मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आस फुलते मनात

देता चाहूल पाऊस

वादळाच्या सोबतीने

चळवळतो पाऊस

 

रान तापते उन्हात

मग मागते पाऊस

गंध मातीचा हुंगाया

तळमळतो पाऊस

 

शेती माती पिकवाया

येतो धावत पाऊस

हळू  हळू  धरेवरी

घरंगळतो पाऊस

 

आभाळाच्या गाभाऱ्यात

जातो धावत पाऊस

रान गारठा पाहून

अडखळतो पाऊस

 

बरसता धुवाधार

फार थकतो पाऊस

रान ओलं गंधाळता

डळमळतो पाऊस

 

जोर ओसरतो तेव्हा

शांत वाटतो पाऊस

मंदवा-याच्या तालात

कळवळतो पाऊस

 

ओढ्या नाल्यांचा सोबती

मग बनतो पाऊस

धार होऊन पाण्याची

खळखळतो पाऊस

तनामनात सारखा

रोज मुरतो पाऊस

चैतन्याच्या रुपातून

सळसळतो पाऊस

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अद्वैताचा साक्षीदार… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ अद्वैताचा साक्षीदार… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

पाऊस असा कोसळतो

धक धक धडकी भरतो

वणवाच उरी चेततो

बेभानपणे अवतरतो

 

गोष्टीत ॠतुंच्या रमतो

गालांवर टप टप पडतो

केसांत बटांवर झुलतो

ओठांवर चिंब नहातो

 

कंकणात किण किण करितो

मुरलीसम अधरी धरितो

तिन्हीसांजे वचनी बुडतो

झोपडीत अधीर होतो

 

पाऊस असा कोसळतो

राधे सह रंग बहरतो

सावळ्यात रंग विरघळतो

अद्वैत उराशी घेतो

 

पाऊस नभातून येतो

थेंब थेंब झिरपत रहातो

 ज्ञानदेवे ओवी गातो

अद्वैत मुळाशी धरितो

 

पाऊस सरींचा येतो

मुक्तेचे गाणे गातो

लखलखता प्रकाश देतो

गात्रात विजेसम भरतो.

 

पाऊस कधी पण येतो

टाळात तुकोबा रमतो

बेभान होत नाचतो

विठ्ठलात दंग रहातो

 

पाऊस साक्षही होतो

अध्यात्म मनाचे जपतो

पण प्रियाराधनी रमतो

द्वैतीद्वैत मिसळतो

 

पाऊस असा रिमझिमतो

मौनात मौन रिझवितो

अद्वैत पाहुनि खुलतो

निश्चिंत करुनिया जातो.

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 144 ☆ निर्मळ… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 144 ? 

☆ निर्मळ…

मनाची औदार्यता असावी

मनाची सौंदर्यता जपावी

मन उदार करून सहज

स्नेहाची उधळण करावी…!!

 

स्नेहाची उधळण करावी

सहिष्णूता, जपावी

वाट्यातील वाटा देतांना

अहंकाराची झालर नसावी…!!

 

अहंकाराची झालर नसावी

सहजतेने मुक्त व्हावे

क्षणभंगूर जीवनात आपुल्या

काहीतरी निर्मळ कार्य करावे…!!

 

काहीतरी निर्मळ कार्य करावे

कीर्ती गंध पसरवून द्यावा

शेवटी काय राहते भूव-री

याचा विचार स्वतः करावा…!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निमित्त… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ निमित्त… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पापणी ओलीच माझी,

ओलीच ती राहू दे ना!

मेघ पावसाच्या नभाचे,

नभीच माझ्या राहू दे ना!

 

वृक्ष व्याकूळ झाले कशाने ?

सळसळती पाने कशाने ?

गुपित हेही जीवघेणे,

वार्‍यास आज सांगू दे ना!

 

हूल उठल्या पावसाची,

चाहूलही लागलीच होती.

मोर माझे जायबंदी ,

मुक्त त्यांना होऊ दे ना!

 

थांबशील तू जराशी ,

वाटले वृथा मनाशी .

थांबण्याला तू जरासे,

निमित्त पाऊस होऊ दे ना!

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ भीम प्रतिज्ञा… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ भीम प्रतिज्ञा… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

किती युगे हे असे चालणार

द्रौपदीचे वस्त्रहरण होणार

 

कशी कळेना तिची वेदना

का बोथट झाल्यात संवेदना

 

कशी आहेत पट्टी बांधून

डोळे आणि समज असून

 

प्रश्न येत नाहीत सोडवता

तर कशाला मग हवी सत्ता

 

द्वेष हिंसा उद्रेक जमावाचा

का दिला जातो बळी स्त्रीचा

 

प्रतीक्षा माता-भगिनींना

करावी अशी भीम प्रतिज्ञा

 

धिंड काढावी नाराधामांची

छाटणी करावी त्या पुरुषत्वाची

 

कृष्ण मारुती जन्मा यावेत

शिवबा सम सिंह अवतरावेत

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पूजा लक्ष्मीरूपाची… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– पूजा लक्ष्मीरूपाची… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

देव्हाऱ्यातील  देवासह मी

रोज लक्ष्मी पूजते 

श्रावणात साक्षात लक्ष्मीरूपे

 ये .. तुजला आमंत्रण देते — 

दारी येता लिंबलोण  मी

टाकते ग उतरूनी 

श्रमपरिहारार्थ टाकते 

तव पायावर पाणी —

ये बाई सुहास्य वदने तू 

मम उंबरा ओलांडूनी

तव आगमने आपसूक जाते

घर सुखसौख्ये भरूनी —

ये आई अंबाबाई लक्ष्मीरूपे

घे पाटावरी बसून

कोमट उदके पदप्रक्षालन

मंगल पायांचे पूजन —

असो कृपेची छाया आई 

भरते मळवट सौभाग्याचा

केशकलापी माळ गं आई   

गजरा हा सुगंधी फुलांचा — 

यथामती यथाशक्ति नैवेद्य 

आई गोड मानूनी घेई

आगमनाने तुझ्या वसू दे

घरात सुखमय शांती — 

भक्तिरुपाने सदा तेवतील

देवघरातील  वाती

खण नारळाची ही साडीसह

भक्तिभावे भरते ओटी —

गोड मानुनी घे सारे हे 

महालक्ष्मी माते

ठेव सदा तव कृपा घरावर 

हीच विनवणी करते — 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भक्ती शक्ती… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ भक्ती शक्ती… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(शिवराय आणि रामदास गुरु शिष्य जोडीवर आधारित कविता)

भक्ती शक्तीचा इतिहास सांगतो,

      महाराष्ट्र माझा !

सह्यगिरीच्या खोऱ्यात गर्जतो,

       छत्रपती राजा !

 

पावनभूमी महाराष्ट्राची,

      संत महंतांची !

जिथे जन्मली ज्ञानेश्वरी,

     अन् गाथा तुकयाची!

 

दासबोध निर्मिती झाली,

  सह्य गिरी कंदरी !

ज्ञान न् बोधाची शिदोरी,

   जनास मिळाली खरी !

 

 शिवरायांनी शौर्याने त्या,

   गडकिल्ले घेतले !

हिंदूंचा राजा बनुनी ,

   छत्रपती  जाहले !

 

 राज्य घातले झोळीमध्ये,

   राजा शिवरायांने ,

 आशीर्वादे समर्थ हाते,

   शिवबास दिले गुरुने !

 

 रामदास – शिवराय जोडीची,

   अपूर्व गाठ पडली!

 आनंदवनभुवनी गुरु शिष्य,

    समर्थ जोडी गाजली!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 170 – हृदयी निवास नरसिंह ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 170 – हृदयी निवास नरसिंह ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

हिरण्याक्ष आणि।

हिरण्य कश्यप।

असूर अमूप।

मातलेले।

वराह रूपाने।

हिरण्याक्ष वधे।

कश्यपू तो क्रोधे।

बहुतापे।

नारायण द्वेष्टा।

बनला असूर।

भक्ता साजा क्रूर।

देता झाला।

पुत्र रत्न लाभे

प्रल्हाद कश्यपा।

करी विष्णू जपा।

अखंडीत।

सोडी विष्णू भक्ती।

पिता सांगे त्यासी।

परि प्रल्हादासी।

चैन नसे।

धर्मांध पित्याने। कडेलोट केला।

झेलून घेतला।

नारायणे।

उकळते तेल।

भक्त नाचे धुंद।

नामाचा आनंद।

कोणा कळे।

हत्ती पायी दिले।

विष पाजियले।

परि ना बधले।

हरीभक्त।

दुष्ट होलिका ती

चितेवरी बैसे।

जाळीन मी ऐसे।

प्रल्हादासी।

दुरुपयोग तो।

करिता वराचा।

अंत होलिकेचा।

होळीमधे।

संतापे कश्यपू।

वदे प्रल्हादास।

कोठे तो आम्हास।

विष्णू दावी।

विष्णूमय जग।

वदला प्रल्हाद।

गदेने जल्लाद।

ताडी खांब।

नरसिंह रूप।

नर ना पशू तो।

अस्त्र शस्त्रा विन।

वधे त्यासी।

आत ना बाहेर।

बसे उंबऱ्यात।

दिन नसो रात।

संध्याकाळी।

ब्रह्मयाचा वर।

प्रभुने पाळीला।

अवतार झाला।

नरसिंह।

वैशाख मासी ती।

चतुर्दशी खास।

ह्रदयी निवास।

नरसिंह।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृ ता र्थ ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ कृ ता र्थ ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

(खरंच असं असेल का एखाद्या मुरलीचे मनोगत ?)

ऐकून माझा मधुर स्वर

चुके काळजाचा ठाव,

कसे कळावे त्यासाठी

सोसले मी किती घाव !

मी दिली अग्निपरीक्षा

पडली छिद्र काळजाला,

तेव्हा कुठे मज मिळाला

स्वर तो मंत्रमुग्ध भरला !

गोड स्वर ऐकताच माझा

हरपे गोपिकांचे भान,

देखल्या विना हरीला

येती मग कंठाशी प्राण !

झाले सार्थक जीवनाचे

लागता हरीच्या ओठी,

मोद भरल्या गोपिकांचा

रास रंगे यमुनेकाठी !

रास रंगे यमुनेकाठी !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #190 ☆ अहो तुम्हाला माहेरपण लाभते का? ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 189 – विजय साहित्य ?

अहो तुम्हाला माहेरपण लाभते का? ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा

भोगून पहा माहेरपण

नक्कीच कराल आमचा हेवा ll

 

मनसोक्त काढलेली झोप

आणि तिच्या हातचा गरम चहा

सुख म्हणजे काय असतं ,

देवा एकदा अनुभवून पहा ll

 

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात ll

 

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड लोणचे चटण्या

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या ।।

 

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून ।

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून ll

 

लाख सांगा देवा हा

तुमच्या मायेचा खेळ l

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 

फिरू द्या तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून l

मायापती देवा तुम्ही,

तुम्हीही जाल गहिवरून ll

 

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते

सगळे आघात झेलत ll

 

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाट l

पैज लावून सांगते विसराल

वैकुंठाची वाट ।।

 

माहेरपण हा केवळ

शब्द नाही पोकळ

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ ll

 

डोळ्यात प्राण आणून

वाट बघणारी आई l

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा स्वर्ग नाही ll

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print