मराठी साहित्य – विविधा ☆ देव,अल्ला,गाॅड वगैरे… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ देव,अल्ला,गाॅड वगैरे… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

मानवी जीवनाची कूस बदलवून टाकणारा तो शब्द …अवघ्या चारपाचशे वर्षात पृथ्वीच्या रंगमंचावर दाखल झाला आणि बघता बघता संपूर्ण मानवी आयुष्य व्यापून टाकले. तो शब्द केवळ शब्द नसून मानवी जीवनाची गुरुकिल्ली म्हणावी इतपत तो महत्त्वाचा बनला आहे. त्या शब्दाचे फायदे अगणित आहेत आणि काही तोटे देखील आहेत.   हा शब्द मानवी जीवनात तंत्रज्ञान म्हणून सत्ता गाजवतो मात्र या शब्दाला मानवी जीवनात जेव्हा “मुल्यात्मक” वजन प्राप्त होईल तेव्हा मानवी जीवनाचा संपूर्ण हितवर्धक कायापालट होईल याची नक्कीच खात्री देता येते. संपूर्ण जगाला खेडे बनवण्याची किमया याच शब्दाच्या प्रभावाने घडवून आणली आणि दुसऱ्या टोकावर संपूर्ण जगाचा विनाश करण्याची ताकद देखील याच शब्दाच्या विकृत वापराने मनुष्याच्या वाट्याला आली आहे.हा शब्द आणि त्याच्या योग्य जाणीवा समजून घेऊन मानवी जीवन फुलवले पाहिजे .

विज्ञान …..एक जादुई शब्द आहे. जादुई याकरिता म्हटले की, जादूची कांडी फिरवल्याचा जो परिणाम कल्पनेत दिसून येतो त्याहून अधिक जादुई परिणाम या शब्दाच्या वापराने मानवी सृष्टीत झाला आहे. अवघ्या चारपाचशे वर्षापूर्वी विज्ञान सर्वार्थाने मानवी नजरेत भरले आणि जगाचे स्वरूप आरपार बदलले. मनुष्याच्या प्रगतीच्या वाटा विज्ञानानेच मोकळ्या केल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याची कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणून दाखवली. तंत्रज्ञान ही विज्ञानरुपी नाण्याची एक बाजू आहे. या बाजूने आता मानवी जीवनाचा कोपरा न् कोपरा व्यापलेला आहे. मनुष्याने या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाचा अतोनात फायदा उपटला आहे. याचबरोबर या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाची घातक बाजू म्हणून अण्वस्त्ररुपी विनाशकी हत्यारे निर्माण झाली आणि पृथ्वी विनाशाच्या टोकावर उभी राहीली हे देखील काळे सत्य आहे. विज्ञानाची सृष्टी जेवढी मोहक आहे , उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व बहुपयोगी आहे विज्ञानाची दृष्टी. ही दृष्टी मानवी वर्तनात व्यवहारात आली की … अंधश्रध्दा, कर्मकांडे, धर्मांधता, जातीयता , भयता , प्रांतीयता , वंशवादता , अलैंगिकता अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. विज्ञानाची दृष्टी म्हणजे विज्ञानाला ” मुल्यात्मक जाणीवेने ” मानवी जीवनात प्रतिष्ठीत करणे. विज्ञानाची नेमकी जाणीव म्हणजे विज्ञान तुमच्या मनांत असंख्य प्रश्न उभे करते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मार्ग देखील ” वैज्ञानिक दृष्टिकोन ” ठेवून मिळवता येतो ही सकारात्मक विधायक भावना रुजवते. विज्ञानाची नेमकी जाणीव हीच की , मनुष्याचे पृथ्वीवरील क्षुद्रत्व समोर ठेवते आणि पुन्हा मनुष्याच्या बुध्दीला उत्तेजना देऊन त्याचे प्राणी सृष्टीहूनचे अधिकचे महत्त्व ठळकपणे समोर आणते. विज्ञानाची जाणीव म्हणजे जादूची कांडी फिरवायला देखील योग्य ध्यास व ध्येय असावे ही भावना प्रबळ करून मनुष्यच पृथ्वी जगवू शकतो असा ठाम आत्मविश्वास मानवी मनांत निर्माण करते. विज्ञानाची ठळक जाणीव म्हणजे जोवर विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तोवरच माणसाला शक्तीशाली बनण्याची संधी आहे , आव्हान आहे  आणि त्याचबरोबर समस्त सृष्टीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे भानं देखील उपलब्ध आहे. विज्ञान हा शब्द वगळून मानवी जीवनाचा भूतकाळ नाही …वर्तमानकाळ नाही …अन् भविष्यकाळ अजिबात नाही.

विज्ञानाचा नैतिक दबदबा इतका की, धर्म नावाच्या संघटीत क्षेत्राला बाजूला करण्याची हिंमत बाळगून आहे. धर्माला योग्य पर्याय म्हणून विज्ञानवादी असणे ही एक वैचारिक भुमिका मांडली जात आहे. विज्ञानाएवढा ताकदीचा आणि संपूर्ण मानवी समाज व्यापणारा दुसरा शब्दच उपलब्ध नाही . विज्ञानाची ही किमया अफाट आहे, जादूई आहे, प्रगतीशील आहे. फक्त जाणीव हीच राखली पाहिजे की, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच विज्ञानाची दृष्टी मानवी समाजात अधिक फैलावली पाहिजे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मार्च…महिना परिक्षेचा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मार्च…महिना परिक्षेचा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मार्च महिना हा सगळ्यांसाठीच धावपळीचा, दगदगीचा आणि आव्हानाचा सुद्धा. शिक्षणक्षेत्र आर्थिक क्षेत्र,आणि मुख्य म्हणजे गृहीणी ह्यांच्या साठी तर हा महिना खूप जास्त महत्वाचा.

कँलेंडरवर नजर टाकली तर हा महिना खूप सुट्ट्यांचा दिसतो मात्र खासियत अशी की पेंडींग कामे,टारगेट्स ह्यामुळे ह्या सुट्ट्या नुसत्या दिसायलाच कँलेंडरच्या बाँक्समध्ये विराजमान असतात. कामाच्या रामरगाड्यामुळे एक तर ह्या सुट्ट्या अर्जत नाहीत आणि चुकून मिळाल्यातरी महत्वाची कामे सतत नजरेसमोर येत असल्याने त्या सुट्ट्यांमध्ये घरी मन रमत नाही वा सुट्ट्यांचा मनमुराद आनंदही उपभोगता येत नाही. सुट्ट्या मिळाल्या तरी हे माहिती असतं साठवून ठेवलेली कामे आपल्यालाच करायची असल्याने ही सगळी कामे नजरेसमोर फेर धरून नाचतात आणि त्यामुळे जीवाची तगमग ही होतेच. गृहीणींच्या भाषेत बोलायचं तर नजरेसमोर असतो धुणी, भांडी ह्यांचा घासायला,धुवायला असणारा ढिगारा आणि नेमकं टाकीतील पाण्याचा साठा संपून गेल्यावर जणू “जल बीन मछली “सारखी तगमगती अस्वस्थता.

हा मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी,शिक्षक प्राध्यापक मंडळींसाठी,  शिक्षणमंडळ आणि विद्यापीठ ह्यामध्ये काम करणा-यांसाठी खूप ताणाचा, कामांचा असतो.

हा महिना राजकारणी मंडळींसाठी पण खूप महत्त्वाचा असतो.कित्येक दिवस खूप अभ्यास करुन मेहनतीनं सत्तेवर असणाऱ्या पक्षाला खर्चाचा ताळमेळ बसवत अंदाजपत्रक सादर करावं लागतं. राज्याच्या ,देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी बसविणं किती कठीण कामं असतं नं.आपल्याला साधं आपल्या घरातील जमाखर्च आणि अंदाजपत्रकाचा ताळमेळ बसवितांना सगळे देव आठवतात. हे तर पूर्ण राज्याचे, देशाचे कामं आणि इतकही करुन कौतुक वाट्याला येत नाही ते नाहीच. विरोधी पक्ष कुठलाही असो तो पक्ष त्यातील फक्त त्रुटी,कमतरता तेवढ्या शोधीत राहणार. माझ्या बघण्यात अजून एकदाही असा प्रसंग आला नाही ज्यामध्ये विरोधी पक्ष हा सत्तेवर असणाऱ्या मंडळींचे कौतुक करतोयं. असो

जणू मार्च महिना हा सगळ्यांची परीक्षा घेण्यासाठीच तयार झालेला महिना असावा. विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभराच्या केलेल्या कष्टांचे, श्रमाचे मुल्यमापन ह्याच काळात होतं जणू. बँकर्स, सी.ए.,आँडीटर्स, कर भरणारी जनता ह्यांची तर अक्षरशः “निंद हराम” करणारा हा महिना. टारगेट्स पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या साठीचा हा कालावधी.

मार्च महिना हा गृहीणींसाठी पण खूप धावपळीचा आणि दगदगीचा महिना असतो. ह्या महिन्यात धान्य विकत घेऊन, त्याला ऊन दाखवून मग त्यावर कीडनाशक कडूलिंबाचा पाला टाकून ते धान्य साठवणूक म्हणून कोठ्यांमध्ये ठेवण्याचे महत्त्वाचे काम गृहीणींचे असते. त्याचबरोबर वर्षभर बेगमी म्हणून साठा करण्याचे पदार्थ उदा.पापड,कुरडई, लोणची, शेवया,वेफर्स आणि असे अनेक पदार्थ करण्याचं गृहीणींच्या कामाची सुरवात मार्चपासूनच होते.

नुकतीच थंडी गायब होऊन उन्हाळ्याला सुरवात झालेली असते.त्यामुळे ह्या हवामाना मधील बदलांमुळे सगळ्यांना आपल्या तब्येतीची काळजी ही घ्यावीच लागते. तरीही व्हायरल इन्फेक्शन हे हात धुवून मागे लागण्या मुळे डाँक्टर्स आणि पेशंट ह्यांच्यासाठी सुद्धा गर्दीचा काळ.पण खरी परीक्षा ही तब्येतीने धडधाकट असणाऱ्या आपल्या घरच्या मंडळींची असते.

हे आर्थिक वर्ष, आपणा सर्वांना भरभराटीचे जावो ,आरोग्य व्यवस्थित राहो हीच ईशचरणी प्रार्थना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझा (शालेय) इतिहास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माझा (शालेय) इतिहास…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

माझा (शालेय) इतिहास…

माझा इतिहास असायचे कारण नाही. तो भूतकाळ आहे. पण इतिहास म्हटले की वजन येते. त्यामुळे हा कालखंड म्हणजे माझा इतिहास.

(माझ्या मतानुसार चांगल्या परिस्थितीत चांगले काम करणाऱ्यांचे नांव होते, तर विपरीत परिस्थितीत चांगले करणारा इतिहास घडवतो. माझे नांव पण नाही, मी इतिहास देखील घडवला नाही. पण फक्त इतिहास म्हटले की वजन येते म्हणून शालेय इतिहास इतकेच.)

इतिहास म्हटले की व्यक्ती, लढाई, संघर्ष, हुकूमशाही, बंड, अन्याय, अत्याचार असेच आणि बरेच डोळ्यासमोर येते.

माझ्या शालेय इतिहासात असे खूप काही नाही. माझ्यावर अन्याय झाला नाही. मी बंड देखील केले नाही. किंवा मशाली आणि पलित्याखाली (रस्त्यावरच्या दिव्याखाली) अभ्यास देखील केला नाही.

पण लढाई, संघर्ष, आणि पालक व शिक्षकांची संयुक्त  हुकूमशाही काही प्रमाणात होती. माझ्या लोकशाहीची काहीप्रमाणात मुस्कटदाबी झाली होती. मुस्कटदाबी यासाठी की मी काय शिकावे यांचे स्वातंत्र्य मला नव्हते. युती, आघाडी असे शब्द मला तेव्हा माहीत नव्हते. किंवा समजले नव्हते. नाही तर पालक, शिक्षक, संस्थाचालक यांची आघाडी असे म्हटले असते किंवा माझी आणि इंग्रजीची युती भल्या पहाटे Good morning बरोबर (शपथ घेऊन) सुरू झाली, आणि Good night बरोबरच (राजीनामा देत) अवघ्या काही दिवसांत किंवा तासांतच तुटली, संपुष्टात असे सांगितले असते. ही युती तुटण्यासाठी कुठलीही (घड्याळाची) वेळ कारणीभूत नव्हती, किंवा कोणाचाही हात त्यात नव्हता. पण शपथ घेतांना आणि राजीनामा देतांना धनुष्यातून बाण सुटला,  अथवा सोडला होता हे नक्की. (बाण सुटला की परत घेता येत नाही, दुसराच घ्यावा लागतो.)

इतिहासात आक्रमणं झालीत. तशी माझ्या शालेय जीवनात आक्रमणे होती. (याला परिक्षा म्हणत असत.) पण ही समजण्यासाठी मला हेर ठेवायची गरज नव्हती. आक्रमणे गनिमी कावा किंवा मी बेसावध असताना झाली नव्हती.

या आक्रमणाची (परीक्षांची) रितसर सूचना यायची. सूचना अगदी शके XXXX, माहे फाल्गुन शुद्ध दशमी ते फाल्गुन कृष्ण पंचमी अशी नसली तरी, यात इंग्रजी महिना तारीख, वार, वेळ, विषय यांचा उल्लेख असायचा. अचानक वार होत नव्हते. थोडक्यात शत्रू दिलदार होता.

ही  आक्रमणे ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळेतच व्हायची. एका वर्षाच्या कालावधीत लहानमोठी मिळून साधारण सहा आक्रमणे असायची. (यात दोन चाचणी, एक सहामाही, परत दोन चाचणी, आणि एक वार्षिक परीक्षा असा क्रम देखील ठरलेला असायचा.)

पाचवी ते दहावी असा महत्वाचा आणि उमेदीचा काळ समजला तरी सहा वर्षे आणि प्रत्येक वर्षात चार अशा एकूण पंचवीस (दहावीत आक्रमणाला तोंड देण्याची पुर्वतयारी म्हणून एक सराव परीक्षा घेत असत.) आक्रमणे झाली. काही आक्रमणे मी तह करून थांबवली. हे तह तोंडी होते. (यालाच तोंडी परीक्षा असे नांव होते. शिक्षकांच्या लेखी याला कमी महत्त्व असावे. कारण त्यांचा भर लेखी परीक्षेवर असायचा, तसे ते तोंडी सांगत असत.)

या आक्रमणांना तोंड मी दिले होते. पण माझ्यावर (ओरडून) तोंडसुख मात्र घरच्यांनी घेतले होते. कारण…… मार्क कमी मिळाले हेच होते. पण तोंडी परीक्षेत माझा (तोंडाचा) दाणपट्टा बऱ्यापैकी फिरायचा.

या आक्रमणाची सूचना घरच्यांना देखील असायची. त्यामुळे त्या काळातल्या माझ्या हालचालींवर त्यांची बारीक नजर असायची. माझी रणनिती काही प्रमाणात तेच ठरवायचे. दहावीत तर तयारी जय्यत होती.

इतिहासात शिकायला, वाचायला, तह, वेढा, स्वकियांची मदत, रसद पुरवठा असेही काही होते. पण याचा अनुभव शेवटी म्हणजे दहावीच्या आक्रमणावेळी अनुभवला. तो देखील सोबत असणाऱ्या इतरांच्या बाबतीत.

एकतर या दहावीच्या आक्रमणाला  परक्या मुलुखात तोंड (दुसऱ्या शाळेत) द्यायचे होते. माझ्या सारखेच अनेक अशा आक्रमणाला तोंड देण्यासाठी आले होते. त्या मुलखाला शत्रू सैन्याचा (पोलिसांचा) वेढा असायचा. तो वेढा भेदून काही स्वकिय (दोस्तराष्ट्र) रसद पुरवण्याची पराकाष्ठा करत असल्याचे मी पाहिले होते. (याला काॅपी पुरवणे असे म्हणत असत. थोडक्यात काॅपीमुक्त अभियानाला देखील इतिहास आहे असे म्हणावे लागेल.) पण खूप कमी जणांना रसद पुरवता येत होती. काही वेळा रसद यायची, पण योग्य ठिकाणी पोहचायची नाही. कारण वेढा सक्त असायचा. (त्यावेळी फितुरीचे प्रमाण कमी होते असे म्हणावे लागेल.)

या आक्रमणात वापरली जाणारी शस्त्र म्हणजे पेन, पेन्सिल, रबर, पट्टी यांची जय्यत तयारी असायची. नि:शस्त्र होण्याची वेळ कधीच आली नाही.

जवळपास सगळ्याच आक्रमणात माझा विजय झाला असला तरी त्याचा विजयोत्सव साजरा करण्याइतका तो दैदिप्यमान कधीच नव्हता.

पाचवी ते दहावी सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात आमचे शिक्षण झाल्याने या दोन्ही सत्रात शिकवणारे जवळपास सगळेच शिक्षक माझे कमी अधिक प्रमाणात गुरू होतेच. किंवा सगळ्या शिक्षकांना गुरुस्थानी मानण्याचा तो काळ होता. असे सांगायचे कारण…..

हल्ली इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिंच्या गुरू बाबत देखील बऱ्याच उलटसुलट चर्चा रंगतात. काही त्यात रंग भरण्याचेच काम करतात. पण माझा इतिहास दैदिप्यमान नसल्याने अशा चर्चा घडत नाहीत, घडणार देखील नाही. कदाचित तू खरेच माझा विद्यार्थी होता का? असा प्रश्न एखादा गुरु मलाच करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा या माझ्या शालेय इतिहासातील काही दस्तऐवज (शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका) आजही माझ्या जवळ आहेत. त्याची आता खूप गरज नसली तरी ते दस्तऐवज मी सांभाळून ठेवले आहेत. (पण ते माझ्या पुढच्या पिढीला मी दाखवत नाही.)

