सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मैत्री  चहाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कधीकधी उगीचचं आपली नेहमीचीच आवडती काम करायला मूड लागत नाही, संगतवार अशी लिंक लागत नाही तेव्हा एरवी काय करावे असा प्रश्न पडायचा,काही सुचायचं नाही. विशेषत: पावसाळा आणि हिवाळा आपली संपूर्ण दिवसभराची कामे सुसंगत पार पाडावयाची असल्यास ह्याच्या शिवाय पर्याय नाही असा रामबाण उपाय. पण जेव्हापासून माझी मी मला नीट ओळखायला लागले तेव्हा हा मूड चुटकीसरशी बदलवण्याच कसब मला साधलयं.आणि ते ही एका सीप मध्येच.

हाँ,हाँ, असं दचकू नका.एक सीप म्हणजेच एक घुँट चाय का भाई.खरचं मस्त वाफाळलेला,आलं घातलेल्या,फेसाळ दुधाचा चहा म्हणजे अमृत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडीनुसार चहामध्ये वापरलेल्या साहित्याचं प्रमाण वेगवेगळं असतं.

आजकाल मधुमेही,अतिशय तब्येतीबाबतीत जागरूक मंडळी बिनसाखर,कमीसाखर,चहापत्तीचं अल्प प्रमाण, अगदी कमी उकळलेला चहा घेणा-या शहरी लोकांचं प्रमाण बरचं वाढलयं.चहाच्या परिवारात ग्रीन टी,लेमन टी ह्यासारखी भावंडही घुसलीयं.पण जो मजा कड्डक मिठ्ठी,आलं,गवतीचाय डालके जो चाय बनती है नं उसका जवाब नही. तबल्याचा गंध नसूनही हा चहा घेतल्यावर प्रत्येकाच्या तोंडून “वाह ताज”बाहेर हे पडतचं पडतं.

खरतरं चहाची आणि माझी ओळख तशी जरा उशीराच झाली. पण कसं असतं नं ओळख,नातं परिचय किती वेळ किंवा उशीरा झाला ह्याच्यापेक्षाही ते नातं,ती ओळख किती मनापासून घट्ट असते त्यावर त्याची खोली अवलंबून असते.त्याचं नात्याप्रमाणे माझी चहाशी ओळख जरी उशीरा झाली तरी ती मैत्री, ओळख खूप मनापासून, घट्ट, न शेवट असणारी झालीय हे ही खरे.

आज हे सगळं चहापुराण आठवायचं कारण म्हणजे गुगलबाबाच्या माहितीनुसार 15 डिसेंबर  हा “चहा दिवस”आहे.आम्ही लहान असतांना माझं माहेर गाईम्हशीवालं.दुधदुभतं माहेरी भरपूर त्यामुळे चहा तोंडी लागणं शक्यच नव्हतं.गाईम्हशींनी दुध दिलं नाही किंवा दुध नासलं तरचं चहा तोंडी लागायचा. पुढेपुढे दुधाचे दात पडल्यावर,जरा ब-यापैकी अक्कल फुटल्यावर मात्र जी चहाशी घट्ट मैत्री झाली ती आजतागायत वाढतेच पण कमी व्हायच नावचं नाही बघा.जशी चहा घ्यायची मजा ही फुल्ल कपभरुन चहामध्येअसते तशीच एक आगळीवेगळी लज्जत ही कटींग चहा मध्येही असते आणि तो अर्धा कटींग चहा आपल्या जिवाभावाच्या,आवडत्या व्यक्तीनं जर दिला असेलं नं तर क्या कहना. आजकाल अमृततुल्य वा प्रेमाचा चहा अशी बरीच तयार चहाची दुकान आहेत शिवाय वारेमाप चहा कॅन्टीन पण आहेत परंतु मला अगदी मोजून इन मिन तीन ठिकाणचा चहा आवडतो, एक म्हणजे माझ्या स्वतःच्या हातचा घरचा चहा, दुसरा आमच्या बँकेत बनणारा चहा आणि तिसरा अमरावतीच्या शाम चौकातील सुंदरम् कॅफे मधील चहा. आमच्या बँकेत तर दोन पुरुष कर्मचारी असा अफलातून साग्रसंगीत आल वैगेरे घालून दिलखेचक चहा करतात न की मस्त चहा ने कामाचा मुडच बनून जातो.

ह्या चहापुराणावरुनच आठवलं बघा.चहा आणि प्रेम किंवा मैत्री ह्यांच एक अनोखं असं नातं असतं.एक कुणी अनामिकानं लिहीलेली चहा आणि मैत्री वरील ही पोस्ट माझी खूप आवडती.ह्या पोस्टमध्ये मी थोडा बदल केलायं.पोस्ट खालीलप्रमाणे

चहाच्या कपासोबतच त्याने मैत्रीचा हात पुढे केला,तेव्हा ती भांबावली,लग्न झालयं,मुलं मोठी झालीयं,छान चाललयं सगळं असं म्हणाली.तो हासून म्हणला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.

ती पुढे म्हणाली मला हे आवडत नाही, मी बरी माझे काम बरे,ह्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही, तेव्हा हलकेच चहाचा कप पुढे करुन हसून परत बोलला तो, अग मी मैत्री म्हणतोयं तुला.

इथे मेली सगळ्या जगाची नजर,सगळ्यांना नसत्या उचापती,प्रमोशन्स तोंडावर, साध्या गोष्टीनेही काहूर माजतं,तो चहाचा कप तिच्या ओठी लावतं खळखळून हसतं म्हणाला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.

थंड होत असलेल्या चहात हिचे अश्रु पडताच डोळे पुसायला पेपरनँपकीन पुढे करतच तो परत बोलला अगं मी मैत्री म्हणतोय तुला.

चहा थंड झाल्यामुळे तो दणदणीत आवाजात परत तिच्या आवडीचा फुल्ल,कड्डक, मीठा चाय आँर्डर करतो तेव्हा ती खुदकन डोळे पुसत हसते.आणि जेव्हा तो फुल्ल चहा कटींग करून आळीपाळीने प्याल्यावर तीच आभाळं खरचं निरभ्र होतं,मनावरचं ओझं हलकं होतं म्हणून तो परत म्हणतो अगं वेडाबाई ह्याचसाठी मैत्री म्हणतोय तुला.

आणि मग ह्या चहाच्या साक्षीनचं परत दोघे शेवटच्या श्वासापर्यंत अंतापर्यंत मैत्रीसाठी बांधील राहण्याची जणू भीष्म प्रतिज्ञाच घेतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments