मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खार….भाग 2 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ खार….भाग 2 ☆ मेहबूब जमादार ☆

एखदा एका नागानं तिचा हा चक्रव्युह भेदण्याचा प्रयत्नं केला होता,पण मोरांने त्याला रक्तबंबाळ केलं होतं. त्याला पळताभूई थोडी झाली होती. अगदी शर्थीने निसटून त्यानं त्याचा जीव वाचवला होता. जवळच्या घळीत तो अदृष्य झाला होता. तिनं निवडलेले घर निश्चितच धोकादायक नव्हतं.

सूर्य मावळतीकडे झूकू लागला होता.

ती झाडाच्या शेंड्यावर बसून वन पहात होती. तिच्या कानांवर फांद्यांचा मोठा आवाज येवू लागला. तिला कळून चूकलं वानरं जवळ येत असल्याचं. ती पंधरा ते वीस वानरांची टोळी होती. झाडांच्या फांदंयानां ते हलवून सोडत. ख्यॅ. . . ख्यॅ…. . करत तिच्याही अंगावर येत. ती झरकन आपलं घरटं जवळ करी. कांही वेळांतच हा कळप पुढच्या झाडावर सरके. या वानरांच्या मर्कट लीलानां अंत नसे. जणू काय वन आपलंच आहे असं ते वागत. छोट्या कै-या,जांभळ,पेरू, अशा अनेक झाडावरची फळे तोडत. त्यातली थोडीसीच खात. उरलेली अर्धी खाली भिरकावून देत. एखादा गरजू ते खाईल हे त्यांच्या डोक्यातच नसे. खचितच ही टोळी झाडावरून खाली उतरे. ओढ्याच्या काठावर जावून बसे. ते इकडेतिकडे पहात. कानोसा घेवून मगच पाणी पित. क्षणात झाडावरती पसार होत.

दिवस पुढे जात होते. पण आज तिला कांहीस उदास वाटू लागलं होतं. तिची समागमाची इच्छा तिचं मन सैरभैर करून सोडी. ती नराच्या शोधात फांदीवर बसून राहीली. ती चिर्र…. असा आवाज काढे,शेपटी इकडून तिकडे नाचवे. नराला बोलविणेचे हे संकेत होते. दोन जोडीदार तिच्याकडे आले. पैकी एक लगट करू लागला. तिला तो कांही वेळ धरू पाहे,पण लगेच अंगावरून ऊठे. ती ऊटली तिनं तिचं तोंड त्याच्या तोंडाजवळ नेलं. बहूधा ती म्हणाली असेल,अरे आवरनां,मी कितीवेळ अशी बसून आहे’. जोडीदाराला ती काय म्हणतेय ते कळलं असावं. त्यानं पुढच्या दोन्ही हातानीं तिला मागून उचललं. तिनं शेपूट बाजूला केलं. तीनचार मिनीटं दोघांच्या तोंडातून चित्कारण्याचा आवाज येत राहीला. दोघं अलग झाले. ती खूशीत घरट्याकडे वळली.                         

असं त्या आडवड्यात दोन चारवेळा घडलं. निसर्ग नियमांनूसार सारं कांही घडत होतं. त्याला ती अपवाद नव्हती.

महिन्याभरातच ती गरोदर असल्याचे तिला कळून चूकले. थोडंस आता सांभाळायला हवं हे तिला पटलं.

कांहीच दिवस उलटले. तिचं अंग आताशा जड होवू लागलं होतं. पहिल्यासारखं तिला झाडावर सरसर चढता येत नव्हतं. या फांदीवरून दुस-या फांदीवर तिला ऊड्या मारता येत नव्हत्या.                     

आज ती कांहीशा विचारात होती. घरटं सोडून शेजारच्या फांदीवर निवांत पहूडली होती. फांदीवर तिनं पुढचे दोन्ही हात व मागचे दोन्ही पाय दोन्ही बाजूस टाकले होते. ती सगळीकडे लक्ष ठेवून होती. खाली पहाताच तिच्या लक्षात आलं,एक साळूंखी ती राहतेल्या झाडाच्या बुंध्यापाशी कांही जमीन उकरत होती. तिच्या लगेच लक्षात आलं,तिनं मागच्या आठवडय़ात कांही बिया तिथं पूरून ठेवल्या होत्या. ती गरोदर असलेने पुढच्या अन्नाची तिला गरज होती. ती लगेच खाली आली. तिला पहाताच साळूंखी भूर्रकन उडून गेली.

साळूंखीनं उकरलेल्या बिया तिनं पुन्हा उकरून खाली घातल्या. परत त्यावर माती टाकली.                      

प्राण्यांत दुस-यांच चोरून खाणं हे सर्रास घडे. आता या सगळ्यांची काळजी घेणं ही तिची जबाबदारी होती. तिचा जोडीदार कामांपुरता आला होता. पुढचं सारं तिलाचं कराव लागणार होतं.

परत ती फांदीवर त्याच परीस्थितीत जावून पहूडली. तिचा डोळा केंव्हा लगला हे तिलाच कळलं नाही.

पक्षांच्या आवाजानं ती ऊटली. सारं झाड पक्षानीं भरून गेलवतं. हळूहळू अंधार वनाला लपेटू लागला होता. जसा पूर्ण अंधार वनांवर दाटलां तसा पक्षांचा आवाज बंद झाला. सगळीकडं सामसूम झाली. ती घरट्यात जावून शांतपणे झोपी गेली.

सकाळ ऊजांडली. तिनं घरट्यांतून पाहिलं. तिचे सारे सहकारी फांद्यांवर इकडेतिकडे झेप घेत होते. चिर्र. . चिर्र. . . असा चित्कार सगळीकडं ऐकू येत होता.

ती घरट्यांतून बाहेर आली. तिनं शेपटीचा झुबका दोन तीनदा हलवला. ती सगळ्या सहका-यामध्ये सामील झाली.

क्रमश:…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खार….भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ खार….भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

ते ब-यापैकी घनदाट वन होतं.त्या वनातून वहाणारा सुंदरसा ओढा छान अशी वळणं घेत वनाबाहेर पडत असे.दोन्ही बाजूस असणा-या झाडांनी त्याला कवेत घेतलेलं. किंबहूना  त्याच्या पाण्यामूळेच ते वन वाढलेलं.सगळी झाडं तिथं गुण्यागोविंदानं नांदत होती.कांही रानटी झाडें तर कांही जांबळ,आंबा,सिताफळ,पेरू अशी फळवर्गीय झाडें गर्दी करून होती. मूळात वन निसर्गनिर्मित होतं.

सूर्य उगवला तरी चूकूनच त्याची किरणं झाडांच्या पायाशी खेळत.सूर्य डोक्यावर आला की तो वनांत ब-यापैकी तळांशी यायचा.झाडांच्या फांद्यानां चकवत. फांद्या डोलतील तशी किरणं डोलायची. वनांतलं वातावरण नेहमीच थंडगार असायचं.ओढ्याचं पाणी काठावरल्या झाडांच्या सावल्या घेवून पुढें पुढें सरकायचं.पाणी इतकं स्वच्छ की ओढ्याच्या तळातील गोल गोल गोटे,निरनिराळ्या प्रकारचे मासे प्रसंगी रेतीही दिसून येई.क्वचित बगळे भक्षासाठी काठांवर बसलेले असत.मासा पाण्यावर दिसताच ते अलगद पकडत.

वन फारसं मोठं नव्हत.बरीचशी झाडें इर्षेपोटी उंच वाढलेली.या झाडावरती मोर ,लांडोर, बगळे, कावळे, टिटवी, कोकिळा, पारवे,चिमण्या, सुतारपक्षी, साळूंख्या हे सर्वजन गुण्यागोविंदानं नांदत होते.प्रत्येकजन आपआपलं झाड निवडून आपलं राज्य प्रस्थापित करून होतां.कधीमधी वानरांची टोळी दंगा करायला यायची.थोडे दिवस थांबून निघून जायची.

थोडंस झुंजूमुंजू झालं.अवघ वन जागं झालं.मोरांचा आवाज वाढला.पक्ष्यांचा कलकलाट वाढला.आवाजाचं मधूर गुंजन सारं वन स्तब्ध होवून ऐके.हळूहळू पांगापांग होवू लागली.जो तो अन्नाच्या शोधार्थ घरट्यांतून बाहेर पडू लागला. 

हे सारं दृश्य मोठ्या पिंपळावरच्या ऊंच बिळातून(घरट्यातून) बाहेर येत एक खार आपल्या तीक्ष्ण नजरेनं पहात होती.राखाडी रंगाची,अंगावर तीन पांढरे पट्टे ल्यालेली व झुपकेदार शेपूट असलेली.खालच्या दोन पायावर बसून ऐटदारपणे ती वनांकडे पाही.

रोज  संध्याकाळी गजबजलेलं वन उजाडताच कुठं गायब होतं हे तिलाच कळत नव्हतं.ती जादातर पांच-दहा झाडावरती फिरून येई.आज फिरतानां तिला पेरूचं झाड दिसलं.तिनं मनसोक्त पेरू कूरतडले.त्यातला गाभा खाल्ला अन बिया खाली टाकून दिल्या.खात असता तिनं चिर्र…..असा आवाज दिला,शेपटी ऊंचावली.आवाज ऐकताच ब-याच खारी त्या झाडांवर झेपा टाकत आल्या.पेरूतला गाभा खायचा अन बिया खाली टाकायच्या.परत खाली जावून पुढच्या हातानीं उकरून त्या पुरायच्या.

हे सारं करत असतानां तिची चाणाक्ष नजर सभोवताली असे.कांही आवाज आला तर सर्र…दिशी ती झाडावर चढे.शेंड्यावर जावून बसे.

शेंड्यावर बसून ती ओढा न्याहाळत होती.तिला भला मोठा नाग ओढ्याच्या काठांवरून वनांत शिरतेला दिसलां.त्याच्या तोंडात बेडूक होता.बिचारा सुटण्याचा प्रयत्न करत होता,पण नागाने त्याच्या अणकुचीदार दातांनीं त्याला घट्ट धरलेलं होतं.

तिनं हे पाहिलं.तिचं सारं अंग शहारलं.तिनं दोन- तीनदा आपली शेपुट इकडेतिकडे नाचवली.तिनं जागा सोडली नाही.आता तर त्या नागाने बेडूक पूर्ण गिळला होता.हळूहळू त्याची चाल मंदावली होती.पण पुढं कांहीतरी संकट त्याला जाणवलं असांव.तो क्षणांत एका घळीत शिरून अदृष्य झाला.प्रत्येकजण आपल्या जीवाला सांभाळतो,हे तिला कळून चूकलं.                       

ती शेंड्यावरून खाली आली.ती आपल्या घरी जाणार तोच तिला एक शेतकरी आपले दोन बैल पाणी पाजण्यासाठी उतारावरून ओढ्याकडे येत असलेला दिसला.त्या वनांत हिच एक वाट होती.गुरंढोरं,शेळ्यामेंढ्या त्या वाटेने येत.पाणी पिवून जात.

तिला माहित होते, आपण चाणाक्ष नजरेनं सारं पाहिलं पाहिजे.वनांत सावज होते तसे शिकारीही होते.

तिला आठवलं मागच्या बाळंतपणांत नागाने तिच्या दोन्ही पिल्लांचा फडशा पाडला होता.ती ओरडली.चित्कारली.दु:ख करण्यापलिकडे तिला कांहीच करता आलं नाही.ती एकच करू शकली, तिनं तीचं घर बदललं.उंच अशा पिंपळाच्या झाडावर ती रहायला आली.तिला तिथं कांहींस सुरक्षित वाटायचं.त्याच झाडांवर मोरांचा अड्डा होता.कांही सुतार पक्षी रहात होते.नागाची आता तिला भिती राहीली नव्हती.

क्रमश:…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘झुळूक’ – भाग-३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘झुळूक’ – भाग-३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- मी आता त्याना एकटक न्याहाळत राहिलो. ते मला वेगळेच वाटू लागले. देवासारखे. खिशातून औषधे बाहेर काढणारा माझा हात तसाच घुटमळत राहिला. ती औषधे त्यांना दाखवायची मला आता गरजच वाटेना. “व्हॉट इज दॅट?” डॉक्टरांचं लक्ष माझ्या हाताकडे होतंच. )  

“मी सध्या ही औषधं. . ” मी काहीसं घुटमळत औषधं त्याना दाखवली. ती पाहून त्यानी परत दिली आणि ते प्रिस्क्रिप्शन लिहू लागले.

“ती औषधं बरोबर आहेत पण डोस थोडा माईल्ड आहे. तुमच्या खोकल्याशी तुमची फ्रेंडशीप झालीय. ती या माईल्ड डोसला जुमानत नाहीय. अर्लीअर रुटीन इन्फेक्शन आता क्राॅनिक स्टेजला पोचू लागलंय. सो यू हॅव टू टेक धीस स्ट्राॅन्ग डोस फाॅर अ वीक. यू वील बी ऑल राईट. जमेल तेव्हा रेस्ट घ्या. रुटीन चालू राहू दे. या. . “

“सर,तापाचं काय?”

ते हसले.

“त्याचं काय?तो या खोकल्याचा लहान भित्रा भाऊ आहे. पहिल्या डोसला घाबरुनच तो पळून जाईल. डोण्ट वरी. “

“सर, पैसे ?”

“थर्टी रुपीज”

मला आश्चर्य वाटलं. फक्त तीस रुपये ?मी काही बोलणार तेवढ्यात त्यानी पुढच्या पेशंटला बोलावलं. पैसे देऊन मी जायला निघालो. मला इथून बाहेर पडावंसंच वाटेना. दाराजवळ जाताच मी मागं वळून पाहीलं. ते समोरच्या पेशंटशी हसून बोलू लागले होते. माझा स्वीच त्यानी केव्हाच ऑफ केला होता. मी बाहेर पडलो ते डाॅ. मिस्त्रींबद्दलची उत्सुकता मनात घेऊनच.

मी घरी आलो. दोन घास खाऊन मी औषध घेतलं. अंथरुणावर पाठ टेकली. डोळे मिटले. ग्लानी आली तरी मनातून डाॅ. मिस्त्री जाईचनात.

“कसं वाटतंय?”रात्री गप्पा मारताना भावानं विचारलं.

“खूपच छान. “

“डाॅ. मिस्त्री कसे वाटले?” त्याने सहजच विचारलं. मला खूप काही बोलायचं होतं,पण ते शब्दात सापडेचना.

“खूsप वेगळे आणि चांगले”

बोलता बोलता मी प्रत्यक्ष पाहिलेला तो आजी-आजोबांचा प्रसंग त्याला सांगितला.

“असे अनुभव मी तिथे अनेकदा घेतलेयत. प्रत्येक पेशंटची कुंडली त्यांच्या मनात पहिल्या भेटीतच अचूक नोंदली गेलेली असते. तू पुन्हा कधी गेलास,तर कांही क्षण तुझ्याकडे रोखून बघतील. ते बघणं म्हणजे मनात साठवलेल्या त्या कुंडल्या धुंडाळणं असतं. आणि मग हसून तुझं नाव घेऊन तुझ्याशी बोलायला सुरुवात करतील. . ” भाऊ असंच खूप कांही सांगत राहिला आणि मी थक्क होत ऐकत राहिलो.

आधीच भारावून गेलेल्या मला डाॅक्टर मिस्त्रींची खरी ओळख आत्ता होतेय असंच वाटत राहीलं. पस्तीस वर्षांपूर्वी स्विकारलेलं वैद्यकीय सेवेचं व्रत सचोटीने अव्याहत  सुरु आहे. ‘पारखी नजर’ हे त्याना मिळालेल़ं ईश्वरी वरदान तर होतंच,पण आजच्या प्रदूषित वातावरणातही त्याचा बाजार न मांडता त्यानी ते निगुतीने जपलेलं होतं. मुलगा सर्जन होऊन अमेरिकेत स्थायिक झाल्यावर ते दुखावले असणारच ना?पण खचले मात्र नाहीत. आपला वारसा पुढे कोण चालवणार हा विचार डोकावला असणारच ना त्यांच्या मनात?पण ती सल ते कुरवाळत बसले नाहीत. रुग्णसेवेचं व्रत त्यानी वानप्रस्थातही अखंड सुरु ठेवलंय आणि मिळणाऱ्या पैशांचा अव्याहत ओघ त्यानी अलगद गरजूंकडे वळवलाय. तेसुध्दा कसलाही गाजावाजा न करता. कधीही सुट्टी न घेणारे डाॅ. मिस्त्री वर्षातून दोन दिवस मात्र आपलं क्लिनिक पूर्णपणे बंद ठेवतात. पण हे आराम करण्यासाठी किंवा बदल म्हणून नव्हे. त्या दोन दिवसातला एक दिवस दहावीच्या आणि दुसरा बारावीच्या परीक्षांचा आदला दिवस असतो. या दोन्ही दिवशी या परिक्षांना बसणाऱ्या मुलामुलींची डाॅक्टरांचे आशिर्वाद घेण्यासाठी रीघ लागलेली असते. त्या सर्वांची अडलेली शिक्षणं डाॅक्टरांच्या आर्थिक मदतीमुळेच मार्गी लागलेली असतात. म्हणूनच त्या मुलाना डाॅक्टरांच्या आशिर्वादाचं अप्रूप असतं आणि डाॅक्टरना त्या मुलामुलींच्या भावनांची कदर. . !

हे आणि असं बरंच काही. सगळं ऐकताना मी भारावून गेलो होतो.

मुंबईची असाईनमेंट पूर्ण करुन परतताना मी अस्वस्थ होतो. मुंबईला येतानाची अस्वस्थता आणि ही अस्वस्थता यात मात्र जमीन अस्मानाचा फरक होता. ती अस्वस्थता उध्वस्त करु पहाणारी आणि ही हुरहूर लावणारी. . !डाॅ. मिस्त्रीनी मला औषध देऊन बरं तर केलं होतंच आणि जगण्याचं नवं भानही दिलं होतं. डाॅ. मिस्त्रींचा विचार मनात आला आणि उन्हाने तापलेल्या वातावरणात एखादी गार वाऱ्याची सुखद झुळूक यावी तसं मला वाटत राहिलं. ती झुळूक मी इतक्या वर्षांनंतरही आठवणीच्या रुपात घट्ट धरुन ठेवलीय. . !!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘झुळूक’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘झुळूक’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- एक छोटं टेबल. साधी खुर्ची. पेशंट तपासणीसाठी मागे पडदा लावून केलेला एका आडोसा. हे सगळं मुंबईतल्या डॉक्टरला शोभणारं नक्कीच नव्हतं. आणि तरीही यांच्यासाठी माझ्या भावाचा हट्टी आग्रह?)

अर्धा तास उलटून गेला, तरी नंबर लागायचं चिन्हच नव्हतं. डाॅ. आपले समोर बसलेल्या प्रत्येक पेशंटबरोबर हसतखेळत हास्यविनोद, गप्पा करीत मग प्रिस्क्रीप्शन लिहून देत. स्वत:बरोबर वाट पहात बसलेल्या पेशंटसच्या मौल्यवान वेळेचं  याना कांहीच कसं वाटत नाही या विचारानं मी अधिकच अस्वस्थ. तडक इथून निघून जावं असं वाटून त्याच तिरीमिरीत मी उठणार एवढ्यात माझा नंबर आला.

“बोला, काय प्राॅब्लेम?” डाॅ. नी हसतमुखाने विचारलं. त्या स्मितहास्याने मनातली अस्वस्थता थोडी कमी झाली. मी माझा प्राॅब्लेम सविस्तर सांगितला. मनातली थाॅयराईडची शंकाही बोलून दाखवली. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकतच ते जागचे उठले.

“कम. लेट मी चेक. “ते आत गेले. पाठोपाठ मी. नाडी परीक्षा झाली. टाॅर्चच्या प्रकाशात माझ्या घशातून त्यानी त्यांची शोधक नजर चौफेर फिरवली. इनमीन तीन मिनिटात चेकअप झालासुध्दा.

“बसा. नथिंग टू वरी. “त्यानी दिलेला दिलासा मला वरवरचाच वाटला.

“डाॅक्टर, थाॅयराईडचं काय करायचं?”

त्यानी माझ्याकडे एकदा रोखून पाहीलं. मग जागचे उठले. माझा गळा सर्व बाजूनी नीट चाचपून पाहीला.

“डोण्ट वरी. नो साईन आॅफ थायराईड अॅट आॅल. “

“हो डाॅक्टर, पण टेस्ट?”

डाॅक्टर हसले. “आय हॅव जस्ट नाऊ डन इट . युवर रिपोर्ट इज निगेटीव. “मी खरं तर आनंदी व्हायला हवं होतं, पण. . . .

“हो पण तरीही. . . “

“लिसन. “माझ्या नजरेतला अविश्वास त्यानी वाचला होता बहुतेक. “व्हाय शूड आय गिव्ह यू अनरिअॅलिस्टीक रिपोर्ट?प्लीज डोण्ट वरी. बिलीव मी. थायराईडचं इंडिकेशन नाहीय हे समजायला ती महागडी टेस्ट करुन तुमचा हार्डमनी कशाला वेस्ट करायचा?”बोलता बोलता प्रिस्क्रिप्शन लिहायला त्यानी पॅड पुढे ओढलं. मी सोबत आणलेली माझ्या डाॅ. नी दिलेली औषधं दाखवायला खिशातून बाहेर काढून ती त्याना दाखवणार, तेवढ्यात मला जाणवलं, माझं प्रिस्प्रिक्शन लिहीता लिहीता त्यांचा हात थबकलेला होता. त्यांची गंभीर एकाग्र नजर समोर दाराकडे पहात कशाचा तरी वेध घेत होती. मी मागे वळून पाहीलं. एक वृध्द जोडपं आत आलेलं मला दिसलं. आजी हात जोडत डाॅ. ना नमस्कार करीत होत्या. पण डाॅ. चं आजींकडे लक्षच नव्हतं. त्यांची गंभीर नजर बसायला मोकळी जागा शोधणार्या पण धाप लागल्यामुळे कासावीस झालेल्या आजोबांवर खिळलेली होती. दुसऱ्याच क्षणी हातातलं पेन तसंच टेबलवर टाकून त्यानी खुर्ची   मागे ढकलली. . . लगेच उठून आजोबांकडे धावले. एकदोघाना जवळ बोलावून आजोबाना उचलून बाहेर आणायला सांगून पार्किंगच्या दिशेने स्वत: बाहेर निघून गेले. पुढे क्षणार्धात आजोबाना आत बसवून कारने एक झोकदार वळण घेतलं आणि डाॅक्टर स्वत: चालवत असलेली ती कार गर्दीत दिसेनाशी झाली. सगळेच पेशंट अवाक् होऊन पहात होते. आजींच्या हुंदक्याने मी भानावर आलो. आजोबा हार्ट पेशंट होते आणि रूटीन चेकअपसाठी इथे आले होते हे आजींकडून समजल़ं. अर्ध्या तासाने डाॅक्टर परत आले. आजी जागच्या उठल्या. जीव मुठीत धरुन थरथरत त्यांच्यासमोर उभ्या राहील्या.

“ही इज आऊट आॅफ डेंजर नाऊ. ‘आधार’ हाॅस्पिटलमधे इंटेन्सीवमधे अॅडमीट आहेत. तिथे जाऊन डाॅ. कर्णिकना भेटा. ही वील हेल्प यू. “आजी क्षणभर घुटमळल्या. हात जोडून उभ्या राहील्या. डाॅक्टर हसले तेव्हा कुठे त्या रिलॅक्स झाल्या. लगबगीने बाहेर पडल्या. डाॅ. नी मनातला आजोबांचा स्वीच आॅफ केला. आणि शांतपणे माझं प्रिस्क्रिप्शन लिहायला घेतलं. मी आता त्याना एकटक न्याहाळत राहीलो. ते मला वेगळेच वाटू लागले. देवासारखे. मग मात्र खिशातून औषधे बाहेर काढणारा माझा हात तसाच घुटमळत राहीला. ती औषधं त्याना दाखवायची मला आता गरजच वाटेना.

“व्हाॅट इज दॅट?”डाॅक्टरांचं  लक्ष माझ्या हाताकडे होतंच.

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘झुळूक’ – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘झुळूक’ – भाग-१ ☆ श्री अरविंद लिमये

सेकंड ए. सी. चा मुंबईपर्यंतचा प्रवासही मला नकोसा वाटला होता. मनाविरुध्द काही करावं लागलं की असं होतंच. आॅफीसच्या या अनपेक्षित असाईनमेंटमुळे मुंबईतलं सलग आठ दिवसांचं हे वास्तव्य टाळता येणं शक्यच नव्हतं. एरवी कोणतंही काम मी उत्साहानं करायचोच, पण यावेळच्या किरकोळ आजारपणामुळे माझा उत्साह मरगळून गेला होता. अखेर  आॅफीसतर्फे सगळी सोय असूनही घरचं वातावरण ही माझीच त्यावेळची गरज असल्यामुळे मी डोंबिवलीला मावसभावाकडेच उतरायचं ठरवलं. किरकोळ आजारपण म्हणजे काय,  तर आठ दिवसांपासून ठाण मांडून बसलेला खोकला. आधी थोडं दुर्लक्ष, मग घरगुती उपचार, आणि नंतर फॅमिली डाॅक्टर यात आठ दिवस गेलेच. औषधं लिहून देताना डाॅक्टरानी थाॅयराईडची शंका व्यक्त करुन टेस्टही करुन घेऊ असं सुचवलं, पण या मुंबईट्रीपच्या घाईत ते राहूनच गेलं होतं.

नाईलाजाने बॅग भरली. त्या जड बॅगेबरोबर दुखरा घसा, ठाण मांडून बसलेला खोकला, डाॅक्टरानी सांगितलेली औषधं, आणि थाॅयराईडची भिती या सगळ्याचं ओझं होतंच.

याच थकल्या मनानं भावाच्या दाराची बेल वाजवली.  तो वाट पहात होताच. तो आणि वहिनी मला पाहून दचकलेच.

“का रे?असा का दिसतोयस?”भावानं विचारलं.

“किती खराब झालायस?काय होतंय?” माझ्या हातातली बॅग घेत भाऊ म्हणाला.

“बरं नाहीय थोडं”

“थोडं ?वेडा आहेस का तू?ताप आहे तुझ्या अंगात. ” बॅग घेताना झालेल्या ओझरत्या स्पर्शाने तापाची वर्दी त्याच्यापर्यंत

पोचवली होती.  मी फ्रेश होईपर्यंत भावाच्या सांगण्यावरुन वहिनीनी डाॅक्टरना फोनसुध्दा केला.

“डाॅ. मिस्त्रींची अपाॅईंटमेंट घेतलीय. तुम्हाला तिथं सोडून हे परस्पर आॅफीसला जातील. “वहिनीनी फर्मान सोडलं. “मी मऊ भात करते. तोवर चहा घेऊन थोडा आराम करा. “म्हणत ती आत गेली. भाऊ त्याचं आवरु लागला.

“तू ऐक माझं. आमच्या डाॅ. नी दिलेली औषधं बरोबर आणलीयत अरे. ती घेतली की बरं वाटेल.  “मी ठामपणे सांगितलं. कारण मिस्त्री हे नाव ऐकलं तेव्हा हे आपल्यापैकी नाहीत हाच विचार माझ्या मनात डोकावला होता. एरवीही हातचं सोडून पळत्याच्या मागं कशाला लागायचं?

“हे बघ, आता मी सांगतो ते ऐक. तुझ्याजवळची औषधं बरोबर घे. ती डाॅ. मिस्त्री एकदा नजरेखालून घालू देत. मगच मी निश्चिंत होईन. “तो माझं काही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हताच. डाॅ. मिस्त्री जसे कांही देवच होते त्याच्यासाठी.

“कोण हे डाॅ. मिस्त्री?”

“आमचे फॅमिली डाॅक्टर”

“स्पेशलायझेशन?” तो हसला. “MBBS आहेत. “माझा चेहराच पडला. “गेल्या पस्तीस वर्षांची प्रॅक्टीस आहे त्यांची. चल, आवर आता लवकर. “

माझा अंदाज बरोबरच होता. डाॅ. म्हणून ते प्रथमदर्शनी आवडले नाहीतच. केवळ नाईलाजाने पेशंटसच्या त्या भाऊगर्दीत मी माझा नंबर यायची वाट पहात ताटकळत बसून राहीलो.

‘चांगला डाॅक्टर’ म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच मनात रुढ झालेली एक कल्पना असते. रुबाबदार, हसतमुख, खूप मोजकं बोलणारा, खूप वेळ तपासणारा, तत्परतेने सगळ्या टेस्टस करुन घेणारा, तो चांगला डाॅक्टर. . !त्याचं रहाणीमान, त्याची लवकर अपाॅईंटमेंट न मिळणं,

त्याचं स्पेशलायझेशन, न परवडणारे व्यावसायिक दर हे त्याचे अत्यावश्यक स्टेटस सिंबाॅल्स. . !डाॅ. मिस्त्री या सगळ्याला छेद देणारेच.  चारचौघांसारखं व्यक्तिमत्व. गर्दीत उभे राहीले तर गर्दीतलेच एक वाटतील असे. सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांचं ते क्लीनिक.  एक मध्यम आकाराचा हॉल. पस्तीस वर्षांची प्रॅक्टीस आणि स्वतःची केबिनही नसावी? पेशंटच्या गर्दी पुढेच थोडं अंतर सोडून एक टेबल.  एक साधी खुर्ची.  पेशंट तपासणीसाठी मागे पडदा लावून केलेला एका आडोसा.  हे सगळं मुंबईतल्या डॉक्टरला शोभणारं नक्कीच नव्हतं.  आणि तरीही यांच्यासाठी माझ्या भावाचा हट्टी आग्रह ?

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रफू… ☆ प्रस्तुति – सुश्री अर्चना साठे ☆

?जीवनरंग ?

☆ रफू… ☆ प्रस्तुति – सुश्री अर्चना साठे ☆

एक 🤝🏼 मित्र भेटला परवा…

खूप जुना…

बऱ्याच वर्षांपूर्वी 😡भांडण झालं होतं आमचं…

नेमकं कारणही 🤔 आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर…

म्हणाला, “मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही… क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं मी ठरवलंय.”_

सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन… सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो…

अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही वेळापुरता बाजुला सारता आला नाही… तेव्हढा वेळच नाही मिळाला.

विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण… चेहऱ्यावर शक्य तेव्हढा भाव ‘आलासच ना अखेरीस’_ हा माज ठेऊन.

तो मला म्हणाला,

“दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली…

काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास…

ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं…

आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता…

वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली…

“त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमचंच…

मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी 🙏🏻माफी दुर्लक्षुन…

तू त्यावेळी मला म्हणाला होतास, ‘देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो “…

ती वेळ माझ्यावर आली… दोन महिन्यांपुर्वी…

नाही शिवू शकलो मी ते ⏺️भोक…

नाही करु शकलो रफू…

नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा आेतून ते एक छिद्र…

माझ्या मुलाच्या ❤️हृदयात पडलेलं…!

_ “गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत”…_

‘कसला बाप तू?’ अशी खिल्ली उडवत बहुदा मनातल्या मनात… 

म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे…

आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला…

यावेळी तू आपलं नातं ‘रफू’ केलेलं पहायला…

त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून हमसून रडायला लागलो….

 

सुन्न होऊन ऐकत होतो मी…

संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठं आंगण मिळतं बागडायला…

_’देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो’,चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता.

घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना… नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे.

‘तो’ त्याने नकळत केलेल्या ‘पापातून’ अन् ‘मी’ नकळत दिलेल्या ‘शापातून’ उतराई होऊ बघत होतो…

मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो…

दोघं मिळून एक नातं, नव्याने ‘रफू’ करू पाहात होतो!

 

तात्पर्य:….

सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो,  मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्यासाठी सदैव प्रयत्न झाले पाहीजेत, त्यासाठी सर्व नातेसंबंधाना जपा, कुणाचाही अपमान करू नका,कुणालाही क्षुल्लक, क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक, शेजारी, सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही,आपल्या आचरणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा,व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच “रफू” करायला विसरू नका….

पहा विचार करुन…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वास्तुशास्त्र ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

?जीवनरंग ?

☆ वास्तुशास्त्र ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

“हे घ्या आई तीन हजार , ठेवा तुमच्याकडे.”

नवीन सुनबाई ऑफिसला जाताजाता अगदी सहज म्हणाली. आणि सासुबाईंचे डोळे भरून आले.

“मला कशाला ग एवढे लागतात?”

“अहो, दिवस भर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेय न मी एक महिन्यापासून. दारावर भाजी, फळवाले येतात. कधी कामवाली जास्तीचे पैसे मागते. शिवाय तुमची भिशी असते, राहुद्या तुमच्याजवळ.”

“अग, पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची.  ते असतांना त्यांच्याकडे मागत असे, आता न मागता महिन्याच्या महिन्याला सरकार देते.”  सासु हसून म्हणाली.

“तुम्ही भिशीच्या ग्रुप बरोबर सिनेमा, भेळ पार्टी, एखादं नाटक असे कार्यक्रम ठरवत जा. जरा मोकळं व्हा आई. ह्यंनी सांगितलंय मला तुम्ही किती त्रासातून कुटुंब वर आणलंय ते. मोठे दादा तर वेगळे झालेत, ताई सासरी खूष आहेत. मग तुम्ही पण आता आपलं जग निर्माण करा. मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्यात. आता जगा स्वतःसाठी. “

“इतक्या लहान वयात हे शहाणपण कुठून आलं ग तुझ्यात ?”

“मी दहा बारा वर्षांची असेन. आजी आत्याकडे निघाली होती.  आईने पटकन सहाशे रुपये काढून हातावर ठेवले. म्हणाली, तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा, ‘आजी कडून’ म्हणून काही खाऊ पिऊ घाला, खेळणी घेऊन द्या. आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती. ‘एव्हढे पैसे कधी मोकळेपणाने खर्चच केले नाहीत ग’ असे म्हणाली होती. तेव्हापासून आजी आणि आई जश्या जिवलग मैत्रिणीच झाल्या……. आई, मला माहितेय, घरचे खटले सांभाळायला तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली न ? किती वाईट वाटलं असेल. किती मन मारावं लागलं असेल…. शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवरयापुढे हात पसरावे लागले असतील. तेव्हा नवरे देखील उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत… तुमची पेन्शन राहुद्या आई. मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन.”

“अग, सगळं आजच बोलणार आहेस का ? जा आता तुला उशीर होईल.”

“मला बोलू द्या आई. हे मी माझ्या समाधाना साठी करतेय. आई म्हणते, की अठरा तास घरात राबणारी बाई कुणाला कधी समजतच नाही. तू मात्र तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव. प्रेम पेर, प्रेमच उगवेल.”

सासुने भरल्या मनाने सुनेच्या गालावर थोपटले. ती दिसेनाशी होई पर्यंत दारात उभी असतांना तिच्या मनात आले, सून आल्यावर मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते तू उलट कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस.

ज्या घरात लेकी सुना सासुचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतो जेथे असेल जिव्हाळ्याचे अस्र तेथे फिके पडते वास्तुशास्त्र. 🌸 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हृदयस्पर्शी – स्वाभिमान ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ हृदयस्पर्शी  – स्वाभिमान ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

मी ऑफिस मधून घरी जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो,वेळ  संध्याकाळची

तरी सात वाजलेले

तेच हॉटेल, तोच कोपरा,

तोच चहा अणि मित्राची वाट पहात बसलो होतो…

 

चहाचा एक झुरका अणि एक सीप घेतला तेंव्हा माझ्या टेबलासमोरील

दुसर्‍या टेबलवर एक माणूस

आणि आठ दहा वर्षांची त्याची मुलगी ..

शर्ट ही फाटका…

अगदी त्याच्या सारखाच

वरची दोन बटनं गायब ,

मळकी पँट, थोडी फाटकी

मजुरी करणारा वेठबिगार असावा.

 

मुलीनी छान दोन वेण्या घातलेल्या साधारण फ्रॉक पण स्वच्छ…

धुतलेला वाटत होता..

 

तिच्या चेहर्‍यावर…

अतिशय आनंद आणि कुतूहल दिसत होते

ती हाॅटेलमध्ये सगळीकडे डोळे मोठ्ठे करून फडफडत पाहात होती डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा …खाली बसायला गूबगूबीत सोफा

ती अगदी सूखावलीच …

 

वेटरने दोन स्वच्छ ग्लास,

थंडगार पाणी त्याच्या समोर ठेवलं …पोरी करता एक डोसा आना की

माणसाने वेटरला सांगितलं …

मुलीचा चेहरा अजून खुलला …

 

आणि तुम्हाला ….

 

नाय , मला काय नग …

 

डोसा आला…

चटणी सांबार वेगळं

गरमागरम मोठ्ठा फूललेला …

मुलगी डोसा खाण्यात गुंग

तो तिच्याकडे…

कौतुकाने पहात पहात

पाणी पीत होता ….

 

तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला

आजकालच्या भाषेत डब्बा फोन

तो मित्राला सांगत होता

आज पोरीचा वाढदिवस आहे …

तिला घेऊन हॉटेलात आलोय …

 

शाळेत तिचा पहीला नंबर आला तर…तुझ्या वाढदिवसाला  मी …

हाॅटिलात मसालाडोसा खायला

घालीन म्हणालो होतो …

 

ती खातीय डोसा

थोडा पॉज ….घेऊन

 

नाय र दोगांना कुटलं परवडतयं!

घरी पिठलं भाकर हाये मला …

 

गरमागरम चहाच्या चटक्याने

मी भानावर आलो….

 

कसा ही असू दे …!!

श्रीमंत किंवा गरीब

बाप लेकीच्या चेहर्‍यावर हसू

बघण्यासाठी काही ही करेल …

 

मी काऊंटरवर चहाचे आणि

त्या दोन मसाला डोसाचे

पैसे भरलो आणि सांगितलं ..

अजून एक डोसा आणि चहा

तिथे पाठवा …

पैसे का नाही…

असं विचारलं तर सांगा

 

आज तुमच्या

मुलीचा वाढदिवस आहे ना ….

तुमची मूलगी

शाळेत पहिली आली नां ….

आम्ही ऐकलं तुमचं बोलणं  …..

म्हणुन आमच्या हॉटेल तर्फे खास

असाच अभ्यास कर म्हणाव ….

ह्याचं बिल नाही …..

 

पण ……. पण …..

फुकट हा शब्द वापरु नका …

 

त्या वडीलांचा स्वाभिमान मला

दुखवायचा नव्हता ….!!

 

आणि अजून एक डोसा

त्या टेबलवर गेला ..

मी बाहेरून पाहात होते..

बाप कावराबावरा झाला

म्हणाला ….

 

येकचं म्हनालो होतो मी …

 

तेव्हा मॅनेजर म्हणाले …

 

अहो तुमची मूलगी

शाळेत पहिली आली …

आम्ही ऐकलं ते …

म्हणून हाॅटेल तर्फे,

आज दोघांना फ्री …

 

वडीलांच्या डोळयांत पाणी आलं

लेकीला म्हणाला …

बघ असाच अभ्यास केलास तर

काय काय मिळतया …

 

बाप वेटरला म्हणाला,

हा डोसा बांधून द्याल कां …

मी आणि माझी बायको

दोगं बी अर्धा-अर्धा खाऊ …

तीला कूटं आसं

खायाला मिळतयं …

 

आणि आता माझ्याही डोळयांत

खळ्ळकनं पाणी आलं ….

 

अतिशय गरीबीतही माणूसकी जपणारी माणसं आहेत अजून या जगात.

आनंद आनंद म्हणजे काय ते त्या पोरीच्या आणि तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचाच……….

संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाळा….भाग 6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 6 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(ताईच्या यशस्वी गीतरामायणानंतर)

‘भक्तीचा ठेवा ‘ या कार्यक्रमानंतर ताईला ओळख मिळू लागली.ही कल्पना पात्रे सरांचीच.

“तुमच्यावर संत वाङमयाचे संस्कार आहेत.तुमच्या गळ्यात भजन, ओव्या छान उतरतात.

भावपूर्ण. श्रद्धायुक्त. अगदी मंदीराच्या गाभार्‍यात डोळे मिटून बसावं इतकं छान! आवडेल लोकांना.

या बाबतीतहीताई साशंकच होती. अजुन जाहीररित्या कार्यक्रम करण्यास मन धजावत नव्हतं.

नको. उगीच हसं व्हायचं. मी आहे तिथेच बरी आहे.

मला इतकंच पुरे. पण कार्यक्रमाची सगळी जबाबदारी सरांनी उचलली. अगदी वर्तमानपत्रातल्या जाहिरातीपासूनते छोट्या अॉडीओ व्हिडीओ क्लीप्सच्या माध्यमातून आॅनलाईन प्रमोशन पर्यंत.

आणि खरोखरच कार्यक्रम जनमानसात ठसला.

लोकांना प्रचंड आवडला. लोक ताईशी कनेक्ट व्हायला लागले. कार्यक्रम संपल्यानंतर श्रोते पडद्यामागे आवर्जून भेटायला येत.

एकदा एका वृद्ध स्त्रीने ताईच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले,”तुझ्या गळ्यातून संतांची वाणीच उतरते.

देव तुझं भलं करो! “

तर कधी कुणी म्हणत,”साक्षात् गिरीधराची मीराच उभी राहिली.”

मनात खूप समाधान होतं. काहीतरी मिळवल्याचा. गवसल्याचा हर्ष होता.

पण विश्वास बसत नव्हता.

यशाच्या पहिल्या पायरीवरही ताई गंभीर होती.

शिडी चढायची तिला घाई नव्हती.

सकाळीच हर्षलशी फोनवर बोलणे झाले होते.

“आई पीट्सबर्गच्या महाराष्ट्र मंडळात तुझा कार्यक्रम त्यांना ठेवायचा आहे. डेट्राॅईट, सॅनहोजे, फ्लोरीडा वरुनही विचारणा झाली आहे. तुझ्या तारखा कळव. इथले लोकल वादक तुला साथ देतील. तरीही तुझ्याबरोबर कितीजणं येणार ते सांग. मंडळच स्पॉन्सर करेल. बाकीचं मी पाहतो. लवकर निर्णय कळव. सगळ्यांचे व्हीसा वगैरे व्हायला वेळ लागेलच.”

सगळंच अविश्वसनीय वाटत होतं. हे सगळं आपल्याबाबतीत घडतंय् हे पचत नव्हतं.

आज मन गच्चं भरलं होतं. भावनांचा कल्लोळ झाला होता. डोळे सारखे भरुन येत होते.

मंचावर नारळ फुटला. फुलं उधळली. ऊदबत्यांचा सुवास दरवळला. वाद्ये जुळवली जात होती. निवेदन संपले.

अन् हळुहळु पडदा वर सरकत गेला. सभागृह स्तब्ध झाले. टाळ्यांचा गजर झाला. स्वागत, प्रास्ताविक झाल्यानंतर ताई पोडीअमजवळ आली.

तिने नम्रपणे रसिक श्रोत्यांना अभिवादन केले.

सुरेख हिरव्या काठांची क्रीम कलरची रेशमी साडी. गळ्यात ठसठशीत मोत्यांची माळ. कानात कुड्या. चेहरा प्रसन्न, हसरा, शालीन. साक्षात् सरस्वती.

 “जोहार मायबाप!! जोहार मायबाप!!”

तिचा गळा दाटला होता.तिनं एक आवंढा गिळला.

“माझे पपा नेहमी म्हणायचे, “साहित्य संगीत कला विहीन:। साक्षात् पशुपुच्छ  विषाण हीन:।। पण आपल्यातल्या कलागुणांची ओळख व्हावी लागते. वाळा म्हणजे तसं पाहिलं तर शुष्क गवतच ना? पण त्यावर पाणी शिंपडताच शीतल सुगंध दरवळतो.”

मग ताई बोलतच राहिली. आठवणींच्या लडी ऊलगडत  राहिल्या. तिच्या अवघड न्यूनगंडातून

चाचपडत सुरु झालेल्या संगीत प्रवासाची कहाणी श्रोतेही मनापासून ऐकत राहिले.

पपांच्या आठवणींने ताईचे मात्र डोळे अखंड झरत होते.

मिटल्या डोळ्यासमोर दोन तेज:पुंज डोळे नजरेनेच तिला आशिर्वाद देत होते. ढगातल्या किरणांच्या साक्षीनं एक स्वप्न साकारत होतं.

समाप्त.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाळा….भाग 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ वाळा….भाग 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(ताईला वाटलं मी कात टाकली..आता पुढे)

हा धक्का होता की चमत्कार?

काय होतं हे? नक्की कुठून आलं  की जे होतंच आपल्याजवळच. झोपलेलं ते जागं झालं का? तिला तिच्या लहानपणाच्या क्लासच्या सरांची आठवण झाली. ते पपांना म्हणाले होते, “हिच्यातला कलाकार झोपलाय.”

पपा एकदा म्हणाले होते, “आकाशातून पाणी तेव्हांच बरसतं जेव्हा मेघ दाटून येतात.”

मग ताईची प्रवास वाट बदललीच जणू! शंका होत्याच. मनात प्रश्नही होतेच. आता हे काय वय आहे का नव्याने काही सुरु करण्याचे? शिकण्याचे?

किती आयुष्य मागे गेलं. प्रवाहात जागोजागी खडक होतेच.

पण पात्रे सर म्हणाले, “कलेला वय नसतं. ती सदाबहार, चिरतरुण असते. साधनेलाही वयाची  चौकट नसते. तुम्ही कलेची सुरवात केव्हाही करू शकता. हं एकच. तळमळ असावी. जिद्द असावी. ईर्षा असावी पण स्पर्धा नको. तुलना नको.किनारा गाठण्याची घाई नको. नावेत बसावं. संथ विहरत रहावं. लाटांबरोबर तरंगत राहण्याचा आनंद घ्यावा.

ताईलाही वाटलं,एका वेदनेनं, डोहात रुतलेल्या, कुठल्याशा  बोचर्‍या भावनेनं धक्का दिला. अचानक एक खांदा दिला. त्यावर विसावून आतलं काहीतरी शांत होतय्. अन् काहीतरी परततय्. साद घालतय्.

मग अभ्यासही सुरु झाला.शास्त्रोक्त पद्धतीने विश्व आकारायला लागलं. गाळलेल्या जागा भरु लागल्या. एक नवी झळाळी ,लकाकी आली. अन् आत्मविश्वास बळावू लागला..एक मनातला बंध वितळू लागला.

विशारदच्या मौखीक चाचणीच्या तपासक ताईला सहज म्हणाल्या,”तुमचा आवाज जाड, थोडासा बसका असला तरी सूरांची परिपक्वता तुम्ही गाताना जाणवते. खरं सांगू का ताल, लय. सूरअचूक असला ना की आवाजाकडे नाही लक्ष जात. उलट तोच आवाज व्यक्तीची प्रतिमा ठरते. तुमच्या आवाजात घनता आणि भाव आहेत. महणून गाणंही मधुर वाटतं.

ध्रुपद गायकी जमेल तुम्हाला. हो! आणि तुम्ही पास झाला अहात. अभिनंदन!!

संगीत विशारदच्या पदवीने ताई अत्यंत आनंदली. अशक्याकडून शक्याकडे तिने एक पाउल ऊचलले होते.

वेळोवेळी पपांची तिला आठवण यायचीच. मनोमन  अपराधीही वाटायचं. रुखरुख जाणवायची.

मन हुरहुरायचं. ‘तेव्हांच ऐकलं असतं तर?  ‘पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. असंही पपाच म्हणायचे.

गीत रामायणाचे घरगुती स्तरांवर कार्यक्रम करण्याची कल्पना अंजोरचीच. ताईने जवळजवळ गीत रामायणातील सगळी गाणी अभ्यासून सराव करुन बसवली.  निवेदन अंजोरच करायची.

‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’ या गाण्याला तर श्रोते अक्षरश: भारावून जायचे. एका शांत स्तब्धतेत अंगावर सरसरुन  काटा ऊभा रहायचा.

‘सियावर रामचंद्रकी जय! सेतु बांधारे..या गीतावर श्रोते उत्स्फूर्तपणे ठेका धरायचे.

एका कार्यक्रमात तर एका व्यक्तीने  ताईला पद नमस्कार करुन म्हटले, “अक्षरश: श्रीराम  भेटवलात”

ताईसाठी हे खूप नवलाचे नक्कीच  होते.

क्रमश:..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

  1. ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print