मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “समज आणि उमज…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “समज आणि उमज…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या  वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, “मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?” त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकांसाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित! त्याने जे उत्तर दिले ते असे…

१.आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.

२.मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.

३.आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना! 

४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.

५.आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी  एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.

६.आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.

७.आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.

८.ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.

९.आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.

१०.आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.

११.आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.

१२.आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.

१३.मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन  चिंता करत बसत

आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा

आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

आपण आपल्या लोकांसाठी कितीही सम्पत्ती जमविली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात, कटू आहे पण सत्य आहे कारण

आपली मुले आपल्या पोटी जन्माला आली आहे पण आपल्यासाठी जन्माला आलेली नाही ते, आपण त्यांना लावलेल्या मजबूत पंखानी स्वतःचे नवीन घरटे बांधायला व आकाशात उडायला आलेली आहेत हे लक्षात ठेवावे व अपेक्षा रहित जीवन जगावे म्हणजे त्रास कमी होईल

🌹खूप खूप शुभेच्छा (७०) सत्तरीच्या, वाटेवर असणाऱ्या मित्रांना, स्वतःची काळजी घ्या, व आपल्या अर्धांगिनीची ची काळजी करा l🌹
 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णस्पर्श… – लेखक : श्री विवेक घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कृष्णस्पर्श… – लेखक : श्री विवेक घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

‘कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन?’ 

कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.

भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.

कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल? कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.

‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते.

इकडे आमच्या विठुरायानेही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही…. औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते.

खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही… पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही.

रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना?

पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही?

तान्हे मूल कुणाचेही असो; गर्दी-गोंधळातही आपल्याकडे बघून गोड हसते तेव्हा आपल्याही ओठांवर स्मितरेषा दरवळते की नाही?

…… आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे.

…… अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.

…… मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.

……. माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले!

लेखक : श्री विवेक घळसासी

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ याला म्हणतात ‘Positive Thinking…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ याला म्हणतात ‘Positive Thinking…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

“याला म्हणतात” – Positive Thinking 🤣 🤣

— जराशी गंमत

शाळेत असताना टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे…. मी हातावरील छडीची घाण पुसत असे.

मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो. 😎  

माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत असत, कारण ते काहीही direct मला सांगायला घाबरत असत… 🤣 🤣 🤣

मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे. माझं हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव बराचवेळी ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत… 😅

कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती खडू माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत…

उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावा. 😮

परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक Z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam. संपेपर्यंत उभे राहत असत. 😟 🤣

कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,

कारण बाकी मुलांना मी व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातले सर्व विद्यार्थी व्यवस्थित दिसायला हवेत हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.🤣

शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती 

माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा करत असत व मैदानाला 5 फेर्‍या मारायला सांगितल्या जात असत.

त्यावेळी बाकी मुलं मात्र वर्गात घाम पुसत असत व कोंडलेल्या वर्गात गुदमरून शिकत असत. 🤣

मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत….

तू शाळेत का येतोस? … तुला ह्याची गरज नाहिये… 🤣

वाह!! काय ते सोनेरी दिवस होते! 😟

अजूनही आठवतात मला!! 😜

‌………. याला म्हणतात “positive thinking.” 😃😃

सरले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी……. 😇

लेखक : अज्ञात (म्हणजे …. एक अतिशय अभ्यासू, झुंजार, कर्मठ, विश्वासू आणि जागरूक विद्यार्थी) 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “साडेसाती…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “साडेसाती…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

एका मैत्रिणीने संदेश पाठवला, “कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहिशील का?”

मी, “तुला साडेसाती सुरू झालीय का?” असे विचारले.

त्यावर ती म्हणाली, “नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे. “

मी म्हंटले, ” मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल. “

त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, “झाला तुझा वाह्यातपणा सुरू?”

विनोदाचा भाग सोडला तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली….

कोणाची संपली?

कोणाची सुरू झाली?

काय म्हणून काय विचारता महाराजा, “साडेसाती”!

मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे.

शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते, म्हणून त्या कालावधीला साडेसाती असे नाव पडले. ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असेल तरी ती कोणालाही टाळता येत नाही. ज्योतिष मानत नाही, असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडातरी घाबरतो.

एक गोष्ट आहे…..

शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की “आमच्यातले कोण छान दिसते?”

प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले,

“लक्ष्मी येताना छान दिसते

आणि

शनी महाराज जातांना चांगले दिसतात. “

शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही.

दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते.

देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की…

“मी सरांशी गप्पा मारून आलोच” असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे.

एकदा त्यांना विचारले,

“तुम्हाला सर ओरडत नाहीत का? चुका काढत नाहीत का?”

देशपांडे म्हणाला, “ओरडतात. “

मी: ” तुम्हाला वाईट वाटत नाही का?”

देशपांडे: “वाटतं… , मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते… पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे. “

मी: “काय?”

देशपांडे: “एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो. साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो. ते मला म्हणाले, “देशपांडे चला, चहा पिऊ. “

चहा पितांना ते म्हणाले,

“देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो. जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे. घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते. आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे? गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात. वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते, साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते. त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही. “

शनी महाराज असेच असतात. पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो, त्यात शनीचा दोष नाही.

शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो.

साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते. माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो कारण व्हायचे ते होतेच. कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो. कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो. या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो.

टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला… अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे. कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात. वेळ नसेल तर भिजत जायचे, वेळ असेल तर थांबायचे, ही निर्णयक्षमता साडेसातीत येते. चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते. भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते.

चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही. आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो. मला वाटले, माझ्या लक्षात आले नाही, इतकं चालतं, अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात.

शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही. अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात.

शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही.

हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात.

डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं.

स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.

…. घाबरावे असे शनी काही करत नाही.

आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे. त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही, ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.

माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे.

गीतेत कर्मण्येवाधिकारस्ते असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात.

गीता, एकंदरीत संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो.

ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो. खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो. अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात.

आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते… साडेसातीत नाही तर एकूण आयुष्यातच…

मी म्हणेन ते, मी म्हणीन तसे, मी म्हणीन तेव्हा…. असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो.

माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही,

होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही,

तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही,

तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही.

एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते. आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते.

‘तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, ’ असे सांगते. मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले…..

त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले.

ही सत्यघटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ? हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. चूक न सुधारता नुसती सांगून उपयोग नाही.

साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते, त्या संधीचे सोने करावे.

ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायला लावतात.. माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही.

… साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात.

साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम.

मग आता सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????

शुभं भवतु !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निंदेचे फळ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “निंदेचे फळ…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

एकेकाळी एका राजाने ठरवले की, तो दररोज १०० अंधांना खीर खायला घालेल.

एक दिवस सापाने खीर असलेल्या दुधात तोंड घातले आणि दुधात विष टाकले. आणि 100 पैकी 100 अंध लोक विषारी खीर खाल्ल्याने मरण पावले. 100 लोक मारल्याचा पाप लागणार हे पाहून राजा खूप अस्वस्थ झाला. राजा संकटात सापडल्याने आपले राज्य सोडून भक्ती करण्यासाठी जंगलात गेला, जेणेकरून त्याला या पापाची क्षमा मिळावी.

वाटेत एक गाव आले. राजाने चौपालात बसलेल्या लोकांना विचारले, या गावात कोणी धर्माभिमानी कुटुंबे आहेत का? जेणेकरून रात्र त्याच्या घरी घालवता येईल. चौपालमध्ये बसलेल्या लोकांनी सांगितले की, या गावात दोन बहिणी आणि भाऊ राहतात, त्या खूप पूजा पाठ करतात. राजा रात्री त्यांच्या घरी राहिला.

सकाळी राजाला जाग आली तेव्हा मुलगी सिमरनवर बसली होती. पूर्वी मुलीचा दिनक्रम असा होता की, ती पहाटे उजाडण्यापूर्वी सिमरनसोबत उठून नाश्ता बनवायची. पण त्या दिवशी मुलगी बराच वेळ सिमरनवर बसून राहिली.

मुलगी सिमरन मधून उठली तेव्हा तिचा भाऊ म्हणाला की बहिण, तू इतक्या उशिरा उठलीस, आपल्या घरी एक प्रवासी आला आहे. त्यांना नाश्ता करून निघून जावे लागेल. सिमरनपेक्षा लवकर उठायला हवे होते. तेव्हा त्या मुलीने उत्तर दिले की, भाऊ, असा विषय वरती गुंतागुंतीचा होता.

धर्मराजला काही गुंतागुंतीच्या परिस्थितीत निर्णय घ्यायचा होता आणि तो निर्णय ऐकण्यासाठी मी थांबले होते, त्यामुळे बराच वेळ सिमरनवर बसून राहिले. तिच्या भावाने विचारले, ते काय होते? तर मुलीने सांगितले की एका राज्याचा राजा आंधळ्यांना दररोज खीर खायला घालायचा. परंतु सापाच्या दुधात विष टाकल्याने 100 अंधांचा मृत्यू झाला.

आंधळ्यांच्या मृत्यूचे पाप राजाला, नागाला किंवा दूध उघड्यावस्थेत सोडणाऱ्या स्वयंपाकी यांच्यावर फोडायचे की नाही हे आता धर्मराजाला समजत नाही. राजाही ऐकत होता. आपल्याशी काय संबंध आहे हे ऐकून राजाला रस वाटला आणि त्याने मुलीला विचारले की मग काय निर्णय झाला?

अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे मुलीने सांगितले. राजाने विचारले, मी तुमच्या घरी आणखी एक रात्र राहू शकतो का? दोन्ही बहिणी आणि भावांनी आनंदाने ते मान्य केले.

राजा दुसऱ्या दिवशी थांबला, पण चौपालात बसलेले लोक दिवसभर चर्चा करत राहिले की काल आमच्या गावात एक रात्र मुक्काम करायला आला होता आणि कोणी भक्ती भाववाला घर मुक्कामसाठी विचारत होता. त्यांच्या भक्तीचे नाटक समोर आले आहे. रात्र काढल्यानंतर तो गेला नाही कारण तरुणीला पाहून त्या माणसाचा हेतू बदलला. म्हणून तो त्या सुंदर आणि तरुण मुलीच्या घरी नक्कीच राहील अन्यथा मुलीला घेऊन पळून घेऊन जाईल. चौपालमध्ये राजावर दिवसभर टीका होत होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी पुन्हा सिमरनवर बसली आणि नेहमीच्या वेळेनुसार सिमरनमधून उठली. राजाने विचारले, मुली, आंधळ्यांच्या हत्येचे पाप कोणाला लागले? त्या मुलीने सांगितले, ते पाप आमच्या गावच्या चौपालात बसलेल्या लोकांत वाटले गेले.

तात्पर्य : निंदा करणे हा तोट्याचा सौदा आहे. निंदा करणारा नेहमी इतरांचे पाप स्वतःच्या डोक्यावर घेतो. आणि इतरांनी केलेल्या पापांचे फळही त्याला भोगावे लागते. त्यामुळे आपण नेहमी टीका (निंदा)टाळली पाहिजे.

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आभासी संवाद…’ – कवयित्री : वसुधा ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘आभासी संवाद…’ – कवयित्री : वसुधा ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

संवाद, संवाद कुठे हरवले?

इकडे तिकडे शोधून पाहिले

नाही कुठे सापडले

अरेच्चा !

हे तर मोबाईल मधे जाऊन बसले

*

बोटांना काम मिळाले

तोंडाचे काम कमी झाले 

शब्द मुके झाले

मोबाईल मधे लपून बसले

*

‘हाय’ करायला मोबाईल 

‘बाय’ करायला मोबाईल 

GM करायला मोबाईल 

GN करायला मोबाईल 

*

शुभेच्छांसाठी मोबाईल 

‘भावपूर्ण श्रद्धांजली’ साठीही मोबाईल 

खरेदीसाठी मोबाईल 

विक्रिसाठी मोबाईल 

*

नाटक, सिनेमांची तिकिटं मोबाईल वर

बस, ट्रेन, विमानाची तिकिटं मोबाईल वर

शाळा, कॉलेज ची फी मोबाईल वर

डॉक्टरांची फी मोबाईल वर

*

वेळच नाही येत आता दुस-यांशी बोलण्याची

बोलता बोलता चेह-यावरचे भाव टिपण्याची

वेगवेगळ्या ‘इमोजी’ धावून येतात मदतीला

दूधाची तहान ताकावर भागवायला 

*

आता शब्द कानांना सुखावत नाहीत

आता शब्द ओठांवर येत नाहीत

आता शब्द कोणी जपून ठेवत नाही

आता शब्द-मैफल कुठे भरतच नाही

*

मोबाईलवरील संवादाला अर्थ नाही

प्रत्यक्ष संवादातील मौज इथे नाही

आभासी जगातले संवादही आभासी

अशा संवादांचा आनंद नाही मनासी

*

म्हणून,

या, चला प्रत्यक्ष भेटूया

आभासी संवादाला मूर्त रूप देऊया!

कवयित्री : वसुधा

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसी रंग में रहना रे बंदे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ उसी रंग में रहना रे बंदे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

अध्यात्मिक रंग होळीचा…

एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगाऱ्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की “मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत… मला ही एक रंगाची बादली देण्यात यावी…“

…. हा रंगारी कृष्णभक्तीत आधीच रंगला होता म्हणून त्याने एक बादली रंगाची भगवंताला दिली… ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ओरडून म्हणू लागले की ….

“मी सर्वांची वस्त्रे रंगविण्याचे कार्य करीत आहे. ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी “फुकट” ही वस्त्रे रंगवुन घ्यावी. कोणताही मोबदला देण्याची गरज नाही… “ 

हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. कोणी आपले धोतर… तर कोणी आपली साडी… कोणी आपले उपरणं… तर कोणी आपला सदरा देण्यास सुरवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल… तर कोणी पिवळा… कोणी निळा तर कोणी गुलाबी… भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवूनही देत होता.

असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरवात झाली. भगवान कृष्ण आपली बादली उचलून निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोषाख केलेला माणूस भगवंतासमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे उभा राहिला. तो म्हणाला “ माझेही एक वस्त्र रंगवून हवे आहे. ” 

भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, “ दे तुझे वस्त्र… कोणत्या रंगात रंगवून हवे आहे…? ? “

तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला… “ त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे. अरे कृष्णा… हे भगवंता… सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे पण या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस. ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग… पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे. कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल.. पण तुझा रंग निःस्वार्थाचा आहे… माझा रंग अहंकाराच्या पूर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तिचा आहे… माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल.. पण तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभूतीचा आहे…. म्हणून ” जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा “… तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व… तू आहेस तरच मी आहे, तू नाही तर मी नाहीच… म्हणून संतांनी लिहिले की….

उसी रंग में रहना रे बंदे,

उसी रंग में रंगना….

जिस रंग में परमेश्वर राखे,

उसी रंग में रंगना….! ! !

होळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…! ! ! 

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझी विपुल शब्दांकित मराठी भाषा…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “माझी विपुल शब्दांकित मराठी भाषा…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

मायंदाळ म्हणजे काय? – बक्कळ 

बक्कळ म्हणजे काय? – पुष्कळ 

पुष्कळ म्हणजे काय? – लय 

लय म्हंजी काय? – भरघोस 

भरघोस म्हणजे काय? – जास्त 

जास्त म्हणजे काय? – भरपूर 

भरपूर म्हणजे काय? – खूप 

खूप म्हणजे काय? – मुबलक 

मुबलक म्हणजे काय? – विपुल 

विपुल म्हणजे काय? – चिक्कार

चिक्कार म्हणजे काय? – मोक्कार 

मोक्कार म्हणजे काय? – मोप 

मोप म्हणजे काय? – रग्गड 

रग्गड म्हणजे काय? – प्रचंड 

प्रचंड म्हणजे काय? – कायच्या काय 

कायच्या काय म्हणजे काय? — लय काय काय 


– आता तरी कळलं का.. काय ते…….

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाचे लक्ष आहे बरं का… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ देवाचे लक्ष आहे बरं का… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?

ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ.

मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही. “

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे. “

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे? ” “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!

काही बोलणार इतक्यात मागून आई आली…

एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो.

अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे…

मी जिथे असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते माझ्या पुढ्यात आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..

मी म्हटले ” प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊदे. “

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता.

ऑफिसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”….

ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यां बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काहीं न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.

संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, ” भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा. ” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते.

घरी पोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला.

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, ” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते! “

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले, ” आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही. ” खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की, ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल!

देवाचे लक्ष आहे बरं का….

लेखक : अनामिक

प्रस्तुती – श्री अनिल वामरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जरूरी आहे आपल्यात बदल करण्याची…” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “जरूरी आहे आपल्यात बदल करण्याची…” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

 “  “ लेखक : अनामिक प्रस्तुती : शोभा जोशी 

जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!


“आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे.

क्लासमध्ये बघायला या, नाही तर मी बोलणार नाही! “

… ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो.

माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त.

मी बावरतच वर्गात नजर फिरवली. मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी, मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली.. “ माय फादर. ” मीही ‘गुडमॉर्निंग’ म्हणालो.

टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, “ हिच्या नावापुढे सही करा. “

मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, ‘खरेच एवढे बिझी आहोत का आपण? ’

विचारातच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, “ बसून बघा सगळे पेपर. ” असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या.

मी तिच्या बेंचवर कसा तरी बसलो. बाजुला माझं बाळ. अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५, ३६. कुठे ३२.

– – टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन, माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय, १० मध्येही नसेल याची खात्री झाली. मीही मग चुकलेली प्रश्नोत्तरे बघायला लागलो.

.. उत्तरे व्यवस्थित सुवाच्च सुटसुटीत लिहिलेली. चुकीचं उत्तरही छान लिहिलेलं.

मी तिच्याकडे पाहताच ती हसत जीभ चावायची. तिने असं केलं.. की मी रागवू शकत नाही म्हणून.

“बाबा, इथे माझी गडबड झाली म्हणून चुकलं! “

“आता तुला याचं बरोबर उत्तर माहित आहे का? ” – मी.

“हो. सगळी माहीत आहेत. “

“मग ठीक आहे. चुकू दे उत्तर. मार्क मिऴालेत समज”

“कसं काय? ” ती गोंधळली.

“बरोबर उत्तरे विसरण्यापेक्षा चुकलेले प्रश्न लक्षात ठेवलेले बरे. ” मी उत्तरलो.

ती परत ‘का? ‘

“कळेल नंतर! ” मी

मीही भरभर पेपर बघितले व टीचरना परत दिले. धन्यवाद देऊन मुलीला घेऊन बाहेर पडलो.

तिला उचलून कडेवर घेऊन पाय-या उतरत होतो तेवढ्यात जिन्यात इंग्रजीत सुविचार दिसले. तिला ते वाचायला लावले. तिने ते वाचले पण अर्थ तिला कळाला नव्हता.

मग मी तिला ते सुविचार उदाहरणासहित समजावून दिले. पहिल्या मजल्यावर येईस्तोवर तिला एक सुविचार पाठही झाला.

अचानक काही तरी आठवल्यासारखं मुलीनं विचारलं, “ बाबा तुम्ही टीचरना काहीच का नाही विचारलं? ”

“काहीच म्हणजे? “

“म्हणजे की मार्क कमी का मिळाले, मी दंगा करते का ते? घरी कधी कधी दमवते, टीव्ही बघत अभ्यास करते, अशी तक्रार पण नाही! “..

मला हसू आलं.

मी तिला हसतच विचारलं, “तू शाळेत कचरा करतेस का? “

“नाही”. – ती.

“सगळ्या टीचरना रिस्पेक्ट देतेस? “

“हो”.

“तुझ्याजवळ नेहमी एक इरेजर, शार्पनर, पेन्सिल एक्स्ट्रा असते, ते तू कुणाला लागलं तर लगेच देतेस? “

“हो”.

“रोज एकाच बेंचवर न बसता सगळ्यांशी मैत्री करतेस? ‘

“हो”.

“नेहमी खरं बोलतेस? “

परत “हो”

“लगेचच मनापासून सॉरी आणि थॅंक्यु म्हणतेस ना?

‘हो बाबा हो.. किती विचारताय हो? ‘

“मग ठीक आहे बेटा. या बदल्यात थोडे मार्क गेले, अध्येमध्ये घरी दमवलं तर चालतंय मग. ” मी म्हणालो.

“ का पण? “

“हेच तर शिकायचंय आता तुला”

“आणि मार्कं, शिक्षण, पहिला नंबर?

“बेटा दुसरीचे मार्क दाखवून जीवनात काही मिळणार नाही आणि शिक्षण काय? कायम चालुच असतं. “

…. सगळं तिच्या डोक्यावरुन गेलेलं. ती जरा उचकुनच म्हणाली,

“बाबा, मी मोठी झाल्यावर मला तुम्ही नक्की काय करणार आहे? “

तिच्या डोळ्यात बघुन मी म्हणालो, “सुसंस्कृत”.

…. परत एकदा डोक्यावरुन गेलं. कळावं म्हणुन ती म्हणाली, “ त्यासाठी मी काय करायचं नक्की. ”

मीही लगेच तिला धीर देत म्हणालो, “फार काही नकोस करू. आता जशी आहेस तसं तु कायम रहा! “

“मग ठीक आहे बाबा” तिच्या जीवात जीव आला.

एक दोन पाय-या उतरल्यावर ती परत म्हणाली, “बाबा, माझा रिझल्ट काय होता? मी पाहिलाच नाही की? “

मी म्हणालो, “रिझल्ट? तू दुसरी पास होणार! “

…. पास शब्द ऐकताच तिचा चेहरा आणखी खुलला. माझ्या खांद्यावर मान ठेऊन लाडीक स्वरात कानात म्हणाली,

“म्हणजे बाबा, आजही तुम्ही मला एक बटरस्कॉच आईस्क्रिम देणार ना? “

मीही हसत तिला घट्ट छातीशी धरत ‘Yes’ म्हणलं.

 

हीच खरी शिकवण कुठे तरी लोप पावत चालली आहे, आणि आपण चुकीच्या मार्गाने आपल्या मुलांचे मूल्यमापन करत आहोत। 

…. जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!

लेखक : अनामिक

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares