.. अग थांब चारूलते! तो मनोहारी भ्रमर ते कुमुदाचे कुसुम खुडताना उडून गेला पण माझं लक्ष विचलित करून गेला. त्याकडे पाहता पाहता नकळत माझं पाऊल बाभळीच्या कंटकावर की गं पडले… आणि तो कंटक पायी रूतला.. एक हस्त तुझ्या स्कंधावरी ठेवून पायीचा रूतलेला कंटक चिमटीने काढू पाहतेय.. पण तो कसला निघतोय! अगदी खोलवर रुतून बसलाय.. वेदनेने मी हैराण झाले आहे बघ… चित्त थाऱ्यावर राहिना… आणि मला पुढे पाऊल टाकणे होईना.. गडे वासंतिका, तू तर मला मदत करतेस का?..फुलं पत्री खुडून जाहली आणि आश्रमी परतण्याच्या मार्गिकेवर हा शुल टोचल्याने विलंब होणारसे दिसतेय… तात पूजाविधी करण्यासाठी खोळंबले असतील..
.. गडे चारुलते! अगं तरंगिनीच्या पायी शुल रुतूनी बसला.. तो जोवरी बाहेर निघून जात नाही तोवरी तिच्या जिवास चैन पडणार कशी?.. अगं तो भ्रमर असा रोजचं तिचं लक्ष भुलवत असतो.. आणि आज बरोबर त्यानं डावं साधला बघ… हा साधा सुधा भ्रमर नव्हे बरं. हा आहे मदन भ्रमर . तो तरंगिनीच्या रूपावरी लुब्ध झालाय आणि आपल्या तरंगिनीच्या हृदयात तोच रुतलाय समजलीस… हा पायी रूतलेला शुल पायीचा नाही तर हृदयातील आहे… यास तू अथवा मी कसा बाहेर काढणार? त्याकरिता तो ऋषी कुमार, भ्रमरच यायला हवा तेव्हा कुठे शुल आणि त्याची वेदना शमेल बरं… आता वेळीच तरंगिनीच्या तातानां हि गोष्ट कानी घालायला हवी…आश्रम प्रथेनुसार त्या ऋषी कुमारास गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगणे आले नाही तर तरंगिनीचे हरण झालेच म्हणून समजा.
गडे तंरगिनी! हा तुला रूतलेला मदन शुल आहे बरं तू कितीही आढेवेढे घेतलेस तरी आम्हा संख्यांच्या लक्षात आलयं बरं.. तो तुझ्या हृदय मंदिरी रुतून बसलेला तो ऋषी कुमार रुपी भ्रमराने तुला मोहविले आहे आणि तुझे चित्त हरण केलयं… हि हृदय वेदना आता थोडे दिवस सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.. पाणिग्रहण नंतरच हा दाह शांत होईल.. तो पर्यंत ज्याचा त्यालाच हा दाह सहन करावा लागतो..
.. चला तुम्हाला चेष्टा सुचतेय नि मला जीव रडकुंडीला आलाय… अश्या चेष्टेने मी तुमच्याशी अबोला धरेन बरं..
हो हो तर आताच बरं आमच्याशी अबोला धरशील नाहीतर काय.. त्या भ्रमराची देखील चेष्टा आम्ही करु म्हणून तूला भीती वाटली असणारं… आता काय आम्ही सख्खा परक्या आणि तो परका ऋषी कुमार सखा झालायं ना.. मग आमच्याशी बोलणचं बंद होणार…
.. चला पुरे करा कि गं ती थट्टा..आश्रमाकडे निघायचं पाहताय की बसताय इथंच . ..
☆ संविधान – लोकशाहीतील शक्तीमान शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆
एखाद्या शब्दात किती अभूतपूर्व ऊर्जा सामावलेली असते याची प्रचिती मोठी आश्चर्यकारक असते. तो शब्द ..केवळ शब्द नसून तमाम मोठया समूहाचे स्वप्न असते , काटेकोर नियमावली देखील असते. तो एक शब्द असंख्य मोठ्या समूहाला आपल्या जगण्याची हमी पुरवू शकतो. तो एक शब्द राष्ट्र नावाच्या रचनेतून एकदा वगळून टाकण्याची कल्पना केली तरी त्याक्षणी त्या राष्ट्र नावाच्या रचनेचे शतशः तुकडे होत असल्याची व्यापक जाणीव पसरते. तो एक शब्द जेव्हा मोठमोठया समूहांना ऊर्जेबरोबरच हमी व विश्वास पुरवू लागतो तेव्हा तो शब्द त्या लोकसमूहाच्या दृष्टीने अगदी पवित्र होऊन जातो. इतका महत्त्वाचा असा तो शब्द …त्याची नेमकी जाणीव मात्र बहुतांशी समाजमनाला योग्यरित्या नसते ही एक शोकांतिकाच आहे. एका महान वारश्याला लागलेला तो एक अभूतपूर्व असाच शाप आहे.
संविधान….म्हणजे लोकशाही रचनेतील व्यापक लोकसमूहाला जगण्याची हमी पुरवणारा शब्द आहे. संविधान हे एका दृष्टीने त्या लोकशाही राष्ट्रांतील लोकसमूहावर टाकलेली जबाबदारी देखील असते. संविधान नावाचा शब्द जेव्हा व्यापक लोकसमूहाला ऊर्जा , हमी व विश्वास पुरवतो तेव्हा त्या संविधान नावाच्या रचनेला तोलून धरण्याचे , सतत योग्य रितीने कार्यान्वित ठेवण्याचे आणि त्याच्या पवित्रपणाला बाधा येऊ न देण्याची जबाबदारी मात्र त्याच लोकसमूहाला उचलायची असते. संविधान जिवंत आहे तोवर प्रत्येक जनसमूह प्रचंड आत्मविश्वास राखून आपल्या राष्ट्रांप्रती जागरुकता ठेवून एका विशिष्ट पण विधायक नियमावलींना प्रमाण मानून खुशाल जगू शकतो. संविधान जिवंत असते तोवर आपल्या अवतीभवती कितीही वेगवेगळ्या विषमतेच्या रचना उभारल्या जात असल्या तरीही आपल्या जगण्याची हमी देणारी संविधान नावाची रचना उपलब्ध आहे ही भावनाच सर्व अल्पसंख्य समूहाला आश्वस्त करत असते. संविधान जिवंत आहे तोवरच आपल्या राष्ट्रांच्या प्रगतीत सर्वसामान्य माणूस आपला वाटा उचलण्याची उमेद बाळगून जगत असतो. संविधान जिवंत आहे तोवरच आपल्या मतांना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध असते याची जाणीव होणे आवश्यक आहे. संविधान हा नुसताच शब्द राहत नसतो तर तमाम लोकसमूहाची जगण्याची व जगवण्याची हमी घेऊन उभारलेली पेटती मशाल असते. या मशालीला जिवंत राखण्यासाठी मात्र लोकसमूहाला जागरुकता नावाचे तेल अखंड पुरवत रहावे लागते. ही जागरुकता जेव्हा नष्ट होईल तेव्हा संविधान नावाची पेटती मशाल थंडावत जाईल अन् नष्ट होईल. संविधान नावाचा एक शब्द किती मोठ्या क्रांती प्रतिक्रांतीला जन्माला घालू शकतो आणि मिटवू देखील शकतो याची उदाहरणे जगभर पसरलेली आहेत….” संविधान बचाव ” ही आरोळी एकाचवेळी ” राष्ट्रबचाव व कॉमन मॕन बचाव ” या अर्थाची होऊन जाते ती याकरीताच….
संविधानविना कोणत्याही लोकशाही राष्ट्रांचा गाडा पुढे जाऊ शकत नाही . तो कोणत्या दिशेला घेऊन जायचा आहे याची खबरबात लोकांना लागत नाही . राष्ट्रांच्या जडणघडणीत सर्वाधिक प्रभावशाली भुमिका संविधान नावाचा शब्द अर्थात रचनाच बजावू शकते. संविधान याचकरीता एखाद्या भविष्यकालीन स्वप्नांची मूर्ती बनून समोर उभी असते. त्या पवित्र मूर्तीला कोणतेही कर्मकांड करण्याची जरुरी नसते…आवश्यकता असते ती लोकसमूहाच्या अखंड जागरुकतेची , विधायक जाणीवेची.
नेने आजी आणि नेने आजोबा… अख्खी गल्ली त्यांना याच नावाने ओळखते.
दोघंच दोघं. एक दुजे के लिये…
मी… मी कोण ? मी शामलाल मिठाईवाला. गेली चाळीस वर्ष मी या दोघांना ओळखतो..
बिल्डींगच्या खाली माझं दुकान. वरच्या मजल्यावर नेन्यांचा फ्लॅट. बिल्डींगच्या जन्मापासूनचे आम्ही सोबती.
कुणी विचारलं तर मी बिनदिक्कत सांगतो… नेने माझे नातेवाईक आहेत म्हणून. आमचं नातं अगदी जवळचंय.
काय सांगत होतो ?—- आमच्याकडची जिलेबी पुण्यात नं.1. चाखून बघाच एकदा.
नेन्यांकडचा प्रत्येक ‘आनंद’ आमच्याकडच्या जिलेबीच्या साथीनं सेलीब्रेट झालाय.
नेन्यांच्या शर्वरीचा जन्म… शर्वरीचा दहावीचा रिझल्ट… ती सी. ए. झाल्याचं सेलीब्रेशन… तिला लागलेली पहिली नोकरी… तिचं लग्न… नेने ‘आजोबा’ झाल्याची गोड बातमी.
आमच्याकडच्या जिलबीनंच गोड झालाय .. प्रत्येक आनंदसोहळा.
गंमत सांगू ?
मला मुलगा झाला तेव्हाची गोष्ट. माझ्याकडचीच जिलबी विकत घेऊन, नेन्यांनी माझंच तोंड गोड केलंय.
आता बोला ?—- शरूचं सासर तिकडे इंदूरला.. ती इथं आली की ती घरी जायच्या आधी इथली गरमागरम जिलेबी घरी पोचायची.
मागच्या वर्षीची गोष्ट. नेने घाईघाईने आले… ” शामलाल, सुटलास तू लेका. जिलेबीचे दोन घाणे कमी काढ उद्यापासून… हा काय ताजा ताजा रिपोर्ट घेऊन आलोय. तो डाॅक्टर गोडबोल्या बोंबलतोय. मधुमेह झालाय या नेन्याला….. पोरकी झाली रे जिलेबी तुझी…”
काय सांगू ? खरंच पोरकी झालीय जिलेबी आमच्याकडची. नेन्यांनी गोड बंद केलंय… बंद म्हणजे बंद…
एक कण सुद्धा नाही… नेन्या पक्का गोडखाशी. आमच्याकडची जिलेबी त्याचा जीव की प्राण.
खरं सांगू ? आमचा जीव नेन्यात अडकलेला. किलोकिलोने जिलेबी खपते रोज….. तरीही…गोड नाही लागत आम्हाला. नेन्यानं कसं काय कंट्रोल केलं कुणास ठाऊक ?
सांगतो……
सोप्पय एकदम. नेन्याला डायबेटिस निघाला आणि… त्या दिवसापासनं वहिनींनी गोड खाणं बंद केलं.
नेन्याचा जीव वहिनींमधे अडकलेला. आपोआप गोड बंद झाला. आता शरू आली तरी…इंदूरचा गजक आमच्याघरी पोचतो. आमच्याकडची जिलबी मात्र….खरंच आमच्याकडच्या जिलबीला वाली राहिला नाहीये…
☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
(मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली.) इथून पुढे —-
वाटेत अनेक ठिकाणी गणवेशधारी जवान होते. मला वाटतं मी दोन मैलांपेक्षा नक्कीच जास्त चाललो असेन. पुढे गेल्यावर डावीकडे काही जवान होते त्यांना मी व्ह्यूईंग गॅलरीला कसं जायचं असे विचारल्यावर असंच पुढे जावा म्हणून सांगितलं. त्यांनी परत माझ्याकडील आधार कार्ड व पास तपासला. बरेच पुढे गेल्यावर इस्त्रोचा लोगो शिरावर धारण केलेली एक इमारत दिसली. त्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढून घेण्याचा मोह झाला. पण न जाणो फोटो काढले तर काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, असे वाटले व परतताना फोटो काढायचे ठरवले. माझ्या पास वरील क्यूआर कोड स्कॅन करून मला जाऊ देण्यात आले. उजवीकडे वर जाण्यासाठी मार्ग आहे. वर जाऊन एका दरवाज्यातून आत गेल्यावर आपण व्ह्यूईंग गॅलरीत प्रवेश करतो. व्ह्यूईंग गॅलरीला स्टेडियमच्या प्रेक्षागाराला असतात तशा एका विस्तीर्ण अर्धवर्तुळाकारात अनेक पायऱ्या आहेत. एकूण प्रेक्षक क्षमता पाच हजार एव्हढी आहे. गॅलरीची रचना अशी आहे की कोणत्याही लाँच पॅड वरून केलेले लॉन्च सहजपणे पाहता यावे. मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मोजके लोक आले होते. समोर एका टेंट मध्ये इस्त्रोच्या पीएसएलव्ही, जीएसएलव्ही व जीएसएलव्ही मार्क तीन या तीनही प्रक्षेपकांची मॉडेल्स ठेवली होती. बरेच लोक त्यांच्याबरोबर फोटो काढून घेत होते. जवळच नाश्ता व चहाची सोय होती. मी इडली वडा खाऊन घेतला. हळूहळू गर्दी वाढू लागली. मी अगदी वरच्या बाजूला मोक्याची जागा पाहून बसलो. अनेक शाळांच्या ट्रिप्स आल्या होत्या. त्यातल्या पिवळी जर्किन्स व मागे ‘आझादी सॅट क्रू’ असे लिहिलेल्या एका टीमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती टीम म्हणजे देशभरातल्या शाळातून आलेल्या सुमारे ७५ ते ८० मुली होत्या. त्यांनी सर्वांनी मिळून ‘आझादी सॅट’ हा उपग्रह बनविला होता व SSLV-D2 च्या तीन पेलोड्स पैकी हा उपग्रह एक होता. तो देखील आज अंतराळात सोडण्यात येणार होता. त्या अत्यंत उत्साहात होत्या. त्यांचे बरोबर त्यांचे शिक्षक होते. इस्त्रोतील ज्या तंत्रज्ञानी तो बनविण्यास मदत केली होती तेही त्यांच्या बरोबर होते. सूत्रसंचालकांची एक टीम होती. ते प्रेक्षकांना चिअरअप करण्यास सांगत होते. ‘थ्री चिअर्स फॉर इस्त्रो’ वगैरे घोषणांनी स्टेडियम दुमदुमत होते. विविध चॅनेल्स व वृत्तपत्रांचे बातमीदार प्रेक्षकांतील काहींच्या व त्या आझादी सॅट क्रू मधल्या मुलींच्या मुलाखती घेत होते. सूत्रसंचालकांनी त्या मुलींपैकी काहींना खाली बोलावून त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. किती लहान मुली त्या!वय वर्षे आठ ते बाराच्या दरम्यानच्या!! त्यांनी धीटपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले व ही संधी दिल्याबद्दल इस्रोचे आभार मानले. देशभरातील विविध सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सातशे पन्नास शाळकरी मुलींकडून उपग्रह बनवून घेणे ही कल्पना ‘स्पेस किड्झ इंडिया’ या चेन्नई स्थित खाजगी अंतरीक्ष नवउद्योगाची (space start-up)आहे. या कंपनीने देशभरातील विविध शाळांमध्ये जाऊन – त्यातील कांही शाळा तर दुर्गम भागातील आहेत- त्यांना उपग्रहाचे विविध भाग बनविण्यासाठी मार्गदर्शन केले व अशा रीतीने AzaadiSat-2 या उपग्रहाचे निर्मिती करण्यात आली. हे स्टेडियम तीन भागात विभागले आहे. सूत्रधार मॅडमनी सर्व प्रेक्षकांना मधल्या भागात यायला सांगितले, जेणेकरून प्रक्षेपण व्यवस्थित बघता येईल. सर्व मिळून साधारण तीन हजार च्या दरम्यान प्रेक्षक होते. हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला. दहा मिनिटे.. पाच मिनिटे..दोन मिनिटे.. एक मिनिट… नंतर उलट मोजणी दहा.. नऊ.. आठ.. सात.. सहा.. पाच.. चार.. तीन.. दोन.. एक.. अँड गो… पण अजून समोर कांहीच दिसत नव्हते. पण नंतर क्षणातच समोरच्या गर्द झाडीतून SSLV-D2 प्रक्षेपक त्याच्या पिवळ्या धमक्क ज्वाळांसहित वर आला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. मी डोळ्यांची पापणीही न लाववीता(अनिमिष नेत्रांनी) ते अद्भुत दृश्य पाहू लागलो. बरेच वर गेल्यावर क्षितिजाशी दीर्घलघुकोन करून यान झपाट्याने पुढे सरकू लागले. आम्हाला माना उजवीकडे वर कराव्या लागल्या. आमच्या पुढील क्षितिज व मागील क्षितिज असे १८०° धरले तर साधारण १००° गेल्यावर यान दिसेनासे झाले. मागे राहिला पांढऱ्याशुभ्र धुराचा लोळ. हवेमुळे तो ही विरळ होत गेला. आमच्या गॅलरी समोर दोन प्रचंड मोठे स्क्रीन्स लावले होते. त्यावर कंट्रोल रूम मधील दृश्य दिसत होती. एकही प्रेक्षक जागेवरून हालला नव्हता. साधारण तेरा मिनिटांनी EOS-07 उपग्रह यानापासून वेगळा होऊन त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित केला गेला, साडे चौदा मिनिटांनी Janus-1 वेगळा झाला, पंधरा मिनिटांनी AzaadiSat-2 वेगळा होऊन त्याच्या कक्षात प्रस्थापित केला गेला असे जाहीर करण्यात आले. त्यावेळी AzaadiSat crew ने जो जल्लोष केला तो बघून डोळे भरून आले. खरोखर देशातल्या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानात रस निर्माण व्हावा म्हणून इस्रो जे कार्य करीत आहे ते कौतुकास्पद आहे. हळूहळू गर्दी पांगु लागली. लोक खाली येऊ लागले. येताना स्पेस म्युझियम लागते, तेथे भारताने अंतरिक्षात प्रस्थापित केलेले विविध उपग्रह तसेच प्रक्षेपकांची मॉडेल्स ठेवली आहेत. त्यांजवळ उभारून लोक फोटो काढून घेत होते. मी अहमदाबाद येथील VSSE म्युझियम बघितलेले असल्याने फक्त एक फेरफटका मारून बाहेर पडलो. जवळच एक ऑडिटरियम आहे ते बंद होते. बाहेर पडल्यावर त्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर आवर्जून एक फोटो काढून घेतला. आता परत अडीच तीन मैल चालावे लागणार अशी भीती वाटत होती, तोवर इस्त्रोचा एक इलेक्ट्रिकल विभागात काम करणारा माणूस भेटला, तो म्हणाला लॉन्च बघून परतणाऱ्यांसाठी इस्त्रोने आंध्र प्रदेश स्टेट कॉर्पोरेशनच्या बसेसची सुलुरूपेटा पर्यंत व्यवस्था केली आहे. थोडे चालल्यावर हे बस दिसली. त्यात बसून मी सुलुरूपेटा येथे आलो.
इथे आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की श्रीहरीकोट्याला येताना स्वतःचे वाहन असणे केव्हाही चांगले. स्वतःचे वाहन असले की थेट व्ह्यूईंग गॅलरीच्या इमारतीपर्यंत जाता येते. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे तीन चार मैलांची पायपीट वाचते. तसेच लॉन्च बघून परततांना ज्यांनी यापूर्वी स्पेस म्युझियम बघितले नसेल त्यांना आरामात त्याचा आस्वाद घेता येतो. येथे रॉकेट गार्डन म्हणून एक उद्यान आहे तेथे आपल्या सर्व प्रक्षेपकांच्या पूर्णाकार प्रतिकृती ठेवल्या आहेत आणि काही सुंदर असे वास्तुकलेचे नमुने आहेत, तेथे पण जाता येते. निव्वळ स्वतःचे वाहन घेऊन न गेल्याने मला रॉकेट गार्डन बघता आले नाही.
सकाळी खूप चालल्यामुळे दमायला झाले होते, त्यामुळे काल आणलेला ब्रेड बटर खाऊन ताणून दिली ते रात्री साडेआठलाच उठलो. उठून काउंटरवर जाऊन जवळ कोठे शाकाहारी जेवणाचे हॉटेल आहे का याची चौकशी केली. त्यावेळी मार्केटमध्ये कोमला निवास म्हणून हॉटेल आहे असे कळले. रिक्षाने हॉटेलमध्ये गेलो. खवय्यांची रांग लागली होती. सर्व व्यवहार तेलगूत चालू होते. माझा नंबर आल्यावर मी प्रथम हिंदीत व नंतर इंग्रजीत राईस प्लेटची चौकशी केली. काऊंटरवरील माणसास हिंदी अजिबात येत नव्हते व इंग्रजीही अगदी मोडकेतोडके येत होते. राईस प्लेट उपलब्ध नसते असे कळले. कोण कोणते पदार्थ उपलब्ध आहेत याची चौकशी केल्यावर मसाला डोसा, रोटी, चपाती वगैरे उपलब्ध असल्याचे कळले. ‘आंध्रात चपाती कशी असेल कोण जाणे’ असा विचार करून दोन रोटी व ग्रेव्ही असे सांगितले. त्याने नव्वद रुपये म्हणून सांगितले. मी पैसे दिले. त्याने कुपन दिले. पण कुपनावर फक्त दोन रोटीच दिसले. मी याबरोबर काय असे इंग्रजीत विचारले. त्याला नीट कळले नाही. नुस्ती रोटी कशी खाणार असा विचार करून मी मसाला डोसा सांगितला. काउंटरवरील माणसाने जरा रागाने बघून त्या कुपनवर पेनने काही लिहिले व माझ्याकडे दहा रुपये मागितले व त्याचे वेगळे कुपन दिले. मला वाटलं डोसा शंभर रुपयांना मिळत असावा. मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.
26 फेब्रुवारी.! आजच्याच तारखेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर ह्यांच्या “ययाती”ला मिळाला होता.
कुठलीही व्यक्ती, व्यक्तीमत्व वा पुस्तकातील गाभा जाणून घ्यायचा असेल तर थेट तिला अगदी मूळापासून गाभ्याला जाणून घेऊनच अभ्यासावं लागतं.अन्यथा वरवर ती व्यक्ती वा ते पुस्तक अभ्यासलं वा चाळलं तर खरे रुप न जाणून घेताच मनात गैरसमज वा संभ्रम निमार्ण व्हायचीच दाट शक्यता.
बरेचदा काही पुस्तकं वा काही व्यक्ती वाचण्याची वा जाणण्याची तीव्र ईच्छा होते, तेव्हा जसजसं त्या गोष्टीच्या खोलापर्यंत आपण अभ्यासतो तो आपण जे बघतं होतो, जाणतं होतो ते निव्वळ हिमनगाचे दिसणारे टोकच होते बाकी सगळा उर्वरित गोष्टींचा आवाका खूप प्रचंड आहे ह्याची जाणीव होते.काही व्यक्तींच्या हातून खूप सारी साहित्य निर्मीती होते.पण त्या साहित्यातील एखादे साहित्य पराकोटीचे लोकप्रिय होऊन त्या व्यक्तीची जणू ओळखच बनते.वि. स. खांडेकर हे ह्याच प्रकारातील “ययाती”ह्या पौराणिक कादंबरीमुळे अजरामर झाले. जणू वि.स.खांडेकर आणि ययाती हे एक समीकरणच बनले. आपलं आवडीचं वाचनं आणि पुस्तक ह्याचा विचार आल्याबरोबर जी काही पुस्तक माझ्या चटकन नजरेसमोर येतात त्यात ययाती हे असतचं.
सांगली,मिरजकडील खांडेकरांनी साहित्य क्षेत्रात विविध पदं भुषविलीतं,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.त्यांना अकादमी पुरस्कार, मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण तसेच कोल्हापूर च्या शिवाजी विद्यापीठाची मानाची डिलीट पदवी मिळाली.आज 26 फेब्रुवारी. 1976 साली ह्याच दिवशी ययाती साठी वि.स.खांंडेकरांना शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यासारखा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
ययाती मी कित्येक वेळा वाचली असेल ह्याचं काही गणितचं नाही. काँलेजजीवना पासून आजवर वाचतांना तिच्यातील दरवेळी नवीनच पैलू नजरेसमोर येतात.खूप सारं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलयं,शिकवलयं ह्या कादंबरीनं.
आधी ऋषीकन्या आणि नंतर राणी झालेल्या देवयानीची संसारकथा,प्रेमाचेच दुसरे नाव त्याग,समर्पण हे मानणाऱ्या राजकन्या शर्मिष्ठेची प्रेमकथा,संयमी कचाची भक्तीगाथा, त्यागमूर्ती शर्मिष्ठा पूत्र पुरूरवाची त्यागकथा, आणि मुख्य म्हणजे आधी राजपुत्र व नंतर राजा झालेल्या ययातीची भरभरून जगण्याच्या आसक्तीची कथा ह्यात सुरेख रंगवलीयं.विशेष म्हणजे एकेक घटनांची साखळी गुंफतांना कुठलीही कडी विस्कळीत झाल्याची वा निखळून पडल्याची अजिबात जाणवत नाही.
ह्यातील एक एक पात्र सजीव होऊन आपल्या डोळ्यासमोर अवतीभवती वावरल्याचा वाचतांना भास होतो.कामुक,लंपट
संयम न पाळणारा ययाती आपल्याला खूप काही शिकवतो.त्याच्या कामुकपणाचा राग न येता त्याच्या शारीरिक मागणीमुळे येणाऱ्या हतबलतेची कीव येते तेव्हाच तो कुठेतरी जवळचा पण वाटायला लागतो.देवयानी च्या प्रबळ महत्वकांक्षे बद्दल वाचतांना अचंबित होतो.शर्मिष्ठेचा त्याग व समर्पण बघितले की नतमस्तक व्हायला होत.खरचं मनापासून केलेलं प्रेम ही खूप उदात्त संकल्पना आहे.ख-या प्रेमात एकमेकांची काळजी घेणं,काळजी वाटणं,हे सगळं असतं.ख-या प्रेमात ना वैषयिक भावना असते ना सतत डोक्याला डोकी लाऊन सतत जवळ राहण्याची गरज हे आपल्याला हे लिखाण समजावून सांगतं.शर्मिष्ठा व ययाती हे दोघे घालवित असलेले काहीच क्षण हे देवयानी ययातीच्या एकत्र सहवासापेक्षाही जास्त समाधान देऊन जातात हे कांदबरीत अतिशय छान उलगडून सांगितलयं.प्रेम हे घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद देऊन जात हे ही वाचतांना जाणवतं. गुरुबंधू कचाने वेळोवेळी केलेली मदत किती अनमोल असते हे उलगडतं.ख-या सद्भावना असल्या की ती व्यक्ती नेमक्या अडचणीच्या प्रसंगी परखडपणे वागून योग्य मार्गदर्शन करते ह्याचा प्रत्यय गुरूपुत्र कचदेव देतात.रक्ताच्या नात्यात प्रसंगी सर्वात प्रिय असलेले तारुण्यही लिलया हसतहसत कसे पित्याला द्यावे हे राजपुत्र पुरुरवा कडून. शिकावं.आणि शेवटी ह्या सगळ्या अनुभवांनी आलेल्या शहाणपणामुळं किंवा आलेल्या समजामुळं राजा ययाती ला उपरती होऊन त्याच्यात होणारे सर्वांगिण चांगले बदल आपल्याला खूप काही शिकवून जातात.
…म्हणून जर कोणी चुकून ही कादंबरी वाचली नसेल तर अवश्य वाचा इतकचं मी म्हणेन. आज काही वाचकांच्या आग्रहास्तव ह्या दिवसाचे औचित्य साधून परत ही ययाती बद्दल पोस्टलयं.
☆ सावरकरांची आठवण… — लेखक – श्री शरद पोंक्षे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
बरोबर १९६६ च्या १ फेब्रूवारीला सावरकरांनी प्रायोपवेशन करायचे ठरवले. आपले ह्या जन्मीचे कार्य पूर्ण झाले आहे ही तात्यांची भावना होती. आपल्या दीर्घायुष्याचे महत्व काय,अशा प्रश्नावर ऊत्तर देताना ते एकदा म्हणाले होते की, ” जगण्याची चिंता मी कधीच केली नाही, म्हणूनच बहुधा इतका दीर्घकाळ जगलो
असेन. “ तात्यांनी वांच्छिलेले स्वातंत्र्य, भाषाशुध्दी, सामाजिक सुधारणा, सैनिकीकरण, आदी विषयात पुष्कळ यश मिळाले होते.. म्हणून तात्या म्हणत की त्यांचे जीवन कृतार्थ झाले आहे. त्यांनी पूर्वी जेजे पेरलंय ते आता उगवत आहे. त्याला आता फळे येत आहेत. हा आपल्या आयुष्याचा फलऋतु आहे. यावर आपण त्यांना म्हटले की, “ हे ठीक आहे.. पण अद्याप पाकिस्तान नष्ट व्हायचे आहे, आपल्याला मानणारे असे राज्यकर्ते राज्यावर बसायचे आहेत, त्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.” त्यावर ते म्हणत ”अरे जगात कोणाचीही सर्व स्वप्ने कधीच साकार होत नाहीत. जे झाले हे अपेक्षेपेक्षा, कल्पनेपेक्षा पूर्ण झाले आहे. उरले ते काम पुढच्या पिढीचे आहे. तिला मार्गदर्शन हवे तर मी ते ग्रंथरूपाने लिहून ठेवले आहे. ते वाचणे आणि त्याला अनुसरून वागणे किंवा न वागणे हे त्यांचे काम आहे.” तेव्हा तात्यांचा जीवन संपवण्याचा विचार पक्का ठरला. ज्ञानेश्वरांप्रमाणे गुहाप्रवेश शक्य नव्हता.जलसमाधी घ्यावी असा विचार केला, पण तो सोडून दिला व शेवटी समर्थ रामदासस्वामींप्रमाणे प्रायोपवेशन करायचे ठरवले. आणि १ फेब्रू १९६६ ला अन्न पाणी त्याग केला. सर्वांच्या भेटीगाठी बंद केल्या. ५,६ दिवस गेले. तात्यांचा रक्तदाब खूप खाली गेला. डॉ.पुरंदरेना घाम फुटला. औषध दिले पण ते औषधही घेत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी रक्तदाब स्थिरावला. डॉ. ना आश्चर्य वाटले. हे कसे झाले? कारण तात्यांचा योगाभ्यास दांडगा होता. काही सिध्दी त्यांना प्राप्त होत्या. हिंदू धर्मातील न पटणाऱ्या आचार विचारांवर कडक टीका करणाऱ्या सावरकरांनी त्यांच्या ध्वजावर अभ्यूदयनिदर्शक कृपाणासमवेत निःश्रेयस निदर्शन कुंडलिनीही अंकित केली होती. शास्त्रीय दृष्टीचे सावरकर, त्यांना पटल्यावाचून, स्वतः अनुभवल्यावाचून ही गोष्ट मानणे शक्य नाही. त्यांना योगशास्त्र अवगत होते. म्हणूनच सर्व भयंकर हालअपेष्टा सोसूनही ते इतकी वर्ष जगले. त्यांच्या लिखाणात, भाषणात लोकांना मोहून टाकणारी शक्ती आली. त्यांचे नाक, कान, डोळे आदी ज्ञानेंद्रीये शेवटपर्यंत उत्तम कार्यक्षम राहिली.
८३ व्या वर्षीसुध्दा त्यांचे केस काळे होते. प्रायोपवेशन चालू होते.. दिवस चालले होते. आयुष्यभर ज्या मृत्यूला त्यांनी पळवून लावले त्याला आता निमंत्रण देऊनही तो जवळ यायला घाबरत होता .त्याही परिस्थितीत ते सहाय्यकाला बोलावून पत्रे वाचून घेत होते. उत्तरे देत होते. एका मोठ्या नेत्याची तार आली. एकाने लिहीले होते, ” तात्यांची प्रकृती कशी आहे? कळवा “.तर दूसऱ्याची होती, ”तात्यांची प्रकृती सुधारो, अशी मी प्रार्थना करीत आहे ”. हे वाचून तात्या म्हणाले, “ नीट वाच..अर्थ समजून घे.” सहाय्यक म्हणाले “भावना एकच आहेत तात्या.’ त्यावर ते म्हणाले,” नाही.. मनातल्या भावना तारेत उतरतात. पहिला मी जायची वाट बघतोय व दूसरा मी बरा व्हावा असे म्हणतोय.” अनेक लोक भेटायला येत होते. आचार्य अत्रेही आले. ते कोणालाच भेटत नव्हते. १७ व्या दिवशी सहाय्यकाचा हात हातात घेऊन म्हणाले,
”आम्ही जातो अमुच्या गावा।आमुचा राम राम घ्यावा।
आता कैचे देणे घेणे। आता संपले बोलणे।”
सहाय्यकाशी बोललेले हे ते शेवटचे शब्द. त्यानंतर तात्यांनी हे जीर्ण शरीर टाकून त्यांचा आत्मा पुढच्या प्रवासावर निघाला. जन्माची सांगता त्यांनी पूर्ण केली .
लक्षावधी लोकांना स्फूर्ती देणारे वक्ते, ग्रंथकार, नाटककार, महाकवी, परकीय साम्राज्याला आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर, विचारवंत, समाजसुधारक, स्वाभिमानी, हिंदूंचे ‘हिंदूहृदयसम्राट‘ — श्री विनायक दामोदर सावरकर— अखेर त्यांनी मृत्यूला २६ दिवसांनी कवटाळले व २६ फेब्रू १९६६ ला सकाळी ह्या जन्माची सांगता करून अनादी अनंत अवध्य आत्मा स्वर्गाकडे गेला.
त्यांचे महान स्फूर्ती कार्य, त्यांचे विचार, हिंदू युवक युवती कार्यप्रवण करून त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करतील हीच अपेक्षा. हा दृढ विश्वास.
लेखक : श्री शरद पोंक्षे
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
डिसेंबरमध्ये आम्ही बेंगलोरला ईशाकडे गेलो होतो. मला बरेच दिवस इस्रो करत असलेल्या प्रक्षेपकांचे प्रक्षेपण प्रत्यक्ष बघण्याची अतिशय इच्छा होती. त्यामुळे बेंगलोरमध्ये असतानाच सहज म्हणून बेंगलोर ते श्रीहरीकोटा अंतर गुगलवर बघितले. ते कारने साधारण सहा तासांचे आहे असे दिसले. ऑक्टोबरमध्ये इस्रोने वन वेब कंपनीच्या छत्तीस उपग्रहांच्या तुकडीचे प्रक्षेपण केले होते. पुढील छत्तीस उपग्रहांचे प्रक्षेपण जानेवारी २०२३ मध्ये करण्यात येईल असे इस्रोने तत्वतः जाहीर केले होते. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निघतांना मी योगेशला म्हटले, ” बहुतेक या महिन्यात मी परत येईन असं दिसतंय. कारण या महिन्यात इस्रो एक प्रक्षेपण करणार आहे आणि मला ते बघायचे आहे.” तो म्हणाला, “मग कशाला जाताय? प्रक्षेपण बघूनच जावा कि!” पण प्रक्षेपणाची तारीख नक्की नसल्याने आम्ही सांगलीला परत आलो. सांगलीला आल्यावर कांही दिवसांनी हे प्रक्षेपण मार्च २०२३ ला होणार असल्याचे समजले. दरम्यान सात फेब्रुवारीला सहज फेसबुक बघत असताना इस्त्रोच्या फेसबुक पेजवर वाचनात आले की दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी SSLV-D2(Small satellite launch vehicle-demonstration launch 2)चे प्रक्षेपण आहे. मला माहित होते की हल्ली सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात थेट प्रक्षेपण बघण्यासाठी एक प्रेक्षागार उभारण्यात आले आहे व तेथून आपणास प्रक्षेपकाचे प्रक्षेपण थेट पाहता येते व त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यानंतर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे SDSC-SHAR (Satish Dhavan space center- Shriharikota high altitude range)च्या वेबसाईटवरून हुडकून काढले. lvg. shar. gov या साइटवर ‘Schedulded’ म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक केले असता एक पेज उघडते त्या पेजवर ‘click here for witness the launch’ असा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक केले असता आपणास रजिस्ट्रेशन करता येते. अशा पद्धतीने माझे रजिस्ट्रेशन झाले (REGISTRATION NO/SNO: T333A0C7774/7382). मला अत्यंत म्हणजे अत्यंत आनंद झाला. लगेच मी इशाला फोन केला. हे घडले संध्याकाळी साडेचार वाजता. दहा तारखेला सकाळी प्रक्षेपण म्हणजे नऊ तारखेलाच मला तिथे पोचावे लागणार होते. ईशाने लगेचच संध्याकाळच्या साडेपाचच्या कोंडुस्करच्या स्लीपरचे बुकिंग केले. मी नेट कॅफेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केल्यावर आलेल्या पासची प्रिंट काढून आणली. तोपर्यंत श्रीहरीकोटाला कसे जायचे हे अजिबात माहीत नव्हते. बेंगलोर मध्ये ईशा व योगेश यांनी व मी कोंडुस्कर मध्ये बसल्या बसल्या google वरून माहिती मिळवली. बेंगलोरहून चेन्नई व तेथून सुलूरूपेटा या श्रीहरीकोटा जवळ असलेल्या गावी मला जावे लागणार होते. प्रत्यक्ष श्रीहरीकोटा मध्ये राहण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे श्रीहरीकोटा पासून १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात मला मुक्काम करावा लागणार होता व तेथून प्रक्षेपणाच्या दिवशी मला श्रीहरीकोटाला जावे लागणार होते. ईशा- योगेश यांनी नऊ तारखेचे बेंगलोर ते चेन्नई साठीचे रिझर्वेशन पाहिले.पण कोणत्याही गाडीचे रिझर्वेशन उपलब्ध नव्हते. मग त्यांनी बेंगलोर ते पेराम्बूर आठ तारखेचे रात्री साडेबाराचे म्हणजेच नऊ तारखेचे 0.30 चे रिझर्वेशन केले. पेरांबूर गाव चेन्नई सेंट्रल पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. चेन्नई ते सुलुरूपेटा रिझर्वेशन एसी टू टायरचे मिळाले.
