☆ दावा परमार्थ – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – श्री श्रीकांत पुंडलिक ☆
कविवर्य डॉ निशिकांत यांची ही एक भावपूर्ण कविता आहे. ही कविता म्हणजे कविवर्यानी आपल्या आयुष्याकडे वळून बघताना केलेले आत्मपरीक्षण आहे.जणू काही आयुष्याचा लेखाजोखाच मांडला आहे.
माणसाचं जीवनच प्रश्नमय आहे. जन्मल्याबरोबर माणसाला प्रश्न पडतो, “कोsहं?” या प्रश्नापासून सुरू झालेलं आयुष्य ‘”सोहं” या उत्तराप्रत येईपर्यंत अनेक प्रश्नांनी भारलेलं असतं. आणि माणूस त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. या जीवन प्रवासात पुष्कळ वेळा आत्मकेंद्री बनत जातो आणि तो फक्त स्वतःपुरता जगायला लागतो. मी, माझं कुटुंब, माझा उदरनिर्वाह, माझी समृद्धी याचा विचार करताना स्वार्थ काय परमार्थ काय या संबंधी तो विचार देखील करत नाही. पण जो ज्ञानी मनुष्य असतो तो मात्र या सर्व क्रियाकलापापासून अलिप्त होत स्वार्थ, परमार्थ, जीवन याचा, साकल्याने विचार करितो. प्रस्तुत कविता म्हणजे याच विचाराचं भावपूर्ण प्रकटीकरण आहे.
कविवर्य आपल्या कवितेच्या पहिल्या कडव्यात अतिशय नम्रपणे, त्याच्या जीवनाचं अधिष्ठान असलेल्या सद्गुरू स्वामी समर्थाच्या चरणी लीन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्यात केलेल्या जीवन प्रवासाची माहिती देतात.
कविवर्य स्वतः आयुःशल्य विज्ञान स्नातक आहेत. त्यांना शारीरिक व्याधी आणि त्यातून सुटकेचा मार्ग माहिती आहे. या ज्ञानाच्या आधारे त्यांनी अनेकांना व्याधीमुक्त केलेलं आहे. त्यात त्यानी कुठलाही स्वार्थ जोपासला नाही. त्यामुळे स्वतच्याही नकळत कविवर्य अध्यात्मच जगले आहेत.
दुसऱ्या कडव्यामध्ये कवींनी आपल्या कामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. कवींचा व्यवसाय जरी वैद्यकीचा असला तरी त्यामागची प्रेरणा मात्र, “शिव भावे जीव सेवा” हीच होती. जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये कवींनी आपल्या आराध्य देवतेलाच पाहिले. व्यवसाय आणि जीवनातील यशाचं श्रेय मात्र विनम्रपणे कवी स्वामी समर्थाना देतात.
मी कर्ता म्हणशी तेणे तू कष्टी होसी।
परा कर्ता म्हणस। तेणे तू पावसी। यश कीर्ती प्रताप॥”
ही समर्थ रासमदास स्वामी याची उक्ती कवी आचरणात आणतात. स्वामी समर्थाविना जीवन निरर्थक आहे हीच भावना या कडव्यात कवींनी मांडली आहे.
तिसऱ्या कडव्यात मात्र कविवर्याची भावना मात्र व्याकुळ झाली आहे. “संध्या छाया भिवविती हृदया” अशी भावना या कडव्यातून व्यक्त होते आहे. व्यासाच्या या वळणावर फक्त स्वामी समर्थाची साथ असावी आणि जीवन उजळून निघावे हीच भावना प्रकट होते आहे. आयुष्य हेच स्वामी समर्थाची पूजा, आणि आता उत्तरपूजा सुरू झाली आहे
न्यूनं संपुर्णतांयाती सद्यो वंदेतमच्युतं
ही कविता वाचत असताना शब्दांचा साधेपणा, प्रासादिकता, यामुळे कवितेमध्ये अंगभूत नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील आर्तता थेट जगद्गुरू संत तुकारामाच्या, “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” या भावनेशी नाते सांगणारी आहे.