मराठी साहित्य – विविधा ☆ “स्पेशल रविवार…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्पेशल रविवार…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नुकताच येऊन गेलेला रविवार माझ्यासाठी खूप स्पेशल ठरला. काय माहित कसा काय पण एखादा दिवसच उगवतो मुळी मस्त. खरतरं कामवालीने पण रविवारी सुट्टी घेतली होती त्यामुळे सगळी कामे आपला हात जगन्नाथ. पण तरीही अजिबात चिडचिड झाली नाही. उलट कामे वाढली तरी पटापट यंत्रवत झपाट्याने उरकली. महाशिवरात्रीचं पारणं असल्याने स्वयंपाक आपोआपच जरा साग्रसंगीत आणि गोड पदार्थांचा होता.त्यात रविवारी तारखेने “अहों” च्या गोंदवलेकर महाराजांची जयंती असल्याने गव्हल्याची खीर होती स्पेशल नैवेद्याला. माझी आत्या खूप सुंदर निगुतीने गव्हले करते आणि प्रेमाने माझ्यासाठी गव्हले राखून ठेवते. खरंच ही जवळची, प्रेमाची आणि आपल्यावर जीवतोडून मनापासून प्रेम करणारी मंडळी ही पण एक प्रकारची श्रीमंतीच बरं का.

सुट्टी चा रविवार एका कारणासाठी खास ठरला कारण ह्या दिवशी एक खूप छान मराठी चित्रपट मला सलग बघता आला. विनाव्यत्यय सलग चित्रपट बघण्याचा योग कितीतरी दिवसां नंतर आला होता.रविवारी दुपारी एक वाजता “गोष्ट एका पैठणीची” हा मराठी चित्रपट बघितला. काल परवा ह्या चित्रपटाचे समीक्षण पण वाचण्यात आलं. डोक्याला ताण न देणारा, डोक्यावरून न जाणारा उलटपक्षी नवीन चांगले विचार डोक्यात भरविणारा हा चित्रपट. ह्याचे परीक्षण नुकतेच सगळ्यांनी वाचल्यामुळे त्यावर न लिहीता ह्या चित्रपटाने आपल्याला काय दिलयं ह्याकडे आज बघूया.

चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सामान्य, निम्न मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्रपटा च्या शेवटापर्यंत अगदी मध्यमवर्गीय कुटुंबा सारखे दाखवलेयं. त्यांच राहणीमान, घर, ह्यात कुठेही अगदी स्वप्नरंजन म्हणून सुद्धा केंद्रबिंदू असलेल्या जोडप्याकडे आवश्यक नसलेली श्रीमंती घुसडण्यात आली नाही. नायिका असलेली सायली संजीव परत एकदा  मराठी धारावाहिक “काहे जिया परदेस” मधील गौरी इतकीच प्रेक्षकांना आवडतेयं.नायक सुव्रत पण एकदम भुमिकेला न्याय देणारा अभिनेता.

ह्या चित्रपटाचा” पैठणी शोध मोहीम” हा गाभा असला तरी एका पैठणीमागोमाग  चार पैठण्यांचा मागोवा ह्या चित्रपटभर आहे. ह्या सिनेमाचे कथानक चित्रपट छान असल्याने. आपणच बघावा,मी फक्त ह्यातून ठळकपणे जाणवलेल्या गोष्टींचा उल्लेख करते.

सर्वप्रथम शोधमोहीमेची सुरवात ही येवल्यातून होते.तेथील पैठणीच्या दुकानातील माई सायलीला जी मदत करतात त्यावरून जगात अजूनही चांगुलपणा टिकून आहे ह्याचा परत एकदा अनुभव घेतला. मग शोधमोहीमे मधील पहिली पैठणी मिळते एका अमेरिकेत स्थायी असलेल्या मुलाच्या वडीलांकडे, मोहन जोशी ह्यांच्या कडे.त्या अनुभवातून वयाच्या एका स्टेजला तरी पैशाअडक्यापेक्षा हाडामासांची मुलं सानिध्यात हवीतच अशी प्रकर्षाने माणसाची ईच्छा असतेच हे कळलं. दुसरी पैठणी सापडते सांगलीच्या राजेसरकारां कडे .तेथे एकसोडून दोन पैठण्या मिळतात. मिलिंद गुणाजी ह्यांचा अभिनय बघून “मेन वील बी मेन” ह्याची जाणीव होते. तिसरी पैठणी सांगून जाते वेळ निघून गेल्यावर हाती शुन्य उरतं. त्यामुळे जवळच्या  माणसांना वेळीच वेळ द्यावा.

सिनेमाचा क्लायमॅक्स मात्र स्वतः प्रत्येकाने बघावा. एक छान तणावरहित सिनेमा एवढचं मी म्हणेन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तीन वर्तुळे… मी, कुटुंब, परिवार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “तीन वर्तुळे… मी, कुटुंब, परिवार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

मी, कुटुंब, आणि परिवार हिच ती तीन वर्तुळे आहेत. जी प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. प्रत्येकाची आपापली असतात. व आवड, क्षमता, सवय, स्वभाव, वय, वेळ, काम, गरज, स्थळ यानुसार यांचा आकार वेगळा असतो. तो बऱ्याचदा बदलता असतो.

व्यक्ती नुसार काही वेळा हि तीनही वेगवेगळी असतात. काही वेळा नकळत एकमेकांना स्पर्श करतात किंवा अडकलेली असतात.

ती वेगळी असली किंवा एकमेकांत गुंफलेली असली तसेच व्यक्ती कुठेही असली तरी या तीन वर्तुळातच असते. तो यातून बाहेर पडूच शकत नाही. किंवा या बाहेर राहू शकत नाही.

मी हे लहान वर्तुळ असते. यात मी, माझे, मला असे आत्मकेंद्रित विषय, विचार, कार्य असते. यात अभिमान, स्वाभिमान, अहंकार, अशा गोष्टी सुध्दा येतात. सगळ्या वाईटच असतात असे नाही. पण सगळ्या चांगल्याच असतात असेही नसते.

या वर्तुळातून बाहेर पडलो की नकळत प्रवेश होतो तो कुटुंबाच्या  वर्तुळात.

कुटुंब या वर्तुळात मी सोडून अजून काही जणांची साथ, विचार सोबत येतात. त्यांचा सहभाग आणि सहवास असतो. यात आपल्या आवडीनिवडी सोबत इतरांच्या आवडीनिवडीची भर पडते.

कुटुंब या वर्तुळात काही जणांची भर पडल्याने येथे मी नाही तर आम्ही हा विचार येतो. वर्तुळ मोठे होते त्यामुळे विचारातला मी पणा काहीवेळा सोडावा लागतो.

याही वर्तुळाच्या पलिकडे गेल्यावर प्रवेश होतो तो परिवाराच्या वर्तुळात. यात  सहभागी असणाऱ्यांची संख्या परत एकदा वाढते. त्यामुळेच मी आणि कुटुंब यापेक्षा हे वर्तुळ मोठे असते.

या वर्तुळात निर्णय घेतांना मी, आणि आम्ही पेक्षा थोडा वेगळा, व्यापक विचार करावा लागतो. काहीवेळा काही बंधने पण येतात.

एक चांगली व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्याचे वर्तुळ हे परिवाराचे वर्तुळ असते. याचा अर्थ यात स्वतःचा अथवा कुटुंबाचा विचार नसतो असे नाही. पण फक्त  मी, किंवा मी आणि माझे कुटुंब यांचाच विचार नसातो.

पहिल्या म्हणजे मी या वर्तुळात विचार असतो तो माझा. नंतरच्या कुटुंबातील वर्तुळात माझा ऐवजी विचार येतो तो आमचा किंवा आपला. आणि तिसऱ्या वर्तुळात हे दोन्ही विचार काही वेळा काही स्वरूपात मागे पडतात, आणि विचार असतो तो मी, आपला, याचबरोबर आपल्या सगळ्यांचा.

परिवार या वर्तुळाचा आकार खूप मोठा असतो. यात मी, कुटुंब याच बरोबर समाज आणि त्यातले सगळे घटक असतात. तसेच परिवाराची व्याख्या प्रसंगानुरूप काळ व काम तसेच गरज यानुसार बदलत असते.

प्रत्येकजण एक दुसऱ्याचा अंदाज घेतांना या तीन पैकी कोणत्या वर्तुळात समोरचा आहे हे बघत असतो. आणि मग त्या नुसार ते एकमेकांशी वागतात. पण असतात वर्तुळात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

बालपण सारखं पायात कडमडतं . वय वाढत. तिथच बिघडत.  मनाला मी पणाची चाहूल लागते.  मग सुरू होतो डाव रडीचा.  हे माझं . ते माझं . तेव्हा सुटते सुसाट धावत मनाची कोती हाव.  मग चक्रावत डोकं. ते सिद्ध करण्यासाठी.  सगळं मलाच हवं.  माझं ही आणि दुस-याच ही. का कुणास ठाऊक हा अचानक झालेला बदल मनात घर करून बसतो आणि मरे पर्यंत तिथेच वस्तिला रहातो.  त्याचा छळ सोसत जगताना वर्तनावर अनेकानेक बंधन लादावी लागतात. अंगावर पडणा-या जबाबदा-या ही त्याच अनुषंगाने पारपाडल्या जातात. मनातलीआपुलकीची भावना नकळत कुठे परागंदा होते ते कळतच नाही. आत्मकेंद्री बनताना आवडलेल्या सगळ्यांनाच दूर लोटाव लागत.

आपलं अस्तित्त्व अबाधित राखण्यासाठी. असा कुठला चमत्कार हे सारं घडवत असतो आणि आपणही त्याला खुशाल दुजोरा देत जातो . दुस-याला कमी लेखत आपलं मोठेपण सिद्ध करण्यातच आपण आपल्याला धन्यमानतो. अनुभवलेल्या अप्रतिम अनुभवांवर विरजण टाकून मोकळे होतो.  का? कशासाठी? पुनः प्रत्यय सोडा त्याची अनुभूती ही क्षीण होत जाते.  हळूहळू लोपत जातं भोगलेल , आवडलेल, जगण्याच्या रबाडग्यात कायमचं.

असं करताना आपण ,आपणच निर्माण केलेल्या एका भ्रामक भावविश्वत भ्रमिष्ट होऊन वारत असतो. तेलंघाण्याच्या बैला सारख. तिथं वाटत सगळं आपलंच आहे. आपणच राजे आपल्या विश्वाचे. पण हे लक्षात येतनाही आपल्या. आपण कमावलेली एखादी गोष्ट हरवली तर ती आपण परत मिळवू शकतो पण जे देवाने आणि दैवाने  दिलेलं असतं ते हरवलं तर उभ्या जन्मात परत मिळवू शकत नाही. जीवनात स्थिरावण्यासाठी कल्पकता, कष्ट, संघर्ष , सत्ता मग उपभोग हे सार लचांड सांभाळता सांभाळता अमाप झिजून झाल्यावर मावळणारा उत्साह आणि थकलेले शरीर भेडसावत असते. जप स्वतःला नाही तर अचानक बला यायची वाट्याला. मग घाबरगुंडी जीवाची आणि धावपळ देहाची.  कपात काळाची.  अनवरत इच्छा ध्येय गाठायची.  या सा-यांचा ताळमेळ बसवताना  संधीच मिळत नाही उपभोग घेण्याची.

हस्य हुश्य करत मग आठवण जुन्या लाघवी मनसोक्त जगलेल्या जीवनाची. हातात असतंच काय त्यांच्या शिवाय. म्हणून आठवणीची साठवण होते पुनरपी दर्शन नाही. 

हे कळत फार उशीरा. संधी निघून गेल्यावर हातातून . वाटत हा शाप भोवतोका प्रत्येक जीवाला. का अहं पणाच्या प्रभावाखाली स्वतःला सिद्ध करण्यासाठी उडताना आपल्या पेक्षा आकाशात उंच उडत गेलेल्या असंख्य गरुडांच विस्मरण कसं होतं आपल्याला. याची जाणीव झाल्यावरच आपण म्हणतो आत्मपरीक्षण करतोय.

कशासाठी ? उपयोग काय त्याचा ?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “काम छोटं, महत्व मोठं…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “काम छोटं, महत्व मोठं…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सरासरी बघता  माणूस आपापल्या क्षेत्रात दिवसभर काबाडकष्ट करीत असतो, मग कधी तो आपल्या दैनंदिन गरजा भागेल इतपत कमावतो तर कधी थोडंफार पुरुन उरेल इतकं. अगदी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती ह्या भरघोस कमावतात अगदी पोटभर पुरुन त्याहूनही कितीतरी पट जास्त उरेल इतकं.

वेगवेगळ्या व्यक्तींच्या कमाईत फरक असला तरी एक गोष्ट मात्र काँमन असते,ती म्हणजे हे कमवायला माणसाला भरपूर कष्ट मात्र घ्यावेच लागतात. कष्ट, मेहनत ह्या गोष्टी म्हणजे जसं अन्नामध्ये मिठाचं महत्त्व असतं तसं जीवनात ह्याचं महत्त्व. आणि ह्याच अपार कष्टानंतर खायला कोंडा आणि उशाला धोंडा असेल तरी निद्रादेवी मात्र कायम प्रसन्न असते.

प्रत्येक व्यक्ती ही भरपूर कामं करीत असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या कामाकामांत फरक हा असतोच.त्याच्या काम करण्याच्या पद्धती, काम करण्याचा कालावधी, कामाचा दर्जा ह्यामध्ये विवीधता ही आढळतेच. काही व्यक्ती प्रचंड कष्ट, कामे करतात पण त्यांच्या कामात निगुती नसते तर काहींच कामं हे अतिशय मोजकं असतं पण त्यांनी केलं की दुसऱ्या ला परत त्या कामाकडे वळून बघावं लागतं नाही इतकं ते परिपूर्ण असतं. काही व्यक्ती ह्या घरातील कामांमध्ये तरबेज तर काही घराबाहेरील कक्षेत असलेल्या कामांमध्ये पटाईत.

ह्या कामाबद्दलची एक छोटीशी पण मस्त पोस्ट वाचनात आली. कालनिर्णय ह्या दिनदर्शिकेच्या मागील पानावर छापलेली आहे. “छोट्या कामांच मोठ महत्त्व” असं शिर्षक असलेली . एक मस्त वाचनीय पोस्ट.

काम हे सुद्धा आपण बघूनबघून अनुभवातून शिकतो.चांगल,उत्कृष्ट कामाची नोंद आपला प्रत्येकाचा मेंदू ताबडतोब घेत असतोच,प्रश्न असतो तो आपल्या स्वतः च्या आळसामुळे त्यावर अंमलबजावणी न करण्याचा. असो

कामाचा उरकं, शाळेत एकही लेटमार्क न होऊ देता सातत्याने कितीतरी वर्षे चारीठाव स्वयंपाक माझी आई सकाळी चारला उठून रांधायची.हे.सगळं आठवून खरंच आता समज आल्यावर आईच खूप कौतुक वाटतं. आमच्या अहो आईंकडुन कुठलही काम कस शेवटापर्यंत व्यवस्थित करता येतं हे बघतं आलेयं. बहीणी कडून ,नणंदे कडून कामाचा झपाटा बघत आलेयं.माझी बहीण तर आताची कमलाबाई ओगलेच जणू.कुठलाही पदार्थ चवीला तसेच दिसायला आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम ह्यात तिचा हातखंडा. बरेचदा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी वा आजुबाजुला वावरणाऱ्या व्यवस्थित काम करणाऱ्या लोकांना आपोआप आपल्या निरीक्षणशक्तीने नजरेत टिपतो आणि मनोमन त्यांचं कौतुक ही वाटतं.

त्या कालनिर्णय मधील एक गोष्ट खूप भावली आणि पटली सुद्धा. त्यात सांगितलयं आपण सकाळी प्रथम उठल्याबरोबर जे पहिलं काम करतो,ते म्हणजे बिछान्यातून उठून तो आवरणे ,हे काम जर सर्वोत्तम निगुतीने जमलं तर दिवसभरातील सगळी कामं आपल्याकडून सकारात्मक भावाने सर्वोत्कृष्टच केल्या जातात. त्यामुळे उठल्याबरोबर प्रत्येकाने आपला बिछाना खूप छान,निटनेटका आवरून हा ठेवलाच पाहिजे. अर्थातच हा नियम काही व्यक्ती ह्या पाळतच असतील म्हणा. पण जे पाळत नसतील त्यांनी हा नियम तयार करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास खूप चांगला सकारात्मक फरक आपल्या आयुष्यात पडेल.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भेटवस्तू… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ भेटवस्तू… ☆ श्री उमेश सूर्यवंशी 

भेटवस्तू… किती गोड आणि आनंददायक शब्द आहे. कुणालाही भेटवस्तू हा शब्द नक्कीच आवडणार. मानवी मनांत चांगल्या कामाकरता शाबासकी म्हणून आणि प्रोत्साहन म्हणून भेटवस्तू देण्याची स्तुत्य परंपरा आहे. लहान मुलामुलीना जितका आनंद या भेटवस्तूने होतो तितकाच आनंद तरुणाला आणि वृध्दांना देखील होतो हे सत्य आहे. भेटवस्तू या शब्दाचा अर्थच मुळी एक विशिष्ट जाणीव मनामध्ये पेरत असतो.

भेटवस्तू…,आनंदाचा ठेवा आहे, समाधानी तृप्ती आहे, प्रोत्साहनाची  शाबासकी आहे. भेटवस्तू   घेताना फारशी नियमावली नसतेच मुळी. कारण भेटवस्तू नाकारण्याची अपवादात्मक उदाहरणे वगळता सर्वत्र भेटवस्तू स्विकारण्याचा पायंडा असतो. याचकरीता मग भेटवस्तू म्हणून काय दिले पाहिजे याची योग्य जाणीव झाली पाहिजे.बरेचदा अनेक स्पर्धात भेटवस्तू म्हणून लहान मुलांना विशिष्ट खेळणी, स्त्रीयांना गृहोपयोगी वस्तू, तरुणाईला फॕशनेबल वस्तू आणि वृध्दांना उपयोगी पडणारी वस्तू निवडतात. एका अर्थाने यामध्ये गैर काहीच नाही. या प्रत्येक वस्तुमागे आनंद हा नक्कीच मिळतो. परंतु या भेटवस्तू मनुष्याला कितपत प्रोत्साहन देतात याविषयी वाजवी शंका उपस्थित केली पाहिजे. शाबासकी याचा अर्थ केवळ पाठीवर थाप अशी नसावी तर मेंदूला चालना अशी असली पाहिजे. मतभेदाला वाव ठेवून इथे एक विचार प्रसूत करतोय. तो असा की, कोणत्याही वयोगटाला त्याच्या पुढील आयुष्यात आनंद, गृहोपयोगी, फॕशनेबल आणि उपयोगी अशा भेटवस्तू देताना…एक चांगले पुस्तक हाच पर्याय उपलब्ध असावा. पुस्तक मनुष्याचे मस्तक घडवते. अनेकजण आजकाल हा पायंडा जपताय हे स्तुत्य आहे.लहानांसाठी बालकथेची आणि थोरामोठ्यांची चरित्रे, स्त्रीकरता गृहोपयोगी आणि स्त्रीवादी साहित्य, तरुणाईकरता वैचारिक व ललित साहित्य, वृध्दाःकरता करमणूक करणारे व इतर साहित्य दिले तर आनंद व प्रोत्साहन याचबरोबर मेंदूचा योग्य व्यायाम घडू शकतो. पुस्तके ही भेटवस्तू कोणत्याही कार्यक्रमाचा पहिला योग्य पर्याय असतो याची जाणीव व्हावी.

आजकाल कोण वाचतय ? हे नकारात्मक पालूपद आळवण्यात अर्थ नाही. पुस्तकासारखी भेटवस्तू केवळ त्याच व्यक्तीला नव्हे तर त्याच्या सानिध्यातील अनेकांच्या हिताची कृती घडवण्यात एक योग्य भुमिका बजावत असते. याचा अर्थ पुस्तकाची भेटवस्तू केवळ वैयक्तिक आनंदाचा, समाधानाचा, तृप्तीचा व प्रोत्साहनाचा भाग होणार नसून तो काही सार्वत्रिक पातळीवर आनंद, समाधान, तृप्ती व प्रोत्साहन पेरत असतो. मानवी जीवनात सामुदायिक हिताची ही कल्पना कृतीत येणे हीच… मनुष्याने मनुष्याला द्यावयाची खरी भेटवस्तू आहे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सरप्राईज ट्रीप…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सरप्राईज ट्रीप…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा का आपल्या मनाने आस्तिकता स्विकारली की आपली प्रत्येक देवदेवतांवर श्रद्धा ही बसतेच. कुठलीही मुर्ती, फोटो दिसला की आपण आपोआपच नमस्कार करतो. कुठलाही प्रसाद मिळाला की तो लगेच डोळे मिटून भक्तीभावाने ग्रहण करतो. कुठल्याही देवाचा अंगारा कपाळाला लावतो,पण जेव्हा कधी आणीबाणीची परिस्थिती येते, संकटाचा सामना करायचा असत़ो, काही निर्णायक प्रसंग समोर उभे ठाकले असतात, किंवा अतीव सुखाची अचानक अनुभूती झालेली असते तेव्हा मात्र हटकून आपल्या डोळ्यासमोर आपलं परम दैवतच येतं,कठीण प्रसंगी आपण जास्तीत जास्त त्याचाच धावा करतो वा अतीव सुखाचे क्षण उपभोगतांना क्षणोक्षणी त्या परम दैवताचीच आठवण करतो.

अर्थातच आपली प्रत्येकाची श्रद्धास्थान ही वेगवेगळी असू शकतात. कारण ह्या श्रद्धेचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडल्या गेलेला असतो. आपलं परम दैवतं हे आपण अनुभवांनी घरात नित्य बघितल्याने, मनापासून निवडलेलं असतं. काल महाशिवरात्र झाली. माझंही परम दैवत शिवशंभो महादेव. त्यावरून ब-याच आठवणी जाग्या झाल्यात, गाठीशी आलेल्या अनुभवांच्या पुरचुंडीची गाठ जरा सैलसर झाली

महाशिवरात्री ला बँकेला सुट्टी असते त्यामुळे जरा निवांतपणा. ह्या दिवशी दोन्ही वेळी उपास असतो. त्यामुळे फराळाला लागणारी निम्मी तयारी ही अधल्या दिवशी करता येते, नव्हे ती तशी करुन ठेवणचं जास्त सोयीचं पडतं.

तसं तर नेहमीच देवळात वा मंदिरात सकारात्मक उर्जा तेवत असते. शांत व पवित्र वातावरणामुळे मन पण प्रसन्न राहातं. काही विशिष्ट दिवस हे त्या दैवताच्या पूजेसाठी खास असतात अशी आपल्या मनाची धारणा असते. हे दिवस सुखद भावनिकदृष्ट्या आपल्याला पाठबळं देतात. आपल्याला ज्या देवाची ओढ असते,ज्याच्यावर आपली मनापासून भक्ती असते,ज्याचा दर्शनासाठी आपल्याला नित्य जावसं वाटतं तेच आपलं परमं दैवतं असतं.

मागील महाशिवरात्रीला लिहीलेल्या पोस्ट मध्ये मी यवतमाळ व अमरावती मधील प्राचीन जागृत शिवमंदारांबद्दल लिहीले होते. माझे स्वतःचे परमदैवत शिवशंभू महादेव तर आमच्या “अहों”चे परमदैवत प्रभू श्रीरामचंद्र. ज्या नवराबायकोंच्या आवडीनिवडी ह्या विरुद्ध असतात ते “काँमन नवराबायको”. आणि विरुद्ध आवडीनिवडी असून सुद्धा जे परस्परांच्या आवडींचा मान ठेवतात, आदर करतात ते “स्पेशल नवराबायको”. त्यामुळे माझ्या शिवभक्तीचा आदर करीत आठ दहा वर्षांपूर्वी “अहोंनी” मला सरप्राईज ट्रीप म्हणून सोरटीसोमनाथ येथील महादेवाचे दर्शन घडविले तो क्षण माझ्यासाठी अमुल्य क्षणांपैकी एक होता. गुजरात मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रम साठी जायचे असल्याने त्यांनी ह्या ट्रीप चे नियोजन केले होते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे सोरटीसोमनाथ. पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

समुद्रकिनारी वसलेल्या ह्या मंदिरामध्ये खूप प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, प्रसन्न वातावरण ,अद्भुत शांती आपल्याला अनुभवायला मिळते हा माझा स्वानुभव. तेथे देवळाच्या कंपाऊंड वाँलपर समुद्राच्या महाकाय लाटा आदळतात आणि जणू ह्या लाटांचे रुप बघून मनात,संसारात असलेल्या छोट्या छोट्या लाटा अवघ्या काही मिनिटात विरुनच जातात जणू.खूप जास्त माझ्या आवडीच्या ठिकाणां पैकी हे एक ठिकाण. तेथेच अहिल्याबाई होळकर ह्यांनी जिर्णोध्दार केलेलं अजून एक शिवमंदिराच्या दर्शनाचा अभूतपूर्व योग आला.

ह्या महाशिवरात्रीच्या पर्वावर जुनी आठवण परत एकदा जागी झाली. ह्यासाठीच कदाचित सणसमारंभ, उत्सव असावेत असं वाटतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ५७ – नवा सूर्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग  –५७ – नवा सूर्य ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गेल्या दिडदोन महिन्यांची काळरात्र संपून, आता नवा सूर्य उगवला होता.एप्रिलमध्ये मद्रास येथे घडलेल्या घटना विवेकानंद यांना कळता कळता दोन महीने लागले. जुलै प्रसन्नता घेऊन उजाडली. विवेकानंद मनातून सुखावले. त्यांच्या मनात एकच सल होती ती म्हणजे, अमेरिकेत परिचय झालेल्या लोकांसमोर आपली वैयक्तिक प्रतिमा खराब करण्याचा झालेला घृणास्पद प्रकार. पण वैयक्तिक पेक्षाही त्याच बरोबर हिंदू धर्माचीही प्रतिमा ? ती पुसून काढली तरच त्यांना आपल्या धर्माबद्दल पुढे काम करता येणार होतं. नाहीतर सुरू केलेलं काम, त्याचं काय भविष्य? आणि उज्ज्वल भारत घडवायच स्वप्न होतं ते ? म्हणून सत्य काय ते सर्वांना कळलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांचे गुरु बंधु ही कामाला लागले होते. विशेषत: अलासिंगा पेरूमल खूप धडपड करत होते.

मद्रासला एका जाहीर सभेचा आयोजन केलं गेलं . पंचायप्पा सभागृह खचाखच भरून गेलं होतं. अध्यक्ष होते दिवाण बहादुर एस सुब्रम्हण्यम अय्यर. राजा सर रामस्वामी मुदलीयार यांनी सूचना केली आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या परिषदेत केलेल्या उज्ज्वल कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला, सी रायचंद्र रावसाहेब यांनी. त्या बरोबरच अमेरिकेतल्या नागरिकांना धन्यवाद देणारा ही ठराव मांडला गेला.रामनद च्या राजेसाहेबांनी अभिनंदनाची तार पाठवली. किती विशेष गोष्ट आहे की, ज्या व्यक्तीसाठी अभिनंदन म्हणून कार्यक्रम करायचा ती इथे प्रत्यक्षात हजर नाही पण तरी एव्हढा मोठा कार्यक्रम? त्याला मोठ्या संख्येने सर्व थरातील लोक उपस्थित राहिले होते. काय होतं हे सगळं? हिंदू धर्माच्या जागरणासाठी विवेकानंद यांनी केलेल्या कामाची ही तर फलनिष्पत्ती होती.

कलकत्त्यात अजून असं काही नियोजन झालं नव्हतं. पण शिकागो च्या सर्वधर्म परिषदेत उपस्थित असलेले धर्मपाल, आलमबझार मठात गेले आणि विवेकानंद यांच्या अमेरिकेतल्या सर्व कार्याचे व यशाचे वृत्त त्यांच्या गुरु बंधूंना सांगीतले. शिवाय धर्मपाल यांचे कलकत्त्यात, हिंदुधर्म अमेरिकेत आणि स्वामी विवेकानंद या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले गेले. याला अध्यक्ष होते महाराजा बहादुर सर नरेंद्र कृष्ण, याशिवाय जपान मधील बुद्धधर्माचे प्रमुख आचार्य, उटोकी यांचे ही या सभेत भाषण झाले. हा कार्यक्रम मिनर्व्हा चित्रमंदिरात झाला. याला नामवंत लोक उपस्थित होते. हे सर्व वृत्त इंडियन मिरर मध्ये प्रसिद्ध झाले होते,  आपोआपच विवेकानंद यांच्या विरुद्ध प्रचारा ला एक उत्तर दिलं गेलं होतं.सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी संगितले होते की, ‘हिंदुधर्माला बुद्ध धर्माची गरज आहे आणि बुद्ध धर्माला हिंदू धर्माची गरज आहे आणि हे ध्यानात घेऊन दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेले पाहिजे’. हे म्हणणे धर्मपाल यांना पटले होते हे आता सिद्ध झाले होते.

या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांचे वृत्त प्रसिद्ध झालेले ही वृत्त आणि ठरावांच्या संमत झालेल्या प्रती अलासिंगा यांनी अमेरिकेतिल वृत्तपत्रांना पाठवल्या.प्रा.राइट,मिसेस बॅगले  आणि मिसेस हेल यांनाही प्रती पाठवल्या गेल्या, औगस्टच्या बोस्टन इव्हिंनिंग ट्रान्सस्क्रिप्ट मध्ये मद्रासला झालेल्या सभेचे वृत्त आले. हे स्वामीजींना कळले. तसेच शिकागो इंटर ओशन यातही गौरवपूर्ण असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. हजारो मैल दूर,  एकट्या असणार्‍या,सनातनी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारकांच्या  विरुद्ध लढणार्‍या विवेकानंद यांना हे समजल्यानंतर हायसे वाटले. थोडा शीण हलका झाला. या नेटाने केलेल्या कामाबद्दल त्यांनी अलासिंगा यांचे कौतुक केले.

आणि ….. मग इतर लोकांना पण जाग आली. आता मद्रास नंतर कुंभकोणम, बंगलोर या ठिकाणी सुद्धा अशा सभा झाल्या. मधल्या दोन महिन्यात सारी सामसुम होती. त्यावेळी विवेकानंद यांनी मिसेस हेल यांना पत्र लिहिले आणि विनवणी केली की, “मला आईसारखे समजून घ्या म्हणून, वात्सल्याची विनवणी! माणूस अशा प्रसंगी किती एकाकी पडतो, त्याची मानसिक स्थिति कशी होते, अशा प्रसंगामुळे नैराश्य आणणारी खरी स्थिति होती. अशाच काळात आधार हवा असतो.अशाच मनस्थितीत विवेकानंद मिसेस बॅगले  यांच्या कडे त्यांनी बोलावलं म्हणून अनिस्क्वामला गेले.जवळ जवळ २० दिवस तिथे राहिले . याचवेळी प्रा. राइट पण तिथे होते. योगायोगाने भारतातील वृत्ते पोहोचली ती या दोघांनंही समजली. या आधी जुनागडच्या दिवाण साहेबांनी प्रा. राइट यांना आणि मिसेस हेल यांनाही पत्रे लिहिली होती ती मिळाली होती. त्यात विवेकानंद यांना असलेला भारतीयांचा पाठिंबा लिहिला होता.पाठोपाठ म्हैसूरच्या राजांचेही पत्र आले. हे राइट आणि बॅगले यांना दिसल्यामुळे विवेकानंद समाधानी झाले.

याला उत्तर म्हणून विवेकानंद मन्मथनाथ भट्टाचार्य यांना लिहितात, “अमेरिकेतील स्त्रिया आणि पुरुष, तेथील चालीरीती आणि सामाजिक जीवन यावर सुरुवात करून ते म्हणतात, मद्रासला झालेला सभेचा वृत्तान्त देणारे सारे कागदपत्र व्यवस्थित मिळाले. शत्रू आता चूप झाला आहे. असे पहा की, येथील अनेक कुटुंबामधून मी एक अपरिचित तरुण असूनही त्यांच्या घरातील तरुण मुलींच्या बरोबर मला मोकळेपणाने वावरू देतात. आणि माझेच एक देशबांधव असलेले मजुमदार मी एक ठक आहे असे सांगत असताना ते त्याकडे लक्षही देत नाहीत, केव्हढ्या मोठ्या मनाची माणसे आहेत ही. मी शंभर एक जन्म घेतले तरी त्यांच्या या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही.हा उभा देश आता मला ओळखतो. चर्चमधील काही सुशिक्षित धर्मोपाध्याय यांनाही माझे विचार मानवतात. बहुसंख्यांना मान्य होत नाहीत. पण ते स्वाभाविक आहे. माझ्याविरुद्ध गरळ ओकून मजुमदार येथील समाजात त्यांना याआधी असलेली, तीन चतुर्थांश लोकप्रियता गमावून बसले आहेत. माझी जर कोणी निंदा केली, तर येथील सर्व स्त्रिया त्याचा धिक्कार करतात. या पत्राची कोठेही वाच्यता करू नये. तुम्हीही समजू शकाल की, तोंडाने कोणताही शब्द उच्चारताना मला अतिशय सावध राहावयास हवे. माझ्यावर प्रत्येकाचे लक्ष आहे. विशेषता मिशनरी लोकांचे”

“कलकत्त्यामद्धे माझ्या भाषणाचे वृत्त छापले आहे त्यात राजकीय पद्धतीने माझे विचार व्यक्त होतील अशा पद्धतीने सादर केले आहेत. मी राजकरणी नाही आणि चळवळ करणारा कुणी नाही मी चिंता करतो फक्त, भारताच्या आत्म्याची, त्याच्या स्वत्वाची, ती जाग आली की सर्व गोष्टी आपोआप होतील.कलकत्त्यातील मंडळींना सूचना द्यावी की, माझी भाषणे व लेखन यांना खोटेपणाने कोणताही राजकीय अर्थ चिटकवला जाऊ नये. हा सारा मूर्खपणा आहे”. असे त्यांनी अलासिंगना कळवले आहे.

यानंतर सप्टेंबरला कलकत्ता येथे ही विवेकानंद यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारि प्रचंड सभा झाली. यासाठी अभेदानंद यांनी घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते.अपार कष्ट घेतले. सर्व थरातील चार हजार नागरिक याला उपस्थित होते .राष्ट्रीय पातळीवरील विवेकानंदांच्या गौरवाचा हा कार्यक्रम होता. अध्यक्ष होते, पियारी मोहन मुखर्जी . कळकतत्यातील थोर व नामवंत व्यक्ति. दुसरे होते कळकतत्यातील नामवंत संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य माहेश्चंद्र न्यायरत्न . याची दखल इंडियन मिरर ने खूप छान घेतली .यात अभिनंदांनचे ठराव तर होतेच, पण कलकत्त्याच्या नागरिकांनी विवेकानंद यांना लिहिलेली पत्रे होती. कलकत्ता ही विवेकानंद यांची जन्मभूमी होती त्यामुळे या घटनेला खूप महत्व होतच .शिवाय असत्य प्रचार केलेल्या प्रतापचंद्र मजुमदार यांचीही कर्मभूमि होती. ब्राह्मसमाजाचे धर्मपीठ पण कलकत्ताच होते. हे वृत्त विवेकानंद यांच्या हातात पडले आणि ते कृतकृत्य झाले बस्स…. जगन्मातेचा विजय झाला होता.आपलीम मातृभूमी आपल्या पाठीशी उभी आहे अशा पूर्ण विश्वासाने स्वामी विवेकानंद यांच्या डोळ्यातून, हेल भगिनींना हे कळवताना अश्रूंचा पूर लोटला होता. मनस्ताप आणि निराशा काळाच्या पडद्याआड गेलं आणि नव्या चैतन्याने. उत्साहाने विवेकानंद ताजेतवाने झाले पुढच्या कार्याला लागायचे होते ना? गुरुबंधूंना ते म्हणतात, “तुम्ही सारे कंबर कसून जर माझ्याभोवती उभे राहिलात तर, सारे जग जरी एकत्र आले तरी आपल्याला त्याचे भय मानण्याचे कारण नाही”. असा यानंतर उगवलेला नवा सूर्य त्यांना आत्मविश्वास देत होता.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खरं प्रेम… ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? विविधा ?

☆ खरं प्रेम… ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

माणूस जन्मल्याबरोबर पहिलं प्रेम अनुभवतो ते म्हणजे आईचं. इथून पुढे प्रेम नावाची अडीच अक्षरे आयुष्यभर आपली साथसोबत करतात. स्त्रीची पुरुषाबरोबर प्रियकर प्रेयसी सोडून पंचवीस-तीस नाती आहेत. पण रस्त्याने एखादी जोडी बोलत निघाली की आपण उगी कुजबुज करीत रहातो. प्रेम अनेक प्रकारचं असतं पण आपण एकाच प्रेमाला धरून बसतो. ही आपल्या कमकुवत समाजाची मानसिकता आहे.

जशी पोटाची भूक असते तशीच प्रेमाचीही भूक असते हे आपण विसरून जातो. माणसाला आयुष्यात सगळं काही मिळालं आणि प्रेम नाही मिळालं तर त्याचं जीवन यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. प्रेम श्रीमंताचं असतं तसंच गरीबाचंही असतं. प्रेम राजाचं असतं तसंच शिपायाचंही असतं आणि भिका-याचंही प्रेमच असतं. थोडक्यात प्रेम कुणाचं कुणावरही असतं. जीवनात येऊन ज्यानं प्रेम केलं नाही त्यानं जीवनात येऊन काहीच केलं नाही असं म्हणता येईल. प्रेम आहे म्हणून तर या जगातला प्रत्येक माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. प्रेमच असा एक धागा आहे जो प्रत्येक जीवमात्रात गुंफला गेला आहे.

काॅलेज वयातलं प्रेम खूप वेगळं असतं. एखाद्या कसबी शिल्पकाराने मुर्तीला घाटदार कोरीव बनवत जावे तसा नुकत्याच वयात आलेल्या पोरीचा उमलत फुलत येणारा तो दैवी आकार. खरोखरच निसर्गाची किमया अफाट आहे. एखाद्या लहान शेंबड्या पोरीची घडत जाणारी सुंदरी बघत रहावी वाटते. त्रयस्तपणे पहाताना अँजेलोच्या अर्धवट गुढ पेंटींगची सर तिला येईल का? की मोनालिसाच्या गुढहास्य चित्रासारखं तेही गुपितच राहील कुणास ठाऊक? या सगळ्या कलाकृती निसर्गाने मानवाकडून करून घेतलेल्या. एका पोरीची बनलेली सुंदरी हीसुद्धा एक कलाकृतीच. आपोआप घडलेली. कुणाच्या मनात असो कुणाच्या मनात नसो न सांगता सवरता केलेली.

कधी कुरणात मोराचं नाचणं बघतो. प्रियेसाठी त्याचा तो नाच बघण्यासारखा असतो. कुठे बागेत फांदीवर चिमणा चिमणीशी गुलगुल करीत असतो. हिरव्यागार वनराईच्या कुशीत कुठेतरी दाट गवतात एकमेकाला घट्ट मिठी मारून विहार करणारी सापाची जोडी पाहिली की मन व्याकुळ होतं. स्वप्नातल्या जोडीदाराला हाका घालीत राहातं. धनुकलीनं कापूस पिंजावा तसं अंगातला कण नि् कण कुणीतरी पिंजत राहातं. मग एखादी गोरीगोमटी दिसली की मन तिच्यापाठी धावतं. तिचा एखादा नेत्रकटाक्ष झेलण्यासाठी अतुर होतं. नकळत मनातल्या जोडीदाराच्या स्वप्नांना खतपाणी घातलं जातं. एखादी हसून बोललीच तर हीच माझी प्राणसखी असं वाटत राहातं. आतापर्यंत आपण हिलाच तर शोधत होतो. कुठं लपली होती ही? परत एकदा स्वप्नांचं पीक तरारून येतं. पण तात्पुरतंच. पुन्हा मनाला संस्कारांचा दोरखंड लावला जातो. आपल्याला शिकलं पाहिजे. घराचं दैन्य कमी केलं पाहिजे हा विचार मनाला भरकटू देत नाही.

शेक्सपियरच्या प्रेमात प्रश्न नसतात मग तुमच्या माझ्या प्रेमात का येतात? फक्त प्रश्न… पण त्याची उत्तरं कुठं आहेत? गंगेची गंगोत्री तशी प्रश्नांची गंगोत्री. एक करंगळीभर पाण्याची धार… पुढे पाण्याचा विशाल सागर. एक गुंता मग सगळी मनाची गुलाबी गुंतागुंत… कुमार वयात मनाला न सुटणारे प्रेमळ प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कोण देईल?

वि. स. खांडेकरांची ‘पहिलं प्रेम’ कादंबरी वाचली त्यावेळी पण असंच वाटलं, प्रेम हे खोटंच असतं, मग ते पहिलं असुदे अगर दुसरं. या जगातील स्वार्थी माणसं या प्रेमाचा तेवढीच मजा किंवा टाईमपास म्हणून उपयोग करीत असावीत. पण या जगात खरं प्रेम आहे बरंका. राधा-कृष्णासारखं आणि कृष्ण-मिरेसारखं सुद्धा प्रेम आहे. अाणि बायको बर्फासारखी पडली असताना तिच्यावर बलात्कार करणारेही या समाजात आहेत. पण हातावर बोटं मोजण्याइतकं का होईना खरंच खरं प्रेम आहे. मला एवढंच समजलं जे प्रेमासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात बाकी सगळे जगायचं नाटक करतात.

काय होतं, ज्यावेळी आपल्या मनातील प्रेमाला खुरडत जगावं लागतं त्यावेळी खुरडत जगायचीच त्याला सवय लागते. असं जगणं म्हणजेच जीवन असाच एक समज होतो. तोच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहिला जातो. हा भार आपण निर्विकारपणे वाहत असतो. आपण खऱ्या प्रेमाला मनाच्या कोनाड्यात दाबून टाकतो. मग जगणं आणि खरं जीवन यांची ताटातूट होते. अशा तर्‍हेने खरं जीवन आपण कधी जगतच नाही. खरं प्रेम कुणावर कधी करतच नाही. खरं प्रेम खूप थोडे लोक करतात हे प्रेम या गुलाबी अक्षरामागे दडलेलं एक सत्य आहे. ते तुम्हाला नाकारता येणार नाही… मला नाकारता येणार नाही… कुणालाच नाकारता येणार नाही..! पण तरीही खरं प्रेम खर्रच आहे हो..!!

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बोलणे…”  ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे ☆

श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे

अल्प परिचय 

एका कंपनीत ३० वर्षे काम केल्यानंतर असीस्टंट मॅनेजर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती.

शिक्षण – एम,काॅम पर्यंत.

विरंगुळा म्हणून लिहीणे. आज पर्यंत जवळपास ३५० हून अधिक पोस्ट.

दै. लोकमत, तरुण भारत जळगाव यात काही प्रकाशित. तसेच काही पोस्ट ऑडीओ बुक वर देखील घेतल्या होत्या.

? विविधा ?

☆ “बोलणे…”  ☆ श्री कौस्तुभ सुधाकर परांजपे 

नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता:

बोलणे….कौस्तुभ परांजपे.

बोलणे……

बोलण्याबद्दल लिहिणे यातच एक गंमत आहे. किती प्रकारचे बोलणे असते….

बोबडे, गोड, लाडात, रागावून, गुळमुळीत, स्पष्ट, चांगले, वाईट, हळू, जोरात, कानात बोलणे इ… यातही बोलणे पण पाठीमागे बोलणे यावर बरेच बोलणे होत असावे. अशा या बोलण्यातल्या विविधता जवळपास प्रत्येकात आहेत.

आपले वय, अनुभव, अधिकार, जबाबदारी, प्रसंग, काळ या बरोबर बऱ्याचदा बोलणेही बदलते.

बोलण्या बाबत काहिंचा हातखंडा असतो. म्हणजे त्यांना फक्त बोलण्यासाठीच बोलावले जाते. आणि ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर काहिंना आता गप्प बसायचं काय घेशील? असेही प्रेमाने विचारतात.

बोलणाऱ्याचा अभ्यास किती? यावरून देखील लोक बोलणाऱ्याची किंमत करत असतात. काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐक, असे सांगतात. तर काही वेळा त्यांच्या बोलण्याकडे  लक्ष देण्याची गरज नाही. असेही बोलून दाखवतात. काही बोलणे कानावर येते, तर काही आपण मनावर घेतो.

काहिंच्या बोलण्या बद्दल लिहिले जाते, तर काहिंच्या लिहिण्याबद्दल बोलले जाते. बोलण्याने माणसे जवळ येतात, तशीच लांब देखील जातात. प्रेम आणि कटुता, आपलेपणा आणि परकेपणा बोलण्यातून जाणवतो.

राग, द्वेश, अहंकार, प्रेम, गर्व, अभिमान, कौतुक, भावना या गोष्टी वागण्या बरोबरच बोलण्यातून जाणवतात. बोलण्यात स्वाभिमान असतो, तसेच बोलण्यात नम्रता, ताठरपणा देखील असते. बोलतांना नकळत माणसाचे अंतरंग जाणवतात.

बोबडे बोलण्याच्या कौतुकापासून, आजकाल वयोमानाने त्यांचे बोलणे नीट समजत नाही या सगळ्या अवस्थेत आपण वेगवेगळ्या पध्दतीने बोलत असतो. काही बोलून मोकळे होतात, तर काही मोकळेपणाने बोलत असतात. बऱ्याचदा कुणी आपल्याशी बोलावं किंवा आपल्या बद्दल (चांगले) बोलावं अशी इच्छा असते.

बोलण्यात ताकद आहे,  “बोलणाऱ्याची माती देखील विकली जाते.” असे म्हणतात. त्याच बरोबर “बोले तैसा चाले…” असेही म्हणतात. “लेकी बोले सुने…”, किंवा “बोलायची कढी…” हे देखील सर्वश्रुत आहे. “तिळगुळ घ्या… गोड बोला… ” असे सांगत आम्ही सण देखील साजरे करतो.

बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी समजतात. तर बऱ्याच गोष्टी बोलता बोलता करायच्या राहून जातात.

काही (राजकारणी) नुसतेच बोलत असतात. तर काही बोलण्यातून राज आणि कारण दोन्ही शोधत असतात.

काही मोजके, मुद्याचे, नेमके, आणि वेळेवर बोलतात. तर काहींना मुद्यावर या, नमनाला घडाभर तेल कशाला? असे सांगावे लागते.

काही वेळा घरातील अबोला देखील बरेच काही बोलून जातो. नुसत्या डोळ्यांच्या हालचालीने देखील काय बोलायचे आहे याचा अंदाज येतो.

पण बोलणे हे होते आणि लागतेच. काही वेळा मंडळी ठरवून एकत्र येऊन बोलणी करतात‌. तर काही वेळा बोलणी ऐकून घ्यायला लागतात.

मोठ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. तर लहान तोंडी मोठा घास हे देखील बोलण्याबाबतच असते.

असो, लिहिता लिहिता मनातले बरेच बोलून गेलो. मनातलं बोलण्यासाठी काही खास माणसं असतात. तर काही खास माणसं मनातलं बरोबर ओळखतात.

©  श्री कौस्तुभ परांजपे

जळगाव-महाराष्ट्र

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रेमाचा सप्ताह…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 प्रेमाचा सप्ताह 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

चौदा फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रेमाच्या सप्ताहातील शेवटचा पण सगळ्यात महत्वपूर्ण दिवस.व्हँलेंटाईन डे . हा दिवस सगळी मनाने आणि वयाने तरुण असणारी मंडळी कुणी उघडउघड तर कुणी मनोमन साजरा करतोच.

प्रेमात पडायला ना वयं लागतं ना रंगरुप. प्रेमात पडतेवेळी सगळीकडे ,सर्वत्र,चारोओर सदाबहार वातावरणच भासतं.तारुण्य हवचं असं काहीही नसतं,वयानं नसलं तरी मनानं चालतं.रंगरुपाची तर बातच सोडा कारण प्रेमात पडलेल्यांना सगळचं सुंदरच दिसतं.

प्रेम ह्या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी हो. प्रेम शब्द उच्चारल्यावर लगेच भुवया उंचावल्या जाण्याचं सहसा आपल्याकडे वातावरण. पण प्रेमात पडणं म्हणजेच काय तर ज्या व्यक्तीवर, गोष्टीवर,वस्तुवर आपण मनापासून प्रेम करतो म्हणजे ती गोष्ट आपल्याला मनापासून आवडणं

जवळपास अवतीभवती सतत हवीहवीशी, वावरावीशी वाटणं,तिचं अस्तित्व कायम मनाच्या कप्प्यांमध्ये सुरक्षित असणं,कुठलाही निर्णय घेतांना सल्ल्यासाठी त्या व्यक्तीची हटकून आठवण येणं.पावलोपावली त्या व्यक्तीला आतल्या आवाजाने मनापासून पुकारणं अथवा आपल्या व्यक्तीने आवर्जून घातलेल्या सादेला अगदी समरसून प्रतिसाद देणं,इतकी साधीसोप्पी प्रेमाची परिभाषा असतांना आपणचं त्याला वेगळं वळणं देऊन जरा क्लिष्ट आणि आडवळणाचं बनवतो बघा.

प्रेम म्हणजे प्रेम असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही काहीतरी वेगळेपण त्यात असतचं ।।

 

प्रेम म्हणजे काहींच्या मते त्यागात,

तर काहींच्या मते उपभोगात असतं,

असं हे प्रत्येकाचचं वेगवेगळं गणित असतं.।।

 

प्रेम हे काहींच्या मते अपेक्षा करण्यात असतं,

तर काहींच्या मते ते अपेक्षा पुरविण्यात असतं,

हे करणं वा पुरवणं दोन्हीही तसं रास्तच असतं,

असं हे प्रेमाचं समीकरणचं वेगवेगळं असतं.।।

 

प्रेम हे रोजच्या देखभालीत असतं,

तसचं ते लांबून काळजी घेण्यातही असतचं,

देखभाल असो वा काळजी करणं हे

वेगवेगळ्या त-हेनं शेवटी जीव लावणचं असतं।

 

प्रेम हे काहींच्या मते जवळीकेत असतं,

कधी प्रेम दुरून अनुभवण्यात पण असतं,

प्रेम हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्येत बसतं।

 

काहींच्या मते प्रेम हे घेण्यात असतं,

तर काहींच्या मते मनापासून ते देण्यातच असतं,

अश्या ह्या देवाणघेवाणीचं तंत्रच वेगळं असतं.।

 

म्हणून खरचं प्रेम हे प्रेमच असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळं

भासतं, कधी वेगवेगळं पण भासतं।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print