मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दुभंगलेले पाणी… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ दुभंगलेले पाणी... ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
... " तुला हजार वेळा बजावून देखील का येतेस या विहिरीवर पाणी भरण्यासाठी... या विहिरीवर फक्त गावातल्या उच्च जमातीच्या लोकांना पाणी भरण्याचा हक्क आहे... तुमच्या सारख्या कनिष्ठ जमातीला हिथं पाण्याचा थेंब देखील मिळणार नाही... आणि हे सांगुन देखील तू इथं रोजच सकाळ पासून उभी असतेस... तुझी सावली या विहिरीवर पडली तर त्यातले पाणी विटाळले गेले तर आम्हाला पाणी कसे बरे मिळेल... तुला इथचं उभी राहण्याची हौस जर असेल तर जरा या विहिरी पासून दूर उभी राहा कि जरा... आमच्या घरी कडक सोवळं ओवळं पाळलं जातं म्हटलं... गावाच्या कोसोदूर असलेल्या या विहिरीवरून पाणी न्यायची तंगडतोड करावी तेव्हा कुठे घरातले आम्हाला दोन वेळेचं खाऊ पिऊ घालतात घरात ठेवून घेतात...तुझ्या सारखं नाही.. सकाळीच तुला त्यांनी इथं पाण्यासाठी पिटाळली कि बसले ते दिवसभर चकाट्या पिटायला घराच्या ओट्यावर.. संध्याकाळ पर्यंत पाण्याचा एखादा माठ भरून घरी नेलास तरी तुझं किती कौतुक करत बसतात... आणि आमच्या घरी आम्हाला मात्र जरा उशीर होण्याचा अवकाश लाखोली वाहत असतात.....