सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ सच्चाई/खरेपण? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

साधेपणा हे सर्वात जास्त चांगले सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आज हा सुविचार वाचला आणि त्यापुढेच सच्चाई किंवा खरेपणा हा सर्वात मोठा दागिना आहे असे म्हणावेसे  वाटले.

बघा तुम्ही, लहानमुले जी असतात, ती आई वडिलांचे शत्रू, आपले-परके, जात-पात हे काही जाणत नसतात. मग अशी मुले कोणाकडे पाहून नुसते हसून हात उंचावले तरी त्या मुलांना उचलून घ्यावेसे वाटते , त्यांची पापी घ्यावी वाटते . कारण त्यांच्या साधेपणातील सौंदर्य, हसून दाखवलेल्या आपलेपणातून निर्माण केलेले नाते आणि त्यांची ओसंडून वाहणारी निरागसता, कृतीतली सच्चाई/ खरेपणा हा आपल्या मनाला भुरळ घालतो.

कोणतेही सौंदर्यप्रसाधन  न वापरता हसून स्वागत करणारी मुलगी जास्त सौंदर्यवती वाटते . तिचे आपुलकीचे बोल एक गोड नाते निर्माण करते आणि तिच्या हृदयातला खरेपणा जो तिच्या चेहर्‍यावरून ओसंडतो, हालचालीतून जाणवतो, नजरेतून बोलतो, तो खरेपणा मनाचा ठाव घेऊन जातो.

एखाद्या कामाच्या ठिकाणी कोणी साधा माणूस असेल तर त्याला भोळा हे विशेषण आपोआपच लागते. मग हे भोळेपण सगळ्यांनाच भावते आणि मग त्यातून पाझरणारी आपुलकी त्यांच्यामधे प्रेमाचे, सहकार्याचे असे नाते निर्माण करते. त्या व्यक्तीच्या खरेपणाचा प्रत्यय वेळोवेळी येऊन या प्रामाणिकपणाची चर्चा देखील होत रहाते. ( त्याच्या याच गुणामुळे वरिष्ठ/ चुकीचे काम करणारे नेहमी त्याला बिचकून रहातात)

अगदी पुरातन काळापासून सत्य महात्म्य चालत आलेले असल्याने गांधिजींनी तर सत्यमेव जयते हा मूलमंत्रच जगताला बहाल केला आहे. त्यांचे माझे सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रातून त्यांनी हे आधी सत्य करून दाखवले आहे.

सत्य हे कधी मरत नसते असे संत  ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून सांगितले आहे. तसेच सत्य हे कोठेही सत्यच रहाते हे पण एक सत्यच आहे.

जगात सगळे नश्वर आहे. मग शाश्वत काय आहे? तर सत्य! जे आपल्या जन्माच्या आधीपासून आहे, आयुष्यभर आपल्या भोवती रहाणार आहे आणि आपल्यानंतरही येथेच रहाणार आहे.

सानेगुरूजींनी ‘खरा’ तो एकची धर्म जागाला प्रेम अर्पावे असे सांगून सध्या जगात जे अनाठायी धर्म डोकाऊ पहात आहेत ते सगळे मिथ्या असून जगाला प्रेमार्पण करणारा हा धर्मच खरा आहे हे सांगितले आहे. त्याचा खरेपणा जगातील कोणतीही व्यक्तीच काय पण खुद्द देव सुद्धा नाकारू शकणार नाही.

खरे बोलण्याचा एक फायदा असतो की आपण काय बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही. किती खरे आहे ना? जर आपण कोणाला वेळ मारून नेण्यासाठी खोटं काही सांगितलं तर आपल्यालाच जन्मभर ते लक्षात ठेवावे लागते नाहीतर कधी हे उघडे पडेल या तणावातच जीवन घालवावे लागते. कोणा दुसर्‍याकडून खरे कळेल का अशी भिती मनात रहाते.

एक खोटे बोलले की पुढच्या हजार खोट्यांचा जन्म होतो. मग या खोट्या गर्ततेत सत्यताच कुठेतरी हरवली जाते पण जनाला फसवले तरी मनाला फसवता येत नसल्याने उगाच मन मारून खोटे वागण्यापेक्षा मनभरून खरे जगले तर निरोगी दीर्घायू प्रत्येकालाच लाभेल.

दागिन्यांनी सौंदर्यात भर पडते म्हणतात. मग अशाच सच्चाईचा, खरेपणाचा,प्रामाणिकपणाचा दागिना मनाने घातला तर त्रिकालाबाधित सत्य असलेल्या तुमच्या जीवनाचे सौंदर्य खर्‍या अर्थाने खुलणार आहे.

खोटे हे कधीपण लक्षात येते म्हणजेच खोटेपणाचे सत्य बाहेर पडते. सोन्याचा मुलामा दिलेले पितळ उघडे पडते म्हणजे सोन्याचा आव आणलेले हे पितळ आहे हे खरे सिद्ध होते. म्हणून खोटेपणा हा भित्रा तर सच्चाई ही निर्भिड असते.

कोर्टात गेले की खरं खोटं सिद्ध होते म्हणतात पण वास्तविक खोटे सिद्ध होते आणि पर्यायाने खरं, सत्य उजेडात येते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे खरं हे लोकांना कडू वाटते . लोकांचे दुर्गुण सांगून त्यांना सुधारू पहाणारा सज्जन त्याला कशाला पाहिजेत नस्त्या पंचायती? असे म्हणून त्या सज्जनापासूनच लोक लांब रहातात पण खोटी स्तुती खोटा मोठेपणा देणार्‍या व्यक्तींना जवळ करतात. पण अशाच व्यक्ती आपला मतलब साध्य झाला की पाठीत खंजिर खुपसतात मग अशावेळी सज्जनाचे ऐकले असते तर किती बरे झाले असते असा विचार येऊनही काही उपयोग होत नाही हे खरंच!

खरेपणाचा सुगंध आल्याशिवाय रहात नाही. तो हिरव्याचाफ्यासारखा असतो. खरेपणा हा सूर्यासारखा असतो. कितीही असत्याच्या कोंबड्याने झाकायचा प्रयत्न केला तरी वेळेत उगवणारच.

म्हणूनच लग्न झालेल्या स्त्रीला मंगळसूत्र, मुंज झालेल्या मुलाला जानवे, अभिमान दाखवण्यासाठी डोक्यावर पगडी, फेटा, टोपी शोभून दिसते तसे हृदय , जीवन सुंदर करण्यासाठी सत्यता धारण केली की बाकी कशाची गरज रहात नाही.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments