26 फेब्रुवारी.! आजच्याच तारखेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर ह्यांच्या “ययाती”ला मिळाला होता.
कुठलीही व्यक्ती, व्यक्तीमत्व वा पुस्तकातील गाभा जाणून घ्यायचा असेल तर थेट तिला अगदी मूळापासून गाभ्याला जाणून घेऊनच अभ्यासावं लागतं.अन्यथा वरवर ती व्यक्ती वा ते पुस्तक अभ्यासलं वा चाळलं तर खरे रुप न जाणून घेताच मनात गैरसमज वा संभ्रम निमार्ण व्हायचीच दाट शक्यता.
बरेचदा काही पुस्तकं वा काही व्यक्ती वाचण्याची वा जाणण्याची तीव्र ईच्छा होते, तेव्हा जसजसं त्या गोष्टीच्या खोलापर्यंत आपण अभ्यासतो तो आपण जे बघतं होतो, जाणतं होतो ते निव्वळ हिमनगाचे दिसणारे टोकच होते बाकी सगळा उर्वरित गोष्टींचा आवाका खूप प्रचंड आहे ह्याची जाणीव होते.काही व्यक्तींच्या हातून खूप सारी साहित्य निर्मीती होते.पण त्या साहित्यातील एखादे साहित्य पराकोटीचे लोकप्रिय होऊन त्या व्यक्तीची जणू ओळखच बनते.वि. स. खांडेकर हे ह्याच प्रकारातील “ययाती”ह्या पौराणिक कादंबरीमुळे अजरामर झाले. जणू वि.स.खांडेकर आणि ययाती हे एक समीकरणच बनले. आपलं आवडीचं वाचनं आणि पुस्तक ह्याचा विचार आल्याबरोबर जी काही पुस्तक माझ्या चटकन नजरेसमोर येतात त्यात ययाती हे असतचं.
सांगली,मिरजकडील खांडेकरांनी साहित्य क्षेत्रात विविध पदं भुषविलीतं,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.त्यांना अकादमी पुरस्कार, मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण तसेच कोल्हापूर च्या शिवाजी विद्यापीठाची मानाची डिलीट पदवी मिळाली.आज 26 फेब्रुवारी. 1976 साली ह्याच दिवशी ययाती साठी वि.स.खांंडेकरांना शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यासारखा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
ययाती मी कित्येक वेळा वाचली असेल ह्याचं काही गणितचं नाही. काँलेजजीवना पासून आजवर वाचतांना तिच्यातील दरवेळी नवीनच पैलू नजरेसमोर येतात.खूप सारं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलयं,शिकवलयं ह्या कादंबरीनं.
आधी ऋषीकन्या आणि नंतर राणी झालेल्या देवयानीची संसारकथा,प्रेमाचेच दुसरे नाव त्याग,समर्पण हे मानणाऱ्या राजकन्या शर्मिष्ठेची प्रेमकथा,संयमी कचाची भक्तीगाथा, त्यागमूर्ती शर्मिष्ठा पूत्र पुरूरवाची त्यागकथा, आणि मुख्य म्हणजे आधी राजपुत्र व नंतर राजा झालेल्या ययातीची भरभरून जगण्याच्या आसक्तीची कथा ह्यात सुरेख रंगवलीयं.विशेष म्हणजे एकेक घटनांची साखळी गुंफतांना कुठलीही कडी विस्कळीत झाल्याची वा निखळून पडल्याची अजिबात जाणवत नाही.
ह्यातील एक एक पात्र सजीव होऊन आपल्या डोळ्यासमोर अवतीभवती वावरल्याचा वाचतांना भास होतो.कामुक,लंपट
संयम न पाळणारा ययाती आपल्याला खूप काही शिकवतो.त्याच्या कामुकपणाचा राग न येता त्याच्या शारीरिक मागणीमुळे येणाऱ्या हतबलतेची कीव येते तेव्हाच तो कुठेतरी जवळचा पण वाटायला लागतो.देवयानी च्या प्रबळ महत्वकांक्षे बद्दल वाचतांना अचंबित होतो.शर्मिष्ठेचा त्याग व समर्पण बघितले की नतमस्तक व्हायला होत.खरचं मनापासून केलेलं प्रेम ही खूप उदात्त संकल्पना आहे.ख-या प्रेमात एकमेकांची काळजी घेणं,काळजी वाटणं,हे सगळं असतं.ख-या प्रेमात ना वैषयिक भावना असते ना सतत डोक्याला डोकी लाऊन सतत जवळ राहण्याची गरज हे आपल्याला हे लिखाण समजावून सांगतं.शर्मिष्ठा व ययाती हे दोघे घालवित असलेले काहीच क्षण हे देवयानी ययातीच्या एकत्र सहवासापेक्षाही जास्त समाधान देऊन जातात हे कांदबरीत अतिशय छान उलगडून सांगितलयं.प्रेम हे घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद देऊन जात हे ही वाचतांना जाणवतं. गुरुबंधू कचाने वेळोवेळी केलेली मदत किती अनमोल असते हे उलगडतं.ख-या सद्भावना असल्या की ती व्यक्ती नेमक्या अडचणीच्या प्रसंगी परखडपणे वागून योग्य मार्गदर्शन करते ह्याचा प्रत्यय गुरूपुत्र कचदेव देतात.रक्ताच्या नात्यात प्रसंगी सर्वात प्रिय असलेले तारुण्यही लिलया हसतहसत कसे पित्याला द्यावे हे राजपुत्र पुरुरवा कडून. शिकावं.आणि शेवटी ह्या सगळ्या अनुभवांनी आलेल्या शहाणपणामुळं किंवा आलेल्या समजामुळं राजा ययाती ला उपरती होऊन त्याच्यात होणारे सर्वांगिण चांगले बदल आपल्याला खूप काही शिकवून जातात.
…म्हणून जर कोणी चुकून ही कादंबरी वाचली नसेल तर अवश्य वाचा इतकचं मी म्हणेन. आज काही वाचकांच्या आग्रहास्तव ह्या दिवसाचे औचित्य साधून परत ही ययाती बद्दल पोस्टलयं.
☆ सावरकरांची आठवण… — लेखक – श्री शरद पोंक्षे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
बरोबर १९६६ च्या १ फेब्रूवारीला सावरकरांनी प्रायोपवेशन करायचे ठरवले. आपले ह्या जन्मीचे कार्य पूर्ण झाले आहे ही तात्यांची भावना होती. आपल्या दीर्घायुष्याचे महत्व काय,अशा प्रश्नावर ऊत्तर देताना ते एकदा म्हणाले होते की, ” जगण्याची चिंता मी कधीच केली नाही, म्हणूनच बहुधा इतका दीर्घकाळ जगलो
असेन. “ तात्यांनी वांच्छिलेले स्वातंत्र्य, भाषाशुध्दी, सामाजिक सुधारणा, सैनिकीकरण, आदी विषयात पुष्कळ यश मिळाले होते.. म्हणून तात्या म्हणत की त्यांचे जीवन कृतार्थ झाले आहे. त्यांनी पूर्वी जेजे पेरलंय ते आता उगवत आहे. त्याला आता फळे येत आहेत. हा आपल्या आयुष्याचा फलऋतु आहे. यावर आपण त्यांना म्हटले की, “ हे ठीक आहे.. पण अद्याप पाकिस्तान नष्ट व्हायचे आहे, आपल्याला मानणारे असे राज्यकर्ते राज्यावर बसायचे आहेत, त्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.” त्यावर ते म्हणत ”अरे जगात कोणाचीही सर्व स्वप्ने कधीच साकार होत नाहीत. जे झाले हे अपेक्षेपेक्षा, कल्पनेपेक्षा पूर्ण झाले आहे. उरले ते काम पुढच्या पिढीचे आहे. तिला मार्गदर्शन हवे तर मी ते ग्रंथरूपाने लिहून ठेवले आहे. ते वाचणे आणि त्याला अनुसरून वागणे किंवा न वागणे हे त्यांचे काम आहे.” तेव्हा तात्यांचा जीवन संपवण्याचा विचार पक्का ठरला. ज्ञानेश्वरांप्रमाणे गुहाप्रवेश शक्य नव्हता.जलसमाधी घ्यावी असा विचार केला, पण तो सोडून दिला व शेवटी समर्थ रामदासस्वामींप्रमाणे प्रायोपवेशन करायचे ठरवले. आणि १ फेब्रू १९६६ ला अन्न पाणी त्याग केला. सर्वांच्या भेटीगाठी बंद केल्या. ५,६ दिवस गेले. तात्यांचा रक्तदाब खूप खाली गेला. डॉ.पुरंदरेना घाम फुटला. औषध दिले पण ते औषधही घेत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी रक्तदाब स्थिरावला. डॉ. ना आश्चर्य वाटले. हे कसे झाले? कारण तात्यांचा योगाभ्यास दांडगा होता. काही सिध्दी त्यांना प्राप्त होत्या. हिंदू धर्मातील न पटणाऱ्या आचार विचारांवर कडक टीका करणाऱ्या सावरकरांनी त्यांच्या ध्वजावर अभ्यूदयनिदर्शक कृपाणासमवेत निःश्रेयस निदर्शन कुंडलिनीही अंकित केली होती. शास्त्रीय दृष्टीचे सावरकर, त्यांना पटल्यावाचून, स्वतः अनुभवल्यावाचून ही गोष्ट मानणे शक्य नाही. त्यांना योगशास्त्र अवगत होते. म्हणूनच सर्व भयंकर हालअपेष्टा सोसूनही ते इतकी वर्ष जगले. त्यांच्या लिखाणात, भाषणात लोकांना मोहून टाकणारी शक्ती आली. त्यांचे नाक, कान, डोळे आदी ज्ञानेंद्रीये शेवटपर्यंत उत्तम कार्यक्षम राहिली.
८३ व्या वर्षीसुध्दा त्यांचे केस काळे होते. प्रायोपवेशन चालू होते.. दिवस चालले होते. आयुष्यभर ज्या मृत्यूला त्यांनी पळवून लावले त्याला आता निमंत्रण देऊनही तो जवळ यायला घाबरत होता .त्याही परिस्थितीत ते सहाय्यकाला बोलावून पत्रे वाचून घेत होते. उत्तरे देत होते. एका मोठ्या नेत्याची तार आली. एकाने लिहीले होते, ” तात्यांची प्रकृती कशी आहे? कळवा “.तर दूसऱ्याची होती, ”तात्यांची प्रकृती सुधारो, अशी मी प्रार्थना करीत आहे ”. हे वाचून तात्या म्हणाले, “ नीट वाच..अर्थ समजून घे.” सहाय्यक म्हणाले “भावना एकच आहेत तात्या.’ त्यावर ते म्हणाले,” नाही.. मनातल्या भावना तारेत उतरतात. पहिला मी जायची वाट बघतोय व दूसरा मी बरा व्हावा असे म्हणतोय.” अनेक लोक भेटायला येत होते. आचार्य अत्रेही आले. ते कोणालाच भेटत नव्हते. १७ व्या दिवशी सहाय्यकाचा हात हातात घेऊन म्हणाले,
”आम्ही जातो अमुच्या गावा।आमुचा राम राम घ्यावा।
आता कैचे देणे घेणे। आता संपले बोलणे।”
सहाय्यकाशी बोललेले हे ते शेवटचे शब्द. त्यानंतर तात्यांनी हे जीर्ण शरीर टाकून त्यांचा आत्मा पुढच्या प्रवासावर निघाला. जन्माची सांगता त्यांनी पूर्ण केली .
लक्षावधी लोकांना स्फूर्ती देणारे वक्ते, ग्रंथकार, नाटककार, महाकवी, परकीय साम्राज्याला आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर, विचारवंत, समाजसुधारक, स्वाभिमानी, हिंदूंचे ‘हिंदूहृदयसम्राट‘ — श्री विनायक दामोदर सावरकर— अखेर त्यांनी मृत्यूला २६ दिवसांनी कवटाळले व २६ फेब्रू १९६६ ला सकाळी ह्या जन्माची सांगता करून अनादी अनंत अवध्य आत्मा स्वर्गाकडे गेला.
त्यांचे महान स्फूर्ती कार्य, त्यांचे विचार, हिंदू युवक युवती कार्यप्रवण करून त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करतील हीच अपेक्षा. हा दृढ विश्वास.
लेखक : श्री शरद पोंक्षे
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
डिसेंबरमध्ये आम्ही बेंगलोरला ईशाकडे गेलो होतो. मला बरेच दिवस इस्रो करत असलेल्या प्रक्षेपकांचे प्रक्षेपण प्रत्यक्ष बघण्याची अतिशय इच्छा होती. त्यामुळे बेंगलोरमध्ये असतानाच सहज म्हणून बेंगलोर ते श्रीहरीकोटा अंतर गुगलवर बघितले. ते कारने साधारण सहा तासांचे आहे असे दिसले. ऑक्टोबरमध्ये इस्रोने वन वेब कंपनीच्या छत्तीस उपग्रहांच्या तुकडीचे प्रक्षेपण केले होते. पुढील छत्तीस उपग्रहांचे प्रक्षेपण जानेवारी २०२३ मध्ये करण्यात येईल असे इस्रोने तत्वतः जाहीर केले होते. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निघतांना मी योगेशला म्हटले, ” बहुतेक या महिन्यात मी परत येईन असं दिसतंय. कारण या महिन्यात इस्रो एक प्रक्षेपण करणार आहे आणि मला ते बघायचे आहे.” तो म्हणाला, “मग कशाला जाताय? प्रक्षेपण बघूनच जावा कि!” पण प्रक्षेपणाची तारीख नक्की नसल्याने आम्ही सांगलीला परत आलो. सांगलीला आल्यावर कांही दिवसांनी हे प्रक्षेपण मार्च २०२३ ला होणार असल्याचे समजले. दरम्यान सात फेब्रुवारीला सहज फेसबुक बघत असताना इस्त्रोच्या फेसबुक पेजवर वाचनात आले की दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी SSLV-D2(Small satellite launch vehicle-demonstration launch 2)चे प्रक्षेपण आहे. मला माहित होते की हल्ली सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात थेट प्रक्षेपण बघण्यासाठी एक प्रेक्षागार उभारण्यात आले आहे व तेथून आपणास प्रक्षेपकाचे प्रक्षेपण थेट पाहता येते व त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यानंतर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे SDSC-SHAR (Satish Dhavan space center- Shriharikota high altitude range)च्या वेबसाईटवरून हुडकून काढले. lvg. shar. gov या साइटवर ‘Schedulded’ म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक केले असता एक पेज उघडते त्या पेजवर ‘click here for witness the launch’ असा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक केले असता आपणास रजिस्ट्रेशन करता येते. अशा पद्धतीने माझे रजिस्ट्रेशन झाले (REGISTRATION NO/SNO: T333A0C7774/7382). मला अत्यंत म्हणजे अत्यंत आनंद झाला. लगेच मी इशाला फोन केला. हे घडले संध्याकाळी साडेचार वाजता. दहा तारखेला सकाळी प्रक्षेपण म्हणजे नऊ तारखेलाच मला तिथे पोचावे लागणार होते. ईशाने लगेचच संध्याकाळच्या साडेपाचच्या कोंडुस्करच्या स्लीपरचे बुकिंग केले. मी नेट कॅफेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केल्यावर आलेल्या पासची प्रिंट काढून आणली. तोपर्यंत श्रीहरीकोटाला कसे जायचे हे अजिबात माहीत नव्हते. बेंगलोर मध्ये ईशा व योगेश यांनी व मी कोंडुस्कर मध्ये बसल्या बसल्या google वरून माहिती मिळवली. बेंगलोरहून चेन्नई व तेथून सुलूरूपेटा या श्रीहरीकोटा जवळ असलेल्या गावी मला जावे लागणार होते. प्रत्यक्ष श्रीहरीकोटा मध्ये राहण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे श्रीहरीकोटा पासून १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात मला मुक्काम करावा लागणार होता व तेथून प्रक्षेपणाच्या दिवशी मला श्रीहरीकोटाला जावे लागणार होते. ईशा- योगेश यांनी नऊ तारखेचे बेंगलोर ते चेन्नई साठीचे रिझर्वेशन पाहिले.पण कोणत्याही गाडीचे रिझर्वेशन उपलब्ध नव्हते. मग त्यांनी बेंगलोर ते पेराम्बूर आठ तारखेचे रात्री साडेबाराचे म्हणजेच नऊ तारखेचे 0.30 चे रिझर्वेशन केले. पेरांबूर गाव चेन्नई सेंट्रल पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. चेन्नई ते सुलुरूपेटा रिझर्वेशन एसी टू टायरचे मिळाले.
बेंगलोरला सकाळी सात वाजता पोचलो. योगेश घ्यायला आला होता. आठ वाजता घरी पोचलो. नाश्ता वगैरे झाल्यावर ईशाने सुलुरूपेटा मधील हॉटेल बुक केले. प्रक्षेपण झाल्यावर व्ह्यूइंग गॅलरीमध्येच स्पेस म्युझियम व रॉकेट गार्डन आहे असे SHAR च्या साइटवर दिसले. त्यामुळे परतीची रिझर्वेशन्स ११ तारखेची केली. जेवण करून मस्तपैकी झोप काढली. रात्री साडेबारा वाजता मुजफ्फुर एक्सप्रेसने मला जायचे होते. ईशा व योगेश मला सोडायला आले होते. सकाळी सात वाजता गाडी पेरांबूर स्टेशनवर पोहोचली. रिक्षा करून मी चेन्नई सेंट्रलला आलो. एमजीआर चेन्नई सेंट्रल(MAS) ते सुलुरूपेटा नवजीवन एक्सप्रेस दहा वाजून दहा मिनिटांनी होती ती साडेअकराला सुलुरूपेटा येथे पोहोचली. उतरल्यावर रिक्षा केली आणि अगोदर बुकिंग केलेले श्री लक्ष्मी पॅलेस हे लॉज गाठले. (जनरली गाडी एक नं प्लॅटफॉर्मला लागते. तेथून वर उल्लेखलेल्या लॉजला जायला रिक्षा केली तर महाग पडते, म्हणून रेल्वे ब्रिज वरून दुसऱ्या टोकाला जाऊन तिथून रिक्षा केली तर स्वस्त पडते) सुलुरूपेटा हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामानाने हे लॉज खूपच चांगले आहे. रूम स्वच्छ, प्रशस्त व हवेशीर आहेत. ए.सी. व टी.व्ही. ची सोय आहे. २४ तास गरम पाणी उपलब्ध असते. रूममध्ये गेल्यावर अन्हीके उरकून खालीच असलेल्या चंदूज रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. शाकाहारी व मांसाहारी एकत्र आहेत. राईस प्लेट मिळत नाही. वेगवेगळे जिन्नस मागवावे लागतात आणि अति महागडे आहेत. जेवण एवढे खास नव्हते, पण भुकेपोटी खाऊन घेतले. जेवण करून थोडे विश्रांती घेतली. नंतर काउंटर वर जाऊन लॉजचे मालक श्री दोराबाबू यांना भेटलो व श्रीहरीकोटाला कसे जायचे याची चौकशी केली. त्यांनी खिडकीतून जवळच असलेल्या एका चौकाकडे बोट दाखवून सांगितले की येथे सकाळी सहा वाजल्यापासून SHAR ला जायला जीप मिळतात. एका जीपमध्ये दहाजण बसवतात व माणसे पन्नास रुपये आकारतात. माहिती जाणून घेतल्यावर मी गावात रपेट मारायला बाहेर पडलो. तालुक्याचे गाव जसे असायला पाहिजे तसेच हे आहे. दोन तास फिरून परत रूमवर आलो. दुपारचे जेवण जास्त झाल्याने लॉज शेजारच्या मॉल मधून ब्रेड व बटर आणून खाल्ले. सकाळचा साडेपाचचा गजर लावून झोपलो. उद्या प्रत्यक्ष प्रक्षेपण बघायचे या कल्पनेने बराच वेळ झोप लागली नाही, पण नंतर लागली. सकाळी साडेपाचला उठून अन्हीके आवरून बरोबर सहा वाजता चौकात आलो. जीप उभी होती. जीपमध्ये अजून कोणी आले नव्हते, म्हणून ‘गणेश टी स्टॉल’ असे नांव लिहिलेल्या टपरीवर कॉफी प्यायला गेलो. कॉफी अप्रतिम होती. टपरीचा मालक राजस्थानी होता. त्याला हिंदी व इथली तेलगू भाषा दोन्ही चांगल्या अवगत होत्या. बोलता बोलता मला शारला जायचे आहे असं मी त्याला म्हणालो. तेथेच एक रिक्षावाला होता. तो कॉफीवाल्याला तेलगूत म्हणाला, ” यांना म्हणावं मी त्यांना तीनशे पन्नास रुपयात शारला नेतो.” कॉफी वाल्याने मला हे हिंदीत सांगितले. मी कॉफीवाल्याला सांगितले, “तीनशे रुपयात नेतो काय विचार.” तो तयार झाला. नाही तरी जीपमध्ये दहा माणसांची जुळणी व्हायला किती वेळ लागणार होता कोणास ठाऊक! मी रिक्षात बसलो. मस्त गुलाबी थंडी होती. दोन्हीकडे समुद्राच्या भरती ओहोटीमुळे तयार झालेली क्षारपड जमीन आहे. सूर्योदय व सूर्यास्त बघण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर मचाणे आहेत, त्यांना व्ह्यू पॉईंट्स म्हणतात. अर्ध्या तासात आम्ही श्रीहरीकोटाच्या मुख्य प्रवेशाजवळ पोहोचलो. तेथे रिक्षावाल्याने मला सोडले. उजवीकडे towards viewing gallary असा बोर्ड होता. तेथे गणवेशधारी जवान होते. त्यांनी माझ्याकडील आधार कार्ड व पास बघून मला पुढे जाण्याची अनुमती दिली. मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली.
☆ माझे मृत्यूपत्र… – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆
(देशभक्त वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.)
माझे मृत्युपत्र या कवितेचे रसग्रहण.
सावरकरांना न ओळखणारा या पृथ्वीतलावर विरळाच. भारतमातेच्या मुकुटातील हा दैदिप्यमान हिराच.mयांचे अमरत्व म्हणजे यांचा जाज्वल्य देशाभिमान, देशभक्ती, उदात्त देशप्रेम होय. भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला तोडण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देवासमोर शपथ घेतली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.
असा हा तेजस्वी तारा भारतीय क्षितिजावर चमकत राहिला..
स्वातंत्र्य वीर सावरकर हे उत्तुंग प्रतिभेचे कवी होते.यांनी साहित्याच्या सर्व दालनात प्रवेश केला.यांचे साहित्य सर्व व्यापी आहे.
माझे मृत्युपत्र हे यांचे वहिनीस लिहिलेले पत्रात्मक काव्य आहे.
राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना इंग्रजांनी पकडले. त्यांना पन्नास वर्षांची काळया पाण्याची शिक्षा जाहीर केली. यातून आपली सुटका नाही.हे त्यांनी जाणले. हे कटू सत्य वहिनीला कसे सांगायचे? घरची परिस्थिती मोठी प्रतिकूल होती.१९०९मध्ये त्यांच्या मोठया भावाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचा चार वर्षांचा मुलगा देवाघरी गेलेला. अशा परिस्थितीत ही मर्मभेदी गोष्ट कशी सांगावी या विचारात ते असताना काव्य प्रतिभा हात जोडून उभी राहिली.असा हा या कवितेचा जन्म.ही कविता देशभक्ती ने ओथंबली आहे.आजपर्यत अनेक कवींनी देशभक्तीच्या कविता लिहिल्या.परंतु झाले बहु, होतील बहु परी या सम नसे.
☆ माझे मृत्यूपत्र… ☆
हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले,
वकृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,
तुतेची अर्पियली नवी कविता रसाला
लेखाप्रती विषय तुचिं अनन्य झाला.
त्वत्स्थंडिली ढकलिले प्रियमित्रसंघा
केले स्वयें दहन यौवन देह भोगा
तत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा
तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा
त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमता
दावानलात वहिनी नव पुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल धैर्यनिष्ठ बंधू
केला हवि परम कारुण पुण्य सिंधू
त्वत्स्थंडिली वरी प्रिय बाळ झाला
त्वत्स्थंडिली वरी आता मम देह ठेला
हे काय बंधू असतो जरी सात आम्ही
त्वत्स्थंडिली च असते,दिधले बळी मी
की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने
जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे
बुद्धयाची वाण धरिले सतीचे.
माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी
हा वत्सवत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी
सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हाते
आलिंगन प्रियकरा मम अंगनेते
प्रस्तुत कविता सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्ती चे प्रतीक आहे. सावरकरांची त्यागी भावना दर्शविणाऱ्या या ओळी बघु या.
हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले
या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्नि कुंडात
माझा परिवार, मित्र, यौवन सारे भोग
यांची आहुती दिली आहे.
या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या काव्यातील शब्दसंपदा संस्कृत प्रचुर आहे.या काव्यात वीर रसाला करूण रसाची झालर लावली आहे.
भगवान् श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेचे प्रबोधन केले व त्यात ज्ञान,कर्म, भक्ती या योगांची माहिती दिली.सावरकर हे बुद्धिमत्तेचे पुतळे होते.त्यांनी ज्ञान,कर्म,भक्ती मार्गाचा अवलंब केला. ही कविता राष्ट्रीय भावनेची व देशभक्ती ने ओतप्रोत भरलेली आहे. कविता आशय संपन्न आहे.
आम्ही हे मातृभूमीची सेवा आंधळेपणाने घेतली नसून डोळे उघडे ठेवून घेतली आहे. कवि म्हणतो की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ठिकठिकाणी सावरकरांचे मातृभूमी विषयीचे प्रेम कळसास पोहचले आहे. सावरकरांचा निस्वार्थी भाव या ओळीत दिसून येतो
हे आपले कुलही त्यामध्ये ईश्र्वरांश
निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश
सावरकरांना पुढील चित्र दिसत असून ते त्यांनी सुंदर विरोधाभास अंलकाराने रेखाटले आहे.
हिंदुस्थान हा आमचा देश आहे. आमच्या देशात आमचेच राज्य हवे या तत्वनिष्ठ स्वभामुळे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.
त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे.
अंदमानच्या काळ्याभोर कोठडीत खिळ्यांचया साह्याने भिंतीवर लिहिलेली कविता आहे.या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिभेला आमचा खरोखरी सलाम.
☆ ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
शिक्षणावर ते पुस्तकी आहे, पढिक पंडीत बनवणारे आहे, असा आरोप सातत्याने केला जातो. गेल्या पंचवीस-तीस वर्षात शैक्षणिक धोरण अधीक कृतीशील, उपक्रमशील झाले आहे हे खरे, तथापि धोरण आणि कार्यवाही यात खूप तफावत दिसून येते. मुले कृतिशील बनावी, म्हणून विविध विषयातील प्रकल्प मुलांना घरी करायला दिले जातात. प्रत्यक्षात मात्र हे प्रकल्प पालकच घरी करताना दिसतात. मुलांचा सहभाग खूप कमी असतो. कात्री, पट्टी, डिंक आणून दे, इ. पुरताच त्यांचा सहभाग मर्यादित असतो. मुलांचे शिक्षण कृतीशील, उपक्रमशील व्हावे, यासाठी सिस्टेड फाउंडेशनाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. सिस्टेड फाउंडेशन म्हणजे ( CISTED FOUNDATION – CENTRE FOR INNOVATION, TECHNOLOGY & ENTERPRENEURSHIP DEVELOPMENT ). याचे फाउंडर मेंबर आहेत, प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे. त्यांच्या प्रकल्पाचे स्वरूप आहे, ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’
मुलांना खेळण्यांशी खेळायला आवडतं. मुलांनी स्वत:च खेळणी बनवली तर— मुलं क्रियाशील होतील. त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळेल. ही खेळणी वैज्ञानिक तत्वांवर बनवली, तर क्रियाशीलता, नवनिर्मितीचा आनंद याबरोबरच त्यांची वैज्ञानिक तत्वांची समजही पक्की होईल. बाजारात अशी काही खेळणी विकतही मिळतात. उदा. डोलणारी, न पडणारी बाहुली. खाली न पडणार्याी बाहुलीमागे गुरुत्वाकर्षण हे तत्व आहे. अशा प्रकारची काही खेळणी मुलांनी स्वत:च बनवली तर? मुलांना निर्मितीचा आनंदही मिळेल आणि वैज्ञानिक तत्वेही चांगली लक्षात रहातील, हा विचार घेऊन सिस्टेड फाउंडेशन गेली दोन वर्षे या प्रकल्पावर काम करत आहे.
सिस्टेड फाउंडेशनचा हा प्रकल्प खरं तर एका जुन्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन आहे.
नवीन काही तरी करण्याच्या ध्यासातून प्रा. भालचंद्र दामोदर केळकर म्हणजेच प्रा. भालबा केळकर यांनी एक नवा उपक्रम १९७५ साली हाती घेतला होता. तो होता शाळकरी मुलांसाठी. ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’, असं त्याला नाव देता येईल. मुलांना खेळण्यांशी खेळायला खूप आवडतं. मुलांनी स्वत:च अशी खेळणी बनवली तर? मग विचार सुरू झाला कोणत्या तत्वावर आधारित कोणती खेळणी बनवता येतील? नंतर तशी खेळणी बनवली गेली. त्याचे प्रात्यक्षिकही झाले. इथे त्यांच्यासोबत हरिभाऊ लिमये, प्रा. देशिंगकर, श्री. प्रमोद लिमये इ. मंडळी होती. यावर आधारित पुस्तकही छापले गेले. सध्या मात्र ते पुस्तक कुठेही उपलब्ध नाही. प्रकल्प महत्वाचा, शिक्षणाला एक नवी दिशा दाखवणारा होता, परंतु यातील संबंधित व्यक्ती आपापल्या व्यापात अधीक व्यस्त असल्याने त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळे त्याचा व्हावा तसा प्रचार आणि प्रसार झाला नाही. हळू हळू हा उपक्रम विस्मृतीत गेला. प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे सध्या या विस्मृतीत गेलेल्या उपक्रमाच्या पुनरुज्जीवनाच्या कामात गुंतले आहेत.
१९७५ साली जेव्हा हा उपक्रम हाती घेतला होता, त्यावेळी बनवलेली खेळणी, त्यात काय सुधारणा करता येतील, नव्याने कोणत्या वैज्ञानिक तत्वावर कोणती खेळणी तयार करता येतील , (innovation and cunstraction) याबद्दल प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे यांच्यात चर्चा होते आणि नंतर खेळणी तयार केली जातात. पुठ्ठा, फळी, कागद, तार, खिळे, बॅटरी, काड्या, टाचण्या, पत्रा, रंगपेटी यासारखे रहज उपलब्ध होणारे साहित्य आणि कात्री, डिंक, पक्कड, हातोडी, चिकटपट्टी यासारखी हत्यारे वापरून ही खेळणी बनवली जातात. प्रत्यक्ष खेळणी तयार करण्यासाठी अनेक हातांची त्यांना मदत होते. सध्या त्यांचे असे २० खेळण्यांचे संच तयार आहेत. आणखी ३० खेळणी बनवण्याची त्यांची योजना आहे. उदाहरण म्हणून त्यापैकी काही खेळण्यांची नावे आणि त्यामागील वैज्ञानिक तत्व बघू या. डोलणारी, न पडणारी बाहुली. गुरुत्वाकर्षण या तत्वावर हे खेळणं बनवलेलं आहे. बाजारातही अशी बाहुली मिळतेच, पण तयार खेळण्यांशी खेळताना हे तत्व मुलांच्या लक्षात येत नाही. पॅरॅशूटच्या खेळण्यात गुरुत्वाकर्षण आणि हवेचा ऊर्ध्वगामी दाब या तत्वांचा वापर केला आहे. न्यूटनचा पाळणा या खेळात ऊर्जेचे संक्रमण ( transfar of energy) हे तत्व वापरले आहे. (कॅरम या खेळात स्ट्रायकरने सोंगटी मारून ती पॉकेटमध्ये घालवायची असते. त्यातही हेच तत्व आहे.) हवेतील मत्सालय किंवा प्राणी संग्रहालय यात तरफेचे तत्व वापरले आहे.
दोन आरशात विशिष्ट कोन करून त्याच्या पुढे वस्तू ठेवल्यावर तिच्या किती प्रतिमा मिळतात? कोन कमी-जास्त केल्यावर मिळणार्याय प्रतिमांची संख्या कशी कमी जास्त होते, कोन जितका लहान, तितकी प्रतिमांची संख्या जास्त. असं बघता बघता दोन आरशात शून्य कोन ठेवला, म्हणजेच समांतर आरसे ठेवले, तर प्रतिमा कशा असंख्य मिळतात, हे दाखवता येते. या सार्याल प्रयत्नातून अनेक गोष्टी मुले स्वत:च शिकतात. शोभादर्शक बाजारात मिळतं. नळकांडं फिरवलं की आतल्या आकृती बदलतात. ते सारं पहाण्यात मुले रमून जातात. मुलांनी ते स्वत: तयार करावं. प्रथम नळकांडे तयार करावे. तीन आरशांच्या दीड इंच रुंदी व सहा ते आठ इंच लांबीचे आरसे त्रिकोण तयार करून आत बसवावेत. आत काचा, मणी, रंगीत कागद घालावेत. नळकांद्याच्या टोकाला पारदर्शक कागद लावून त्याला पुढे पुठ्ठा लावावा. पुठ्ठयाला बघण्यासाठी मधोमध छिद्र पाडावे. काचा, मणी, रंगीत कागद यांच्या कोन करून ठेवलेल्या आरशांमुळे अनेक प्रतिमा तयार होऊन नयनरम्य आकृती दिसते. नळकांडे हलवताच आतल्या आकृत्या बदलतात. शोभादर्शकाला तीन काचांच्याऐवजी चार किंवा पाच काचा लावल्या तर…आत त्रिकोणाऐवजी चौकोन, पंचकोन तयार होईल. मग दिसणार्याय प्रतिमांमध्ये काय फरक दिसेल? मुलांना विचारप्रवृत्त करावे. निरीक्षण करायला, शोधून काढायला सांगावे. भालबा म्हणतात, ‘मुलांनी स्वत:च अशी काही खेळणी बनवली, तर ती क्रियाशील होतील. स्वत: वस्तू तयार केल्याचा आनंद मिळेल. ती बनवताना आत्मविश्वास, चिकाटी हे गुण वाढीला लागतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातून जी वैज्ञानिक तत्वे मुले शिकतील ती कधीच विसरणार नाहीत. पाठांतरापेक्षा हे ज्ञान टिकाऊ स्वरूपाचे असेल. या सार्याणतून पुढची पिढी पढिक पंडित न बनता क्रियाशील बनेल.’
तत्व, विचार आणि कल्पना या आपआपल्या जागी कितीही सुयोग्य असल्या, तरी व्यवहारात त्यांची उपयोगिता सिद्ध होणं महत्वाचं असतं. सिस्टेड फौंडेशनने आपल्या ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ या उपक्रमाची उपयुक्तता आजमावण्यासाठी पलूस, देशिंग, सखराळे आणि कणेरी मठ येथील शाळेतून यासंबंधीच्या कार्यशाळा घेतल्या. २००-४००मुले होती. मुले खेळणी बनवण्यात रमून गेली होती.
शाळेत कार्यशाळा घ्यायची ठरली की शाळाप्रमुखांशी संपर्क साधून कार्यशाळेमागचा हेतू स्पष्ट केला जातो. त्यांच्या संमतीने दिवस निश्चित झाला की जी खेळणी कार्यशाळेत बनवून घ्यायची त्याची यादी, त्यामागील वैज्ञानिक तत्व, खेळणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-साधने, त्याची चित्राकृती शाळेकडे पाठवली जाते. साधारणपणे एका ठिकाणी पाच खेळण्यांची माहिती दिली जाते. मुलांनी साहित्य आणावे, असेही संगितले जाते. न आणलेले साहित्य आयोजकांकडून पुरवले जाते. प्रत्यक्ष कार्यशाळा सुरू करताना प्रथम त्या त्या खेळण्याची माहिती सांगितली जाते. खेळणी करून दाखवली जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांचे ५-५ चे गट केले जातात. त्यांना खेळणी करण्यास संगितले जाते. प्रत्येक गटाला वेगवेगळी खेळणी तयार करण्यास सांगितले जाते. मुले काम करत असताना अर्थातच त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. त्यांना मार्गदर्शन केले जाते. कार्यशाळेचा अवधी तीन तासांचा असतो. त्यात काही गटात एक, काही गटात दोन, तर क्वचित एखाद्या गटात तीन खेळणीही बनतात. गट तयार करताना मुलांचे वय अथवा इयत्ता विचारात घेतली जात नाही. पाचवी ते नववी मुलांचा समावेश या कार्यशाळेत असतो.
प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे आणि एखादा मदतनीस असे तिघे जण कार्यशाळेत मार्गदर्शन करतात. काही वेळा शाळा स्वत: संपर्क करून पुन्हा कार्यशाळा घेण्याविषयी विनंती करते. पलूस इथे चार वेळा कार्यशाळा झाली आहे. एका कार्यशाळेसाठी साधारणपणे दहा हजार खर्च येतो. सुरूवातीला हा खर्च, ‘घरचं खाऊन लष्करच्या भाकरी…’ अशी टीका सहन करत भलाबांनीच केलाय. शिक्षण पद्धतीतील परिवर्तनची आत्यंतिक आस ( passion) हेच त्याच्यामागे कारण आहे. आता फाउंडेशन स्थापन झालय.
सध्याचे शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी बघू जाता, हा उपक्रम अधीक प्रभावीपणे चळवळीत रूपांतरित होईल, असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, १४ तालुक्यांच्या गावी सायन्स सेंटर स्थापन झाली आहेत. महाराष्ट्रातील सायन्स सेंटर स्थापन करण्यात अजिंक्य कुलकर्णी यांचे मोठेच परिश्रम आहेत. त्यांनी लखनौ, चंदीगड, दिल्ली, कानपूर, चेन्नई इ. ठिकाणी सायन्स सेंटर स्थापन केली आहेत आणि त्याचे काम-काज कसे चालावे, याचे मॉडेल पद्मनाभ केळकर यांनी तयार केले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक सायन्स सेंटरसाठी चार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आशा ५६ शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काम प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे यांनी केले आहे. त्यांच्यामार्फत शाळाशाळातून, ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समाज’ हा उपक्रम रुजत वाढत जाईल, असे वाटते.
वसई ते कोल्हापूर या पट्ट्यातील, जो डोंगराळ भाग आहे, तिथे आश्रम शाळा (निवासी शाळा) आहेत. २०१९पर्यन्त या शाळांमधून सायन्स सेंटर्स स्थापन झाली आहेत. या प्रत्येक आश्रम शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे आणि पद्मनाभ केळकर यांनी केले आहे. सूर्य उगावतो आहे. आता प्रतीक्षा आहे त्याच्या सर्वदूर पसरणार्यां झळझळित किरणांची.
हानपणी मराठी परिक्षेत नेहमी निबंध असे ‘माझी आई’. तेव्हा वाक्ये ठरलेली असत. “माझी आई खूप सुंदर आहे, माझी आई छान गाणं म्हणते, माझी आई स्वयंपाक खूप छान करते, माझी आई मला खूप आवडते”. झाला निबंध. भाषा बदलली तरी वाक्य तीच.. फक्त अनुवादित. ह्या पलिकडे लिहायचं तर आई समजलेलीच कुठे असते आपल्याला त्या वयात. बस आई आई असते. गरज असते (जी अनंत काळाची असते), श्वास असते म्हणा ना.
‘आई’ म्हणजे काय हे समजेपर्यंत निबंध लिहिण्याचं वय निघून गेलेलं असतं किंवा आई ह्या विषयावर निबंध लिहिणं बालिशपणाचं वाटतं. कारण तोपर्यंत आपल्यावर बाहेरच्या जगाचा प्रभाव असतो आणि आपले idols बदललेले असतात. अपरिपक्व विचारांमुळे हे idols पण बदलत असतात, प्रगल्भतेने त्यांना स्थैर्य येतं. आईला मात्र backseat दिलं जातं आणि ते ती अगदी सहज स्वीकारते.
आईच्या पदरापासून सुरु झालेला माझा आणि आईचा हा प्रवास…
माझ्या जन्माच्या वेळी खूप दिव्यातून आईला जावे लागले, माझा जन्म झाला आणि आईचा पुनर्जन्म. पुढे पूर्ण वर्ष माझी खूप काळजी घ्यावी लागणार होती जी तिने लीलया पार पाडली, कशी ते मात्र मला मी आई झाल्यावर कळले.
“तू कुणाची” असा प्रश्न विचारताच माझं चटदिशी उत्तर येई , ‘मी बाबांची’. नकळत आईच्या मनावर एक ओरखडा . पण हसतमुखाने लटक्या रागात तिची एखादी चापट, एवढीच प्रतिक्रिया. आज कळतं की नकळत किती आघात करत असतो आपण आईच्या मनावर.
तेव्हा आई ही माझी प्रतिस्पर्धी, स्त्री म्हणून बाबांच्या प्रेमाची वाटेकरी, बालबुद्धीला एवढंच कळत असे. आमच्यात fine tuning होऊ लागलं आणि मी आईची कधी झाले कळलंच नाही.
लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं की आपली आई एक परी आहे आणि तिच्याकडे जादुची छडी आहे. मला पण असंच वाटे, खास करुन दिवाळीत. कारण रात्री झोपताना सामसूम दिसणाऱ्या स्वयंपाकघरात सकाळी उठले की स्वादिष्ट फराळाचा घमघमाट असे, तेव्हा कळायचंच नाही ही झोपते कधी, ऊठते कधी आणि सगळं करते कधी. फक्त खायचं तेवढं कळत असे. दिवाळीची आणखी एक आठवण म्हणजे तिची वसुबारसेची रांगोळी. पाटावर अत्यंत सराईतपणे ती गाय आणि वासरू काढत असे, ते ही रांगोळीने. मी दिवसभर त्या रांगोळीची वाट बघत बसे. आज त्याच थरथरत्या हातांना रांगोळीची दोन बोटं ओढणं किती जड जातं हे बघून गलबलून येतं.
पण “मी बाबांची” म्हणणारी मी , वाढले मात्र आईच्या शिस्तीत. नुसतं बाबांच्या रागे भरण्याने ताप काढणारी (आणि नंतर त्यांच्याशी कट्टी घेणारी) मी आणि हवालदील बाबा, हे चित्र बघताच त्या माऊलीला लगेच समजले, इकडे शिस्त लावण्याचे काम तिलाच करावे लागणार आणि ते पण मोठ्या खुबीने!
मग काय सुरु झाला आमचा क्लास. तिच्या ह्या क्लासमधे ‘To Do ‘ ची लिस्ट कमी , ‘Not to Do’ ची
लिस्टच मोठी होती.,असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही. मी कधी रागाने तिला म्हणे, “काय गं सारखी नकार देत असतेस? ” तर शांतपणे मला समजावी, ” कारण तुला नकार पचवता आला पाहिजे आणि नकार देता पण आला पाहिजे”. त्या वयात तिचं बोलणं किती कळलं कुणास ठाऊक, पण पुढच्या आयुष्यात नक्कीच उपयोग झाला.
शालेय जीवनातून कॉलेजमध्ये पाऊल ठेवले आणि तिच्या नजरेला आणिकच धार आली. बुरसटलेल्या विचारांची नाही ती, पण मैत्री कुणाशी असावी आणि कशी असावी ह्याचे मात्र नियम होते. तिच्यात आता एक मुलीची आई जरा जास्तच डोकावू लागली. आता शिस्तीची जागा माझ्या बद्दल वाटणाऱ्या काळजीने घेतली. आणि त्या काळजीपोटी माझ्यावर वेळेत घरी येण्याचं बंधन घातलं गेलं. कधी चुकून उशीर झाला तर तिचा काळजीने चेहरा काळवंडलेला असे, मग मलाच अपराधी वाटे. इतक्या वर्षांनी आज ही तीच अवस्था असते तिची.
तिच्याकडून शिकले.. तडजोड कधी, कुठे आणि किती करायची, तेही आत्मसन्मान सांभाळून. तिच्या प्रत्येक कृतीत माझ्यासाठी शिकवण असे. कणिक भिजवताना परात स्वच्छ दिसली पाहिजे, उष्टी खरकटी भांडी इतकी स्वच्छ पाहिजेत की कामवालीला आज स्वयंपाक काय होता ते कळता कामा नये. करंजी करताना एक मोदक ,आणि मोदक करताना एक करंजी करायचीच असते, का विचारलं की म्हणे बहिणीला भाऊ आणि भावाला बहिण ही पहिजेच. ह्या आणि अशा अनेक गोष्टी शिकले ज्या मला पुढे कामी आल्या. बाकी बऱ्याच गोष्टी तर तिला बघून बघूनच शिकले. असेच तर घडत असतात संस्कार.
तर ही माझी आई, माझं लग्न ठरल्यावर मात्र थोडी चिडचिडी झाली. कदाचित धास्तावली. कदाचित मला पुढे जड जाऊ नये म्हणून मुद्दाम मायेचे पाश सैल करू बघत होती. कदाचित स्वतःलाच जड जाऊ नये म्हणून? सासरी मी पटकन रुळावी म्हणून? असेल कदचित !!
मुलगी म्हणून अती स्तुती कधीच केली नाही. एखादा पदार्थ मी केला की छान झालाय असं म्हणायची.. की मी समजून जायचे अजून सुधारणा करण्यास वाव आहे. “तुला माझं कौतुकच नाही ” हे माझं पेटंट वाक्यं आणि, “मुळूमुळू रडायचं नाही, येत नाही म्हणायचं नाही, करुन बघ, शिकून घे”.. ही तिची पेटंट वाक्यं. पुढे मला मुलं झाल्यावर ह्या वाक्यांत आणिक भर पडली . ” सारखं ओरडू नाही गं मुलांना ! किती बोलतेस ! अशाने कोडगी होतील ती! ” …. बघा, आहे का आता? आईची आजी झाल्यावर नियम आणि शिस्त दोन्ही शिथिल होतात, किंबहुना पूर्णच बदलतात. नातवंडांना सगळं माफ !
तर अशी मी तिच्या तालमीत घडत गेले, नुसतीच घडले नाही तर सक्षम झाले.. मानसिक दृष्ट्या.
आज लिहिता लिहिता तिची अनेक रुपं माझ्या डोळ्यासमोर सरसर सरकली. रात्री जागून माझ्यासाठी परकर पोलकं शिवणारी, तेही हाताने. माझ्यासाठी मेहनत घेणारी , मला सगळं आलच पाहिजे असा अट्टाहास करणारी, आपली मुलगी आयुष्याच्या कुठल्याही शर्यतीत मागे पडू नये म्हणून धडपडणारी.
मला आराम मिळावा म्हणून माझ्या तान्हुल्यांना सांभाळणारी, आणखी किती रुपात दिसली ती मला काय आणि किती लिहू?
खरं तर लिहूच काय?
… ‘आई’ हाच एक अखंड ग्रंथ असतो, ज्याची कितीही वाचलं तरी पानं संपतच नाहीत, असं वाटतं. अजून कितीतरी वाचायचे बाकी आहे.
हा प्रवास फक्त माझा आणि आईचा नसून सगळ्या माय-लेकींचा प्रवास आहे. काळानुरूप त्यात मैत्रीची भर पडली आणि तो आणिकच सुंदर, सुखकर आणि समृद्ध झाला. आपला हा प्रवास असाच चालू राहो….सर्व मायलेकींसाठी.
लेखिका : अज्ञात.
प्रस्तुती : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शाळा, महाविद्यालयातील तरुणाई अडकतेय ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’च्या जाळ्यात,सिगारेटची जागा आता” ई सिगारेटनी” घेतली. वेब सिगरेट नाव नवीन नसले तरी अनेक शाळांमध्ये व महाविद्यालयीन परीसरात या वेब ची लाट आली आहे. सातशे पन्नास रुपया पासून पाच हजार रुपया पर्यंत किंमत असलेली ही वेब सिगरेट शाळा महाविद्यालयातील शिक्षकांची डोके दुखी बनली आहे ज्या सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. आता नवीन जी वेब सिगरेट आली आहे ती पेनड्राइव, पेन, लायटरच्या आकाराची. फरक असा की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.यामुळे सिगारेट ओढल्याची निशाणी राहत नाही. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मधल्या सुट्टीत याचा वापर बिनदिक्कत करतात आणि नेहमी प्रमाणेच वर्गात बसतात. काही विद्यार्थी शाळेत पेंगलेले दिसताहेत. शिक्षक सुध्दा भयभीत झाले आहेत. कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. ओरडण्याचा सोय नाही.
अशी मुले ओळखणे फारच कठीण असतात. इतर नशे प्रमाणे कोणत्याही प्रकारची चिन्हे दिसत नसल्याने विद्यार्थ्यांना हुडकून काढणे दुरास्पद असते.वर्गीतील असामान्य वर्तन. व अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अशा मुलांचा समावेश नसणे यावरून तर कधी विद्यार्थ्यांकडून अशा विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना प्राप्त होते. अशा मुलांचे समुपदेशन करणे व व्यसनापासून दूर करणे हे शिक्षकांचे काम आहे. अनेकदा विद्यार्थी आपण व्यसन करतच नाही असे सांगतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालक अनभिज्ञ आहेत. ज्यावेळी पालकांना शाळेतून फोन जातो त्यावेळी त्यांना सुद्धा मानसिक धक्का बसतो.
अनेकदा काही पालक आपला मुलगा या वेब सिगरेटच्या आहारी गेला आहे हे मान्य करण्यास तयार होत नाही. अशावेळी शिक्षक मात्र पालकांच्या रोषास बळी पडतो. शाळा, महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून पोलीस तक्रार नाही व कुठेही वाच्यता नाही. अनेक प्रकरणे दाबून टाकली जातात. भारतीय कायद्याने अशा प्रकारच्या सिगारेट वापरण्यावर व विक्रीवर बंदी आहे. असे असले तरी या व्यवसायात गुंतलेले लोक आपले सावज शाळा, महाविद्यालयाबाहेर असलेल्या पानपट्टी दुकाने व खाऊगल्लीत हेरतात. दुर्दैवाने तरुण मुले, मुलीही या व्यसनात गुरफटत आहेत. सर्व साधारणपणे हुक्या प्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सची जत्रा वेब सिगरेट मध्ये असते असे या मुलांच्या बोलण्यातून जाणवले. आकर्षणापोटी तर कधी मौज मजेसाठी हजारो रुपये खर्चून वेब घेतली जाते व सामाईक चस्का घेतले जातात.
द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.शरीराला अपायकारक असलेली ही द्रवे आमच्या तरुणपिढीची शरीर व मने खोकली करत आहे व त्याबरोबर आपल्या देशातील तरुण पिढी बरबाद होत आहे. या वेबचा धूर वेळीच रोखला नाही तर भविष्यात शाळा महाविद्यालये ही वेबचा अड्डा बनतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शाळेत असताना टीचरकडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे….कारण मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो.
माझे सगळे टीचर मला क्लासमध्ये उभा रहायला सांगून शिकवत असत.कारण माहितीये? ….ते सगळे माझी खूप इज्जत करत असत.
माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्याचदा माझ्या आई- पप्पांना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही मला direct सांगायला घाबरत असत…
मी जे काही लिहायचो, ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे, माझे हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे. त्याच कारणास्तव ते बरेचवेळा मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत…
कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती chalk माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत…ही गोष्ट वेगळी की ती कॅच सुटून मलाच chalk लागत असे.
उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावं . हीच काय ती अपेक्षा होती त्यांची माझ्याकडून.
परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजूबाजूला पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत.
कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,
कारण मी बाकी मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातल्या सर्व मुली व्यवस्थित दिसाव्यात, हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.
शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती.
माझ्या शरीराला vitamin D आणि मोकळी हवा मिळावी, ह्यासाठी मला बरेच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात मैदानाला 10 फेर्या मारायला सांगितल्या जात असत.
जेव्हा की बाकी मुलं वर्गात घाम गाळत , गुदमरत शिकत असत.
मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत….
तू शाळेत का येतोस?..तुला ह्याची गरज नाहीये…
वाह ! काय ते सोनेरी दिवस होते!
लेखक – अज्ञात
संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग 58 – ग्रीनएकर ची रिलीजस कॉन्फरन्स ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
नव्या सूर्याच्या चैतन्याने विवेकानंद पुन्हा ताजेतवाने झाले. उदात्त जीवनाकडे घेऊन जाणारे विचार व्याख्यानातून ते मांडतच होते. परिचित व्यक्तींच्या आग्रहाखातर त्यांचे वेगवेगळ्या व्यक्तींकडे वास्तव्य होत होते. शिकागोहून ते आता ग्युएर्न्सी यांच्याकडे न्यूयॉर्कला आले. एव्हढ्या या विचारांच्या लढाईत विवेकानंद यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल कुणी काहीही चांगले लिहिलेले कुठे दिसले, तर ते अत्यंत आनंदी होत असत. त्यांच्या वाचनात एक ख्रिस्त धर्मीय व्यासंगी, संस्कृत भाषेचा अभ्यास असलेले डॉ.मोनियर विल्यम्स यांना हिंदू धर्म कसा दिसतो ते वाचायला मिळाले. ते त्यांनी पत्रातून मिसेस हेल यांना कळविले आहे. त्यात आहे, “हिंदूधर्माचा विशेष असा आहे की त्याला कोणाही परधर्मीयाला आपल्या धर्मात आणण्याची गरज वाटत नाही आणि तसा कोणताही प्रयत्न तो करीत नाही, हिंदू धर्म सर्वांचा स्वीकार करणारा, सर्वांना जवळ घेणारा आणि सर्व आपल्या ठायी सामावून घेण्याइतका व्यापक आहे. सर्व प्रकारच्या मन:प्रवृत्तीच्या माणसांना मानवेल असे काहीतरी देण्यासारखे या हिंदू धर्माजवळ आहे. मानवी मन, त्याचे स्वरूप आणि प्रवृत्ती यामध्ये जी अमर्याद विविधता आढळते तिच्याशी जुळवून घेण्याची तेव्हढीच अमर्याद अशी जी क्षमता आहे ते त्याचे खरे खुरे सामर्थ्य आहे”. विल्यम पुढे म्हणतात, “नेमके बोलायचे झाले तर, स्पिनोझाचा (डच फिलॉसॉफर,जन्म १६३२ मृत्यू १६७७) जन्म होण्याआधी दोन हजार वर्षे हे हिंदू, स्पिनोझाच्या विचारांचे पुरस्कर्ते होते. डार्विनच्या(जन्म १८०९ मृत्यू १८८२, इव्होल्यूशन सिद्धांत मांडला) जन्माआधी अनेक शतके त्याच्या सिद्धांताचा स्वीकार करणारे होते आणि आताच्या आपल्या काळातील हक्सले (बायोलोजिस्ट -जन्म-१८२५ मृत्यू-१८९५) यांचे विचार मान्य करणार्यांच्या शेकडो वर्षे आधी हे हिंदू, उत्क्रांतीवादी होऊन गेले होते किंवा त्यांनी तसे केले त्यावेळी उत्क्रांती या शब्दातील अर्थ व्यक्त करणारा शब्द देखील जगातील कोणत्याही भाषेत नव्हता”. असे सगळे वर्णन वाचून विवेकानंद यांना डॉ. मोनियर विल्यम्स यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे कौतुक वाटले. कारण एका प्रज्ञावंताचे ते निरीक्षण होते. हा आनंद झाला म्हणूनच त्यांनी हेल यांना हे पत्र लिहून कळवलं.
आता विवेकानंद न्यू यॉर्क जवळच्याच फिशिकल येथील हडसन नदीच्या काठावर असलेल्या ग्युएर्न्सी यांच्या निवासस्थानी राहायला आले होते. इथे त्यांना मन:शान्ती मिळाली होती. याच काळात एक दखल घेण्यासारखी घटना घडली. आपले गाव सोडून आपण परक्या शहरात किंवा गावात गेलो असू आणि तिथे कुणी आपल्या गावचे भेटले तर आपल्याला जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. त्याच्या बद्दल आपल्याला आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो. सर्वधर्म परिषदेत विवेकानंद यांना एक नरसिंहाचारी म्हणून भारतीय तरुण भेटला होता. तिथे तो वाईट संगतीत राहून भरकटला होता. अधून मधून तो विवेकानंद यांना भेटत असे आणि काही मदत मागत असे. पण हे सर्व बघून विवेकानंद फार दुखी झाले. त्याला आपल्या देशात- भारतात- परत पाठवणे योग्य आहे असा विचार स्वामीजींनी केला. मग त्यांनी अलसिंगा यांना पत्र लिहून कळवले आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी करायला सांगितली. त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली. तो भारतात सुखरूप पोहोचला, हे सर्व श्रेय विवेकानंद यांचेच. एक भारतीय तरुण परदेशात भुकेला आणि अनाथ राहू नये असे विवेकानंद यांना वाटले होते.
विवेकानंद यांची पुढची भेट इंग्लंडला व्हावी असे एकाने सुचविले होते पण जगन्मातेचा आदेश आल्याशिवाय स्वामीजी थोडेच जाणार? पण सर्वत्र व्याख्याने दौरे, संभाषणे चर्चा मुलाखती असे भरपूर होत होते. आता विवेकानंद यांना वाटत होतं की, प्रत्यक्ष काहीतरी काम इथे सुरू व्हायला हवे. न्यूयॉर्क संस्थानात मिस फिलिप्स यांची कुठेतरी रम्य अशी जागा आहे, असे त्यांना कळले होते आणि तिथे आपण हिमालय उभा करू आणि आश्रमाची स्थापना करू असा विचारही त्यांच्या मनात आला होता. मनात असा विषय येणं ही सकारात्मकता निर्माण झाली होती ती मनस्थिती ठीक झाल्यामुळेच .
याच दरम्यान ग्रीनएकर इथले एक आमंत्रण मिळाले. एक वेगळ्या प्रकारचा मेळावा आयोजित केला गेला होता. २७ जुलैला विवेकानंद ग्रीनएकर इथे मेळाव्यासाठी पोहोचले. दोन दिवस आधी मनात जी आश्रमाची कल्पना आली होती तसाच रम्य परिसर इथे योगायोगाने होता. फार्मर यांच्या मालकीची ग्रीन एकर मेन संस्थानात इलीयटजवळ खूप मोठी जमीन होती.
इथे असे नव्या नव्या कल्पना त्यांना पाहायला आणि अनुभवायला मिळत होत्या. सर्व धर्म परिषद असो, कोलंबियन औद्योगिक प्रदर्शन कल्पना असो, आता हा ग्रीनएकरचा मेळावा सुद्धा एक वेगळीच संकल्पना होती. एखादी कल्पना मनात आली की ती प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी आवश्यक कष्ट घेऊन नियोजन करणे हे पाश्चात्यांचं वैशिष्ट्य स्वामीजींना फार फार भावल होतं. सर्वधर्म परिषदेच्या धर्तीवर वर्षभरातच हा मेळावा आयोजित केला होता. ही कल्पना होती मिस सारा जे.फार्मर यांची. सर्व धर्म परिषद ही औपचारिक होती. तिथे व्याख्याने देऊन सर्व जण आपापल्या स्थानी परत गेले होते. पण आता तसे नव्हते. धर्माची निरनिराळी मते असणार्या सर्व व्यक्तींनी पंधरा दिवस एकत्र राहावे, कुठलीही कार्यक्रमाची चौकट असू नये. मुक्त संवाद व्हावा, मोकळेपणाने संभाषण व्हावे आणि सर्वांना मुक्त प्रवेश. सारा फार्मर यांची अशी अभिनव कल्पना स्वामीजींना आवडलीच.
फार्मर यांच्या मालकीची मोठी जागा होती तिथे हिरवेगार शेत, जवळच वाहणारी नदी, सुसज्ज विश्रामगृह, छोटी छोटी स्वतंत्र निवासस्थाने, बाजूलाच पाईन वृक्षाचे जंगल असा शांत आणि निसर्गरम्य परिसर . शिवाय परिसरात तंबू, त्याला नाव होते हॉल ऑफ पीस /शांतिमंदिरउभे केलेले. कोणी कुठेही रहा, इथे कुठलीही मूर्तिपूजा नव्हती फक्त वैचारिक कार्यक्रम होणार होता. परस्परांना समजून घ्यावे, एकमेकांशी बोलावे, सामूहिक चर्चा करावी, गप्पा गोष्टी माराव्यात, इच्छा असेल तर शांत व निवांत बसावे, असा एकूण विषय होता. सतत औपचारिक व्याख्याने देऊन स्वामी विवेकानंद कंटाळले असताना अशी निसर्गात शांत राहण्याची संधी मिळाली म्हणून ते प्रसन्न झाले होते. इथे ग्रीनएकर मध्ये ख्रिस्त धर्मातील विविध पंथाचे प्रतिनिधी, बुद्धिमंत व विचारवंत सहभागी झाले होते.
डॉ. एडवर्ड एव्हरेट हेल, मिस जोसेफाईन लॉक, अर्नेस्ट एफ.फेनोलेसा, फ्रॅंकलिन बी. सॅनबोर्न, मिसेस आर्थर स्मिथ, मिसेस ओली बुल, गायिका मिस एम्मा थर्स्बी, हे उपस्थित होते. रोज सकाळचे प्रमुख भाषण झाले की जो तो आपल्याला हव्या त्या विषयाकडे वळे, वक्ता आणि श्रोता यांच्यात अनौपचारिक नाते असे. पाईन वृक्षाखाली व्याख्याने चालत. विवेकानंद याच्या भोवती खूप जण गोळा होत आणि त्यांचे आध्यात्मिक विचार तन्मयतेने ऐकत असत. इथे श्रोत्यांना वेदान्त विचारांचा लाभ होत असे. सर्व धर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष हिंदू धर्म ते सांगत असत. त्यासाठी ते उपनिषद, भगवतगीता, अवधूतगीता, भतृहरी, संत मीराबाई, शंकराचार्यांचे निर्वाणषटक यातील दाखले देत असत. सर्व श्रोते एकरूप होऊन जात आणि विवेकानंद त्यांच्याकडून ‘चिदानंदरूप: शिवोहम! शिवोहम! हे चरण आळवून घेत, हे म्हणत म्हणतच श्रोते आपल्या स्थानी परतत असत. जिथे बसून पाईन वृक्षाखाली विवेकानंद यांनी व्याख्यान दिले होते तो पाईन वृक्ष पुढे विवेकानंद यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. हा ग्रीन एकरचा उपक्रम पुढे काही वर्ष चालू होता. नंतर याच वृक्षाखाली बसून सारदानंद आणि अभेदानंद यांनी तिथे प्रवचन दिले होते.
‘हॉल ऑफ पीस’ मध्ये म्हणजे तंबू मध्ये विवेकानंद यांचे स्वतंत्र व्याख्यान झाले होते. त्याला मिसेस बुल उपस्थित होत्या. विवेकानंद यांनी मुख्य धडा दिला की, “सर्व धर्माच्या प्रेषितांचा आपण मान ठेवला पाहिजे. त्यांच्या शिकवणुकीचा आदरपूर्वक अभ्यास केला पाहिजे, त्या त्या धर्माच्या अनुयायांनी हे जपले पाहिजे की, आपल्या वर्तनामुळे,आपल्या महापुरुषांनी दाखवून दिलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मार्गात कोणतेही किल्मिष मिसळले जाऊ नये. प्रत्येक धर्मातील दोष उणिवा आणि काही ठिकाणी भयानक असलेले भाग आपल्याला आढळतील ते भाग बाजूला ठेवावेत आणि मानवाच्या आत्मिक विकासासाठी पोषक असणारे असे एक ईश्वर, आत्म्याचे अमरत्व, सारे प्रेषित आदरार्ह आणि सारे धर्म विचारात घेण्यासारखे आहेत. या गोष्टींवर भर द्यावा. जसे एखाद्या कुटुंबात प्रत्येकाला कामे वाटून दिलेली असतात, तसेच मानव जातीच्या या कुटुंबात प्रत्येक धर्माकडे काही कामगिरी सोपविली आहे. सर्व मानवांना देण्यासारखा सत्याचा काही अंश प्रत्येक धर्माजवळ आहे त्याचा स्वीकार करा आणि तशी दृष्टी धारण करा. हीच सर्वधर्म समन्वयाची दिशा ठरेल. तिचा खरा उपयोग आहे”. अशी स्पष्ट आणि रेखीव मांडणी विवेकानंद यांनी केली असल्याचा बुल यांनी म्हटलं आहे.
ग्रीनएकरला स्वामी विवेकानंद सात-सात, आठ-आठ तास बोलत असत. असे नवे नवे आयाम विवेकानंद यांना कळत जात होते तस तसे त्यांना अमेरिकेतल्या पुढच्या कार्याची दिशा ठरवायला मदत होत होती. अशा प्रकारे ग्रीनएकरचा कार्यक्रम छान पार पडला. आता विवेकानंद १३ ऑगस्टला ग्रीनएकरहून प्लायमाउथ आले, तिथे फ्री रिलीजस असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमासाठी कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिन्सन यांनी निमंत्रण दिले होते. केव्हढी मानाची गोष्ट होती की, अशा वार्षिक कार्यक्रमांना प्रमुख अतिथि म्हणून स्वामीजींना बोलवले जात होते. एव्हढा लौकिक त्यांना मिळाला होता. रामकृष्ण परमहंस यांनी महासामद्धी घेऊन आता आठ वर्षांचा काळ लोटला होता. त्यांनी सांगितलेल्या कामाच्या शोधात स्वामीजी भारतात फिरल्या नंतर आता ते अमेरिकेत आले होते. त्यांनी इथवरच्या प्रवासात अनेक अनुभव घेतले, अनेक घटना घडल्या, पण त्यांचे अंतर्मन नव्या दिशेचा शोध घेतच होते. ग्रीनएकरचा त्यांचा अनुभव खूप चांगला होता. याचवेळी त्यांना, आपण आपल्या धर्माबद्दल काही लिहावे असे वाटले होते. त्यासाठी शांतता हवी आणि वेळ सुद्धा. असे त्यांनी अलसिंगा यांना पत्रात म्हटले आहे की, “ ज्या दिवसात व्याख्याने नसतात तेंव्हा हातात लेखणी घ्यावी असे मनात आहे”. हेच त्यांनी मिसेस स्मिथ यांनाही पत्रात कळवले आणि ते सारा बुल यांच्या कानावर गेले आणि त्यांनी विवेकानंद यांना लगेच आपल्या घरी केंब्रिजला बोलावले. त्याप्रमाणे ते ऑक्टोबर मध्ये सारा बुल यांच्याकडे गेले. सारा बुल यांचे घर असलेले केंब्रिज अतिशय शांत, गर्दी नाही असे होते. तिथे त्यांनी विवेकानंद यांना स्वस्थपणे राहता येईल अशी व्यवस्था केली. सारा चॅपमन बुल. कोण होत्या त्या?…