मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #186 ☆ एक भाकर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 186 – विजय साहित्य ?

☆ एक भाकर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

चुलीतला जाळ

जसा जसा भडकायचा

झोपडीबाहेरचा अंधार

तसा तसा वाढायचा.

भाकरीचा चंद्र

नशीबाच्या कलेकलेनं

रोज कमी जास्त हुयाचा.. . !

कधी चतकोर, कधी अर्धा

कधी आख्खाच्या आख्खा

डागासकट हरखायचा.. !

माय त्याच्याशी बोलायची .

अंधारवाट तुडवायची. . . !

लेकराच्या भुकंसाठी

लाकडागत जळायची.. !

आमोशाच्या दिसात बी

काजव्यागत चमकायची. . . !

त्या नडीच्या दिसात ती. . .

गाडग्यातल मडक्यात अन्

मडक्यातल गाडग्यात करीत

माय जोंधळं हुडकायची.

जात्यावर भरडायची.

तवा कुठं डोळ्याम्होरं.. . .

चंद्रावानी फुललेली

फर्मास भाकर दिसायची..!

घरातली सारीच जणं

दोन येळच्या अन्नासाठी

राबराब राबायची…!

चुलीमधल्या लाकडागत

जगण्यासाठी जळायची.. . !

पडंल त्ये काम करून

म्या, तायडी,धाकल्या गणू

मायची धडपड बघायचो

बाप आनल का वाणसामान

सारीच आशेवर जगायचो.. . !

चुल येळेवर पेटायसाठी

हाडाची काड करायचो. . . !

चुलीवर भाकर भाजताना

माय मनात रडायची.

भाकर तयार व्हताच

डोळ्यात चांदणी फुलायची.. !

लाकड नसायची, भूक भागायची.

आमच्या डोळ्यावर झोप यायची

पण . . . कोण जाणे कुठपर्यंत

एक थंडगार चुलीम्होर.. .

बा ची वाट बघत बसायची.

भाकरीच्या चंद्रासाठी

तीळ तीळ तुटायची.

उजेडाची वाट बघत

आला दिवस घालवायची…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाट… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ पहाट… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

(लवंगलता..८-८-८-४)

पेंगुळलेली निशा लाजरी लाजत लाजत गेली

दरवळलेली उषा हासरी हासत हासत आली

समारोप हा काळोखाचा रंगछटांनी झाला

शशी फिकासा हळूहळू मग क्षणात लपून गेला

धुंद गारवा मंद मारवा मिरवत अलगद आला

उंच अंबरी उजळत गेली शतरंगाची माला

नभ सोनेरी जल सोनेरी सोन्याचे जग सारे

अलगद नकळत इथे जलावर कुणी शिंपले पारे

सुरू जाहली कैक खगांची किलबिल किलबिल शाळा

समीर घुमतो इकडे तिकडे पायी बांधुन वाळा

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला पाऊस… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आला पाऊस… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

आला पाऊस प्रेमाचा,

   त्याच्या सांगू किती तऱ्हा,

 जसा ज्याच्या मनी भाव,

    त्याला भिजवतो तसा.

 आला पाऊस प्रेमाचा,

   माऊलीच्या वात्सल्याचा,

  उरी पाझरला पान्हा,

    कुशीत विसावे  तान्हा!

  आला पाऊस प्रेमाचा,

    बोट बापाचे धरता,

   आनंद नि विश्वासाचा,

    ठेवा गवसला पोरा!

  आला पाऊस प्रेमाचा,

    गुरू-शिष्यांच्या जोडीचा,

   गिरविता अक्षरांना,

     वसा घेतला ज्ञानाचा.

    आला पाऊस प्रेमाचा,

      सखा जीवाचा भेटता,

     सुख-दुःखाच्या क्षणांना,

       त्याचा कायम आसरा.

      आला पाऊस प्रेमाचा,

       प्रियतमांच्या भेटीचा,

       सात-जन्माच्या साथीच्या,

        निभावण्या आणा-भाका!

      आला पाऊस प्रेमाचा,

        विरह-वेदना देणारा,

      जन्म-मृत्यूचा हा फेरा,

        अव्याहत चालणारा.

     आला पाऊस प्रेमाचा,

       भक्तिरसात डुंबुया,

      कल्याणासाठी विश्वाच्या,

       आळवू पसायदाना!

©  सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बाजाराचा आजार ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बाजाराचा आजार ? श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

जोडगोळी ही दोघांची

ठरवे बाजाराची चाल,

मारता वृषभाने मुसंडी

लोकं होती माला माल !

गप्प बसून कोपऱ्यात

वाट बघे रिस संधीची,

हळूच येऊन रिंगणात

करे वृषभाची गोची !

पडे आडवा मनोरा,

नवख्यांची पळापळ,

मौका घेत सटोडीये

पांढरे करती उखळ !

हवी असेल जर रोज

निद्रा तुम्हांस सुखाची,

एखाद्या चांगल्या बँकेत

FD बघा काढायची !

……  FD बघा काढायची !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 193 ☆ अण्णाभाऊ विनम्र अभिवादन!… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 193 ?

☆ अण्णाभाऊ विनम्र अभिवादन!… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

अण्णाभाऊ तुम्ही गेलात तेव्हा,

मी असेन तेरा वर्षांची!

तेव्हाही तुमच्या मोठेपणाची

खूणगाठ मनाशी घट्ट!

वाचत होते वर्तमानपत्रातून,

मासिकांमधून,

तुमचे आणि तुमच्या विषयीचे!

तुमचा सीमा लढा, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक चळवळ!

अमर शेखांसह गाजलेली कलापथके,

काॅम्रेड डांग्यांबरोबरचे स्नेहबंध,

कम्युनिस्ट विचारसरणीचे,

तुमचे झंझावाती व्यक्तिमत्व!

 शिष्टमंडळासह केलेली रशियाची वारी!

 

लाखो रसिकांप्रमाणे, मी ही गुणगुणते तुमचे शब्द, “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली !”

या लावणीतले आर्त

मनाला वेढून राहिलेले!

त्या शब्दांची जादू आजही टिकून!

तुमची सदाहरित गीते लोकप्रिय आजही!

 

तुमचं मजल्याचं घर पाडणा-यांना,

जाणवलंही असेल,

तुमचं अबाधित अढळत्व!

रसिक वाचकांच्या मना मनात

“फकिरा” नं घर करणं!

 

किती वेगळे, अलौकिक तुमचे कार्यकर्तृत्व……  

कौल जनमानसाचा—

घ्यावा मुजरा मानाचा!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

पाऊस ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पाऊस,

कैफियत अनिवार्य ,

रुजवात पर्याय .

पाऊस ,

स्वप्न अन् खयाल ,

शोक विलंबित ख्याल.

पाऊस,

अलौकिक भक्ती,

मोक्ष आणिक मुक्ती.

पाऊस,

रातवा अखंडित रात्र ,

चिंबचिंब पुलकित गात्र.

पाऊस,

विनवणी आर्त,

अद्वैत आर्ष भावार्थ .

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #199 ☆ ‘केवड्याचा भास…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 199 ?

☆ केवड्याचा भास… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

केवड्याचा भास होतो

नागिनीचा त्रास होतो

 

हो म्हणावे ही अपेक्षा

खालीवरती श्वास होतो

 

आज का परका समजते ?

काल तर मी खास होतो

 

प्रीतिचा वनवास नव्हता

केवढा बिंधास होतो

 

काल तर तू पास केले

आज का नापास होतो ?

 

कावळ्यांनी संप केला

त्रास तर पिंडास होतो

 

मेघ नसता अंबरी का ?

मातिला आभास होतो

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बेशरम ☆ सौ.वंदना हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? कवितेचा उत्सव ?

☆ बेशरम… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

स्त्रीत्वाच्या ठिकऱ्या उडाल्या

झोप उडाली

कुठली जात

कुठला धर्म

कुठला नवरा

कुठला भाऊ

कुठले पोलिस

कुठली सत्ता

इथं तर

मानवता झाली बेपत्ता

माणसाच्या गराड्यात तिला

जनावरा सारखं ओढतात

तिच्या वस्त्रा बरोबर

तिचे सत्व उतरवतात

हवा तसा छळ करून

वाऱ्यावर सोडतात

व्यवस्थाच नग्न झाली

अब्रु कशी टिकणार….?

बेटी बचावच गुणगान

कुठं कुठं पुरणार….?

स्त्रीत्वाच्या सन्मान

कुणाला कसा भेटणार….

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लोकशाहीरअण्णाभाऊ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ लोकशाहीरअण्णाभाऊ… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

अन्याया विरुद्ध हाक देणारा

वाटेगावचा कोहिनूर हिरा

दीन दलितांना दिला न्याय खरा

साहित्य सम्राटाला या मानाचा मुजरा

 

शिक्षण शाळेत नाही घेतले

जेथे जातीयतेचे विष उगवले

जगाच्या शाळेत ज्ञान मिळविले

दीनांच्या कैवाऱ्याला हा मानाचा मुजरा

 

पायी चालत मुंबई गाठली

पायांची त्या चाळण झाली

कष्टकऱ्यांच्या अन्याया वाचा फोडली

लोकशाहिर अण्णाभाऊंना या मानाचा मुजरा

 

फकिरा लिहूनी अमर जाहला

ज्ञानाचा हा सूर्य तळपला

साहित्य क्षितीजी तारा झळकला

तेजस्वी प्रकाशाला हा मानाचा मुजरा

 

चरित्र यांचे प्रेरक ठरले

समानतेचे वारे वाहिले

दलितांचे कैवारी जाहले

समाजाच्या दीपस्तंभा हा मानाचा मुजरा

🍃

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – विरह…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– विरह…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

आठवणींच्या आसवांनी,

भिजले भूतकाळाचे पान !

तुझ्याचसाठी रे झुरतेय मी,

नशिबाने चूकवले तुझे दान !

दिवस उगवतो अन् मावळतो,

छळते ती मज अनामिक कातरवेळ !

अपूर्ण आणाभाकांची सल टोचे मनी,

अपूर्णत्वाने खेळते जीवनाचा खेळ !

दाटून येतात रोज,

आठवणींचे काळे ढग !

भिजवतात ह्रदयाला,

दुरावला कसा तू जिवलग !

माझं हास्य मलाच फसवी,

जगात हसत कशी वावरतेस !

तुझ्या स्मृतींच्या क्षणाला,

एकल्या विश्वात का बावरतेस !

नियतीच्या कुंचल्यातील फटकाऱ्यांनी,

रेखाटलंय जीवनाचं अजब व्यंगचित्र !

कुणीही हसावं, कुणीही बोलावं,

भावनांनी खेळ मांडलाय विचित्र !

हृदयाच्या किनाऱ्यावर  आदळतात,

आठवणींच्या रोज आक्राळ लाटा !

तुझ्या माझ्या आयुष्यात दुभंगलेल्या,

चालतेय काट्यांनी सजलेल्या वाटा !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print