मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चैत्रपालवी… भाग – १  + संपादकीय निवेदन – सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “दुर्वांची जुडी “ या नव्या कथासंग्रहाचे प्रकाशन दि. ०६/०४/२०२५ रोजी शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे करण्यात आले. वीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मा. ममता सकपाळ यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. (प्रकाशक:अमित प्रकाशन)

या नव्या कथासंग्रहाबद्दल आपल्या सर्वांतर्फे राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच अखंड साहित्य सेवेसाठी असंख्य शुभेच्छा.

आजच्या आणि उद्याच्या अंकात वाचूया या नव्या संग्रहातली एक कथा चैत्रपालवी – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ चैत्रपालवी… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

गॅलरीतून दूरवर दिसणाऱ्या त्या निष्पर्ण झाडाकडे नंदा कितीतरी वेळ पहात होती. दिवस सरत्या हिवाळ्यातले असले तरी उन्हातलं ते निष्पर्ण झाड अगदी भकास दिसत होतं. एखाद्या सुकलेल्या काड्यांच्या खराट्या सारखं. भासत होतं. त्या झाडाकडे पाहता पाहता नंदाच्या मनात आलं, “आपलंही आयुष्य असंच आहे. भकास, निष्पर्ण, शुष्क, ओलावा नसलेलं.

आजूबाजूला अनंत गोंधळ होते. वाहनांची वर्दळ होती. हॉर्न चे आवाज होते. समोरच्या मैदानात मुले खेळत होती. कोणाचे मोठ्याने बोलण्याचे ही आवाज होते. हसणे, ओरडणे, सारं काही होतं. खरं म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात नकळत एक ऊर्जा असते. हालचालीतलं चैतन्य असतं. पण नंदा, या क्षणी तरी या वातावरणाचा भाग होऊच शकत नव्हती. जणू काही तिचं सारं अस्तित्व, त्या दूरच्या पानं गळून गेलेल्या बोडक्या झाडाशीच बांधलेलं होतं. कुठेतरी तिच्या अंत:प्रवाहात एक लांबलचक कोरडा उसासा फिसकारला.

ती घरात आली आणि पुन्हा एका शून्यात हरवली. भिंतीवर कोलाज केलेली अनेक छायाचित्रे होती. दोघांची. ती आणि श्रीरंग. दोन हसरे, आनंदी चेहरे. घट्ट प्रेमाने बांधलेले, मिठीत विसावलेले, हातात हात धरलेले. जणू एक गाढ भावनेचा प्रवाहच त्या भिंतीवर या स्वरूपात दृश्यमान होता. फोटोतला नदीचा किनारा, फेसाळलेल्या लाटा, पौर्णिमेचा चंद्र, नारळाची गर्द झाडी, पाण्याने वेढलेल्या खडकावर बसलेल्या तिचा निवांत चेहरा. हे नुसतेच फोटो नव्हते, त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे बंदिस्त क्षण होते.

एकमेकांबरोबर आयुष्याला सुरुवात करताना किती नादमय होतं सारं! नंदा आणि श्रीरंग सारखं जोडपंच नसेल कुठे? सौंदर्य, आरोग्य, बुद्धी, पैसा सारं काही होतं. कशाचीच उणीव नव्हती. पण बेभानपणे आयुष्य जगत असताना, कुठेतरी जीवनातला पोकळपणा नकळतच आजकाल जाणवायला लागला होता. काही प्रश्न सभोवती झडत होते.

“काय नंदा? संपलं नाही का तुमचं फॅमिली प्लॅनिंग? किती दिवस दोघे दोघेच राहणार? येऊ देत की आता बालपावलांची दुडदुड. “

कधी तिची आईच म्हणायची,

” लवकर विचार करा बाबा! आता आमचीही वय होत चालली आहेत. अधिक उशीर झाला तर आमच्याकडूनही काही होणार नाही बरं! आणि हे बघ प्रत्येक गोष्टीचं वय ठरलेलं असतं बरं का! आता उशीर नका करू, मग पुढे अवघड जाईल. निसर्गाचे काही नियम असतात. “

कोणी बोललं म्हणून नव्हे, पण नंदाला तिच्या स्वतःच्या देहाबद्दल आजकाल काहीतरी परकेपणा जाणून लागला होता.

त्यादिवशी बागेतल्या कुंड्यांना पाणी घालत असताना तिला जाणवलं, ही सदाफुली फुलली आहे, मोगऱ्यालाही वेळेवर फुले येतात, गुलाब उमलतात, घाणेरी सुद्धा सदाबहार असते, पण ही जास्वंदी? हिरवीगार, टवटवीत, भरपूर पान असूनही आजपर्यंत हिला एकदाही एकही फुल आलं नाही. असं का? मग तिने ठरवलं, आता विशेष लक्ष देऊन या झाडाला खत पाणी घालायचं. पण या विचारा बरोबरच एक उदासीनता तिच्या मनाला घट्ट पकडून राहिली.

या विषयावर व्हायला हवी तशी चर्चा त्या दोघांमध्ये आजपर्यंत झाली नव्हती. कदाचित दोघेही, कुणी कुणाला दुखावू नये म्हणून मुद्दामहून हा विषय टाळत असावीत. पण एक लक्षात आलं होतं की कसलेही अवरोधन वापरत नसताना ते का घडू नये? 

सुरुवातीला माणसं नाकबुलीमध्ये मध्ये असतात. आशावादी असतात. ‘होईल की. एवढी काय घाई आहे?’ याही विचारात असतात. पण मग असा एक क्षण येतो की तो शक्याशक्यतेच्या पलीकडे घेऊन जातो. माणसाला खडबडून जागा करतो. आणि गडद अंधारातही ढकलतो.

श्रीरंग तसा फारसा गंभीर नसावा. पण नंदाच्या उदासीनतेकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. अखेर त्यांनी दोघांनी वैद्यकीय सल्ला घ्यायचा ठरवले. तोही काळ नंदाला खूप कठीण गेला. दोष कुणात असेल? तिच्यात दोष निघाला तर त्यांच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल? श्रीरंग नक्की कसा रिऍक्ट होईल? समजून घेईल की दुरावेल?या अपूर्णतेचा तो कसा स्विकार करेल? प्रेमाचं सहजीवन यांत्रिक होईल की आणखी भलतंच काही सोसावं लागेल? या विचारांनी नंदा पार विस्कटून जायची. आणि समजा, दोष श्रीरंग मध्ये निघाला आणि तो डिप्रेशन मध्ये गेला तर? सगळंच अनाकलनीय आणि अस्वस्थ करणार होतं.

श्रीरंग मात्र नंदाला म्हणायचा “नको इतका विचार करूस. काहीतरी मार्ग निघेल. आणि अगं! मुल झालंच पाहिजे या विचारापासूनच थोडी दूर जा की. जीवनात इतर आनंद नसतात का?”

असं कसं बोलू शकतो हा? स्त्री आणि मातृत्व यांचं अतूट भावनिक नातं याला समजत नाही का?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चौफेर, नाना प्रकारच्या टेस्ट्स दोघांच्याही झाल्या. डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तर देतानाही कधी कधी मन खचायचं.

पण वैद्यकीय चाचण्यांमधून काहीच निघाले नाही. डॉक्टर म्हणाले, ” व्यंधत्वाचे कुठलेही दोष शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर दोघांतही नाहीत. तुम्हाला मूल न होण्याचं तसं वैज्ञानिक कारण काहीच नाही. “

” मग?”

त्यानंतर डॉक्टर म्हणाले,

” काही वेळा वाढतं वय, मानसिक स्थिती, थकलेपण, ताण-तणाव, दडपण याचाही परिणाम होऊ शकतो. जितकी लैंगिक उत्कटता असायला हवी तितकी नसते. आजकालच्या पीढीची ही समस्याच आहे. पण निराश होऊ नका. शास्त्र खूप पुढे गेले आहे आता. आपण काही प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रयत्न करू शकतो. म्हणजे इन्सेमिनेशन, आयव्हीएफ, यु आय आय वगैरे. विचार करा आणि पुन्हा भेटा. “

खरोखरच हे सगळं मानसिक दृष्ट्या खूप त्रासदायक होतं. अवघडवून टाकणार होतं. प्रगत शास्त्राच्या उपयोगालाही मर्यादा असतातच. शक्याशक्यताही असतातच. सारं कितीही अवघड असलं तरी याही प्रवाहात जाण्याचं नंदा आणि श्रीरंग ने ठरवलं.

आशावाद नव्हता असंच नाही. पण एक डोंगराएवढं ओझं होतं मनावर. शरीराच्या व्यथेपेक्षा मनाची व्यथा खूप मोठी होती. भावनांचे प्रचंड चढउतार होते. कमतरता, उणीव, काहीतरी नसल्याची जी भावना असते ना ती खचवून टाकणारी असते. सुखाची पानगळच असते ती.

यामधला एकच, अत्यंत सकारात्मक भाग म्हणजे दोघांमधलं नातं! ते अधिक घट्ट होत होतं. दोघंही एकमेकांची मनं जपत होते. पण त्यातही एक होतं की नंदाची मानसिक पडझड जास्त होत होती. श्रीरंगला तेही जाणवत होतं.

त्यादिवशी प्रधानांच्या आजी बोलता बोलता नंदाला सहज म्हणाल्या,

” का ग? तुमच्या पत्रिकांमध्ये एकनाड योग आहे का?”

“म्हणजे?” नंदाने विचारले.

” म्हणजे पत्रिकेत दोघांचीही अंत्यनाड असेल तर मुलं होण्यास बाधा येऊ शकते. कितीही प्रयत्न केले तरी मुल होत नाही, असं म्हणतात. “

नंदाने जेव्हा श्रीरंगला हे सांगितले तेव्हा तो उसळलाच. आणि ठामपणे म्हणाला,

” या कशावरही आपण विश्वास ठेवायचा नाही. लोकांना म्हणावं आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. “

पण असं होत नाही ना?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आज दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी परशुराम जन्मोत्सव आहे. — त्यानिमित्ताने सादर.) 

|| कराभ्यां परशुं चापं दधानं रेनुकात्मजम ||

|| जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम || १ ||

*
|| नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम || 

|| मोचिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनं || २ || 

*
|| भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम || 

|| गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम || ३ ||

*
|| वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम || 

|| तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम || ४ || 

*
|| परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनुः || 

|| रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम || ५ || 

*
|| शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं || 

|| रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ || 

*
|| मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं || 

|| य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||

*
॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीपरशुरामस्तोत्रं संपूर्णम् ॥

☆ ☆ ☆ ☆

☆ श्री परशुराम स्तोत्र : मराठी भावानुवाद  ☆

रेणुका तनय धनुर्धारी हाती परशु धारिला

जामदग्नी भार्गव रामा नमन क्षत्रियसंहारकाला ॥१॥

*
भार्गव रामासी वंदन रेणुकाचित्तनंदना नमन

मातृसंकट विमोचक अद्भुत क्षत्रियांचा विनाशन ॥२॥

*
दक्ष भयभीत स्वजनांस्तव दक्ष धर्मा रक्षित 

प्रिय गतवर्गासी वीर जमदग्नी जिवलग सुत ॥३॥

*
महादेवा केले वश दृप्तभूप कुलाचा नाश

तेजोमय कार्तवीर्य संहारक करी भवभयनाश ॥४॥

*
दक्षिण करात परशु धरिला वाम हस्ते धरी धनू

भृगुकुलवंशज रमणीय मनोहारी घनश्याम तनू ॥५॥

*

शुद्ध बुद्ध महाप्रज्ञावान पण्डित रणधुरंधर

श्रीदत्तकरुणापात्र राम विप्रगणांचे करी रंजन ॥६॥

*
चिरंजीव पावन पंथे शोषितो अंश सागराचा 

जपतो जो राम नामासी प्रसाद तया कार्यसिद्धीचा ॥७॥

*

॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचित निशिकान्त भावानुवादित श्रीपरशुरामस्तोत्र संपूर्ण ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ It’s a Pause, Restart…! ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

It’s a Pause, Restart…!  ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

रोहिणी सकाळी नेहमीप्रमाणे उठली. तिच्या अगोदरच तिचा पती विनोद उठला होता. बेडरूमचे दार उघडून ती स्वयंपाक घरात गेली. विनोद सकाळचा चहा एक एक घोट घेत मोबाईल बघत बसला होता. ती उठून आलेली पाहून विनोदने तिला विचारले, ” तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे ? विनोद कोणत्या गोष्टीविषयी विचारतो हे तिला अजिबात लवकर लक्षात आले नाही. ती काहीच न बोलता ब्रश करायला निघून गेली.

नंतर त्याच्यासमोर असलेल्या खुर्चीत, एक-दोन मिनिटे ती शांत बसून राहिली. आणि मग तिला थोडंस लक्षात आले की त्याला कशाविषयी बोलायचे आहे ते. रात्री काय घडले होते हा विचार ती करु लागली. मग तिला लक्षात आले की, त्याने रात्री तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला होता पण तिने त्याचा हात बाजूला काढून टाकला होता. काय बोलावं या विचारात होती. थोडी भानावर आली आणि म्हणाली,

”तुझा तो हात घट्ट मिठी मारुन झोपणे या हेतूने नव्हता, तर तो डायरेक्ट स्तनाकडे गेला होता. मग मला वैताग आला आणि तो हात मी झिडकारून लावला. मी अशी का वागले किंबहुना बऱ्याच वेळा मी अशी का वागते, हेच तुला विचारायचा आहे ना ? 

“होय मला हेच जाणून घ्यायचं आहे! ”तो उत्तरला.

ती त्याला शांतपणे म्हणाली, ”मी तुला खूप वेळा सांगितलं आहे. मला हल्ली इच्छा होत नाही. मला काही वेळा संभोग नकोसा वाटतो. मला फक्त जवळ घेऊन, मिठी मारून झोपलेलं आवडतं. पण तू डायरेक्ट लैंगिकतेकडे जातोस. तेव्हा मात्र मला खूप इरिटेशन होतं. जेव्हा मला नको असते तेव्हा मी तुला बाजूला सारते. शिवाय माझी रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही. अधून मधून सारखी जाग येते. मला वाटतं या विषयावर आपण खूप वेळा बोललो आहोत. त्याच त्याच विषयावर मला परत परत बोलायची इच्छा नाही. ” 

“अगं पण बरेच दिवस झाले ना..! हे ऐकल्यावर ती चिडली. ती रागाने म्हणाली, ”अरे, तीन चार दिवसच तर झाले आहेत. ”

“मला इच्छा झाली पण तुझी इच्छा नसेल तर मग मी काय करावं? “ तो वैतागून म्हणाला 

ती ओरडून रागाने त्याला म्हणाली, “ थोडा संयम ठेवायला शिक. तुझ्या हाताचा वापर कर. शीss सकाळी सकाळी माझ्या डोक्याला ताप देऊ नको. तुला जो हवा तो मार्ग तू काढू शकतोस. या गोष्टीवर मला वाद घालायचा नाही. मी तुला खूप वेळा सांगितलेलं आहे की मला जेव्हा इच्छा नसते तेव्हा मी तुझ्याशी संभोग करू शकत नाही That’s it. ”

असे म्हणून ती रडू लागली. तेव्हा त्याला जाणवले की ही खूपच काहीतरी गंभीर गोष्ट आहे. ती कोणत्यातरी अडचणीतून जात आहे. आज पर्यंत, लग्नाला 24 वर्षे झाली. नोकरी, घर, मुलांच्या शाळा सगळ्या गोष्टीला हिंमतीने तोंड देणारी, स्वतःचं मुलांचं जगणं आनंदमय करणारी रोहिणी आज-काल अशी का वागत असावी ? हा प्रश्न त्याला पडला होता. काहीतरी अडचण आहे याची त्याला जाणीव झाली.

तो उठला. त्याने लगेच तिला जवळ घेतले आणि विचारले, ” रोहिणी तुला नेमकं काय होतंय? सांगशील का मला प्लीज. मलाही त्रास होतो ग रोहिणी. आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ”

तिच्या डोळ्यातून झरझर पाणी ओघळत होते. आणि ती बोलू लागली, “अरे, मला हल्ली खूप एकटं वाटतं. अचानक गरम होतं, घाम सुटू लागतो. हात पाय दुखतात, पायात गोळे येतात. अचानक रडू येतं, खूप चिडचिड होते, राग अनावर होतो. काही करण्याची इच्छा होत नाही. अधून मधून सारखं इरिटेशन होतं. झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठावसं वाटत नाही. बऱ्याच वेळा डोक दुखतं. अंगात हॉट फ्लसेस आल्यासारखे वाटतात. अगोदर सारखी संभोगाची इच्छा होत नाही. कधी कधी छातीत दुखतं, कधी कधी खूप धडधड जाणवते रे विनोद. काय काय आणि किती किती सांगू तुला ?” तिचे हुंदके चालूच होते.

“मधे एकदा तुला न सांगताच ऑफिस मधून मी डॉक्टरांच्याकडे गेले होते. ब्लड प्रेशर आणि ईसीजी नॉर्मल आहे म्हणाले ते डॉक्टर. विटामिन्सच्या काही गोळ्या लिहून दिल्या. रोज रात्री एक घेते मी त्या गोळ्या. ” बोलता बोलता थोडा वेळ ती थांबली. विनोद शांतपणे तिचं सगळं ऐकत होता. थोडा वेळ गेल्यावर डोळे पुसत अचानक म्हणाली,

“आईसारखं आपल्याला कोणीतरी मायेनं, आपुलकीनं जवळ घ्यावं असं मला वाटतं.. अंगात वाटतो तसा मनातही खूप कोरडेपणा जाणवतो. रात्री अचानकच खूप घाम येतो खूप गरम होऊ लागते. मला भिंती वाटते रे विनोद..!

“काय करू सांग ना ? मी रोज व्यायाम करते. सूर्यनमस्कार घालते. मेडिटेशन करते. पण तरीही काही फरक जाणवत नाही. ” 

हे ऐकून विनोद म्हणाला, “रोहिणी माझं ऐक आपण Psychiatrist/मानसरोग तज्ञांच्या कडे जाऊया. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. काही काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे.”

त्याच दिवशी संध्याकाळी ते दोघेही सायकियास्ट्रीस्ट कडे गेले. सायकियास्ट्रीस्ट दोघांशी बोलतात. आणि म्हणतात, ” तुम्हाला झोप लागावी यासाठी आपण काही दिवसांसाठी औषध देऊ शकतो पण तुम्हाला जाणवणारी ही सगळी लक्षणं रजोनिवृत्तीशी म्हणजेच menopausal symptoms शी निगडीत आहेत का हे पहावं लागेल. मला वाटतं ही सगळी लक्षणं, तुमच्या वयाचा विचार करता मेनोपॉजशी निगडित आहेत असे मला वाटते. बाकी तुमच्या मनाची अवस्था खूप काही अडचणीची आहे असे मला वाटत नाही. ”

असे म्हणून त्या डॉक्टरांनी त्या दोघांना स्त्रीरोगतज्ञ/ gynecologist ना भेटण्याचा सल्ला देतात. आणि गायनॅकॉलॉजिस्टनी कन्फर्म केल्यानंतर आपण सायकोथेरपीची मदत घेऊ शकतो असे ते सांगतात.

दुसऱ्या दिवशी रोहिणी आणि विनोद दोघेही gynecologist कडे जातात. रोहिणीची सगळी लक्षण डॉक्टर ऐकून घेतात.

“रोहिणी तुझं वय काय म्हणालीस ? 

“50years मॅडम..

Menstrual cycle म्हणजे तुझे periods regular आहेत?

“नाही मॅडम, कधी चार महिन्यांनी, कधी तीन महिन्यांनी, कधी सहा महिन्यांनी, खूप irregular आहेत. ”

“तुला ब्लड प्रेशर चा त्रास किंवा शुगर वगैरे काही आहे ?

“अजून तरी नाही मॅडम..

“काही काळजी करू नकोस ही सगळी लक्षणं Premenopausal symptoms ची वाटतात. ”

बाकीच्या काही अडचणी नाहीत ना हे बघण्यासाठी आपण सोनोग्राफी करूया आणि काही ब्लड टेस्ट करून घेऊ. चालेल..!

“हो मॅडम करून घेऊया आपण सगळं..

रजोनिवृत्तीच्या काळात जी अनेक लक्षणं दिसून येतात त्याची सगळी माहिती डॉक्टर, रोहिणीला देतात.

45 ते 55 हा स्त्रियांच्या आयुष्यातला रजोनीवृष्टीचा काळ असतो. Menopause/ रजोनिवृत्ती इस्ट्रोजनच्या पातळीत घट झाल्यामुळे निर्माण होणारा नैसर्गिक बदल आहे. अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्सज्, सतत स्नायू दुखणे, हाॅट फ्लशेस, थकवा आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या रजोनिवृत्तीत प्रत्येक स्त्रीला जाणवतात.

Estrogen संप्रेरकाची पातळी कमी झाल्यामुळे, योनीत कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे कामेच्छा कमी होते. घटत्या इस्ट्रोजेन पातळीमुळे अस्वस्थता निर्माण होते. शरीराच्या तापमानात सतत चढ-उतार झाल्यामुळे काही वेळा अचानक गरम वाटते. आणि रात्री घाम फुटतो. त्वचेला खाज सुटते. यामुळे म्हणावी तशी रात्रीची झोप पूर्ण होत नाही. दिवसा थकवा जाणवतो. वारंवार विश्रांती घ्यावीशी वाटते. झोप जितकी कमी होईल तितके जीवनातील गोष्टी आणि घटना लक्षात ठेवणे कठीण होते. त्यामुळे काही गोष्टी विसरतात हे जाणवू लागते.

रोहिणी प्रश्न विचारते, “मॅडम यापुढे हे असेच चालू राहणार का, की यातून मलि बाहेर पडता येईल?

“रोहिणी आणि विनोद हे पहा, हा काळ प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळा असतो. पण साधारणतः दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतचा काळ हा menopausal symptoms चा काळ धरला जातो. Mild to moderate सौम्या ते तीव्र अशा प्रकारची लक्षणे यात दिसू शकतात. शारीरिक, मानसिक, भावनिक या सर्व गोष्टीवर योग्य काम करून आपण या काळात जाणवणारे चढ-उतार योग्य प्रकारे मॅनेज करू शकतो. यासाठी हार्मोनल थेरपी शिवाय कौन्सिलिंग, सायकोथेरपी या गोष्टींचा वापर करता येतो.”

“पण मॅडम, हे सगळं कधीपासून चालू करायचं.?”

“तुला जे होतंय ते काय होतं, आणि ते कशामुळे होतं हे आता तुला लक्षात आले आहे. त्यातून तू हळूहळू मार्ग काढत जाशील. लक्षणं खूप तीव्र झाली तर काय करायचं ते आपण नंतर ठरवू! ”

नंतर डॉक्टर त्या दोघांना Premenopausal, menopausal, Postmenopausal याविषयी माहिती सांगतात. तसेच पूर्ण बारा महिने जेव्हा मासिक पाळी येत नाही त्यानंतरच आपण रजोनिवृत्ती झाली असं म्हणू शकतो हे नमूद करतात. अधूनमधून कधी कधी ब्लीडिंग, स्पाॅटींग होऊ शकतं तेव्हा घाबरायचं नाही तसेच एक- दोन वर्षातून एकदा pap smear ची test स्वतःच्या सवडीने करण्याचा सल्ला देतात.

संतुलित आहार, दररोज व्यायाम, स्वतःच्या छंदासाठी काही वेळ, मित्र-मैत्रिणींशी संवाद, आपल्या आवडत्या कामात रममाण होणे, जीवनशैलीत योग्य प्रकारे बदल करून आपण ही लक्षण कमी करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींसाठी कौन्सिलर आणि सायकोथेरपीस्ट यांचा उपयोग कसा करून घ्यायचा असा सल्ला देतात. गरज पडली तर असावे म्हणून रोहिणी आणि विनोद यांच्या आग्रहास्तव त्यांच्या ओळखीच्या दोन-तीन कौन्सिलरचे फोन नंबर डॉक्टर त्यांना देऊन ठेवतात.

सर्व माहिती ऐकल्यावर रोहिणी, मॅडमना म्हणाली, ” Thank you madam! तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितले. मी स्वतःची काळजी घेईन. काही लागलं तर तुम्हाला संपर्क करेन! ”

विनोद म्हणतो, “मॅडम, मीही तिची काळजी घेईन, आणि मुलांनाही सांगेन, पण मॅडम, ती अगोदर सारखी आनंदी राहू शकेल ना!

डॉक्टर म्हणतात,” हो नक्की, कोणत्याही अडचणीत आपलं जगणं, आणि आपलं सहजीवन आनंदी करणं, सुंदर करणं हे आपल्याच हातात असतं. नाही का ?” 

“It’s a pause, restart yourself Rohini…!

“Vinod take care of her!”

विनोद, रोहिणीचा हात हातात घेतो. दोघेही केबिनच्या बाहेर पडायला निघतात. दोघेही, “Thank you madam” Blood report झाल्यावर परत तुम्हाला आम्ही भेटायला येतो.

बाहेर पडताना रोहिणीच्या मनाला एकच वाक्य साद घालत होते. It’s a Pause, Restart…!

© डॉ. सोनिया कस्तुरे

कस्तुरे आरोग्य केंद्र, सांगली 

9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धक्के पे धक्का… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ धक्के पे धक्का… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

मी माझ्या कौटुंबिक सल्ला केंद्रात बसले होते.. तशी मी नवीनच.. बँकेतून राजीनामा देऊन या आवडीच्या कामात गुंतले होते. माझे शिक्षण वकिलीचे.. पण पटकन बँकेत नोकरीं केली आणि पैशाची गरज म्हणून स्वीकारली.. पण कंटाळा आला लवकरच.. तेच डेबिट आणि क्रेडिट.. लग्न नाही केल.. नको ती गुंतवणूक कोणामध्ये.. सर्वाशी प्रेमाने वागायचं.. अनेक माणसे जोडायची.. अनेक पर्याय समोर ठेवायचे आणि शेवटी… पेन्शन आहे तर छान वृद्धाश्रम पकडायचा… आपल्या वयाच्या माणसात रमायचे.. असे माझे ठरलेले पण….

माझे नाव विजया.. माझी एक सहकारी आहे, म्हंटल तर मैत्रीण म्हंटल तर सहकारी, माझे सगळे टायपिंग करते, शिवाय पोस्टात जाणे, बँकेत चेक जमा करणे इत्यादी.. काही काम नसेल तेंव्हा गप्पा मारते.. ती पण एकटीच आहे… तिने का लग्न केल नाही कोण जाणे.. कदाचित प्रेमभंग झाला असेल किंवा कोणी मनासारखा कोण मिळाला नसेल. मी लग्न केल नाही कारण माझा प्रेमाभंग झाला असे काही नाही.. पण मनासारखा कोणी मिळाला नाही हेच खरे..

माझ्या या कौटुंबिक सल्ला केंद्रात काही पीडित येत.. सल्ला विचारत.. माझा एवढ्या वर्षाचा जगाचा अनुभव आणि वकिलीचे शिक्षण, त्यामुळे बहुतेक मी चांगले सल्ले देत असावी.. पण बरीच मंडळी येत हॆ खरे.

एक दिवस मी आणि माझी सहकारी शांता ऑफिसात बसलेलो असताना माझी बँकेतील जुनी सहकारी लीना आत आली. लीना आणि मी जुहू शाखेत दहा वर्षे एकत्र होतो.. मग तिची बदली झाली आणि भेटी कमी होत गेल्या पण मोबाईलमुळे संपर्क होता.

“अग विजू.. छान ऑफिस काढलंस ग.. मला कुंदा म्हणाली.. गोरेगाव ईस्टला सेंट थॉमसजवळ तू ऑफिस थाटल्याच.. नोकरीं केंव्हा सोडलीस?

“अग हो हो लीने.. किती वर्षांनी भेटतेस? असतेस कुठे?

“मी अजून नोकरीं करते ग.. सध्या माहीम ब्रँचला आहे.. मुलगी कॅनडात गेली जॉबला.. आणि मी एकटीच..

“हो हो… मला आठवण आहे लीने.. तुझा नवरा खुप लवकर गेला ते माझ्या लक्षात आहे, त्यानंतर तू तूझ्या मुलीला धिटाईने वाढवलंस.. सोपं नाही ते.

“मुळीच सोपं नाही.. पण बँकेत नोकरीं होती आणि तुझ्यासारखे सर्व सहकारी मित्र मैत्रिणी म्हणून मुलीला मोठं केल.. ती आर्किटेक झाली आणि तीन वर्षांपूर्वी कॅनडाला गेली पण.. छान नोकरीं मिळाली तिला.

“मग तू नाही गेलीस कॅनडाला?

“ती म्हणते आहे इकडे ये म्हणून.. पण अजून नाही गेले.. नाही जाणार असेही नाही.. शेवटी महिमा म्हणजे माझा जीव आहे, तिला लांब ठेऊन कसे चालेल? नवरा गेल्यानंतर आम्ही दोघी एकमेकांसाठी आहोत.

‘हो, बरोबर आहे ग.. एवढी वर्षे तुम्ही दोघीच ना सतत.. सहज आलीस ना?

‘सहज असं नाही.. तुझा सल्ला हवा होता.. तू हॆ ऑफिस काढलंस. म्हणजे तू सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास पण केला असणार. म

“म्हणजे काय? अग मी लॉ केलय.. बर तुला कसला सल्ला हवाय?

“विजू.. लीना शांताकडे साशंक नजरेने पहात बोलली..

“अग बोल. बोल.. ती आपली मैत्रीणच समज.. शांता तीच नाव.. ती पण एकटी आहे माझ्यासारखी.. मला मदत करते या ऑफिस मध्ये.

‘बर.. मग मी बोलते.. विजू, तुला माहित आहे माझा नवरा मुलगी अगदी लहान असताना गेला… त्यानंतर आईबाबा मागे लागले पण मी लग्न केल नाही.. मुलीला मोठं केल.. शिकवलं.. ती परदेशीं गेली आणि माझी एक जबाबदारी कमी झाली. बाबा गेल्यानंतर आईला माझ्याकडे आणलं.. मग आम्ही तिघ आनंदाने राहिलो.. गेल्या वर्षी आई गेली. माझ्या भावाने आईकडे दुर्लक्ष केल पण मी आईच सर्व केल. आई गेली, मुलगी परदेशी त्यामुळे मी एकटी पडले.

“खरे आहे, सतत सोबत असणारी मानस दूर गेली की फार फार एकटं वाटतं. मग काय केलंस तू?

‘मी नोकरीं करतेच पण बऱ्याच ऍक्टिव्हीटी मध्ये भाग घेते… योगा.. जिम जॉईन केल.

“बर केलंस.. आपली तब्येत चांगली राहते आणि वेळ पण चांगला जातो.

“हो.. आणि माझ्या जिममध्ये मला भेटला कुमार.. डॉ. कुमार.

“अरे वा.. डॉ. कुमार.. मग?

“डॉ कुमार हा सर्जन आहे.. अंदाजे पंचाव्वान वयाचा..

“म्हणजे आपल्याच वयाचा..

“होय.. त्याची बायको तीन वर्षांपूर्वी कॅन्सरने वारली.

“बर.. मग?

“गेले सहा महिने आम्ही एकमेकांना ओळखतो.. त्याने मला मागणी घातली.

“लग्नाची?

“नाही.. लिव्ह मध्ये राहण्याची.

“मग? तू काय उत्तर दिलस? आणि डॉ कुमार तुला आवडतो काय?

“कुणालाही आवडवा असाच आहे कुमार.. हुशार, स्मार्ट, प्रेमळ पण?

“पण तो लग्न करायला तयार नाही..

“का?

“त्याच्या मुलाचं ऑब्जेशन आहे म्हणे?

“त्याला मुलगा आहे? कोण कोण आहे त्याच्या घरी.

“मुंबईत तो एकटाच असतो… त्याचा मुलगा आणि सून सिंगापुरला असतात.

“ठीक आहे.. तूझ्या कुमारला घेऊन ये इकडे.. मी बोलते.

“हो, त्यासाठीच मी आले होते.. तुझं मत घयायला.. तुझा सल्ला हवा मला..

“तुम्ही दोघे येत्या रविवारी दुपारी चारला या.. मी वाट पहाते..

“मी निघते तर..

“अग, अशी कशी जाशील.. माझी मैत्रीणना तू? शांता.. मी हाक मारली. न सांगता शांताने कॉफीचे मग हातात दिले.

मी आणि शांता लीनाची वाट पहात होतो. पण चारच्या सुमारास एका महागड्या गाडीतून एक मध्यम वयाचा माणूस उतरला. आमच्या ऑफिसकडे पहात आत आला. माझ्याकडे पहात म्हणाला..

“मी डॉ. कुमार.. लीनाने सांगितलंच असेल..

मी गडबडले.. हा लीनाचा मित्र.. किती देखणा.. वय लक्षातच येत नाही याच..

“हो.. लीना नाही आली..

“नाही.. लीना म्हणाली तू भेटून ये, ती बोलली आहे सर्व..

“हो हो.. लीना मला म्हणाली.. डॉ. कुमार यांनी मला लिव्ह इन बद्दल विचारलं.

‘हो.. माझी पत्नी तीन वर्षांपूर्वी गेली.. मी डॉक्टर असूनही तिला वाचवू शकलो नाही मी… खरं तर ती पत्नी नंतर आधी मैत्रीण.. गिरगांवात आमच्या चाळीत रहाणारी. त्यामुळे शाळेत असताना पासूनची मैत्रीण. माझ्या मुलाची आई.. ती गेली आणि मी एकटा झालो. विजया, एकटेपणाना फार वाईट असतो.

“हो डॉक्टर, मला कल्पना आहे त्याची.. कारण मी पण एकटीच असते.. एकटीच रहाते..

“का? तुमचे मिस्टर हयात नाहीत?

“मी लग्नचं केल नाही..

“असं का? का बर? तुम्ही देखण्या आहात.. सुशिक्षित आहात.. बँकेत नोकरीं करत होत्या.. कुणी मनासारखा राजकुमार भेटला नाही का?

“तस असेल कदाचित.. लग्न करावेसे वाटलं नाही हॆ खरे..

“बर.. लीना बोलली असेल माझ्या बद्दल..

“हो.. लीना माझी बँकेतील मैत्रीण.. मी असे सल्ले देते हॆ कळल्यामुळे ती माझ्याकडे आली.. लीना म्हणाली तिची तुमची भेट जिममध्ये झाली.

“होय.. जवळजवळ सहा महिने मी तिला पहातोय.. ओळख झाली.. मन चहा कॉफी घेणे झाले.. तिने तिच्या नवऱ्या बद्दल सांगितले आणि एकटीने मुलीला वाढवल्याचे पण सांगितले.. मला तिचे कौतुक वाटले.. मुलगी कॅनडाला गेल्याचे सांगितले.

तेंव्हा मला वाटायला लागले, आता लीना एकटी झाली आहे.. तिला कुणीतरी जोडीदार हवा आहे.. मी पण एकटा आहे.. दिवस हॉस्पिटल, पेशन्ट यात जातो पण घरी येताना एकटेपणा जाणवतो… कुणीतरी ‘दमलास का रे’ म्हणणारी हवी असते. पाणी आणून देणार हक्काच हवं असत.. मला लीना तशी वाटली.. मी तिला विचारलं..

“पण तुम्ही लग्नाचं नाही विचारलात.. लिव्ह इन बद्दल विचारलात.

“हो.. तस दोन्ही एकच असत ना?

“नाही.. लिव्ह इनमध्ये बायकोचे अधिकार नसतात.. फक्त एकत्र राहणे असत.

“बरोबर.. पण मागील संसार असतो ना.. तो मोडता येत नाही. माझा मुलगा आहे, सून आहे.. नातवंड येईल दोन महिन्यात.. त्यामुळे त्यान्च्या अधिकारात अडचण होता कामा नये नवीन लग्नामुळे. त्यामुळे माझा मुलगा, सून म्हणालीत ” तुम्हाला एकटेपणा वाटतोय.. हॆ खरेच.. तुम्हाला पण जोडीदारीण हवी.. पण लग्न करू नका.. लिव्ह इन हा चांगला पर्याय आहे.

“मग लीनाच काय मत आहे?

“म्हणून लीना तुझा सल्ला विचारायला आली होती.. मग ती आपल्या मुलीशी बोलेल.

“ठीक आहे.. मी बोलेन तिच्याशी..

“मग मी निघतो..

“थांबा डॉक्टर, शांता.. “ मी हाक मारली. शांता कॉफीचे मग घेऊन आली. कॉफी घेता घेता मी म्हणाले

“डॉक्टर, तुमच्या मुलाचा फोन नंबर द्या आणि त्याला केंव्हा वेळ असतो? मी बोलेन त्याच्याशी. ” 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती कोण होती ? ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ ती कोण होती ? ☆  सुश्री नीला महाबळ गोडबोले

पंचवीसएक वर्षांपूर्वीची गोष्ट… लेकीचा जन्म अजून झालेला नव्हता.. मी आणि माझे यजमान दोघेच रहात होतो…

नक्की महिना कोणता ते आठवत नाही.. पण पावसाळ्याचे दिवस होते.

बहुतेक रविवार असावा…

यजमानांचा सेमिनार होता… ते दिवसभर बाहेर असणार होते..

सकाळपासून रिपरिपणारा पाऊस नि त्यामुळे झालेलं कुंद वातावरण…

मन उदास झालं होतं… त्यात एकटेपणा..

अपर्णाकडे जायचं ठरवलं.. बरेच दिवस ती बोलावत होतीच..

“जेवायलाच ये “.. तिचा हट्टी आग्रह.. नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं..

बरेच दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता. स्वयंपाकाचं झंझट नव्हतं…

पद्मजा फेणाणींची माझी आवडती कॅसेट लावली.. नि मस्तपैकी सगळी कपाटं आवरून काढली…

स्वयंपाकघर चकचकीत केलं. बरेच दिवस रेंगाळलेलं केस धुण्याचं कामही उरकून घेतलं…

छान तयार झाले.. पर्स घेतली नि बाहेर पडले. दाराला कुलूप लावणार एवढ्यात पुस्तक विसरल्याचं आठवलं.. माझ्याकडचं ” चारचौघी ” हे पुस्तक अपर्णाला वाचायचं होतं. ते घेऊन यायला तिने आवर्जून सांगितलं होतं..

तशीच पुन्हा आत गेले.. कपाटातून पुस्तक काढलं.. पर्समधे टाकलं.. नि बाहेर पडले..

कुलूप लावलं… नि चारचारदा कुलूप ओढून पाहिलं…

खरंतर मी संशयी नाही.. पण कुलुपाच्या बाबतीत मला नेहमी माझाच भरवसा वाटत नाही..

कुलूप व्यवस्थित बसल्याची खात्री करून एकदाची निघाले..

अपर्णाचं घर जवळच असल्याने चालतच गेले.. पावसात मस्त भिजत..

ती वाटच पहात होती.. तिचे यजमान पुण्याला गेल्याने तीही घरात एकटीच होती..

गॅलरीत बसून दोघींनी वाफाळतं टोमॅटो सूप प्यायलं.. वाहत्या रस्त्यावरची रहदारी न्याहाळत..

अपर्णानं मला जेवायला बसवलं नि गरमागरम आलू पराठे तव्यावरून माझ्या पानात वाढले…

माझे आवडते आलू पराठे.. तेही गरम नि आयते. घरच्या लोण्याचा गोळा, कवडी दही,. रायतं, कैरीचं लोणचं.. गृहिणीला अजून काय हवं असतं?

पण सुगरण अपर्णाने मला आवडतो म्हणून ढोकळाही केला होता.. गोड पाहिजेच म्हणून बदाम, केशर घातलेली शेवयाची खीर.. शिवाय पुलाव होताच…

भरपेट जेवण झालं.. खरंतर पोटात इवलीशीही जागा नव्हती.. तरी पोटभर गप्पा झाल्या..

यजमानांचा फोन आला.. तेव्हा संध्याकाळचे सात वाजल्याचं कळलं.. ते अर्ध्या तासात घरी येणार म्हटल्यावर मीही घरी जायला निघाले.. पंधरा मिनिटे पुन्हा दाराशी गप्पांची मैफिल झोडून घराकडे कूच केलं..

घराच्या कोप-यावर पोहोचायला नि दिवे जायला एकच गाठ पडली.. पावसाळी वातावरणात अंधाराने घातलेली भर भीतीला आवतण देत होती..

घराच्या दाराशी आले.. दाराच्या बाजूलाच स्वयंपाकघराची खिडकी.. सताड उघडी..

मी जाताना सगळी खिडक्या दारं घट्ट बंद केलेली.. नेहमीच्या सवयीने..

मग ही खिडकी उघडी कशी? कदाचित वादळ आलं असेल.. त्यामुळे उघडली गेली असेल वा-याने..

खिडकीतून आत डोकावून पाहिलं.. सगळा कट्टा भांड्यांनी भरलेला.. फुलपात्रे, ग्लास, चमचे, कप.. यांची मैफल भरलेली.. सोबत चिवडा नि बिस्किटांचा डबाही..

…. मी तर कट्टा साफ करून गेले होते.. मग एवढी भांडी कुठून आली? घरात कधीतरी एखादा उंदीर शिरतो.. किंवा या रिकाम्या खिडकीतून मांजरही शिरलं असेल..

पण उंदीर नि मांजर अशी भांडी कशी काढतील फडताळातून कट्ट्यावर ? शिवाय तो चिवड्याचा डबा?

आता मात्रं भीतीनं जीव कापायला लागला..

म्हणजे एखादा चोर शिरला असेल का घरात?

पण कुलूप तोडलेलं नाही.. कुठलंही दार उघडलेलं नाही.. खिडकीचं दार उघडं आहे पण खिडकीच्या जाळीमधून चोर शिरणं शक्य नाही…

मग. ?

म्हणजे ते भूत, प्रेत वगैरे तर नसेल ? की काळी जादु.. करणी. भानामती तसलं काही?

अरे देवा…

हो.. बरोबरच आहे.. आज अपर्णा म्हणतच होती अमावस्या आहे.. म्हणून तिने घरात नारळ फोडला…

पण असलं काही नसतं.. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.. असले विचार करणंही चुकीचं आहे.

पण मग हा कसला प्रकार ?.. खूप विचार केला.. डोक पिंजून काढलं…. आणि ट्यूबलाईट पेटली..

मिस्टरांकडे एक किल्ली असते.. तेच आले असणार.. चहासाठी भांडी काढली असणार.. चिवड्याच्या डब्यातून चिवड्याची फक्की मारली असणार… अन् मी मात्रं वेड्यासारखी काहीबाही विचार करत बसले होते.. स्वत:चीच मला लाज वाटली..

एकदाचं हुश्शही झालं..

आता निर्धास्तपणे मी कुलूप काढलं.. घरात संपूर्ण अंधार होता … बेडरूममधे टॉर्च होता.. तो आणला.. चालू केला… हॉलमधे टॉर्चचा प्रकाश टाकत स्वयंपाकघराकडे पाणी पिण्यासाठी निघाले..

…. कोप-यात टॉर्चचा उजेड पडला आणि डोळ्याला जे दिसलं ते पाहून जोराची किंकाळी तोंडातून बाहेर पडली..

त्या कोप-यात एक अतिशय कृश आणि बुटकी बाई पाय पोटाशी घेऊन बसली होती..

अंधाराशी स्पर्धा करणारा अव्वल वर्ण, पिंजारलेले मोकळे केस.. बारीक डोळे, नाकात मोठी चमकी नि कशीतरी नेसलेली इरकल साडी.. हे कमी होतं म्हणून की काय..

.. तिचे पुढे आलेले पांढरे पिवळे दात काढून ती माझ्याकडे पाहून हसू लागली..

” कोण आहे तुम्ही ?” मी धीर एकवटून विचारलं.. नि ती पुन्हा खदाखदा हसू लागली..

आता मात्रं माझं अवसान संपलं.. ही नक्कीच कुणीतरी हडळ बिडळ असणार.. माझी खात्री पटली.. मी भीतीने दाराशी पळत सुटले.. नि दाराशी आलेल्या माझ्या यजमानांना धडकले..

” काय झालं ? अशी का पळतेयस?”

माझ्या तोंडातून शब्दच फुटेना..

” भूत.. भूत “

मी कोप-याकडे बोट दाखवायला नि दिवे यायला एकच गाठ पडली..

मिस्टरांनी कोप-यात पाहिलं..

“चिन्नम्मा.. तू कधी आलीस ?”.. मिस्टरांनी तिला सहजपणे विचारलं..

उत्तर न देता ती पुन्हा तशीच हसली..

” तुम्ही या बाईला ओळखता ?”

” ओळखता काय? चांगला ओळखतो.. अगं हिनं दहा वर्ष आपल्या घरी काम केलय.. खूप प्रामाणिक.. अगदी घरच्यासारखं काम करायची.. मुलं मिळवायला लागल्यावर तिने काम सोडलं. परवाच हिचा मुलगा दवाखान्यात माझ्याकडे तपासायला हिला घेऊन आला होता.. हिला स्किझोफ्रेनिया झालाय… कोणीतरी कानात बोलतय.. कोणीतरी फोटो काढतय.. असे भास होतायत.. घरी न सांगता कुठेतरी हिंडत बसते..

अनेक वर्षांनी आज आपल्या घरी आली…. पण तू एवढी घाबरलीयस का? तूच तिला घरात घेतलं असशील नं?”

मी नाही म्हटलं नि घडलेलं सारं सांगितलं..

” पण मग ही घरात कशी शिरली ?”

आम्ही खूप चर्चा केली.. तिला विचारलं.. पण हसण्याशिवाय तिच्याकडून कोणताच प्रतिसाद नव्हता..

नि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.

मी अपर्णाकडे जाण्यासाठी दारात आले नि पुस्तक विसरलं म्हणून दार तसेच उघडे ठेऊन खोलीत गेले..

तेवढ्यात ही चिन्नम्माबाई घरात शिरली नि सरळ स्वयंपाकघरात गेली.. आणि मी दाराला कुलूप लावून निघून गेले..

हिने स्वयंपाकघरातील भांडी काढली.. भूक लागल्यावर कदाचित चिवडा, बिस्कीटे खाल्ली नि नंतर बिचारी हॉलच्या कोप-यात येऊन बसली..

– – आम्हाला या प्रकारावर हसावं की रडावं तेच कळेना..

मी तिला चहा करून दिला. चहा, बिस्कीटे खायला घालून, खणानी तिची ओटी भरली नि आम्ही दोघे तिला तिच्या घरी गाडीतून सोडून आलो..

तिच्या घरच्यांची दिवसभर शोधाशोध सुरूच होती. त्यांनी चारचारदा आमची क्षमा मागितली नि आभारही मानले..

चार दिवसांनी ती पुन्हा गायब झाल्याचं तिच्या मुलाकडून कळलं…

पण यावेळी मात्र ती आमच्याकडे आली नव्हती…

– – पंचवीस वर्षात ना ती कुठे सापडली.. ना तिची खबरबात मिळाली..

पोलीस स्टेशनमधे ती अजूनही ” मिसिंग ” आहे..

….. जायच्या आधी मात्र तिच्या ” डॉक्टरदादांना ” भेटून, आमच्या घरी चहापाणी करून गेली.. !!

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “काशा…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ काशा… ☆ प्रा. भरत खैरकर 

“मॅडम बाई नमस्कार.. ओळीखलसं कां मला? मी.. मी काशा.. ” एका भिकारीवजा तरुणाचा आवाज माझ्या कानावर पडला. ऑफिस सुटल्यामुळे मी घाईघाईने शंकरनगरच्या सिटी बस स्टॉप वर जात होते. मला बर्डी बस पकडायची होती. सोबत माझ्या ऑफिस मधल्या माझ्या मैत्रिणी होत्या. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपली ‘पोझिशन’ मला राखायची होती. पण तो गडी पडल्यागत “मॅडम, मी काशा.. मला ओळखलं नाहीस.. मॅडम बाई म्या भेटलो नव्हतो कां तुम्हास्नी.. तुम्हीच नाही कां मला खाऊ पिऊ घातलं होतं.. उपदेश नव्हता कां दिला.. अरे, भिक मागू नकोस नव्हतं कां म्हटलं मला तुम्ही.. ऐकून तर घ्या मॅडम बाई, मी काय म्हणतो ते!!” मी सारखी त्याच्याकडे दुर्लक्ष करून जसं आपण त्याला ओळखतच नाही उगीचच गळी पडू इच्छितो.. असा भाव दाखवत मैत्रिणी सोबत चाललेली होती. सोबत त्याची तीच कॅसेटही चाललेली होती.. पण नाही.. बस स्टॉप वर पोहोचताच बस आली. मी भरकन

बस मध्ये बसले. तो खिडकीतून मला शोधीतच होता आणि सारखा ” मॅडम बाई.. मॅडम बाई ऐकून तर घ्या. ” असा ध्वनी मला माझा चिरत चालला होता.. बसच्या वेगासोबत… !

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी बी. ए. फायनल ला होते. माझ्या अभ्यासिकेतून दूरवरची घरं.. आला गेला.. येणारे जाणारे दिसायचे. अभ्यासाचा कंटाळा आला तर मी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची धावपळ बघायची.. किती वेळ मी असं बघत बसलेली असायची माझं मलाच कळायचं नाही..

अशीच एक दिवस अभ्यासिकेतून बाहेर डोकावले तर समोरच्या घरी “देवो मा भिकाऱ्याला एखादी भाकरं. ” असं म्हणून आपली ताटली सरकावून समोरच्या घराच्या दारा खेळत असलेलं एक भिकाऱ्याचा पोर मला दिसलं.. मी अभ्यास सोडून सारखी त्याच्या हालचालीकडे लक्ष देत होती. ” देवो मा भिका-याले.. ” त्याची लाचारयुक्त हाक पुन्हा पुन्हा ऐकायला येत होती.. नखान दारावरच्या पेन्टशी तो खेळत होता.. हे सगळं नकळत घडत होतं.. मी “शुक.. शुक.. इकडे ये.. ” करून त्याला हाक दिली. ही मुलगी आपल्याला कां बोलवेल ? असं समजून की काय त्यांना माझ्याकडे लक्ष देऊन.. पुन्हा ” देवो माय भिकाऱ्याला.. ” ची कॅसेट वाजवली. मी पुन्हा “शुक.. शुक.. अरे, तूच.. तूच.. तू इकडे ये.. ” म्हणून त्याच्याकडे पाहून हात हलविला. तो येऊन अभ्यासिकेच्या दारात उभा राहिला. मी त्याला आत बोलावलं. नुकताच वहिनींनी माझ्यासाठी आणून ठेवलेला नाश्ता टेबलवर तसंच होता.. मी ती प्लेट त्याच्याकडे देत माझ्यासाठी दुसरी प्लेट वहिनी कडून मागितली.. त्यानं ती घेतली आणि मी इशारा केलेल्या बाजूच्या खुर्चीत तो बसला.. त्यानं पायजामा फाडून तयार केलेली भीक मागायची मळकट झोळी खाली

ठेवली. त्यातलं पीठ जमिनीवर आपण आत असल्याची जणू आठवण त्याला देत होतं.. जमिनीवरच्या पिठानं पिशवीच्या आजूबाजूला पांढरं कुंपण तयार केलं होतं!

त्यानं “ताईसाहेब, तुम्ही घ्या की.. असं म्हणत प्लेट माझ्याकडं सरकवली.. तितक्यात माझी प्लेट सुद्धा वहिनीने आणली. आम्ही दोघेही नाश्ता करायला बसलो.. मी उत्सुकता म्हणून त्याला बोलत केलं कदाचित माझा उद्देशही तोच होता.

“नाव काय रे तुझं?”

“काशा”

” आई वडील काय करतात तुझे?”

” ते नाहीत. “

” कां रे काय झालं?”

” मेलीत दोगं बी”

“कशी रे? “माझा प्रश्न.

“ताईसाहेब, माझा ‘बा ‘सुदीक असाच भीक मागून पीठ आणायचा.. ते पीठ किराणा दुकानात नेऊन विकायचा.. मिळालेल्या पैशात दारू ढोसायचा.. उरलेला पैका मायला देऊन घर चालवायला सांगायचा.. “

” मग रे? ” माझी तंद्री लागली प्लेटमध्ये चमचा तसाच पडून राहिला.

“असाच एक दिवस बा घरी आला.. खूप खूप खोकलला.. एकाएकी आमची सगळ्यांची घाबरगुंडी उडाली.. पण काही उपाव नव्हता. बा चा ठसा नड्डयात अडकला.. अन् मेला तो.. असाच उभ्या उभ्या ! काही दिसानं लोक म्हणायचे डोमा भिकाऱ्याले टीबी. झालती म्हणून.. लोकांचं ते म्हणणं समजत नवतं मले.. “

“मग रे?”

” मग काय ? माझ्या माय वर आली जबाबदारी सगळी.. तिनं जमा केलेल्या पैशातून एक म्हैस विकत घेतली. माझी मोठी ताई लग्नाला आलेली.. ती दिसायला एकदम तुमच्यासारखीच सुंदर.. ताई, घरची गरीब परिस्थिती इकडे झाकलं तर तिकडे उघड पडायची.. मायच्या जीवाले तिची काळजी लागली होती एक दिवस म्हशीले पाणी पाजायला ताई शिवारातल्या आडावर गेली.. माय चारा कापत होती धुर्‍यावर.. पाणी काढता काढता ताईचा पाय घसरला.. ती पडली अडात.. बादलीसकट.. “धप्पक्कन “झालेल्या मोठ्या आवाजाने माय धावत आली.. तर पोरगी विहिरीत पडली.. तिला कां करावं काही सुचत नव्हतं.. तिनं आंगचं लुगडं सोडलं.. पाण्यात टाकलं.. आडात.. “पकड… पकड.. “म्हणून ती ताईला सांगू लागली. तीनही ते लुगडं धरलं.. आई खंगलेली ताकद नसलेली.. कशी काय वडणार ताईला वर.. !! उलट ताई चांगली अठरा-एकोणीस वर्षाची तुमच्या एवढीच.. तिचं वजन हे जरा जास्तच.. आईच ओडल्या गेली आत मध्ये.. आडात..

अर्ध्या तासाने कोणीतरी गडी माणूस बैलांना पाजायला म्हणून आडावर आला.. त्यांना पाहिलं आडात पडलेल्या माझ्या मायला.. बहिणीला.. त्यानं उडी टाकून ताईला वर काढली.. तिच्यात जीव होता.. आई आतच मेली होती.. तिलाही त्यानं बाहेर काढलं.. मग गावात निरोप धाडला.. मी माझ्या लहान भावासकट धावत गेलो.. तर अडावर माय मरून पडली होती.. त्या इसमाने तिचं शरीर आपल्या टाॅवेलनं झाकलेलं.. ताई ही वलीचीप झाली होती.. फुगलेली होती.. तिची छाती अजूनही खालीवर होत होती.. तेवढीच फक्त जिवंत असल्याची खूण! मला वाटत होतं एखाद्यानं ताईला खांद्यावर घेऊन गरगर फिरवावं अन काढावं सार पाणी नाकातोंडातून बाहेर.. पण मी लहान हाय.. माझं कोण ऐकल.. म्हणून मी चूप राहिलो.. पाच-सहा तासातच ताई सुद्धा आईबाच्या रस्त्याला गेली.. मेली..

झालं संपलं सारं.. काही उपाव राहिला नाही जगण्याचा आम्हां भावंडापुढं.. म्हणून आली ही ताटली आमच्या हातात.. ” असं म्हणत त्यानं नास्त्याची प्लेट दाखविली. तो सांगताना इतका रमला होता की आपण नाश्ता करीत आहोत.. हेही तो विसरला होता.. आणि ती प्लेट त्याला आपली ताटलीच वाटली होती.. माझा घास तोंडातल्या तोंडात फिरला.. काय हे अपार दुःख !!काय ही दैना भगवंता!! ह्या विचाराने मी चरकले. तू एखादी नोकरी कां करत नाहीस ? मी त्याला पुन्हा बोलतं केलं.

“कोण देतो ताईसाहेब नोकरी.. साऱ्यांना वाटतें मी लहान आहे.. काय करल हे इतकसं हुतकाड.. म्हणून कोणी बी कामाला घेत नाही.. दुसरी गोष्ट कमी मोबदल्यात जास्त काम करून घ्यायची सवय आहे आपल्या इथल्या लोकायले.. म्हणून कोणीच ठेवले पाहत नाही मायासारख्याले.. उपदेश मात्र सारेच देते..

मी समाजाचं खरं चित्र दाखविणाऱ्या त्या पोराकडे अवाक् होऊन पाहतच राहिली.

“मग कसं भागतं रे तुम्हां दोघांचं?” “कां भागणार नाही.. म्या उन्हाळ्यामंदी शहरात जातो भावाला घेऊन.. तिथे एसटी स्टँड.. रेल्वे स्टेशनमंदी कधी कधी १०० रुपये येते.. कधी कधी २०० रुपये.. कधीकधी तर ३०० रूपये बी.. भिक म्हणून मिळतात.. चांगल भागतं आम्हां दोघांचंबी त्याच्यात.. “त्याचं उत्तर आणि इन्कम ऐकून मी चाटच पडली.

“बरं ताई साहेब, निघालं पाहिजे मला! आता बाया वावरात जायच्या आधी चार-पाच घर मागून घेतो.. मंग झालं आजच्या पुरतं काम. ” असं म्हणून त्यानं खाली प्लेट माझ्याकडे देत, आपल्या पिशव्या घेतल्या अन निघालाही.. मी पाहतच राहिले.. तो दिसेनासा झाला तरी त्याची कहाणी आठवतच राहिले..

तोच ‘काशा’ आज मला भेटला होता.. एकेकाळी समाजसेवेच्या उद्देशाने भारावलेली मी. माझ्या पोझिशनला.. प्रेस्टीजला.. धक्का लागेल म्हणून.. त्याला ओळखत असूनसुद्धा ओळख दाखवली नव्हती.. माझ्यातल्या ह्या परिवर्तनाचा आणि काशात अजून न झालेल्या बदलाचा विचार करत मी घरी केव्हा येऊन पोहोचले, माझं मलाच कळलं नाही..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “तक्रार…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “तक्रार…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळी दहाच्या सुमारास पोलिस चौकीत आलो तेव्हा वाटलं की अर्ध्या तासात काम संपवून घरी जाता येईल पण कसलं काय!!बारा वाजले तरी चौकीतच होतो. तक्रारीचे स्वरूप समजल्यावर प्रत्येकानं साहेबांची भेट घ्यायला सांगितलं आणि ते कामासाठी बाहेर गेलेले. वाढतं ऊन आणि पोटातली भूक यामुळं चिडचिड वाढली तरीही चडफडत बसून राहिलो. काही वेळातच साहेब आले. तेव्हा अस्वस्थता कमी झाली. दहा मिनिटात बोलावणं आल्यावर केबिनमध्ये साहेबांसमोर उभा राहिलो.

“नमस्कार साहेब” 

“बोला. काका. डोक्याला बँडेज??, काय झालं??. ”

“त्यासाठीच आलोय पण माझी तक्रार नोंदवून घेतली जात नाहीये”

“का?”साहेबांनी हवालदारांकडे पाहत विचारलं पण हवालदार काहीच बोलले नाहीत.

“मी सांगतो”

“हं बोला”साहेब.

“कपाळावरची ही पट्टी दिसतेय ना. सकाळीच तीन टाके पडलेत. ”

“अक्सीडेंट, टु व्हीलर की कार”

“फ्लेक्स”

“म्हणजे”साहेबांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उत्सुकता.

मी पुढे काही बोलणार इतक्यात हवालदार म्हणाले “मोठ्या लोकांविरुद्ध तक्रार करायची म्हणतात म्हणूनच लिहून घेतली नाही. ”

“हे खरंय”माझ्याकडं पाहत साहेबांनी विचारलं.

“शंभर टक्के!!या भागातील माननीय, मान्यवर आणि त्यांचे चार कार्यकर्ते यांच्यामुळे ही दुखापत झाली. असा माझा आरोप आहे. ”

“नक्की काय घडलं ते जरा नीट सांगा?”साहेबांचं बोलणं संपायच्या आत मी मोबाइल पुढे केला. फोटो पाहून साहेब जरासे वैतागले. “आता हे काय?”

“पुरावा”

“फ्लेक्सच्या फोटोत कसला पुरावा?”

“साहेब, यातच सगळं काही आहे. वेगवेगळ्या बाजूने फोटो काढलेत त्यावरूनच तक्रार करतोय.” 

“काय बोलताय ते तुमचं तुम्हांला तरी समजतेय का?”साहेब.

“हा फ्लेक्स बेकायदेशीररित्या लावलाय. रस्ता ओलंडताना डिवायडरमध्ये जी दहाएक फुटाची जागा असते तिथे लावलेल्या फ्लेक्सची किनार मला लागली. तीन टाके घालावे लागले. ”

“म्हणून थेट पोलिसात तक्रार!!”

“का करू नये. थोडक्यात निभावलं पण जर काही गंभीर दुखापत झाली असती. डोळा फुटला असता तर.. ”

“काही झालं नाही ना. ”

“मग काही गंभीर व्हायची वाट पहायची का?”

“तक्रार करून काय मिळणार आणि ज्या लोकांची नावं घेत आहेत. त्यांना काही फरक पडणार नाही. ”

“असं कसं. फ्लेक्स माननियांना शुभेच्छा देण्यासाठी लावलाय कार्यकर्त्यांची नावं आणि फोटो आहेत. फ्लेक्स चुकीच्या ठिकाणी आणि धोकादायक स्थितीत लावलाय. त्याचा पुरावा म्हणून शूटिंग सुद्धा केलंय. ”

“फार काही हाती लागणार नाही परंतु मनस्ताप मात्र वाढेल. ”

“तक्रार करायला आलो तेव्हाच मनाची तयारी केलीय.

“जरा शांत डोक्यानं विचार करा” 

“साहेब, आम्ही सामान्य माणसं सार्वजनिक ठिकाणी जीव मुठीत घेऊन फिरतो. त्यातही पायी चालणाऱ्यांचे फार हाल. एकतर लोक बेफाम गाड्या चालवतात आणि त्यात भर म्हणजे जागोजागी लावलेले फ्लेक्स. आमचा विचारच कोणी करत नाही उलट ‘घरात बसा कशाला बाहेर पडता’ असं उद्धटपणे बोलतात. ”

“तुमचा त्रास समजू शकतो. याविषयी नक्की मार्ग काढू. नको त्या भानगडीत पडू नका. त्रास होईल. ” 

“निदान तुम्ही तरी असं नका बोलू. आम्हांला फक्त कायद्याचा आधार म्हणजे पर्यायाने तुमचाच आधार. वाट्टेल तिथं फ्लेक्स लावतात. इच्छा असूनही विरोध करता येत नाही अन भांडूही शकत नाही. त्रास सगळ्यांना होतो. सहन होत नाही अन सांगता येत नाही अशी अवस्था. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात राहतो. आज वाचलो तेव्हा ठरवलं की या त्रासाविरुद्ध तक्रार करायची. ”

“त्यानं काय साध्य होईल. ”

“माननियांचे नाव असल्यानं तक्रारीची निश्चितपणे दखल घेतली जाईल आणि बाकी सोशल मीडिया आहेच आणि न्यूज चॅनल तर ब्रेकिंग न्यूजसाठी तडफडत असतातच” माझ्या बोलण्यानं साहेब विचारात पडले.

“थोडा वेळ बाहेर बसता का?काहीतरी मार्ग काढतो. ”

बाहेर बाकावर जाऊन बसलो. डोकावून पाहीलं तर आत फोनाफोनी सुरू होती. काही वेळानं आत बोलावलं. बसायला सांगून साहेबांनी चहाची ऑर्डर दिली.

“एक उत्तम उपाय सापडलाय. त्यामुळे तक्रारीची गरज भासणार नाही. ”

“काय?”मी 

“आपल्या भागातील सगळे बेकायदेशीर फ्लेक्स उतरवण्याचं काम सुरू झालंय. ”

“अरे वा!!अचानक हा चमत्कार??”

“चमत्कार वैगरे काही नाही. तुमच्या तक्रारीविषयी माननीयांशी बोललो. तुमचं म्हणणं त्यांना शंभर टक्के पटलं आणि या कामी घेतलेल्या पुढाकाराबद्दल माननियांनी तुमचं खास कौतुकसुद्धा केलं. ताबडतोब कार्यकर्त्यांना फ्लेक्स काढायच्या कामाला लावलयं. आता ठीक आहे. ”

“खूप खूप धन्यवाद साहेब!!, फार मोठी मदत झाली. अजून काय पाहिजे. इतरांप्रमाणे मीसुद्धा निमूटपणे सहन करत होतो पण आज थोडक्यात बचावलो तेव्हाच ठरवलं की याविषयी काहीतरी करायला पाहिजे. जखमेचे फोटो काढले. डोक्याला बँडेज बांधलेल्या अवस्थेत घटनाक्रम शूट करून इथे आलो. ”

“आता पुढं काहीही करू नका”साहेब.

“जे हवं होतं ते तुम्ही झटपट केलंत त्यामुळे आता बाकी काही करण्याची गरज नाही. खूप खूप धन्यवाद!!आणि माझी एक विनंती माननीयांपर्यंत पोहचवा. पुन्हा बेकायदेशीर फ्लेक्स लावले जाऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे. त्यांनी मनात आणलं तर हे सहज शक्य आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार!!” साहेबांचा निरोप घेऊन चौकीच्या बाहेर पडलो. घरी येताना चौकातले फ्लेक्स उतरवण्याचे काम सुरू होतं ते पाहून नकळत चेहऱ्यावर हसू उमललं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फक्त अंतर एका हाताचं… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ फक्त अंतर एका हाताचं…  ☆ सौ. वृंदा गंभीर

आई वडील मुलांना जन्म घालतात, त्यांना परिस्थिती नुसार अति कष्टाने वाढवतात पायावर उभं करतात. फक्त एकचं स्वप्न असतं जे “आम्ही भोगलं ते मुलांना नको. ”

“असचं गावात एक कुटुंब होतं. खूप गरीब कष्टाळू पदरी चार मुलं, स्वप्न मोठं बघितलं आणि कामाला लागले. जे काम मिळालं ते करत गेले. कशाची लाज धरली नाही. मुलांना शाळेत घातलं, “गावात दहावी पर्यंत शाळा होती. नंतर बाहेर टाकायचं ठरलं, ” मुलं हुशार होती दोन दोन वर्षाचं अंतर होतं. मोठ्या मुलाला ठेवलं बाहेर शिकायला, खूप काटकसर करावी लागत होती. तो बारावी झाला दुसरा दहावी झाला. आता खर्च वाढला होता, पाऊस कमी जास्त झाल्यामुळे गावात कामं मिळत नव्हती. मग त्यांनी गावं सोडायचं ठरवलं राधा ताईंच्या, हाताला चव होती. मुलांच्या मदतीने ओळखीने डबे मिळवले. बघता बघता खूप डबे वाढले. परिस्थिती सुधारली, आता मुलं सगळेच कॉलेज ला जात होते. मोठ्या मुलाने “हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स” केला, त्याला छान नोकरी मिळाली. दुसरा M. B. A झाला, तिसरा “सॉफ्टवेअर इंजिनियर झाला “व चौथा “वकील झाला” दिवस सरले होते. आनंदाचे वारे वाहू लागले होते. मुलांना आई वडिलांचा अभिमान होता. खूप सुख द्यायचं असं म्हणायचे मुलं पण पुढचं कुणी बघितलं होतं.

“मोठ्या मुलाचं लग्न झालं, सुरवातीचे दिवस छान गेले, नंतर मुलात बदल जाणवायला लागला. त्याचं बोलणं कमी झालं दुसरे मुलं म्हणायचे दादा असं का वागतो, तो पहिल्यासारखा बोलत का नाही. खूप प्रश्न पडायचे मुलांना पण, आई वडील कळून न कळल्यासारखं त्यांना समजून सांगायचे. अरे त्याला कामं वाढली असतील लग्न झालं, जबाबदारी वाढली म्हणून, कदाचित नसेल बोलत. होईल पुन्हा पाहिल्यासारखं, मुलं शांत बसायची.

“दुसऱ्या मुलाचं लग्न त्याच्या ऑफिस मधल्या मुलीशी झालं. तिने पण M. B. A. केलं होतं. दोघांना पगार छान होता. आता गाडी बंगला सर्व काही झालं होतं. त्यांचा संसार सुरळीत सुरु होता. बरोबर जाणं येणं छान चालू होतं. पण मोठ्याचं बघून यांचं वागणं बदलायला वेळ लागला नाही. “आई वडिलांना वाईट वाटतं होतं. पण अजून दोन मुलांची लग्न बाकी होती. म्हणून सगळं सहन करत होते.

“तिसऱ्या व चौथ्या मुलाचं एकत्र लग्न झालं. दोघी बहिणी होत्या, एक इंजिनियर तर दुसरी डॉक्टर होती. जोड्या सुंदर होत्या, घर गोकुळा, सारखं भरलं होतं. आई वडील समाधानी होते.

या दोघी अपवाद होत्या, त्यांना कुटुंब आवडत होतं. म्हणून त्या प्रेमाने वागत होत्या. असेच दिवस जात होते. सगळ्यांना मुलं झाली कुटुंब वाढलं होतं. हळू हळू मुलं बाहेर पडली. स्वतःचा संसार सुरु केला, छोटा वकील आणि त्याची बायको डॉक्टर असलेली घरीच राहिले. वकिलाने परीक्षा दिली तो आता जज झाला होता.

“रोज नवनवीन केस समोर येत होत्या, तो योग्य न्याय देऊन केस सोडवत होता. एक दिवस त्याच्या समोर अशी केस आली की तो इतका गुंतून गेला, की न्याय कसा आणि काय द्यायचा आपण चं आईवडिलांवर अन्याय केला आहे. आपण दुसऱ्या आई वडिलांना काय न्याय देणारं आहोत.

“तर ती केस अशी होती, एका म्हाताऱ्या आईवडिलांनी हक्कासाठी मुलांवर केस केली होती. ते आजोबा आम्ही कुठल्या परिस्थितीत मुलांना शिकवलं वाढवलं, आमच्या जवळच सगळं देऊन, आम्ही विश्वासाने सगळं दिलं आता हे मुलं बाहेर पडली आम्ही काय करायच कोण सांभाळेल. आम्हाला आमच्य्याकडे कोण लक्ष देईल काय असेल आमचं उर्वरित आयुष्य, ते पोट तिडकीने बोलतं होते. कोर्टात शांतता पसरली होती. जज ही शांत होते. त्यांनी पुढची तारीख देऊन टाकली घरी आले मन उदास होतं.

“काय न्याय द्यायचा माझ्या भावांनी पण अन्याय केला. तेही बाहेर पडले. आज डोकं सुन्न झालं माझं, तत्याला कळत नव्हतं, तेवढ्यात तिथे आई आली चेहरा बघून म्हणाली काय झालं बाळा, आज उदास दिसत. आहे तेंव्हा तो आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला. म्हणाला, “आई आजची केस बघून मी हैराण झालो. वाईट वाटतं ग, आई तुम्हीही किती कष्टातून शिकवलं मोठं केलं आज तुम्हाला सुख देण्याऐवजी, आम्ही दुःख चं देत आहोत. “आम्ही आहे तुमच्या जवळ राहतो. आपण आनंदात पण तुमचं मन त्या तिघांसाठी व्याकुळ होतं. ते येत ग लक्षात पण काय करणार, , , समाजाने अजब परंपरा निर्माण केली. असं वाटतं, नसतं तुम्ही शिकवलं गावातच राहिलो असतो…… तिथेच कामधंदा केला असतातर, आज एकत्र असतो. का आपण मी काय करू काय न्याय देऊ आई सांग ना.

“आई म्हणाली ” बाळा फक्त एक हाताचं अंतर असतं रे “

मी म्हणालो मला समजले नाही, तेंव्हा आई बोलायला लागली, अरे तुम्ही पण आई वडील झाले. आता मुलांना वाढवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात. तुम्हाला आम्ही हातभार लावला. आम्हाला कुणाचाच हातभार नव्हता. लोकांच्या शेतात मिळेल ते काम केलं. तुम्हाला शिकवलं आता, फक्त तुम्हाला आरामात वाढवायचंय आम्ही कसं केलं असेल याचा विचार केला. की जाणीव होईल तुम्हाला, मी म्हणालो, “आई मला आहे, जाणीव प्रीतीला पण आहे. म्हणू, न मी तुमच्या जवळ आहे ग, आई म्हणाली होय आहे. “मला मान्य आहे, पण सगळेच सगळ्यांचे मुलं असे जाणीव ठेवतात, असं नाही ना. मी आहे नशीबवान तसें अनेक असतील, असं नाही. ना उद्या तुम्हीही असेच एकटे पडले तर, , , , , , ,

म्हणून म्हणते “फक्त एका हाताचं अंतर असतं. “

“अरे ज्या पलंगावर तुमचा, जन्म झाला, , जिथे तुम्ही लहानचे मोठे झाले. आईच्या कुशीत मायेने झोपले. आईच्या उबीत वाढले. तिचं आई नकोशी होते. कधी तर त्या पलंगावर बायको येते. त्या वेळी आई खाली असते. पलंगाची उंची असते फक्त एका हाताची, मग आई का नकोशी होते. ज्या आईने त्याच पलंगावर वाढवलं असतं, निजवलेलं असतं, किती प्रेम माया लावलेली असते. ती पण एक स्त्रीच असते, मग एवढा बदल का होतो. एकीने घडवलेलं असतं, एक साथ देणारं असते, ती पण आयत्या पिठावर रेघोट्या मरणार असते. आईचं मन कधीच विचलित होत नाही. मुलगा आला नाही तर, काळजी जेवण केलं नाही. काळजी ती स्वतःला उठून जेवायला वाढायला तयार असते. पण बायको मनासारखं झालं नाही, तर तण तण करते. रुसून बसते, भांडणं होतात, माहेरी निघून जाते. शेवटी आई सांगते, “बाबा रे तुझं सुख तू बघ नसेल तिला आवडत आमच्या बरोबर… रहायला तर बाहेर पड. आनंदात संसार करा. मग मुलगा तिचे ऐकून बाहेर पडतो. आई वडील विसरतो, नाती महत्वाची नसतात का?

आईच्या जागी आई असते. बायकोच्या जागी बायको असते. मग तिचं ऐकून आई वडिलांना त्रास देणं, किंवा घरा बाहेर काढणं, चांगलं आहे का? का मुलगा म्हणून आई वडिलांना समजून घेत नाही. तुम्हीही पळता ना मुलांसाठी, तेंव्हा माझे आई वडील असच माझ्यासाठी पाळले, मला मोठं केलं, हे का नाही मनात येत? का नाही बायकोला सांगू शकत, माझ्या “आई वडिलांनी खूप कष्ट केले. त्यांना आता सुखी ठेचायचे आहे. त्यांना फिरायला पाठवायचेआहे, चारिधाम यात्रेला पाठवायचे आहे, आता हे सगळं तुला सांभाळावं लागेल… पण नाही. हल्लीची मुलं बदलतात. “आज तुम्ही बदलले उद्या तुमची मुलं बदलतील. म्हणून बाळा “हाताचं काय वितेच सुद्धा अंतर पडू देऊ नका माया, ममता प्रेम फक्त आई कडे, मिळतं बाजारात सगळं मिळेल आई वडील नाही मिळणार…

“मुलींच्या आई वडिलांनी पण कष्ट घेऊन मुली शिकविलेल्याअसतात. त्यांनाही त्रास झालेला असतो. पण आता त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. आम्हाला जे संस्कार करून शिकवून सासरी पाठवलं होतं, ते मुलीला शिकवलं जात नाही. रोज फोन करून घरातलं विचारायचं, मग तिला “शिकवायचं संसारात आईची लुडबुड चांगली नाही. उद्या तिलापण वाहिनी येणार असते. त्या जे वागणार तसेच फळ मिळणार असतं, पण कोण शिकवणार त्यांना… म्हणून मुलांनी जाणीव ठेवावी. ” आई वडिलांचा आधार असतो, मुलगा मुलं जर कडक राहिली, तर वृद्धाश्रमात आई वडील जाणार नाहीत.

“मुलाने फार विचार केला व बायकोला घेऊन भावांकडे गेला. तिथे सर्व समजून सांगितलं. भावांना एकत्र राहण्यासाठी तयार केलं. त्यांनाही पटलं होतं, दुनियेचा त्रास बघितला होता, खस्ता खाल्ल्या होत्या, तेही घरी आले.

मग जज ने निकाल दिला, मुलांनी आई वडिलांना आदराने वागवायचं. नाही, तर वारस हक्क रद्द होऊन, नुकसान भरपाई व मुलांना वाढवतांना, झालेला आजतागायत खर्च, व्याजासहित परत करायचा. निर्णय ऐकून सगळे चकित झाले. मुलांनी आजोबा आज्जीची माफी मागून घरी नेलं, व आनंदात राहू लागले.

“तात्पर्य काय तर प्रश्न मुलानेच सोडवला मग असा प्रश्न आधीच का निर्माण करायचा म्हणून अंतर नको प्रेम हवं…”

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “म्हैस…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “म्हैस…” ☆ श्री सुधीर करंदीकर

मी राहतो पुण्याला कर्वेनगर या भागात. आम्ही रोजच दुपारी बावधन या भागात मुलीकडे जातो. नातवंडं दुपारी शाळेतून घरी येतात. त्यावेळेला आम्ही घरी असल्यामुळे त्यांचे दुपारचे खाणे – पिणे, अभ्यास, क्लास ला सोडणे / आणणे वगैरे, याची काळजी रहात नाही. संध्याकाळी मुलगी किंवा जावई ऑफिस मधून घरी आले, की, थोड्या गप्पा मारून, आम्ही साधारण ६ – ६. ३० ला तिथून निघून कर्वे नगरला, आमच्या घरी येतो. आमचे जाणे येणे स्कुटरनी असते. कधी कधी बायको बावधनहून स्कुटर घेऊन आधी निघून जाते, अशावेळेस, मी घरापर्यंत कधी पायी जातो, कधी अर्धे अंतर बसनी व पुढचे पायी जातो.

एक दिवस बायको स्कूटर घेऊन लवकर घरी गेली म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मला बसनी घराकडे जायचं होतं.

मुलीकडून ६. ३० ला निघालो. साधारण ५ – ७ मिनिटे चालत गेलो, की मेन रोड लागतो. रस्ता ओलांडला, की, समोरच बसचा थांबा आहे. ट्रॅफिकच्या पीक- आवर्स मध्ये पुण्यात कुठलाही रस्ता ओलांडणे हे एक दिव्यच असते. मी जाऊन रस्त्याच्या अलीकडे उभा राहिलो व ट्रॅफिक मध्ये गॅप पडण्याची वाट बघत थांबलो. त्या दिवशी ट्रॅफिक जरा जास्तच होता. या रोडची खासियत अशी आहे, की, पुणे विद्यापीठ ते व्हाया पाषाण रोड – व्हाया चांदणी चौक – पौड डेपोपर्यंत, म्हणजे साधारण ५ – ६ किमी अंतरामध्ये कुठेही सिग्नल नाही. त्यामुळे सगळ्याच गाड्या, म्हणजे कार/ स्कुटर/ मोटर सायकल/ बसेस आणि ऑटो, रस्त्याच्या दोन्हीकडून सुसाट स्पीडनी धावत असतात. बहुदा, ४-५ मिनिटे गेली, की, छोटीशी गॅप मिळते व त्यामध्ये जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करता येतो. आज काय प्रकार होता माहित नाही, मधे गॅपच येत नव्हती. बाजूला बघितलं, तर काही तरुण मंडळी गॅप नसतांना पण, धावून रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात एक अंध व्यक्ती समोरून आरामात रस्ता ओलांडून आली. अज्ञानात सुख असतं, असं म्हणतात, ते असं!

मी बऱ्याच वेळेला ४ – ५ पावले पुढे जायचो आणि वेड्यावाकड्या येणाऱ्या गाड्यांना घाबरून परत मागे यायचो. पण पुढे जायची हिम्मत होत नव्हती. वाट बघता बघता १० मिनिटे झाली, पण ‘नो चान्स’. अशा वेळेस वाटतं, की, काहीतरी घडून ट्रॅफिक जॅम व्हावा, त्यामुळे आपोआपच क्रॉस करणाऱ्यांची सोय होते. पण तसही आज काही घडत नव्हतं. १५ मिनिटे झाली, तरी मी होतो त्याच ठिकाणी होतो.

तेवढ्यात माझी नजर मागे गेली. मागे एक तगडी म्हैस उभी होती व तिच्या गळ्यातली दोरी धरून मुलगा उभा होता. म्हशीकडे बघताच मी मनातल्या मनात ‘युरेका’, ‘युरेका’ (म्हणजे ‘सापडले’, ‘सापडले’) असे ओरडलो. मी लगेच त्या मुलाकडे गेलो.

मी : दादा, म्हैस घेऊन पलीकडे चलणार का?

मुलगा : कशाकरता? काय करायचं आहे?

मी : करायचं काहीच नाही. फक्त पलीकडे माझ्याबरोबर चलायचं आणि लगेच परत यायचं. ५ रुपये देईन.

(मुलाला काहीच अर्थबोध झाला नसावा. पण ५ रु मिळणार आणि करायचं काहीच नाही, हे त्याला समजलं 

मुलगा : काका, चला 

मुलगा म्हैस घेऊन निघाला. मी म्हशीची ढाल करून, तिच्या उजव्या बाजूनी रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. इतका धुव्वाधार ट्रॅफिक असूनही मी मजेत रस्ता ओलांडत होतो. काही वाहन चालकांनी म्हशीकरता कर्कश्य हॉर्न वाजवले, काहींनी म्हशीला मनात शिव्या दिल्या असतील. आम्ही थाटात पलीकडे पोहोचलो. मी मुलाला ५ रु दिले आणि आभार मानले. पलीकडे ४ वयस्कर रस्ता क्रॉस करायला उभेच होते. मला इतक्या आरामात रस्ता ओलांडतांना बघून, सगळेच मुलाला म्हणाले – अरे आम्हाला पण पलीकडे सोड. आम्ही २ – २ रु देऊ. लगेच मुलानी म्हैस मागे वळवली आणि सगळे म्हशीच्या आडोश्यानी पलीकडे निघाले. मला हे बघतांना मजा वाटली. मी जवळच्या बस थांब्यावर जाऊन बस ची वाट बघत बसलो.

रस्त्यावरचा ट्रॅफिक मगाशी होता, तसाच टॉप गिअर मधे होता. सहजंच माझं लक्ष पलीकडून येणाऱ्या म्हशीकडे गेलं. २ वयस्कर म्हशीच्या आडोशाने रस्ता क्रॉस करत होते. म्हशीच्या फेऱ्या सुरु झालेल्या बघून मला मजा वाटली आणि लक्षात आलं, की, म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं, या सारखा सुरक्षित पर्याय नक्कीच नाही. तेवढ्यात त्या मुलाचं लक्ष माझ्याकडे गेलं व त्यानी आनंदानी हात हलवला. बहुदा मनामध्ये मला थँक्स म्हटले असेल. मी पण हात हलवून त्याच्याशी संवाद साधला. तेवढ्यात माझी बस आली आणि मी आत चढलो.

नंतर साधारण महिनाभर माझी जा- ये स्कुटरनीच सुरु होती. स्कुटर असली, की, माझा जाण्यायेण्याचा रस्ता थोडा बदलतो.

आज बायको स्कुटर घेऊन बावधनहून लवकर घरी गेली, त्यामुळे मला बसनी जायचे होते. मुलीकडून निघालो आणि चालत मेनरोडला पोहोचलो. साडेसात ची वेळ असल्यामुळे रस्त्याच्या दोन्हीबाजूनी सुसाट गाड्या धावत होत्या, सगळीकडून हेडलाईट डोळ्यावर येत होते, कर्कश्य हॉर्न वाजत होते. काही टू व्हीलरवाले उलटीकडून येत होते. काही फुटपाथवरून येत होते. थोडक्यात म्हणजे, पुण्यातल्या कुठल्याही हमरस्त्याचं चित्र समोर होतं. चित्रातला एक रंग मिसिंग आहे, हे पटकन लक्षात आलं. जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करतांना कुणीच दिसत नव्हते. मी मनात म्हटलं, हे गेले कुठे? तेवढ्यात माझं लक्ष थोडं पलीकडे उभ्या असलेल्या म्हशीकडे गेलं आणि म्हशीबरोबरच्या मुलाचं माझ्याकडे गेलं. मला बघताच मुलांनी हात उंचावला आणि ओरडला, ‘काका, चला पलीकडे सोडतो. फ्री मध्ये, पैसे द्यायचे नाही’.

माझ्या डोक्यात महिन्यापूर्वीच्या घटनेची ट्यूब पेटली, आपण याला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचे ५ रु दिले होते.

मुलगा मला थांबा म्हणाला आणि धावत जवळच्या फुलवाल्याकडून एक फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आला. मला गुच्छ देऊन त्यानी खाली वाकून मला नमस्कार केला व म्हणाला, काका चला.

आम्ही म्हशीच्या आडोशाने रस्त्यावर उतरलो आणि चालायला लागलो. महिन्यापूर्वी गेलो होतो, तेव्हा म्हैस थोडी बिचकत होती. आज ती एकदमच कंफर्टेबल वाटत होती. आपल्याकडे सिग्नल तोडणारे, उलटे येणारे, फुटपाथवर गाड्या घालणारे जेवढे कंफर्टेबल असतात तेवढीच.

चालता चालता —

मी : अरे म्हशीला घेऊन इकडे काय करत होतास? आणि मला हा गुच्छ कशाकरता?

मुलगा : काका, गेल्या वेळेला आपण भेटलो होतो, त्या दिवसापासून मी रोजच इथे असतो. आणि रोजचं तुमची वाट बघत होतो.

मी : कशाकरता?

मुलगा : तुम्हीच मला हा मार्ग दाखवला. संध्याकाळी रोज म्हशीला घेऊन इथे येतो आणि रस्ता क्रॉस करणाऱ्यांची मदत करतो, मला पण छान पैसे मिळतात. गेल्या १० दिवसांपासून ह्याच रोडवर आता ८ म्हशी सोडल्या आहेत. घरचे सगळेच म्हशींबरोबर इथे निरनिराळ्या चौकात येतात, व २- ३ तास थांबतात. रोजचे म्हशीमागे ८० – १०० रु मिळतात. ह्या वेळेला म्हशींना काहीच काम नसते. त्यांची खाण्यानंतरची शतपावली होते. रात्री त्यांना झोप पण छान लागत असेल. त्यामुळे दूध पण वाढले आहे.

मी : ट्रॅफिक कमी असेल तर ट्रिपा मिळत नसतील!

मुलगा : काका, क्रॉस करणारी पब्लिक कायमच असते. आणि ट्रॅफिक कमी असतांना गाड्यांवाले जास्तच स्पीडनी आणि वेड्यावाकड्या गाड्या मारतात. त्यामुळे माझ्या ट्रिपांना मरण नाही. अगदीच दुपारी किंवा रात्री ९ नंतर मीच येत नाही.

मी : वा, क्या बात है!

तेवढ्यात आम्ही पलीकडे पोहोचलो. तिथे ५- ६ वयस्कर स्त्री – पुरुष उभे होतेच. मुलानी लगेच त्यांना माझी ओळख करून दिली – ह्या काकांनीच मला ही म्हशीची कल्पना दिली. वगैरे.

मी मनातून आनंदलो व देवाचे आभार मानले.

सगळ्यांनीच मला थँक्स दिले. त्यातल्या तिघा जणांनी मला बाजूला घेतले व मुलाला सांगितले, ‘आम्ही पुढच्या ट्रिप ला येतो. तू जा पुढे’.

एक जण (मला) : तुम्ही आमचा व आमच्या घरच्यांचा फार मोठा प्रॉब्लेम सोडवला आहे. आता घरून बाहेर पडतांना बायको बजावते, ‘म्हैस असेल तरच रस्ता क्रॉस करा. २ -५ रु जाऊ देत’.

दुसरी व्यक्ती : पूर्वी रोज रस्ता ओलांडताना समोर म्हशीवर बसलेले यमराज दिसायचे. आता त्यांची म्हैसच बरोबर असते, त्यामुळे एकदम ‘बी – न – धा – स’.

तिसरी व्यक्ती : आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढच्या मीटिंगला आम्ही तुम्हाला बोलावू. आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुम्हाला नक्की यायचे आहे. तुमची म्हशींची कल्पना म्हणजे – तोड नाही. फोन नंबर ची देवाण घेवाण झाली.

त्यांना बाय करून मी बस स्टॉप वर पोहोचलो. तिथे बसायला नवीनच बाक केले आहेत. बाकावर बसलो आणि कल्पनेच्या दुनियेत पोहोचलो ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳

पुढच्या काही दिवसांनंतरची वर्तमानपत्रे मला दिसायला लागली ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳

# ‘सिनियर सिटिझन्सच्या मदतीला म्हशी सरसावल्या’

पुण्यातल्या रस्त्यांवर चालणे ‘मौत का कुंवा’ मधे गाडी चालवण्याइतके धोकादायक होते. तुम्हाला कोण आणि केंव्हा उडवेल, ही चालणाऱ्यांच्या मनात सतत धास्ती असायची. म्हशीचा आडोसा घेऊन चालतांना लोकांची ही धास्ती आता संपली आहे. खाली निरनिराळ्या चौकातले वयस्कर मंडळींना घेऊन रस्ता क्रॉस करणाऱ्या म्हशींचे फोटो होते.

# ‘रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्स ना रामराम’

बहुतेक रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स हद्दपार झाले आहेत. रस्त्यांवर ठराविक अंतरांवर म्हशींची जा – ये सुरु असल्यामुळे वाहनांच्या वेगावर आपोआपच वचक बसला आहे. ‘वाहने सावकाश चालवा, पुढे स्पीड ब्रेकर आहे’ ह्या पाट्या जाऊन, ‘म्हशी पुढे आहेत’ अशा पाट्या आल्या आहेत.

# ‘आर्थोपेडीक क्लिनिक मधली गर्दी ओसरली’

रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स काढल्यामुळे वाहन चालकांचे पाठीचे व कंबरेचे दुखणे यात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.

# ‘शाळा चालकांची म्हशीला पसंती’

शाळा सुटल्यानंतर लहान मुले रस्ता ओलांडताना वाहनांची नेहेमीच दशहत असायची. शाळेनी शाळा सुटतांना शाळेसमोर २ म्हशी तैनात कराव्या, अशी पालकांनी शाळा चालकांकडे मागणी केली आहे. बहुतेक शाळा चालकांनी याला मंजुरी दिली आहे.

# ‘म्हशींना सर्वच शहरांमध्ये डिमांड’

सर्वच मोठ्या शहरांमध्ये पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकरता म्हशींची मदत घेणार. पाहणी पथके पुण्यात दाखल.

# वर्षातली सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना म्हणून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

मीडिया संशोधकाच्या शोधात! ! !

काहीतरी गोड आवाजामुळे माझी तंद्री मोडली. शेजारी बसलेली मुलगी सांगत होती, बस येतेय, चला. लांब बस दिसत होती. मी उठून पुढे आलो. बाजूला म्हशीच्या ट्रिप सुरु होत्याच. तेवढ्यात बस आली. मी म्हशीकडे बघून तिला बाय केलं आणि बसमध्ये चढलो.

लेखक : सुधीर करंदीकर 

मोबा 9225631100

इमेल < srkarandikar@gmail. com >

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शिकार…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? जीवनरंग ?

“शिकार…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आई मी आता खूप खूप थकलोय गं! होत नाही हल्ली पूर्वीसारखी शिकार करणं!

तारुण्यातली रग, उमेद गळून पडली या म्हातारपणात… का कुणास ठाऊक सतत तुझी मला अलीकडे फार आठवण येत होती…

आणि आजही ती आठवण मला येते, तेव्हा डोळे भरून येतात आई. त्यावेळी किती लळा

लावलास तू आई मला! मी लहान बछडा असल्यापासून सांभाळलंस.

मला माझे गणगोत कुणी असतील असं आठवतंही नव्हतं…

नाही म्हणायला तूच कधीतरी मला ते सांगत असायचीस. काळाचा घाला यावा तसा त्या नराधम शिकाऱ्यांनी आमच्या कुटुंबावर बंदुकीच्या फैरीवर फैरी झाडल्या..

आमच्या कुटुंबातले सगळे बळी पडले. तेव्हा मी एकटाच मृत आईच्या कुशीत पहुडलेलो..

त्या शिकाऱ्यांनी मला पाहिलं आणि उचलून घेत गुहेतून बाहेर आले..

तसा मी टणकन खाली उडी घेतली. माझ्या आयुष्यातील ती पहिली उडी..

मी पळत पळत निघालो. शिकारी माझ्या मागे मागे येत होते…

आणि तितक्यात आई तू कुठून तरी अवतरलीस, मला तू अलगदपणे तोंडात धरून जंगलात नाहीशी झालीस..

शिकार्‍यांना बंदुकीचा चाप ओढताच आला नाही..

आणि तु माझा जीव वाचवलास.. तिथून पुढे मी तुमच्या बरोबरच राहू लागलो..

मला तू घेऊन आलेली तुझ्या दादल्याला आवडलं नाही हे त्याचं वेळी मला जाणवलं.

त्यानं तुला म्हटलं देखील,

‘हि पीडा इथं कशाला आणलीस आणि कळून सवरून आपलाच मृत्यू लवकरच का ओढवून घेतेस? कधी असं झालयं का आजवर वाघाच्या जातीनं आपली शिकार केलेली नाही. तो एक ना एक दिवस आपली शिकार नक्की करणारं’

 तेव्हा तू तुझ्या दादल्याला म्हणाली होतीस,

 ‘लहान अनाथ बछडं पाहून माझं आईचं हृदय द्रवलं. मी त्याला सांभाळेन आणि कळता सवरता झाला कि त्याला त्याच्या बिरादारीत सोडेन. त्यानं शिकार करणं हा त्यांचा जीवन धर्म आहे, त्याचा तो पाळेल आणि मी एक आई आहे, तो माझा धर्म मी पाळेन’..

 पण तुझ्या दादल्याला ते तितकसं रूचलं नाही तुझ्यापुढे त्याचं काही चाललं नाही..

 पहिले काही दिवस तुझ्या अपरोक्ष मला त्रास देऊन हाकलू पाहात होता पण तू मात्र मला सतत जपत असायची.

तुमच्या कळपातील इतरजण दादल्याच्या सांगण्यावरून मला कितीतरी वेळा त्रास देऊ लागले.. पण मी तिकडं तुझ्याकडे पाहून दुर्लक्ष केले..

हळूहळू मी वयात येऊ लागलो आता मला माझी बिरादारी हवी हवीशी वाटू लागली तसचं तुझ्या कळपातले देखील माझ्यापासून दोन हात लांब राहू लागले..

आणि एक दिवस तूच मला आमच्या बिरादारीच्या वेशीवर सोडून गेलीस.

त्यावेळी तुझे ते पाणावलेले डोळे मी पाहिले..

अगदी संथ गतीने तू निघालीस सारखी सारखी मान वेळावून तू माझ्या कडे पाहात होतीस..

मला गलबलून आलं होतं. डोळेही पाणावले होते गं माझे तेव्हा.. कदाचित नैसर्गिक ती गोष्ट असावी माय लेकरात ताटातूट होते असते तेव्हा अशीच घडणारी.

अशी जगावेगळी, न भुतो न भविष्यती अशी आपली माय लेकराची जोडी जमली होती..

तू मला तिथे सोडून गेलीस खरी, पण माझ्या बिरादारीतल्या लोकांनी मला जवळ केलं नाही..

 ते मला डरकाळया फोडत म्हणाले,

‘आपल्या बिरादारीत शेळपटांना थारा नाही.

तुला आम्ही बहिष्कृत केले आहे.. तुझा तुला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे.

स्वतःची शिकार, गुहा तुझं असेल. आमच्यापैकी कुणीच तुझ्या मदतीला सोबतीला असणार नाही. तू त्या हरणांच्या कळपात लहानाचा मोठा होत गेल्याने डरपोक झाला आहेस. ’

अशी बरीच निर्भत्सना त्यांनी माझी केली आणि तिथून त्यांनी मला बाहेर हाकलं..

आई! आता परत तुझ्याकडे येणं सुज्ञपणाचं नव्हते.

मग मी एकट्याने राहण्याचा निर्णय घेतला.

गुहेचा प्रश्न सोडवला आणि भुक भागविण्यासाठी सगळं जंगल पालथं घालावे म्हणून भटकू लागलो. पण पदोपदी माझ्या बिरादारीतल्या लोकांनी धमकावलं.

 ‘हे जंगल आमच्यासाठी आहे. इथं तुला शिकार करता येणार नाही. तुला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल’..

त्यामुळे मला शिकार करणं मुश्किल झालं. इकडं माझी भुक खवळू लागली..

एक दिवस गेला, दोन दिवस गेले. दुसऱ्या जंगलात जाण्याचा मी विचार केला. पण ते कुठे असेल किती लांब असेल. असेल का नसेल याचा काही अंदाज येईना..

बरं तिथवर जाण्यासाठी अंगात ताकद तरी हवी होती..

आधीच दोन चार दिवसाच्या उपासमारीने जीव घायकुतीला आलेला आणि केलेली सततच्या पायपीटेने शरीर गलितगात्र झालेले..

आता एक तरी अन्नाचा कण पोटात गेल्याशिवाय काही होणे नव्हते..

मी हताश, पेंगळून टेकडीवर बसलो होतो आणि माझी नजर सहज कुरणावर चरणाऱ्या त्या तुमच्या कळपावर गेली..

भूक शमवणे हाच एकच विचार डोक्यात घोळत असताना, मागचा पुढचा कोणताच विचार न करता जीवाच्या आकांताने मी धावत सुटलो..

आई तुला सांगतो मी सुसाट धावत येतोय हे त्यांना दिसले, मग तेही पाच दहाजण, आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. त्यात एक लंगडत धावताना मला दिसले.. आणि माझी शिकार पक्की झाली..

मी होता नव्हता त्राण आणला आणि त्या भक्ष्यावर झडप घातली..

आपला पाय ओढत जिवाच्या आकांताने पळू पाहणारा तो… अखेर माझी शिकार बनला..

मी प्रथम लचक्यावर लचके तोडून काढले बकाबका दोनचार घास गिळले असतील नसतील तोच मला तो चेहरा दिसला.. तुझ्या दादल्याचा… माझी भुकच मेली.. आई!…

आई मी तुझा खूप खूप अपराधी आहे. ज्याला जिवापाड जपून मातेच्या वात्सल्याने वाढंवलंस, आपल्या शत्रूच्या बिरादारीतला असून मी, बछ्डा असल्यापासून आईचं प्रेम दिलंस… आणि मी… मी मात्र आमच्या वाघाच्या मुळ स्वभावधर्माला भुकेला शेवटी बळी पडलो गं… आई मी कृतघ्न ठरलो. मला क्षमा कर असं मी कोणत्या तोंडाने म्हणू ?आता आई तुला जी काही मला शिक्षा करशील, ती भोगायची माझी तयारी आहे.. “

 एकीकडे आपलं कुकूं आज पुसलं गेल्याच दु:ख आईला दाटून आलं होत आणि त्याची शिकार करणारा आपलाच मानसपुत्रच निघावा या नियतीच्या कात्रीत एक आईच प्रेम सापडलं गेल होतं. पण शेवटी मातृहृदयच जिंकलं गेलं होतं.

“आई तू मला जवळ ओढलंस तुझं तोंड माझ्या डोक्यावर ठेवलंस.. नि आपल्या डोळ्यांतील आसवांना मुक्त वाहू दिलेस. माझ्या पाठीवरून तुझा प्रेमळ हात फिरला गेला, ती तुझी मुक संमती समजून तिथून मग मी मूकपणे निघून गेलो… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares