सुश्री मंजुषा सुनीत मुळे

कवितेचा उत्सव 
☆ उमेद— ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
रोजचा दिवस नवा, रोजची रात्रही नवी
रोज नव्याने उगवायची रहात नाही
तसंच अगदी तसंच — मीही रोज नव्याने जगणं सोडत नाही —
थंडीचा जाच, उन्हाचा कांच, पावसाचं झोडपणं संपत नाही
पण म्हणून दिवस-रात्र उगवायचे थांबत नाहीत
अन मीही रोज नव्याने जगणं सोडत नाही —
किती दुःखं अन किती सुखं, रहाटगाडग्याची ही गाडगी
पण दुःखानंतर सूखच येणार, देवाकडेही पर्याय नाही
म्हणूनच रोज नव्याने जगणं, मी काही सोडत नाही —
व्याप-ताप-काळज्या-प्रश्न, मागेमागेच करत असतात
सारखं लक्ष वेढ्यात असतात, पण मी दखल त्यांची घेतच नाही
अन रोज नव्याने जगणं मी काही थांबवत नाही —
रुसणं-फुगणं-मानापमान, अन धुसफूस-कुरकुर-कुरबुर करणं
माणसं काही थांबवत नाहीत, पण त्यानेही माझं भान सुटत नाही
आणि माझं रोज नव्याने जगणं, मी काही सोडत नाही —
दुखणं,यातना अन सारख्याच वेदना, या ना त्या अवयवाची सततची काही याचना
पण त्यांचे लाड पुरवतांना, मी मुळी कधी थकतच नाही
आणि रोज नव्याने जगणं, मी काही थांबवत नाही —
सोबतीचे सख्खे सांगाती अचानक हात सोडून जातात, दुःख मागे ठेवून जातात
पण माझ्या मनातल्या त्यांच्या अढळ स्थानाला, तेही धक्का लावू शकत नाहीत
म्हणूनच मग मीही पुन्हा रोज नव्याने जगणं थांबवत नाही —
माहितीये आज ना उद्या जायचंच आहे, जे अटळ आहे ते टळणार नाही
पण त्या अटळ उद्यासाठी, मी आजच रडायला लागणार नाही
अन तो दिवस उगवेपर्यंत, माझं रोजचं फुलणं मी सोडणार नाही
— अन तोपर्यंत माझं रोज नव्याने जगणं मी थांबवणार नाही
— माझं रोज नव्याने जगणं मी कधीच सोडणार नाही …
© मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