श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “50-50 अर्थात थोड तुझं… थोड(स) माझं” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आमचही घर इतर (सर्व) सामान्य घरांसारखच आहे. म्हणजे आमच्याही आपसातल्या काही गोष्टी फक्त स्वयंपाक घरापर्यंतच असतात. काही थोड्या घरंगळत बाहेर हाॅलमधे रेंगाळतात. तर काही मात्र हाॅलमधून बाल्कनीत फेरफटका मारायला येतायेता बाहेर केव्हा पडतात ते समजत नाही. पण आमच छान चालल आहे.

दोन किंवा जास्त पक्षाच सरकार आल्यावर जस त्यांचा आपसात वेळोवेळी वेळेवर समन्वय असतो, तसाच आमचा समन्वय आहे. त्यांची जशी आपसात हवी तशी खातेवाटप आहे असे दाखवतात तशीच आम्ही आम्हाला हवी तशी आमची खाती वाटून घेतली आहेत.

आता घर म्हणजे देणंघेणं, सणवार, खाणंपिणं, खरखोटं, कमीजास्त, उठणबसण यासारख्या बऱ्याच गोष्टी जोडीने येणारच. आणि याच जोड गोष्टी आम्ही गोडीने आमची खाती म्हणून वाटून घेतल्या आहेत. यातच आमची ख्याती आहे.

आता देणंघेणं, यात देण तिच्याकडे आणि घेणं माझ्याकडे ठेवलंय.उगाचच देतांना आपल्याकडून काही कमी गेल का?…. याची खंत वाटायला नको. आणि घेण यात माझ्या काहीच अपेक्षा नसतात. त्यामुळे तिथे खेद नसतो. मिळाल त्यात आनंद.

सणवार, यात सण कोणते, कुठल्या पध्दतीने साजरे करायचे हे ती ठरवते. आणि ते कोणत्या वारी आहेत, आणि त्या दिवशी मी नेमक्या गोष्टी टाळायच्या हे मला ठरवावच लागतं. त्यामुळे सण तिचे आणि वार माझ्याकडे येतात. पण अशा वारांची वारंवार आठवण ती करून देते.

खाणंपिणं यांचंही तसच. खाण्याच्या गोष्टी तिच्याकडे, आणि पिण्याच्या मात्र मी माझ्याकडे ठेवून घेतल्या आहेत. यात तिच्या खाण्याबद्दल मला काहीच म्हणायचे नसते. पण माझ्या (काही) पिण्याबद्दल तिला आक्षेप असतो. मी तिच्या खाण्याबद्दल बोलत नाही. पण माझ्या त्या पिण्याबद्दल निषेध हा पिण्याअगोदर आणि प्यायल्यानंतर दोन्ही वेळा नोंदवला जातो.

खरखोटं यात ती काही वेळा मला विचारते, खर सांगताय ना……. पण ती बोलते किंवा विचारते त्यात खोटं काहीच नसत. पण तरीही ते खरंच आहे असं खोटखोटच मी म्हणतो असं तिला वाटत. इतका माझ्या खरेपणा बद्दल तिला विश्वास आणि आदर आहे.

कमीजास्त बद्दल जास्त काय सांगणार. पण तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं वेळेवर, व्यवस्थित करून, कमी बोलून सुद्धा कमीपणा मात्र तिच्याच वाट्याला येतो. आणि याचा जास्त त्रास तिलाच होतो. यात सगळं, वेळेवर, व व्यवस्थित यावर विशेष जोर असतो. तरीही माझ्याकडून तिला जास्त अपेक्षा नसतातच. पण त्यातही मी कमी पडतो. यापेक्षा जास्त सांगण्यासारख काही नाही.

उठणबसण यात टी.व्ही. समोर बसून कार्यक्रम पाहताना थोड्या थोड्या वेळाने काम करण्यासाठी उठण तिच्याकडे, तर कार्यक्रम संपेपर्यंत (तंगड्या लांब करून) बसण मला भाग असत.

या प्रकारे आमचं सगळ व्यवस्थित चालल आहे. यात काही ठिकाणी आमचे मतभेद असतील. पण मनभेद मात्र कुठेच नाही. आणि यावर आमच एकमत आहे.

अरे हो… एकमतावरून आठवल. आमचे बरेचसे निर्णय हे एकमताने घेतलेले असतात. याबद्दल शंका नाही. पण हे एकमत म्हणजे एकच मत असतं, आणि अर्थातच ते कोणाच असेल……. यावर सगळ्यांचच एकमत असेल.

अस आमच थोड तुझं आणि थोड(स) माझं असलं तरीही 50/50 आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments