मराठी साहित्य – विविधा ☆ “मैत्री  चहाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मैत्री  चहाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कधीकधी उगीचचं आपली नेहमीचीच आवडती काम करायला मूड लागत नाही, संगतवार अशी लिंक लागत नाही तेव्हा एरवी काय करावे असा प्रश्न पडायचा,काही सुचायचं नाही. विशेषत: पावसाळा आणि हिवाळा आपली संपूर्ण दिवसभराची कामे सुसंगत पार पाडावयाची असल्यास ह्याच्या शिवाय पर्याय नाही असा रामबाण उपाय. पण जेव्हापासून माझी मी मला नीट ओळखायला लागले तेव्हा हा मूड चुटकीसरशी बदलवण्याच कसब मला साधलयं.आणि ते ही एका सीप मध्येच.

हाँ,हाँ, असं दचकू नका.एक सीप म्हणजेच एक घुँट चाय का भाई.खरचं मस्त वाफाळलेला,आलं घातलेल्या,फेसाळ दुधाचा चहा म्हणजे अमृत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडीनुसार चहामध्ये वापरलेल्या साहित्याचं प्रमाण वेगवेगळं असतं.

आजकाल मधुमेही,अतिशय तब्येतीबाबतीत जागरूक मंडळी बिनसाखर,कमीसाखर,चहापत्तीचं अल्प प्रमाण, अगदी कमी उकळलेला चहा घेणा-या शहरी लोकांचं प्रमाण बरचं वाढलयं.चहाच्या परिवारात ग्रीन टी,लेमन टी ह्यासारखी भावंडही घुसलीयं.पण जो मजा कड्डक मिठ्ठी,आलं,गवतीचाय डालके जो चाय बनती है नं उसका जवाब नही. तबल्याचा गंध नसूनही हा चहा घेतल्यावर प्रत्येकाच्या तोंडून “वाह ताज”बाहेर हे पडतचं पडतं.

खरतरं चहाची आणि माझी ओळख तशी जरा उशीराच झाली. पण कसं असतं नं ओळख,नातं परिचय किती वेळ किंवा उशीरा झाला ह्याच्यापेक्षाही ते नातं,ती ओळख किती मनापासून घट्ट असते त्यावर त्याची खोली अवलंबून असते.त्याचं नात्याप्रमाणे माझी चहाशी ओळख जरी उशीरा झाली तरी ती मैत्री, ओळख खूप मनापासून, घट्ट, न शेवट असणारी झालीय हे ही खरे.

आज हे सगळं चहापुराण आठवायचं कारण म्हणजे गुगलबाबाच्या माहितीनुसार 15 डिसेंबर  हा “चहा दिवस”आहे.आम्ही लहान असतांना माझं माहेर गाईम्हशीवालं.दुधदुभतं माहेरी भरपूर त्यामुळे चहा तोंडी लागणं शक्यच नव्हतं.गाईम्हशींनी दुध दिलं नाही किंवा दुध नासलं तरचं चहा तोंडी लागायचा. पुढेपुढे दुधाचे दात पडल्यावर,जरा ब-यापैकी अक्कल फुटल्यावर मात्र जी चहाशी घट्ट मैत्री झाली ती आजतागायत वाढतेच पण कमी व्हायच नावचं नाही बघा.जशी चहा घ्यायची मजा ही फुल्ल कपभरुन चहामध्येअसते तशीच एक आगळीवेगळी लज्जत ही कटींग चहा मध्येही असते आणि तो अर्धा कटींग चहा आपल्या जिवाभावाच्या,आवडत्या व्यक्तीनं जर दिला असेलं नं तर क्या कहना. आजकाल अमृततुल्य वा प्रेमाचा चहा अशी बरीच तयार चहाची दुकान आहेत शिवाय वारेमाप चहा कॅन्टीन पण आहेत परंतु मला अगदी मोजून इन मिन तीन ठिकाणचा चहा आवडतो, एक म्हणजे माझ्या स्वतःच्या हातचा घरचा चहा, दुसरा आमच्या बँकेत बनणारा चहा आणि तिसरा अमरावतीच्या शाम चौकातील सुंदरम् कॅफे मधील चहा. आमच्या बँकेत तर दोन पुरुष कर्मचारी असा अफलातून साग्रसंगीत आल वैगेरे घालून दिलखेचक चहा करतात न की मस्त चहा ने कामाचा मुडच बनून जातो.

ह्या चहापुराणावरुनच आठवलं बघा.चहा आणि प्रेम किंवा मैत्री ह्यांच एक अनोखं असं नातं असतं.एक कुणी अनामिकानं लिहीलेली चहा आणि मैत्री वरील ही पोस्ट माझी खूप आवडती.ह्या पोस्टमध्ये मी थोडा बदल केलायं.पोस्ट खालीलप्रमाणे

चहाच्या कपासोबतच त्याने मैत्रीचा हात पुढे केला,तेव्हा ती भांबावली,लग्न झालयं,मुलं मोठी झालीयं,छान चाललयं सगळं असं म्हणाली.तो हासून म्हणला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.

ती पुढे म्हणाली मला हे आवडत नाही, मी बरी माझे काम बरे,ह्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही, तेव्हा हलकेच चहाचा कप पुढे करुन हसून परत बोलला तो, अग मी मैत्री म्हणतोयं तुला.

इथे मेली सगळ्या जगाची नजर,सगळ्यांना नसत्या उचापती,प्रमोशन्स तोंडावर, साध्या गोष्टीनेही काहूर माजतं,तो चहाचा कप तिच्या ओठी लावतं खळखळून हसतं म्हणाला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.

थंड होत असलेल्या चहात हिचे अश्रु पडताच डोळे पुसायला पेपरनँपकीन पुढे करतच तो परत बोलला अगं मी मैत्री म्हणतोय तुला.

चहा थंड झाल्यामुळे तो दणदणीत आवाजात परत तिच्या आवडीचा फुल्ल,कड्डक, मीठा चाय आँर्डर करतो तेव्हा ती खुदकन डोळे पुसत हसते.आणि जेव्हा तो फुल्ल चहा कटींग करून आळीपाळीने प्याल्यावर तीच आभाळं खरचं निरभ्र होतं,मनावरचं ओझं हलकं होतं म्हणून तो परत म्हणतो अगं वेडाबाई ह्याचसाठी मैत्री म्हणतोय तुला.

आणि मग ह्या चहाच्या साक्षीनचं परत दोघे शेवटच्या श्वासापर्यंत अंतापर्यंत मैत्रीसाठी बांधील राहण्याची जणू भीष्म प्रतिज्ञाच घेतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याच्या पुस्तकातून… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आयुष्याच्या पुस्तकातून? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पु.ल.देशपांडे यांच्या नाटकातला एक प्रसंग आठवला. एका केसचा साक्षिदार म्हणून एका स्त्रीला साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभे केलेले असते. वकील नाव विचारतात ती नाव सांगते. पुन्हा वकील तिला म्हणतात वय? तर ती बाई म्हणते, आता गरीबाला कसलं आलय वय? आन अडाण्याला कसली आलीय जन्मतारिख?

कोर्टात एकच हशा. असो यावरून प्रश्न पडला अडाणी कोणाला म्हणायचे? अडाणी लोक पण अनुभवाचे बोल बोलताना सहज म्हणतात, नुसतं शाळा कालेजात जाऊन चार पुस्तकं वाचून शानपन येत नसतं•••

मग शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काही संबंध आहे का? असेल तर वरचा डायलॉग का बोलला जातो? नसेल तर मग माणूस शिकतो का? अर्थातच शिक्षण म्हटले की पुस्तकांचा संबंध येतोच. मग एवढी शेकड्याने पुस्तके वाचून, हाताळून जर शहाणपण आले नाही म्हणत असतील तर असे कोणते पुस्तक आहे जे अशिक्षीत लोकही वाचून शहाणपणाच्या गोष्टी करतात?

मग लक्षात आले, प्रत्येक चराचराचे आयुष्य म्हणजे त्या चराचराचे पुस्तकच नाही का? अनुभवाचे गुरू प्रसंगांच्या पानातून हे पुस्तक ज्याचे त्याला शिकवत असतात. त्याच अनुभवाच्या जोरावर शिकलेले ज्ञान त्यांना शहाणपण देत असते. म्हणून शाळेत न गेलेली व्यक्ती अशिक्षित असू शकेल पण अडाणी नाही.

किती महत्वाचे असते ना हे पुस्तक? जन्माचे मुखपृष्ठ आणि मृत्यूचे मलपृष्ठ घेऊन आलेले पुस्तक ज्याचे त्यानेच लिहायचे असते.

पुस्तके जशी वेगवेगळ्या विषयाची, वेगवेगळ्या लिखाणाची वेगवेगळ्या प्रकाराची असू शकतात तशीच प्रत्येकाच्या आयुष्याची पुस्तके वेगवेगळी असू शकतात पण या एकाच पुस्तकात सगळ्या प्रकारची सगळ्या विषयाची प्रकरणे असतात.

कधी त्यात दोन ओळी, तीन ओळी, चारोळी, कविता,गझल,मुक्तछंद सारख्या असंख्य कविता मिळतील

तर कधी, पॅरॅग्राफ, लेख,निबंध, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी असे लिखाण मिळेल.

प्रत्येक पान हे उत्सुकतेने भरलेले असते. मधे अधे लिखाणाला पुरक अशी चित्रे मिळतील. लेखनातील पात्रेही किती केव्हा कशी पुढे येतील हे खुद्द लेखकालाही माहित नाही.

प्रत्येकालाच असे पुस्तक लिहावेच लागते.

मग अशी पुस्तके काळाच्या पडद्याआड गेली की काही दिवस हळहळून ही विस्मरणात पण जातात.

पण खरे सांगू? प्रत्येकाने आपले पुस्तक लिहीताना आपल्या पुस्तकाची प्रत कोणाला काढावी वाटेल असे लिखाण केलेले असावे. या पुस्तकाचा आदर्श कोणीतरी घ्यावा असे लिखाण करून मग आपले पुस्तक बंद करावे.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आयडेंटिटी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आयडेंटिटी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

मध्यंतरी एका कार्यक्रमाला जायचा योग आला तेव्हा त्यांनी माझा परिचय करून देताना माझ्या बद्दल काही माहिती सांगून ओळख करून दिली.तेव्हां जरा लक्षात आल एकाच व्यक्तीची किती वेगवगळ्या प्रकाराने ओळख दडलेली असते.ती ओळख कधी नात्यातून तर कधी आपण करीत असलेल्या कामावरून तर कधी कधी आपला स्वभाव, आपला जनसंपर्क ह्यावरून ठरत असते.

एकदा नोकरीत असतांना सर्व्हिस बुकमध्ये बोटांचे ठसे घेतले तेव्हाही ही आपली अजून एक ओळख हे ध्यानात आले.  इंशुरन्स पाँलिसी काढतांना ओळख म्हणजेच आयडेंटिटी मार्क विचारतात ही पण एक ओळखच. अशा निरनिराळ्या प्रकारच्या आपल्या एकाच व्यक्तीच्या ओळखी बघुन अचंबित व्हायला झालं.

सहजच मनात आलं खरचं एवढीच असते आपली ओळख?आपली आयडेंटिटी?नक्कीच नाही.

मग ठरवलं आपली ओळखं आपली आयडेंटिटी आपण स्वतः तयार करायची.

सहसा घरच्या सगळ्या जबाबदा-या पार पाडता पाडता स्त्रीला स्वतः चा विसरच पडतो आणि मग इतर लोक जसे तिला गृहीत धरायला लागतात तसेच ती पण स्वतः ला गृहीत धरायला लागते.

कोणाची बायको,कोणाची आई म्हणून ओळख असणं आनंद देतचं पण आपल्या ओळखीला परिपूर्णता तेव्हाच मिळते जेव्हा आपली आपल्या स्वतःवरून ओळख पटते.

तिचं सगळं वागणं,बोलणं,आवडनिवड,सोयी ह्या सगळ्या घरच्यांचा आधी विचार करूनच ठरल्या जातात.अर्थात हा तिच्या स्वभावाचाच भाग असतो.ह्याचे प्रमाण सिमीत असेल तर तिला त्यात आनंदही मिळतो. ह्या गुणांमुळे घर एकत्र बांधून ठेवायला मदतच होते. पण ह्याचा अतिरेक झाला तर ती स्वतः मधील “स्व” च विसरते.

ह्याचाच परिणाम म्हणजे स्वतःचा स्वतः वरील विश्वास उडतो म्हणजेच आत्मविश्वास कमी होतो. लहानसहान बाबींमध्ये सुध्दा दुसऱ्या वर अंवलंबून राहायला लागतो.

समोरच्यांच्या मतांचा आदर जरूर करावा पण तेवढेच आपल्या मतांनाही प्राधान्य द्यावे.

शेवटी काय तर आपण केलेले कर्म आणि करीत असलेले कार्य च खरी दाखवतात आपली आयडेंटिटी.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “50-50 अर्थात थोड तुझं… थोड(स) माझं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “50-50 अर्थात थोड तुझं… थोड(स) माझं” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आमचही घर इतर (सर्व) सामान्य घरांसारखच आहे. म्हणजे आमच्याही आपसातल्या काही गोष्टी फक्त स्वयंपाक घरापर्यंतच असतात. काही थोड्या घरंगळत बाहेर हाॅलमधे रेंगाळतात. तर काही मात्र हाॅलमधून बाल्कनीत फेरफटका मारायला येतायेता बाहेर केव्हा पडतात ते समजत नाही. पण आमच छान चालल आहे.

दोन किंवा जास्त पक्षाच सरकार आल्यावर जस त्यांचा आपसात वेळोवेळी वेळेवर समन्वय असतो, तसाच आमचा समन्वय आहे. त्यांची जशी आपसात हवी तशी खातेवाटप आहे असे दाखवतात तशीच आम्ही आम्हाला हवी तशी आमची खाती वाटून घेतली आहेत.

आता घर म्हणजे देणंघेणं, सणवार, खाणंपिणं, खरखोटं, कमीजास्त, उठणबसण यासारख्या बऱ्याच गोष्टी जोडीने येणारच. आणि याच जोड गोष्टी आम्ही गोडीने आमची खाती म्हणून वाटून घेतल्या आहेत. यातच आमची ख्याती आहे.

आता देणंघेणं, यात देण तिच्याकडे आणि घेणं माझ्याकडे ठेवलंय.उगाचच देतांना आपल्याकडून काही कमी गेल का?…. याची खंत वाटायला नको. आणि घेण यात माझ्या काहीच अपेक्षा नसतात. त्यामुळे तिथे खेद नसतो. मिळाल त्यात आनंद.

सणवार, यात सण कोणते, कुठल्या पध्दतीने साजरे करायचे हे ती ठरवते. आणि ते कोणत्या वारी आहेत, आणि त्या दिवशी मी नेमक्या गोष्टी टाळायच्या हे मला ठरवावच लागतं. त्यामुळे सण तिचे आणि वार माझ्याकडे येतात. पण अशा वारांची वारंवार आठवण ती करून देते.

खाणंपिणं यांचंही तसच. खाण्याच्या गोष्टी तिच्याकडे, आणि पिण्याच्या मात्र मी माझ्याकडे ठेवून घेतल्या आहेत. यात तिच्या खाण्याबद्दल मला काहीच म्हणायचे नसते. पण माझ्या (काही) पिण्याबद्दल तिला आक्षेप असतो. मी तिच्या खाण्याबद्दल बोलत नाही. पण माझ्या त्या पिण्याबद्दल निषेध हा पिण्याअगोदर आणि प्यायल्यानंतर दोन्ही वेळा नोंदवला जातो.

खरखोटं यात ती काही वेळा मला विचारते, खर सांगताय ना……. पण ती बोलते किंवा विचारते त्यात खोटं काहीच नसत. पण तरीही ते खरंच आहे असं खोटखोटच मी म्हणतो असं तिला वाटत. इतका माझ्या खरेपणा बद्दल तिला विश्वास आणि आदर आहे.

कमीजास्त बद्दल जास्त काय सांगणार. पण तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं वेळेवर, व्यवस्थित करून, कमी बोलून सुद्धा कमीपणा मात्र तिच्याच वाट्याला येतो. आणि याचा जास्त त्रास तिलाच होतो. यात सगळं, वेळेवर, व व्यवस्थित यावर विशेष जोर असतो. तरीही माझ्याकडून तिला जास्त अपेक्षा नसतातच. पण त्यातही मी कमी पडतो. यापेक्षा जास्त सांगण्यासारख काही नाही.

उठणबसण यात टी.व्ही. समोर बसून कार्यक्रम पाहताना थोड्या थोड्या वेळाने काम करण्यासाठी उठण तिच्याकडे, तर कार्यक्रम संपेपर्यंत (तंगड्या लांब करून) बसण मला भाग असत.

या प्रकारे आमचं सगळ व्यवस्थित चालल आहे. यात काही ठिकाणी आमचे मतभेद असतील. पण मनभेद मात्र कुठेच नाही. आणि यावर आमच एकमत आहे.

अरे हो… एकमतावरून आठवल. आमचे बरेचसे निर्णय हे एकमताने घेतलेले असतात. याबद्दल शंका नाही. पण हे एकमत म्हणजे एकच मत असतं, आणि अर्थातच ते कोणाच असेल……. यावर सगळ्यांचच एकमत असेल.

अस आमच थोड तुझं आणि थोड(स) माझं असलं तरीही 50/50 आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जी सरकार ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

🔅 विविधा 🔅

जी सरकार ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

कधीकधी मला इतका राग येतो ना की मला क्रांती कराविशी वाटते. बंडाळी, क्रांती, उठाव हे शब्द वामपंथीयांचे साहित्य वाचल्यामुळे डोक्यात भिनलेले. आता त्याशिवाय म्हणजे क्रांति शिवाय पर्याय नाही. बंड करावेच लागेल. उठाव करावाच लागेल. जुलूम सहन करता कामा नये. किती सहन करावं. सारखं तेच तेच अन्यायच अन्याय. मग एक दिवस असा उगवतो की कडेलोट होतोय असं वाटताना उद्रेकच होईल असं ठाम मत होतं. असा एकच दिवस नव्हे तर महिन्यातून एक दिवस उगवण्याचे ठरलेलेच व बहुतेक तो रविवारचाच दिवस असतो, ज्यादिवशी हक्काची सुट्टी असते व त्याला कारण आमचं सरकार!!

तसं आमचं सरकार अजबच म्हणायचं. (तसं म्हणण्याची हिम्मत होत नाही ही गोष्ट वेगळी!)  तर आमचं सरकार, आलं देवाजीच्या मना या धर्तीवर, चला आपण ही खोली साफ करूयाचं फर्मान सोडून मोकळं होतं. सरळ सरळ ब्रह्मांडच आठवतं. निम्मा दिवस तरी वाया जाईल याची अक्षरशः मनाची खात्रीच पटते. रविवार म्हटला की कसं, सकाळीस उशिरा उठणं, सावकाश दाढी उरकणं मग मनसोक्त शॉवर खाली आंघोळ, मग गरम गरम नाश्ता व हातात वर्तमानपत्र, वा मोबाईल, त्यातील व्हॉट्स एप व फेसबुक फ्रेंड्स, इन्स्टा, स्नॅपचेट, वाटच पहात असतात की हा गडी कधी ऑनलाईन होतो. यापरतं परमसुख नाही. थोडं…. . फार इकडे तिकडे सर्फिंग केलं की रविवार मजेत जाणार याची ग्यारंटी! पण कधीकधी तसं घडायचं नसतं!

बायको एका हातात झाडू, दुसऱ्या हातात खराटा, काखेत वरची जळमटं काढायला लांब काठीला बांधलेला झाडू, तीन चार बादल्या पाण्याने भरलेल्या,  हिपोलीनच्या पुड्या, ओली फडकी, कोरडी फडकी, जय्यत तयारी करून समोर उभी ठाकलेली. मग मनातले मांडे बाजूस सारून आपसूकच उभं होणं आलं. हिचं आपलं ओठातल्या ओठात पण खरमरीत पुटपुटणं चालूच असतं, “ नाही तरी तुम्हाला कामाचा कंटाळाच तेवढा. हातातून मोबाईल खाली ठेवता ठेववत नाही.”   मी आपला तिच्या वाक् बाणांकडे कानाडोळा करत होतो. पण खरं सांगू का? ते क्रांती, बंड, उठाव यांचं अवसान गळूनच पडलं होतं. बघता बघता कपाटं रिकामी होत असलेली, खिडकीचे पडदे काढणं, भिंतींवरचे फोटोफ्रेम, काय काय ते खोलीच्या मधोमध माझ्या उंचीचे ढीगच ढीग. शिवाय शेजारी मोठालं स्टुल ठेवलेलं. त्यावर मलाच चढणं भाग होतं. पंखा, ट्युबलाईट पुसायला.  अडगळीची खोली, पोटमाळा असला की त्या स्टुलावरून एकदा चढणं झालं की मोहीम फत्ते झाल्याशिवाय उतरणं होत नसे.

“ एकेक वस्तु द्या बरं पुसून, अगोदर कोरड्या फडक्याने मग  ओल्याने. ” मी म्हटलं, “ हुकूम सरकार! ” हे झालं का? ते झालं का? हे इथे नका ठेवू, ते तिथे बरं दिसेल. पुढे सरकवाना पुढे. ते तेवढं बाजूला ठेवा. मग मोलकरीणला देऊ, भंगारात काढू, अहो हे माझ्या मावशीची चुलत भाची हे केव्हापासून मागत होती. तिच्यासाठी राखून ठेऊ. ती इतक्या वेगाने ती निर्णय घेत होती की मला काय मत द्यावं ते उमजत नव्हतं. मग तिने एकेक बॉक्स काढायला घेतले, तसं माझं पित्त खवळलं, “ अगं त्यात वर्तमानपत्रात व मासिकांत आलेले माझे लेख आहेत. ती अडगळ नाहीये, पाहिजे तर पुसून देतो पण ते बॉक्स जसेच्या तसे परत ठेव. ” यावर “कोण वाचतंय इतकं सगळं? नुसती जागा अडून राहिलीय.” कुणीतरी गरम शिसं कानात ओततंयची फिलींग आली बुवा. पण मग मी निक्षून सांगितलं. “त्याला हात लावू नको, पाहिजे तर दुसरं कपाट आणून देईन मी!” मग ते तेवढ्यावर निभावलं.

बारा वाजले तरी पसारा आ वासून डोळ्यापुढे! म्हटलं, “ ए बये, तू आणखी नको करू उचकपाचक, नाहीतर ह्यातच संध्याकाळ व्हायची. ”  तिनं उलट उत्तर दिलं, “ तुम्हीच पटापट हात चालवा बघू. आवराआवर करायला वेळ लागत नाही. ” मी कपाळाला हात लावला. हिच्या समोर कोणतीही संथा चालत नाही. आलिया भोगासी म्हणत(अर्थात मनातल्या मनात!) एकेक वस्तूंवरून हात फिरवू लागलो. तिचा चेहेरा सगळं मनासारखं होत असल्याचं सांगून जात होता.

झालं एकदाचं आवरून. माझं तर तसं कंबरडंच मोडलेलं. तरीही हुश्श, साहीसुट्ट्यो असं सवयीने मनातल्या मनात म्हणून घेतलं. तिचं बारीकसारीक सामान इथे तिथे लावणं चालूच होतं. तेही एकदाचं आटपलं, मग माझ्यासमोर जितंमयाच्या आवेशात पहात ती बोलली, “आता कसं दिसतंय सगळं?” अनाहूतपणे मी बोलून गेलो, “काही फरक पडलेला नाही, जसंच्या तसंच तर आहे सगळं!” हे ऐकल्या बरोबर तिचं मुसमुसणंच सुरू झालं. बाकी एकदम शांतता पसरली. मी किती घोर अपराध केलाय याची प्रचंड जणीव मला झाली. अचानक तिला वाचा फुटली, “ तुम्हाला तर माझी किंमतच नाही. कितीही कष्ट करा, मर मर मरा,  राब राब राबा, सगळं पालथ्या घड्यावर पाणीच. ” आता घड्याच्या जागी मीच मला दिसू लागलो व अंगावरून गार पाणी वाहत असल्याचा भास झाला. तेव्हा लक्षात आलं, दोघांच्या आंघोळी लटकलेल्या. तसं मी तिला जवळ घेत म्हटलं, “ नाही गं, तुला छानच जमतं सगळं यथास्थित लावणं. जशी तू देखणी तशी तुझी ही खोली.  चल, आज तसा उशीरच झालाय, तू सैंपाक करण्याच्या भानगडीत पडू नकोस, बाहेरच जेवू!!” मी अंदाज घेऊ लागलो. माझ्या शब्दांचा परिणाम होत असलेला. तिचं मुसमुसणं थांबलं. म्हणाली, “तसं आपण दोघेही दमलोय तेव्हा तू म्हणतोस तसंच करू. मी आंघोळ करून येते. तोपर्यंत….” तिने चक्क  मोबाईल माझ्या हाती दिला. अन् मी खरडू लागलो.   अजून लेख लिहून पूर्ण होत नाही तो बाथरूममधून हाक आली, हाक कसली दमदार आवाजातला आदेशच. “आंघोळ करून घ्या बघू! अन् तो मोबाईल ठेवा खाली!!” मी लगेच म्हटलं, “जी, सरकार….”

© डॉ. जयंत गुजराती

१०/१२/२०२३

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डुल्लू… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ डुल्लू… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

हा शब्द ऐकला आणि खूप गंमत वाटली. आणि आठवले लहान बाळ. ज्याला पहिली टोचणी मिळते पाचव्या किंवा बाराव्या दिवशी.आणि जगात आल्याचे बक्षीस म्हणून पाहिला दागिना मिळतो तोच हा डुल्लू म्हणजेच डूल त्या डुलच्या सोन्याच्या तारेने कान टोचणी होते.अर्थात हे हौसेचे असते. आणि न रडणारे बाळ पण त्या टोचणीने अगदी आकांताने रडते. जणू पुढच्या आयुष्यात होणाऱ्या कान टोचणीची नांदीच! अर्थात दोन्ही अर्थाने होणारी कानटोचणी फायद्याचीच असते.

कानाच्या खालच्या भागात एक बिंदू असतो तो डोळे व मेंदू यांना ऍक्टिव्ह बनवतो.  डोळ्यांच्या नसा या बिंदूतून जातात. त्यामुळे  दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते. त्याच बरोबर लहान व मोठा मेंदू एक्टिव्ह होतो.या बरोबरच कान टोचल्याने शरीराचा तो बिंदू उघडतो ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कान टोचल्याने लठ्ठपणाही कमी होतो.

एक्यूप्रेशर तज्ञांच्या मते, कानाच्या खालच्या भागात मास्टर सेन्सरी आणि मास्टर सेरेब्रल नावाचे 2 कानाचे लोब असतात. या भागांना छेद दिल्यास बहिरेपणा निघून जातो. कानाला छिद्र केल्याने स्पष्ट ऐकू येते.

ज्या ठिकाणी कान टोचले जाते ते थेट स्त्रियांच्या प्रजनन अवयवांशी संबंधित आहे. कान टोचल्याने महिलांना मासिक पाळीच्या अनियमिततेच्या समस्येपासून आराम मिळतो  त्याचप्रमाणे मासिकपाळीच्या काळात  होणारा त्रास कमी होतो. मध्यभागी कान टोचले तर सगळ्या रक्तवाहिन्या एक्टिवेट होतात.

कानाचे बिंदू टोचून घेऊन धातू वापरल्याने अंगातील वात ताब्यात राहतो.  आपल्या या सर्व जुन्या आणि मागासलेल्या परंपरा चालीरीतींना वैज्ञनिककदृष्ट्या  महत्त्व आहे.

एका डूल ने सुरु झालेला दागिन्यांच्या प्रवास कितीही दागिने घेतले,घातले तरी संपत नाही.पण आज आपण फक्त कानातील दागिने बघू.

तसे कान न टोचता सुद्धा विविध प्रकारे कानात घालू शकतो.आणि त्याचे फायदे पण विविध आहेत. जसे क्लिपचे,चुंबकीय,नुसते दाब देऊन चिकटणारे इत्यादी. बरे हे इथेच संपत नाही. याच बरोबर कानातले चौकडा,कुडी,भोकर, वेल,पट्टी,रिंग,झुबे,टॉप्स,सोन्याचे कान असे विविध प्रकार असतात. शिवाय पुरुषांचे  कानातील दागिने पण असतातच. ही परांपरा अगदी पूर्वी पासून आहे. पूर्वीचे राजे,महाराजे यांचे फोटो किंवा चित्रे तर त्यांच्या कानात भिकबाळी व बाळी दिसतेच.

रामायण महाभारत काळापासून कर्णभूषणे प्रचलित होती. त्यांचे दोन प्रकार होते. १) कानाच्या वरच्या भागात घालायचे कर्णभूषण याला कर्णिका म्हणत. २) कानाच्या खालच्या पाळीत घालायची कर्णभूषणे याला कुंडल म्हणत.

गोलाकार व नक्षीदार कुंडलांना मकरकुंडले म्हणत. वर्तुळाकार प्रफुल्ल कमळाप्रमाणे असलेल्या कर्णभूषणास कनक कमल म्हणत.

भिकबाळी ही उजव्या कानात वरच्या बाजूस घातली जात होती.

ती घातल्याने मूत्र साफ होते.

व मानसिक स्वास्थ्य चांगले रहाते. जेथे पाण्याचे दुर्भीक्ष असेल तेथे ही भिकबाळी लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त असते.म्हणून वाळवंटी प्रदेशात कानाच्या पाळीच्या वरच्या बाजूस कान टोचून तेथे भिकबाळी, सुंकली किंवा छोटी बाळी घातली जाते.

पूर्वी सोन्याची तार  खोबऱ्याच्या वाटीला टोचून ठेवायचे आणि त्या तारेने बाळाचे कान टोचले जायचे. आता वेगवेगळी मशिन्स आहेत. पूर्वी कानाच्या पाळीला खालच्या बाजूला एकाच ठिकाणी छिद्र करत असत.पण आता कान २/३ ठिकाणी तर ५/६ ठिकाणी पण टोचलेला दिसतो. म्हणजे ही आरोग्या विषयी जागृती व फॅशन दोन्ही एकत्र करता येते. आहे की नाही फायदा?

या एका कान टोचण्याने (दोन्ही अर्थाच्या) कितीतरी फायदे होतात. तर आपणही याचा फायदा मिळवू व इतरांना पण करुन देऊ.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सच्चाई/खरेपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ सच्चाई/खरेपण? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

साधेपणा हे सर्वात जास्त चांगले सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आज हा सुविचार वाचला आणि त्यापुढेच सच्चाई किंवा खरेपणा हा सर्वात मोठा दागिना आहे असे म्हणावेसे  वाटले.

बघा तुम्ही, लहानमुले जी असतात, ती आई वडिलांचे शत्रू, आपले-परके, जात-पात हे काही जाणत नसतात. मग अशी मुले कोणाकडे पाहून नुसते हसून हात उंचावले तरी त्या मुलांना उचलून घ्यावेसे वाटते , त्यांची पापी घ्यावी वाटते . कारण त्यांच्या साधेपणातील सौंदर्य, हसून दाखवलेल्या आपलेपणातून निर्माण केलेले नाते आणि त्यांची ओसंडून वाहणारी निरागसता, कृतीतली सच्चाई/ खरेपणा हा आपल्या मनाला भुरळ घालतो.

कोणतेही सौंदर्यप्रसाधन  न वापरता हसून स्वागत करणारी मुलगी जास्त सौंदर्यवती वाटते . तिचे आपुलकीचे बोल एक गोड नाते निर्माण करते आणि तिच्या हृदयातला खरेपणा जो तिच्या चेहर्‍यावरून ओसंडतो, हालचालीतून जाणवतो, नजरेतून बोलतो, तो खरेपणा मनाचा ठाव घेऊन जातो.

एखाद्या कामाच्या ठिकाणी कोणी साधा माणूस असेल तर त्याला भोळा हे विशेषण आपोआपच लागते. मग हे भोळेपण सगळ्यांनाच भावते आणि मग त्यातून पाझरणारी आपुलकी त्यांच्यामधे प्रेमाचे, सहकार्याचे असे नाते निर्माण करते. त्या व्यक्तीच्या खरेपणाचा प्रत्यय वेळोवेळी येऊन या प्रामाणिकपणाची चर्चा देखील होत रहाते. ( त्याच्या याच गुणामुळे वरिष्ठ/ चुकीचे काम करणारे नेहमी त्याला बिचकून रहातात)

अगदी पुरातन काळापासून सत्य महात्म्य चालत आलेले असल्याने गांधिजींनी तर सत्यमेव जयते हा मूलमंत्रच जगताला बहाल केला आहे. त्यांचे माझे सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रातून त्यांनी हे आधी सत्य करून दाखवले आहे.

सत्य हे कधी मरत नसते असे संत  ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून सांगितले आहे. तसेच सत्य हे कोठेही सत्यच रहाते हे पण एक सत्यच आहे.

जगात सगळे नश्वर आहे. मग शाश्वत काय आहे? तर सत्य! जे आपल्या जन्माच्या आधीपासून आहे, आयुष्यभर आपल्या भोवती रहाणार आहे आणि आपल्यानंतरही येथेच रहाणार आहे.

सानेगुरूजींनी ‘खरा’ तो एकची धर्म जागाला प्रेम अर्पावे असे सांगून सध्या जगात जे अनाठायी धर्म डोकाऊ पहात आहेत ते सगळे मिथ्या असून जगाला प्रेमार्पण करणारा हा धर्मच खरा आहे हे सांगितले आहे. त्याचा खरेपणा जगातील कोणतीही व्यक्तीच काय पण खुद्द देव सुद्धा नाकारू शकणार नाही.

खरे बोलण्याचा एक फायदा असतो की आपण काय बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही. किती खरे आहे ना? जर आपण कोणाला वेळ मारून नेण्यासाठी खोटं काही सांगितलं तर आपल्यालाच जन्मभर ते लक्षात ठेवावे लागते नाहीतर कधी हे उघडे पडेल या तणावातच जीवन घालवावे लागते. कोणा दुसर्‍याकडून खरे कळेल का अशी भिती मनात रहाते.

एक खोटे बोलले की पुढच्या हजार खोट्यांचा जन्म होतो. मग या खोट्या गर्ततेत सत्यताच कुठेतरी हरवली जाते पण जनाला फसवले तरी मनाला फसवता येत नसल्याने उगाच मन मारून खोटे वागण्यापेक्षा मनभरून खरे जगले तर निरोगी दीर्घायू प्रत्येकालाच लाभेल.

दागिन्यांनी सौंदर्यात भर पडते म्हणतात. मग अशाच सच्चाईचा, खरेपणाचा,प्रामाणिकपणाचा दागिना मनाने घातला तर त्रिकालाबाधित सत्य असलेल्या तुमच्या जीवनाचे सौंदर्य खर्‍या अर्थाने खुलणार आहे.

खोटे हे कधीपण लक्षात येते म्हणजेच खोटेपणाचे सत्य बाहेर पडते. सोन्याचा मुलामा दिलेले पितळ उघडे पडते म्हणजे सोन्याचा आव आणलेले हे पितळ आहे हे खरे सिद्ध होते. म्हणून खोटेपणा हा भित्रा तर सच्चाई ही निर्भिड असते.

कोर्टात गेले की खरं खोटं सिद्ध होते म्हणतात पण वास्तविक खोटे सिद्ध होते आणि पर्यायाने खरं, सत्य उजेडात येते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे खरं हे लोकांना कडू वाटते . लोकांचे दुर्गुण सांगून त्यांना सुधारू पहाणारा सज्जन त्याला कशाला पाहिजेत नस्त्या पंचायती? असे म्हणून त्या सज्जनापासूनच लोक लांब रहातात पण खोटी स्तुती खोटा मोठेपणा देणार्‍या व्यक्तींना जवळ करतात. पण अशाच व्यक्ती आपला मतलब साध्य झाला की पाठीत खंजिर खुपसतात मग अशावेळी सज्जनाचे ऐकले असते तर किती बरे झाले असते असा विचार येऊनही काही उपयोग होत नाही हे खरंच!

खरेपणाचा सुगंध आल्याशिवाय रहात नाही. तो हिरव्याचाफ्यासारखा असतो. खरेपणा हा सूर्यासारखा असतो. कितीही असत्याच्या कोंबड्याने झाकायचा प्रयत्न केला तरी वेळेत उगवणारच.

म्हणूनच लग्न झालेल्या स्त्रीला मंगळसूत्र, मुंज झालेल्या मुलाला जानवे, अभिमान दाखवण्यासाठी डोक्यावर पगडी, फेटा, टोपी शोभून दिसते तसे हृदय , जीवन सुंदर करण्यासाठी सत्यता धारण केली की बाकी कशाची गरज रहात नाही.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आनंद मानायला शिकूया…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आनंद मानायला शिकूया…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांचं आमच्या घरी आगमन झालयं आणि जणू खूप तहान लागली असतांना समोर फक्त आणि फक्त अथांग समुद्र  असावा किंवा नुकतीच शुगर डिटेक्ट झाल्याबरोबर समोर पंचपक्वान्नाचे ताट यावे,असा फील आलाय. कारणं बँकेचे ऑडिट सुरू असल्याने बँक सोडून बाकी कशालाही जणू वेळच उरत नाही. अर्थातच बँकेचे काम हे नोकरी असल्याने माझ्यासाठी प्रायोरीटी मध्ये वरच्या क्रमांकावर.

परवा मस्त दिवाळीअंकाचा गठ्ठा घरी आला.समोर वाचण्यासाठी इतकी वाचनसंपदा पसरली आहे आणि आपली अतिव्यस्त दिनचर्येमुळे आपण त्याचा धडपणे आस्वाद घेऊ न शकल्याने मन खरचं व्यथित होतं.

खरचं बोटांवर मोजण्याइतक्या काही व्यक्ती असतात त्यांना आपल्या आवडीनिवडी आणि आपल्या जबाबदा-या ह्यांचा योग्य समतोल साधण्याचं कसबं असतं.नाहीतर बहुतेक ठिकाणी दात असले की चणे नसतात आणि चणे येतात तेव्हा दात गायब होतात.

सहसा आपण लोकं आधी पैसा मिळवणे, तो साठवणे ह्या मागे इतके हात धुवून लागतो की आपण आपल्याच साठी क्षणाचीही उसंत घेत नाही. प्रसंगी आपण आपल्या आवडींना फाटा देतो आणि आधी कर्तव्य बजावायला सज्ज होतो.हे करतांना स्वतःची मोठी स्वप्ने पूर्ण करण्याच्या ध्यासाने इतके कामात गुरफटतो की स्वतःच्या आवडीच्या छोट्या  छोट्या गोष्टींचाही आस्वाद घेण्यात वेळ घालवायचा विसरतो.आणि जेव्हा सगळ्या जबाबदा-या आटोपून आपण जरा हूश्श् करतो आणि आपल्या आवडींकडे वळू असे ठरवितो तेव्हा आपलेच शरीर आपल्याला साथ देत नाही.

सध्या आपण चार ओळी वाचायला वेळ काढत नाही आणि जेव्हा वेळच वेळ मिळतो तेव्हा वाचण्यासाठी आपली नजर,आपले डोळेच साथ देत नाहीत. हीच गोष्ट पर्यटनाच्या बाबतीत पण लागू पडते.कित्येकदा आपण परदेशी फिरण्याच्या स्वप्नापाई तरुणपणात नुसती ढोर मेहनत करतो. जेणेकरून सगळ्या जबाबदा-या उरकल्या की सहजतेने परदेशी फेरफटका मारता येईल. पण वस्तुस्थिती अशी येते की तेव्हा पैसा तर येतो पण परदेशी फिरण्याची शरीरात ताकदच नसते.ह्या परदेशी फिरण्याच्या ध्यासापायी आपण आपला भारत देश सुध्दा धड पूर्णपणे बघत नाही.

खरचं मला फार कौतुक वाटतं अशा लोकांच जे आयुष्यातील जबाबदा-या पार पाडतांना प्रत्येक पायरीवर काही क्षण का होईना विसावा घेतात,त्या विसाव्यातच आपल्या आधी लहान का होईना पण आवडी,ईच्छा पूर्ण करतात.नाहीतर काहीजणं भराभर पूर्ण जीना घाईघाईने चढायच्या नादात कधीकधी अजिबात विराम न घेता धावतपळत  ध्येय गाठण्यासाठी उरापोटावर जावून इच्छित स्थळी पोहोचतात तर खरं पण पोहोचेपर्यंत पार दमून गेल्यामुळे त्यातला आनंद, त्यातला रसच गमावलेला असतो.

त्यामुळे शरीराला आणि मनाला सुध्दां टप्प्याटप्प्यावर विश्रांतीची ,थकवणा-या मोठमोठ्या स्वप्नांमागे न धावता छोट्याछोट्या गोष्टीतही आनंद मानायला शिकण्याची सवय हवी हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपुलकीची पुस्तके ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

श्री सुबोध अनंत जोशी

?  विविधा ?

☆ आपुलकीची पुस्तके ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

तसं पाहिलं तर, पुस्तके ही निर्जीव भौतिक वस्तू आहे. मुद्रित  मजकूर असलेल्या कागदांची बांधणी करून तयार झालेली वस्तू म्हणजे पुस्तक.विविध आकारप्रकाराची निर्जीव वस्तू.ही वस्तू पुस्तकाच्या बाजारात विकली जाते, विकत घेतली जाते;दुकानातून, ग्रंथालयातून, स्टॉल मधून वितरित होते. त्याचा उपयोग संपल्यावर किंवा त्याचा उपयोग न केल्यावर  या वस्तूची रद्दी होते. काही पुस्तकाच्या जिवांवर वितरक, प्रकाशक  क्वचित् लेखक पैसे मिळवतात. पुस्तकांचे जिवावर मोठ-मोठी ग्रंथालये उभी राहतात. पुस्तकाच्या प्रदर्शनात कमाई करणारे प्रकाशक भेटतात;क्वचित् लेखकही असतात. हौशी लेखक प्रसिद्धीच्या आशेने, अपेक्षेने  अधिकाधिक पुस्तकांना प्रसवतात.अशा पुस्तकांचे गठ्ठे  ग्राहकांची वाट पाहत असतात. डिजिटल, ऑनलाइन पुस्तके, डमी पुस्तके, पीडीएफ आवृत्ती, कॉपीराईट  असे कितीतरी शब्दप्रयोग पुस्तकांच्या दुनियेत चलनी नाण्याप्रमाणे प्रचलित असतात.

 वरील मजकूर बव्हंशी तिरकस,तिरसट,सिनिकल दृष्टीने लिहिला गेला आहे.कारण पुस्तकाला निर्जीव मानलं गेलं तर असंच लिहिलं जाईल. पुस्तकाला सजीव तरी कसे म्हणता येईल? सजीवतेच्या व्याख्येत पुस्तक बसत नाही. ते कधी श्वास घेतं का? ते स्वतःहून इकडून तिकडे फिरते का?  पुस्तकाला पुनरुत्पादनाची शक्ती आहे का? पुस्तकाला पाच संवेदनापैकी एक तरी संवेदना आहे का? या सर्वांची उत्तरे नकारार्थी आहेत. असे असूनही पुस्तक असे काही आहे की ते आपल्या मनाला जिवंतपणा देते, पुस्तक असे आहे की ते स्वतः अलिप्त राहून अशी कांहीं प्रक्रिया घडवून आणते,की त्यामुळे पुस्तकवाचनाचा परिणाम संजीवनीसारखा होतो. या कारणामुळेच पुस्तके भौतिक निर्जीव वस्तू रहात नाही. पुस्तकविक्रेत्याला पुस्तक वस्तू वाटेल,परंतु पुस्तकप्रेमीला ती सजीव वाटेल.  पुस्तकप्रेमीच्या द्रृष्टीने पुस्तकातला मजकूर ही  अक्षरांचे एका मागून एक ठेवलेले डबे नसतात. पुस्तक हे अक्षरे, शब्द, वाक्य,त्यामधील अर्धविराम, पूर्णविराम,स्वल्पविराम या सर्वांसोबत सर्व  वाचकांच्या मनासमोर असे एक जिवंत काव्य, सळसळते विश्व निर्माण करते की त्यामुळे वाचकांचे मन तळापासून ढवळून निघते.ही प्रक्रिया कशी असते याचा उलगडा करण्याचा प्रयत्न कांहीं समीक्षकांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी केला आहे.

 या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे वाचक प्रतिसाद सिद्धांत(Reader Response Theory) आणि वाचन ग्रहण सिद्धांत.पुस्तक म्हणजे संहिताच (Text) असते. ही संहिता  एक स्तरीय नसते; ते जाळेच असते आणि या जाळ्यात वाचक अडकतात किंवा अडकवून घेतात.  आयसरने प्रतिपादन केल्याप्रमाणे साहित्यकृतीच्या संहितेत काही रिकाम्या जागा असतात. अर्थात्, त्या वाचक आपल्या बुद्धीनुसार भरून टाकतो.आयसरच्या मते वाचनाचा प्रत्येक क्षण हा भूतकाळातील स्मृती आणि भविष्यकाळातील अपेक्षा यांच्यात  जे द्वंद्व   उभे राहते त्याच्या संबंधित असते.  आयसरने म्हटले आहे की  प्रत्यक्षात   या गोष्टी संहितेत नसतात.  वाचकाने त्या भरायच्या असतात.

जौशच्या  मते आपल्या काही कलाकृतीच्या संदर्भात काही अपेक्षा असतात.  ही अपेक्षांची क्षितिजे( Horizon of Expectations) नेहमी बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक काळात वाचकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.जौशच्या मते वाचकसमूह संहितेचा अर्थ लावतो.पॉल स्टिकर याने वाचनप्रक्रिया कशी विकसित होते याचे विवेचन केले आहे.वाचक हा वाचन करताना तीन अवस्थातून जातो.पहिल्या अवस्थेत वाचक संरचनात्मक संबंधाचा(Configuration) विचार करतो. दुसऱ्या अवस्थेत साहित्यकृतीच्या अर्थात्मक भागाचा (Recofiguration) विचार केला जातो. आणि तिसऱ्या अवस्थेत वाचकाला स्वतः विषयीचे ज्ञान,आत्मज्ञान(Self-understanding) यांचे आकलन होते.  अमेरिकन समीक्षक स्टॅनले फिश याने Is There a Text in This Class? या पुस्तकात वाचकवर्गाची  किंवा वाचक समूहाची   कल्पना मांडली.

या सर्व सिद्धांतानुसार असे दिसते की कांहीं समीक्षक वाचकाच्या वैयक्तिक प्रतिसादाला महत्त्व देतात;बहुसंख्य समीक्षक वाचकसमूहाला महत्त्व देतात.मराठी समीक्षक प्रा.रा.ग.जाधव यांनी साहित्याचे परिस्थिती विज्ञान(Ecology of Literature) ही संकल्पना मांडली.साहित्यकृती ही सजीव आहे आणि साहित्य ही समुदायवाचक कल्पना आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे की वैयक्तिक वाचक असो किंवा वाचकसमूह असो, पुस्तकाला वाचक भेटल्यावर पुस्तक हे सजीवतेकडे वाटचाल करू लागते. यासंदर्भात अमेरिकन समीक्षकांनी म्हटले आहे की पुस्तकाला त्याचा वाचक मिळेपर्यंत कोणतेही पुस्तक हे अनेक पुस्तकांपैकी एक असते.पुस्तकाला वाचक भेटल्यावर मात्र वाचनातून सौंदर्यभाव निर्माण होतो आणि सौंदर्यभाव हा अत्यंत सुंदर असा चमत्कार आहे आणि त्याचे स्पष्टीकरण ना मानसशास्त्र करते,ना  कोणती समीक्षा करते.(  A book is a thing among things,a volume lost among the volumes that populate the indifferent universe until it meets its reader, the person destined for its symbols. What then occurs is that singular emotion called Beauty,that lovely mystery which neither psychology nor criticism can describe  ).वाचकाला जो सौदर्यानुभव येतो ते एक गूढ आहे असे म्हटले आहे आणि ते खरेही आहे.वाचकाला जो आनंद मिळतो त्यासंबंधी  प्लेटो,अॅरिस्टाॅटल,वर्डस्वर्थ,कोलरिज,टी एस.ईलियट,आय.ए.रिचर्ड तसेच संस्कृत वैय्याकरणी मम्मट  अशा अनेकांनी आपले सिद्धांत प्रतिपादन केले आहेत.त्या सर्वांचा हाच निष्कर्ष आहे की साहित्यवाचनातून असे काही मिळते की त्यामुळे वाचकांच्या मनाचे उन्नयन होते.पुन्हा एकदा हेच सिद्ध होते की पुस्तकाला वाचक भेटल्यावर पुस्तक निर्जीव राहत नाही.

यापुढे जाऊन असे म्हणता येईल की काही पुस्तके ही वाचकसमूहाला किंवा वैयक्तिक वाचकाला आपलीशी वाटतात. या आपलेपणाच्या कारणाचाही शोध घेता येईल. समाजशास्त्रात Kinship of  Spirit हा एक सिद्धांत आहे.या सिद्धांताप्रमाणे काही गोष्टी कॉमन असतील,तर  एखादे ठिकाण,व्यक्ती,वस्तू याकडे आपले मन ओढ घेते.(An inherent attraction and liking for a particular person, place or a thing, often based on some commonality).

लेखक आणि पुस्तक यांचाच विचार केला तर लेखकाला त्याच्या स्वतःच्या पुस्तकाबद्दल आपुलकी वाटणे हे अगदी नैसर्गिक आहे. नीराद चौधरी यासारखे लेखक अपवादात्मकच म्हणावे लागतील. याचे कारण असे की निराद चौधरींच्यामते लेखकाची पुस्तके ही त्याची  प्रौढ झालेली मुलेच(Grown up Children) असतात आणि एकदा पुस्तक लिहून झाले की त्या पुस्तकाचा आणि लेखकाचा संबंध तुटतो. असा विचार करणारा निराद  चौधरी हा एखादाच असेल. बहुतेक लेखक हे आपल्या पुस्तकांना आपली आवडती मुलेच मानत असणार यात शंका नाही.

वाचकाच्या बाबतीत बोलायचं झाले तर वाचकही सर्व पुस्तकांच्या बाबतीत तटस्थ राहू शकत नाही. काही पुस्तकांचेबाबतीत त्याला काहीच वाटणार नाही. काही पुस्तकांचेबाबतीत थोडे काही  वाटेल आणि काही पुस्तकांचेबाबतीत मात्र त्याला खरोखरीच आपलेपणा वाटेल आणि तीच पुस्तके त्या वाचकाची, सह्रदय वाचकाची आपुलकीची पुस्तके होतात.

पुस्तकातल्या अनुभवाशी आपल्या आयुष्यातील अनुभव काही वेळा जोडले जातात किंवा या उलट होऊ शकते.एक वाचक म्हणून आपण पुस्तकातल्या व्यक्ती, प्रसंग आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींशी, प्रसंगाशी कळत नकळत जोडतो आणि या कारणामुळे ते पुस्तक आपलेसे होेते.कांही अनुभव खूप नाजूक असतात, दिसत नाहीत पण जाणवतात. एखादे पुस्तक वाचल्यावर मन ‘पर्युत्सुक’ होते,

ते का होते, कसे होते याची चिकित्सा नंतर करायची. कदाचित ‘जननान्तरसौह्रदानि” पूर्वजन्मसंस्काराची आठवण होत असेल का? या जन्मातली,सुदूर भूतकाळातील आठवण येत असेल का?

आयुष्याच्या सांदीकोपऱ्यात असंख्य सुखदुःखे, संकटे, अडचणी हा सगळा गोमकाला  जमलेला असतो.पुस्तक वाचताना, आपल्या आयुष्यातील त्या प्रसंगासारखे असणारे प्रसंग वाचनात आले तर आपण त्या पुस्तकाशीही जोडले जातो. ना.सी फडके यांचा ‘हरवली म्हणून सापडली’, या नावाचा एक लघुनिबंध आहे.किल्ली हरवली म्हणून ती शोधण्यासाठी लेखक फडके माळावर जातात आणि  तिथल्या अनेक वस्तू पाहून ते गतकाळातल्या आठवणीत रमून जातात. एखादे पुस्तक वाचताना आपल्या आयुष्यात हरविलेल्या गोष्टी आपल्याला सापडू शकतात. याबाबतीत  माझा वैयक्तिक अनुभव मी सांगू शकेन.

काही समीक्षकांनी वाचकसमूहाचा विचार केला असला तरी वाचन ही पूर्णपणे खाजगी बाब आहे असे मला वाटते. पुस्तकाचे सार्वजनिक  अभिवाचन असले तरी श्रवण हे खाजगीच आहे आणि आपल्या वाचनाची आवडनिवड आपल्याला जोखता येते आणि त्यातूनच आपली वाटणारी पुस्तके निवडता येतात.

माझ्या किशोरवयात कुमारवयात सुंदर पुस्तके वाचायला मिळाली.पाठ्यपुस्तके तर इतकी सुंदर की अजूनही ती डोळ्यासमोर येतात. चांदोबासारखी मासिके फेर धरून नाचतात. किशोरवयात वाचलेली साने गुरुजींची “सुंदर पत्रे”आठवतात.  महाविद्यालयात शिकत असताना राम गणेश गडकरी,केशवसुत, देवल इत्यादींच्या साहित्यकृती वाचलेल्या होत्या. प्रौढ वयात वाचलेले आरती प्रभू, कुसुमाग्रज,  तेंडुलकर,महेश एलकुंचवार,रवींद्र पिंगे,चिं.वि.जोशी असे कितीतरी साहित्यिक. हे सर्वच आवडते लेखक.परंतु आपुलकीची पुस्तके कोणती? असं विचारलं तर आवडता लेखक हाच निकष लावता येणार नाही.खरे तर आपुलकीचे असे निकष असतात का?असले तर कोणते?आपुलकीची पुस्तके पूर्वी वाचलेली आहेतच.ती परत एकदा वाचून या प्रश्र्नांची उत्तरे कदाचित देता येतील.

ले. सुबोध अनंत जोशी

सांगली

मो 9423661068.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उपोषण…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “उपोषण…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

उपोषण हे हत्यार आहे याची खात्री पटली. त्यातही आपला पोषणकर्ता उपोषण करत असेल तर आपल कुपोषण होण्याची भिती असते.

सध्या वातावरणात गारवा येत असतानाच आमच्या घरातल वातावरण मात्र तापत होत. कारण एकच होत. ऑफिसच्या धावपळीतून येणाऱ्या दिवाळीसाठी तयारी करायला त्यांना वेळ मिळत नव्हता.

तापलेल्या वातावरणाची धग मधे मधे भांड्यांच्या वाढणाऱ्या आवाजाने आणि तोंडाने होणाऱ्या भडिमाराने  जाणवत होती.

काय मेली मदत ती काडीची नाही. घर, ऑफिस सांभाळून सगळी मरमर करायची ती आपणच. आणि त्यात यांना कौतुक त्या वर्ल्डकप च. तो मिळायचा त्याला मिळेल. त्यांच काय?…. जाहिरातवाले सगळ त्यांच्या घरी वेळेअगोदर पाठवतील. यांच काय…… यांचे चहाचे कप मात्र वाढत चालले आहेत.

काही नाही….. हे चालणार नाही…. मी तुम्हाला काही वेगवेगळ्या दिवसांची मुदत देते. या दिवशी सांगितलेली सगळी कामं झाली तर ठिक…… नाहीतर उपोषण हे नक्की…..

हे अल्टिमेटमचे सगळे दिवस वेचून वेचून भारताची मॅच असणारेच होते.‌‌……

मी पण आपल मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात…… जरा दिवस तरी बदलता येतील का? सगळ्या दिवशी भारताचीच नाहीतर एक चांगली मॅच आहे……

म्हणूनच….. म्हणूनच हे दिवस…. कारण सगळेच तुमच्या सारखे टाळ्या वाजवत, नाहीतर कसं खेळायला पाहिजे होतं याची बडबड करत टी.व्ही. समोर बसतील. बाजारात गर्दी कमी असेल. तुमचा पार्किंग चा प्रश्न पण निकालात निघेल. आणि मॅच चांगली होईल का सांगता येत नाही, पण खरेदी चांगली होईल…… तिने थर्ड अंपायर ने निर्णय द्यावा तसा ठोस निर्णय सांगितला.

झाल…… अशा उपोषणाची चर्चा फोनवर मैत्रिणींशी झाली सुध्दा…… संध्याकाळी मैत्रीणी (वेळात वेळ काढून) बराचवेळ हजर. नुसत्या नाही. कोणी वेफर्स ची पाकिट, कोणी थंडपेयाची लहान खोकी, किंवा बाटल्या आणल्या. अगं उपोषण म्हटल्यावर कोणीतरी तुला पाहायला येतीलच. तु पाणी पिशील. पण त्यांना नको का काही…

दुसरी….  पाण्यावरून आठवल. तुला पण पाणी लागेलच. मी दहा बारा बाटल्या पाठवते. राहू दे. कामाला येतील. सारख तुला कोणाकडे पाणी मागायला नको. आणि परत येणाऱ्यांशी थोड बोलण होइलच. घशाला कोरड पडते. (दोन बायकांमध्ये ऐकण थोडच आणि बोलण जास्त असत हे यांना सांगावस वाटत होत. पण बोललो नाही….. नाहीतर उपोषण लगेच सुरू झाल असत. आणि उपोषण करणाऱ्यांची संख्या पण वाढली असती.)

अगं खरंच. माझ्याकडे पण ग्लुकोज पावडरचे डबे आहेत. कुठला ऑरेंज फ्लेवर पाठवू का?……. आणखीन एक आवाज.

आणि हो, आत्ता बोलायला नको, पण लागला तर सलाइन लावायचा स्टॅण्ड पण आहे माझ्या कडे…… सासूबाई आजारी असतांना त्यांनीच आणायला लावला होता. येवढा लगोलग आणला पण मोजून दोनदाच लागला त्यांना. आता घरात येताजाता तो पायालाच लागतो. सध्या हातरुमालच वाळत असतात त्यावर…….. एक आवाज…..

आणि हे काय?……बसणार कुठे?…. तु आपली हाॅलमधेच बैस. रिमोट मात्र तुझ्या हाताशी ठेव.  प्राईम व्हिडिओ, नाहीतर ते यु ट्यूब वरचे कार्यक्रम चांगssssssले पहात बैस. यात चांगले कार्यक्रम बराचवेळ असे दोन्ही भाव होते. परत एक आवाज…..

एक्स्टेन्शन बाॅक्स आहे का? नाहीतर तो पण आणते. फोन चार्ज करायला उठायला नको. आपल जवळ असलेला बरा. आणि मऊ उशा, शाल, आणि तक्या मात्र राहू दे जवळ. त्या शिवाय उपोषणाचा फिल येणार नाही.

आणि तु उपोषणाला बसलीस की कळव. म्हणजे येताना ती नवीन लागलेली आहे ना… तिला घेऊन येईन. अगं मोबाईल मधे काय मस्त शुटिंग करते ती. आणि बॅकग्राऊंडला समर्पक गाणीपण भरायला जमत तिला. यंग जनरेशन……. उपोषणावर गाणी आहेत का?….. नाहीतर सॅड म्युझिक टाकू.

यंग जनरेशन म्हणतांना त्यात कौतुक होत की आपल्याला जमत नाही याची खंत याचा सुगावा काही लागला नाही. पण शुटिंगची व्यवस्था होणार होती.

जमेल तसं आम्ही लंच ब्रेक मध्ये येऊच. नाहीतरी नंतर अर्धा तास गप्पांमध्येच जातो. त्या काय इथे सुध्दा होतील. आणि पाठिंबा सुद्धा मिळेल.

अशी उपोषणाच्या अगोदरची तयारी झाली.

सगळे गेल्यानंतर मी म्हटलं. मी दोन दिवस सुट्टी घेतो. काय हव ते सगळ आणू. आणि यावेळी तुला साडी ऐवजी पैठणी. आणि एक दागिना. चालेल…….. आणि या आश्वासनानंतर उपोषण स्थगित.

आता काय?…….. आज सुटीच्या दिवशी मी दिवाणावर….. मऊ तक्यासोबत. समोर ती आधीच कोणीतरी आणलेली थंडपेयाची बाटली……. आणि वेफर्सच पाकीट.

आणि हाॅलमधेच खाली बायको चिवड्यासाठी खोबऱ्याचे काप करतेय. आणि आम्ही दोघंही मॅच बघणार आहोत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print