मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : आईस्फ्रूट… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : आईस्फ्रूट… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“ ए आये घी ना त्यो आईसफ्रुटचा लाल लाल गोळा… मला पाहिजी म्हंजं पाहिजीच.. लै दात शिवशिवालया लागल्यात बघ…गाडी सुटायच्या आदुगर मपल्याला हानून दी.. ती बाकिची पोरास्नी त्याचं आई बा कसं घेऊन देत्यात बघं तिकडं.. ती पोरं माझ्याकडं बघून तोंड वाकडं करूनदावत खिदळतात बघं.. तुला न्हाई तुला न्हाई म्हनून चिडीवित्यात… आये  तू बापसा संग भांडान काढूनशान निघालीस माहेराला… मला अंगावरच्या फाटक्या बंडीवर तसच उचलून.. खाली चड्डी तरी हाय काय नाय ते बी तूझ्या ध्यानात नाही… तापलेल्या इंजिनावनी डोस्कं तुझं संतापलेलं.. उन्हानं कावलेली एस.टी. पकडली…तापलेली सीट,झळा मारणारा वारा जीवाची लाही लाही करत,फारफुर फारफुर करत उर धपापत वेगानं धावणारी ती एस. टी…आतल्या माणसांना बेजार करत रस्ता कापत निघालेली.. सोताच्या इचाराच्या गुंतवळयात आडकलेली .माझी बी खबर घेईनास तू.. बा पोरं भुकेज्याल़ं असलं.. तहान लागली असलं काय बी कळंना तूला… म्या सारखं आये आये म्हनून कवाधरनं मागं लागलूया परं.. तू गप. बैस किरं मुडद्द्या.. बापावानीच छळतूया मेला म्हनून माझयावरच ढाफरतीस… मी तुझ्याच पोटचा गोळा हायं नव्हं मगं मला दि की  त्यो गोळा …न्हाईतर हि खिडकीची दांडीच कडाकडा मोडून खातो बघ… मगं दात तुटलं तरं बेहत्तर…  नि बा ला माघारी बोलवायला  आल्यावर तुला लै रागवायला सांगतो का न्हाई बघ !..” . 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : काय भुललासी वरलिया रंगा.… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : काय भुललासी वरलिया रंगा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“साहेब रागावणार नसाल तर एक सांगु का तुमास्नी ! ह्यो तुमच्या पायातल्या बुटाची जोडी बघा अस्सल चामड्याची हायं बघा… त्येला नुसतं साधं पालीस करत जा..ते जेव्हढं नरम राहिलं तेवढा बुट चांगला टिकंल नि चालताना पायाला बी लै आराम वाटंल… ते चमकणारं पालीस याला बिलकुल वापरू नगा… ते काय वरच्या वर चमकत राहतयं त्येचं काय खरं नस्तया…म्या बी साधंच पालीस करून देतू.. चालंल नव्हं तुमास्नी?.. “

.. ” मालक , पण तो बुट आधीच तसला, त्यातं तुम्ही त्याला साधं पालीस करायला सांगताय… मग तो चमकदार दिसणार कधी? चारचौघात माझी इमेज उठून कशी दिसेल? मालक तुमचा तो पूर्वीचा जमाना गेला, आता सारं काही दिसण्यावर जगरहाटी चाललेय !.. फॅशनबाज कपडा, चेहऱ्याला रंगरंगोटीचा मुलामा, डोक्यावरचे केसांचं कलप केलेलं टोपलं, डोळ्यावर काळा निळा चष्माची झापडं नि पायात भारी किंमतीचे ब्रॅंडेड बुट असा जामानिमा असल्याशिवाय माणूस जगात आपली छाप उमटवू शकत नाही… असा जो नाही तो आजच्या जमान्यात पुवर चॅप, मागासलेला ठरतो.. कुणीच त्याला विचारत नाही.. मग त्याची उपासमार होणार कि नाही… मालक एक वेळ घरात जेवायला नसलं तरी चालतं पण माणसानं दिसायला अगदी भारी असलं पाहिजे..आणि तुम्हाला कसं काय कळलं या बुटाचं चामडं अस्सल आहे ते? “

“साहेब तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे.. आजचा जमाना वरच्या दिखाव्यालाच भुलतो बघा.. त्याला आतला माणूस ओळखता येत नाही…दिखाव्यातचं सारं आयुष्य घालवून आपून काय मिळविलं तर मोठं शुन्य…उगा आपला खायला कार नि भुईला भार होऊन राहण्यात काय मतलब… काही विचारानं चाललं आचारानं वागलं तरचं आपल्या बरोबर समाजाचं बी भलं होईल.. ते जिणं बघा कसं सोन्यावाणी चमचमणारं असतयं… अन जे चमकतयं ते समधं सोनं कुठं असतया… हि ओळखण्याची पारख माणसात असायला हवी… तुमच्या पायातला बुटाचा जोड हा अस्सल चामड्याचा आहे हे म्या वळखणार नाही तर कोण वळखणार ..  तिथं पाहिजे जातीचे ते येरागबाळयाचं काम नोहे… आणि अस्सल असतं तेची किंमत असते… त्येला बाहेरची कशाची जोड लागत नसते.. माणूस दिसायला साधा असला तरी विचारानं  भारी असल्यावर चारचौघात चमकल्याबिगर राहत नसतो… ते चोखोबा  सांगुन गेलं नव्हं का…… 

“ काय भुललासी वरलिया रंगा… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दुभंगलेले पाणी… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ दुभंगलेले पाणी… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… ” तुला हजार वेळा बजावून देखील का येतेस या विहिरीवर पाणी भरण्यासाठी… या विहिरीवर फक्त गावातल्या उच्च जमातीच्या लोकांना पाणी भरण्याचा हक्क आहे… तुमच्या सारख्या कनिष्ठ जमातीला हिथं पाण्याचा थेंब देखील मिळणार नाही… आणि हे सांगुन देखील तू इथं रोजच सकाळ पासून उभी असतेस… तुझी सावली या विहिरीवर पडली तर त्यातले पाणी विटाळले गेले तर आम्हाला पाणी कसे बरे मिळेल… तुला इथचं उभी राहण्याची हौस जर असेल तर जरा या विहिरी पासून दूर उभी राहा कि जरा… आमच्या घरी कडक सोवळं ओवळं पाळलं जातं म्हटलं… गावाच्या कोसोदूर असलेल्या या विहिरीवरून पाणी न्यायची तंगडतोड करावी तेव्हा कुठे घरातले आम्हाला दोन वेळेचं खाऊ पिऊ घालतात घरात ठेवून घेतात…तुझ्या सारखं नाही.. सकाळीच तुला त्यांनी इथं पाण्यासाठी पिटाळली कि बसले ते दिवसभर चकाट्या पिटायला घराच्या ओट्यावर.. संध्याकाळ पर्यंत पाण्याचा एखादा माठ भरून घरी नेलास तरी तुझं किती कौतुक करत बसतात… आणि आमच्या घरी आम्हाला मात्र जरा उशीर होण्याचा अवकाश लाखोली वाहत असतात.. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आम्हाला… जा जा दुसरीकडे कुठे विहीर शोध जा.. इथं बिलकुल थांबू नकोस.. “

… ” ताई आपल्या गावात हिच एक विहीर आहे हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे… तुमची उच्च जमातीच्या घरांपेक्षा आमची कनिष्ठ जमातीची घरं हाताच्या बोटावर मोजता येणारी.. या वैराण वाळवंटात  शेकडो मैल दूरवर गाव नि वस्ती आहेत.. तिथं देखील एखादं दुसऱ्या विहिरींना पाणी आहे.. आता आपल्या गावाची हिच विहीर गावकुसाबाहेर कोसांवर असल्यानं तुम्हाला पाणी नेण्यासाठी किती सायास करावे लागतात मगं आमची काय कथा… तुमचं सगळयांच भरून झालं  कि द्याल आम्हाला प्रत्येकाला निदान दोन दोन घागरी.. एक पिण्याला नि दुसरी स्वयंपाकाला… भागवून घेऊ आम्ही कसंतरी… पण तुम्ही नाही म्हणू नका.. पाणी देण्याचं पुण्य तेव्हढं तुम्हाला नक्कीच मिळेल… माणसांसारखी माणसचं आहोत आपण एकाच आकाराच्या देहाची, जन्माने उच्च निच्च माणसात भेदभाव जरी झाला तरी माणुसकी मात्र अभेद्य असते कि… तहान भूक जशी तुम्हाला तशीच ती आम्हालाही आहेच कि.. त्यांना कुठे असतो भेदभाव… तुमचे माठ मातीचे आणि आमचेही त्याच मातीपासून बनलेले.. प्रत्येक माठामाठात भरलेले पाणी  हे त्या विहिरीतलेच एकच आहे.. ते तुमच्या माठातले सोवळयाचे नि आमच्या ओवळयातले हा भेदभाव पाणी कुठं करते.. त्याला फक्त तहानलेल्याची तृष्णा भागविणे एव्हढेच ठाऊक असते… आपला स्त्री जन्मच मुळी अभागी आहे बघाना.. तुम्हाला तुमच्या घरी दासीचं जिणं जगावं लागतयं तेच आमच्या घरी सुद्धा चुकलेलं नाही.. या पुरुषसत्ताक परंपरेत स्त्रियांच्यावर अन्याय होत आलेत आणि आपण सगळ्या आपापल्या कोषात राहून मूकपणे सहन करत आहोत.. आपण आपापसातील दरी जर मिटवली नाही तर या अन्यायाचं परिमार्जन कसं करणारं… एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीचं दुख समजू शकते.. कारण स्त्रीच्या हृदयात प्रेमाचा झरा अखंडपणे स्त्रवत असतो…माझी हि बडबड कदाचित तुम्हाला आवडणार नाही.. पण तो दिवस दूर नाही…स्त्रीचं समाजाचं नव्यानं परिवर्तन घडवून नक्की आणेल… पाण्यात काठी मारुन भेद होत नसतो… हेही लवकरच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कण कण वेचिताना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कण कण वेचिताना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… असं म्हणतात की जो इथं जन्माला आला त्याच्या अन्नाची सोय झालेली असतेच. अर्थात चोच आहे तिथे चाराही असतो.. फक्त ज्याला त्याला तो शोधावा लागतो.. त्यासाठी त्याला जन्मताच मिळालेले हातपाय योग्य वेळ येताच हलवावे लागतात.. असेल माझा हरी देई खाटल्यावरी असे भाग्यवंत खूप विरळे असतात.. अदरवाईज जिथे जिथे दाणा पाणी असेल तिथवर यातायात हि करावीच लागते.. बरं पोटाची व्याप्ती पण एकच एक दिवसाची असते.. होय नाही तर ते एकदा ओतप्रोत.. नव्हे नव्हे तट्ट ( फुटेपर्यंत) भरले एकदा आता पुढे चिंता मिटली असं का होतं. तुमचा आमचा अनुभव असा तर अजिबात नाही ना हे सर्व मान्य अक्षय सत्य आहे. दुसरं त्यात पहाना आपलं एकटयाचंच उदरभरणाची गोष्ट असती तर एकवेळ थोडा पोटाला चिमटा घेऊन रोजची हि दगदग न करता एक दोन दिवसाच्या फरकाने चाऱ्याचा शोधात हिंडता आले असते. पण तसं नशिबात नसतं. आपल्या बरोबर आपलीच रक्तामासाची, आपुलकीच्या वीणेने बांधलेली नाती यांची जबाबदारी …घरटयातला कर्त्याला कर्तव्य चुकत नसतं.. अन मग रोज मिळालेला चारा सर्वांना पुरणारा नसेल तर स्वताच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो तो खऱ्या अर्थाने. तैल बुद्धीच्या माणसांसारखा हा अन्नाचा साठा करून ठेवण्याची क्षमता आमच्या पक्ष्यांच्या घरटयात नाही.. त्यामुळे फार काळ साठवलेले अन्नधान्य नाहक नाशवंत होण्याचा धोकाही होत नाही…उन्हाळ्या असो वा पावसाळा, वा हिवाळयाचा कडाका , दाण्याच्या शोधात गावात करावा लागतोच फेरफटका… हि आम्हाला पक्ष्यांना नैसर्गिक शिकवण दिलीयं.. गरजेपुरते आजचे घ्या आणि इतर भुकेलेल्यांना शिल्लक ठेवा निस्वार्थ बुद्धीने.. त्यामुळे कधीही कमतरता पडलीच नाही, भुकबळी झालाच नाही, ना चाऱ्यासाठी आपापसांत भांडण तंटे, चोऱ्यामाऱ्या झाल्या नाहीत.. जे आम्हाला माणसांच्या जगात नेहमी दिसत आलयं.. जे मिळालयं त्यात तृप्तता आमच्या अंगाखांद्यावर दिसून येते..निसर्गत: सामाजिक बांधिलकीची समज असते ती आपल्या सर्वप्राणीमात्रात फक्त आम्हाला उमजलीय .. नि तुम्हा मानवांना स्वार्थाचा तण जो असतो तो मात्र उमजून घेण्याची तसदी घेत नाही… ती लवकरच उमजून यावी हि त्या जगनियंत्याला प्रार्थना..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ – “स्त्रीचा पदर…”– अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ 🌹 “स्त्रीचा पदर…” – अज्ञात 🌹 ☆ प्र्स्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  ☆

पदर काय जादुई शब्द आहे !! हो मराठीतला !!

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द.

पण केवढं विश्व सामावलेलं आहे त्यात….!!

किती अर्थ, किती महत्त्व…

काय आहे हा पदर……!?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा भाग..!

तो स्त्रीच्या ” लज्जेचं रक्षण” तर करतोच. सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं..!

पण,आणखी ही बरीच “कर्तव्यं” पार पाडत असतो..!

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल ते सांगताच येत नाही..!?

सौंदर्य खुलवण्यासाठी “सुंदरसा” पदर असलेली ” साडी” निवडते..! सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते.

सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. …..!!

लहान मूल आणि

“आईचा पदर “

हे अजब नातं आहे.!

मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन ” अमृत प्राशन” करण्याचा हक्क बजावतं……!!

जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा ” पदर ” पुढे करते..!

मूल अजून मोठं झालं., शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या ” पदराचाच आधार ” लागतो..!

एवढंच काय…! जेवण झाल्यावर हात धुतला, की टाॅवेल ऐवजी “आईचा पदरच” शोधतं आणी आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात मुलानं पदराला नाक जरी पुसलं तरी ती रागावत नाही..!

त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला ” आईचा पदरच ” सापडतो…..!!

महाराष्ट्रात तो ” डाव्या खांद्या वरून ” मागे सोडला जातो…..!!

तर गुजराथ, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो..!

कांही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात..!

तर काही जणी आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं ” पदरच ” झटकतात..!

सौभाग्यवतीची “ओटी “भरायची ती पदरातच अन्‌ “संक्रांतीचं वाण “लुटायचं ते ” पदर ” लावूनच..!

बाहेर जाताना ” उन्हाची दाहकता ” थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर ओढला जातो.!

तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच ” छान ऊब ” मिळते….!!

काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच ” गाठ ” बांधली जाते..

अन्‌ नव्या नवरीच्या

“जन्माची गाठ ” ही नवरीच्या पदरालाच.

नवरदेवाच्या उपरण्यासोबतच बांधली जाते…..!!

पदर हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना…!?

नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते..!

पण संसाराचा राडा दिसला..! की पदर कमरेला खोचून कामाला लागते..!

देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना …..?

माझ्या चुका ” पदरात ” घे..!

मुलगी मोठी झाली, की “आई ” तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय म्हणते अगं.! चालताना तू पडलीस तरी चालेल..! पण, ” पदर ” पडू देऊ नकोस !

अशी आपली भारतीय संस्कृती…!

अहो अशा सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा ” विनयभंग ” तर दूरच ती रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करून साधे पाहणार ही नाहीत..!

ऊलटे तिला वाट देण्यासाठी बाजुला सरकतील एवढी ताकत असते त्या पदरात..

ही आहे आपली भारतीय संस्कृती…

संग्राहिका – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे ,प्रिया जाऊ नको रे!..आकाशीच्या चांदण्या वसुंधेरवर उतरल्या आणि आपल्या प्रियतमाला साद देऊ लागल्या. आकाशी चंद्र आता एकाकी पडला.चांदण्याच्या विरहाची काळी चंद्रकला उदासीचे अस्तर लेवून आभाळभर पसरली.चंद्र अचंबित झाला. त्याला कळेना आज अशा अचानक मला सोडून वसुंधेरवर कुणाच्या मोहात या चांदण्या पडल्या!माझ्याहून सुंदर प्रेमाचा कारक असा वसुंधेरवर कोण भेटला?कालपर्यंत तर माझ्या अवतीभवती राहून आपल्या प्रेमाने रुंजी घालत असणाऱ्यांना, प्रत्येकीला मनातून आपला स्व:ताचाच चंद्र मालकीचा हवा असा वाटत होते.. मी त्यांचे मन केव्हाच ओळखले होते. प्रेमाच्या चंदेरी रूपेरी प्रकाशी त्या सगळयांना मी सामावून घेतलेही होते. कुठेही राग रुसवा, तक्रारीला जागा नव्हती. अगदी दृष्ट लागण्यासारखीच आमची अशी अक्षर प्रीती होती कालपर्यंत. पण आज पाहतो त्या प्रेमाचा माझ्या नकळत त्यांनी ब्रेक अप करावा.. ना भांडण, ना धुसफूस ना शिकवा ना गिलवा. हम से क्या भुल हुई जो हम को ये सजा मिली…एक, दोन गेल्या असत्या तर समजून गेलो असतो.. पण इथं तर एकजात सगळ्याच मला सोडून गेल्या .आपापल्या मालकीचा स्वतंत्र चंद्राबरोबर बसून मलाही त्या दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे.. करून साद देत सांगू लागल्या ये रे ये रे तू देखिल इथं खाली वसुंधेरवर ये आणि तुला आवडणारी एखादी चांदणीशी सुत जुळव . आणि आता आपण सगळेच या वसुंधेरवर प्रीतीचं नंदंनवन करुया… म्हणजे पुन्हा गोकुळात रासलिला.. छे छे किती अनर्थ माजेल… नको नकोच ते. 

.. मी त्यांना म्हटलं हा काय वेडेपणा मांडलाय तुम्ही.. त्या वसुंधेरवरची लबाड प्रेमी जन मंडळी आप आपल्या प्रियतमेला हवा तर तुला आकाशीचा चंद्र, चांदण्या आणून देतो असं आभासमय ,फसवं आश्वासन देऊन आपल्या प्रीतीची याचना करतात.. ते आपण इथून दररोज वरून पाहात आलोय कि.. कुणाचं सच्च प्रेम आहे आणि कोण भुलवतयं हे आपल्याला इथं बसून बघताना आपलं किती मनोरंजन व्हायचं.. आणि आणि ते सगळं पाहता पाहता आपण सगळे मात्र नकळत मिठीत बांधले जात असताना, त्या प्रेमाचे टिपूर चांदणे वसुंधेरवर सांडले जात असे… मग असं असताना आज अचानक तुमची मिठी रेशमाची सैल होऊन गळून का जावी.. अगं वेड्या बायांनो दूरून डोंगर.. आपलं वसुंधरा.. साजरे दिसतात हे काय वेगळं सांगायला हवं का मी तुम्हांला… आज तुम्ही ज्याला भुलालय तो जरी तुम्हाला मालकीचा स्वतःचा चंद्र गवसला असलाना तर तो तुमचा भ्रम आहे बरं.. अगं ते चंद्र नाहीत तर चमचमणारा काचेचा चंद्र आहेत.. तुमच्या सौंदर्यावर भाळलेला..भ्रमरालाही लाज वाटेल अशी चंचल वृत्तीची प्रिती असते त्यांची.. मग तुम्हाला ही आकाशीचा तो चंद्र आणून देतो हया फसव्या थापा मारतील.. आणि आणि त्यानंतर हळूहळू जसं जसं तुमचं सौंदर्य अस्तंगत होत जाईल ना तसा तसा तुमच्यातला त्याचा इंटरेस्ट कमी कमी होत जाऊन तो नव्या सौंदर्यवतीच्या शोधात राहिल.. मग तुमची काय गत होईल?..इथं निदान कालगती ने तुम्हाला उल्का होउन खाली तरी जाता येत होतं पण तिथं वसुंधेरवर तुम्हाला उल्का सुद्धा होता येणार नाही… 

तेव्हा सख्यांनो हा वेडेपणा सोडा या बरं परत आपल्या ठिकाणी . दिल पुकारे आरे आरे… सुलगते साइनेसे धुवाॅं सा उठता है लो अब चले आओ के दम घुटता है…. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ रासलीला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ रासलीला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

माझे मन तुझे झाले..

 तु आणि मी आता एकरूप झालो. 

अद्वैताचे निधान लाभले. 

असोनी लौकिकी संसारी मी तुलाच वाहिली जीवाची कुर्वंडी.. बासरीच्या मोहक धुनी धावत आले यमुना थडी. 

गुंतले गुंतले मन तुझ्यात 

 सोडविले मला तू संसाराच्या कह्यात.. 

बोल लाविती निंदा करती गणगोत किती

जनरितीचे भान हरपले चाड ना उरली कसली ती, 

तु माझा कृष्ण सखा नि मी तुझी सखी. 

मी तू तद्रूप झाले यमुनेच्या जळासारखी

कान्हा माझाच असे तो एकटीचा…

 

…हो हो मीच असे फक्त तुझाच एकटीचा 

कान्हा सांगे कानात एकेकीचा .. 

रंग रंगली ती रासलिला.. 

धावो आले सगळे गाव यमुनातीरी 

धरुनी आणाया आप आपल्या कुल स्त्रीला

मग कृष्णे केली माव दाविली आपली लिला

गोपिकांच्या वस्त्रप्रावरणात गोकुळात

 दिसे नयनी एकच निलकृष्ण तो अनेकात

भाव विभोर ते भवताल दंगले.. 

अद्वैताचे निधान लाभले. 

माझे मन तुझे झाले..

यमुनेचेही जल प्रेमाने सलज्ज लाजले.. 

तरंग तरंग लहरी लहरी उठते झाले.. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ न उमजलेले अश्रू… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ न उमजलेले अश्रू … ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही… 

मग डोळेच येतात धावून नि भावनेचा ओघ घेतात सामावून.. क्षणभर होते त्यांची कालवाकालव अन आसवांची करतात जमवाजमव.. 

तरारलेले अश्रू पूर्ण डोळे एकेक थेंब ओघळू लागतात..

पाहशील का एकदाच डोळयात माझ्या,दिसतेय का तुला अर्थपूर्ण हळवी भावना असे मुके हुंदके सांगत असतात.. ओथंबलेली डोळ्यातली आसवं पापणीच्या किनाऱ्यावर जलबिंदूची नक्षी काढतात.. 

अन तर्जनी नकळत फिरते तिथे अलगद अलवारपणे टिपून घेते किनाऱ्यावर साचलेले अश्रूबिंदू… 

एखादा उन्मळून वाहिलेला भावनेचा कड गालावरून जेव्हा स्यंदन करत ओघळतो.. 

भर भावुकतेचा वाहून गेला तरी सल त्याचा उरी टोचतच राहतो…

आणि आणि या आवेगाची आठवण जेव्हा जेव्हा त्या क्षणाला येते तेव्हा तेव्हा ही अशीच आसवांची रिमझिम बरसून जाते… 

मन गलबलून येते नि… 

काळजाला भिडते असे काही तेव्हा शब्दात मांडले जातेच असे नाही.

.फक्त डोळेच सांगुन जातात सर्व काही…

समजण्या पलिकडचे जे कदापि उमजतच नाही… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जीवनपथ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जीवन पथ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“.. ये ये असा भांबावलास का? “

“..आणि या वळणावरून पुढे चालता चालता थांबलास का? “

“..हाच आपला मार्ग बरोबर असेल ना ? ही शंका का आली बरं तुला?”

“..इतका मजल दरमजल करीत प्रवास करून मध्य गाठलास आणि आता या वाटेवरून पुढची वाटचाल करण्यास घुटमळतोस का ?.”

“…निर्णय तर त्यावेळी तूझा तूच घेतला होतास! याच वाटेवरून जाण्याचा आपलं इप्सित साध्य इथेच मिळणार असा आत्मविश्वासही त्यावेळी तुझ्या मनात होता की!”

“..ते तुझं साध्य गाठायला किती अंतर चालावे लागेल, त्यासाठी किती काळ ही यातायात करावी लागेल याचं काळ काम नि वेगाचं गणित तूच मनाशी सोडवलं होतसं की! उत्तर तर तुला त्यावेळीच कळलं होतं .”

.”. वाटचाल करत करत का रे दमलास!, थकलास! इथवर येईपर्यंत चालून चालून पाय दमले..आता पुढे चालत जाण्याचं त्राण नाही उरले..”

“..घे मग घटकाभर विश्रांती.. होशील पुन्हा ताजातवाना, निघशील परत नव्या दमाने. काही घाई नाही बराच आहे अवधी .”

“.ही काय कासव सश्याची स्पर्धा थोडीच आहे? अरे इथं कुणी हारत नाही किंवा कुणी जिंकत नाही. कारण हा आहे जीवन प्रवास आदी कडून अंता कडे निघालेला.. “

“..पण पण कुणालाही न चुकलेला. जो जो इथे आला त्याला त्याला याच वाटेवरून जावं लागलंच.. हा प्रवास मात्र ज्याला त्याला एकटयालाच करावा लागतो.. “

.”.साथ सोबत मिळते ना घडीची पण निश्चित नसते तडीची. “

“..तू पाहिलेस की कितीतरी जणांचे चालत गेलेल्यांचे पावलांचे ते ठसे , त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूनच तू ही चालत निघालास .काही पावलंं तुझ्या बरोबरीने चालली त्यात काही भरभर पुढे निघून गेली तर काही मागे मागेच रेंगाळली.. “

“..पण तू ठरवलं होतसं की आपण चालायचं अथक नि अविरत त्या टप्यापर्यंत..आणि हे ही तू जाणून होतास या वाटेने जाताना चालणे हाच एकमेव पर्याय आहे इथं दुसरं वाहन नाही मुळी. “

.”.आशा निराशेच्या दिवस रात्री दाखवत असतात मैलाचा टप्पा

..सुखाच्या सावलीचे मृगजळ दुःखाच्या उन्हात कायम चमचमते दिसते.. “

“..आल़ं हातात म्हणत म्हणत उर किती धपापून किती घेतेय याचं भान नसतयं.. “

“..दुतर्फा घनदाट वृक्षलता लांबवर पसरत गेलेल्या त्या लपवून ठेवतात संकटानां दबा धरुन बसवतात.. “

“..खाच खळगे प्रतिकुलतेचे नि समस्यांचे दगडधोंडे वाटेवर जागोजागी पसरलेले असतात तुझ्याशी सामना करण्यासाठी डोकं उंचावून..,”

“..कुठे उंच तर कुठे सखल, कुठे वळण तर कुठे सरळ, कुठे चढण तर कुठे उतार.. यावर चालूनच व्हायचं तुला पैलपार.. ही आहे तुझी जीवन वाट .. ”  

 आणि आणि माझी…

“.. मी आहे हा असाच ना आदी ना अंताचा माझा मलाच ठावठिकाणा नाही.. “

.”. कशा कशाचंच मला सोयरसुतक नाही… आणि कशाला ठेवू म्हणतो ते तरी.. “

“किती एक आले नि गेले किती एक अजूनही चालत राहिलेत.. आणि उद्याही कितीतरी येणार असणार आहेत… हीच ती एकमेव वाट आहे ना सगळ्यांची.. “

“.. आणि आणि माझा जन्मच त्यासाठी आहे तो सगळयांचा भार पेलून धरण्यासाठी.. “

“कोवळया उन्हाचे किरणाचे कवडसे गुदगुल्या करतात माझ्या अंगावर… दवबिंदूचे तुषार नाचतात देहावर.. ओले ओले अंग होते नव्हाळीचे न्हाणे जसे..चिडलेला भास्कर चिमटे काढतो तापलेल्या उन्हाने… दंगेखोर वारा फुफाटयाची माती उधळून लावतो भंडाऱ्यासारखी.. मग रवी हळूहळू शांत होत केशर गुलाबाच्या म्लान वदनाने मला निरोप देतो.. अंधाराचा जाजम रात्र टाकत येते… चांदण्याच्या खड्यांना चमकवित चंदेरी रूपेरी शितल अस्तर पसरवते..अंधारात बागुलबुवा झाडाझुडपांच्या आडोशाला दडतो… मी मी असाच पहुडलेला असतो.. दिवस असो वा रात्र मला काहीच फरक पडलेला नसतो… कारण मला तर कुठेच जायचं वा यायचं नसतं..” 

“..माझं कामं प्रवाश्यांच्या पदपथाचं असतं. .”

“.. मी आहे हा असाच ना आदी ना अंताचा अक्षय वाटेचा…” 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ वाचाल तर वाचाल… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ वाचाल तर वाचाल… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

जिकडे पाहावे तिकडे घरभर पुस्तकेच पुस्तकं पसरलेली असतात. अगदी दिवाणखान्यापासून, शयनकक्षापर्यंत, स्वंयपाकघरात टेबलावर इतकचं काय .. जाऊदे.. तुम्ही ओळखलं असालचं.. घरात इनमीन सहा माणसं सगळी मोठी नि पुस्तकाची वेडी.. घरात दूरदर्शन आहे पण सगळेच जण दुरुनच दर्शन घेत असतात. मीच कधी तरी हट्टाने कार्टून लावारे म्हणत असतो.. तेव्हढ्यापुरताच तो लागतो. मोठी छोटी पुस्तकं मात्र प्रत्येकाच्या हातात असतात.. एवढं काय असतं त्यात असं मी विचारलं तर मला म्हणतात, तू अजून लहान आहेस. मोठा झालास की, वाचायला लागलास की तुला कळेलचं काय असतं त्यात.. मलाही पुस्तकं हवयं असा कधी मधी मी पण हट्ट धरला कि मोठ्या मोठ्या चित्राची एक दोन पुस्तके माझ्या समोर ठेवतात.. हत्ती, घोडा, वाघ सिंह, विमान, मोटार, जहाज, पोपट, मैना, चिमणी, सगळे त्यात दिसतं ,मी पाहतो पाच मिनिटांत पुस्तकं वाचून? नव्हे पाहून हाता वेगळे होतं ..मग घरातल्यांचं तसं का होत नाही असा प्रश्न काही सुटत नाही..मग माझ्या पुस्तकाहून काही वेगळं त्यात नक्की काहीतरी असणार.. हळूच ती पुस्तकं हातात घेऊन बघण्याचा मोह अनावर होतो.. कधी कधी ती पुस्तकं इतरांच्या नकळत हाती घेऊन चाळत जातो.. शब्दांच्या ओळीवर ओळीने पानं पानं भरलेले असते.. अक्षर ओळख नुकतीच होत असल्याने एकेक शब्दाचा उच्चार करतो अर्थ आणि समज दोन्ही बाल बुद्धीच्या पलीकडे असल्याने पानं पलटलं जातं… नेमके काय असतं की ते इतकं खिळवून ठेवतं याचा शोध अजून चालूच आहे.. पण एक मात्र मला उमजलयं वेळ मात्र छानच जातो.. त्यातली अक्षरं चित्रं पाहून डोळे खिळतात आणि चेहऱ्यावर हास्य पसरतं.. मग घरातले कसे मौनात वाचता वाचता मंदस्मित करत करत मोठयानं हसू लागले दिसतात अगदी तसेच मी पण हसू लागतो… तो आवाज ऐकून आई धावत येते आणि आधी हातातलं पुस्तकं काढून घेते.. पुन्हा या पुस्तकांना हात लावू नको बरं.. नाहीतर तुला सगळे रागावतील.. मी खट्टू होतो आईवर रुसून बसतो..शहाणा माझा राजा उदया मोठा झालास कि वाचायची आहेतच हि पुस्तकं तुला.. आता जरा तुझी खेळणी घेशील खेळायला…माझं पुस्तक वाचन तिथचं संपतं.. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print