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – २ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

या दिवशी पूजा करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. आजच्या पिढीला याची उपयुक्तता सांगणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येक रुढी ,परंपरेला शास्त्रीय आधार आहे.या दिवशी अभ्यंगस्नान करून, ब्रह्मदेवाची दवणा ( थंड असतो म्हणून ) वाहून नंतर महा शांती केली जाते. ” नमस्ते बहू रुपाय विष्णवे नमः।” हा मंत्र म्हणून विष्णुची पूजा करतात. इतिहास, पुराणे यांचे ज्ञान देतात. गुढीपाडव्या दिवशी जो वार असेल, त्याच्या देवतेचीही पूजा केली जाते. संवत्सर पूजा केल्याने, आयुष्य वृद्धी होते. शांती लाभते.आरोग्य लाभते. समृद्धी येते.अशी समजूत आहे. प्रत्यक्ष गुढी उभी करतांना, एका उंच वेळूच्या टोकाला ,भरजरी  खण किंवा साडी ,साखरेच्या गाठी, फुलांचा हार, आंब्याची आणि कडुलिंबाची  डहाळी, आणि या सर्वांवर तांब्याचा किंवा चांदीचा कलश  सजवून, गुढी दाराशी किंवा खिडकीशी उभी केली जाते.याला ब्रह्मध्वज असे ही म्हटले जाते. विजयाचे, मांगल्याचे आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून ही गुढी असते. समोर रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते. कडुलिंब आणि आंब्याच्या झाडाच्या पंचांगांचे आयुर्वेद शास्त्रातील महत्त्व ओळखून हा सन्मान त्यांना दिला आहे. ( ते देववृक्ष आहेत. )कलश रुपी सूत्राच्या सहाय्याने वातावरणातील सात्विक लहरी घरात प्रवेश करतात. ( अँटेनाच्या कार्या प्रमाणे. )या दिवशी नववर्षाच्या पंचांगाची पूजा करून, वर्षफल श्रवण केले जाते. जेवणात पक्वान्नं करून, प्रसाद म्हणून ,कडूलिंबाच्या चटणीचा प्रसाद ग्रहण केला जातो. कटू संबंध दूर करून साखरेप्रमाणे एकमेकातले संबंध वाढावेत ,अशी एकमेकांना सदिच्छा देतात. शेतकरी जमीन नांगरणीस सुरुवात करतात. पारंपारिक वेषभुशा करुन, मिरवणूक काढून, आनंद लुटतात. कोणी नवीन खरेदी करतात. किंवा नवीन कामाला सुरवात करतात.

आपल्या प्रत्येक  सणाला शास्त्रीय आधार आहे. तो नवीन पिढीने अभ्यासायला हवा. जाणून घ्यायला हवा. या शुभ दिनानिमित्त येणारे नवीन शुभ कृती संवत्सर, शालिवाहन शके १९४५ हे सर्वांना सुखाचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो.

– समाप्त – 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गुढीपाडव्याचे महात्म्य… भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

नवीन वर्ष सुरू करण्याच्या प्रथा अनेक आणि वेगवेगळ्या आहेत. एक जानेवारीपासून व्यावहारिक वर्ष सुरू होते. एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष , कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी वर्ष,  एक जून पासून शैक्षणिक वर्ष, त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचे वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. त्यालाच आपण गुढीपाडवा असे म्हणतो.

याला वर्षप्रतिपदा तसेच युगादी तिथी असेही म्हटले जाते. वर्षारंभाचाचे दिवस जरी वेगवेगळे असले तरी एक गोष्ट समान आहे .ती म्हणजे वर्ष हे बारा महिन्यांचेच आहे. ” द्वादश मासौ संवत्सर:। ” असे वेदाने प्रथम सांगितले .आणि जगाने ते मान्य केले आहे. या सर्वांमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षारंभ सर्वात योग्य प्रारंभ दिवस आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.

नैसर्गिक आणि भौगोलिक—- गुढीपाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपात आवर येतो.( संपात बिंदू, क्रांती वृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे  ज्या बिंदूत परस्परांना छेदतात, तो बिंदू.) आणि त्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो. त्यावेळी उत्साहवर्धक आणि समशीतोष्ण असे हवामान असते. झाडांनाही नवीन पालवी येत असल्याने, तीही टवटवीत दिसतात. कधीही नवनिर्मिती ही आनंददायी असते. तेव्हा अशा वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात करणे योग्य आणि आदर्शही आहे.

गुढीपाडवा या सणाला पौराणिक असाही आधार आहे. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, तो हा दिवस. महाभारताच्या आदिपर्वात उपरीचर राजाने, त्याला  इंद्राने दिलेल्या कळकाची काठी  त्याने जमिनीत रोवली. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून गुढी पूजन केले जाऊ लागले. एका कथेनुसार, शंकर-पार्वती यांचे लग्न चैत्र शुद्ध प्रतिपदेला ठरले. आणि तृतीयेला झाले .म्हणून या दिवशी आदिशक्ती पार्वतीचीही पूजा करतात.ऐतिहासिक दृष्टीने विचार करता शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने , मातीचे सैन्य केले .आणि त्यावर पाणी शिंपडून, त्याला जीवन  दिले. आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाने  क्षात्र तेज संपलेल्या समाजात ,आत्मविश्वास निर्माण केला. आणि शत्रूवर विजय मिळविलेला हा दिवस. आणि शालिवाहन शक  तेव्हापासून सुरू झाले.

अध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाचे महत्व सांगायचे तर ,या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली असे मानतात .त्यामुळे तो हा दिवस. वर्षा. रंभाचा मानला जातो.

व्यावहारिकदृष्ट्या गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मानला गेला आहे. या दिवसातील कोणतीही घटिका हि शुभ मुहूर्त असल्याने ,वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही.” गणेशयामल ” या तंत्र ग्रंथात सांगितले आहे की 27 नक्षत्रां पासून निघालेल्या लहरीं मध्ये सत्वगुण निर्माण करणाऱ्या प्रजापती लहरी,चैत्र महिन्यात आणि विशेषतः चैत्र शुद्ध प्रतिपदेला, सर्वात जास्त असतात. म्हणून तो दिवस वर्षारंभ मानणे योग्य आहे.

क्रमशः…

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अवती भवती… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ?

☆ अवती भवती… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

सांगलीत जुन्या स्टेशन रोडवरून आमराईकडे जाणाऱ्या रस्त्यावरच LIC ऑफिस लागतं. “जीवन के साथ भी जीवन के बाद भी ” या आशेवर लोकांच्या जीवन विमा पॉलिसीवरचा विश्वास जपणाऱ्या या इमारतीमध्ये दिवसभर लोकांची लाईफ लाईन धावपळ करीत असते.

बऱ्याच वेळा संध्याकाळी सात नंतर सांगलीतून घरी येताना याच LIC ऑफिसच्या गेटच्या बाजूच्या भिंतीवर सिग्नलकडे तोंड करून आरामात बसलेला हा अनामिक कुत्रा दिसायचा. त्याची ऐट मनाला भावून जायची. नकळत त्याची छबी टिपण्याचा मोह आवरायचा नाही.

” बचत भी और सुरक्षा भी – हे ब्रीद उराशी बाळगून ही पॉलिसी घराघरांशी नातं जोडून आहे. स्वतःचं जीवन समृद्ध करणारी माणसं रस्त्यात कुत्रं आडवं आलं की हाड हाड करतात. तोच हा कुत्रा याच माणसांच्या पैशाचं ईमानईतबारे रक्षण करत बसलाय असं याच क्षणी वाटून जायचं.

गेली कित्येक दिवस सायंकाळी हाच एकटा कुत्रा ऐटित, याच जागेवर बसायचा. येता जाता त्याची आणि माझी अशी वारंवार नजर भेट व्हायची….पण काही दिवस झालं तो आता तिथं दिसत नाही. येता जाता मनात हूरहूर वाटत रहायची.

ते ठिकाण आल्यानंतर आजही काही क्षण नजर त्या ठिकाणी जाते. त्याची रिकामी जागा अस्वस्थ करते . त्याचं काय झालं असेल ? त्याचं बरं वाईट तर झालं नसेल ना ?( पुन्हा भीती  रस्त्यावर त्याचं बेवारस चिरडण्याची ). झालं असेल बरं वाईट तर माणसासारखा त्याचा वीमा कोणी काढला असेल का ? असे अनेक प्रश्न घेऊन मी त्याच रस्त्यावरच्या गतिरोधकावरून हळू केलेली गाडी रोजच्याच स्पीडनं पुढं दामटवतो.

मनात मात्र तो कुत्रा, LIC ची ती  “जीवन के साथ भी जीवन के बाद भी ” ची टॅगलाईन आणि माझाच जीव मुठीत घेऊन मी तुमच्यासारखाच धावत असतो….!

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 61 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान –  लेखांक दोन ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 61 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान –  लेखांक दोन डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरातील कालीमातेचं/जगन्मातेचं दर्शन घेऊन परिव्राजक म्हणून प्रवास सुरू केला तो आता कन्याकुमारी मंदिरात दर्शनाने संपणार होता.

उत्तरेकडील बर्फाच्छादित हिमालयापासून सुरू झालेली स्वामीजींची प्रदीर्घ यात्रा आता भारताच्या दक्षिण टोकास संपली होती. तामिळनाडू मध्ये जिथे अरबी समुद्र, हिंद महासागर, आणि बंगालची खाडी यांचा संगम होतो तिथे माता कन्याकुमारीचे प्राचीन मंदिर आहे. तिचे पौराणिक संदर्भ पण आहेत.    

या मंदिरात स्वामीजी गेले आणि साष्टांग नमस्कार करून, कन्यारूपातील जगन्मातेचं दर्शन घेऊन बाहेर आले. तशी समोर लांबवर नजर गेली, दीड फर्लांग अंतरावर दोन प्रचंड शिलाखंड दिसले.यावरच माता कन्याकुमारीने /पार्वतीने स्वत: इथे तपस्या केली होती. या शिला खंडावर तिचे पदचिन्ह आज ही आहेत म्हणून त्याला ‘श्रीपाद शिला’ म्हणून ओळखले जाते. मनशांती साठी व चिंतनासाठी आपल्याच भूमीवरच्या या शिलाखंडावर जायची त्यांना मनोमन इच्छा झाली. तिथे गेलो तर खर्‍या अर्थाने मातृभूमीचे दक्षिण टोक आपण गाठले असा अर्थ होईल. म्हणून कसही करून त्या खडकांवर आपण जावं असं वाटून, ते किनार्‍यावर आले. समोर उंच उंच फेसाळत्या लाटा होत्या.त्याची जराही भीती वाटली नाही कारण, मनात तर याहीपेक्षा मोठे वादळ उठलेले होते. समोरच होड्या होत्या. काही कोळी पण उभे होते. स्वामीजींनी त्यांची  चौकशी केली. त्या नावेतून खडकापर्यंत पोहोचविण्यास नावाडी तयार होते, फक्त पैसे द्यावे लागणार होते. नावाड्यांनी त्याचे ३ पैसे सांगितले.  स्वामीजी तर निष्कांचन होते.तीन काय, एक पैसा सुद्धा त्यांच्या जवळ नव्हता. पण साहस तर होतं.  झालं,क्षणाचाही विलंब न करता, त्यांनी त्या उंच लाटांमध्ये उडी घेतली आणि पोहत पोहत जाऊन ते खडक गाठले. समुद्राला रोजचे सरावलेले असतांनाही नावाडी हे बघून स्तब्धच झाले. लाटा उसळणार्‍या तर होत्याच पण तिथे शार्क माशांपासून पण धोका होता हे त्यांना माहिती होतं. हे पाहून दोन तीन नावाडी स्वामीजींच्या पाठोपाठ गेले. ते सुखरूप पोहोचले हे बघून, त्यांना काही हवे का विचारले. आम्ही आणून देऊ असे सांगीतल्यावर थोडे दूध आणि काही शहाळी पुरेशी आहेत असे स्वामीजींनी सांगितले.

राष्ट्र चिंतन पर्व – २५, २६ २७ डिसेंबर  

स्वामी विवेकानंदांनी या आधी आध्यात्मिक साधना म्हणून अनेक वेळा एकांतात ,अरण्यात वगैरे ध्यान केलं होतं. पण आता चे ध्यानचे रूपच वेगळे होते. अरण्य नाही,झाडं झुडुपं नाही, गुहा नाही ,उघड्या खाडकावर आकाशाचे चं छत आणि आजूबाजूला प्रचंड आणि चोवीस तास खळाळणार्‍या समुद्राच्या लाटा,दिवसा सूर्यची प्रखर किरणे, जोरात येणार्‍या वार्‍याचे झोत असा पारंपरिक ध्यान धारणेचा वेगळाच एकांतवास तिथे होता.२५ डिसेंबर १८९२ रोजी स्वामी ध्यानास बसले. स्वामीजींनी या शिलाखंडावर तीन दिवस, तीन रात्र अखंड ध्यान केलं. लाटांच्या अखंड गंभीर नादाबरोबर स्वामीजींचे गाढ चिंतन सुरू झाले. कलकत्त्यातून बाहेर पडल्यापासुनचे सर्व दिवस, त्यात आलेले अनुभव, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. जगन्मातेचं ध्यान आणि भारत मातेचं चिंतन तीन दिवसात झालं. चौथ्या दिवशी सकाळी तरुण नावाड्यांनी जाऊन होडीतून त्यांना पुन्हा किनार्‍यावर आणलं. जे शोधायला स्वामीजी आले होते ते त्यांना इथे मिळालं. भारताचा गौरवशाली इतिहास, भयानक वर्तमानकाळ आणि आणि आधी पेक्षाही अधिक स्वर्णिम भविष्यकाळ याचा चित्रपटच जणू त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला.सिंहावलोकन करण्याचा तो क्षण होता. भारताच्या श्रेष्ठ संस्कृतीतले वास्तव तसाच त्यातलं सुप्त सामर्थ्य त्यांना या क्षणी जाणवलं होतं. त्याच्या मर्यादा ही त्यांना जाणवल्या होत्या.

प्राचीन इतिहास असलेला हा विशाल देश, इतिहासाचे केव्हढे चढउतार, सार्‍या जगाला हेवा वाटेल असे प्राचीन काळातील द्रष्ट्या ऋषीमुनींनी दिलेले आध्यात्मिक धन. पण तरीही आज भारत कसा आहे? त्याची अस्मिताच हरवलेली दिसत आहे. सगळ्या मानव जातीने स्वीकारावीत अशी शाश्वत मूल्यं पूर्वजांकडून लाभली आहेत तरीही त्यातल्या तत्वांचा त्याला विसर पडला आहे. अभिमान वाटावा असा भूतकाळाचा वारसा आहे पण वर्तमानात मात्र घोर दुर्दशा आहे. यातून समाजाचं तेज पुनः कसं प्रकाशात आणता येईल?  अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधायची होती. उपाय शोधायचे होते. एखाद्या शिल्पकाराने उत्तम मूर्ती घडविताना त्याचा सर्वांगीण विचार करावा तसा स्वामीजी भारताचा विचार यावेळी करत होते. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक ग्राहक दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक ग्राहक दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

(15 मार्च- निमित्ताने)

आपल्या रोजच्या जीवनात अनेक व्यवहारिक गोष्टींना सामोरे जावे लागते. तो व्यवहार बघतांना कधी आपला आर्थिक संबंध येतो तर कधीकधी परिचयातून व्यवहारात भावनिकता पण येते. कधी आपण ग्राहक असतो तर कधी विक्रेता. अर्थातच प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या व्यवहारात ग्राहकाची भुमिका निभावतेच.

आपल्याला आपल्या मुलभूत हक्काच्या गोष्टी आपसूकच मिळाल्या तर आपण नशीबवान ह्या सदरात मोडतो असं समजावं परंतु जर आपल्याला आपल्या हक्काच्या मुलभूत, जीवनावश्यक, अर्थातच नियमांना धरून जर पुरवठा झाला नाही तर प्रत्येकाने त्यासाठी लढायची,आपले हक्क मिळवायची तयारी ही ठेवलीच पाहिजे. कारण अन्याय करणाऱ्या इतकाच तो सहन करणाराही दोषी असतो हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे आपल्याला आपल्याच हक्काच्या गोष्टी मिळतांना वा गरजेनुसार गोष्टी विकत घेतांना आपली कुठे फसगत तर होत नाही नां ह्याकडे अत्यंत डोळसपणे,जागरुकतेने प्रत्येकाने बघण्याचीच खरी गरज आहे म्हणून “जागो ग्राहक जागो” ह्या घोषवाक्याची आज 15 मार्च ह्या आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाच्या दिवशी हटकून आठवण ही येतेच.

15 मार्च हा दिवस “आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन”म्हणून ओळखल्या जातो.15 मार्च 1962 साली अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी ह्यांनी ग्राहकांसाठीच्या हक्कांची सनद त्यांच्या भाषणात मांडली.ते हक्क पुढीलप्रमाणे आहेत.

1 सुरक्षेचा हक्क,2 माहिती मिळविण्याचा हक्क,3 निवड करण्याचा हक्क,4 मत मांडण्याचा हक्क,5 तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क,6 ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क.

दुर्दैवाने आपल्याकडील ग्राहकच अनभिज्ञ राहून ह्या विषयाची माहिती करून घेण्याच्या बाबतीत उदासीन असतो.कितीही जाहीरातीत “जागो ग्राहक जागो”हे घसा फोडून सांगितल्या गेले तरी शेवटी “पालथ्या घड्यावर पाणी”असो.

अनेकदा खरेदी करतांना किंवा सेवेच्या बाबतीत त्याचा वापर करतांना ग्राहकांचे अनेक गोष्टींकडे असलेले दुर्लक्ष, माहितीचा अभाव हे विक्रेत्यांच्या पथ्थ्यावर पडते.ग्राहक ह्या नात्यानं मिळालेल्या अधिकारांचा वापर आपण अतिशय जागरूकतेनं केला तर हे अधिकारच आपल्याला जागरूक ग्राहक म्हणून तयार करतील. सरकार कडूनही ग्राहकांच्या जनजागृती साठी वेळोवेळी आवश्यक ती माहिती पुरविली जाते.उदा.फसवणूक झाली तर तक्रार कोठे करावी, फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीला आपण धडा कसा शिकवू शकतो,त्यानंतर नुकसानभरपाई कशी मिळवू शकतो ह्याची माहिती ग्राहक सेवेअंतर्गत आपल्याला मिळते.ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, वस्तुचे गुणवत्ता प्रमाण आणि दर्जा तपासून घेण्याचा अधिकार आहे.ग्याहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच,ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करते.

ग्राहक आणि विक्रेते ह्यांच नातं खरतरं पोळपाट आणि लाटण्यासारखं असतं.दोन्हीही व्यवस्थित असल्यासच पोळी नीट लाटली जाणार बघा.

आमच्या बँकींग सेक्टर मध्ये तर “ग्राहक देवो भवः “हे वाक्य जणू आमचे ब्रीदवाक्य समजल्या जातं.सध्या तर बँकींग सेक्टर मधील वाढत्या स्पर्धेमुळे आणि कोरोनाने आलेल्या आर्थिक गंडांतरामुळे आम्हाला एक एक ग्राहक जोडून ठेवावा लागतो.सध्याच्या बँकींग सेक्टर वरील विश्वास नाहीसा होण्याच्या काळात आपल्या ग्राहकांचा विश्वास ढळू न देण्याचं आव्हानात्मक काम आम्हाला जिकरीनं करावं लागतं.

तर अशा ह्या ” जागतिक ग्राहक दिनी” ग्राहकांच्या हक्कांची,सुरक्षेची,अधिकारांची पायमल्ली  कधीच होऊ नये हीच मनोकामना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक विनंती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ एक विनंती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

कधी काळी सुवर्णभुमी म्हणून प्रख्यात असणारा आपला भारत देश जगाला संस्कारांचे , संस्कृतीचे, मानवतेचे विश्वबंधुत्वाचे , आदर्श राजकारणाचे, मार्गदर्शन करण्यात आघाडीवर होता. आपली भरतीय संकृती अति पुरातन आहे. रोम, ग्रीक, संस्कृतीपेक्षाही श्रेष्ठ तर आहे . हे जगन्मान्य आहे. आपल्या पुरातन  वैभवशाली मात्रृभुमीने भारतीय स्त्रियांच्या अतिउच्च संस्कारांचे महान आदर्श संपूर्ण जगाला दिले आहेत . जगाने ते वंदनीय व सर्वश्रेष्ठ असल्याचे मान्य केले आहे.  त्याना अनुकरणीय मानले आहे . आपल्या देशाने पारतंत्र्य ही अनुभवले आणि त्यातून प्राणपणाने लढून स्वातंत्र्यही मिळवले . या लढ्यात अनेक विरांगणानी परमोच्या त्यागाचे , औदार्याचे ,स्वसंरक्षणाचे  वस्तूपाठ समाजाला दिले आहेत.  आजच्या काळातही ते आदर्श असून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.  भारतीय मातांनी अनेक तेजःपुंज आपत्याना जन्मदेउन त्यांना उत्तम प्रकारे घडवून त्याच्याकडून सामाजिक , सांस्कृतिक, धार्मीक,क्रांती घडवून आणली आहे. आज तगायत ती तशीच घडतेय . मातृसत्ताक, किंवा पितृसत्ताक  पध्दतीत स्रियांची कुटुंबावरची पकड कधीच कमी झालेली नाही . म्हणूनच “जिच्या हाती पळण्याची दोरी ती जगा उद्धारी” असे म्हटले जाते.

पुरातन, ऐतिहासिक, आणि वर्तमान काळातही स्त्री शक्तीची धगधगती मशाल सातत्याने तेवतरहून समाजहिताचे समर्थपणे संरक्षण करत आहे.

पाश्यात्य संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या मोहजालाच्या आहारी जावून काही नवी स्थित्यंतरे घडत आहेत. ती सारीच तकलादू व असमर्थनीय आहेत असे नाही. पण आपले आदर्श बाजूला ठेवून त्यांचेच अनुकरण करावे इतकी ती प्रतिष्ठीत आहेत असेही नाही. आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धी ने त्यातील श्रेष्ठ कनिष्ठ निवडून घेवूनच त्यांची अंमलबजावणी  करावी हेच हितकारक ठरेल.

काही बदल झाला तरी तो वरपांगी असेल. आपली मुळातली आणि तळागाळातील संस्कृती कायम टिकून राहील यात शंकाच नाही. भारतीय महिला संघटनांच्या माध्यमातून या निवडीला योग्य दिशा देण्याचे कार्य सुरू आहे . त्याला बळ दिले जावे आणि आपल्या भारतमातेच्या पुरातन पण परिवर्तनीय जलजाज्वल संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त व्हावे हीच अपेक्षा.  आपले आदर्श आपलेच आहेत. त्याना सुरक्षीत ठेवून पुढची सांस्कृतिक वाटचाल आदर्श करण्यासाठी  . आता महिलांनीच पुढाकार घेण्याचे नियोजन करावे. ही आग्रही विनंती

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फाल्गुनातील चैत्रविलास… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? विविधा  

☆ फाल्गुनातील चैत्रविलास… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

निसर्गात ऋतूंचा रंगलेला बहारदार खेळ पाहिला कि अचंबित व्हायला होतं. तसेच बाराही महिने एकामेकात एखादा गोफ विणावा तसे ते अलगद एकत्र गुंफलेले असतात. एक महिना या निसर्गातून आपला निरोप घेण्यापूर्वीच नवीन  महिन्याला आमंत्रित करतो. खुलेआम त्याचे स्वागत करतो.

तसाच फाल्गुनही याला अपवाद कसा असेल? या महिन्यात उन्हाळ्याची तलखी असतेच पण मधूनच वाऱ्याच्या सुखदशा लहरी स्पर्शतात आणि मनाला आनंद देतात. या महिन्यात सृष्टीला प्रणयाची बाधा झालेली असते. पक्षीवर्गात ही प्रणयातूरता जाणवते. पक्ष्यांच्या स्वरातील माधुर्य अधिकच गहिरे होते. त्यांचे स्वर अधिक मंजूळ होतात. चिमण्या, कावळे, साळुंख्या अशा सर्व पक्ष्यांच्या सूरांत ही मधुरता असते. एक उत्कटता साऱ्या निसर्गात असते. मधूनच मृगजळांचे भास होतात. प्रणयार्त पक्षीही किती संयमी असतात. हा गुण घेण्यासारखा आहे मानवाने. शांत दुपार हे फाल्गुनाचे आणि एक वैशिष्ट्य आहे. यावेळी आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी मनात रुंजी घालत असतात.  बाहेर उन्हाचा तडाखा वाढत असतो. पण बाहेर पक्ष्यांच्या मधुरवाने मनात आनंद निर्मिती होते. उन्हाचा ताव, मनी आठव पिंगा आणि पक्ष्यांचा मधुरव अशी ही सरमिसळ या फाल्गून दुपारी असते.

फाल्गुन पौर्णिमेच्या दरम्यान निसर्गातील रंगपंचमी अगदी भराला आलेली असते. पळस तर फुलून लालकेशरी साज लेवून नटलेला आहे. त्यात मोहरी च्या फुलांचा गर्दपिवळा रंग, झाडावेलींवरील पालवीच्या अनेकविध छटा हा रंगोत्सवच ना? म्हणूनच श्रीहरी गोपगोपींसह, राधेसह होलिकोत्सव साजरा करून रंगांमध्ये न्हाऊन निघत असेल. साऱ्या जगताला समानतेची शिकवण अशाच कृतीतून भगवंत देत असतो. अथांग प्रेम देणारा हा फाल्गुन मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि आत्यंतिक विरह असा दुर्मिळ संगम फाल्गुन मासातअसतो. वातावरणात तरुवेलींची सुकलेली पाने गळतात. पानगळ हाच शिशिराचा स्थायीभाव असतो. पण फाल्गुनातच साऱ्या वृक्ष वेलींवर नाजूक पालवी फुटू लागते. असं वाटतं कि फाल्गुन मास आतुरतेने आपल्या चैत्र सख्याची वाट पहात असतो.

उन्हाने भाजणाऱ्या झाडा-वेलींना मायेने कुरवाळत हा हसरा फाल्गुन नवपालवीची शुभवार्ता सांगत असतो. फाल्गुन सख्याच्या अंतरीची हाक चैत्रसख्याला ऐकू येते. मग अलगद निसर्गात, इथेतिथे पानोपानी चैत्राच्या चाहूल खुणा खुणावू लागतात. वनराणी जणु आपल्या जवळील हिरव्या रंगाच्या हिरवट, पोपटी गर्द शेवाळी, पिवळसर सोनेरी राजवर्खी रंगाची मुक्तहस्ते उधळण करू लागते. मग तरु-लतांवर ही रंगल्याली नाजूक  पालवी वाऱ्यावर लवलव करु लागते. शिरीष, पिंपळ आदि वृक्ष ही नाजूक पालवीचे सजतात.       

फाल्गुन महिन्यात खऱ्या अर्थाने चैत्रही धरेवर अवतरतो. यावेळी फाल्गुन आणि चैत्र अगदी हातात हात घालून सज्ज असतात कारण ऋतूराजाच्या आगमनाची जय्यत तयारी त्यांना करायची असते. कळ्याफुलांना, तरुवेलींना, नभातील चंद्र तारकांना,अगदी वातलहरींना ही हा सांगावा द्यायचा असतो. आंब्याच्या मोहोराचा, कडुलिंबाच्या फुलोऱ्याचा मस्त गंध वातावरणात दरवळत असतो. पक्षीही पंख फडफडत आनंदाने गगनात उंच भऱ्याऱ्या घेतात आणि त्याबरोबरच नरपक्षी माद्यांना आमंत्रित करण्यात मशगुल असतात. फाल्गुनाचा चैत्रविलास असा रंगलेला असतो.

हळूहळू फाल्गुनाची निरोपाची घडी जवळ आलेली असते. पण आपला उत्साह, आपले चिरतारुण्य तो हसतमुखाने आपल्या चैत्रसख्याकडे सुपूर्द करतो. ह्या निरोपावेळी करुण वातावरणात सुध्दा फाल्गुनाचे निर्मळ हास्य मिसळते आणि चैत्रही आनंदी बनतो. दोघांच्या गळामिठीची साक्षीदार ही सारी सृष्टी असते. आता फाल्गुन तर निरोप घेतो पण चैत्र मास मन घट्ट करून निसर्गाशी एकरूप होऊन जातो. या मधुमासाचा गोडवा किती वर्णावा! चैत्रमास हा ‘वसंताचा आत्मा’च. त्यामुळे या महिन्यात कोकिळ  मदमस्त ताना घेतो. आम्रतरुवर आता मोहोरातून बाळकैऱ्या डोकावू लागतात. सोनचाफा, पांढरा चाफा, लाल चाफा फुलतात. त्यांच्या सुगंधात जाई, जुई, मोगरा, मदनबाण यांचे गंध मिसळून साऱ्या परिसरात गंधमळे फुलल्याची जाणीव वातलहरी करून देतात. कमलिनीच्या मिठीत भ्रमर मत्त होतात. पळसाबरोबर पांगारा, सावरी, फुलतात. वनराई पुष्पवैभव दिमाखात मिरवत असते. चैत्रपालवी नी फुले यांची रानभूल पडते. पक्षी मीलनोत्सुक असतात. कुठे घरटीही दिसू लागतात व लांबट, वाटोळी, चपटी … साऱ्या निसर्गात वासंतिक सोहळा रंगलला पाहून चैत्र खुलतो, गाली हसतो…

फाल्गुनाच्या रंगोत्सवी

चैत्रविलास हा रंगला

पानोपानी, पक्षांच्या कंठी

चैत्र  रुणझुण नादावला|

 

सांज क्षितीजावर असे

चित्रशिल्प भुलवितसे

अवनीवर वासंतिक

उत्सव गंधभरा सजलासे|

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print