सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

वाचताना वेचलेले 
☆ गीतांजली भावार्थ …भाग 54 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
१०२.
मी तुला ओळखतो अशी घमेंड मी लोकांत
मिरवत असे.
माझ्या कलाकृतीतून ते तुझीच प्रतिभा पाहात असत.
‘कोण आहे तो?’ मला येऊन ते विचारत, त्यांना काय सांगावं? ‘खरंच! मला सांगता येत नाही.’
ते मला दोष देत, कुचेष्टा करत निघून जात.
तू मात्र हसत बसत असायचास.
तुझ्या कथा मी चिरंतन गीतात सांगत असे.
माझ्या ऱ्हदयातील गुपित त्यात उमटत असे.
ते म्हणत, ‘ याचा सर्व अर्थ मला सांगा.’
त्यांना काय सांगावं मला समजत नसे.
मी म्हणायचो,’त्याचा अर्थ काय कुणास ठाऊक!’
कुचेष्टा करत हसत ते निघून जात.
तू मात्र तिथंच हसत बसून राहायचास.
१०३.
तुला केलेल्या एकाच नमनात,हे परमेशा,
माझ्या वृत्ती प्रकट होवोत आणि
तुझ्या पायाशी असलेल्या या जगाला स्पर्श करोत.
वर्षाव न झालेल्या पाण्यानं वाकलेल्या
जुलैच्या ढगाप्रमाणं या एकाच नमस्कारात
माझ्या वृत्ती तुझ्या दाराशी नम्र होवोत.
एकाच माझ्या नमनात विविध स्वरांनी युक्त
माझी सारी गीतं, एकाच प्रवाहात सामील होवोत,
शांत सागरात विलीन होवोत.
पर्वत शिखरावरील आपल्या घरट्याकडे रात्रंदिवस गृहविरहानं व्यथित झालेल्या बगळ्यांच्या समूहाप्रमाणं माझी जीवनयात्रा
एकाच नमनात तुझ्या शाश्वत घराकडे
प्रवास करो.
– समाप्त –
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