बेंगलोरला सकाळी सात वाजता पोचलो. योगेश घ्यायला आला होता. आठ वाजता घरी पोचलो. नाश्ता वगैरे झाल्यावर ईशाने सुलुरूपेटा मधील हॉटेल बुक केले. प्रक्षेपण झाल्यावर व्ह्यूइंग गॅलरीमध्येच स्पेस म्युझियम व रॉकेट गार्डन आहे असे SHAR च्या साइटवर दिसले. त्यामुळे परतीची रिझर्वेशन्स ११ तारखेची केली. जेवण करून मस्तपैकी झोप काढली. रात्री साडेबारा वाजता मुजफ्फुर एक्सप्रेसने मला जायचे होते. ईशा व योगेश मला सोडायला आले होते. सकाळी सात वाजता गाडी पेरांबूर स्टेशनवर पोहोचली. रिक्षा करून मी चेन्नई सेंट्रलला आलो. एमजीआर चेन्नई सेंट्रल(MAS) ते सुलुरूपेटा नवजीवन एक्सप्रेस दहा वाजून दहा मिनिटांनी होती ती साडेअकराला सुलुरूपेटा येथे पोहोचली. उतरल्यावर रिक्षा केली आणि अगोदर बुकिंग केलेले श्री लक्ष्मी पॅलेस हे लॉज गाठले. (जनरली गाडी एक नं प्लॅटफॉर्मला लागते. तेथून वर उल्लेखलेल्या लॉजला जायला रिक्षा केली तर महाग पडते, म्हणून रेल्वे ब्रिज वरून दुसऱ्या टोकाला जाऊन तिथून रिक्षा केली तर स्वस्त पडते) सुलुरूपेटा हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामानाने हे लॉज खूपच चांगले आहे. रूम स्वच्छ, प्रशस्त व हवेशीर आहेत. ए.सी. व टी.व्ही. ची सोय आहे. २४ तास गरम पाणी उपलब्ध असते. रूममध्ये गेल्यावर अन्हीके उरकून खालीच असलेल्या चंदूज रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. शाकाहारी व मांसाहारी एकत्र आहेत. राईस प्लेट मिळत नाही. वेगवेगळे जिन्नस मागवावे लागतात आणि अति महागडे आहेत. जेवण एवढे खास नव्हते, पण भुकेपोटी खाऊन घेतले. जेवण करून थोडे विश्रांती घेतली. नंतर काउंटर वर जाऊन लॉजचे मालक श्री दोराबाबू यांना भेटलो व श्रीहरीकोटाला कसे जायचे याची चौकशी केली. त्यांनी खिडकीतून जवळच असलेल्या एका चौकाकडे बोट दाखवून सांगितले की येथे सकाळी सहा वाजल्यापासून SHAR ला जायला जीप मिळतात. एका जीपमध्ये दहाजण बसवतात व माणसे पन्नास रुपये आकारतात. माहिती जाणून घेतल्यावर मी गावात रपेट मारायला बाहेर पडलो. तालुक्याचे गाव जसे असायला पाहिजे तसेच हे आहे. दोन तास फिरून परत रूमवर आलो. दुपारचे जेवण जास्त झाल्याने लॉज शेजारच्या मॉल मधून ब्रेड व बटर आणून खाल्ले. सकाळचा साडेपाचचा गजर लावून झोपलो. उद्या प्रत्यक्ष प्रक्षेपण बघायचे या कल्पनेने बराच वेळ झोप लागली नाही, पण नंतर लागली. सकाळी साडेपाचला उठून अन्हीके आवरून बरोबर सहा वाजता चौकात आलो. जीप उभी होती. जीपमध्ये अजून कोणी आले नव्हते, म्हणून ‘गणेश टी स्टॉल’ असे नांव लिहिलेल्या टपरीवर कॉफी प्यायला गेलो. कॉफी अप्रतिम होती. टपरीचा मालक राजस्थानी होता. त्याला हिंदी व इथली तेलगू भाषा दोन्ही चांगल्या अवगत होत्या. बोलता बोलता मला शारला जायचे आहे असं मी त्याला म्हणालो. तेथेच एक रिक्षावाला होता. तो कॉफीवाल्याला तेलगूत म्हणाला, ” यांना म्हणावं मी त्यांना तीनशे पन्नास रुपयात शारला नेतो.” कॉफी वाल्याने मला हे हिंदीत सांगितले. मी कॉफीवाल्याला सांगितले, “तीनशे रुपयात नेतो काय विचार.” तो तयार झाला. नाही तरी जीपमध्ये दहा माणसांची जुळणी व्हायला किती वेळ लागणार होता कोणास ठाऊक! मी रिक्षात बसलो. मस्त गुलाबी थंडी होती. दोन्हीकडे समुद्राच्या भरती ओहोटीमुळे तयार झालेली क्षारपड जमीन आहे. सूर्योदय व सूर्यास्त बघण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर मचाणे आहेत, त्यांना व्ह्यू पॉईंट्स म्हणतात. अर्ध्या तासात आम्ही श्रीहरीकोटाच्या मुख्य प्रवेशाजवळ पोहोचलो. तेथे रिक्षावाल्याने मला सोडले. उजवीकडे towards viewing gallary असा बोर्ड होता. तेथे गणवेशधारी जवान होते. त्यांनी माझ्याकडील आधार कार्ड व पास बघून मला पुढे जाण्याची अनुमती दिली. मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली.
☆ माझे मृत्यूपत्र… – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆
(देशभक्त वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.)
माझे मृत्युपत्र या कवितेचे रसग्रहण.
सावरकरांना न ओळखणारा या पृथ्वीतलावर विरळाच. भारतमातेच्या मुकुटातील हा दैदिप्यमान हिराच.mयांचे अमरत्व म्हणजे यांचा जाज्वल्य देशाभिमान, देशभक्ती, उदात्त देशप्रेम होय. भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला तोडण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देवासमोर शपथ घेतली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.
असा हा तेजस्वी तारा भारतीय क्षितिजावर चमकत राहिला..
स्वातंत्र्य वीर सावरकर हे उत्तुंग प्रतिभेचे कवी होते.यांनी साहित्याच्या सर्व दालनात प्रवेश केला.यांचे साहित्य सर्व व्यापी आहे.
माझे मृत्युपत्र हे यांचे वहिनीस लिहिलेले पत्रात्मक काव्य आहे.
राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना इंग्रजांनी पकडले. त्यांना पन्नास वर्षांची काळया पाण्याची शिक्षा जाहीर केली. यातून आपली सुटका नाही.हे त्यांनी जाणले. हे कटू सत्य वहिनीला कसे सांगायचे? घरची परिस्थिती मोठी प्रतिकूल होती.१९०९मध्ये त्यांच्या मोठया भावाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचा चार वर्षांचा मुलगा देवाघरी गेलेला. अशा परिस्थितीत ही मर्मभेदी गोष्ट कशी सांगावी या विचारात ते असताना काव्य प्रतिभा हात जोडून उभी राहिली.असा हा या कवितेचा जन्म.ही कविता देशभक्ती ने ओथंबली आहे.आजपर्यत अनेक कवींनी देशभक्तीच्या कविता लिहिल्या.परंतु झाले बहु, होतील बहु परी या सम नसे.
☆ माझे मृत्यूपत्र… ☆
हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले,
वकृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,
तुतेची अर्पियली नवी कविता रसाला
लेखाप्रती विषय तुचिं अनन्य झाला.
त्वत्स्थंडिली ढकलिले प्रियमित्रसंघा
केले स्वयें दहन यौवन देह भोगा
तत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा
त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमता
दावानलात वहिनी नव पुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल धैर्यनिष्ठ बंधू
केला हवि परम कारुण पुण्य सिंधू
त्वत्स्थंडिली वरी प्रिय बाळ झाला
त्वत्स्थंडिली वरी आता मम देह ठेला
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्स्थंडिली च असते,दिधले बळी मी
की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने
जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे
बुद्धयाची वाण धरिले सतीचे.
माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी
हा वत्सवत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी
सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हाते
आलिंगन प्रियकरा मम अंगनेते
प्रस्तुत कविता सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्ती चे प्रतीक आहे. सावरकरांची त्यागी भावना दर्शविणाऱ्या या ओळी बघु या.
हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले
या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्नि कुंडात
माझा परिवार, मित्र, यौवन सारे भोग
यांची आहुती दिली आहे.
या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या काव्यातील शब्दसंपदा संस्कृत प्रचुर आहे.या काव्यात वीर रसाला करूण रसाची झालर लावली आहे.
भगवान् श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेचे प्रबोधन केले व त्यात ज्ञान,कर्म, भक्ती या योगांची माहिती दिली.सावरकर हे बुद्धिमत्तेचे पुतळे होते.त्यांनी ज्ञान,कर्म,भक्ती मार्गाचा अवलंब केला. ही कविता राष्ट्रीय भावनेची व देशभक्ती ने ओतप्रोत भरलेली आहे. कविता आशय संपन्न आहे.
आम्ही हे मातृभूमीची सेवा आंधळेपणाने घेतली नसून डोळे उघडे ठेवून घेतली आहे. कवि म्हणतो की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ठिकठिकाणी सावरकरांचे मातृभूमी विषयीचे प्रेम कळसास पोहचले आहे. सावरकरांचा निस्वार्थी भाव या ओळीत दिसून येतो
हे आपले कुलही त्यामध्ये ईश्र्वरांश
निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश
सावरकरांना पुढील चित्र दिसत असून ते त्यांनी सुंदर विरोधाभास अंलकाराने रेखाटले आहे.
हिंदुस्थान हा आमचा देश आहे. आमच्या देशात आमचेच राज्य हवे या तत्वनिष्ठ स्वभामुळे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.
त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे.
अंदमानच्या काळ्याभोर कोठडीत खिळ्यांचया साह्याने भिंतीवर लिहिलेली कविता आहे.या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिभेला आमचा खरोखरी सलाम.
☆ ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
शिक्षणावर ते पुस्तकी आहे, पढिक पंडीत बनवणारे आहे, असा आरोप सातत्याने केला जातो. गेल्या पंचवीस-तीस वर्षात शैक्षणिक धोरण अधीक कृतीशील, उपक्रमशील झाले आहे हे खरे, तथापि धोरण आणि कार्यवाही यात खूप तफावत दिसून येते. मुले कृतिशील बनावी, म्हणून विविध विषयातील प्रकल्प मुलांना घरी करायला दिले जातात. प्रत्यक्षात मात्र हे प्रकल्प पालकच घरी करताना दिसतात. मुलांचा सहभाग खूप कमी असतो. कात्री, पट्टी, डिंक आणून दे, इ. पुरताच त्यांचा सहभाग मर्यादित असतो. मुलांचे शिक्षण कृतीशील, उपक्रमशील व्हावे, यासाठी सिस्टेड फाउंडेशनाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. सिस्टेड फाउंडेशन म्हणजे ( CISTED FOUNDATION – CENTRE FOR INNOVATION, TECHNOLOGY & ENTERPRENEURSHIP DEVELOPMENT ). याचे फाउंडर मेंबर आहेत, प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे. त्यांच्या प्रकल्पाचे स्वरूप आहे, ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’
मुलांना खेळण्यांशी खेळायला आवडतं. मुलांनी स्वत:च खेळणी बनवली तर— मुलं क्रियाशील होतील. त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळेल. ही खेळणी वैज्ञानिक तत्वांवर बनवली, तर क्रियाशीलता, नवनिर्मितीचा आनंद याबरोबरच त्यांची वैज्ञानिक तत्वांची समजही पक्की होईल. बाजारात अशी काही खेळणी विकतही मिळतात. उदा. डोलणारी, न पडणारी बाहुली. खाली न पडणार्याी बाहुलीमागे गुरुत्वाकर्षण हे तत्व आहे. अशा प्रकारची काही खेळणी मुलांनी स्वत:च बनवली तर? मुलांना निर्मितीचा आनंदही मिळेल आणि वैज्ञानिक तत्वेही चांगली लक्षात रहातील, हा विचार घेऊन सिस्टेड फाउंडेशन गेली दोन वर्षे या प्रकल्पावर काम करत आहे.
सिस्टेड फाउंडेशनचा हा प्रकल्प खरं तर एका जुन्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन आहे.
नवीन काही तरी करण्याच्या ध्यासातून प्रा. भालचंद्र दामोदर केळकर म्हणजेच प्रा. भालबा केळकर यांनी एक नवा उपक्रम १९७५ साली हाती घेतला होता. तो होता शाळकरी मुलांसाठी. ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’, असं त्याला नाव देता येईल. मुलांना खेळण्यांशी खेळायला खूप आवडतं. मुलांनी स्वत:च अशी खेळणी बनवली तर? मग विचार सुरू झाला कोणत्या तत्वावर आधारित कोणती खेळणी बनवता येतील? नंतर तशी खेळणी बनवली गेली. त्याचे प्रात्यक्षिकही झाले. इथे त्यांच्यासोबत हरिभाऊ लिमये, प्रा. देशिंगकर, श्री. प्रमोद लिमये इ. मंडळी होती. यावर आधारित पुस्तकही छापले गेले. सध्या मात्र ते पुस्तक कुठेही उपलब्ध नाही. प्रकल्प महत्वाचा, शिक्षणाला एक नवी दिशा दाखवणारा होता, परंतु यातील संबंधित व्यक्ती आपापल्या व्यापात अधीक व्यस्त असल्याने त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळे त्याचा व्हावा तसा प्रचार आणि प्रसार झाला नाही. हळू हळू हा उपक्रम विस्मृतीत गेला. प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे सध्या या विस्मृतीत गेलेल्या उपक्रमाच्या पुनरुज्जीवनाच्या कामात गुंतले आहेत.
१९७५ साली जेव्हा हा उपक्रम हाती घेतला होता, त्यावेळी बनवलेली खेळणी, त्यात काय सुधारणा करता येतील, नव्याने कोणत्या वैज्ञानिक तत्वावर कोणती खेळणी तयार करता येतील , (innovation and cunstraction) याबद्दल प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे यांच्यात चर्चा होते आणि नंतर खेळणी तयार केली जातात. पुठ्ठा, फळी, कागद, तार, खिळे, बॅटरी, काड्या, टाचण्या, पत्रा, रंगपेटी यासारखे रहज उपलब्ध होणारे साहित्य आणि कात्री, डिंक, पक्कड, हातोडी, चिकटपट्टी यासारखी हत्यारे वापरून ही खेळणी बनवली जातात. प्रत्यक्ष खेळणी तयार करण्यासाठी अनेक हातांची त्यांना मदत होते. सध्या त्यांचे असे २० खेळण्यांचे संच तयार आहेत. आणखी ३० खेळणी बनवण्याची त्यांची योजना आहे. उदाहरण म्हणून त्यापैकी काही खेळण्यांची नावे आणि त्यामागील वैज्ञानिक तत्व बघू या. डोलणारी, न पडणारी बाहुली. गुरुत्वाकर्षण या तत्वावर हे खेळणं बनवलेलं आहे. बाजारातही अशी बाहुली मिळतेच, पण तयार खेळण्यांशी खेळताना हे तत्व मुलांच्या लक्षात येत नाही. पॅरॅशूटच्या खेळण्यात गुरुत्वाकर्षण आणि हवेचा ऊर्ध्वगामी दाब या तत्वांचा वापर केला आहे. न्यूटनचा पाळणा या खेळात ऊर्जेचे संक्रमण ( transfar of energy) हे तत्व वापरले आहे. (कॅरम या खेळात स्ट्रायकरने सोंगटी मारून ती पॉकेटमध्ये घालवायची असते. त्यातही हेच तत्व आहे.) हवेतील मत्सालय किंवा प्राणी संग्रहालय यात तरफेचे तत्व वापरले आहे.
दोन आरशात विशिष्ट कोन करून त्याच्या पुढे वस्तू ठेवल्यावर तिच्या किती प्रतिमा मिळतात? कोन कमी-जास्त केल्यावर मिळणार्याय प्रतिमांची संख्या कशी कमी जास्त होते, कोन जितका लहान, तितकी प्रतिमांची संख्या जास्त. असं बघता बघता दोन आरशात शून्य कोन ठेवला, म्हणजेच समांतर आरसे ठेवले, तर प्रतिमा कशा असंख्य मिळतात, हे दाखवता येते. या सार्याल प्रयत्नातून अनेक गोष्टी मुले स्वत:च शिकतात. शोभादर्शक बाजारात मिळतं. नळकांडं फिरवलं की आतल्या आकृती बदलतात. ते सारं पहाण्यात मुले रमून जातात. मुलांनी ते स्वत: तयार करावं. प्रथम नळकांडे तयार करावे. तीन आरशांच्या दीड इंच रुंदी व सहा ते आठ इंच लांबीचे आरसे त्रिकोण तयार करून आत बसवावेत. आत काचा, मणी, रंगीत कागद घालावेत. नळकांद्याच्या टोकाला पारदर्शक कागद लावून त्याला पुढे पुठ्ठा लावावा. पुठ्ठयाला बघण्यासाठी मधोमध छिद्र पाडावे. काचा, मणी, रंगीत कागद यांच्या कोन करून ठेवलेल्या आरशांमुळे अनेक प्रतिमा तयार होऊन नयनरम्य आकृती दिसते. नळकांडे हलवताच आतल्या आकृत्या बदलतात. शोभादर्शकाला तीन काचांच्याऐवजी चार किंवा पाच काचा लावल्या तर…आत त्रिकोणाऐवजी चौकोन, पंचकोन तयार होईल. मग दिसणार्याय प्रतिमांमध्ये काय फरक दिसेल? मुलांना विचारप्रवृत्त करावे. निरीक्षण करायला, शोधून काढायला सांगावे. भालबा म्हणतात, ‘मुलांनी स्वत:च अशी काही खेळणी बनवली, तर ती क्रियाशील होतील. स्वत: वस्तू तयार केल्याचा आनंद मिळेल. ती बनवताना आत्मविश्वास, चिकाटी हे गुण वाढीला लागतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातून जी वैज्ञानिक तत्वे मुले शिकतील ती कधीच विसरणार नाहीत. पाठांतरापेक्षा हे ज्ञान टिकाऊ स्वरूपाचे असेल. या सार्याणतून पुढची पिढी पढिक पंडित न बनता क्रियाशील बनेल.’
तत्व, विचार आणि कल्पना या आपआपल्या जागी कितीही सुयोग्य असल्या, तरी व्यवहारात त्यांची उपयोगिता सिद्ध होणं महत्वाचं असतं. सिस्टेड फौंडेशनने आपल्या ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ या उपक्रमाची उपयुक्तता आजमावण्यासाठी पलूस, देशिंग, सखराळे आणि कणेरी मठ येथील शाळेतून यासंबंधीच्या कार्यशाळा घेतल्या. २००-४००मुले होती. मुले खेळणी बनवण्यात रमून गेली होती.
शाळेत कार्यशाळा घ्यायची ठरली की शाळाप्रमुखांशी संपर्क साधून कार्यशाळेमागचा हेतू स्पष्ट केला जातो. त्यांच्या संमतीने दिवस निश्चित झाला की जी खेळणी कार्यशाळेत बनवून घ्यायची त्याची यादी, त्यामागील वैज्ञानिक तत्व, खेळणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-साधने, त्याची चित्राकृती शाळेकडे पाठवली जाते. साधारणपणे एका ठिकाणी पाच खेळण्यांची माहिती दिली जाते. मुलांनी साहित्य आणावे, असेही संगितले जाते. न आणलेले साहित्य आयोजकांकडून पुरवले जाते. प्रत्यक्ष कार्यशाळा सुरू करताना प्रथम त्या त्या खेळण्याची माहिती सांगितली जाते. खेळणी करून दाखवली जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांचे ५-५ चे गट केले जातात. त्यांना खेळणी करण्यास संगितले जाते. प्रत्येक गटाला वेगवेगळी खेळणी तयार करण्यास सांगितले जाते. मुले काम करत असताना अर्थातच त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. त्यांना मार्गदर्शन केले जाते. कार्यशाळेचा अवधी तीन तासांचा असतो. त्यात काही गटात एक, काही गटात दोन, तर क्वचित एखाद्या गटात तीन खेळणीही बनतात. गट तयार करताना मुलांचे वय अथवा इयत्ता विचारात घेतली जात नाही. पाचवी ते नववी मुलांचा समावेश या कार्यशाळेत असतो.
प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे आणि एखादा मदतनीस असे तिघे जण कार्यशाळेत मार्गदर्शन करतात. काही वेळा शाळा स्वत: संपर्क करून पुन्हा कार्यशाळा घेण्याविषयी विनंती करते. पलूस इथे चार वेळा कार्यशाळा झाली आहे. एका कार्यशाळेसाठी साधारणपणे दहा हजार खर्च येतो. सुरूवातीला हा खर्च, ‘घरचं खाऊन लष्करच्या भाकरी…’ अशी टीका सहन करत भलाबांनीच केलाय. शिक्षण पद्धतीतील परिवर्तनची आत्यंतिक आस ( passion) हेच त्याच्यामागे कारण आहे. आता फाउंडेशन स्थापन झालय.
सध्याचे शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी बघू जाता, हा उपक्रम अधीक प्रभावीपणे चळवळीत रूपांतरित होईल, असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, १४ तालुक्यांच्या गावी सायन्स सेंटर स्थापन झाली आहेत. महाराष्ट्रातील सायन्स सेंटर स्थापन करण्यात अजिंक्य कुलकर्णी यांचे मोठेच परिश्रम आहेत. त्यांनी लखनौ, चंदीगड, दिल्ली, कानपूर, चेन्नई इ. ठिकाणी सायन्स सेंटर स्थापन केली आहेत आणि त्याचे काम-काज कसे चालावे, याचे मॉडेल पद्मनाभ केळकर यांनी तयार केले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक सायन्स सेंटरसाठी चार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आशा ५६ शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काम प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे यांनी केले आहे. त्यांच्यामार्फत शाळाशाळातून, ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समाज’ हा उपक्रम रुजत वाढत जाईल, असे वाटते.
वसई ते कोल्हापूर या पट्ट्यातील, जो डोंगराळ भाग आहे, तिथे आश्रम शाळा (निवासी शाळा) आहेत. २०१९पर्यन्त या शाळांमधून सायन्स सेंटर्स स्थापन झाली आहेत. या प्रत्येक आश्रम शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे आणि पद्मनाभ केळकर यांनी केले आहे. सूर्य उगावतो आहे. आता प्रतीक्षा आहे त्याच्या सर्वदूर पसरणार्यां झळझळित किरणांची.