श्री सुनील काळे

स्वपरिचय 

जन्मगाव पाचगणी असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाई पाचगणी महाबळेश्वर या परिसरातील निसर्गरम्य जागेवर जावून अनेक जलरंगातील चित्रे रेखाटनाचा नाद लहानपणापासून आहे. या परिसरातील पाच हजारांपेक्षा जास्त चित्रे रेखाटलेली आहेत. त्यांचे प्रदर्शन मुंबईच्या सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर मुंबई, ऑबेरॉय टॉवर्स, म्युझियम आर्ट गॅलरी येथे व पुण्यात बालगंधर्व येथे प्रदर्शने केलेली आहेत. अनेक प्रसिद्ध कलारसिक लोकांनी चित्रे विकत घेतलेली आहेत. लेखन, वाचन, चित्रकला, बागकाम, कॅलिग्राफी, फिरणे, रेखाटने करणे, गाणी ऐकणे, निसर्गात रममान होणे व शांत राहणे हे आवडीचे छंद आहेत.

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – १ ☆ श्री सुनील काळे 

आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित, नावीन्यपूर्ण, रोमांचक , सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात… आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते… एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.

अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्तेत खोलवर रुतत जातो . काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात… असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे…. माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण- धगधग मनात साठलेली असते .

1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले . त्या काळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे .सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते. त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात….

मला वाई, पाचगणी , महाबळेश्वरचा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणीमध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती.  या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्याजवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला.  त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरीचे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही.  तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली.  अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली.  मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यावसायिकरित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. त्यानंतर उतरती कळा लागली …

मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला.  पुढे पाचगणी क्लब, टेबल लँडवरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो . प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले. मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली जवळपास 200 ओरिजिनल जलरंगातील निसर्गचित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही.  उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली…  आणि पूर्ण देखील केली… आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली .

अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला. राहायला घर नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही, अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो.  तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.

आणि मग जगण्यात राम नाही, मजा नाही.. सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ? कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.

पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे. पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. माहीत नाही पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते.  दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो.  ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची ,सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला, या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले , ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवताच्या व काट्याकुट्यांच्या मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती .

मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो . त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो. मला कशाचेही भान राहिले नव्हते.  कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो….  आणि… अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली. डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला. आयझॅकने मला कडकडून मिठी मारली. माझे डोळे पुसले, माझे सांत्वन केले, आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली.

आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा. संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा . मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा. फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा. चालताना देखील धावत धावत चालायचा… आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments