हा भेटशी भेटशी

अशी दुपार वकत

तुझ्या पालवीत जीव

आयुष्य गेले थकत..

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #181 ☆ यादवी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 181 ?

☆ यादवी… ☆

नको झोपताना उगा यादवी

इथे श्वास गातात रे भैरवी

 

पतीदेव मानून भजते तुला

तुझे वागणे का असे दानवी

 

प्रशंसा करावी अशा या कळ्या

स्वतःची न गातात त्या थोरवी

 

जरी रुक्ष आहे इथे खोड हे

जपे ओल शेंड्यावरी पालवी

 

किती विरह रात्री धरा सोसते

सकाळी धरेला रवी चाळवी

 

प्रकाशा तुझा चेहरा देखणा

हवा तीव्र होता दिवा मालवी

 

पहाटे पडावा सडा अंगणी

अपेक्षा इथे मातिची वाजवी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘बाई आणि मुलं ’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘बाई आणि मुलं ’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मुलं विसरतात आईला

मुलं विसरतात बाईंना…… 

 

कोणे एके काळी, 

जी त्यांच्यासाठी आणतात फुलं

शिक्षकदिनाच्या दिवशी.. 

आणतात केक 

वाढदिवसाच्या दिवशी…… 

 

लिहितात ‘माझे आवडते शिक्षक’ विषयावरचा निबंध.                                       

डोळ्यांतून ओसंडतो

भक्तिभाव त्यांच्यासाठी…… 

 

करतात वर्णन आईजवळ

त्यांच्या ‘कित्ती कित्ती

सुंदर शिकवण्याचे,

पुस्तकापलीकडची आयुष्यभराची 

शिदोरी दिल्याचे’…… 

 

कधी कधी 

वयस्क असूनही

तशा न दिसण्याचे…… 

 

‘सेंड ऑफ’च्या दिवशी

डिश संपवून जाताना

पाया वगैरे पडतात

कोणी कोणी थांबून

गिफ्ट बिफ्ट देतात…… 

 

मग परीक्षा होतात..

रिझल्ट लागतात..

वर्षे उलटतात..

कॅलेंडरे बदलतात..

लग्ने वगैरे सुद्धा होतात

एखाद-दुस-याची आमंत्रणेही येतात…… 

 

कधी तरी कोणी भेटतं

रस्त्यातच वाकून पाया पडतं

कधी तरी कळतं

अमकी परदेशी गेली

तमका सायंटिस्ट झाला

तमकी डॉक्टर झाली

तमका ॲक्टर झाला….. 

 

बाई थकतात

फोनच्या रिंग्ज 

वाजेनाशा होतात

बाई कुठेतरी नाव वाचतात

मा. अमुक.. सुप्रसिद्ध तमुक..

बाई फोन नंबर शोधतात

मिळाला नाही तर मिळवतात

मेसेज की फोन.. विचार करतात…. 

 

तिकडची रिंग वाजत रहाते

“येईलच फोन त्याचा उलट!”

बाईंना वाटत रहाते

किती जाईल हरखून,

करेल चौकशी भरभरून,

आठवतील वर्गातले सगळे हास्यविनोद

त्यालाही फिरून फिरून!

म्हणेल, “आता भेटायलाच येतो

बायकोला दाखवायला आणतो.”

बेल वाजल्याचे भास होतात

बाई कितीदा तरी फोन बघतात….. 

 

तास, दिवस, वर्षॆ उलटतात

अनेक काळे केस पांढरे होतात…

मग कुठल्याश्या वृत्तपत्राच्या कोप-यात

श्रद्धांजलीच्या रकान्यात

लहानशा चौकोनात

येते छापून – ज्येष्ठ.. प्रसिद्ध वगैरे

यांचे दु:खद निधन झाल्याचे

बाईंचा काळापांढरा फोटो

आणि मागे कोणी नसल्याचे….. 

 

मग घणघणू लागतात फोन हातातले

याचे त्याला, त्याचे याला

कोणाकोणाचे कोणाकोणाला

‘किती छान शिकवायच्या बाई!

किती कडक होत्या बाई

तरी किती हसवायच्या बाई!’

कोणाकोणाला आवंढे येतात

कोणाच्या डोळ्यात अश्रू येतात

कोणीकोणी तर ढसाढसा रडतात…

 

कोणी एक घरी जातो

बाईंच्या फोटोला हार घालतो

उदास तसाच बसून राहतो…. 

 

भिंतीवरच्या फोटोत

आता बाई शांत असतात

त्यांच्या पिंडाला लगेच

कितीतरी कावळे शिवतात…. 

लेखिका :  संजीवनी बोकील

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंतोत्सव… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंतोत्सव… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

 

नवचैतन्ये वसंत नटला

तरुवेलींचा सुगंध सुटला ||धृ ||

 

      ‌ बहावा तरी सुंदर सजला

       पर्णपाचुतुनी बहरु लागला

       पीतफुलांनी डोलत सुटला

       पांथस्थांना खुणवु लागला ||१||

 

गुलमोहराच्या पायघड्यांनी

रस्ता सारा मखमली बनला

रक्तवर्ण हा तळपु लागला

ग्रीष्मासंगे फुलुनी आला ||२||

 

       पळस,पांगिरा,फुलांनी नटला

       हिरव्या कोंदणी ,ठसा उमटला

       मनासी वेधत,खुलवु लागला

       संगतीने ग्रीष्मात हरवला ||३||

 

आम्रतरुही मोहरुनी आला

कैरीफळांचे तोरण ल्यायला

कोकिळ कूजनी रंगुनी गेला

आमराईचे भूषण बनला ||४||

 

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 123 ☆ कृष्ण देव आठवतो… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 123 ? 

कृष्ण देव आठवतो

(अष्टअक्षर..)

 

मज आवडे एकांत, नको वाटतो लोकांत

वेळ पुरेसा मिळता, होई जप भगवंत.!!

 

मज आवडे एकांत, कृष्ण देव आठवतो

रूप त्याचे मनोहर, मनी माझ्या साठवतो.!!

 

मज आवडे एकांत, क्षण माझा मी जोपासे

धूर्त ह्या जगाची कधी, भूल पडे त्याच मिसे.!!

 

मज आवडे एकांत, शब्दाचे डाव मांडतो

नको कुणा व्यर्थ बोल, मीच मला आवरतो.!!

 

मज आवडे एकांत, राज हे उक्त करतो

शब्द अंतरीचे माझे, प्रभू कृपेने लिहितो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 54 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 54 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

१०२.

मी तुला ओळखतो अशी घमेंड मी लोकांत

मिरवत असे.

माझ्या कलाकृतीतून ते तुझीच प्रतिभा पाहात असत.

‘कोण आहे तो?’ मला येऊन ते विचारत, त्यांना काय सांगावं? ‘खरंच! मला सांगता येत नाही.’

ते मला दोष देत, कुचेष्टा करत निघून जात.

तू मात्र हसत बसत असायचास.

 

तुझ्या कथा मी चिरंतन गीतात सांगत असे.

माझ्या ऱ्हदयातील गुपित त्यात उमटत असे.

ते म्हणत, ‘ याचा सर्व अर्थ मला सांगा.’

त्यांना काय सांगावं मला समजत नसे.

मी म्हणायचो,’त्याचा अर्थ काय कुणास ठाऊक!’

कुचेष्टा करत हसत ते निघून जात.

तू मात्र तिथंच हसत बसून राहायचास.

 

१०३.

तुला केलेल्या एकाच नमनात,हे परमेशा,

माझ्या वृत्ती प्रकट होवोत आणि

तुझ्या पायाशी असलेल्या या जगाला स्पर्श करोत.

 

वर्षाव न झालेल्या पाण्यानं वाकलेल्या

जुलैच्या ढगाप्रमाणं या एकाच नमस्कारात

माझ्या वृत्ती तुझ्या दाराशी नम्र होवोत.

 

एकाच माझ्या नमनात विविध स्वरांनी युक्त

माझी सारी गीतं, एकाच प्रवाहात सामील होवोत,

शांत सागरात विलीन होवोत.

पर्वत शिखरावरील आपल्या घरट्याकडे रात्रंदिवस गृहविरहानं व्यथित झालेल्या बगळ्यांच्या समूहाप्रमाणं माझी जीवनयात्रा

एकाच नमनात तुझ्या शाश्वत घराकडे

प्रवास करो.

 – समाप्त – 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ रूप ग्रीष्माचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ रूप ग्रीष्माचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

चैत्र वैशाख महिन्यात

सूर्याची प्रखर उष्णता

रात्र छोटी दिवस मोठा

ग्रीष्माची चाहूल लागता

 

आग ओकतो नारायण

वाढे पृथ्वीचे तापमान

झळा घेऊनी येतो वारा

ग्रीष्माचे होता आगमन

 

रंगीत फुलांचे ताटवे

सुगंधाचा दरवळ

कोवळी पालवी फुटते

कुहू कुहू गातो कोकिळ

 

आम्रतरू मोहरतात

गुलमोहर बहरतो

देतात सावली थंडावा

अंगणी मोगरा फुलतो

 

ग्रीष्माचे रूप मनोहर

येतो रंगीत रूप घेऊन

रणरणत्या उन्हातही

पावसाची आस ठेवून

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चिऊ…☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ चिऊ… ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆

चिमुकली  ती चिऊताई

झेपावते खिडकीपाशी

इकडे तिकडे बघे क्षणभरी

मारून चोच मला खुणवी

 

थोडे दुर्लक्ष माझे जरी

जवळ मारते उड्या भारी

कामात गर्क मीअसे जरी

हळूच छान चिवचिव करी

 

येई  क्षणात झाडावरूनी

घेत भरारी येई परतूनी

तिला भिती खुप गोंगाटाची

मात्र स्वच्छतेवर  अतिप्रिती

 

पिते उन्हात नळातील पाणी

सुंदर प्रतिबिंब मजेत पाही

दाणे टिपून घेत भर्रदिशी

पकडते नाजूक फांदी

 

लपतछपत पानोपानी

माझ्या भोवती घाले घिरटी

तिचे येणे असे दिवसाकाठी

आनंदाचा झरा माझ्यासाठी

 

© सौ. मुग्धा कानिटकर

सांगली

फोन 9403726078

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दगडावर बीज रूजविले – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?दगडावर बीज रूजविले – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

प्रचंड  मोठ्या दगडाच्या

मुळे रोऊनी छातीवरती

ताठ  मानेने न्याहाळतो

खाली पाणी निळाई वरती

 दगडावर बीज रूजविले

 त्याच्यावर धरून सावली

 बेचक्यात  जपली तयाने

 माझ्यापुरती मातीमाऊली

 जन्म  कुणाचा कुठे असावा

नसतेच कधी कोणा हाती

 पण जन्माचे सार्थक  करणे

 असते आपुली वापरून मती

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वास्तु देव… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ. मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ वास्तु देव… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

दिस आज, दीन झाले

उदास मी, हा तिष्ठतो

रिकाम्या घराचे ओझे

ओणव्याने रे सोसतो

 

शेतीवाडी टाकून तू

कुठे बरे, विसावला?

वास्तुपुरुष मी, माझा

संग तू कसा सोडला?

 

खरे तुझे, दारिद्र्य हे

इथे आज पसरले

लक्ष्मी, सरस्वती अशी

रुसली ते, बिनसले.

 

कर तयांची प्रार्थना

ज्ञानाची धरून कास

कृपा करी अन्नपूर्णा

मनी असावा विश्वास

 

आहे मी, इथेच असा

प्राण आणून डोळ्यांत

परतुनी ये मानवा

खरा मोद, निसर्गात

 

पुन्हा एकदा होऊ दे

गोकुळ आपले घर

कोकणात चैतन्याची

एकवार येवो सर

 

आंबा, सुपारी, फणस

माड, भात, काजूगर

शिवार, सडा फुलू दे

वाडीत दशावतार

 

हसावी, लाट किनारी

फेर धरी रे नाखवा

मातीच ती कोकणाची

धाडेल, तुला सांगावा.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares