सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 229 ?

☆ मृदगंध ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 पुढच्याच महिन्यात पाऊस येईल,

मृगाचा!

जून मधला पाऊस मला खरा वाटतो,

तुझ्यासारखा!

दरवर्षी नवा !

— कोऱ्या पाठ्यपुस्तकांसारखा!!

त्या कोऱ्या पुस्तकांचा वास

आणि मृदगंध!

कुठल्याही सुवासिक फुलाला किंवा

महागड्या अत्तरालाही,

नाहीच त्याची सर !

 

नेमेचि येतो…..म्हणण्या सारखा,

नाही राहिला पाऊस!

तो ही आता बेभरवशाचा!

 

पण आठवणी नेहमीच

असतात भरोश्याच्या…शाश्वत!

मला जून मधला पाऊस,

जुन्या आठवणींच्या गावात घेऊन जातो !

ती शाळा..भिजलेली वाट…

वर्ग…खिडकी ..पाऊसधारा!

 

आपलं गाव दुष्काळी,

पण पाऊस नेहमीच असतो,

सुजलाम सुफलाम!

  वैशाख वणव्यात तापलेल्या

धरणीला तृप्त करताना,

दरवळणारा मृदगंध—

थेट प्राणात जाऊन पोहचलेला,

 

आणि सखे तू ही तशीच !

 

 म्हणायचीस,

“जिवंतपणी तर मी तुला विसरूच शकत नाही पण,

मेल्यानंतरही तुझी आठवण,

माझ्या आत्म्याबरोबर असेल”

आणि

तू  अकालीच निघून गेलीस….

पण थेट प्राणात रुतून बसली

आहेस—-

 

पाऊस कसाही मोसमी- बेमोसमी,

 

तू मात्र शाळेत असल्यापासून,

श्वासात भरून घेतलेल्या,

मृदगंधासारखी !!!

© प्रभा सोनवणे

४  मे २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments