श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘झुळूक’ – भाग-३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- मी आता त्याना एकटक न्याहाळत राहिलो. ते मला वेगळेच वाटू लागले. देवासारखे. खिशातून औषधे बाहेर काढणारा माझा हात तसाच घुटमळत राहिला. ती औषधे त्यांना दाखवायची मला आता गरजच वाटेना. “व्हॉट इज दॅट?” डॉक्टरांचं लक्ष माझ्या हाताकडे होतंच. )  

“मी सध्या ही औषधं. . ” मी काहीसं घुटमळत औषधं त्याना दाखवली. ती पाहून त्यानी परत दिली आणि ते प्रिस्क्रिप्शन लिहू लागले.

“ती औषधं बरोबर आहेत पण डोस थोडा माईल्ड आहे. तुमच्या खोकल्याशी तुमची फ्रेंडशीप झालीय. ती या माईल्ड डोसला जुमानत नाहीय. अर्लीअर रुटीन इन्फेक्शन आता क्राॅनिक स्टेजला पोचू लागलंय. सो यू हॅव टू टेक धीस स्ट्राॅन्ग डोस फाॅर अ वीक. यू वील बी ऑल राईट. जमेल तेव्हा रेस्ट घ्या. रुटीन चालू राहू दे. या. . “

“सर,तापाचं काय?”

ते हसले.

“त्याचं काय?तो या खोकल्याचा लहान भित्रा भाऊ आहे. पहिल्या डोसला घाबरुनच तो पळून जाईल. डोण्ट वरी. “

“सर, पैसे ?”

“थर्टी रुपीज”

मला आश्चर्य वाटलं. फक्त तीस रुपये ?मी काही बोलणार तेवढ्यात त्यानी पुढच्या पेशंटला बोलावलं. पैसे देऊन मी जायला निघालो. मला इथून बाहेर पडावंसंच वाटेना. दाराजवळ जाताच मी मागं वळून पाहीलं. ते समोरच्या पेशंटशी हसून बोलू लागले होते. माझा स्वीच त्यानी केव्हाच ऑफ केला होता. मी बाहेर पडलो ते डाॅ. मिस्त्रींबद्दलची उत्सुकता मनात घेऊनच.

मी घरी आलो. दोन घास खाऊन मी औषध घेतलं. अंथरुणावर पाठ टेकली. डोळे मिटले. ग्लानी आली तरी मनातून डाॅ. मिस्त्री जाईचनात.

“कसं वाटतंय?”रात्री गप्पा मारताना भावानं विचारलं.

“खूपच छान. “

“डाॅ. मिस्त्री कसे वाटले?” त्याने सहजच विचारलं. मला खूप काही बोलायचं होतं,पण ते शब्दात सापडेचना.

“खूsप वेगळे आणि चांगले”

बोलता बोलता मी प्रत्यक्ष पाहिलेला तो आजी-आजोबांचा प्रसंग त्याला सांगितला.

“असे अनुभव मी तिथे अनेकदा घेतलेयत. प्रत्येक पेशंटची कुंडली त्यांच्या मनात पहिल्या भेटीतच अचूक नोंदली गेलेली असते. तू पुन्हा कधी गेलास,तर कांही क्षण तुझ्याकडे रोखून बघतील. ते बघणं म्हणजे मनात साठवलेल्या त्या कुंडल्या धुंडाळणं असतं. आणि मग हसून तुझं नाव घेऊन तुझ्याशी बोलायला सुरुवात करतील. . ” भाऊ असंच खूप कांही सांगत राहिला आणि मी थक्क होत ऐकत राहिलो.

आधीच भारावून गेलेल्या मला डाॅक्टर मिस्त्रींची खरी ओळख आत्ता होतेय असंच वाटत राहीलं. पस्तीस वर्षांपूर्वी स्विकारलेलं वैद्यकीय सेवेचं व्रत सचोटीने अव्याहत  सुरु आहे. ‘पारखी नजर’ हे त्याना मिळालेल़ं ईश्वरी वरदान तर होतंच,पण आजच्या प्रदूषित वातावरणातही त्याचा बाजार न मांडता त्यानी ते निगुतीने जपलेलं होतं. मुलगा सर्जन होऊन अमेरिकेत स्थायिक झाल्यावर ते दुखावले असणारच ना?पण खचले मात्र नाहीत. आपला वारसा पुढे कोण चालवणार हा विचार डोकावला असणारच ना त्यांच्या मनात?पण ती सल ते कुरवाळत बसले नाहीत. रुग्णसेवेचं व्रत त्यानी वानप्रस्थातही अखंड सुरु ठेवलंय आणि मिळणाऱ्या पैशांचा अव्याहत ओघ त्यानी अलगद गरजूंकडे वळवलाय. तेसुध्दा कसलाही गाजावाजा न करता. कधीही सुट्टी न घेणारे डाॅ. मिस्त्री वर्षातून दोन दिवस मात्र आपलं क्लिनिक पूर्णपणे बंद ठेवतात. पण हे आराम करण्यासाठी किंवा बदल म्हणून नव्हे. त्या दोन दिवसातला एक दिवस दहावीच्या आणि दुसरा बारावीच्या परीक्षांचा आदला दिवस असतो. या दोन्ही दिवशी या परिक्षांना बसणाऱ्या मुलामुलींची डाॅक्टरांचे आशिर्वाद घेण्यासाठी रीघ लागलेली असते. त्या सर्वांची अडलेली शिक्षणं डाॅक्टरांच्या आर्थिक मदतीमुळेच मार्गी लागलेली असतात. म्हणूनच त्या मुलाना डाॅक्टरांच्या आशिर्वादाचं अप्रूप असतं आणि डाॅक्टरना त्या मुलामुलींच्या भावनांची कदर. . !

हे आणि असं बरंच काही. सगळं ऐकताना मी भारावून गेलो होतो.

मुंबईची असाईनमेंट पूर्ण करुन परतताना मी अस्वस्थ होतो. मुंबईला येतानाची अस्वस्थता आणि ही अस्वस्थता यात मात्र जमीन अस्मानाचा फरक होता. ती अस्वस्थता उध्वस्त करु पहाणारी आणि ही हुरहूर लावणारी. . !डाॅ. मिस्त्रीनी मला औषध देऊन बरं तर केलं होतंच आणि जगण्याचं नवं भानही दिलं होतं. डाॅ. मिस्त्रींचा विचार मनात आला आणि उन्हाने तापलेल्या वातावरणात एखादी गार वाऱ्याची सुखद झुळूक यावी तसं मला वाटत राहिलं. ती झुळूक मी इतक्या वर्षांनंतरही आठवणीच्या रुपात घट्ट धरुन ठेवलीय. . !!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments