मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

स्वपरिचय 

जन्मगाव पाचगणी असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाई पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील निसर्गरम्य जागेवर जावून अनेक जलरंगातील चित्रे रेखाटनाचा नाद लहानपणापासून आहे. या परिसरातील पाच हजारांपेक्षा जास्त चित्रे रेखाटलेली आहेत. त्यांचे प्रदर्शन मुंबईच्या सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर मुंबई, ऑबेरॉय टॉवर्स, म्युझियम आर्ट गॅलरी येथे व पुण्यात बालगंधर्व येथे प्रदर्शने केलेली आहेत. अनेक प्रसिद्ध कलारसिक लोकांनी चित्रे विकत घेतलेली आहेत. लेखन, वाचन, चित्रकला, बागकाम, कॅलिग्राफी, फिरणे, रेखाटने करणे, गाणी ऐकणे, निसर्गात रममान होणे व शांत राहणे हे आवडीचे छंद आहेत.

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित, नावीन्यपूर्ण, रोमांचक , सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात… आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते… एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.

अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्तेत खोलवर रुतत जातो . काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात… असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे…. माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण- धगधग मनात साठलेली असते .

1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले . त्या काळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे .सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते. त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात….

मला वाई, पाचगणी , महाबळेश्वरचा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणीमध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती.  या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्याजवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला.  त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरीचे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही.  तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली.  अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली.  मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यावसायिकरित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. त्यानंतर उतरती कळा लागली …

मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला.  पुढे पाचगणी क्लब, टेबल लँडवरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो . प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले. मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली जवळपास 200 ओरिजिनल जलरंगातील निसर्गचित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही.  उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली…  आणि पूर्ण देखील केली… आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली .

अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला. राहायला घर नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही, अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो.  तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.

आणि मग जगण्यात राम नाही, मजा नाही.. सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ? कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.

पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे. पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. माहीत नाही पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते.  दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो.  ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची ,सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला, या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले , ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवताच्या व काट्याकुट्यांच्या मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती .

मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो . त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो. मला कशाचेही भान राहिले नव्हते.  कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो….  आणि… अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली. डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला. आयझॅकने मला कडकडून मिठी मारली. माझे डोळे पुसले, माझे सांत्वन केले, आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली.

आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा. संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा . मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा. फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा. चालताना देखील धावत धावत चालायचा… आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आजपासून अधिक महिन्याची सुरूवात! गेला आठवडाभर वाॅटसपवर याविषयी वेगवेगळे लेख आणि माहिती वाचतेय. अधिक महिन्यात काय काय करावं, म्हणजे कोणती व्रतवैकल्ये करावी, पोथ्या-पुराण वाचावी, जावयाला ३३ जाळीदार वस्तूंचं वाण द्यावं इ.इ. त्याचबरोबर फक्त अधिक महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी, आईला साडी घ्यावी, असंही वाचलं. अन् मन विचाराच्या भोवऱ्यात गरगरायला लागलं.

अशी साडी वगैरे देऊन अधिक महिन्यात तुझीओटी भरण्याचा एखादाच प्रसंग मी अनुभवला असणार. कारण ठळकपणे असं फारसं आठवत नाहीये.  माझ्या लग्नानंतर जेमतेम ६ वर्षांनीच तू देवाघरी गेलीस.

माझा याप्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याला अजिबात आक्षेप नाही. पण खरंच का अश्या ओटी भरण्यानेच फक्त आईबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. आणि माझ्या मनाने ठामपणे याचं उत्तर *नाही * असं दिलं.

लग्नापूर्वी तर तुझ्यासोबतच राहात होते. पण संसारात पडल्यावर क्षणोक्षणी तुझी आठवण येतच राहिली. *लेकरासंगे वागताना थोडी थोडी समजत जातेस * असं सहजपणे लिहून गेले माझ्या कवितेत ते उगाच नाही. तू आपल्या वागण्यातून रूजवलेले संस्कार, नक्कीच माझं आयुष्य सुंदर करत गेले आणि आजही करत आहेत.

अगदी लहान वयात तू लावलेली वाचनाची सवय, आयुष्यातील अनेक अवघड परीक्षा यशस्वीपणे पास होण्यासाठी नकळत कारणीभूत ठरली. कारण आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी विचार करण्याची कुवत आणि वैचारिक बैठक त्यातूनच तयार झाली. तुझं स्वतःचं उदाहरण तर नेहमीच माझ्या डोळ्यांसमोर असतं.

मराठी आणि हिंदी भाषांवरील तुझं प्रभुत्व, शुद्धलेखनाचा आग्रह, यामुळेच माझ्या लेखनात सहसा शुद्धलेखनाची चूक आढळत नाही. याआणि जी काही कमतरता राहते, तो नक्कीच माझा आळशीपणा किंवा अज्ञान. पण या  गोष्टींसाठी प्रशंसा होते तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणीने नेहमीच डोळे भरून येतात. 🥲😢

परिस्थितीनं नववीतच शिक्षण सोडायला लागलं तरी आपल्या अखंड आणि अफाट वाचनामुळे तू मिळवलेलं ज्ञान आणि वैचारिक समृद्धी, ही अनेक शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या व्यक्तींपेक्षाही कितीतरी उच्च दर्जाची होती, हे मला पदोपदी जाणवतं. म्हणूनच अगदी लहान वयात आमच्या हाती श्रीमान योगी, स्वामी, झेप, मृत्युंजय यासारखी पुस्तकं होती.  चौथीला स्काॅलरशिप मिळाल्यावर तू घेऊन दिलेलं साने गुरुजींचं, चित्रा आणि चारू, हे पुस्तक उदात्त प्रेम आणि मैत्री कशी असते, असावी हे नकळत शिकवणारं!

स्वतःसाठी पुरेसं नसतानाही, त्यातलंच दुसऱ्याला देऊन मदत करण्याची तुझी सह्रदयता, माणुसकी या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. मग ती साधी वाटीभर आमटी, कामवाल्या राधाबाईंसाठी मुद्दाम काढून ठेवण्याची गोष्ट असो की आणखी काही!

आम्हां पाचही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगायला शिकवताना, बाबा आणि तू, दोघांनी  सोसलेल्या अडचणी आणि केलेल्या त्यागाला तोडच नाही. त्या ऋणातून उतराई होणं या जन्मी तरी जमेल असं वाटत नाही ग! 🙏

असे संस्कार घडवणारी आई लाभणं हे आमचं महद्भाग्य! असे कितीतरी प्रसंग आणि आठवणी! कोणीतरी म्हटल्याप्रमाणे *आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई, तरी लिहून होणार नाही,आई तुझी थोरवी!  पण  माझी ही शब्दरूपी ओटी तुला समाधान देईल, असा मला विश्वास आहे.

आणि हो हे वाचून, सगळ्या मुलामुलींना शब्दांत व्यक्त करता आलं नाही तरी, आपापल्या आईची  आठवण काढून ते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील याची मला खात्री वाटते. ज्यांच्या नशिबी अजून मातृसौख्य आहे, ते भाग्यवान या निमित्ताने पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरण्याचा सुखद अनुभव घेतील. तिची प्रेमानं, आपुलकीनं चौकशी करतील आणि काळजीही घेतील. बाकीचे तिचे स्मरण करून, तिच्या संस्कारांचा वसा चालू ठेवतील, तर ही ओटी सुफळ संपूर्ण होईल.

© सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

एक काळ होता जेव्हा म्हणत असत की ‘पैसा गेला – काही नाही गेलं, तब्बेत गेली – काही तरी गेलं, चारित्र्य गेलं – सर्व काही गेलं’ (money lost- nothing lost, health lost- something lost, charector lost – everything lost).

आता परिस्थिती बदलली आहे. कोरोना नंतरच्या काळात तर ती प्रकर्षाने जाणवू लागली आहे व वरील सुभाषितामध्ये ही बदल झाला असून ‘वर्तणूक गेली- काही तरी गेलं, तब्बेत गेली तर सर्व काही गेलं’ अशी आता परिस्थिती आहे.

तुमच्याकडे पैसा असेल, वर्तणूक ही चांगली असेल पण तुमची प्रकृती (तब्बेत/हेल्थ) चांगली नसेल तर त्या पैशाचा, वर्तणूकीचा तुम्हाला काहीच फायदा नाही. तुमची प्रकृती खराब झाली तर तुमच्या चांगल्या वर्तणुकीमुळे तुमचा वशिला लागेल, चांगल्या दवाखान्यात तुम्हाला दाखल ही करता येईल, तेथील महागडा खर्च ही तुम्ही पेलू शकाल, पण तुमच्या शरीरावर होणाऱ्या औषधांच्या माऱ्याचे दुष्परिणाम ही तुम्हाला भोगावे लागतील. कोरोना काळात रेमिडीसीयर सारख्या औषधांनी अनेकांचा जीव वाचला पण त्यांच्या दुष्परिणामांनी त्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली‌ हे सर्वश्रुत आहेच. 

आजकाल आपलं खाणंपिणं ही असुरक्षित झालं आहे. उत्पन्न जास्त व्हावे यासाठी औषधांच्या फवारणी व रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतात उत्पादन होणारे धान्य हे सदृढ शरीरासाठी पोषक राहीले नाही व त्याने वेगवेगळ्या आजारांना निमंत्रणच दिले जात आहे. विशेष म्हणजे ते उत्पादन करणारे शेतकरी ही हेच अन्न खातात व त्यांच्यावर ही विपरीत परिणाम होतातच. खाद्यतेलांमधील भेसळ, फळे लवकर पिकावीत म्हणून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे फळे ही स्वस्थ शरीरासाठी सुरक्षित राहीले नाहीत. दूध वगैरे इतर पेय, बहुतेकांच्या आवडीची आईस्क्रीम, चॉकलेट्स ही यापासून सुटलेले नाहीत, त्यामुळे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच घटकांपासून आपल्या शरीरस्वास्थ्याला हानी पोहोचत आहे. त्यात जनसामान्यांप्रति असलेल्या नैतिकतेचा अभाव सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होत आहे. 

जगण्यासाठी अन्नधान्य आवश्यक आहे म्हणून ते टाळता तर येणार नाही. सतत बाहेरचे, भोजनालयांतील अन्न, फास्ट फूड, पिझ्झा बर्गर सारखे स्वस्थ शरीरासाठी तेवढे आवश्यक नसलेले अन्न/पदार्थ खाऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंतची शरीरे कमकुवत व जाड, बेढब होत आहेत. अकाली मृत्यू चे प्रमाणही वाढत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने कर्करोग व इतर साथीच्या रोग व विविध व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. परवा सामायिक केलेल्या लेखाप्रमाणे डॉ. नितू मांडके, डॉ. गौरव गांधींसारखे कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने दगावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परिस्थिती व भविष्य अंधारात आहे. घरातील सदस्य व वयस्कांच्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे घरातील आर्थिक स्थिती ही बिघडत आहे.      माणूस पैसा कमावण्यासाठी आयुष्यभर धावतो व तब्बेत खराब करून घेतो आणि मग मेहनतीने कमावलेला पैसा तब्बेत ठिक करण्यावर घालवतो. 

या सर्वांवर मात करण्यासाठी आपण आपल्या प्रकृतीची शक्यतो काळजी घेणे, तब्येत सांभाळणे, शरीर सुदृढ व रोगमुक्त कसे राहील याविषयी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी सतत प्रयत्नशील राहणे एवढेच आपल्या हाती आहे.

व्याधींचे अस्तित्व नाही असे घर शोधून ही सापडणार नाही. माझे ही खानपानावर नियंत्रण नसल्याने माझे ही वजन वाढत होते. आनुवंशिकतेमुळे उंची कमी व वजन ९६ किलो झाल्यामुळे माझे दोन्ही पायांचे गुडघे खराब झाले होते. चालणे अशक्य व खूपच त्रासदायक झाल्याने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून गुडघेबदल (जॉइंट रिप्लेस) करुन स्टील चे पार्ट बसवण्यात आले. एका पायाला पंचवीस व दुसऱ्या पायाला सत्तावीस टाके घालण्यात आले होते. त्यांचे एक्स रे चे फोटो व गुडघ्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेचे वण माझ्या स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत दिसतात. 

माझेही वय आता साठ आहे. उंची १५५ से. मी. त्यानूसार माझे वजन ५५ ते ६० किलो असायला हवे पण ते वाढत ९६ चे ९८ झाले. मी दररोज सकाळी सहा व सायंकाळी सहा कि. मी. असे बारा किलोमीटर चालत होतो. यामुळे वजन वाढत नव्हते, पण कमी ही होत नव्हते. पाऊस, थंडी व कंटाळा ने यात खंड पडत असे. वजन कमी करण्यासाठी मी मध-निंबू, उपाशी राहणे, पंधरा दिवस अन्न न घेता फक्त रस (ज्यूस) पिऊन राहणे, असे इतरही बरेच प्रयत्न करून पाहिले पण वजन काही कमी होत नव्हते. कंटाळून चालणे ही बंद झाले होते. शेवटी मी दैवावर हवाला ठेवून दिवस कंठत होतो. शरीर अजुन स्थूल झाले होते. (स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत बघून कल्पना करू शकता). चालतांना मला धाप लागत होती व जीना चढाउतरायला त्रास होत होता. पोटाचा घेर वाढल्याने मला उभे राहिले तर माझे पाय दिसत नव्हते‌.  मोजे- बुट (सॉक्स- शूज) घालायला खूपच त्रास होई. मोजे घालतांना पोट दाबले जावून गळ्यापर्यंत येत असे‌.  सर्वच कपडे मला घट्ट होत असत. स्थूलपणा ची लाज वाटून कामाव्यतिरिक्त मी बाहेर जाणे टाळत होतो. घरातच राहिल्याने हळूहळू नैराश्य मला घेरायला लागले होते. दररोज सकारात्मक कथा लोकांना पाठवायचो पण मन निराश व्हायला लागले होते. 

आधी आमच्या शेजारी राहणाऱ्या एका मित्राची पत्नी, वय वर्षे तीस, पण ती ही स्थूल होती. माझे बघून तिने ही वजन करायचे सर्व प्रयत्न करून झाले होते पण त्यांनाही फरक पडला नव्हता. नंतर ते दूर रहायला गेले. त्यांनंतर त्यांना वजन कमी करण्याच्या खात्रीलायक प्रकाराविषयी माहीत झाले व त्यांनी ते अंमलात आणले. स्वतः अनुभवून मित्राचे दोन महिन्यांत दहा व पत्नी चे सहा महिन्यांत पंचवीस किलो वजन कमी झाल्यावर ती दोघे आमच्याकडे आली. मी त्यांना बघून आश्चर्यचकित झालो. 

जेवण बंद न करता, आहार नियंत्रण करून सकस आहाराच्या मदतीने व घरातल्या घरात नियमित व्यायाम करुन कमी दिवसांत वजन घटवण्याच्या या पद्धतीविषयी त्यांनी मला माहिती दिली. भविष्यात आजारी पडून त्रास, मनःस्ताप भोगण्यापेक्षा शरीर स्वस्थ, निरोगी करून व्याधीमुक्त जीवन जगण्याचा आनंद देणारा हा सहज साध्य असलेला व्यायाम प्रकार मला उत्तम वाटला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही पद्धत अवलंबली.

आहार नियंत्रण, सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा व्यायाम व दोन वेळा सकस संतुलित आहाराच्या मदतीने सुरुवातीच्या काही दिवसांतच मला खूप हलके वाटू लागले व उत्साह वाढून पहिल्या महिन्यात माझे आठ किलो वजन कमी झाले. दूसऱ्या महिन्यात सात, तिसऱ्या महिन्यात पाच व पुढील पंधरा दिवसांत तीन असे साडेतीन महिन्यांत एकूण तेवीस किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर अगदीच कमी झाला (स्टेटस ला असलेल्या फोटोत बघू शकता) व स्वतःला खूप उत्साही, स्वस्थ व हलकं वाटू लागले. माझे सर्वच कपडे आता ढिले होऊ लागले. माझ्यातील झालेला हा बदल बघून माझे इतर मित्रही अचंबित झाले व त्यांनीही ही पद्धत अवलंबली आणि घरातल्या घरात राहून वजन घटवायला त्यांनी सुरुवात केली आहे.

हे फक्त वजन घटवण्यास उपयोगी नसून ज्यांचे वजन कमी आहे व त्यामुळे त्यांना त्रास किंवा चेष्टा, उपेक्षेला सामोरं जावं लागतं, त्यांना ही यातून फरक पडतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकारात्मक भावना वाढीस लागते.

या सोप्या व्यायामांमुळे थायराईड, ॲसिडिटी, अपचन, मायग्रेन, महिलांमधील पी. सी ओ. डी. चा त्रास ही कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याच स्त्रियांना स्थूलपणामुळे संतती होण्यास अडचण  येते. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे हा अडसर निघून संतती झाल्याचीही उदाहरणे आहेत. 

बरेचसे आजार हे वाढलेल्या पोटामुळे होतात. अपचन, वात, गॅस, ॲसिडिटी, मायग्रेन, बद्धकोष्ठता, हातापायाला मुंग्या येणे, अंग दुखी, वाढत्या वजनामुळे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी हे आजार ‘एकावर एक फ्री’ सारखे आपल्या जीवनात प्रवेशात. स्थूलपणामुळे हृदयावरही ताण येतो. रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. मांडी वाळून बसणे शक्य होत नाही. प्रवास ही नकोसा होतो. 

आपल्या नेहमीच्या दिनचर्येला बाधा न येता दिवसातला आपला एखादा तास घेणाऱ्या या व्यायामाने येणाऱ्या घामामुळे त्वचा निरोगी होते व त्वचेला तजेला येतो तसेच शरीरातील टाकाऊ, विषारी द्रव्ये घामाद्वारे मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने किडनी वरील ताण ही कमी होतो व एकप्रकारे अनायासेच डायलेसिस ची प्रक्रिया पार पडत असल्याने भविष्यात किडनीचे विकार होणे ही टळते.

आपले शरीर असंख्य कोषिका (सेल्स) नी बनलेले असल्याने या विविध व्यायामांमुळे मेटॅबोलिजम वाढल्याने हे सेल्स मजबूत होतात, शरीराचे स्नायूही मजबूत होतात, परिणामी शरीर सुदृढ व निरोगी बनते. 

आपल्यापैकी प्रत्येकाला आज ना उद्या या समस्या व सत्याला सामोरे जावे लागणार आहेच. वजन कमी करणे वाटते तितके सोपे नाहीच पण दृढ निश्चय, मनापासून प्रयत्न, या विषयावरील तज्ञांचे नियमित योग्य मार्गदर्शन व सातत्य ठेवल्याने हे वाटते तितके अवघड ही नाही हे मला उमजले व मी ते करुन दाखवले आणि अजूनही करीत आहे. 

व्यायाम शाळेत ही जाऊन व्यायाम करणे हे ॲलोपॅथी सारखे आहे. कदाचित तुम्ही वजन कमी करू शकता पण व्यायाम बंद केल्यावर साईड इफेक्ट सारखं पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढू लागते. 

योग करून शरीर स्वस्थ ठेवू शकता पण ते होमिओपॅथी सारखे आहे. फरक पडण्यास खूप कालावधी लागतो. त्यापेक्षा हजारो इच्छुक लोकांप्रमाणे मी अवलंबीत असलेल्या या पद्धतीमुळे लवकर व दीर्घकाळ फरक पडणार असेल तर ते चांगले नाही का? 

आपल्याला जे काही फुकट मिळते त्याचा फक्त आनंद असतो पण त्याची कदर मात्र रहात नाही. लाखमोलाचं हे शरीर ही आपणास फुकट मिळालं आहे. त्यांची काळजी घेण्याऐवजी वाटेल ते खाऊन, पिऊन त्याच्यावर अत्याचार करतो व मग त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात पैसे घालवतो. दरमहा असे गोळ्या औषधांवर किती खर्च होतात त्याचा हिशोब केला तर हळूहळू जाणारा हा आकडा मोठा होतो. 

तुमची जर खरंच मनापासून वजन कमी किंवा जास्त करायची व कोणत्याही स्वास्थ्यविपरित परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असे आपले शरीर स्वस्थ, सुदृढ व निरोगी असावे अशी तीव्र आंतरिक इच्छा असेल तर आणि तरच या विषयावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आपले वजन खात्रीने कमी होईल याची ‘ आधी केले, मग सांगितले ‘ या उक्तीप्रमाणे मी ग्वाही देतो.

आपणास स्वास्थ्यपुर्ण सुखी समाधानी आयुष्य लाभो यासाठी भरभरून शुभेच्छा. चला तर मग या सुंदर जीवनाला ‘फॅट टू फिट’ असे वळण देऊन अजून सुंदर बनवूया.

© श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी

आज २७ जुलै – आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन.  

… “यशस्वी होण्याचा माझा निर्धार पुरेसा मजबूत असेल तर अपयश कधीही माझ्या आड येणार नाही” – असा आत्मविश्वास बाळगणारे आणि तो खरा करून दाखवणारे कलामसर, म्हणजे ही मोलाची शिकवण जणू संपूर्ण देशालाच देणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. 

ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तत्कालीन मद्रास इलाख्यातील रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव अवूल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दिन होते, जे  एक नावाडी असून इमाम म्हणून देखील ते काम बघत. त्यांच्या आईचे नाव आशीअम्मा होते. त्या एक गृहिणी होत्या. कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होते. सर्व भावंडांमध्ये कलाम हे शेंडेफळ होते.

कलामांचे पूर्वज श्रीमंत व्यापारी होते, पण कालौघात त्या कुटुंबावर कठीण परिस्थिती आली होती. अब्दुल कलाम लहानपणी वृत्तपत्रे विकून कुटुंबाच्या माफक उत्पन्नात भर घालायचे हे आवर्जून सांगण्यासारखे आहे. 

कलाम यांनी रामनाथपुरम् येथे शालेय शिक्षण घेतले आणि सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्राची पदवी संपादन केली. १९५५ मध्ये ते एरोस्पेस अभियांत्रिकी करण्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेले. फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न पात्रता फेरीत अगदी काही गुणांनी भंग पावले. ते नवव्या क्रमांकावर होते. पण आय.ए.एफ. कडे फक्त आठ जागाच उपलब्ध होत्या. त्यानंतर त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम केले. 

१९६९ मध्ये कलाम यांची बदली भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो मध्ये करण्यात आली. इस्रोमध्ये ते एस.एल.व्ही. या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक होते. एस एल व्ही प्रक्षेपकाने १९८० मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केला. एस एल व्ही हा भारताचा पहिला प्रक्षेपक होता. कलाम यांनी ध्रुवीय प्रक्षेपण वाहन (PSLV) विकसित करण्यासाठीही काम केले. एसएलव्ही तंत्रज्ञानातून बॅलॅस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठीच्या प्रोजेक्ट व्हॅलीअंट आणि प्रोजेक्ट डेव्हिल या दोन प्रकल्पांचे ते संचालक देखील होते. त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांना प्रगत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे संचालकपद मिळाले. आर्. वेंकटरमन संरक्षण मंत्री असताना कलाम यांची क्षेपणास्त्रांचा ताफा विकसित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘ बेलास्टिक ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, तेव्हापासूनच त्यांना ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाऊ  लागले होते.

१९९२ ते १९९९ पर्यंत कलाम हे पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओ चे सचिव होते. पोखरण-२ चाचण्यांदरम्यान कलाम हे मुख्य प्रकल्प समन्वयक होते. याच काळात कलाम भारतातील  आघाडीचे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले.

२००२ मध्ये अब्दुल कलाम यांची भारताची ११ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारताचे राष्ट्रपती बनणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. २००७ पर्यंतचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा ठरला. लोकांमध्ये, विशेषतः शाळकरी मुलांमध्ये ते फार लोकप्रिय ठरले, इतके की त्यांना ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हटले जाऊ लागले. त्यांनी देशाच्या अनेक भागांना भेटी दिल्या. त्यांची भाषणे, त्यात असणाऱ्या प्रेरणादायी विचारांमुळे लोकप्रिय ठरली. राष्ट्रपतीपदासाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून लोकांचा दबाव  असतांनाही त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रपतीपदानंतर कलाम आय.आय.एम.- अहमदाबाद, आय.आय.एम.-शिलॉंग, आय.आय.एम.- इंदूर,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अण्णा विद्यापीठ, आदींमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर बनले.

२७ जुलै २०१५ रोजी आय.आय.एम.- शिलॉंग येथे व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी, रामेश्वरम् येथे पूर्ण शासकीय इतमामाने आणि अतिशय सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. 

अब्दुल कलाम हे त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणासाठी ओळखले जात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी काही पुस्तके व लॅपटॉप व्यतिरिक्त कोणतीही वैयक्तिक संपत्ती मागे सोडली नाही. ते विविध धर्माच्या शिकवणुकींचे जाणकार होते, आणि आंतरधर्मीय संवादाचे प्रतीक होते हे आवर्जून नमूद करायलाच हवे. 

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात:

  • India-2020:A vision for the new  Millennium
  • Wings of fire
  • Ignited minds- Unleashing the power within India
  • A manifesto for change: A sequel to India 2020
  • Transcendence: My spiritual experiences with Pramukh swamiji

  — आदि पुस्तकांचा समावेश होतो.

तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये :

  • पद्मभूषण -१९८१
  • पद्मविभुषण – १९९०
  • भारतरत्न – १९९७
  • वीर सावरकर पुरस्कार – १९९८
  • रॉयल सोसायटी, इंग्लंड यांचेकडून दिला जाणारा किंग चार्ल्सII पदक – २००७
  • इडिनबर्ग युनिव्हर्सिटी, इंग्लंड यांचेकडून डॉक्टर ऑफ सायन्स – २०१४

  —– आदि पुरस्कारांचा समावेश होतो.

आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अतिशय आदरपूर्वक प्रणाम. 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित

एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते.पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला आले असता ते म्हणाले, ” महाराज, माझ्या अपेक्षेबाहेर माझी जी भरभराट झाली, ती माझी कर्तबगारी नाही. भगवंताच्या कृपेनेच ती झाली, यात शंका नाही. आता काय केल्याने मी त्याचा उतराई होईन?” हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज प्रसन्न झाले व त्यांना म्हणाले, “आपल्यावर ज्याने उपकार केले, त्याच्याजवळ जी वस्तू नाही, ती त्याला देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उतराई होणे होय. जी वस्तू त्याच्यापाशी आहे तीच त्याला देण्यात फारसे स्वारस्य नाही. सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताचीच असल्याने दृश्य वस्तू  त्याला देणे म्हणजेच त्याचेच त्याला दिल्यासारखे आहे. त्याच्यापाशी नाही अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे त्याला स्वतःचे स्वतःवर प्रेम करता येत नाही. आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केले म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते. भगवंतावर मनापासून प्रेम करणे शक्य होण्यासाठी त्याला शरण जावे. शरणांगती साधण्यास, मी कोणीही नाही ही भावना निर्माण झाली पाहिजे. ती नामस्मरणाने निर्माण होते. म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा”.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

वादळासोबत उडू न जाणारी झाडंच मातीत घट्ट पाय रोवून उभी रहातात सावधपणे. डवरतात.फळाफुलानी बहरतात. भुकेल्याची तहान भूक शमवण्यात स्वतः ला धन्यमानतात. पांथस्थाना देतात सावली. पाखरांना देतात आधार.मातीलाही आपल्या मुळाशी बांधून ठेवतात आपलीशी करून आपल्याशी. परिसराला नसती शोभाच  नाही तर ऐश्वर्यसंपन्न ही बनवतात आपल्या परीने . विश्वासाने त्यांच्या कडे बघणाराच्या मनातील आनंद , हर्षोल्लास द्विगुणित करतात .आपल्या जागेवर अटल राहून. ती असता स्थितप्रज्ञ. अबोल. तुम्हाला नसतं त्याच कसलंच निमंत्रण. गरजवंतालाच जावलागतं  त्यांच्या कडे .तुम्ही गेलात त्यांच्याकडे तर ती करतनाहीत तुमचा आव्हेर. कशालाच ती  विरोध नाहीत करत. तुम्हाला हव ते घ्याही म्हणत नाहीत आणि नाही ही म्हणत नाहीत. माणसान असलच झाड बनाव आपलं सर्वस्व दान करणार.

परोपकाराच प्रतीक बनाव. मार्गदर्शक बनाव. झाडाच्या जगण्याचा आदर्श घ्यावा. जन्मावं, वाढावं, तगावं, माणसांच्यासाठी. तेव्हा सगळा समाजच संपन्न होईल, निरागस, निर्मळ, परोपकारी. माग कळेल झाडांची ममता आणि महानता. पण त्यासाठी मातीशी अतूट नाळ जोडावी लागते. देण्यातला आनंद लूटण्यआलआ शिकावं लागतं.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जगात सगळ्यात ताकदवान कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे सामान्यांचे कंबरडे. हे नेहमी मोडण्यासाठीच असतं.  पेट्रोल डिझेलची भाववाढ झाली की सामान्यांचे कंबरडे मोडते.

सिलेंडर चे भाव वाढले की सामान्यांचे कंबरडे मोडते.  दर वर्षी केंद्रात आणि राज्यात अशी दोनवेळा अंदाजपत्रके म्हणजेच बजेट येतात. त्या दोन्ही वेळेला विरोधी पक्षांच्या मते सामान्यांचे कंबरडे मोडलेले असते.  तसं पाहायला गेलं तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे.  पण कंबरडे हा अवयव कुठे आहे हे मला अजून समजलं नाही.  कंबर आणि त्याच्या जवळपास कुठेतरी तो असला पाहिजे कारण त्याचं नाव कंबर या नावावरून तयार झालेलं आहे असा आपला माझा सर्वसामान्य माणसाचा बाळबोध अंदाज. तर हा कंबरडे नावाचा सर्वशक्तिमान अवयव मी सर्वसामान्य असून सुद्धा मला काही अजून सापडला नाही.  बहुधा तो शरीराच्या आत कोठेतरी दडला असावा.  कारण माझी कंबर दुखते हे माझ्या आई ग ! उई ग ! वरून सगळ्यांनाच समजतं.  परंतु कंबरडं मोडतं म्हणजे काय होतं हे काही अजून मला समजलं नाही. ते मोडत असून सुद्धा पुन्हा ते कसं जोडलं जातं तेही समजत नाही. कारण एकदा मोडल्यानंतर पुन्हा मोडण्यासाठी मध्यंतरीच्या काळात ते जोडलं जाणं आवश्यक आहे.  कारण न जोडता ते पुन्हा मोडणार कसं ? त्यामुळे हा कंबरडं नावाचा अवयव कुठे असतो, तो सतत मोडून सुद्धा कसा जोडला जातो, या साऱ्या चमत्काराची फोड कुणी करत असेल तर मला हवी आहे.  बघा तुम्हाला जमतय का –  हे कबरडं कुठे आहे आणि ते कसं मोडलं आणि जोडलं जातंय हे शोधून काढायला ?

मला कळवा हं तुम्हाला समजलं तर…

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

एवढा धो धो पाऊस पडतोय. अशा वेळेस दोनच गोष्टींची निवड करणे शक्य असते – एक म्हणजे पुस्तक-वाचन आणि दुसरी म्हणजे अपेयपान !    

अशा पावसात अस्सल दर्दी माणसाला व्हिस्की, बीअर, व्होडका, वाईन यातील कुठलेच पेय लागत नाही. या अस्सल दर्दी माणसाची पसंती असते एकाच पेयाला – ते म्हणजे – रम ! हा परिचित ब्रँड तुमच्या जमान्यातला असेल, पण ही ‘रम’ ब्रिटिश जमान्यात मुंबईत बनत होती, हे तुम्हाला माहीत नसेल.  आज तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. 

१८५३ साली पहिली आगगाडी व्हिक्टोरिया टर्मिनसवरून निघाली. तेव्हा पुढचं स्टेशन होतं – भायखळा. दादर नव्हतं, कुर्ला नव्हतं, मुलुंड नव्हतं, पण एक स्टेशन होतं, ते म्हणजे भांडुप ! आश्चर्याचा धक्का बसेल, पण बाकी कुठलंही स्टेशन नव्हतं. 

आता भांडुप स्टेशन असण्याचं कारण काय?  कारण फार गंमतीदार आहे. भांडुपला गाडी थांबली, तर बरेचसे गोरे भांडुपला उतरले आणि तिथे गावात जाऊन चार-पाच पेग रम मारली आणि परत गाडीत येऊन बसले.  तेव्हा भांडुपची लोकसंख्या असून असून किती असणार? तर तीनशे, चारशे… कारण १८८१ साली जेव्हा जनगणना झाली, तेव्हा भांडुपची लोकसंख्या होती – जेमतेम पाचशे चव्वेचाळीस ! आता एवढ्या छोट्या गावात तेव्हा रम कशी बनवली जायची? …. 

त्याचं झालं असं – मुंबई जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात आली, तेव्हा त्यांनी ल्यूक ॲशबर्नर नावाच्या माणसाला भांडुप हे गाव नाममात्र भाड्याने दिले. हा ल्यूक ॲशबर्नर ‘ बॉम्बे कुरियर ‘ नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक होता. त्याला सांगितलं गेलं की, ‘ तू वर्तमानपत्र पण सांभाळायचं आणि इथे रम पण बनवायची.’ तो काय करणार बिचारा? तो अग्रलेख लिहिणार की रम बनवणार? मग त्याने एक युक्ती केली. त्याचा कावसजी नावाचा मॅनेजर होता. त्यानं त्याच्या हाती कारभार सोपवला आणि त्याला सांगितलं की, ‘ रम बनवणे तुझं काम आहे.’                                                        

तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, त्या काळी साडेचार लाख लिटर रम बनवली जायची आणि आख्ख्या भारतभर ब्रिटिश सैनिकांना पुरवली जायची. त्याच्यानंतर गंमत काय झाली की, मॉरिशसला स्वस्त रम तयार व्हायला लागली आणि मग भांडुपचा ‘रम’चा धंदा बंद करावा  लागला .  ‘बॉम्बे गॅझेटियर’च्या चव्वेचाळीसाव्या पानावर ल्यूक ॲशबर्नरच्या नावासकट ही माहिती उपलब्ध आहे.  

आता ही सगळी माहिती आम्हाला कुठून मिळाली? तर आमचे एक मित्र आहेत – श्री. माधव शिरवळकर. त्यांनी ” मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…” या नावाचे पुस्तक लिहिले. त्यात अशा अनेक गंमतीजमती आम्हाला वाचायला मिळाल्या. तेव्हा आज आपल्याला माधव शिरवळकरांचेही आभार मानलेच पाहिजेत. त्यांचे हे पुस्तक आपण जरूर वाचा.

तोवर ….. “ चीअर्स ! “   

लेखक : अज्ञात. 

(https://www.instagram.com/p/Cuej5u-NBh-/) – या सूत्रधाग्यावरून (link) साभार.

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माफक अपेक्षा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

माफक अपेक्षा ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका निवांत क्षणी भावुक होऊन तिला त्याने विचारलं…”काही हवंय का तुला?”

अशा अनपेक्षित प्रश्नाने ती दचकली.40 वर्षाच्या संसारात साधं पाणीही न विचारलेला माणूस आज का असं विचारतोय?

कारण आज त्याला जाणीव झाली…. आपल्या जीवनाची नौका किती सहजपणे पार झाली, या भ्रमातून सुटून त्या नौकेची नावाडी त्याची बायको होती, याची जाणीव.

डोळ्यावरचा चष्मा सुरकुतलेल्या कानामागे सरकवत ती म्हणाली,

“हो, खूप काही हवं होतं. पण योग्य वेळी.आता या वयात काय मागू मी?

लग्न झालं आणि या घरात आले, हक्काचा माणूस म्हणून फक्त तुम्ही जवळचे होता. पण तुम्हाला ना कधी बोलायला सवड,ना माझ्यासोबत वेळ घालवायची आवड.सतत आपले मित्र, नातेवाईक आणि भाऊ बहीण…आपल्याला एक बायको आहे.तिच्या काही मानसिक गरजा आहेत,हे तुम्ही ओळखून मला तुमच्याकडून मानसिक ऊब हवी होती.

घरातली कामं करून दमायचे, आल्या गेल्याचं जेवण, नाष्टा, पाणी, त्यांचा मुक्काम.. अंगावर ओढून घ्यायचे.कितीतरी स्वप्नं पाण्यावर सोडायचे, आजारपण अंगावर काढायचे, जीव नकोसा व्हायचा, पण संसाराचे नाव येताच त्राण परत आणून पुन्हा सज्ज व्हायचे.

त्यावेळी गरज होती मला. दोन शब्दांनी फक्त विचारपूस केली असती, तर पुढची चाळीस वर्षं जोमाने आणि आनंदाने  जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या.

तुमच्या घरात जेव्हा सर्वजण एका बाजूला राहून माझ्यावर खापर फोडायचे, मला एकटं पाडायचे, तेव्हा मला गरज होती ती तुमची. तुम्ही मात्र तटस्थ.तेव्हाची झालेली जखम आजतागायत मनावर ओली आहे. वेळ निघून गेली, आता कशी पुसणार ती जखम?

गर्भार असतांना माझ्या आई- वडिलांवर जबाबदारी टाकून मोकळे झालात, पण माझे डोहाळे पुरवायचे तुमच्याकडून राहून गेलेत..त्या नऊ महिन्यांत तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवावा,आपल्या बाळाशी बोलावं…हे हवं होतं मला तेव्हा.आज काय मागू मी?

माझंही शिक्षण झालं होतं, मलाही काहीतरी करून दाखवायचं होतं. तेव्हा प्रेरणा हवी होती, आधार हवा होता तुमचा.आज सगळं संपून गेल्यावर काय मागू मी?

मुलांमागे धावताना, त्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकताना तुम्ही माझा भार जरा हलका करावा हे हवं होतं मला, तेव्हा शरीराची जी झीज झाली त्याचे व्रण अजूनही तसेच आहेत…आज ती वेळ निघून गेल्यावर कसे पुसणार ते व्रण?

संसाराच्या नावाखाली झालेला अन्याय मी पदराआड लपवला…तुम्हाला कसली शिक्षाही नाही मिळणार.मी कोण तुम्हाला शिक्षा देणारी? पण एका स्त्रीचं आयुष्य तुम्ही तुमच्या गरजेखाली पणाला लावत तिचं आयुष्य व्यर्थ घालवलं, याची नोंद मात्र त्या विधात्याकडे अबाधित असेल…

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर ☆

? काव्यानंद ?

☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर

वैभव जोशी यांच्या गझलचं रसग्रहण

आज त्यांची  देवप्रिया(कालगंगा)वृत्तातली एक गझल मी रसग्रहणासाठी घेतली असून त्यातील प्रत्येक शेराचा आशय माझ्या कुवतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी अनेकांना यातील शेरांच्या अर्थाचे वेगळे पदर उलगडतीलच.

आजची रचना

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

 

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

 

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

 

काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

 

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वैभव जोशी

आता प्रत्येक शेराचा आशय आपण पाहू..

शेर क्र.१

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

एका लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी त्याची लेखणी हीच त्याला मिळालेली अमोघ अशी ताकद असते.आपल्यापाशी असलेली शब्दसंपदा लेखणीच्या माध्यमातून तो रसिक मायबापापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पण या लेखणीतून फक्त शब्दबुडबुडे बाहेर न पडता जगातल्या दुःखितांच्या,पीडितांच्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ्य दे असं मागणं गझलकार ईश्वराकडे मागत आहे!खूप सुंदर असा मतल्याचा शेर!

शेर क्र.२

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

या शेरात गझलकार वरवर अगदी साधं वाटणारं पण अतिशय कठीण,सत्वपरीक्षा पाहणारं मागणं ईश्वराकडे मागत आहेत.आपल्या अवतीभवती भुकेने तडफडणारे अनेक लोक आहेत आणि अशी वेळ कुणावरही,कधीही येऊ शकते!यदाकदाचित असा प्रसंग स्वतःवर कधी आलाच तर एकवेळ पोटाची खळगी भरायला भाकरी नाही दिलीस तरी चालेल,पण भूक सहन करण्याचं बळ दे,आणि तशा अवस्थेतही स्वत्वाची भावना कधी ढळू देऊ नकोस,पोटासाठी लाचारी पत्करायला लावू नकोस असं गझलकारांचं मागणं आहे..असं कुणी एखादाच मागू शकतो कारण आज माझं हक्काचं आहे ते हवंच पण दुसऱ्याचं आहे तेही हवं अशी लोकांची मनोधारणा बनत चालली आहे!खूप गहन अर्थाचा शेर!

शेर क्र.३

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

वाह! या जगात जसे असामान्य लोक आहेत तसेच अतिसामान्यही आहेत.कुणी सडेतोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतो तर कुणी मूग गिळून बसत सतत अन्याय सहन करत राहतो.बळी तो कान पिळी या न्यायाने मोठा अधिक मोठा होत जातो आणि सर्वसाधारण आहे तो जैसे थे अवस्थेत पिचून जातो.प्रत्येक युगात हे असंच चालत आलंय पण अशा वंचितांना आपली व्यथा बोलून दाखवण्याची स्फूर्ती परमेश्वराने द्यावी,त्यांच्या जाणिवा जागृत व्हाव्यात असं या शेरात गझलकारांचं मागणं आहे!सुंदर शेर!*ज्येष्ठ दिवंगत गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांची

बोल बाई बोल काही

हा अबोला ठीक नाही

असा शेर असलेली गझल मला सहज आठवली हा शेर वाचताना!

शेर क्र.४

काय कामाचा गड्या ओठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

हाही शेर खूप उंचीचा खयाल असलेला!आधीच्या शेरात म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे केवळ अन्याय सहन करत कुढत जगणाऱ्या माणसांच्या शब्दांना कधी तरी वाचा फुटावी आणि मनात दाटून आलेलं सगळं बाहेर यावं जेणेकरून पुढची वाटचाल सुकर होईल!

हो मोकळी बोलून तू हृदयात जे जे दाटले

का भावनांना आपल्या अव्यक्त मग ठेवायचे

या शेरात म्हटल्याप्रमाणे मनातल्या भावनांची कोंडी फुटल्याशिवाय जगणं सुखाचं होणार नाही आणि त्यासाठीच ईश्वराने आपलं मन मोकळं करण्याची स्फूर्ती माणसांना द्यावी,मूक हुंदके सहन करण्यापेक्षा परिस्थितीचं,काळाचं आव्हान पेलण्याची ताकद दे,अश्रूंपेक्षा हिम्मत दे असं गझलकार इथे सुचवतात.

शेर क्र.५

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वाह,हा शेवटचा शेर तर एखाद्या पोथीचा कळसाध्याय असावा तसा आहे!सामान्य माणसाला रोजची भाकरी आणि रहायला मठी असावी एवढीच अपेक्षा असते,त्याला कुठल्या शिखरावर जायची आस नसते आणि किमान सुखाचं आयुष्य लाभावं इतकं त्याचं अल्प मागणं असतं.

प्रस्तुत शेरात गझलकार म्हणतात की मला त्या ध्रुवासारखं आकाशातलं अढळपद मिळण्याची लालसा नाही तर अवतीभवतीच्या माणसांच्या काळजातच जागा हवी आहे जेणेकरून त्यांची सुखदुःख,व्यथा वेदना जाणून घेता येतील.स्वतःपुरेसंच जगण्याची संकुचित वृत्ती न जोपासता इतरांची मनं वाचण्याचा व्यापक दृष्टिकोन या शेरात प्रभावीपणे व्यक्त झाला आहे आणि म्हणूनच या शेरातला खयाल खूप उच्च दर्जाचा वाटतो!एका कवीसाठी, गझलकारासाठी माणसं वाचण्याहून  दुसरं मोठं काही नसतं असाही एक विचार इथे गवसतो!खूप आवडला हा शेर!

ही रचना मला का आवडली?

देवप्रिया वृत्तातली ही खूप सुंदर रचना आदर्श मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यातला प्रत्येक शेर खास आहे. दे रे ईश्वरा या रदिफला अगदी समर्पक असे वरदान,जाण, त्राण, स्फूर्तीगान,आव्हान आणि स्थान हे कवाफी चपखलपणे वापरले आहेत. लेखणी,भूक,भाकरी,हुंदका,गगनातलं अढळपद अशी प्रतीकं, रूपकं आणि प्रतिमा या रचनेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे प्रत्येक शेर वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतो!श्री.वैभव जोशी यांच्या तरल आणि संपन्न प्रतिभेला मनापासून नमस्कार!आजच्या वाढदिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा!

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares