सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “ज्ञानपीठाच्या निमित्ताने…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

26 फेब्रुवारी.! आजच्याच तारखेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर ह्यांच्या “ययाती”ला मिळाला होता.

कुठलीही व्यक्ती, व्यक्तीमत्व वा पुस्तकातील गाभा जाणून घ्यायचा असेल तर थेट तिला अगदी मूळापासून गाभ्याला जाणून घेऊनच अभ्यासावं लागतं.अन्यथा वरवर ती व्यक्ती वा ते पुस्तक अभ्यासलं वा चाळलं तर खरे रुप न जाणून घेताच मनात गैरसमज वा संभ्रम निमार्ण व्हायचीच दाट शक्यता.

बरेचदा काही पुस्तकं वा काही व्यक्ती वाचण्याची वा जाणण्याची तीव्र ईच्छा होते, तेव्हा जसजसं त्या गोष्टीच्या खोलापर्यंत आपण अभ्यासतो तो आपण जे बघतं होतो, जाणतं होतो ते निव्वळ हिमनगाचे दिसणारे टोकच होते बाकी सगळा उर्वरित गोष्टींचा आवाका खूप प्रचंड आहे ह्याची जाणीव होते.काही व्यक्तींच्या हातून खूप सारी साहित्य निर्मीती होते.पण त्या साहित्यातील एखादे साहित्य पराकोटीचे लोकप्रिय होऊन त्या व्यक्तीची जणू ओळखच बनते.वि. स. खांडेकर हे ह्याच प्रकारातील “ययाती”ह्या पौराणिक कादंबरीमुळे अजरामर झाले. जणू वि.स.खांडेकर आणि ययाती हे एक समीकरणच बनले. आपलं आवडीचं वाचनं आणि पुस्तक ह्याचा विचार आल्याबरोबर जी काही पुस्तक माझ्या चटकन नजरेसमोर येतात त्यात ययाती हे असतचं.

सांगली,मिरजकडील खांडेकरांनी साहित्य क्षेत्रात विविध पदं भुषविलीतं,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.त्यांना अकादमी पुरस्कार, मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण तसेच कोल्हापूर च्या शिवाजी विद्यापीठाची मानाची डिलीट पदवी मिळाली.आज 26 फेब्रुवारी. 1976 साली ह्याच दिवशी ययाती साठी वि.स.खांंडेकरांना  शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यासारखा  पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

ययाती मी कित्येक वेळा वाचली असेल ह्याचं काही गणितचं नाही. काँलेजजीवना पासून आजवर वाचतांना तिच्यातील दरवेळी नवीनच पैलू नजरेसमोर येतात.खूप सारं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलयं,शिकवलयं ह्या कादंबरीनं.

आधी ऋषीकन्या आणि नंतर राणी झालेल्या देवयानीची संसारकथा,प्रेमाचेच दुसरे नाव त्याग,समर्पण हे मानणाऱ्या राजकन्या शर्मिष्ठेची प्रेमकथा,संयमी कचाची भक्तीगाथा, त्यागमूर्ती शर्मिष्ठा पूत्र पुरूरवाची त्यागकथा, आणि मुख्य म्हणजे आधी राजपुत्र व नंतर राजा झालेल्या ययातीची भरभरून जगण्याच्या आसक्तीची कथा ह्यात सुरेख रंगवलीयं.विशेष म्हणजे एकेक घटनांची साखळी गुंफतांना कुठलीही कडी विस्कळीत झाल्याची वा निखळून पडल्याची अजिबात जाणवत नाही.

ह्यातील एक एक पात्र सजीव होऊन आपल्या डोळ्यासमोर अवतीभवती वावरल्याचा वाचतांना भास होतो.कामुक,लंपट

संयम न पाळणारा ययाती आपल्याला खूप काही शिकवतो.त्याच्या कामुकपणाचा राग न येता त्याच्या शारीरिक मागणीमुळे येणाऱ्या हतबलतेची कीव येते तेव्हाच तो कुठेतरी जवळचा पण वाटायला लागतो.देवयानी च्या प्रबळ महत्वकांक्षे बद्दल वाचतांना अचंबित होतो.शर्मिष्ठेचा त्याग व समर्पण बघितले की नतमस्तक व्हायला होत.खरचं मनापासून केलेलं प्रेम ही खूप उदात्त संकल्पना आहे.ख-या प्रेमात एकमेकांची काळजी घेणं,काळजी वाटणं,हे सगळं असतं.ख-या प्रेमात ना वैषयिक भावना असते ना सतत डोक्याला डोकी लाऊन सतत जवळ राहण्याची गरज हे आपल्याला हे लिखाण समजावून सांगतं.शर्मिष्ठा व ययाती हे दोघे घालवित असलेले काहीच क्षण हे देवयानी ययातीच्या एकत्र सहवासापेक्षाही जास्त समाधान देऊन जातात हे कांदबरीत अतिशय छान उलगडून सांगितलयं.प्रेम हे घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद देऊन जात हे ही वाचतांना जाणवतं. गुरुबंधू कचाने वेळोवेळी केलेली मदत किती अनमोल असते हे उलगडतं.ख-या सद्भावना असल्या की ती व्यक्ती नेमक्या अडचणीच्या प्रसंगी परखडपणे वागून योग्य मार्गदर्शन करते ह्याचा प्रत्यय गुरूपुत्र कचदेव देतात.रक्ताच्या नात्यात प्रसंगी सर्वात प्रिय असलेले तारुण्यही लिलया हसतहसत कसे पित्याला द्यावे हे राजपुत्र पुरुरवा कडून. शिकावं.आणि शेवटी ह्या सगळ्या अनुभवांनी आलेल्या शहाणपणामुळं किंवा आलेल्या समजामुळं राजा ययाती ला उपरती होऊन त्याच्यात होणारे सर्वांगिण चांगले बदल आपल्याला खूप काही शिकवून जातात.

…म्हणून जर कोणी चुकून ही कादंबरी वाचली नसेल तर अवश्य वाचा इतकचं मी म्हणेन. आज काही वाचकांच्या आग्रहास्तव ह्या दिवसाचे औचित्य साधून परत ही ययाती बद्दल पोस्टलयं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments