श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘झुळूक’ – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- एक छोटं टेबल. साधी खुर्ची. पेशंट तपासणीसाठी मागे पडदा लावून केलेला एका आडोसा. हे सगळं मुंबईतल्या डॉक्टरला शोभणारं नक्कीच नव्हतं. आणि तरीही यांच्यासाठी माझ्या भावाचा हट्टी आग्रह?)

अर्धा तास उलटून गेला, तरी नंबर लागायचं चिन्हच नव्हतं. डाॅ. आपले समोर बसलेल्या प्रत्येक पेशंटबरोबर हसतखेळत हास्यविनोद, गप्पा करीत मग प्रिस्क्रीप्शन लिहून देत. स्वत:बरोबर वाट पहात बसलेल्या पेशंटसच्या मौल्यवान वेळेचं  याना कांहीच कसं वाटत नाही या विचारानं मी अधिकच अस्वस्थ. तडक इथून निघून जावं असं वाटून त्याच तिरीमिरीत मी उठणार एवढ्यात माझा नंबर आला.

“बोला, काय प्राॅब्लेम?” डाॅ. नी हसतमुखाने विचारलं. त्या स्मितहास्याने मनातली अस्वस्थता थोडी कमी झाली. मी माझा प्राॅब्लेम सविस्तर सांगितला. मनातली थाॅयराईडची शंकाही बोलून दाखवली. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकतच ते जागचे उठले.

“कम. लेट मी चेक. “ते आत गेले. पाठोपाठ मी. नाडी परीक्षा झाली. टाॅर्चच्या प्रकाशात माझ्या घशातून त्यानी त्यांची शोधक नजर चौफेर फिरवली. इनमीन तीन मिनिटात चेकअप झालासुध्दा.

“बसा. नथिंग टू वरी. “त्यानी दिलेला दिलासा मला वरवरचाच वाटला.

“डाॅक्टर, थाॅयराईडचं काय करायचं?”

त्यानी माझ्याकडे एकदा रोखून पाहीलं. मग जागचे उठले. माझा गळा सर्व बाजूनी नीट चाचपून पाहीला.

“डोण्ट वरी. नो साईन आॅफ थायराईड अॅट आॅल. “

“हो डाॅक्टर, पण टेस्ट?”

डाॅक्टर हसले. “आय हॅव जस्ट नाऊ डन इट . युवर रिपोर्ट इज निगेटीव. “मी खरं तर आनंदी व्हायला हवं होतं, पण. . . .

“हो पण तरीही. . . “

“लिसन. “माझ्या नजरेतला अविश्वास त्यानी वाचला होता बहुतेक. “व्हाय शूड आय गिव्ह यू अनरिअॅलिस्टीक रिपोर्ट?प्लीज डोण्ट वरी. बिलीव मी. थायराईडचं इंडिकेशन नाहीय हे समजायला ती महागडी टेस्ट करुन तुमचा हार्डमनी कशाला वेस्ट करायचा?”बोलता बोलता प्रिस्क्रिप्शन लिहायला त्यानी पॅड पुढे ओढलं. मी सोबत आणलेली माझ्या डाॅ. नी दिलेली औषधं दाखवायला खिशातून बाहेर काढून ती त्याना दाखवणार, तेवढ्यात मला जाणवलं, माझं प्रिस्प्रिक्शन लिहीता लिहीता त्यांचा हात थबकलेला होता. त्यांची गंभीर एकाग्र नजर समोर दाराकडे पहात कशाचा तरी वेध घेत होती. मी मागे वळून पाहीलं. एक वृध्द जोडपं आत आलेलं मला दिसलं. आजी हात जोडत डाॅ. ना नमस्कार करीत होत्या. पण डाॅ. चं आजींकडे लक्षच नव्हतं. त्यांची गंभीर नजर बसायला मोकळी जागा शोधणार्या पण धाप लागल्यामुळे कासावीस झालेल्या आजोबांवर खिळलेली होती. दुसऱ्याच क्षणी हातातलं पेन तसंच टेबलवर टाकून त्यानी खुर्ची   मागे ढकलली. . . लगेच उठून आजोबांकडे धावले. एकदोघाना जवळ बोलावून आजोबाना उचलून बाहेर आणायला सांगून पार्किंगच्या दिशेने स्वत: बाहेर निघून गेले. पुढे क्षणार्धात आजोबाना आत बसवून कारने एक झोकदार वळण घेतलं आणि डाॅक्टर स्वत: चालवत असलेली ती कार गर्दीत दिसेनाशी झाली. सगळेच पेशंट अवाक् होऊन पहात होते. आजींच्या हुंदक्याने मी भानावर आलो. आजोबा हार्ट पेशंट होते आणि रूटीन चेकअपसाठी इथे आले होते हे आजींकडून समजल़ं. अर्ध्या तासाने डाॅक्टर परत आले. आजी जागच्या उठल्या. जीव मुठीत धरुन थरथरत त्यांच्यासमोर उभ्या राहील्या.

“ही इज आऊट आॅफ डेंजर नाऊ. ‘आधार’ हाॅस्पिटलमधे इंटेन्सीवमधे अॅडमीट आहेत. तिथे जाऊन डाॅ. कर्णिकना भेटा. ही वील हेल्प यू. “आजी क्षणभर घुटमळल्या. हात जोडून उभ्या राहील्या. डाॅक्टर हसले तेव्हा कुठे त्या रिलॅक्स झाल्या. लगबगीने बाहेर पडल्या. डाॅ. नी मनातला आजोबांचा स्वीच आॅफ केला. आणि शांतपणे माझं प्रिस्क्रिप्शन लिहायला घेतलं. मी आता त्याना एकटक न्याहाळत राहीलो. ते मला वेगळेच वाटू लागले. देवासारखे. मग मात्र खिशातून औषधे बाहेर काढणारा माझा हात तसाच घुटमळत राहीला. ती औषधं त्याना दाखवायची मला आता गरजच वाटेना.

“व्हाॅट इज दॅट?”डाॅक्टरांचं  लक्ष माझ्या हाताकडे होतंच.

क्रमशः…

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments