श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ सावरकरांची आठवण… — लेखक – श्री शरद पोंक्षे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

बरोबर १९६६ च्या १ फेब्रूवारीला सावरकरांनी प्रायोपवेशन करायचे ठरवले. आपले ह्या जन्मीचे कार्य पूर्ण झाले आहे ही तात्यांची भावना होती. आपल्या दीर्घायुष्याचे महत्व काय,अशा प्रश्नावर ऊत्तर देताना ते एकदा म्हणाले होते की, ” जगण्याची चिंता मी कधीच केली नाही, म्हणूनच बहुधा इतका दीर्घकाळ जगलो 

असेन. “ तात्यांनी वांच्छिलेले स्वातंत्र्य, भाषाशुध्दी, सामाजिक सुधारणा, सैनिकीकरण, आदी विषयात पुष्कळ यश मिळाले होते.. म्हणून तात्या म्हणत की त्यांचे जीवन कृतार्थ झाले आहे. त्यांनी पूर्वी जेजे पेरलंय ते आता उगवत आहे. त्याला आता फळे येत आहेत. हा आपल्या आयुष्याचा फलऋतु आहे. यावर आपण त्यांना म्हटले की, “ हे ठीक आहे.. पण अद्याप पाकिस्तान नष्ट व्हायचे आहे, आपल्याला मानणारे असे राज्यकर्ते राज्यावर बसायचे आहेत, त्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.” त्यावर ते म्हणत ”अरे जगात कोणाचीही सर्व स्वप्ने कधीच साकार होत नाहीत. जे झाले हे अपेक्षेपेक्षा, कल्पनेपेक्षा पूर्ण झाले आहे. उरले ते काम पुढच्या पिढीचे आहे. तिला मार्गदर्शन हवे तर मी ते ग्रंथरूपाने लिहून ठेवले आहे. ते वाचणे आणि त्याला अनुसरून वागणे किंवा न वागणे हे त्यांचे काम आहे.” तेव्हा तात्यांचा जीवन संपवण्याचा विचार पक्का ठरला. ज्ञानेश्वरांप्रमाणे गुहाप्रवेश शक्य नव्हता.जलसमाधी घ्यावी असा विचार केला, पण तो सोडून दिला व शेवटी समर्थ रामदासस्वामींप्रमाणे प्रायोपवेशन करायचे ठरवले. आणि १ फेब्रू १९६६ ला अन्न पाणी त्याग केला. सर्वांच्या भेटीगाठी बंद केल्या. ५,६ दिवस गेले. तात्यांचा रक्तदाब खूप खाली गेला. डॉ.पुरंदरेना घाम फुटला. औषध दिले पण ते औषधही घेत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी रक्तदाब स्थिरावला. डॉ. ना  आश्चर्य वाटले. हे कसे झाले? कारण तात्यांचा योगाभ्यास दांडगा होता. काही सिध्दी त्यांना प्राप्त होत्या. हिंदू धर्मातील न पटणाऱ्या आचार विचारांवर कडक टीका करणाऱ्या सावरकरांनी त्यांच्या ध्वजावर अभ्यूदयनिदर्शक कृपाणासमवेत निःश्रेयस निदर्शन कुंडलिनीही अंकित केली होती. शास्त्रीय दृष्टीचे सावरकर, त्यांना पटल्यावाचून, स्वतः अनुभवल्यावाचून ही गोष्ट मानणे शक्य नाही. त्यांना योगशास्त्र अवगत होते. म्हणूनच सर्व भयंकर हालअपेष्टा सोसूनही ते इतकी वर्ष जगले. त्यांच्या लिखाणात, भाषणात लोकांना मोहून टाकणारी शक्ती आली. त्यांचे नाक, कान, डोळे आदी ज्ञानेंद्रीये शेवटपर्यंत उत्तम कार्यक्षम राहिली.

८३ व्या वर्षीसुध्दा त्यांचे केस काळे होते. प्रायोपवेशन चालू होते.. दिवस चालले होते. आयुष्यभर ज्या मृत्यूला त्यांनी पळवून लावले त्याला आता निमंत्रण देऊनही तो जवळ यायला घाबरत होता .त्याही परिस्थितीत ते सहाय्यकाला बोलावून पत्रे वाचून घेत होते. उत्तरे देत होते. एका मोठ्या नेत्याची तार आली.  एकाने लिहीले होते, ” तात्यांची प्रकृती कशी आहे? कळवा “.तर दूसऱ्याची होती, ”तात्यांची प्रकृती सुधारो, अशी मी प्रार्थना करीत आहे ”.  हे वाचून तात्या म्हणाले, “ नीट वाच..अर्थ समजून घे.” सहाय्यक म्हणाले “भावना एकच आहेत तात्या.’ त्यावर ते म्हणाले,” नाही.. मनातल्या भावना तारेत उतरतात. पहिला मी जायची वाट बघतोय व दूसरा मी बरा व्हावा असे म्हणतोय.”  अनेक लोक भेटायला येत होते. आचार्य अत्रेही आले. ते कोणालाच भेटत नव्हते.  १७ व्या दिवशी सहाय्यकाचा हात हातात घेऊन म्हणाले,

”आम्ही जातो अमुच्या गावा।आमुचा राम राम घ्यावा।

आता कैचे देणे घेणे। आता संपले बोलणे।”

सहाय्यकाशी बोललेले हे ते शेवटचे शब्द. त्यानंतर तात्यांनी  हे जीर्ण शरीर टाकून त्यांचा आत्मा पुढच्या प्रवासावर निघाला. जन्माची सांगता त्यांनी पूर्ण केली .

लक्षावधी लोकांना स्फूर्ती देणारे वक्ते, ग्रंथकार, नाटककार, महाकवी, परकीय साम्राज्याला आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर, विचारवंत, समाजसुधारक, स्वाभिमानी, हिंदूंचे  ‘हिंदूहृदयसम्राट‘ —  श्री विनायक दामोदर सावरकर— अखेर त्यांनी मृत्यूला २६ दिवसांनी कवटाळले व २६ फेब्रू १९६६ ला सकाळी ह्या जन्माची सांगता करून अनादी अनंत अवध्य आत्मा स्वर्गाकडे गेला.

त्यांचे महान स्फूर्ती कार्य, त्यांचे विचार, हिंदू युवक युवती कार्यप्रवण करून त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करतील हीच अपेक्षा. हा दृढ विश्वास.

लेखक : श्री शरद पोंक्षे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments