मराठी साहित्य – विविधा ☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कशाले काय म्हनू नये…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

कशाले काय म्हनू नये…

अशाच काहीशा नावाची आणि अर्थ असणारी बहिणाबाई यांची एक कविता शाळेत होती…

बिना कपाशीनं ऊले

त्याले बोंड म्हनू नये…..

               हरिनाम हि ना बोले

               त्याले तोंड म्हनू नये……

नाही वाऱ्याने हालंल

त्याले पान म्हनू नये…

असे बरेच कशाला काय म्हणू नये हे खास अहिराणी भाषेत पण सहज समजेल या शब्दांत त्यांनी सांगितले आहे. हे सगळे दोष आहेत. माणूस म्हणून कसे रहावे हेच सांगण्याचा हेतू त्यात होता. यात त्यांनी माणूसच नाही, तर वनस्पती, आणि निसर्ग यांच्यातील अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक गोष्टी सहज ओघावत्या शब्दात सांगितल्या.

पण आता काळ बदलला. जगण्याचे तंत्र (आम्ही आमचेच) बदलले. नवीन तंत्रज्ञानात आम्ही आमचे वागण्याचे ताळतंत्र काही प्रमाणात सोडले. कारण आता आला मोबाईलचा जमाना. आणि या मोबाईलच्या जमान्यात आम्ही माणूस म्हणून जगायचेच विसरलो. इतकेच नाही तर काही अपप्रवृत्तींचे दर्शन आम्ही राजरोसपणे दाखवायला, करायला लागलो. (अर्थात सगळेच नाही. पण संख्या कमी देखील नाही.) याचे वाईट वाटणारे आहेत तसेच समर्थक देखील आहेत. (तो खुपच ॲक्टिव्ह असतो, मोबाईल वर गाणं बघतच जेवतो, शाळेत जात नाही अजून, पण मोबाइल बरोब्बर हाताळतो इ…)

आता मोबाईल त्यातले फेसबुक, व्हॉटस्ॲप, गुगल, यू ट्यूब, इनस्टा. ट्विटर, गेम या बद्दलच तरुणाईचे ट्विट असते. असे आणि इतरही बरेच काही यातच आम्ही स्वतःला हरवले आहे. आम्ही या मोबाईलच्या अधीन झालो आहोत. आणि अप्रत्यक्ष पणे त्यांचे समर्थन देखील करतो.  आम्ही कामाव्यतिरिक्त बराचसा वेळ मोबाईल मध्येच घालवून वेळ घालवत असतो.

आज सहजपणे या मोबाईल बद्दल खालील प्रमाणे म्हणतील का?……. कारण सततचा त्याचा वापर. आणि तो वापरण्याची अधीरता.

        नाही केले अपडेट…..

        त्याला स्टेटस् म्हणू नये..

नाही बदलले चित्र…..

त्याला डी.पी. म्हणू नये.

         नाही आला मेसेज……

         त्याला गृप म्हणू नये.

नाही काढले फोटो…….

त्याला सोहळा म्हणू नये.

          ज्याने केले नाही फॉरवर्ड……

          त्याला ॲक्टिव्ह म्हणू नये.

जो जागेवरच थांबला…….

त्याला नेट म्हणू नये.

         जो वेळेवर संपला…..

          त्याला नेटपॅक म्हणू नये.

ज्याने नाही झाला संपर्क…….

त्याला रेंज म्हणू नये.

          ज्याने दाखविला नाही रस्ता…….

          त्याला मॅप म्हणू नये.

जी लवकर डिस्चार्ज झाली……

तिला बॅटरी म्हणू नये.

              ज्याचे दिले नाही उत्तर……..

               त्याला गुगल म्हणू नये.

जी भरते लवकर……

 त्याला मेमरी म्हणू नये.

                    ज्यात नाही नवे ॲप……

                    त्याला प्ले स्टोअर म्हणू नये. जो होतो सतत हॅंग…….

त्याला मोबाईल म्हणू नये.

 

शेवटी तर असे म्हणावे लागेल की……

 

        ज्यांच्याकडे नाही मोबाईल……..

        त्याला माणूस म्हणून नये.

जिथे नाही वाय फाय……..

त्याला घर म्हणू नये.

कारण आम्ही बराचवेळ काही कारणाने किंवा कारणाशिवाय मोबाईल सोबतच असतो.

सगळ्या नवीन गोष्टी वाईटच असतात असे नाही. पण चांगले काय आहे? हे आपणच समजून घेत ते आणि तेवढेच वापरले पाहिजे. नेमके, वेचक घेऊन  ठराविक काळात वापरला तर मोबाईल देखील चांगलाच आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ “काळजी—घेणे आणि करणे…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “काळजी—घेणे आणि करणे…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल एक गौरगोपालदासजींची छोटीशीच पण भरपूर समज देणारी आँडीओक्लीप ऐकली.गौर गोपाल दास सांगतात, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, पण तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित करता की सुखावर, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असते. गौर गोपाल दास यांनी साधू संतांच्या बाबतीत म्हटले, की संसारी माणसालाच दुःख असते असे नाही, तर सन्यस्त माणसालाही दुःख आहेच. कारण जोवर आपण देहाने या जगात आहोत, तोवर राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार चिकटलेले असणारच. तसेच जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी पैसा लागणारच, शारीरिक व्याधी होणारच, थंडी, ऊन, वारा, पाऊस  यांचा जाच होणारच. मात्र या सगळ्या गोष्टी घडूनही आपण त्यातून स्वतःसाठी जर आनंद शोधायचा ठरवले तरच आनंदी राहू शकतो.

ही क्लीप ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपलं जितकं नुकसान येणाऱ्या संकटाने होतं त्याच्या कित्येक पट  जास्त नुकसान ते संकट प्रत्यक्ष यायच्या आधीच्या भितीने, कल्पनेने आपलं आँलरेडी होऊन जातं फक्त आपल्या ते लक्षात येत नाही वा जाणवत नाही. काही वेळा आपण करीत असलेल्या अवास्तव काळज्याचं आपले जास्त मानसिक खच्चीकरण करतात.

मानवी स्वभाव मोठा अनाकलनीय आहे. बरेच वेळा आपल्या स्वतःला “बाबापुता” करुन स्वतःच्या मनाला कुरवाळयला,सांत्वना द्यायला फार आवडायला लागतं,मग आपण ते सहाणेवर गंध उगाळल्यासारखं आपल्याच दुःखाचे, व्यथांचे वेटोळे ,फेरे स्वतःभोवती फिरवीत बसतो आणि इथेच आपला घात होतो.

स्वतःच्या मनाला कणखर बनवून संकटाला दटके सामना करायला फक्त आणि फक्त तुम्हीच शिकवू शकता.

..सद्यस्थितीत नैराश्याने ग्रासलेले लोक परदेशातच नाही तर भारतातही मोठ्या प्रमाणात आहेत. याचे कारण शोधायचे झाले तर लोक स्वमग्न होत आहेत. आपल्या विषयात अडकून राहिलो कि आपल्याला आपले प्रश्न मोठे वाटतात आणि आपण त्याचाच विचार करत बसतो. दर दिवशी नवीन आव्हाने, नवीन प्रश्न समोर येणारच आहेत, मात्र प्रश्नांनी समस्यांनी खचून न जाता आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला तर आपणही आनंदी होऊ शकतो. म्हणजेच काय तर राग, दुःख, त्रास आपोआप येऊन आपल्याला चिकटणार आहेच, पण त्यातून आनंद आपल्याला जाणीवपूर्वक निवडावा लागेल.

…कुठल्याही संकटाचा कमी जास्त प्रकोप हा आपल्याला वाटणा-या भितीशी संलग्न असतो.नुकत्याच आलेल्या संकटाच्या लाटेनं हे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव करुन दिली.ह्या भितीचा उगम हा काळजी मधून होतो.काळजीचा अतिरेक झाला की त्याची जागा भिती घेऊ लागते आणि भीतीची का एकदा मनावर पकड बसली की संकटाचा उद्रेक सुरू होतो.

कुठलही नवीन संकट सामोरं येऊन उभं ठाकलं की त्याबद्दलची भिती मनात घर करुन बसते,नव्हे अगदी ठाणच मांडून बसते.त्या संकटाची तीव्रता ही परिस्थिती पेक्षाही आपल्या मनाच्या अवस्थेतील काळजी,भीती ह्यांनी वाढते.

पण ह्या मनाने लाऊन घेतलेल्या भितीलाही शेवटी कुठेतरी मर्यादा ही असतेच.कालांतराने ही भितीही आंगवळणी पडल्यासारखी मानगुटीवर चढूनच बसते.पण नंतर एकवेळ अशी अवस्था येते की ह्या काळजी,भिती ची कमाल मर्यादा ओल्यांडल्या जाते आणि मग त्या क्षणापासून त्यातील हवाच निघून जाते.मनात निर्माण झालेली भिती हीच परिस्थिती बिघडवण्यास जास्त कारणीभूत असते.नोकरी घरकाम, वाचन लेखन वा तत्सम आपल्या आवडत्या कला ह्या सारख्या सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं तर मग परिस्थिती चुटकीसरशी सकारात्मक होते.

कदाचित काही वेळी परिस्थिती फारशी बदलली जरी नसली तरीही स्वतः मधील बदलांमुळे ह्या संकटातून बाहेर पडल्यासारखं वाटतं हे नक्की. त्यामुळे सभोवताली निरभ्र आकाश आणि घेतलेला मोकळा श्वास सुखावू लागतो.काळजी जरुर घ्यावी पण काळजी करीत बसू नये हे मात्र कोरोनानेच शिकविले

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सखी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ सखी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

कितीतरी दिवसातून आज

ती स्वतःस विसरुन

त्याच्या जवळ येवुन बसते.

 

आज त्याला जी भेटते.

 

कदाचित बायको नसते

रोजची धुणीभांडी आवरणं सावरणं

असे काहीच नव्हते तिच्या मनात.

आज स्वयंपाक रांधण्याचे पण

बहुतेक नव्हतेच तिच्या ध्यानात .

तो तसा नेहमीप्रमाणेच शांत बसलेला

ऑफिस मधून आल्यावर थोडा थकलेला

तिच्या हातचा चहा पिऊन प्रसन्नही झालेला .

 

आज तिनं त्याला विचारले नाही ,

येताना भाजीपाला आणला का?

सामानाची लिस्ट दुकानात पोहचवली का…

वगैरे वगैरे…काहीच नाही .

 

तोही आज थोडा गोंधळूनच जातो .

चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह देवून

तिच्याकडे एकटक पहातो .

इतक्यात तिच बोलू लागते

आपल्या रोजच्याच बडबडी प्रमाणं

“आज बाहेर वातावरण छान आहे ना

चला बाहेर ओट्यावर बसूया का?”

 

तो अजूनच गोंधळून जातो .

माझी बायको कुठं हरवली

असे स्वतःलाच विचारतो .

 

इतक्यात ती त्याच्या अगदी जवळ जाते

आणि स्वतःचा हात पुढे करते .

त्याचा हात हातात मागते.

ती त्याला बाहेर ओट्यावर नेते

तेंव्हा, एक-एक चांदणी आकाशावर उमटते

पुन्हा तिची बडबड चालू होते

आज ती त्याला ती वेगळीच भासते .

तिच्या बडबडीत

ना त्रुटींची उणिव असते,

ना व्यथांची जाणिव ओघळते .

नुकत्याच उमललेल्या मोगऱ्याच्या

फुलांप्रमाणे तिच्या शब्दातिल गंध

तिला सुगंधित करतो .

नकळत मौन सोडुन तोही

तिच्या मधुर शब्दांना दाद देतो .

दोघांच्या सुखद  संवादानी

वातावरण गंधाळून जाते .

आज बायको नाही त्याला

नविन मैत्रीण भेटली असे वाटते !

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 60 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक एक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 60 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक एक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर,  “आपल्याला सार्‍या मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा द्यायची आहे, तेंव्हा आपला भर तत्वांचा, मूल्यांचा, आणि विचारांचा प्रसार करण्यावर हवा. संन्यास घेतलेल्यांनी किरकोळ कर्मकांडात गुंतू  नये”. असे मत नरेंद्रनाथांचे होते. या मठातलं जीवन, साधनेला वाहिलेलं होतं. अभ्यासाबरोबर ते सर्व गुरुबंधुना पण ते प्रोत्साहित करू लागले की, भारत देश बघावा लागेल, समजून घ्यावा लागेल. लक्षावधी माणसांच्या जीवनातील विभिन्न थरांमध्ये काय वेदना आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण न होण्याची कारणे काय आहेत ते शोधावे लागेल. हे ध्येय समोर ठेऊन ,भारतीय मनुष्याच्या कल्याणाचे व्रत घेऊन स्वामी विवेकानंद यांचे हिंदुस्थानात भ्रमण सुरू झाले.

परिव्राजक स्वामीजी सगळीकडे फिरून आता धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत.

महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्‍या सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. इथून महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले.

त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्‍यांचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत.

कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.

कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. २४ डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम  या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता.वर्तमानकालीन भारताचं विराट दर्शन त्यांना घडलं होतं. शतकानुशतके आपला समाज निद्रितवस्थेत आहे आणि तो आपला वारसा विसरला आहे,रूढी परंपरा यांचा दास झाला आहे असं भीषण चित्र त्यांना दिसत होतं. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा  करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त – दुसरी बाजू ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त  – “दुसरी बाजू…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आठ मार्च,महिलादिन. आजकाल बरेच ठिकाणी महिलादिन वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरे केले जातात.खरंतरं महिलादिनी सरसकट महिलांची अपेक्षा असते की हार,बुके सत्कार समारंभा ऐवजी तिला आधी एक स्वतंत्र विचार, स्वतंत्र भावना,स्वतंत्र आवड आणि स्वतंत्र मत असलेली व्यक्ती म्हणून आधी समजून घेतल्या जावं, तिच्या कष्टांची दखल घेतल्या जावी.

आपण सगळ्याजणी तशा नशीबवान. आपण अशा घरात जन्म घेतला जेथे कदाचित महिलादिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नव्हता पण संपूर्ण वर्षभरच जणू महिलादिन असल्यासारखी मोकळी हवा,मोकळा श्वास, मुलगी म्हणून कुठलिही दुय्यम दर्जाची वागणूक आपल्याला कधीच मिळाली नाही त्यामुळे माहेरी महिलादिन हा काही वेगळा साजरा करावा असे प्रकर्षाने कधीच वाटले नाही.

पुढे लग्न झालं. ति.आईंनी एका महिलेचं दुसऱ्या महिलेशी कसं सख्य असू शकतं हे आम्ही एकाच छताखाली तीस वर्षे म्हणजे मी त्यांच्याजवळ राहून शिकायला मिळालं,त्यामुळे वेगळा महिला दिन साजरा करायचा विचार खरतर मनात आलाच नाही.

“अहो”नी संसाराच्या वाटचालीत तो सुरळीत आणि व्यवस्थित चालविण्याचा कासरा मोठ्या विश्वासाने हाती निश्चींतपणे सोपविला. अर्थातच आपले स्वतः चे बाबा सोडून , मग अहोंपासून नंतरची पिढी “मेन वील बी मेन “असल्यासारखी तोंडाने कौतुक कधीच करणार नाही पण नजरेतील विश्वास कधीकधी त्याहीपेक्षा जास्त सांगून जातो. त्यामुळे ही नजरेतील पसंतीची पावती हाच माझा महिलादिन.

पुढे लेक मात्र नवीन पिढीप्रमाणे महिलादिन स्पेशल म्हणून फेसबुक वर पोस्ट टाकू लागला,पिझ्झा पार्टी घडवू लागला.आणि असं करतांना आईमुलातं मित्रमैत्रीणीचा मोकळेपणा कधी आणि कसा येतं गेला तेच कळलं नाही.पण जेव्हा व्यंकटेश अगदी लहानातल्या लहान गोष्टीपासून ते महत्वाच्या मोठ्या गोष्टींपर्यंत सगळ्यात आधी.,बेझिझक मला सांगू लागला तोच माझा महिलादिन ठरला.

पुढे नोकरीच्या ठिकाणी जेव्हा सहकारी वर्ग आपल्यावर कामाची जबाबदारी सोपवून ते काम निटनेटकं होऊनच पुर्णत्वाला मी नेणारच ही खात्री, विश्वास बाळगून निश्चींत होऊ लागला नं तोच माझा महिलादिन ठरला.

तसेच मित्रमैत्रीणी, जवळील लोकं, माझा रोजचा वाचक वर्ग हा माझ्यातील लेखणीला, माझ्या भावनांना, विचारांना, माझ्या सवयींना हा माझा पेक्षाही जास्त ओळखू लागला आणि माझ्यावर भरभरून प्रेम करु लागला तोच माझा महिलादिन ठरला.

असो बरेच वेळा सत्कारसमारंभ, बुके,फुलं आणि गिफ्ट ह्यांच्यापेक्षाही ही भावनांनी जोडलेली नाती बाजी मारुन जातात नं तेव्हाच खरा महिलादिन धुमधडाक्यात साजरा झाल्याचा फील येतो हे मात्र खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पळसफुलांचा शृंगार…” ☆ श्री हेमंत देशपांडे ☆

? विविधा ?

☆ “पळसफुलांचा शृंगार…”  ☆ श्री हेमंत देशपांडे ☆

संक्रांत संपून गेलेली असते.

दिवस तिळातिळाने वाढत असतो.  सबंध वातावरणात भरुन असलेली गोड-गोड गुलाबी थंडी आता विरळ होऊ लागलेली असते.  हिवाळाभर पसरुन राहिलेल्या शिशिर ऋतूचा सोहळा आणिक काही कालावधीनंतर संपून जाणार असतो.  आभाळभर पसरलेली शुभ्र धुक्याची वेल सूर्याच्या प्रखर दाहाने वितळायला लागलेली असते.  एखाद्या लोखंडी गोळ्याला उष्णता दिल्यावर तो जसा खदिरांगारासारखा दिसतो तशी अवस्था भास्कराच्या उष्णतेने येणार असते.  पण तशाही अवस्थेत तो आभाळगोल आपला उष्ण प्रवास निरंतर सुरु ठेवत असतो.

होळीचा सण हा शिशिरातला सण!  शिशिरात कसं मस्त-मस्त वातावरण असतं!  जंगलांनी पळसाचे लालसर केशरी रंग आपल्या अंगाला माखून घेतले असतात.  एखाद्या लावण्यवती प्रमदेनं मत्त शृंगार करुन आपल्या प्रियकराशी भेटायला आतुर व्हावं, तशी ती पळस झाडं आपल्याच फुलांचा शृंगार करुन हजार रंगांनी रंगोत्सुक होणाऱ्या होळीच्या सणाला भेटायला आतुर झालेली असतात, उत्सुक झालेली असतात.  रंगात रंग नि भांगेत भांग मिसळवून टाकण्याचा हा क्षण नि सण असतो.  आणिक सोबतीला शिशिरातलं हवंहवंसं, मिश्किलसं वातावरण खुलत असतं.

पळसफुलांचा रंग एकमेकांच्या अंगावर बरसवून आपण प्रेमाची देवाणघेवाण करत असतो.  आणिक जंगलात पळसाची झाडं आपल्या फुलांचा रंगमय शृंगार पाहून कृतकृत्य झालेली असतात.  झाडांच्या मनी दुःख असतं ते केवळ आपली फुलं खुडली गेली याचं.  फुलांना जन्म देणाऱ्या सर्वच झाडांचं तसं असतं.  एखाद्या नवसौभाग्यवतीच्या अंगावरचा दागिना हरविल्यावर तिनं व्याकुळ नजरेनं तो दागिना इतस्ततः शोधण्याचा प्रयत्न करावा, तशी ती फुलं खुडलेली झाडं करत असतात.  आपल्याच खुडल्या गेलेल्या फुलांना पुन्हा-पुन्हा शोधत असतात.  मला याचंच सगळ्यात जास्त दुःख होतं.  झाडांचं आणिक फुलांचं दुःख मी नाही पाहू शकत.  त्यापेक्षा हजार फुलांचे घाव आपल्यावर व्हावेत असं वाटू लागतं नि नेमकं तसं घडत नसतं.

आपली फुलं माणसांच्या हवाली करुन अश्रू ढाळणारं जंगल पाहायला एकदा मी धावतच जंगलात गेलो होतो.  आताशा नुकतीच कुठं शेंदरी रंगाची फुलं पळस झाडाला लागली असतील नसतील, पण ती लागतात नं लागतात तोच त्या फुलांवर ‘मानवी गिधाडं’ तुटून पडलीत, असा आर्त दुःखाचा भाव जंगलाच्या चेहऱ्यावर मी स्पष्टपणे वाचला.  आपल्या सभोवार फुललेल्या पळसफुलांची आरास माणसांनी विस्कटून टाकली म्हणून जंगल जणू रडत होतं नि जंगलाचं रडू पाहून मलाही रडू येत होतं.

माथ्यावरचा मार्तंड खूप तापला.  सर्वांगाला खूप चटके बसले.  मी भानावर आलो नि माझं रडू थांबलं.  मग मला सूर्याचा मनस्वी संताप आला.  वाटलं, हा आभाळगोल स्वतःला देव म्हणवतो ना!  पौषातल्या रविवारी आईच्या पूजेच्या ताटात हा सूर्य येऊन बसतो ना!  मग तरीही हा देव खोटा का?  खरा देव तर कृपाळू असतो.  साऱ्या पृथ्वीवर वैशाखवणवा पेटवून देणारा हा सूर्य म्हणजे एक महाराक्षस आहे.  जंगलातील फुलं माणसांनी तोडून नेल्याचं दुःख नि माझ्या प्रियतम जंगलावर आग ओकणाऱ्या सूर्याचा राग मनात मावेनासा झाला तेव्हा प्रेयसीच्या रसिल्या ओठांवर प्रियकरानं ओठ टेकावेत तसे आभाळाच्या ओठांवर सूर्याने आपले ओठ टेकवले नि हळूहळू सूर्य आकाशाच्या मिठीत विलीन झाला.

© श्री हेमंत देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गंगूताई हनगल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “गंगूताई हनगल…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

(पाच मार्च- जन्म दिनानिमित्त)

श्रीमंती म्हणजे नेमकं कायं ह्या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या त-हेने देऊ शकतील.मला विचारलं तर मी म्हणेन आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या व्यक्ती म्हणजे आपली श्रीमंती.आणि म्हणूनच आपला भारत देश हा मला वाटतं ह्या अर्थाने एक खूप जास्त श्रीमंत राष्ट्र असावं. 

ह्या अनुभवी,जेष्ठ मंडळींबद्दल तर आपल्या प्रत्येकाच्या मनात नितांत आदर हा असतोच. म्हातारं वयानं असणं आणि म्हातारपणं येणं ह्या दोन निरनिराळ्या संकल्पना आहेत हे ह्या निमीत्ताने मला नव्यानेच उमगलं.म्हातारपण येण्यात खरतरं वयाचा संबंध नसून त्या मनोवृत्तीचाच खरा संबंध असतो हे अगदी मनोमन पटलं.कित्येक वयानं वयस्कं झालेल्या लोकांमधील तरुणाईला सुद्धा लाजवेल अशी कामाची आवड,चपळता,हौस, सकात्मकता, एनर्जी बघायला मिळते तर कित्येक तरुण व्यक्तींमध्येही कित्येकदा कमालीची विरक्ती,आळस,कामाची नावड,नकारात्मकता, औदासिन्य बघायला मिळतं.अशावेळी खरचं कळतच नाही म्हातारपणं हे कोणत्या मापदंडाने मोजावं.ही म्हातारपणातील तरुणाई आणि तरुणाईतील म्हातारपणं बघितले की चटकनं ती चवनप्राश वाली जाहिरात आठवते, “सोला साल के बुढ्ढे ओर सौ सालके जवान”वाली जाहिरात.

5 मार्च.आज अशाच एका अगदी कापसासारख्या म्हाता-या होऊन गेलेल्या पण शेवटच्या श्वासापर्यंत तरुणाई टिकवून ठेवणा-या व्यक्तीची जयंती. ही व्यक्ती संगीत क्षेत्रातील असून हे क्षेत्र प्रिय असणाऱ्या व्यक्तींसाठी तर ह्या दैवतच.ह्या व्यक्ती म्हणजे हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका गंगूताई हनगळ.

ह्यांचा जन्म 5 मार्च 1913 ला धारवाड येथे झाला. संगीताचे प्राथमिक धडे ह्यांनी दहाव्या वर्षी स्वतःच्या आईकडून घेण्यास सुरवात केली आणि वयाच्या अकराव्या वर्षी 1924 साली बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधी,नेहरुजी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनीदेवी नायडू ह्यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गाऊन वाहवा मिळविली. काही काळ त्या कथ्थक नृत्य शिकल्या.मग 1938 पासून सवाई गंधर्व म्हणजेच रामचंद्र कुंदगोळकरांकडे किराणा घराण्याची गायकी पंधरा वर्षे साधना करून प्राप्त केली. त्यांना भिमसेनजी जोशी ह्यांचीही संगत लाभली.

सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह हुबळी येथील वकील व्यावसायिक गुरुराज कौलगी ह्यांच्याशी झाला. कौलगींना संगीताची जात्याचं खूप आवड असल्याने ग़गूताईंची संगीतसाधना ही शेवटपर्यंत टिकली,जोपासल्या गेली. त्यांचे संगीतसाधनेतील कारकीर्द आणि लोकप्रियतेचे टप्पे बघितले की खरचं अचंबीत व्हायला होतं. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांची सुरवात 1931मध्ये

त्यांची एच.एम.व्ही.कडून गाण्याची पहिली तबकडी 1932 मध्ये तर आकाशवाणी वर पहिला कार्यक्रम 1933 मध्ये झाला.

कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा ध्यास असला तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती कितीही आणि कोणतेही अडथळे पार करु शकते.फक्त इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा गंगूताई आपल्या संगीतसाधनेच्या जोरावर धारवाड विद्यापीठाच्या मानद संगीत प्राध्यापक झाल्यात.त्यांनी परदेशात अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत.संगीताच्या कार्यक्रमांमुळे त्या अमेरिका, इंग्लंड, कँनडा, नेपाळ,नेदरलँड, पाकिस्तान, जर्मनी, फ्रान्स व बांगलादेश इ.ठिकाणी जाहीर कार्यक्रम करण्यासाठी गेल्या.

भारतसरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण ह्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरविले.त्यांना पन्नास पेक्षाही जास्त मानाचे पुरस्कार मिळालेत.त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी शाळा,महाविद्यालयातून सुमारे 200 जाहीर कार्यक्रम केलेत.त्यांना गानरत्न, गानसरस्वती,रागरागेश्वरी ह्या सारख्या उपाध्या मिळाल्यात.हुबळीमधील त्यांचे “गंगालहरी” नावाचे घर सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.हुबळीला सुमारे पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल उभारण्यात आले.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगूताईंनी त्यांचा तब्बल दीड तास चाललेला शेवटचा जाहीर गाण्याचा कार्यक्रम वयाच्या अवघ्या 89 व्या वर्षी दणदणीत पार पाडला. वयाच्या 96 व्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेवटचे गायन केले.त्या दिवशी त्या दहा मिनीटे सलग गायल्या.खरचं आहे नं हा तरुणाईला लाजवणारा उत्साह, मेहनत, साधना अशा ह्या थोर,अख्ख आयुष्य संगीतसाधनेला वाहून घेणाऱ्या गंगूताई हनगळांनी 21 जुलै 2009 रोजी अखेरचा श्वास घेतला.खरचं अशा थोर विभुती बघितल्या की नतमस्तक व्हायला होतं हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या !’ ☆ श्री पार्थ बावीसकर ☆

?  विविधा ?

☆ ‘स्त्री’ला धैर्यमूर्ती मानणारे तात्या !’ ☆ श्री पार्थ बावीसकर ☆

(आजची स्त्री कशी असावी ? याबद्दल सावरकरांच्या दृष्टीकोनातून हिंदुस्थान पोस्टला लिहिलेला लेख !)

….विनायकाची आई तो लहान असतानाच देवाघरी गेली, आईनंतर आईच्याच मायेने येसूवाहिनीने त्यांच्यावर प्रेम केलं, सावरकर कुटुंब एकत्र होऊन वाढलं, आणि देशासाठी लढलं सुद्धा ! विनायकराव परदेशात असतांना इकडे भारतात त्यांच्या दोन्ही बंधूंना अटक झाली, घरावर जप्ती आली आणि सावरकर कुटुंबातील दोन्ही स्त्रिया उघड्यावर पडल्या…अशा अवस्थेत आपल्या परमप्रिय वहिनीला लिहिलेल्या पत्रात विनायकराव म्हणतात,

तू धैर्याची अससी मूर्ती | माझे वहिनी, माझे स्फूर्ती

रामसेवाव्रतांची पूर्ती | ब्रीद तुझे आधीच

“सांत्वन” नावाचं हे सावरकरी काव्य ! इतकी उलथापालथ घडूनही, आभालाहून मोठं संकट येऊनही आपली वहिनी, आपली बायको, खंबीरपणे सगळ्यावर मात करेल हा त्या स्त्रीवर दाखवलेला विश्वास, विनायकरावांचा एक निराळा पैलू आपल्यासमोर आणतो. पुरुष संकटात असला तर स्त्रीने पुढे होऊन पुरुषालाही बळ द्यावे आणि स्वत: जबाबदारीने संकटाशी सामना करावा असेच तात्या सुचवतात, होय ना !

विनायक जिथे वाढला तो भाग आणि तो काळ एका संकुचित, रूढीग्रस्त मानसिकतेत जगणारा. रांधण्यात आणि वाढण्यात जन्म घालवावा बायकांनी, बाकी रमूच नये कशात अशीच तेंव्हाची रीत. पण चूल आणि मुल वाट्याला येण्याआधीच ज्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण दुर्दैवाने ओढून नेले अशांचे अभाग्यांचे काय ? अशांच्या भाळी लिहिल्या होत्या अबोल यातना फक्त ! या निष्पाप स्त्रियांच्या वेदनांना शब्दरूप दिलय विनायकाने. बालविधवांचे दु;खस्थिती कथन हे विनयकाचे काव्य अशा अनेक मूक प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. “ही विवाहव्यवस्था आहे ही वैधव्यव्यवस्था” असा करडा सवाल विनायकराव करतात तो उगाच नाही, स्त्रीने सती जाणे हे धर्माला मान्य नाहीच शिवाय ते माणुसकीलाही लाज आणणारे आहे असं विनायकराव सप्रमाण पटवून देतात हे विशेष !

गुलामगिरी मान्यच नव्हती तात्यांना ! माझी भारतमाता जशी पारतंत्र्यात राहू नये, तिची गुलामगिरी संपावी तशीच आजची स्त्रीसुद्धा मुक्त व्हावी, मुक्तपणे तिने करावा संचार या मताचे होते तात्या ! “राज्याची सूत्र हातीघे तो तो पुरुष थोर आहेच, पण पाळण्याची दोरी जीच्या हाती ती स्त्री काही कमी थोर नव्हे !’’ असं म्हणत सहजीवनाचा केवढा आदर्श सांगितलाय तात्यांनी !

“स्त्रीने तेवढे लग्न होईतो अखंड कौमार्य असले पाहिजे, पुरुषाने कसेही असले तरी हरकत नाही ही जुनाट नितीमत्ता पक्षपाती नि टाकाऊ आहे” हे तात्यांचे वाक्य वाचले की वाटते हा माणूस वैचारिक दृष्ट्‍या सगळ्या समकालीन नेत्यांच्या किती पुढे गेला असेल, किती प्रगल्भ असेल.

हा माणूस सौंदर्याचा उपासक होता. जे जे उत्तम उदात्त उन्नत्त महन्मधुर त्याचा ध्यास घेतलेला होता. जीवनात कुठल्याही बाबतीत कुरूपता याला नकोच होती. आपल्या दूरस्थ वहिनी आणि पत्नीला “नवकुसुमयुता” असं लोभसपणाने म्हणणारे विनायकराव समस्त स्त्रीवर्गाला  सांगतात…“…लावण्यवती कुमारीनो, जननिंनो, तुम्हाला जन्मतःच निसर्गाने दिलेल्या ह्या दैवी देणगीला, तुमच्या सौंदर्याला आपल्या पूर्वपुण्याईचं वरदान माना आणि ते सौंदर्य जपा ! हल्लीच्या आधुनिक काळात, सौंदर्य प्रसाधने वापरा, खुलून दिसा !” …विनायकराव हा विचार अशा काळात सांगत होते जिथे त्यांचे हे शब्द ऐकून बायका गालातल्या गालात, खुदकन् हसून लाजेने चूर होण्याचीच शक्यताच जास्त होती, पण आजच्या बायका तात्यांचा हा सल्ला खुबीने राखताहेत खऱ्या…!

एके ठिकाणी मॅझिनीच्या विचाराचा संदर्भ देतांना विनायकराव म्हणालेत, “पुढील शतकात स्त्रीजाती आपले राजकीय हक्क स्थापित केल्यावाचून राहणार नाहीत.” हा विचार देऊन आताशा पन्नास वर्ष उलटूनही गेली असावीत. तात्यांच्या कल्पनेतली शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री निर्माण होतांना फार वर्ष लागलेले नाहीत. अवघ्या एका शतकाच्या आत त्यांचे शब्द खरे ठरलेत. आज घराघरात, आणि घराबाहेरही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाई मोठ्या अभिमानाने उभी आहे, संकटे झेलते आहे, वादळ पेलते आहे, आणि लढते आहे.

तिच्या प्रत्येक भरारीसोबत एक नवं आव्हान तिच्यासमोर उभ आहे. बलात्कार, जाळपोळ, मारहाण, हिंसाचार ह्या दृश्य घटना झाल्या, पण अश्या कित्येक अदृश्य घटना अजून समोर आलेल्यासुधा नाहीत. या मुक्या वेदना समोर येतील तेंव्हा काय होईल ? कोणते नवे प्रश्न उभे रहातील ? यापैकी अगदी सगळ्याच नाही पण यातल्या काही प्रश्नांची उत्तरे या “सावरकरी” विचारातून मिळोत, अशी अशा करायला काय हरकत आहे !

© श्री पार्थ बावसकर

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘थालीपीठ’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ ‘थालीपीठ’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये सर्वांच्या आवडीचा, खमंग,चटकदार आणि प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात अगदी मानाने विराजमान झालेला  पदार्थ म्हणजे ‘थालीपीठ’. इतकचं काय तर हाँटेल,टपरी,अगदी पंचतारांकित हाँटेल मध्ये सुध्दा हे थालीपीठ स्पेशल डिश म्हणून आपल्यासमोर येते.नुसत नाव जरी घेतल तरी तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ.थालीपीठ कुणाला आवडत नाही असा माणूसच विरळा.अगदी राजेशाही थाटापासून ते झोपडीपर्यंत आणि आयत्या वेळी पटकन करुन खाण्याजोगा हा पदार्थ. संध्याकाळच्या वेळी संपुर्ण स्वैपाकाचा कंटाळा आला तर ” चला,चार थालीपीठ लावते ” असे म्हणून वेळ मारुन नेणारा ग्रुहिणींचा पक्का दोस्त.

पण तरीसुध्दा ही इतकीच महती नाही बरं का या थालीपिठाची कारण साग्रसंगीत, व्यवस्थित डावं,उजवं सोबत घेऊन पानात येणारा हा खमंग, चविष्ट पदार्थ आहे.त्यामुळेच तो सर्वांच्या आवडीचा आहे.

मंडळी,अहो पुराणातही या थालीपीठाचा उल्लेख आढळतो बरं का.यमुनेच्या तीरावर क्रुष्णाच्या सवंगड्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करुन केलेल्या काल्यामध्ये या थालीपीठाचाही समावेश होता.क्रुष्णासह सारे सवंगडी याचा आस्वाद घेत होते तेव्हा क्रुष्णाच्या पानात आलेला पेंद्याच्या घरचा थालीपीठाचा तुकडा अगदी आवडीने,चवीने क्रुष्णाने खाल्ला होता म्हणे.

पु. ल. देशपांडे यांच्या ‘ असा मी असामी ‘ या पुस्तकात पु. ल.म्हणतात  ” संसारातील रोजच्या कटकटींना कंटाळून कधी कधी संसार सोडून जावेसे वाटते पण त्याच दिवशी सौ. ने कांद्याचे थालीपीठ केलेले असते. “पहा मंडळी, एका मोडणाऱ्या संसाराला वाचवायचं काम हे थालीपीठ करतं अस म्हणता येईल. तर, ‘जाऊबाई जोरात’ या नाटकामध्ये महिलांच्या बसमध्ये दरोडेखोर येतात आणि सामानाची झडती घेताना त्याच्या हाती एक डबा लागतो तेव्हा त्यातील पदार्थाच्या वासाने तो मोहून जातो आणि यात काय आहे असे एका महिलेला विचारतो. तेव्हा त्यात थालीपीठ आहे असे सांगितल्यावर म्हणजे काय असे तो विचारतो त्यावेळी त्या थालीपीठाच्या रेसिपीचे वर्णन त्या नायिकेने (निर्मिती सावंत) इतके अफलातून केले आहे कि बस्.

म्हणजे पुराणापासून चालत आलेल हा पदार्थ आजही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अढळ स्थान मिळवून आहे.

आता हे थालीपीठ बनते कसे? तर ज्वारी,बाजरी,गहू,चणाडाळ, तांदूळ या धान्याच्या एकत्रीकरण केलेल्या पीठापासून.अगदी खास पध्दतीने करायचे असेल तर ही धान्ये भाजून घेऊन त्याचे पीठ करुन त्यात कांदा,मिरची,कोथिंबीर, हळद,हिंग,तीळ,जीरे,मीठ असे सर्व साहित्य घालून मळून पोळपाटावर पातळ फडक्यावर भाकरीसारखे थापून तव्यावर तेल सोडून खमंगपणे दोन्ही बाजू भाजून घेतल्या जातात.अशा पध्दतीने थालीपीठ बनवताना आपल्या आवडीनुसार यात काही भाज्यासुध्दा घातल्या जातात.

घरी, प्रवासात, डबापार्टी, भिशीपार्टी, डोहाळजेवण असा कुठेही चालणारा आणि चवीने खाल्ला जाणारा हा पदार्थ. पंजाबी,चायनीज,गुजराती,बंगाली, इटालियन अशा विविध पदार्थांची कितीही रेलचेल असली तरी लोणी,दही,लसणाची चटणी,लोणचं असं सार सोबत घेऊन ताटात येणारे हे थालीपीठ म्हणजे सर्वांची आवडती महाराष्ट्रीयन परिपुर्ण थाळीच. महाराष्ट्रात  श्रावणात,नागपंचमीच्या आदल्या दिवशी असे थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.ग्रामीण भागात याला ‘ धपाटे ‘असेही म्हणतात.म्हणजे तसं तर  धपाटे हा थालीपीठाचा जुळा भाऊ म्हटलं तरी वावग ठरणार नाही. म्हणजे सणावारीसुध्दा थालीपीठ बनविण्याची पध्दत आहे.अगदी नवरात्रीच्या नवू दिवसांच्या उपवासातही बदल म्हणून शाबूदाणा,वरी,बटाटा यापासून थालीपीठ बनविले जाते.

मंडळी,भारतीय खाद्यसंस्कृती अनेकविध पदार्थांनी परिपुर्ण तर आहेच पण या थालीपीठाचीसुध्दा चांगलीच महती आहे म्हणूनच अलिकडे गावागावातील प्रत्येक खाऊगल्लीमध्ये भेळ,आईस्क्रीम, पिझ्झा,बर्गरच्या जोडीला दही,खर्डा थालीपीठाच्याडिशने मानाचे स्थान मिळवले आहे.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

आपण भारतीय लोक उत्सव प्रेमी लोक. भारत संस्कृती प्रधान देश. कृषी प्रधान देश. आपल्या संस्कृतीत सणांना खूपच महत्त्व आहे. सर्व सण हे पर्यावरणावर आधारित असेच आहेत. फाल्गुन हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना. शेतकऱ्यांचा थोडा निवांतपणाचा काळ. सृष्टीमध्ये नवनवीन रंग घेऊन येणाऱ्या, वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत आणि थंडीला निरोप असा हा सण  म्हणजे होळी.

हा सण फाल्गुनी पौर्णिमेला साजरा केला जातो. काही ठिकाणी तो दोन दिवस , तीन दिवस तसेच पाच दिवसही साजरा करतात. पौर्णिमेच्या दिवशी ‘ होळी ‘ दुसरे दिवशी धुळवड, आणि पाचवे दिवशी रंगपंचमी असा साजरा करण्याची प्रथा आहे. ‘होलीका ‘  या नावावरून ‘,होळी’ हे नाव या सणाला पडले आहे .आपल्या देशाच्या उत्तर भागात ‘ होरी ‘ किंवा  ‘दोलायात्रा ‘असेही म्हणतात. गोवा, महाराष्ट्रात कोकणात ‘ शिमगा ‘ ‘हुताशनी ‘ ‘होलिका दहन ‘ ‘ फाल्गुनोत्सव ‘ वसंतोत्सव  तसेच दक्षिणेत काम दहन असेही म्हणतात.

पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाणले होते .त्यानंतर त्यांनी रंग रूपाने पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे हाही या उत्सवा मागील हेतू आहे. आणखीही अशी कथा सांगितली जाते की ,लहान मुलांना  पीडा देणाऱ्या ‘ होलिका ‘, किंवा  ‘होलाका ‘   ‘ढुंढा’, ‘ पूतना,’ यासारख्या राक्षसींच्या प्रतिकांचे होळी पेटवून दहन केले जाते.

त्याचबरोबर आणखीही अशी कथा सांगतात की ,हिरण्यकश्यपू या अहंकारी राजाचा प्रल्हाद हा मुलगा नारायणाचा भक्त होता. राजाला नारायणाचे नाव घेतलेले पसंत नव्हते. अनेक प्रकारे तो प्रल्हादाला घाबरवत होता. जेणेकरून त्याने नारायणाची भक्ती सोडून द्यावी .राजाने आपली बहीण ‘होलीका ‘ हिच्याकरवी एक योजना आखली. ‘ होलीकेला’ अग्नीवर विजय मिळविण्याचे वरदान मिळाले होते .त्यामुळे होलीकेला राजाने सांगितले की, तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बैस . त्याप्रमाणे ती  प्रल्हादाला घेऊन चितेवर बसली. प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात लीन झाला होता .इतक्यात होलिका जळायला लागली. आकाशवाणी झाली . तिला वरदानात असं सांगितलं होतं की, तिच्या वरदानाचा तिने दुरुपयोग केला तर , ती स्वतः जळून जाईल. त्याप्रमाणे ती स्वतः भस्मसात झाली .आणि प्रल्हादाला काहीच झालं नाही .सृष्टीचा दृष्टांवर होणाऱ्या  विजयाचे प्रतीक म्हणून ही होळी .

होळी प्रज्वलित करताना, रचनेच्या मध्यभागी खोड उभे केले जाते . त्याला ‘माड ‘ असे म्हणतात. .त्याच्याभोवती इतर लाकडे रचली जातात. होळी प्रज्वलित करताना कर्त्याने शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. “सहकुटुंबस्य मम  ढुंढा राक्षसी प्रित्यर्थं  तत्पीडा परिहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये” असा मंत्र म्हणून, समिधा वाहून होळी पेटवितात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. आणि नारळ अर्पण करतात. फाल्गुन पौर्णिमेला ‘पूर्वा फाल्गुनी ‘ नक्षत्र येते. त्या नक्षत्राची ‘भग ‘ ही देवता आहे. महाराष्ट्रात भगाच्या नावाने बोंबा मारत होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. यामागचे मानसशास्त्रीय कारणही आहे .मनात जे किल्मिष, द्वेष, राग ,चीड ,असे शड्ररिपू  बाहेर पडून जावेत. मन स्वच्छ  हॅलो अँड एमटी असे व्हावे . मनातले अमंगल अशुभ होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे. आणि चांगल्या शुभ, मंगल अशा गोष्टींचा स्वीकार करायचा हा संदेश होळीचा आहे. होळी शांत झाली की दूध आणि तूप शिंपडून शांत केली जाते.

उत्तर भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात .इंदूर शहरात वेगळी पद्धत आणि एक  शान असते .या दिवशी शहरातील सर्व लोक राजवाड्याजवळ एकत्र येऊन होळी साजरी करतात. हा सण सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात असला तरी, ब्रजप्रदेशातील श्रीकृष्णाच्या मथुरा , वृंदावन ,बरसाना ,नंदगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ते पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. रात्री नृत्य गायनाचा कार्यक्रम करून करमणूक  केली जाते .इंग्रजीत या सणाला ” होली फेस्टिवल ऑफ कलर्स ” असे म्हणतात. वजीराला होळी दिवशी पुरुष– महिला  एकमेकांना रंग लावतात. आणि महिला पुरुषांना काठीने मारतात . ही प्रथा पाहण्यासाठी लोक मुद्दाम  व्रजयान या ठिकाणी जातात. आपण टीव्हीवरही प्रथा पाहतो.पहाताना गंमत वाटते.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला ‘ ‘धुळवड’, असे म्हटले जाते. या दिवशी, आदल्या दिवशीच्या होळीच्या रक्षेची म्हणजे धुळीची पूजा करून ,रक्षेची प्रार्थना करतात. ” वंदितासि  सुरेंद्रेण ब्रम्हणा शंगकरेणच ।

अतस्तं  पाहिनो देवी भूतो भूतिप्रदा भव ।। हे देवी धुली, तू ब्रम्हा, विष्णू ,महेशानी  वंदित आहेस. म्हणून तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो. आणि आमचे रक्षण कर. असे म्हणून ती रक्षा, शेण, आणि चिखल असे पदार्थ अंगाला लावून नृत्य गायनही करतात. आयुर्वेदात मडथेरपी अशाच पद्धतीची असावी.

फाल्गुन वध पंचमीचा दिवस म्हणजे ” रंगपंचमी “.महाराष्ट्रात किंवा इतरही ठिकाणी ग्रुप करून, एकमेकांच्या घरी जाऊन, रंग आणि गुलाल लावण्याची किंवा उडवण्याची प्रथा आहे.  ” “बुरा मत मानो,  होली है।असं म्हणतात. पूर्वीच्या काळी केशराचे आणि नैसर्गिक रंग उडवून आनंद लुटत असत .रासायनिक रंग उडवणे म्हणजे प्रकृती बिघडवून घेणे होय.

आता होळी साजरी करत असताना, आपणही मनातील किल्मिष, एकमेकांबद्दल वाटणारा राग सोडून देऊन नवीन वर्ष रंगा रंगात  न्हाऊन जाऊन एकमेकात आदर आणि प्रेम प्रस्थापित करूया. होळीला नमस्कार करून आशीर्वाद घेऊ या.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print