मराठी साहित्य – विविधा ☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
सौ.वनिता संभाजी जांगळे
विविधा
☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
आपले मन काय विचार करते याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. तसे पाहता मन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जे दिसत नाही पण अस्तित्वात आहे ते आपले मन. आपल्या मनात सतत विचारांचा कल्लोळ चालूच असतो. मग हे विचार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात. आपल्यात तयार होणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही मनातूनच उगम पावत असते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी आपणास प्रथम आपल्या मनाची तयारी ठेवावी लागते. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यास प्रयत्नासोबत आपल्या मनाची भक्कम साथ हवी असते. लोक नकळतपणे बोलतात.. बघा .. " मनात आले तर करेन, नाहीतर नाही करणार "
आपले मन काय विचार करते याच्यावर आपले वागणे अवलंबून असते. मनात येणाऱ्या बऱ्या-वाईट विचारांवर आपली वर्तणुक ठरत असते. पण आपल्या मनास वाईट कृत्यांपासून परावृत्त करणे हे आपल्याच हातात असते. मन जर वाईट मार्गाने धावत असेल तर त्याला लगाम घालण्याचेही आपल्याच हाती असते. अर्थात अस्तित्वात नाही पण आपणासी संलग्न आहे अशा मनाचे दोर हे आपल्याच हाती असतात. आपणास जर स्वतःचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत असे प्रभावी घडवायचे असेल...